प्रिय आजीस.....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Oct 2016 - 12:42 pm

अयान हिर्सी अलि.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

प्रिय आजीस,

तू गेलीस पण मी आक्रोश केला नाही. तशी तू जाणारच होतीस. आई म्हणत होती तू मरतेसमयी ‘‘घेऊन जा ! घेऊन जा !’’ म्हणून आपल्या पूर्वजांचा धावा करीत होतीस. तुझ्या पायांनी तुला सावरण्यास नकार दिला होता कारण तुझे सांधे पूर्ण आखडले होते. जेव्हा ते सरळ असत तेव्हा ते वाकत नव्हते आणि एकदा वाकले की सरळ होत नसत. किंवा सरळ झाले की परत आखडत. अत्यंत कष्टाने तू जेव्हा ते सरळ करीत असे तेव्हा ते कुरकरत. झोपून झोपून तुझी पाठ दुखत असे. तुझी त्वचा सुरकुतली होती व त्यात साठणाऱ्या घामाने तुझ्या सर्वांगाला खाज सुटत असे. तुझी लांबसडक सुंदर बोटे आता वाळलेल्या काटक्यांसारखी कडक व आत वळली होती. तुझ्या कानांनी आणि डोळ्यांनी तुला दगा दिला होता. तुझ्या मुलींनी व नातींनी तुझी खूप काळजी घेतली पण वृद्धपणीच्या वेदना त्यांना कमी करता येणे शक्य नव्हते.

तू गेल्यावर मी आक्रोश केला नाही पण माझ्या मनात अपराधीपणाची एक भावना टोचत राहिली. तू गेलीस तेव्हा मी तेथे असायला पाहिजे होते. मी लहान होते तेव्हा तू माझ्या आजारपणात मला छातीशी धरलेस, माझ्या कानात धिराच्या चार गोष्टी सांगितल्यास. माझ्या इवल्याशा शरीराला त्या भयंकर तापापासून वाचविलेस. माझ्यासाठी तू आपल्या पूर्वजांना मदतीसाठी साद घातलीस, त्यांना मदतीसाठी आवाहान केलेस, मला मांत्रिकाकडे घेऊन गेलीस. त्याने तुझ्याकडून तुझे पैसे लाटले, तुझ्या बकऱ्या घेतल्या व तापून लाल झालेल्या खिळ्यांनी मला छातीवर डागण्या दिल्या. खरे तर तापापेक्षा मला त्या डागण्यांचाच जास्त त्रास झाला आणि आजी, अजूनही ते व्रण माझ्या छातीवर ताजे आहेत. मी त्यांना तुझ्या प्रेमाच्या खुणाच समजते. तुला म्हणून सांगते, त्या मांत्रिकामुळे नाही तर तुझ्या प्रेमामुळेच मी त्या भयानक तापातून बरी होत असे. मी लहान असताना माझ्या गरजेच्या वेळी तू होतीस पण जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी नव्हते याचे आजी, मला दु:ख होते. मी माझ्या आधुनिक जगाच्या मांत्रिकांना बोलाविले असते. त्यांच्याकडे वेदनाशामक औषधे असतात आणि चाके असणाऱ्या काठ्याही असतात, ज्यांच्या मदतीने तू रस्त्यावरुन आरामात चालू शकली असतीस. त्यांनी तुला खाज सुटणार नाही अशी औषधेही लावली असती. जेव्हा तुला माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मी तुला टाकून निघून गेले त्याबद्दल जमल्यास मला माफ कर !

काफिरांबरोबर रहायला लागून मला आता जवळजवळ दोन तपे झाली. त्यांची जिवनपद्धती आता माझ्या चांगल्याच परिचयाची झाली आहे. आणि मला ती आवडतेही. मला माहिती आहे हे वाचून तुला वाईट वाटले असते. बांबांनीही मरतेसमयी मला मला त्याबद्दल पुनर्विचार करण्यास सांगितले होते व आपल्या परंपरा व धर्म पाळ असा सल्ला दिला होता आणि आई तर मला फोनवर दरवेळी हेच सांगते. तुही असतीस मला तेच सांगितले असतेस पण आजी, मला कधी कधी आतून असेही वाटते की तूच मला समजून घेतले असतेस.

