पिसूक....
(पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.)
पहाटे पडलेल्या चित्रविचित्र स्वप्नांमुळे ग्रेगॉर दचकला व गाढ झोपेतून उठला. त्याने हात ताणायचा प्रयत्न केला आणि तो उडालाच. त्याचे ह्रदय धडधडू लागले. त्याचे चक्क एका मोठ्या किड्यात रुपांतर झाले होते. त्याच्या चिलखतासारख्या पाठीवर तो असाह्यपणे त्याचे काटकुळे हातपाय अधांतरी हलवीत तो बिछान्यावर पहुडला होता. त्याने त्याची मान जरा उचलली. घुमट्यासारख्या गुबगुबीत पोटाच्या वळ्या त्याच्या नजरेस पडल्या. त्या गुळगुळीत पोटावर त्याचे पांघरुण टिकणे शक्यच नव्हते. ते खाली खाली घसरत चालले होते. थोड्याच वेळात ते पलंगावरुन खाली पडेल असे त्याला वाटले. त्याने ते सावरुन घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचे ते असंख्य काटकुळे हातपाय नुसतेच हवेत अधांतरी हवेत हलत राहिले.
काय झाले आहे मला ? तो स्वत:शी पुटपुटला. हे स्वप्न तर नाही ? पण ते स्वप्न नव्हते. कारण त्या खोलीच्या भिंतीत कोंडलेली त्याची खोली त्याच्या चांगलीच ओळखीची होती. साधारणत: ज्या आकाराची खोली असते त्यापेक्षाही थोडी लहान अशी ती खोली. कोपऱ्यातील छोट्या टेबलावर कापडाचे काही तुकडे अस्ताव्यस्त पडले होते. टेबलावर एक चांदीची चौकट होती ज्यात ग्रेगॉरने एका मासिकातून कापलेला एका स्त्रीचा फोटो होता. सरळ बसलेल्या त्या स्त्रीच्या खांद्यावर फरची शाल होती व तिचा एक हात त्या गुबगुबीत शालीच्या आड नाहीसा झाला होता. त्याने नजर खिडकीबाहेर भरुन आलेल्या आभाळाकडे टाकली. पागोळ्यातून गळणाऱ्या थेंबाचा एकसुरी आवाजाने तो थोडासा उदास झाला. हा सगळा बावळटपणा बाजूला सारुन झोपूया का अजून थोडा वेळ ? त्याने विचार केला. पण ते शक्य नव्हते कारण त्याला उजव्या कुशीवर झोपायची सवय होती आणि आत्ताच्या परिस्थितीत तो कुशीवर वळू शकत नव्हता. त्याने परत एकदा कुशीवर वळण्यासाठी जोरदार प्रयत्न केला पण तो परत पूर्वस्थितीवर आला. त्याने आपले केविलवाणे पाय दिसू नयेत म्हणून डोळे बंद केले आणि परत शंभरएक वेळा तरी प्रयत्न केला. शेवटी उजव्या बाजूला एक चमक उठल्यावर त्याने तो प्रयत्न सोडून दिला.
‘ शीऽऽ कसला व्यवसाय पत्करलाय मी ! दिवसरात्र प्रवास ! काम कमी आणि प्रवास जास्त. कार्यालयात बसून काम करणे केव्हाही मस्त. शिवाय प्रवासात तिकिटाची काळजी, जेवणाची आबाळ, आणि मुख्य म्हणजे असंख्य होणाऱ्या ओळखी. नुसत्याच ओळखी. त्यातील एकही खरा मित्र होऊ शकत नाही.’’ याचा त्याला सगळ्यात तिटकारा वाटता असे.
त्याच्या पोटावर थोडीशी खाज सुटली. तो कसाबसा पाठीवर जोर देऊन थोडा वर सरकला. उशीवर त्याचे डोके जरा वर झाले. त्याने जेथे खाज सुटली होती तेथे नजर टाकली. तेथे त्याला असंख्य पांढरे ठिपके दिसले. ते कसले आहेत हे न उमजून त्याने त्याला पाय लावला आणि विजेच्या वेगाने परत मागे घेतला. तेथे पाय लागताच त्याच्या शरीरातून एक कळ उठली व मस्तकाला भिडली.
