झीरो

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
20 Sep 2016 - 11:52 pm

"मम्मे, बुटं कुटं फेकलीसा?" इनशर्ट करत करत रव्या बोंबलला
"न्हाय माय, म्या कशापायी टाकू. ते दावेदारानं नेलं का उचलून बघ माय"
"तिज्यायला न्हेऊन्शानी, कायतर सोड म्हण"
एक सापडला बाहेरच्या खाटंखाली, दुसरा न्हाणीच्या चुलीमागं. तिथलंच फडकं मारल बसून तोपर्यंत फवं न च्या आला.
एक घास फव्याचा न एक घोट चाचा करणार्‍या लेकाला न्हाहाळत बसली माय.
काळं का असना पण रव्या नाकीडोळी देखना. नाकाडोळ्यापेक्षा नजरंत भरायचा बेगुमानपणा. बारीक मशीन मारलेल्या आर्मीकटला उचलून धरायची दणक्या छाती. खांदं कधी पुढं आलं नाहीत. कायम ताणलेली न भरलेली छातीच पुढं करणारा रव्या म्हनजे त्याच्या मम्मेचा नानीमांने दिलेला ताईतच जणू.
नास्टा आटपला तशी बॅग अडकवली न बुटं वाजवत रव्या भाईर पडला.
गल्लीत चार रामराम ठोकत अन धा घेत रव्या नीट कट्ट्यावर आला. तितक्यात मोरे अंमलदार आलाच बुलेट वाजवत.
"चला रविसर, लावू तुमच्या कामाचं कायतरी" म्हणत दोन बोटं टपरीकडं दाखवली. रव्या नीट टपरीच्या आश्क्याकडनं दोन पिवळे गांधीबाबा घेऊन बॅकसीटवर बसला. फाट फाट धुर फोडत मोरेची बुलेट ठाण्याकडं निघाली.
"हे बग रव्या, पवारसाहेब तर नसतील आता, राठोड आसंल. तेची तहान काय भागणार नाय. बरं यंदा रिटनचं काय खरं न्हाई आपलं. अवघड केलंय."
"पण मोरे दाजी, तुम्ही हुतय म्हणला की सेटिंग"
"गड्या, आमच्या टायमाला चलायचं, आता बदललला जमाना. फिजिकल करतोस रे तू. मार खातोस रिटनला. आता लास्ट चान्स. पुढच्या साली तर एजबार. रिझर्वेशनचं तर काय खरं न्हाई, कसं करायचं?"
"दाजी, कायबी करा. आपली ताकत संपली आता."
"करु, कायतरी लावू नेहूनशानी. एकचा हुतय का बंदोबस्त?"
"ऑ, एक? काय दाजी, बापाला एक मागितला तर कानाखाली ५ उठतेत"
"मग तेच्या आधीच भरतीला थांबायला काय झालतं"
"ते नाही जमायचं दाजी आता, हेवडं टाइम करा रिटनला म्यानेज, आख्खा पगार टाकीन वर्शभर पायाशी" बोलत वाकलाच खाली रव्या.
"ह्या..असलं असतंय व्हय, उठ लका, बारकं हुतासा तवा तुझ्या बाकडून आम्ही शिकलाव वर्दीचा थाट आन तुम्ही आसं वाकून कसं चालतय ओ"
"काय उपेग झाला दाजी, रिझर्व फोर्सला ना पेन्शन धड ना मान. नावाची वर्दी, घरात नुसता थाट बघून घ्या"
"ह्या ह्या, तसं बोलु नगासा राजं, पावणं केलं तेना झेपतंय तेवढं. आता तुमची बारी. यंदाचं लावा नेट कायतरी."
"कसं करांवं दाजी, काय उमगंना बगा. रिटन आपल्या डोस्क्याच्या भईरची बात"
"बरं, ही घे ५००, जावा घराकडं. आन ते कुळकर्ण्याच्या देवासंगं बसा जरा. च्यायला बामनं लिखापढी कशी बडवतेत तेवढं तरी शिका. मोप ताकद दिलीय आपल्यात, डोस़कं लागतय तेवढं शिका"
"व्हय दाजी, जाताव"
.....................
रव्याला जसं का कळाया लागलं तसं एकच डोसक्यात. झालं तर पोलीसच. वर्दीशिवाय श्याट काय करायचं नाय. आर्मीची भरती काय झेपली नाही तवा पोलीसाचा नाद घेऊन बसलेला. सोबतीची पाच साहाजण फिजिकल लेखी आटपून, ट्रेनिंग उरकून नाही नाही त्या ठिकाणी पोस्टिंग घेऊन बसली. ह्याची कथा पुढं सरकना. पळायला रव्या एक नंबर. २० किलोमीटर निबार पळायचा सकाळी. देशी जोर आन बैठकानं आंग दगडासारखं झालेलं. मम्मेनं खाऊ घातलेलं जीवापाड. त्यात घरच्या म्हशी. रग काय जिरायची नाही. मग उठायचा हात कुणावर तरी. वर्दीसामने झुकणारा रव्या दुसर्‍या कुणापुढं वाकला न्हाय कधी. डोसक्यात राखच कायम. जरा कोण भरतीचा विषय घेऊन छेडला की फोडलाच त्येला.