पण माझे मन तुझ्या मृत्युमुळे अजूनही आक्रंदत नाही.

आजी तुझ्याबरोबर आपल्या कर्मठ परंपराही गेल्या. ‘ हंऽऽऽ म्हण माझ्या मागून्... मी आयन, हिरसीची मुलगी, जो मगनचा मुलगा आहे. जो गुलरिड्चा पूत्र आहे....’’ ज्या परंपरात उंटांना मुलींपेक्षा चांगली वागणूक मिळायची त्या मूर्ख परंपरा तुझ्याबरोबरच गेल्या. हे चांगले झाले का वाईट ते माहीत नाही.

जेव्हा घराण्यात एखाद्या मुलाचा जन्म होई तेव्हा घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पसरे. तुझे डोळे अभिमानाने चमकत. या खुषखबरीबरोबर वाटण्यासाठी तू अंगात आल्यासारखे गवताच्या सतरंज्या अखंडपणे विणत बसे,. त्या विणताना तू आम्हाला आपल्या घराण्याच्या कथा सांगत असे. शौर्याच्या, आक्रमणाच्या आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे घराण्याची प्रतिष्ठा, अब्रू कशा सांभाळल्या गेल्या याच्या.

जेव्हा मुलीच्या जन्माची बातमी कळे तेव्हा तुमचा चेहरा पडे. तलालच्या झाडाखालीच तुमचा मुक्कम पडे. तुम्हाला घरात येणेही नकोसे वाटे कारण घरात कित्येक दिवस उदास वातावरण असे. वैतागत तुम्ही बायका आम्हा मुलींना तेथून हुसकावून लावत. त्यावेळी तुम्ही आम्हाला ज्या गोष्टी सांगत त्यात सगळ्या वाईटसाईट गोष्टी भरलेल्या असत. ज्या घरात मुलींचा जन्म होतो ते कसे देशोधडीस लागते..इ..इ.इ. मुलीचा जन्म म्हणजे घराण्याला लाज आणणे याबद्दल तुमचे एकमत होत असे. मुलगी जन्माला आल्यावर तू दातओठ खात बाहेर भली मोठी सतरंजी विणत बसायचीस. सतरंजीवरील नक्षिकाम कधिही न चुकविणारी तू त्या काळात हमखास चुकत असे. मग परत शिव्याशाप.... आजी तू आम्हाला मेहनत करायला शिकवलीस. तुझे शब्द आजही माझ्या कानात घुमतात...मुलींनो केर काढा, मुलींनो सतरंज्या झटका, मुलींनो बकऱ्यांचे दूध काढा, मुलींनो चूल पेटवा, पाणी भरा, मटण साफ करा, भाज्या चिरा, तांदूळ निवडा.... एक ना दोन ..तू सतत आम्हाला काहीतरी काम लावत असायचीस. ए बी सी शिकण्याऐवजी तू आम्हाला आपली वंशावळ पाठ करायला लावलीस.. तुला ऐकून वाईट वाटेल पण अबेह आता नाही आणि वंश चालवायला आत फक्त माझा भाऊ महदच उरला आहे. त्याचे वय आता चाळीसच्यावर असले तरी हा वंश चालविण्यास त्याला एकच मुलगा आहे. त्याचे नाव जॅकोब. त्याला आपल्या परंपरांचे आणि परंपरेप्रमाणे शिक्षण देता येत नाही कारण तो ज्या ठिकाणी रहातो आणि ज्या काळात आत्ता तो आहे तेथे ते शक्यच नाही. ते शिक्षण त्याला मुर्खपणाचे व अशास्त्रिय वाटेल जसे मलाही एके काळी वाटले होते.