तो परत खाली घसरला व त्याच्या मूळ जागेवर आला. ‘‘ हे पहाटे उठणे वगैरे म्हणजे शुद्ध बावळटपणा आहे.’’ तो मनाशी म्हणाला.
‘‘ माणसाला कशी भरपूर झोप पाहिजे. बाकीचे विक्रेते एखाद्या बेईमान वेश्येसारखे उंडरतात. मी जेव्हा पहाटे ऑर्डर लिहित असतो तेव्हा हे सकाळचा नाष्टा हाणत असतात. मी जर असे केले तर साहेब मला जागेवरच नोकरीवरुन हाकलेल. अर्थात तसे झाले तर बरेच होईल म्हणा. कदाचित त्यातच माझा उज्वल भविष्यकाल दडलेला असेल. समजा तसे नाही झाले तरीही त्याची कटकट तरी संपेल. आईबाबांमुळे माझे हात बांधलेले आहेत, नाहीतर मी केव्हाच त्याच्या तोंडावर राजिनामा फेकून मारला असता. त्याच्या समोर मला त्याच्याबद्दल काय वाटते हे त्याच्या तोंडावर स्पष्ट सांगितले असते. ते ऐकून तो त्याच्या खुर्चीवरुन उडाला असता. साल्याची बसायची पद्धत तरी कशी उद्दाम आहे. याचे टेबल उंचावर मांडले आहे आणि याला कारकुनांकडे खाली पहात बोलण्याची भारी हौस. बिचाऱ्यांना त्याच्याजवळ जावेच लागते कारण साल्याला ऐकूही येत नाही धड. बाबंचे पैसे परत करण्यासाठी अजून सहासात वर्षे तरी येथे नोकरी करावी लागणार. एकदा पैसे साठले की मी त्याला फाडून खाणार हे निश्चित. त्यावेळी मात्र मी स्वत:वर कसलाही ताबा ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. पण आता उठावे हे बरे ! पाचची लोकल आहे ना ! ’’
त्याने कपाटवर ठेवलेल्या गजराच्या घड्याळावर एक नजर टाकली. ‘‘ अरे बापरे ! ’’ तो किंचाळला. साडेसहा वाजले होते आणि काटे संथपणे पुढेच जात होते. मोठा काटा तर जवळजवळ तीनवर आला होता. गजर वाजला नाही की काय ? पण घड्याळात सहाचा लावलेला गजर स्पष्ट दिसत होता. बहुतेक करुन तो वाजला असणार. गजराचे जाऊ देत. पण त्या गोंगाटात कशी काय झोप लागली? त्याला गजर ऐकू येणार नाही एवढी गाढ झोप तर निश्चितच लागली नव्हती. पण आता काय करायचे हा खरा प्रश्र्न होता. पुढची गाडी सातला होती. ती पकडण्यासाठी त्याला जिवघेणी कसरत करावी लागणार होती आणि त्याने अजून बॅगही भरली नव्हती. तसा त्याला कामावर जाण्याचा उत्साह राहिला नव्हता हेही खरं होतं. सहेबाची कटकट टाळण्यासाठी जरी त्याने सातची गाडी काहीतरी करुन पकडली असती तरी व्हायचा तो गोंधळ झालाच असता. तो नेहमी ज्याच्याबरोबर कंपनीत जात असे त्याने तो सहाच्या गाडीवर फिरकला नव्हता हे आत्तापर्यंत साहेबाच्या कानावर घातलेच असणार. तो कारकून म्हणजे साहेबाचा एक नंबरचा चमचा आणि मूर्ख होता. ‘‘आजारी होतो अशी थाप मारली तर ?’’ तो मनाशी म्हणाला. पण त्याच्यावर कोणाचाही विश्र्वास बसला नसता कारण गेल्या पाच वर्षात तो एकदाही आजारी पडला नव्हता. आणि साहेब विम्याचा डॉक्टर घेऊन घरी अवतीर्ण झाला असता ते वेगळेच. या डॉक्टरांचा जगातील प्रत्येक आजारी माणूस हा ढोंगी असतो या तत्वावर ठाम विश्र्वास असतो. दुर्दैवाने यावेळी मात्र ते खरं ठरलं असतं. त्याला तशी काहीच धाड भरली नव्हती. त्याला फक्त गाढ झोपेनंतर एक गुंगी चढली होती आणि त्याला भयंकर भूक लागली होती. हे जरा विचित्रच होतं.
