सलामत हरी राया!!!

स्वप्ना हसमनीस's picture
स्वप्ना हसमनीस in जनातलं, मनातलं
1 Oct 2008 - 9:14 pm

मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो.
ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत.
त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात.
रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात.
कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या काळात आपापल्या गावी परतून आप्तेष्टांना भेटतात. ह्याला "बालिक काम्पुंग" असे म्हणतात.अतिशय प्रेमाने भेटवस्तूंची देवाणघेवाण होते.

दररोज संध्याकाळी "बुका पुआसा"ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.बुका पुआसा म्हणजे सूर्यास्त्तापश्चात् एकत्र येऊन सोडलेला उपवास!


रस्त्यांतून ठिकठिकाणी दिव्याची रोषणाई केली जाते.

महिनाअखेर ईद का चांद दिस्ल्यावर अईद्-इल-फित्री (रमजान ईद) साजरी केली जाते."सलामत हरी राया अईद्-इल-फित्री " असे म्हणून एकमेकांना शुभेच्छा देतात.

ह्या शुभदिनी स्त्रिया "बाजु कुरंग" आणि पुरुष " बाजु मेलायु" ह्या पारंपारिक पेहरावात दिसतात. पुरुष गोल काळी टोपी घालतात.लहानमोठे सर्व ह्याच वेषात वावरताना दिसतात.


येथील मुस्लिम लोक सौम्य स्वभावाचे,मनमिळावू व शांतताप्रिय आहेत.त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते मला नेहमीच जाणवते.
देशभरात उत्साहात आणि आनंदात साजरा होणार्‍या त्यांच्या ह्या सणात त्यांनी आम्हालाही आदराने व प्रेमभावाने सहभागी करुन घेतले.बुका पुआसाचे खास आमंत्रण,आदरातिथ्य ह्या सर्व गोष्टींचे वर्णन करावे तितके थोडेच.
त्यांना मनापासून म्हणावेसे वाटते "सलामत हरी राया"!!

संस्कृतीशुभेच्छाअनुभवआस्वाद

प्रतिक्रिया

छोटुली's picture

2 Oct 2008 - 9:12 am | छोटुली

मलेशियातील सणाचे वर्णन छान वाटले,नवीन माहिती समजली.स्वप्नाताई, तुम्हालापण 'सलामत हरीराया'!

प्रमोद देव's picture

2 Oct 2008 - 9:34 am | प्रमोद देव

मुसलमान लोक हरी राया हा शब्द वापरतात हे ऐकून मौज वाटली. पण त्यांच्या भाषेत त्याचा नेमका अर्थ काय आहे? आपल्याला अभिप्रेत आहे तोच की काही वेगळा? निव्वळ शब्द आणि उच्चार साधर्म्य तर नाही ना.
बाकी माहीती आवडली.

सर्किट's picture

2 Oct 2008 - 3:50 pm | सर्किट (not verified)

http://en.wikipedia.org/wiki/Hari_Raya_Aidilfitri

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

नंदन's picture

2 Oct 2008 - 4:21 pm | नंदन

विकी आणि गूगलवरून असं दिसतं की हरि राया = उत्सव/सणाचा दिवस.
कारण बालीतील हिंदू सणांनाही हेच नाव आहे.

त्यापेक्षाही प्वासा = उपवास असे असावे. पूर्वरंगमध्ये इंडोनेशियन मुस्लिम अभिनेत्री रोजांना उपवासा म्हणत असल्याचे नमूद करून ठेवलेले आहेच. या दोन्ही बहासांमध्ये (भाषांत) हा शब्द संस्कृतोद्भव असावा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वप्ना हसमनीस's picture

3 Oct 2008 - 7:41 am | स्वप्ना हसमनीस

लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद, पण केवळ लिंकवर विसंबून न रहाता माझा स्वानुभव मी येथे व्यक्त केला आहे.

तरीही मानवी अनुभवांना महाजाल हा पर्याय असू शकत नाही असे मला वाटते. :)

---डॉ.स्वप्ना

स्वप्ना हसमनीस's picture

3 Oct 2008 - 7:11 am | स्वप्ना हसमनीस

हरी राया ह्या शब्दाचा अर्थ आहे उत्सवाचा दिवस (Day of celebration). रमाधानच्या महिनाभराच्या उपवासांनंतरचा शुभ दिवस म्हणजेच हरी राया.
धन्यवाद!
---डॉ.स्वप्ना

विजुभाऊ's picture

3 Oct 2008 - 12:23 pm | विजुभाऊ

बहाशा मलेशिया मधे हरी = दिवस
राया = सण
साया बोलेह चकप बहाशा मलेशिया
साया = मी
बोलेह = शकतो
चकप = बोलणे
बहाशा मलेशिया = भाषा मलेशिया

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

चन्द्रशेखर गोखले's picture

2 Oct 2008 - 9:38 am | चन्द्रशेखर गोखले

फारच छान! फोटोन्मुळे सणात सहभागी झाल्याचा आन॑द मिळाला.समाधान वाटल.