मी आता आपल्या परसातील तलालच्या झाडापासून व आपल्या घराच्या कुंपणापासून खूपच दूर गेले आहे. मी आता खूप दूर काफिरांच्या प्रदेशात कायमचे स्थायिक झाले आहे. देश म्हणजे काय हे मला तुला कधीच समजावून सांगता आले नाही. मला आठवतंय आपण जेव्हा नैरोबीला रहायला आलो तेव्हा मी माझ्या शाळेचा ॲटलास मांडीवर घेऊन तुला समजविण्याचा प्रयत्न करीत असे.. पण छे ! जेव्हा आम्ही केनियातील आमच्या शाळासोबत्यांबरोबर गप्पा मारत असू तेव्हा तुला ते आवडत नसे. तू म्हणायचीस, ‘‘ त्या गुलामांबरोबर काय गप्पा मारता !’’ मी जेव्हा तुला सांगितले की ज्यांच्या देशात आपण राहतो त्यांच्याशी आपण आदरानेच बोलायला पाहिजे तेव्हा तुला देश म्हणजे काय हे कळत नव्हते असे माझ्या लक्षात आले. देश या कल्पनेने तू गोंधळून गेलीस. सोमालियाबद्दल ऐकूनही तू अशीच गोंधळून गेली होतीस. इसाक आणि दारोदच्या पराक्रमी पुत्रांना या सीमा कशा काय मान्य होतात हे तुला उमजत नव्हते. त्या चित्रातील रेषा काफिरांनीच मारल्या आहेत असा तुझा समज होता. मांडीवरील ॲटलास जमिनीवर टाकत तू आम्हाला फक्त अल्लाशी आणि आपल्या घराण्याशीच इमान राखण्याचा उपदेश करायचीस.

आजी, देश अस्तित्वात आहेत आणि इसाक आणि दारोदच्या पुत्रांबद्दल तू म्हणते आहेस ते खरे आहे. सोमालिया आता नावालाच शिल्लक आहे. आता आम्ही अंधाधुंदीसाठी ओळखले जातो. हिंसेसाठी ओळखले जातो. समुद्रावरील चाचेगिरीसाठी आम्ही आता जगप्रसिद्ध आहोत आणि अनाकलनीय रक्तपात व बलिदान ही आमची ओळख झाली आहे
.
जगभर मुसलमान अवघड परिस्थितीत जगत आहेत. सर्व मुस्लीम देशांमधे अराजक माजले आहे. या देशांमधे उत्पादन जवळजवळ बंद पडले आहे व विचार करणारी मने मारली जात आहेत. या देशांमधे ना राष्ट्र नावाची संकल्पना उरली आहे ना उज्ज्वल भवितव्यासाठी कुठलेही प्रयत्न. पण या गोऱ्या काफिरांच्या देशामधे सगळे वेगळे आहे. येथे झेंडा हे राष्ट्राचे खरेखुरे प्रतिक आहे. तू मला ताकदीचा आदर करण्यास शिकवलेस, जगण्यासाठी डोळे उघडे ठेवून योग्य ते धोरण स्वीकारण्यास सांगितले. आजी, जगण्यासाठी या काफिरांचे शिक्षण आपल्या बुरसटलेल्या शिक्षणापेक्षा जास्त उपयुक्त आहे असे माझे स्पष्ट मत झाले आहे.

तुला आठवतंय आपल्या मोगादिशूमधे बायकांची हडकुळ्या मडकुळ्या गाईंचे दुध काढताना किती तारांबळ उडायची ते? इकडे मी हॉलंड नावाच्या देशात गेले होते तेथे मशीनने गाईंचे दूध काढले जाते. मोगादिशूमधे सगळ्या गाईंचे जेवढे दूध निघते तेवढे माझ्या एका मित्राच्या गोठ्यात जमा होते आणि तेही काही मिनिटात. अर्थात काफिरांची जिवनशैली एवढ्यावरच थांबत नाही. मी आता स्वत: ते अनुभवत आहे आणि जर तू आत्ता असतीस तर मला खात्री आहे त्यांच्या उपचारांनी तुलाही बरे वाटले असते.