या विचारांची त्याच्या मेंदूत वेगाने उलथापालथ होत होती. त्याला त्यामुळे उठावे की नाही यावर निर्णय घेता येत नव्हता. तेवढ्यात त्या घड्याळात पावणेसातचा ठोका पडला. त्याच वेळी पलंगाच्या मागे असलेला दरवाजा कोणीतरी हलकेच ठोटावला.
‘‘ग्रेगॉर ! एऽऽ ग्रेगऽऽ त्याच्या आईचा मृदू आवाज आला,
‘‘ पावणे सात वाजले. तुला लोकल पकडायची नाही का आज ?’’
तिला प्रतिसाद देताना स्वत:चा आवाज ऐकून ग्रेगॉर हादरला. त्याचाच आवाज होता तो. त्याबद्दल शंकाच नाही. पण त्या आवाजाच्या मागे खर्जामधे एक खरखर अखंड चालू होती. त्यामुळे त्याच्या घशातून बाहेर पडणारे शब्द पहिले काहीच क्षण स्पष्टपणे ऐकू येत होते. नंतर ते एकमेकांवर आपटून त्यांचा अर्थ उमजत नव्हता. ग्रेगॉरला खरेतर आईला नीट उत्तर द्यायचे होते पण या भानगडीमुळे तिला ते समजेल का नाही याची खात्री नसल्यामुळे त्याने अगदी थोडक्यात उत्तर दिले,
‘‘ आलोच मी...आई..उठतोय मी...’’
बहुदा लाकडी दरवाजाने त्याच्या स्वरातील खरखर शोषून घेतली असावी कारण बाहेर बहुतेक नीट ऐकू येत असावे. पण या संवादामुळे घरातील इतरांना मात्र ग्रेगॉर अजून उठलेला नाही याची तीव्रतेने जाणीव झाली. कारण असे कधीच घडले नव्हते. थोड्याच क्षणात दरवाजाच्या एका बाजूला त्याचे वडील दारावर मुठी आपटू लागले,
‘‘ ग्रेगॉर...ग्रेगॉर... काय फाजिलपणा चालवलाय ? दुसऱ्या बाजूला त्याची बहीण काळजीने विचारत होती,
‘‘ ग्रेगॉर तुला बरं नाही का ? काही पाहिजे का तुला ?’’ ग्रेगॉरने शब्दांमधे अंतर ठेवत, आवाज शक्य तितका तोच ठेवण्याचा प्रयत्न करीत उत्तर दिले,
‘‘ आलोच मी... तयार होतोय !.’’
ते ऐकून त्याच्या वडिलांनी नाष्ट्याचे टेबल गाठले. पण त्याची बहीण हळू आवाजात पुटपुटली, ‘‘ग्रेगॉर दरवाजा उघड बरं !’’ पण ते तो उघडणार नव्हता. नशीब टूरवर हॉटेलमधील खोल्यांमधून झोपताना त्याला दरवाजे आतून बंद करुन झोपण्याची सवय लागली होती. खरेतर त्याला शांतपणे उठून कपडे घालायचे होते व मुख्य म्हणजे न्याहारी करायची होती. त्यानंतर पुढे काय करायचे ते तो ठरविणार होता कारण पलंगावर असे पडून राहून, विचार करुन त्यातून काही निघणार नाही याची त्याला खात्री होती. कित्येकदा त्याचे उठल्यावर अंग आंबून जात असे व नंतर त्याचा मागमूसही रहात नसे. ‘‘तसेच काहीतरी असेल’’ तो मनात म्हणाला व झालेला भ्रम दूर होण्याची वाट पहात बसला.
पांघरुण बाजूला सारणं तसे सोप्प होते. जरा अंग आक्रसल्यावर ते आपोआपच बाजूला घसरुन पडले. पण पुढचे उठणे अवघड होते. तो जरा जास्तच रुंद बांध्याचा होता. शरीर सावरण्यासाठी त्याला भक्कम बाहूंची आवश्यकता होती पण येथे तर फक्त दाहीदिशांना वळवळ करणारे असंख्य काटकुळे केसाळ पाय त्याच्या दिमतीस होते. त्यातील एखादा पाय वाकविण्याचा तो प्रयत्न करे तेव्हा तो अगोदर आपोआप सरळ होई. शेवटी तो पाय पाहिजे तसा हलविण्यास लागला तरी इतर पाय त्याचा काहीच ताबा नसल्यासारखे वळवळ करीत. जणू काही त्यांना त्या एकाच पायाला त्रास दिलेला आवडत नसावा.