परवाच सोनकांबळ्याचा नित्या ठोकळ्याएवढी पुस्तके घीवून चाललेला. परिक्षा देऊनच सरकारात घुसणार ह्ये नित्याचा निश्चय, सहज म्हणून रव्याला बोलून गेला.
"राजं, कुठं पोस्टिंग? बसतंय का यंदा तरी रिटन"
सटकला रव्या. हाणून ते हाणून त्याला बोट नाचवून सांगितला.
"पुस्तकं वाचून सुधराया न्हाई तुम्ही, न्हाई इथल्याच चौकीत रिमांडला घेतला तर बोल आईघाल्या"
नित्या गप्प पुस्तके उचलून सटकला, मागनं फिदीफिदी हासली गाबडी, रव्या थाटात परेड कदम टाकत घर गाठला.
.........................
"वर्षं सरली, रीटन काय न निघता रव्या एजबार झाला. धरणग्रस्ताचं मिळनां सर्टिफिकेट का भूकंपग्रस्ताचं. कुठं तर दोन वर्षाचं का हुईना एक्झम्प्शन मिळावं म्हणलं तर ते हुईना. बनसोड्या आन पाटोळ्या सोबतच घाशीत पण त्यांना ३ वर्षे अजून होती हातात. त्येंचं भलं केलं त्यांच्या बाबानी. ओपनला काय केलं राजांनी? दीड एकर शेती, आन दोन म्हशी? बीएड, डीएड ची औकात नव्हती डोसक्याची, आता तर वर्दी बी ग्येली. रिझर्वेशनचा कय जीआर बीआर निघला तरच चान्स. एजला सूट मिळाली तरच कायतरी होतंय. नायतर उठला बाजार"
.........................
आईबापाला कीती दिवस सांगणार रिटन निघंना म्हून, त्येणी सावरुन घ्यायचं तवर घेतलं, आता मम्मेचा सुरु झाला तगादा, "काय जमना वर्दी तर लाग कुठतरी ब्यांकेत बिंकेत"
"मम्मे, एवढं लिव्हायला येत असतं तर पीएसाय नसतो झालो? न्हाई जमाया ते"
"आर्र, सोयरीक्या यायल्यात रं, पावण्याच्या डोळ्यात भरतय सगळं. कायतर नगो दाखवाया नोकरी?"
"मम्मे, लग्नाचं सोड, द्याच्या टैमाला पाव्हणे वर केलं हात, आता टैम झाला गांडू, आणतेत ववाळायला दांडू"
"बग माय, मोरे भावसाब काय करंना का?
..............
अंमलदार मोरे दाजी पाव्हण्यातला. त्येचं बी काळीज तुटायचं ह्येच्यापायी पण हात बांधलेलं त्याचे. शेवटी रव्याला बोलाऊन त्याला सोबत ठाण्यात न्यायला चालू केला. वरली खाल्ली कामं त्याला सांगायला चालू केला. पीआयपासून प्युनपर्यंत सगळे तर रव्याला ओळखायला लागले महिन्याभरात. हायवे ड्युट्या वाढल्या तशा मोरे दाजींनी रव्याला सोबत न्यायला चालू केलं. कॅन्टीनचा राह्यलेला खाकी पीस देऊन टेलरकडनं वर्दीची भरती झाली. बिना नंबराचा बेल्ट न रिकामे शोल्डर फ्लॅप सोडले तर रव्या दिसायला पार मप्पोच. बूट बीट वाजवत काठी आपटत नाईट ड्युटी मारायला मस्त मजा यायली. टोर्चच्या उजेडात बाहेरच्या गाड्या थांबायच्याच. वर्दी बघताच आल्लाद नोटा घरंगळायच्या. माल सगळा मोरे दाजीकडं पोच हुताना दिवसाला तीनचार निळे तुकडे सुटायले. घरी नोटा दिसायच्या, मम्मी आपली चारदा इचारायची.
"परमनंट करतेत ना रव्या बेटा?"
"मम्मे, सोड. आता हे ते वर्दीच समज. पगारीच्या वर सुटतील एक वर्षात"
................
"चला राजं, नवं साह्याब आलंत रेस्ट हाऊसला. पीआय साह्यबानं सांगीतलय. जाऊन येऊ."
रेस्ट हाऊसला सगळा थाटच, लाल दिवा मिरवत बाहेर थांबलेली अ‍ॅम्बॅसेडर, दोन जीपा, चार पाच सफारीवालं, दोन इन्शर्टात गॉगल मिरवणारं. एक जण फाईल घिवून भईर आला की मोरेदाजीनी वर्दी दिली. रव्याला घीवून आत घुसले तसा साह्यब फिरुन बघितला. खालमानेच्या रव्याकडे डोसक्यापासून पायापर्यंत पहात मोरेदाजीवर कडाडला.
"काय मोरे, युनिफॉर्म बदलला का नियम बदलले परस्पर? आँ"
"न्हाई सोनकांबळे साहेब, मी आहे की. ह्ये कॉन्स्टेबल न्हाई, झीरो आहे, गावचाच आहे आपल्या. रवी जाधव नाव हाय, आपल्या पाव्हण्यातलाय. वळकत असताल तुम्ही बी, आयकलाव की हितलेच हाव ना तुम्ही"
..................