या डच माणसाच्या यशाचे रहस्य त्याच्या बदलत्या जगाशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत आहे. समोर उभे ठाकलेले प्रश्र्न सोडवितांना तो निसर्गाला वाकवतो. निसर्ग त्याला वाकवू शकत नाही. आपल्या येथे काटेरी झुडपे, बाओबाबच्या झाडांप्रमाणे, संध्याकाळ, सकाळ यांच्याप्रमाणे आपण कोण आहोत आणि काय आहोत हे अगोदरच ठरलेले आहे. त्यांच्यात आणि माणसात फार फरक होत नाही. आपण अशा परमेश्र्वराला वंदन करतो जो आपल्याला हे बदलू नका असे सांगतो. जेव्हा आपले पूर्वज वाळवंटातून भटकत होते तेव्हा त्यांनी ओॲसीसचे रुपांतर कायमस्वरुपी पाण्याच्या साठ्यात करण्यासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत कारण अल्लाने तशी परवानगीच नाकारली आहे.

तुला आठवतंय का ? तुझा सूल ते येमेन्चा प्रवास ? वाळवंटातील रखरखीत रस्त्यावरुन अनेक दिवस चालत तू बरबेराच्या बंदरात पोहोचलीस. मधेच तू एखाद्या गाडीवानास तुला गाडीत घेण्यासाठी पैसेही दिले असशील. पण तू जेव्हा एका बोटीतून समूद्र पार केलास तेव्हा खरंतर तू एका टाईममशीनमधूनच प्रवास केलास असेच म्हणायला लागेल. तुझ्या कदाचित लक्षात आले नसेल पण त्या लहानशा बोटीने तुला दुसऱ्या युगात आणून सोडले होते. या धाडसात तू काही एकटी नव्हतीस. हजारो लोकांनी आपल्या काटाकुट्यांनी शाकारलेल्या आपल्या झोपड्या सोडल्या, आपली गुरे सोडली, आपल्या समजूती सोडल्या, आपल्या परंपरा सोडल्या, जे मागे राहिले होते त्यांना सोडले व ते या नव्या युगाच्या प्रवासात सामील झाले. आजी, जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक या प्रवासात सामील झाले होते.

पण आजी, समजा तू या प्रवासात सामील झाली नसतीस, आपली काट्याकुट्याची झोपडी सोडली नसतीस, आपल्या परंपरा सोडल्या नसत्यास, आपले आयुष्य ती झोपडी शाकारण्यात घालविली असतीस, व अधुनिक जगापासून दूर् दूर राहिली असतीस तरी त्या जगाने तुला गाठलेच असते. हो ! बंदुका, गोळ्या व त्या वापरणाऱ्या अतिरेक्यांच्या स्वरुपात. आजी अगं आता ते जगात कानाकोपऱ्यात पोहोचू शकतात....

आजी तू आमच्या मनावर बिंबविलेले नीतिमत्तेचे धडे आणि या काफिरांची नीतिमत्ता याचीही तुलना मी सतत करत असते. मला तुला वाचण्यास खेद वाटेल की या काफिरांच्या पद्धती अमलात आणल्यास सध्याच्या जगात जगण्यासाठी निश्चितच मदत होईल.

तू आम्हाला संशयाचे आणि अविश्वासाचे फायदे सांगितलेस, शिकविलेस आणि इस्लाम ने आम्हास तकिय्या शिकविला. समोरच्याच्या डोळ्यात धूळ फेकण्यास शिकविले. जेव्हा मला माझ्या भावाने घाणीत फेकले तेव्हा तू मलाच रागवलीस कारण तुझ्यामते मी भावावरही विश्र्वास ठेवण्याची गरज नव्हती. विश्वास टाकणे म्हणजे मूर्खपणा हेच आम्हाला इस्लाम सांगतो. सतत सावध राहणे हे तुझं ध्येयवाक्य होतं पण सतत सावध राहण्याने काळजी वाढते हे तू सोयिस्कररित्या विसरलीस. सतत सावध राहण्याच्या दडपणामुळे मनावर व आयुष्यावर प्रचंड दडपण येते. याचाच अर्थ तुम्ही कोणाशीही मैत्री करु शकत नाही आणि अब्रूला घाबरुन तुमच्या चुकांची जाहीर कबूली देऊ शकत नाही.