‘‘पण येथे बिछान्यावर पडून काय उपयोग ?’’ तो मनाशी म्हणाला. त्याला वाटले की त्याच्या शरीराचा खालचा भाग हलवून तो पलंगावरुन खाली उतरु शकेल पण तो भाग त्याने अजून पाहिला नव्हता आणि तो कसा असेल याविषयी त्याला कल्पना करता येईना. पण खालचा भाग हलविणे फारच अवघड होते. त्याने जोर लावला पण त्याचा अंदाज चुकला. तो पलंगाच्या काठावर आपटला आणि त्याच्या मस्तकात एक जिवघेणी कळ उठली. त्या दुखण्याने त्याला हे मात्र कळाले की त्याच्या शरीराचा खालचा भाग फारच नाजूक आहे.
मग त्याने शरीराचा वरील भाग बिछान्यावरुन खाली हलविण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते करताना त्याने त्याचे डोके काठावर आपटणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. हंऽऽऽ ते जरा सोपे वाटलं त्याला. पण त्याला धप्पकन खाली पडूनही चालणार नव्हते कारण तो डोक्यावर पडून बेशुद्ध झाला असता तर सगळीच पंचाईत झाली असती. त्यापेक्षा बिछान्यावरच पडलेलं काय वाईट ? तो मनाशी म्हणाला.
बरेच प्रयत्न केल्यावर तो परत पूर्वस्थितीवर आला. त्याच्या नजरेस परत ते विचित्रपणे हालचाल करणारे पाय पडले. त्यांच्यावर ताबा मिळविण्यासाठी त्याच्याकडे काही उपाय नव्हता ना या सगळ्या भ्रमावर त्याच्याकडे कुठले औषध होते. त्याने परत स्वत:ला बजावले की बिछान्यावर पडून राहण्याने काहीही होणार नाही. कसलाही धोका पत्करुन बिछान्यावरुन उठणेच शहाणपणाचे ठरेल. त्याचवेळी त्याने स्वत:ला हेही बजावले की परिस्थितीला थंड डोक्याने प्रतिसाद देणे हे हताश होऊन गोंधळ घालण्यापेक्षा बरं. हा सगळा विचार करताना त्याने आपली नजर मात्र खिडकीवरुन हटवली नव्हती पण दुर्दैवाने धुक्याने बाहेरचे काहीच दिसत नव्हते. घड्याळाचा ठोका पडल्यावर तो स्वत:शी पुटपुटला, ‘‘ सात वाजले...तरी एवढे धुके...’’ तो काही क्षण तसाव निश्चल पडून राहिला. त्याचा श्र्वासोच्छ्वास मंद चालला होता जणू काही सगळे परिस्थिती वास्तव मुळपदावर येण्याची वाट पहात होता.
तो एकदम ठामपणे म्हणाला, ‘‘ सव्वासातच्या आत कुठल्याही परिस्थितीत मला उठायलाच पाहिजे. कोणीतरी कार्यालयातून चौकशी करण्यासाठी येईल त्याच्या आधी उठायलाच हवे. कदाचित कोणीतरी आलेही असेल कारण ते लवकरच उघडते.’’ हा विचार मनात येताच त्याने आपल्या शरीराला एका लयीत झोके देण्यास सुरुवात केली. त्याले वाटले याने तो पलंगावरुन खाली पडेल. पडताना डोकं जर उचलून धरले तर कसली दु:खापतही होणार नव्हती. त्याची पाठ बऱ्यापैकी टणक होती. पाठीवर पडले तर काही विशेष लागणार नव्हते. पण त्याला काळजी वाटत होती ती पडल्यावर येणाऱ्या धप्पऽऽ आवाजाची. तो थांबविता येणे त्याला शक्यच नव्हते. आवाजाचे एक जाऊ देत, पण त्या आवाजाने त्या बंद दरवाजापलिकडे काय गोंधळ उडेल याचा विचार त्याला करवेना. पण त्याला आता तोही धोका पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
अंगाला हेलकावे देत तो पलंगावरुन जवळजवळ अर्धाआधिक खाली आला. आता त्याला तो खेळच वाटू लागला. कोणाची थोडीशी मदत मिळाली असती तर उठणे किती सोपे होते. दोन धडधाकट माणसे असती तर...पुरेसे होते. त्याला त्याचे वडील आणि मोलकरणीची आठवण झाली . त्यांनी नुसते त्याच्या पाठीखाली हात घालून त्याला उचलून जमिनीवर ठेवले असते तर तो स्वत:हून त्याच्या पायावर चालू लागला असता. काटकुळे असले तरी ते पाय होते आणि त्यांचा उपयोग त्यांना चांगलाच माहीत असणार. हंऽऽऽ... दरवाजे तर सगळे बंद होते. मदतीसाठी आरडाओरडा करावा का ? त्या कल्पनेनेच त्याला हसू फुटले.