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

रातराणी's picture

20 Sep 2016 - 11:59 pm | रातराणी

क्रमशः आहे ना? सुरुवात भारी!

आनंदयात्री's picture

21 Sep 2016 - 12:24 am | आनंदयात्री

जबरदस्त जमून आलीये कथा. तुम्हाला कथेतल्या व्यथेची नस अचुक पकडता येते, आणि अगदी क्लायमॅक्सला ती दाखवता येते! और भी आनेदो.

शप्पथ! एक नंबर बे अभ्या. श्री दा पानवलकरांच्या सूर्य नामक कथासंग्रहात एक अशा ब्याकग्रौंडची कथा आहे. हे पोलिसी वातावरण वगैरे परफेक्ट आहे त्यात. त्याचीच आठवण झाली वाचून.

बोका-ए-आझम's picture

21 Sep 2016 - 1:22 am | बोका-ए-आझम

सूर्यवरुनच काढलेला आहे. अनंत वेलणकर _/\_

बोका-ए-आझम's picture

21 Sep 2016 - 1:21 am | बोका-ए-आझम

अस्सल बावनकशी! रव्याचं कायतरी जमव भौ!

अमितदादा's picture

21 Sep 2016 - 1:26 am | अमितदादा

एक नंबर--

बहुगुणी's picture

21 Sep 2016 - 1:58 am | बहुगुणी

बारकावे अगदी अचूक, आवडली.

निनाद's picture

21 Sep 2016 - 3:49 am | निनाद

भारी लिहिताय, एकदम जबरदस्त!
अजून पाहिजे होती...