या उलट काफिर प्रामाणिकपणा आणि विश्वासावर विश्र्वास ठेवण्याचा आग्रह धरतात. येथे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला कोणावर तरी विश्र्वास ठेवावाच लागतो. विमानात बसताना तुम्हाला वैमानिकावर विश्र्वास ठेवावा लागतो. तुम्ही आजारी असताना तुमच्या मुलाने तुम्हाला भरविलेले अन्न गिळताना तुम्हाला त्याच्यावर विश्र्वास ठेवावाच लागतो. काफिर आयुष्याकडे एक परिक्षा म्हणून पहात नाहीत, किंवा पुढच्या जगात जाण्यासाठीचा रस्ता म्हणूनही पहात नाहीत. ते त्याच्याकडे एक पूर्ण व आनंदी गोष्ट म्हणून पाहतात. त्याच्याकडे असलेली सर्व संपत्ती, काळ वेळ हे सर्व या पृथ्वीतलावरील जिवन आनंदायी होण्यासाठी खर्च करतात. त्याला स्वच्छतेचे वेड आहे. त्याला चांगले अन्न व पुरेशी विश्रांती लागते. तो त्याच्या बायकापोरांशी प्रामाणिक असतो. तो त्याच्या आईवडिलांची काळजी घेऊ शकतो पण तो वंशावळीची घमेंड मनात बाळगत नाही. त्याला ती पाठही करावी लागत नाही. त्याच्या कष्टाने मिळवलेली फळे तो स्वत:वर स्वत:च्या कुटुंबावर, मित्रांवर खर्च करु शकतो. एकाच वंशामुळे येथे मित्र होत नाहीत तर तुम्हाला रस असणाऱ्या गोष्टी समान असल्यातर येथे मैत्री अगदी सहज होते.

काफिर आधुनिक विचारांवर विश्र्वास ठेवतात, त्यांचा अभ्यास करतात म्हणून आज त्यांच्या देशात सुबत्ता आहे. या अशा शांत, पुढारलेल्या, ज्ञानाला किंमत असणाऱ्या वातावरणात एखादी मुलगी जन्माला आली तर काही विशेष घडले आहे असे कोणालाच वाटत नाही. मुलीच्या जन्मानंतर येथे शांतता पसरत नाही तर उत्सव साजरा होतो. शाळेतही मुली मुलांबरोबर त्यांच्याच शेजारी बसतात. त्याच्या एवढे तिलाही हुंदडण्यास मिळते. तिलाही त्याच्या एवढेच अन्न मिळते. आजारपणात तिचीही तेवढ्याच ममतेने काळजी घेतली जाते. मोठी झाल्यावर तिलाही आपल्या भावाप्रमाणेच आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असते.

आजी, मला कल्पना आहे की हे वाचून तुला धक्का बसेल पण जरा शांत डोक्याने विचार केलास तर तुला उमगेल की परमेश्र्वराच्या एका अपत्याला दुसऱ्या अपत्याचा गुलाम म्हणून वाढविण्यात काहीच अर्थ नाही आणि मुलींचे योनीमार्ग कापून, परत शिवून, तिला विकत घेणाऱ्या पुरुषासाठी तयार करण्यातही काही पुरुषार्थ नाही.

तुझ्याप्रमाणे काफीरही काटकसरी असतात पण त्यांना संपत्तीचे प्रदर्शन करण्यात कसलाही अपराध वाटत नाही. संपत्ती किती आहे किंवा किती कमी आहे यावरुन त्यांच्यात वर्ग पडले आहेत. त्यांच्यात वेगवेगळ्या वैचारिक पद्धतींनीही वर्ग पडले आहेत. पण हे मतभेद असणारच हे त्यांनी पत्करलेले आहे. केवळ पूर्वज एक होते म्हणून जन्माला घातलेल्या इस्लामी बंधुत्वाच्या ढोंगी वचनांपेक्षा हे खूपच बरं आहे, व्यवहार्य आहे. एकता व सहजिवन प्रामणिक व सरळ आहे. नाहीतर आपल्याकडे एकता ही तुमचे पाठांतर कसे आहे यावर अवलंबून असते.