त्याच्या शरीराचे हेलकावे आता तोल जाईल येथपर्यंत येऊन पोहोचले होते. पाचच मिनिटात काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता कारण पाच मिनिटांनी सव्वासात वाजणार होते. ...तेवढ्यात दरवाजावरील घंटा वाजली. ‘‘कार्यालयातीलच कोणीतरी असणार !’’ तो मनाशी म्हणाला. त्या विचारानेच त्यांचे अंग ताठरले. पण त्याचे पाय मात्र जास्तच वेगाने वळवळू लागले. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. ‘‘त्यांनी दरवाजा उघडला नाही म्हणजे मिळवली’’ त्याने आशा व्यक्त केली. अर्थात तसे करणे हे किती मूर्खपणाचे आहे हे लगेचच त्याला उमगले. तेवढ्यात पाय घासत चालणाऱ्या मोलकरणीने दरवाजा उघडला. त्याला पहिल्या काही शब्दांवरुनच कोण आलंय ते कळले - हेडक्लार्क आला होता. ‘‘शीऽऽऽ काय घाणेरडे नशीब आहे आपले. या कंपनीत काम कराव लागतंय ! एकदा उशीर झाला नाही तर लगेच शंकाकुशंकांचे मोहोळ उठले देखील. सगळे कर्मचारी एक नंबरचे बदमाष असतात असे वाटते की काय यांना ? एक तास उशीर झालाय फक्त. अपराधीपणामुळे वेड लागून मला वेड लागायची वेळ आली आहे. इतकी की मला उठताही येत नाही... हा सगळा भ्रमच असणार... जर खरंच गरज होती तर, त्यांना एखाद्या शिपायाला पाठवायला काय हरकत होती ? हेडक्लार्कला येऊन ही भानगड किती महत्वाची आहे हे सिद्ध करायचे होते का ? या विचारांनी प्रक्षुब्ध होत त्याची धडपड वाढली आणि तो पलंगावरुन खाली पडला. धप्पऽऽऽ असा आवाज आला पण तो आवाज एवढा काही मोठा नव्हता. खाली अंथरलेल्या गालिचामुळे पडण्याचा आवाज दबला गेला. शिवाय त्याची पाठही आता लवचिक झाली होती. पण त्याने डोके वर उचलून न धरण्याचा निष्काळजीपणा केला होता आणि त्याची शिक्षा त्याला लगेचच मिळाली. डोक़्याला मार लागायचा तो लागलाच. त्याने आपले डोके पटकन वळविले व त्या गालिचावर घासले.
‘’ आत काहीतरी पडल्याचा आवाज झाला.’’ बाहेर हेडक्लार्क म्हणाला. त्याने मनोमन त्याला शाप दिला. ‘त्याच्यावरही असा प्रसंग येईल तेव्हा पाहू’’ पण त्याचा तो शाप शेजारच्या खोलीत त्या हेडक्लार्कच्या करकर करणाऱ्या चामड्याच्या बुटांच्या आवाजात दबला गेला. उजव्या हाताच्या खोलीतून त्याची बहीण दबक्या आवाजात त्याला बाहेर काय होतंय ते सांगत होती.
‘‘तुझे साहेब आले आहेत’’
‘‘ माहीत आहे मला’’ तो ओठातल्या ओठात पुटपुटला.