चन्द्रशेखर गोखले's picture

2 Oct 2008 - 9:38 am | चन्द्रशेखर गोखले

फारच छान! फोटोन्मुळे सणात सहभागी झाल्याचा आन॑द मिळाला.समाधान वाटल.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2008 - 4:54 pm | प्रभाकर पेठकर

मलेशियन ईदची माहिती सुंदर शब्दात आणि छायाचित्रांसहीत दिली आहे. धन्यवाद.

अरबस्थानात रमझान (रामाधान) चे उपवास (रोझे) असेच पाळतात. उपासाला 'सोम' म्हणतात. रमझान मध्ये 'सोम' पाळण्याला 'रोझा' ठेवणे (पाळणे) म्हणतात.
पहाटे सुर्योदया पुर्वी जेऊन घ्यायचे. दिवस भर पाणीही प्यायचे नाही. (काही जणं थूंकीही गिळत नाहीत). सूर्यास्ताला मशीदीतून बांग दिली जाते. अशी बांग कानी पडल्यावरच फलाहार आणि खजूर खायचा असतो. (हलका, सहज पचेल असा आहार). त्यानंतर १० ते १५ मिनीटात दूसरी बांग होते. ही दिवस भरातील अत्यंत महत्त्वाच्या नमाजाची बांग असते. ही चुकविली तर उपवास केल्याचे पुण्य मिळत नाही. (अशी तरतूद मुद्दाम करून ठेवली आहे. दिवसभराचा उपवास सोडताना लोकांनी एकदम बकाबका भरमसाठ जेवू नये म्हणून) हे ४५ मिनिटांचे नमाज पठण केल्यानंतर तुम्ही कितीही जेवण्याखाण्यासाठी मोकळे असता.
उपास सोडताना फक्त फलाहार आणि खजूर सेवन करायचे असते. मशिदींमधून आणि काही उपहारगृहातून फळांच्या बशा मांडून ठेवलेल्या असतात. तिथे कोणीही जाऊन त्याचे विनामुल्य सेवन करू शकतो. (अगदी इतर धर्मियही). काही दानशूर मंडळी रमझानच्या महिनाभर अशा फळांचा, खजूराचा दानधर्म करतात.
पण, हल्ली रोझा सोडताना (दिवसभराच्या उपवासाने तोंडाची चव गेली असते म्हणून) लोकांचा कल चमचमीत भजी आणि मांसाहाराकडे झुकलेला आहे. बटाट्याची, वांग्याची, कांद्याची, उकडलेल्या अंड्याची, लांबट ढोबळी मिरचीची, पालकाच्या पानाची अशी अनेक प्रकारची भजी विक्रीसाठी असतात. त्याच बरोबर, तंदूरी चिकन, चिकन कबाब, छपली कबाब, बोटी कबाब, शीग कबाब असे अनेकविध पदार्थांची रेलचेल असते.
ईदच्या आधी महिनाभर सगळीकडे सगळ्याच वस्तूंचा सेल चाललेला असतो. आपण जशा महत्वाच्या (जसे फ्रिझ, टीव्ही, एसी इ.)खरेदी दिवाळीच्या सुमुहूर्तावर करतो तसे ते लोकं इदच्या सुमुहूर्तावर करतात. इदच्या दिवशी नवेकपडे घालून लहान मुले ओळखीतल्यांच्या घरी (आणि हल्ली अनोळखी घरीही) 'बक्षीश' मागत फिरतात. त्याला 'ईदी' मागणे म्हणतात. ही भीक नसते.
ही प्रत्येक लहानाला मोठ्याकडे मागायचा 'हक्क' असतो. त्यामुळे गरीब माणूसही 'ईदी' मागून आपला सण साजरा करू शकतो.
इदच्या सणाला दानधर्म करणे पुण्यकर्म असते. नोकरदार मध्यम वर्गापासून मोठमोठ्या व्यापार्‍यांपर्यंत जो तो आपल्या ऐपती प्रमाणे दानधर्म करतो. गरीब माणसे निदान आपल्या स्वतःच्या आणि नात्यातल्या मुलांना 'इदी' वाटतात. ह्या मंगल प्रसंगी सर्व जणं एकमेकांना 'ईद मुबारक' असे म्हणून अभिवादन करतात.
दूसरी ईद येते ती 'बकरी ईद'. ही 'ईद' 'रमझान ईद' नंतर ७५ दिवसांनी येते. ह्याला 'ईद अल् आधा' म्हणतात. तसेच 'बडी ईद' असेही म्हणतात. ह्या ईदला उपवास नसतात. पण बकर्‍याचा बळी देतात. (मला नेहमी आश्चर्य वाटते. 'बकरी ईद' म्हणायचे आणि बळी मात्र 'बकर्‍याचा' द्यायचा. असो.) असा बळी देऊन ते मांस सर्व आपण नसते खायचे. गरीबांना वाटायचे असते. जेणे करून गरीबांना वर्षातून एकदा तरी चांगले चुंगले खायला मिळावे. ह्या ईदला गायही कापतात. पुर्वीच्या काळी (१९९० पर्यंत) हे बळी देण्याचे प्रकार सर्रास उघड्यावर इमारतींच्या कंपाउंड मध्ये चालायचे. इतर धर्मियांना (विशेषतः हिन्दूंना) हे सर्व बघून खूप त्रास व्हायचा. पण पुढे सरकारने ह्या प्रकारांवर बंदी घातली नसली तरी ही बळी देण्याची क्रिया सार्वजनिक नजरेस पडू नये अशी काळजी घेण्याचे आवाहन केले. आमच्या बिल्डींग शेजारील इमारतीत एक पाकिस्तानी दर ईदला गाय कापायचा. ती गाय आदल्या संध्याकाळी विकत आणून कंपाउंडमध्ये बांधून ठेवायचा. दुसर्‍या दिवशी सकाळी कापायचा. पण बिचारी गाय (मृत्यू समोर दिसत असल्यामुळे कि काय...) रात्रभर केविलवाणी हंबरत असायची. त्या पाकिस्तान्याच्या शेजारी एक भारतिय गुजराथी कुटुंब राहात होते. दोन्ही कुटुंबात चांगला घरोबा होता. पण ईदच्या आदल्या दिवशी गाय आणली की ते गुजराथी कुटुंब गावातीलच त्यांच्या भावाकडे राहायला जायचे. त्या इमारतीत सगळे हिन्दू होते. 'बकरी ईद' ही मातम मनविण्याची (दु:ख प्रदर्शनाची) ईद असल्या मुळे ह्या ईदला 'ईद मुबारक' म्हणत नाहीत. मात्र ही जास्त उत्साहात साजरी करतात.
असो.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2008 - 6:29 pm | बिपिन कार्यकर्ते