पिशी अबोली's picture

21 Sep 2016 - 3:55 am | पिशी अबोली

किती ते कंगोरे रंगवलेत! वा: भाऊराया!

संदीप डांगे's picture

21 Sep 2016 - 8:39 am | संदीप डांगे

शॉट!

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2016 - 8:40 am | टवाळ कार्टा

भारी

प्रचेतस's picture

21 Sep 2016 - 8:46 am | प्रचेतस

जबरी कलाटणी दिलीस शेवटी.
नादच खुळा.

यशोधरा's picture

21 Sep 2016 - 8:56 am | यशोधरा

भन्नाट आवडली.

झुमकुला's picture

21 Sep 2016 - 8:57 am | झुमकुला

एक नंबर......

नाखु's picture

21 Sep 2016 - 9:03 am | नाखु

निरिक्ष्ण आणि बोली भाषा अगदी नेमकी पकडलीय,

पुढचा भाग लवकर येऊ दे.

अभु लिखाण पंखा नाखु

छान लिहिले आहेस अभ्या !!!

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2016 - 9:44 am | चौथा कोनाडा

अ प्र ति म !
भ न्ना ट !

काय गोळीबंद लेखन आहे !
अतिशय समर्पक शब्द भाषा अन जबरदस्त ओघवती शैली !
वाचायला सुरु केली ते शेवटालाच येवून थांबलो
शेवट स्टनिंग आहे !

अभ्या द ग्रेट !

गणामास्तर's picture

21 Sep 2016 - 10:24 am | गणामास्तर

दोस्ता, तुझी गोष्ट सांगण्याची स्टाईल जबरा हाये. लै आवाल्डा.
अश्या लै रव्याच्या जिंदगीचं मॅथेमॅटिक्स कुठं तरी हुकून र्‍हायलय.

इनिगोय's picture

21 Sep 2016 - 11:06 am | इनिगोय

+1 गोष्ट आवडलीच!

अशा माणसांचं पुढे काय होतं?

तुषार काळभोर's picture

21 Sep 2016 - 11:08 am | तुषार काळभोर

झिरो!

संजय पाटिल's picture

21 Sep 2016 - 11:01 am | संजय पाटिल

झिरोची.. जबर मांडलिया..

सिरुसेरि's picture

21 Sep 2016 - 1:09 pm | सिरुसेरि

जबरदस्त लेखन . कुठेतरी "अपहरण" मधला धडपडणारा अजय देवगण आठवला .

खेडूत's picture

21 Sep 2016 - 1:12 pm | खेडूत

मस्त मस्त कथा!
अगदी चित्र समोर उभं झाल्ं..

नीलमोहर's picture

21 Sep 2016 - 2:24 pm | नीलमोहर

कशाला असं लिहिता,
हलकं फुलकं काही लिव्हा आता,

एस's picture

21 Sep 2016 - 2:41 pm | एस

छान लिहिलंय.


ह्ये कॉन्स्टेबल न्हाई, झीरो आहे,

किसन शिंदे's picture

21 Sep 2016 - 4:27 pm | किसन शिंदे

जबर लिहिलंय. पुढचाही भाग येऊदेच

सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे मनापासून आभार.
ह्या भागाचा उर्वरीत भाग पॉइंट झीरो प्रकाशित केला आहे.
धन्यवाद.

ज्योति अळवणी's picture

22 Sep 2016 - 2:08 am | ज्योति अळवणी

सुंदर लिहिलं आहे

सदानंद कुलकर्णी's picture

26 Jun 2019 - 8:22 pm | सदानंद कुलकर्णी

एका दमात वाचले अन नजरेसमोर अनेक 'रव्या' दिसू लागले. भाषेचे वळण लातूर, उस्मानाबाद भागातील वाटते आहे.

जॉनविक्क's picture

26 Jun 2019 - 8:41 pm | जॉनविक्क

_/\_

mayu4u's picture

28 Jun 2019 - 11:52 am | mayu4u

अस्वस्थ करणारं लेखन...