अजि म्यां बी बर्म पाहिले...

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जनातलं, मनातलं
30 Sep 2008 - 2:15 pm

स्वर्गातल्या त्या सुरम्य उपवनात बहरलेल्या प्रजक्ताखाली भाईकाका मनातल्या मनात एक बंदिश जमवीत होते. तितक्यात वाघ मागेलागल्यासारखे धापा टाकीत रावसाहेब पुढ्यात येऊन ठाकले.

" अहो पी यल्ल! हितं काय करताय एवढं सक्काळी, सक्काळी म्हणतो मी?"
" कांही नाही हो. एक चाल बांधत होतो. कां? काय झालं?"
" ते चाल लावायचं सोडून सोडा हो. खाली कुणी तरी करतंय हो ते काऽऽम."
"अरे वा! खाली कांही नवीन मंडळी सांगितिक प्रयोग करताहेत असं कानावर आलं होतं. तुम्ही कुणाबद्दल बोलताय?"
" कोण तर ते नवीन आहे बघा. एक कोण ते मोद बुवा म्हणे!"" पण राव साहेब तुम्हाला एवढं रागवायला काय झालं?"
" पण आपण नवोन्मेषी प्रतिभा-कोंबांच्या सृजनाचे स्वागतच करायला हवे. त्याशिवाय कां कलावृक्ष कल्पांतापर्यंत बहरलेला राहील."
सखाराम गटणे तिथे कधी येऊन पोहोचला ते समजलेच नाही.
" करा कि वो. ते कोंब का बोंब काय ते, त्याचं स्वागत करा कि वो. पण ते स्वोत्ताला बुवा गिवा म्हणवून घ्यावं काय रे? शिव शिव पापच कि हो!"
" कां त्यात एवढा कोपोद्रेक होण्य़ासारखे काय आहे?" पुन्हा सखाराम गटणेचे दात खडखडले.
"अरे बुवा म्हट्‌लं की ते कागलकर बुवा, वझेबुवा, झालंच तर विनायकबुवा असलं मातब्बर देव माणूस डोळ्यासमोर हुबं राहतं की. नुसतं हुंबपणा करून चालत नाही की रे. त्याच्या सारखं एक तान घेऊन दाखवा कीऽऽ. मुळव्याध होतयं कि नाही बघा."
इथं रावसाहेबांचा हात आपसुक कानाकडे गेला.
"तेंच्च तर म्हणतो मी जांवय बापू. कल्हयवाल्यान्‌ जाकीट घातलेन्‌ म्हणून त्याचा कांही नेहरू होत नसतो"
अंतूशेठ नेहेमीप्रमाणे अवचित येऊन टपकलेच.
" सबूर. मी सांगतो...."
अरे, हरितात्या तुम्ही कधी आलात?
" हा काय आत्ताच येतोय. थोरल्या श्रीमंतांचे बाबत कांही रुमाल पहावे म्हणून इंद्राच्या दरबारात गेलो होतो.... वाट्लेंच मला पुर्ष्या तू असा ढ बाबूसारखा पहाणार तें.... अरें आता इंद्राने देखील ते ईन्टरनेटावर बरेच दप्तर उपलब्ध करोन ठेवले आहे. त्यात कांही धांडोळा घेत होतो तों मध्येच हे मोदबुवांचे गाणे ऐकू आले. बाशिंदा नवशिका आहे करा.पण अगदीच बाजारबुणगा नाही. अबलख वारूवर मांड ठोकली आहे. ती गळोन न जातां नेटास नेईल तो आणखी एक झेंडा अटकेपार होईल. यात आम्हाला कांही शक नाही .
अरे पुराव्याने शाबीत करील तो."

तेवढ्यात दुरून कुठून तरी 'बा अदब, बा मुलाजिजा, क्षत्रिय कुलावतंस......’ 'अशा ललकार्‍या कानावर येऊ लागल्या.

" बापरे, महाराज फेरफटक्यास निघाले वाटतं" असं म्हणत हरितात्या डोईवरची शिंदेशाही पगडी सावरत तिकडे धावले. अंतुशेठ मात्र अण्णू गोगट्या झालेल्या तोंडाचा चंबू करून एक डोळा किलकिला करीत त्रासिक चेहर्‍याने पाठमोर्‍या हरितात्यांकडे पहात राहिले. त्यांना जांवय बापूंबरोबर गंजिफाचा एक डाव टाकायची लहर आली होती. पण भाईंची गान समाधी लागलेली पाहून हेगिष्टेंना कुठे गठावे याचा विचार ते करू लागले. रावसाहेब ' हे म्हाराज आणि हितं कशाला तडमडतंय आत्ताऽच.' असं काहीसं पुटपुटत काढता पाय घेऊ लागले. तशीही या माणसाला अशा गर्दीची संवय नव्हतीच.