तुला फराह गोर आठवतो का ? नैरोबीमधे तो आपली काळजी घेत असे. तो कठोर परिश्रम करीत असे. एकएक पैसा साठवत असे. पण तुमच्या कायद्याने त्याला त्याचा पैसा नालायक, पलंगावर लोळणाऱ्या बेशरम जाती बांधवांवर, ज्यांनी बायका पोरांचा चैनीसाठी त्याग केला होता अशांवर खर्च करायला लावून त्यालाही देशोधडीस लावले. आजी तुझ्या लाडक्या नातवाबरोबर, हसनबरोबर अमेरिकेत आता असेच होतंय.

आता अबेह नाही आणि तुही नाहीस पण मला त्यासाठी बिलकूल वाईट वाटत नाही ना त्या सरलेल्या काळाबद्दल.....

तू कविता म्हणायचीस आणि मला पाठ करायला लावायचीस. पण मी त्या पाठ करु शकले नाही. मी त्या लिहुनही ठेवल्या नाहीत. त्यासाठी मी तुझी आणि पुढच्या पिढ्यांची माफी मागते. आता तुझ्यानंतर त्या कविताही वाळूतील त्या थडग्यात नाहिशा झाल्या आहेत. त्याला मीच जबाबदार आहे. त्या कविता, ती गाणी मला आठवत नाहीत याबद्दल माझ्या मनात आक्रोश जरुर आहे पण मी तुला सांगते त्या गाण्यांमधे आम्हाला बांधून ठेवण्याची शक्ती आता उरली नाही हे सत्य आहे. सोमाली जमाती आता अनिश्चितेच्या समुद्रावर स्वार झाल्या आहेत. या समुद्राच्या लाटा अजस्र व उलथापलथ घडवून आणतात आणि आमच्याकडे त्यापासून सुटका करुन घेण्यासाठी कुठलीही बोट किंवा अवजारे नाहीत. या बाबतीत आपले वंश दुर्बळ व वांझ आहेत. त्याच्याशी एकनिष्ठ राहणे म्हणजे हिंसेला निमंत्रण देणे. एकता आणि प्रगतीचा तो मार्ग नव्हे.
तुझ्या मुलांना आणि नातवंडाना आता कसलाही पायाभूत आधार उरलेला नाही किंवा मार्गदर्शकही उरलेला नाही. लादनचेच उदा घे ना. तू नेहन्मीच तिला नावे ठवत आलीस. कारण तुला तिची संगिताची आवड आवडायची नाही. ती आता ब्रिटनमधे आहे. ज्यांनी तिला आधार दिला ते लोक आता तिचा तिरस्कार करतात. ती आता तुझ्या जमातीची नाही आणि ती धड काफीरही नाही. तिची अवस्था आता त्रिशंकू सारखी झाली आहे. मला तसे व्हायचे नाही...

सुटकेचा मार्ग या काफीरांकडेच आहे. त्यांनी अमर्याद स्मरणशक्ती असलेली पुस्तके छापली आहेत. दृष्टीला न दिसणारे रोगजंतू ते आता पाहू शकतात. त्यांनी त्या रोगजंतूंना मारण्याची औषधे तयार केली आहेत. आजी, पुर्वजांचा कोप झाला म्हणून किंवा भुताखेतांचा कोप झाला म्हणून आपल्याला ताप येत नाही. तो या रोगजंतूंमुळे येतो. आपल्या कुठल्याही उपचारांपेक्षा काफिरांची औषधे जास्त परिणामकारक आहेत कारण ती संशोधित आहेत.

