...लहान दिवा लवकर विझतो!

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in जनातलं, मनातलं
28 Dec 2016 - 3:24 pm

खूप दिवसांपासून लिहायचे होतेया विषयावर, पण राहून जात होते. कालच्या प्रसंगाने मात्र मला लिहायची इच्छा आवरता आली नाही.
झालं असं कि काल कामानिमित्त मुंबईत जाणे झाले. एकट्याने जायला कंटाळा आला आणि येताना समानहि होते आणायचे म्हणून जोडीला विकास नावाच्या मित्राला घेऊन गेलो. विरार ला पोचल्यावर त्याने एक आठवण सांगितली, विकासची एक वर्षाची पुतणी 3-4 महिन्यांपूर्वी आजारी पडली होती. न्युमोनिया झाला होतं तिला आणि त्यांनी तिला विरारमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. छोटीला उपचारांनी बरे तर वाटत होते पण रुग्णाच्या तब्बेतीतील प्रगती विचारल्यावर डॉक्टरांची उत्तरे कायमच घाबरवणारी असायची असे तो म्हणाला. अगदी एकदा तर डॉक्टर बोलता बोलता सहज बोलून गेले होते कि “सगळं ठीक आहे हो, पण लहान दिवा लवकर विझतो”.
आता छोटी अगदी गुटगुटीत आणि मजेत असूनही त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर लगेच शहारे आले तर विचार करा कि त्या परीस्थित छोटीच्या आईवडिलांना काय वाटलं असेल? विकासच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर लगेच मलाही मागील काही महिन्यातील प्रसंग आठवले, काही डॉक्टर्स अगदी कुशलतेने वापरत असलेले हे धक्कातंत्र कधी बंद करतील? रुग्णांच्या स्वास्थ्याच्या प्रगतीबाबातीत असली वाक्यं त्याच्या कुटुंबाला दिलासा देत असतील असे वाटत का त्यांना?
सहा महिन्यांपूर्वी माझ्या अंबरनाथ मध्ये मित्राच्या बायकोला सतत पोटात दुखण्याचा त्रास होत होता. फॅमिली डॉक्टरांनी सांगितल्यावर एका स्त्रीरोगतज्ञांना दाखवले तर ते म्हणतात कि तिच्या गर्भाशयात गाठ आहे आणि तिला आजच्या आज आमच्याकडे दाखल करून घेऊन दोन दिवसांच्या आत शस्त्रक्रिया करावी लागेल, शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचा खर्च किमान ३५,००० रुपये होणार होता(शस्त्रक्रियेनंतर लागणारी औषधे आणि गरज पडल्यास इतर चाचण्याचा खर्च वगळता). अचानक उद्भवलेल्या या समस्येला सामोरं जाण्यासाठी सगळी जुळवाजुळव करण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. सगळे मिळून किमान ५०,००० रुपये जमा करायचे होते आणि रुग्णाबरोबर हॉस्पिटलमध्ये कोणीतरी स्त्रीचे असणेही गरजेचे होतेच. अवसान गळून गेलेल्या अवस्थेत त्याने मला फोन केला. ती दोघंही घाबरली होती. मी आधी त्याला शांत केले आणि सगळ्यात आधी त्याचा बायकोचे सगळे रिपोर्ट्स मला इमेल करायला सांगितले. ते रिपोर्ट्स तडक माझ्या फॅमिली डॉक्टरांना दाखवले(तो इकडे रहात असताना ते त्याचेही फॅमिली डॉक्टर होते.) त्तांना थोडा संशय आला, त्यांनी ते आमच्या स्त्रीरोगतज्ञांना दाखवले तर खरा प्रकार कळला. गर्भाशयाच्या मार्गात एक गाठ तयार होत होती हे खरे असले तरी असे तडकाफडकी शस्त्रक्रिया करण्याची गरज नव्हती. दुसर्या दिवशी मित्राला सपत्नीक बोलावून स्त्रीरोगतज्ञांना भेटायला घेऊन गेलो, सोनोग्राफी केल्यानंतर आठवड्यानंतर येणाऱ्या सुट्ट्यांच्या तारखा ठरवून रीतसर शस्त्रक्रिया करून घेतली. दोन दिवसानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. एकूण खर्च १५,००० रुपये फक्त! आधीच्या हॉस्पिटलच्या अंदाजे खर्चापेक्षा किमान २५,००० रुपये कमी.
