हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली.
नरकचतुर्दशीच्या सुमुहूर्तावर थेटरात स्थानापन्न झालो. रिकाम्या खुर्च्या मनांत धडकी भरवत होत्या. पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि आम्हाला, दर क्षणाला, साक्षात त्या भगवान शंकराचे दर्शन होऊ लागले. अजय देवगण हा साक्षात 'शिवाय' म्हणजे शंकराच्या रुपात हिमालयाच्या उंच शिखरांमधे लीलया बागडत होता. अत्युच्च शिखरांवरुन खालच्या भयाण दरीमधे अंग झोकून द्यायचे आणि कंटाळा आला की एखाद्या कड्यावर हुक अडकवून मस्त झोके घ्यायचे. काही अपघात, होणे शक्यच नव्हते कारण तेच! साक्षात शिवाय (अभिनयाशिवाय, अशी एक हीन कोटी मनांत चमकून गेली.) तर अशा त्या भोलेनाथला मधेमधे चिलिम ओढताना दाखवणे क्रमप्राप्तच होते, प्राणवायु कमी असला तरी! ज्यांच्या पराक्रमाने छाती ५६ इंचाची होते, अशा भारतीय सैनिकांनीही शिवायच्या लीला पाहून तोंडात बोटे घातलेली दिसतात तेंव्हा ती छाती ५६ ची ६६ इंच होते की काय, अशी आम्हाला धास्ती वाटत होती.
अर्थातच आमच्या या शिवायला गिर्यारोहणासाठी आलेली एक बल्गेरियन पार्वती भेटते. त्यांचे प्रेम काय, असे तसे असणारे ? हिमवादळात सुद्धा, इतरांना वाचवून झाल्यावर हा महादेव पार्वतीसह एका टांगत्या तंबूत प्रणयाची रात्र रंगवतो. निसर्गधर्म द्येवालाही चुकला नाही. पार्वती पोटुशी रहाते. तिला परत जायचे असते माहेरी. पण शंकराच्या रिक्वेस्टवरुन ती मुलीला जन्म देऊन जाते कायमची माहेरी. शंकराला मुलगी कशी, हा प्रश्न नाही विचारायचा. परत ती मुलगी मुकी पण बहिरी नाही. बल्गेरियन पार्वतीला आणि तिच्या मुलीला जन्मजात हिंदी येतच असतं. तान्ही असल्यापासून शिवाय तिला पाठीशी बांधून हिमशिखरांत बागडण्याचे काम चालूच ठेवतो. एकदा मुलीला आईचा फटु आणि लेटर सापडते. बालहट्टापुढे शिवाय शरण. मुलीसकट बल्गेरियाला निघतो. कारण तिथे तांडवनृत्य करुन बालकांचे लैंगिक शोषण करणार्या आंतरराष्ट्रीय नरराक्षसांचा संहार करण्याचे स्क्रिप्ट विष्णुनेच लिहून ठेवले असते. त्यांतच संकर्याच्या मुलीचेच अपहरण होते. आरारारा! मग काय होणार ? तो तिसरा डोळाच उघडतो. एकदा तिसरा डोळा उघडल्यावर समोर येईल ते भस्म! शेवटच्या मारामारीत तर बर्फाचे डोंगर बघून शिवाय ला होमपिच मिळाल्याचा अत्यानंद होतो आणि बर्फाच्या त्रिशूळानेच तो म्येन व्हिलनचा वध करतो. आता या आधुनिक शंकराला मदत करायला, तिथली भारतीय एम्बसी, त्यातील आणखी एक पार्वतीचा रोल करायला उत्सुक असलेली सुंदरी मदत करते. शेवटच्या प्रसंगात पुन्हा ती अँग्लो-इंडियन मुलगी बापाला रडवते. साक्षात भगवान असल्यामुळे त्याला कुठल्याच देशाचे कायदेकानून लागू नसतात, कैलासावर परत येण्यासाठी.
चित्रपट संपल्यावर भगवान शंकराला मुलगी होती का, यावर गुगल शोध घेण्याचे मनोमन ठरवूनच ओम नमः शिवाय चा जप करत घरचा रस्ता धरला.
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 9:02 pm | यशोधरा
साक्षात शिवाय (अभिनयाशिवाय) >> =))
भारी लिहिलेय! मेर्कू देखनेका हय ये शिन्मा!
29 Oct 2016 - 9:34 pm | संदीप डांगे
I don't know who you are. I don't know what you want. If you are looking for ransom, I can tell you I don't have money. But what I do have are a very particular set of skills, skills I have acquired over a very long career. Skills that make me a nightmare for people like you. If you let my daughter go now, that'll be the end of it. I will not look for you, I will not pursue you. But if you don't, I will look for you, I will find you, and I will kill you.
29 Oct 2016 - 9:44 pm | कैलासवासी सोन्याबापु
लियाम निसन!!
_______/\______
29 Oct 2016 - 9:35 pm | रेवती
परिक्षण भारी झालेय.
आता या शिनेमाच्या वाटेला जाणार नाही.
29 Oct 2016 - 9:37 pm | यशोधरा
उलट हे परिक्षण सोबत घेऊन जायचे! मज्जा यील!
29 Oct 2016 - 9:38 pm | रेवती
चालतय की! पण आपली ग्यांग सोबतीला हवी म्हणजे पुरता धुव्वा उडवता येईल. ;)
असले 'काहीही हं' सिनेमे निघूच कसे शकतात?
29 Oct 2016 - 9:40 pm | यशोधरा
तू इकडे येतेस की मी तिकडे येऊ?
29 Oct 2016 - 10:15 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या ह्या! =))
जबराट हानलय! अता ह्याच्या शिवाय कंचा शिवाय?
29 Oct 2016 - 11:05 pm | कविता१९७८
हा हा हा वाटलच होत असा सिनेमा असणारे
4 Nov 2016 - 2:00 pm | पाटीलभाऊ
हाहा..भारी परीक्षण...!
4 Nov 2016 - 2:11 pm | नाखु
सिनेमा संपल्यावर नावाची सरमिसळ होऊन येणारा शब्द प्रेक्षकांना म्हणावसा वाटत असेल "शिव्या"
परीक्षण थोडक्यात संपवले त्यामुळे बाकी "पात्रांवर" अन्याय झालाय का ? त्यांनी कुठे दाद मागायची?