त्या ललकार्‍यां पाटोपाठ तुतार्‍या आणि शहाजणेही वाजू लागली.
पण कां कोणास ठाऊक, तुतार्‍यांचा आवाज आज नोकिया ट्यून सारखा ऐकायला येत होता.
...............
...............
...............
...............
...............
...............

काल रात्रीच मी मोबाईल वर गजरासाठी नोकिया ट्यून सेव्ह केली होती.

कथालेख

प्रतिक्रिया

झकासराव's picture

30 Sep 2008 - 2:21 pm | झकासराव

:))
फर्मास जमलय हो. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रमोद देव's picture

30 Sep 2008 - 2:33 pm | प्रमोद देव

काय राव! आमी वाट बगुनशान र्‍हायलो व्हतो की आता जुगलबंदी रंगनार म्हनून. पन तुमी बी आय्त्या येली घात केलासा! 8>

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 3:30 pm | विसोबा खेचर

अरूणराव,

अहो चांगली जमली होती की मैफल! इतक्या लौकर आटपती का घेतलीत? :)

सख्याच्या एन्ट्रीचे वाक्य तर खासच.. :)

असो, आमच्या गुरुजींच्या काही व्यक्तिचित्रांची एक मांदियाळी असलेला हा छोटेखानी लेख छानच वाटला.. :)

आपला,
(भाईकाकांचा लखु रिसबुड) तात्या.

अरुण वडुलेकर's picture

1 Oct 2008 - 7:34 pm | अरुण वडुलेकर

मोदबुवा,
तुमच्या म्हागुटनं चालावं म्हन्लं. पन लै अवगाड बगा. भाईकाका आमचं बी लै खास दैवत. त्याच्या पायरीला हात लावाय जरा भाव वाटतं बगा.
तुमी मागं असलं काय तरी करा म्हनाला व्हता. पन छाती जाली न्हाई. आता तुमच्या नादानं जरा एक दम घातला बगा. तुमी समद्यांनी पास केला तर
पुन्न्यांदा कायतरी करून बघू. तवर रामराम.

रिकामा नाना

तात्या,

भाईकाका, तात्याराव, मारियो पझो, आयन रँड ही आमची टेक्ट बुकं.
त्यातले त्यात भाईकाका तर आमचे ही द्रोणगुरूच. आजवर जे कांही पांढर्‍यावर काळं केलं,
ते भाईंचीच अक्षरे गिरवीत. ही मैफल मलाही अजून रंगवायची होती. पण त्यासाठी पुन्हा एकदा
ते गणगोत अभ्यासावे लागेल. लखूला तर मी विसरलोच होतो. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली.
तसा आता नाथाही आठवला. ही मैफल सीईटी समजा. पुन्हा एकदा बोर्डाच्या परीक्षेला मी बसेनच.
तुमची प्रतिक्रिया म्हणजे असली दाद होती.विशेषतः सखारामच्या एन्ट्रीचे
पण आपण नवोन्मेषी प्रतिभा-कोंबांच्या सृजनाचे स्वागतच करायला हवे. त्याशिवाय कां कलावृक्ष कल्पांतापर्यंत बहरलेला राहील
हे वाक्य तुम्हाला आवडले, ही खरी दाद. बाकी सगळे समेवर 'वाह!'म्हणतातच्.असो.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
अरूण वडुलेकर
(किंचित् रावसाहेब)

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 12:30 am | विसोबा खेचर

भाईकाका, तात्याराव, मारियो पझो, आयन रँड ही आमची टेक्ट बुकं.

वा! काय सुंदर वाक्य आहे!

तसा आता नाथाही आठवला. ही मैफल सीईटी समजा. पुन्हा एकदा बोर्डाच्या परीक्षेला मी बसेनच.

हरकत नाही. टेक युअर ओन टाईम. मी वाट पाहीन .. :)

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2008 - 7:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरूणराव, येऊद्यात अजून ... मस्त लिहिता!

प्राजु's picture

1 Oct 2008 - 8:06 pm | प्राजु

मैफल फारच लवकर आटोपती घेतलीत हो..
जरा रंग चढू लागला होता.. तर तो पर्यंत तुतारीच वाजवलीत..
मस्त झालंत लेखन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

2 Oct 2008 - 5:29 am | नंदन

वा!, खूप दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले. मैफल मस्त जमली होती, पण लवकर संपली :(
पुढचा विस्तारित भाग लखू, नाथा, नारायण, बापू काणे,तो, पेस्तनकाका, चितळे मास्तर या सार्‍यांसह येऊदेत :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

छोटुली's picture

2 Oct 2008 - 9:48 am | छोटुली

पु.लं. ची सगळी व्यक्तिचीत्रे एकत्र जमविलीत कि काय ? अजून काहि बाकि आहेत ,त्यांनाही आनायचे होते ना!