पुढील प्रसंग तर भयावह आहे. झाले असे कि माझ्या ऑफिस मध्ये काम करणारे एक गृहस्त वारंवार होणार्या खोकल्याने त्रस्त होते. मुंबईच्या एक प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये ते गेले तेव्हा सगळ्या तपासण्या केल्यानंतर त्यांना पुप्फुसांचा कर्करोग असल्याचे समजले. तोही शेवटच्या स्थितीतला. त्यांच्या वैद्यकीय रिपोर्ट मध्ये तसे स्पष्टपणे लिहिले होते सामान्य माणसाला कळेल अश्या भाषेत(आम्ही स्वत: ते रिपोर्ट्स वाचले होते). तर हे रिपोर्ट्स घेऊन ते गृहस्थ एका डॉक्टरकडे गेले होते आणि ते रिपोर्ट्स बघून डॉक्टरांनी सांगितले कि “काही विशेष नाही, एक छोटीशी शस्त्रक्रिया केली कि सगळं ठीक होईल.” इकडे रुग्णाने जेव्हा ऑफिसमध्ये वारीष्ठ्नांना हे रिपोर्ट्स दाखवले तेव्हा वरिष्ठांनी खरी परिस्थिती त्या गृहस्थाला सांगितली(आतापर्यंत या ऑपरेशन वाल्या डॉक्टरने त्यांना काहीही खरे सांगितले नव्हते). आता माझीं मुलं आणि बायकोचं काय होईल? माझ्याकडे सहा महिनेही नाहीत असं म्हणत त्यांना ढसाढसा रडताना मी पाहिलेय. अपेक्षेप्रमाणे ६ महिन्यांच्या आत त्यांचा अंत झाला. जर रिपोर्ट्स मधले खरे काय ते रुग्णाला कळले नसते तर आमच्या गावाकडच्या डॉक्टरने खरेच त्याची शस्त्रक्रिया केली असती? एवढा स्वार्थीपणा?
तीन दिवसापूर्वीच सकाळी बातम्यांमध्ये पाहिलं कि महाराष्ट्रातल्या दोन शहरांतील वैद्यकीय तपासणी केंद्रांनी कट विरोधात प्रॅक्टिस आवाज उठवला तर वैद्यकीय तपासण्यांचे शुल्क लक्षणीयरीत्या घातले(रु.५००० ऐवजी रु.३५००, रु.२५०० ऐवजी २०००/-) म्हणजे कट प्रॅक्टिस करणारे हे काही डॉक्टर्स रुग्णांना किती लुबाडत असतील?
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि हे सगळे मी सगळ्याच डॉक्टरांबद्दल बोलत नाहीये, खरोखरच सेवाभावाने रुग्णांसाठी कार्य करणारे डॉक्टर्स मी बघतो रोजच. रुग्णांना परवडतील अशीच औषधे सुचवणे, गरिबांकडून कमीत कमी शुल्क घेणे हे सगळे ते करत असतात. काहीजण शाळांमध्ये वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देतात, समुपदेशन करतात आणि आरीओग्या तपासणी शिबिरांमध्ये जाऊन मोफत सेवाही देतात, माझ्या भोवतालच्या ग्रामीण आणि मागास भागामध्ये हे प्रकर्षाने दिसते. अशांना मी मनोमन दंडवत घालतो. पण लोकांच्या भीतीचा असा गैरफायदा घेणारेही कमी नाहीत. तुम्ही आयुष्याची पाच-दहा वर्षे आणि लाखो रुपये खर्ची घालून जे ज्ञान मिळवलेत त्याचा आम्ही आदर करतो, अगदी तुम्हाला देवासमान मानतो पण आमच्या विश्वासाचा आणि भीतीचा जो गैरफायदा आपण लोकं घेता ते कितपत योग्य आहे?

समाजअनुभव

प्रतिक्रिया

असा अनुभव मलाहि आईच्या बाबतित २००० साली आला होता. ईसिजि नॉरमल आला नाहि म्हणुन ताबड्तोब दवाखान्यात दाखल करण्यास सान्गितले.शस्त्रक्रिया करावी लागेल सान्गितले. दुसर्या ठिकाणी दाखवले तर अजुन तपासण्या करायला सान्गितले.
लगेच शस्त्रक्रियेचि गरज नाहि असे सान्गितले. आज परयन्त शस्त्रक्रिया करावी लागलि नाहि.

सिरुसेरि's picture

28 Dec 2016 - 5:49 pm | सिरुसेरि

सुन्न

टवाळ कार्टा's picture

28 Dec 2016 - 5:52 pm | टवाळ कार्टा

डॉ.खरे यांच्याकडे जा

एकनाथ जाधव's picture

30 Dec 2016 - 1:50 pm | एकनाथ जाधव

हेच सान्गणार होतो