'बकरी ईद' ही मातम मनविण्याची (दु:ख प्रदर्शनाची) ईद असल्या मुळे ह्या ईदला 'ईद मुबारक' म्हणत नाहीत. मात्र ही जास्त उत्साहात साजरी करतात.

काका, माझ्या माहिती प्रमाणे हे थोडे वेगळे आहे. इस्लामच्या दोन्ही ईद आनंदप्रदर्शनाच्याच आहेत. शिया लोकांचा 'आशरा मुहर्रम' (आपल्या कडे त्याला नुसतेच मुहर्रम म्हणतात) मात्र एक दु:खाचा मौका आहे.

बकरी ईद ची कथा आपल्या कडच्या चिलया बाळाच्या कथेशी बहुतेक जुळणारी आहे. इब्राहीम (ज्युडो - ख्रिश्चन परंपरेप्रमाणे पहिला पैगंबर) ला देवाने त्याच्या मुलाचा बळी मागितला. इब्राहीम जेव्हा खरंच बळी देऊ लागला तेव्हा देवाने प्रसन्न होऊन त्याच्या कडून मुलाऐवजी बकर्‍याचा (रॅम) बळी चालेल असे सांगितले. या घटनेचे स्मरण करण्याकरता या इद ला बळी देतात. इद्-उल्-अधा मधील अधा म्हणजे कुर्बानी. शिवाय या दिवशी हाज यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंना हाजी पदवी वापरता येते. म्हणून पण या दिवशी खूप आनंद साजरा करतात. या इद ला इदमुबारक म्हणू शकता. (मुहर्रम ला चुकूनही म्हणू नका, शियां ना तर नाहीच नाही). :)

मातम हा शब्दच मुळी शिया लोकांशी निगडीत झाला आहे.