जेवढ्या लवकर आपण या काफिरांचे मार्ग चोखाळू तेवढ्या लवकर आपले जिवन सुसह्य होईल. सुसह्य आयुष्याबद्दलची तुझी मते काय आहेत ते मला चांगलेच माहिती आहे. आरामदायी जिवनाने शिस्त बिघडते व नीतिमत्ताही बिघडते असे तुझे लाडके वचन मला माहीत आहे. तू धुणे धुण्याच्या मशीनलाही नावं ठेवायचीस. तुला असे वाटायचे की यामुळे तरुण मुलींना जास्त मोकळा वेळ मिळेल व त्या बिघडतील व व्याभिचारी होतील. यातील पहिला भाग बरोबर आहे पण दुसरा अत्यंत चुकिचा आहे. मुलींना वॉशिंग मशीनमुळे वेळ मिळतो जो त्या सत्कारणी लावतात. सांस्कृतिक ऱ्हासावर सगळ्यात उत्तम औषध म्हणजे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे. एखादी प्रार्थनाही तुम्ही करु शकता पण त्याचा खरंच उपयोग होत असेल असे मला वाटत नाही. मी जेव्हापासून या काफिरांच्या देशात आले आहे तेव्हापासून यंत्रेच माझे कपडे व भांडी धुत आहेत. आम्ही अन्नही बऱ्याच वेळा बाहेरुन मागवतो व बराच वेळ वाचवतो. पण मी नुसती बसून राहिलेले नाही. वेळ मिळाल्यास मी आयुष्याचा अनंद घेते. उपभोग घेते. काय वाईट आहे त्यात ?

आजी माझा आता जुनाट पद्धतींवर विश्र्वास उरलेला नाही. तुझ्या आयुष्याच्या शेवटी जग बदलण्यास सुरुवात झाली होती आणि ती जुनाट जिवनपद्धती आता माझ्या कामी येत नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि सोमालियातील सगळ्या नाही पण थोड्याफार आठवणींवर माझे प्रेम आहे. पण मी माझ्या वंशाची आणि अल्लाची सेवा आता या पुढे करणार नाही.. आणि त्याने माझ्या माणसांची प्रगती खुंटते म्हणून मी माझ्या सोमालियातील जमातींना काफिरांचे मार्ग अनुसरण्यास प्रोत्साहन देईन हे निश्चित......

आयान हिरसी अलि....

नोमॅड या पुस्तकात....
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

तकिया : अर्थासाठी हे पहाणे.
तकिय्या

समाजजीवनमानराहणीविचारभाषांतर

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

4 Oct 2016 - 1:05 pm | प्राची अश्विनी

वा! आत बघायला लावणारा, पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख! अनुवाद प्रचंड आवडला.

पैसा's picture

4 Oct 2016 - 10:00 pm | पैसा

!!!

अनुप ढेरे's picture

4 Oct 2016 - 10:09 pm | अनुप ढेरे

मस्तं! विशेषनामं सोडली तर भारतातलं वर्णन वाटू शकेल.

पिलीयन रायडर's picture

5 Oct 2016 - 8:11 am | पिलीयन रायडर

अत्यंत आवडले!

जयंत कुलकर्णी's picture

5 Oct 2016 - 11:42 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

यशोधरा's picture

5 Oct 2016 - 12:25 pm | यशोधरा

अफाट आहे..

राजाभाउ's picture

5 Oct 2016 - 12:52 pm | राजाभाउ

+१ खरच अफाट आहे.

कवितानागेश's picture

5 Oct 2016 - 11:03 pm | कवितानागेश

काय लिहु?

निखिल निरगुडे's picture

6 Oct 2016 - 7:55 pm | निखिल निरगुडे

अप्रतिम

प्रियाजी's picture

7 Oct 2016 - 12:44 pm | प्रियाजी

अतिशय भावपूर्ण अनुवाद! धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2016 - 1:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

धाडसी बाई आहे ! इतके सत्य विचार करायला तिच्या समाजात फार जणांना जमत नाही... बोलायला तर अत्यंत कठीण आहे.

उत्तम अनुवाद. मूळ लेख वाचला नाही, पण भावानुवाद वाचून लेखिकेच्या मनाची तळमळ पोचली.

भावानुवाद छानच. फक्त ते मरीआईच्या कोपाचा संदर्भ आउट ऑफ कंटेक्स्ट वाटला. येथे भावानुवादात दुसरे एखादे उदाहरण देता आले असते का?

जयंत कुलकर्णी's picture

7 Oct 2016 - 4:13 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !
मलाही खटकले होते पण कंटाळा केला होता. आता बदलले आहे.
ढन्यवाद !

सुखीमाणूस's picture

8 Oct 2016 - 6:05 am | सुखीमाणूस

भारतातले आपण भाग्यवान असे वाटले.

रुपी's picture

10 Oct 2016 - 11:34 pm | रुपी

फारच छान! आवडलं.