तेवड्यात डाव्याबाजूच्या खोलीतून त्याच्या वडिलांची हाक आली,
‘‘ग्रेगॉर, तुझे साहेब आले आहेत ! तू आज सकाळची लोकल का पकडली नाहीस असे विचारताएत. त्यांना काय उत्तर देऊ ते समजत नाही. शिवाय त्यांना तुझ्याशी बोलायचे आहे. दार उघड. मी त्यांना तुझी खोली अस्ताव्यस्त असेल याची कल्पना आधीच दिली आहे., त्याची काळजी करु नकोस !’’
‘‘ ग्रेगॉर, गुड मॉर्निंग !’’ हेडक्लार्क म्हणाला.
’‘त्याला बरं वाटत नाहीए !’’ त्याची आई त्या हेडक्लार्कला सांगत होती.
‘‘ त्याला निश्चितच बरं वाटत नसणार. नाहीतर सकाळची त्याची लोकल कधीच चुकली नाही. तो कामाशिवाय दुसऱ्या कशाचाच विचार करीत नाही. मी सांगते तुम्हाला, गेले आठ दिवस तो संध्याकाळीसुद्धा बाहेर गेलेला नाही. टेबलावर बसून काम करणे एवढेच करीत होता तो. उरलेला वेळ तो आगगाडीची वेळापत्रके चाळण्यात घालवितो. अगदीच वेळ उरला तर तो लाकडी फ्रेमवर नक्षिकाम करतो. गेले तीन दिवस संध्याकाळी तो हेच करीत बसला होता. ती फ्रेम खूपच छान झाली आहे. आता तो दरवाजा उघडेल तेव्हा तुम्हाला ती दिसेलच. तुम्ही आलात ते बरेच झाले. नाहीतर त्याने काही हा दरवाजा उघडला नसता. तसा हट्टीच आहे तो ! असे म्हणू नये पण तो आजारीच असणार ....’’
‘‘आलोच मी !’’ त्याने प्रत्येक शब्दावर जोर देत सांगितले. उत्तर देताना तो थोडे देखील हलणार नाही याची त्याने काळजी घेतली होती. न जाणो हालचालीमुळे बाहेरच्यांना त्याचे बोलणे कदाचित ऐकू गेले नाही तर....
‘‘मलाही तसेच वाटते बाईसाहेब ! काही गंभीर प्रकार नसावा म्हणजे झालं ’’ हेडक्लार्क म्हणाला.
‘‘पण गंभीर नाही असे कसे म्हणू मी ? आमच्या धंद्यात थोड्याफार आजारपणाकडे आम्ही नेहमीच दुर्लक्ष करतो. म्हणजे कामाकडे लक्ष द्यावेच लागते ना !’’
‘‘येऊदेत का आता त्यांना आत ?’’ वडिलांनी अस्वस्थ होत, दरवाजा ठोठावत विचारले. परत एकदा विचारले.
‘‘ नको !’’ आतून उत्तर आले. डावीकडील खोलीत या उत्तराने तणावपूर्ण शांतता पसरली तर उजव्या खोलीत त्याची बहीण मुसमुसून रडू लागली. ही का नाही इतरांबरोबर ? बहुतेक नुकतीच उठली असेल आणि तिचे अजून आवरुन व्हायचे असेल. पण मग तिला एवढे रडायला काय झालं ? तो उठत नाही आणि त्या हेडक्लार्कला आतही घेत नाही म्हणून ? त्याची नोकरी जाईल या भितीने ? का आता कार्यालयातून घेतलेल्या कर्जफेडीचा परत तगादा चालू होईल या भितीने ? पण तिला या सगळ्याची एवढी काळजी करण्याचे कारण नव्हते. तो अजूनही घरात होता आणि ते सोडण्याचा त्याचा आजिबात विचार नव्हता. त्या क्षणी तरी तो गालिचावर पडला होता आणि तो ज्या परिस्थितीत होता ती पाहिल्यावर हेडक्लार्कला त्याने आत घ्यावे असे कोणीच म्हटले नसते. आणि एवढ्या किरकोळ करणासाठी त्याला तडकाफडकी नोकरीवरुन डच्चू देण्याचे तर काहीच कारण नव्हते. रडून त्याला त्रास देण्यापेक्षा ग्रेगॉरला थोडा वेळ एकटे सोडले असते तर फार बरे झाले असते. अर्थात हे ग्रेगॉरचे मत होते. पण आता पुढे काय होणार या अनिश्चितीचे सावट त्यांच्या मनावरुन जाणे शक्यच नव्हतं. त्यामुळे त्यांचे असे वागणेही अपेक्षित होते.
‘‘मि. ग्रेगॉर,’’ हेडक्लार्कचा आवाज थोडा चढलेला वाटला.
‘‘ काय झालंय तुला? काय चाललंय काय ? स्वत:ला कोंडून घेऊन आणि ‘‘हो’’ ‘‘नाही’’ अशी उत्तरे देऊन तू स्वत:च्या आईवडिलांना कसला घोर लावला आहेस याची कल्पना आहे का तुला ? शिवाय तू तुझ्या कामाकडेही दुर्लक्ष करतो आहेस. अर्थात हे तुझ्या आईवडिलांइतके महत्वाचे नाही. आम्हाला सगळ्यांना तुझ्याकडून ताबडतोब उत्तर हवंय. कमाल आहे ! कमाल आहे !. इतके दिवस मी तुला एक शांत सुस्वभावी, विश्र्वासार्ह माणूस समजत होतो पण आता अचानक तू ते सगळे धुळीस मिळविण्याचे ठरविलेले दिसते. तुला माहिती आहे का ? साहेबांनी तुझ्या नाहीसे होण्यावर एक शंकाही प्रदर्शित केली. तुझ्यावर सद्ध्या रोखपालाची जबाबदारी टाकण्यात आली त्याबद्दल बोलत होते ते. अर्थात मी ताबडतोब त्यांना तुझ्याबद्दल खात्री दिली. पण आता तुझा हटवादीपणा पाहिल्यावर तुझी बाजू घेण्याचे मला काही कारण उरले आहे असे बिलकूल वाटत नाही. आणि लक्षात ठेव, तुझ्या सारखे कंपनीला छपन्न सेल्समन मिळतील. हे सगळे मी तुला खाजगीत सांगण्याचे ठरविले होते पण तूच माझ्यावर हे सगळे सगळ्यांसमोर सांगण्याची वेळ आणली आहेस. त्यांनाही कळू देत तू किती बेजबाबदारपणे वागतो अहेस ते... गेल्या वर्षातील तुझी कामगिरी समाधानकारक नाही हेही त्यांना समजले पाहिजे. मान्य आहे सद्ध्या मंदी चालू आहे पण विक्री होतच नाही असे होऊच शकत नाही, किंबहुना अशी वेळ आलीच नाही पाहिजे’’.
‘‘ पण साहेब,....!’’ ग्रेगॉर आतून ओरडला. ‘‘मी आता कुठल्याही क्षणी दरवाजा उघडणार आहे. मला जरा चक्कर आल्यासारखे वाटत होते बस्स.. त्यामुळे मला उठायला उशीर झालाय. मी अजूनही माझ्या बिछान्यावरच आहे.. पण आता मला बरं वाटतय. काल रात्री मी एकदम ठीक होतो.. हे अचानक काय झालय ते मला कळत नाही. नाहीतर काल रात्रीच काही लक्षणे दिसली असती आणि मी कार्यालयात कळविले असते. कृपया माझ्या आईवडिलांना यात ओढू नका. तुम्ही माझ्यावर जे काही आरोप केलेत त्याला कसलाही आधार नाही हे तुम्हालाही चांगले माहीत आहे. कदाचित मी शेवटी पाठविलेल्या ऑर्डर्स तुम्ही अजून पाहिलेल्या दिसत नाहीत. मी अजूनही आठची गाडी पकडू शकतो. आपण आपला वेळ वाया घालवू नका. कार्यालयात परत जा ! मी लवकरच माझ्या कामाला लागेन. कृपया आपल्या मोठ्या साहेबांनाही हे सांगा आणि माझी बाजू मांडा...’’
इतका वेळ काय बडबड केली हेच ग्रेगॉरला कळले नव्हते. त्याने सवयीने आपले कपाट गाठले व त्याच्या आधाराने तो आता सरळ उभे राहण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला खरेतर खोलीचा दरवाजाच उघडायचा होता आणि त्या हेडक्लार्कशी बोलायचे होते. त्याला दरवाजा उघडण्याचा आग्रह करणाऱ्यांवर त्याला पाहिल्यावर काय परिणाम होतोय, ते काय म्हणतात हे पाहण्याची व ऐकण्याची त्याला उत्सुकता लागली होती. जर ते घाबरले असते तर तो गप्प राहणार होता पण त्यांनी जर सगळे शांतपणे समजून घेतले असते तर मात्र तो आठची गाडी पकडण्याच्या तयारीला लागणार होता...त्या कपाटाच्या गुळगुळीत पृष्ठभागावरुन तो दोन तीन वेळा घसरला पण अखेरीस तो उभा राहिला. शरीराच्या खालच्या भागातील वेदनांकडे यावेळेस त्याने पूर्ण दुर्लक्ष केले. नंतर त्याने मागेच असलेल्या खुर्चीवर स्वत:चे शरीर झोकून दिले व आपल्या वळवळणाऱ्या काटकुळ्या पायांनी तिच्या कडांना पकडले. त्यामुळे एक झाले त्याचा त्याच्या शरीरावर ताबा आला. त्याने बोलणे थांबविले कारण बाहेर त्याला परत हेडक्लार्कचा आवाज ऐकू आला.
‘‘मि. सामसा, तुम्हाला तो काय म्हणतोय यातील एक शब्द तरी कळला का ? मला वाटतंय तो आपल्याला मूर्ख बनवतोय.’’
ते ऐकताच त्याची बिचारी आई रडू लागली.
‘‘ अहो त्याला आधीच बरं नाहीए...त्याला आणखी त्रास का देता ?’’ स्फुंदत स्फुंदत तिने हाक मारली, ‘‘ग्रीटऽऽऽ ग्रीटऽऽऽ!’’
‘‘ आले! आले ! ’’ त्याच्या बहिणीने दुसऱ्या खोलीतून उत्तर दिले.... ग्रेगॉरची खोली या दोन खोल्यांच्या मधे होती...
‘‘ताबडतोब जाऊन डॉक्टरला घेऊन ये. काहीतरी भयंकर झालंय... त्याचा आवाज ऐकलास का ?’’
‘‘मला तर तो मनूष्यप्राण्याचा आवाज वाटलाच नाही......’’ हेडक्लार्क म्हणाला.....
क्रमशः
मूळ लेखक : फ्रान्झ काफ्का.
अनुवाद : जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
26 Oct 2016 - 12:20 am | बोका-ए-आझम
काफ्काची ही कथा (Metamorphosis) अंगावर येते अक्षरशः! अनुवाद मस्तच!
26 Oct 2016 - 9:01 am | प्रचेतस
अप्रतिम अनुवाद.
राजकीय धाग्यांच्या रणधुमाळीत अशा धाग्यांचे येणे अतिशय सुखद वाटते.
26 Oct 2016 - 9:24 am | यशोधरा
अनुवादित कथा आवडली.
26 Oct 2016 - 9:30 am | महासंग्राम
वाह, अत्यंत सुरस अनुवाद ...
26 Oct 2016 - 11:56 am | राजाभाउ
हे एक मस्त काम केलत तुम्ही !!!! :)
26 Oct 2016 - 11:58 am | राही
दी फेर्वान्ड्लुन्ग मूळ जर्मनमधून वाचण्यासाठी जर्मन शिकण्याचा अट्टाहास केला होता.
आणि लोकल ट्रेनमध्ये भेटलेल्या जर्मन मायलेकींशी या पुस्तकावर माझ्या मोडक्या तोडक्या जर्मन/इंग्लिशमधून गप्पा झाल्या होत्या आणि त्या दोघींना अपार आनंद (आणि अर्थात मलाही आनंद) आणि नवल वाटले होते.
आणि पुण्या-मुंबईचे मॅक्स्म्युलर आणि अनेक आठवणी.
लेख मस्तच.
26 Oct 2016 - 12:57 pm | एस
सावकाश वाचण्यासाठी बाजूला ठेवत आहे.
26 Oct 2016 - 1:27 pm | वाचूका
खुपच रंजक.. पुधील भागाची वाट पाहत आहे
26 Oct 2016 - 2:53 pm | गणामास्तर
मस्त, एकदम उत्कंठावर्धक कथा !
कृपया पुढील भाग लवकर टाका हि विनंती.
27 Oct 2016 - 9:41 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
4 Dec 2016 - 10:02 pm | पैसा
खिळवून ठेवणारी कथा