बिपिन.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2008 - 7:30 pm | प्रभाकर पेठकर

असेल ही बिपिन,

माझे ह्या विषयावरील वाचन नाही. पण एका अरबाशी झालेल्या चर्चेत त्याने जी माहिती दिली त्याला अनुषंगून माझा प्रतिसाद आहे.
आता येईन तेंव्हा नक्कीच ह्यावर सखोल अभ्यास करीन. धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2008 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर

असो. आत्ताच गुगलवर तपासले असता कळाले की माझी माहिती चुकीची आहे.
कदाचित ज्या अरबाशी माझे बोलणे झाले तो मी कशाबद्दल विचारतोय ह्या बाबत गोंधळात असावा. ( भाषेची अडचण). किंवा जेंव्हा हा विषय सुरू झाला आमच्या दोघात तेंव्हा त्याच्या डोक्यात मुहर्रम बद्दल विचार चालू असावेत.

गुगल वर खालील माहीती आहे.
Brothers and Sisters, we have gathered here today with joy and happiness to celebrate the day of IDD AL ADHA, which as you know occurs on the tenth day of Dhil Hijjah, the 12th month of the Islamic lunar calendar. Today’s worldwide celebrations not only mark the end of this year’s annual pilgrimage to the holy city of Makkah but also commemorate Prophet Abraham’s inspirational willingness to sacrifice his son for God.

क्षमस्व, मिपाकरहो.

संजय अभ्यंकर's picture

2 Oct 2008 - 7:44 pm | संजय अभ्यंकर

तीन एक वर्षांपुर्वी मलेशियेत गेलो होतो.
तेथे अनेक गोष्टी आश्चर्य कारक होत्या.

मलाय भाषेची लिपी रोमन आहे त्यामुळे ती वाचता येते. थोडे लॉजीक वापरले तर काही शब्दांचे अर्थही कळू लागतात.
संस्कॄत भाषेचा प्रभाव अनेक ठिकाणी दिसुन येतो (स्थळांच्या नावात पुत्राजाया तसेच भूमीपुत्र बँक इ.)

मुस्लीम स्त्रीया डोके फडके बांधुन झाकतात. परंतू हायवेवर टोल गोळा करण्यापासुन अनेक कामे करतात. भारतात मुस्लिम स्त्रीया नोकरी करताना अभावानेच आढळतात.

ह्या देशाचे चलन १ रिंगीट = रू. १३ ते १४ आहे. तसेच युरोपा प्रमाणे वस्तु खूप महाग नसल्यामुळे आम्हा भारतीयांचा निभाव लागतो.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

स्वप्ना हसमनीस's picture

3 Oct 2008 - 7:29 am | स्वप्ना हसमनीस

मलेशियातील भाषेला बहासा म्हणतात.शब्दांचे उच्चार फोनेटीक असल्याने लिपि समजते. बहासाचा उगम संस्कृतपासूनच झाला आहे. येथे पुरातनहिंदू संस्कृतीचे अवशेष पहायला मिळतात.तसेच येथे तामिळी मलेशियन लोक बहुसंख्येने रहात असल्यामुळे हिंदू संस्कृती टिकून आहे.बरीच हिंदू देवळे आहेत.
ह्या देशाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे स्त्रियांना अत्यंत आदराने व सन्मानाने वगविले जाते असा माझा अनुभव आहे.

----डॉ.स्वप्ना

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2008 - 7:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त वर्णन केलंत स्वप्नाताई तुम्ही, आणि पेठकर काका आणि बिपीन साहेबांनी थोडी माहितीत भरही घातली.

स्वप्ना हसमनीस's picture

3 Oct 2008 - 7:33 am | स्वप्ना हसमनीस

अजुनही काही सचित्र माहिती देणार आहे.
---डॉ.स्वप्ना

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 8:11 pm | विसोबा खेचर

लेख आणि चित्र, दोन्हीही मस्त..!

तात्या.

स्वप्ना हसमनीस's picture

3 Oct 2008 - 7:31 am | स्वप्ना हसमनीस

मलेशियातील माझ्या काही अनुभवांवर लेख लिहिण्याचा माझा मानस आहे.
----डॉ.स्वप्ना

विसोबा खेचर's picture

3 Oct 2008 - 8:02 am | विसोबा खेचर

मलेशियातील माझ्या काही अनुभवांवर लेख लिहिण्याचा माझा मानस आहे.

स्वागत आहे, अगदी अवश्य लिहा..

तात्या.

सहज's picture

3 Oct 2008 - 8:04 am | सहज

लवकर येउ द्या.

लेख आवडला हेवेसांनल.

मदनबाण's picture

3 Oct 2008 - 7:28 am | मदनबाण

व्वा..छान लेख..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda