हा अनुभव आहे त्यामुळे कंपनीचे नाव लिहिले आहे.
मध्यंतरी माझी नॅनो मी ओफिसातुन घराकडे येताना संध्याकाळी रस्त्याच्या मधोमध बंद पडली. कशीबशी ढकलत कडेला लावली व रिक्षा करुन मग घरी आलो. रात्री टाटाच्या कस्टमर केअर ला फोन लावुन पुढे टोईंग बाबत विचारणा केली.पलिकडुन उत्तर आले कि थोड्या वेळात कॉल करु म्हणुन.एकुण तक्रार धसास लावण्याचा प्रकार कौतुकास्पद आहे. त्याबद्दल काही तक्रार नाही. पण नंतर कस्टमर केअरमधुन फोन यायला चालु झाले. सुरवात कन्नड मधुन. फोन नंबर ०२० ने सुरवात होत असल्याने तो पुण्याहुन येत आहे हे समजले व मी बेंगलोरमधुन तक्रार रजिस्टर केली असल्याने त्यानुसार कर्नाटक क्षेत्र सांभाळणारा कोणी कन्नड भाषिक प्रतिनीधी बोलत असणार हे ही ताडले पण बाबांनो मला कन्नड येत नाही कोणी मराठी बोलणारे असल्यास त्याच्याशी संभाषण करु शकतो असे सांगितल्यानंतर मराठी बोलणारे कोणी नाही अशी असमर्थता दर्शवुन हिंदी वा इंग्लिश मध्ये संभाषण सुरु ठेवण्यात आले. हा प्रकार ३-४ वेळेला झाला. सुरवात अस्खलीत कन्नड मधुन. नो मराठी...मग हिंदी व इंग्लिश मधुन. अर्थात तक्रारीची योग्य दखल घेतली गेली व दुसर्या दिवशी टोईंग करु असे आश्वासन दिले गेले. दुसर्या दिवशी जेव्हा फोन केला तेव्हा अर्थात तिथला स्टाफ बदलला असल्याने कोणी स्त्री प्रतिनीधी आता उपलब्ध होती. तेव्हाही तोच प्रकार. अस्खलित कन्नड.नो मराठी.
अर्थात एकुण प्रोब्लेमच्या सोडवणुकीबद्दल कंपनीबद्दल काही तक्रार नाही पण पुण्यात असुनही तिथल्या कस्ट्मर केअर रिप्रेझेंटेटीवला मराठी येत नसावे ह्याबद्दल सखेद आश्चर्य जरूर वाटले.
आशा आहे कि टाटा मोटर्स कस्टमर केअर पुण्यातुन चालविले जात असुन मराठीबाबत उदासीन आहे हा फक्त मला आलेला असावा.
कंपनीमध्ये काम करणारे ह्याबाबत जास्त माहीती देवु शकतील.
ठिगळ : काही वेळापूर्वीच एकुण सर्विस कशी काय वाटली असा फिडबॅक कॉल आला. पुन्हा सुरवात कन्नडमधुन.
मी...मराठी?
संभाषण कन्नड वळणाने जाण्यार्या इंग्लिशमधुन.
प्रतिक्रिया
16 Sep 2016 - 6:21 pm | सूड
तुम्ही कानडा योगेशु नाव घेतलेलं त्यांना माहित असावं
16 Sep 2016 - 6:24 pm | कंजूस
माथेरान महाबळेश्वरची भाषा गुजराथी,हिंदी,इंग्रजी आहे.
16 Sep 2016 - 9:04 pm | खटपट्या
तुम्ही बँंगलोरमधून तक्रार केलीत म्हणून तुमचा कॉल कन्नड बोलणार्या कॉलसेंटरकडे वळवला असेल. त्यात चूक काय? जर एखाद्याने पुण्यातून तक्रार केली असेल आणि त्याला कन्नडमधून प्रतिसाद मिळत असेल तर चूकीचे म्हणू शकतो. पुण्यात काम करतात म्हणून मराठी आलेच पाहीजे अशी सक्ती आपण करु शकत नाही.
कस्टमर केअर सेंटर पुण्यात आहे पण ते कन्नडातल्या लोकांना सपोर्ट देण्यासाठी असेल तर मराठी नाही आले तरी काही फरक पडत नाही. बँगलोर मधे राहणार्या कीती मराठी लोकांना कन्नड येते?
16 Sep 2016 - 10:30 pm | संदीप डांगे
सहमत आहे,
कायो, तुम्ही फक्त 'पुण्याचा नंबर' म्हणून इतक्या लांबवर विचार केलात?
16 Sep 2016 - 11:21 pm | कानडाऊ योगेशु
सक्ती नाही हो मी फक्त शहानिशा करतो आहे कि मराठी मधुन संभाषण करु शकतो का नाही ते?
इन फॅक्ट मी तशी विनंतीही केली कि कोणी मराठी येणार्याकडे कॉल ट्रान्स्फर करा म्हणुन. परंतु टेक्नीकली तसे करणे शक्य नसावे. मध्यंतरी संगीतकार कौशल इनामदारांनी एका सेल फोन सर्विस प्रोवायडर कंपनीबाबत आलेला अनुभव नमूद केला होता. त्या कंपनीने हेतुपुरस्सर कॉलसेंटर मध्ये मराठीला सपोर्ट केलेच नव्हते. का तर म्हणे इट इज डाऊनमार्केट. तसा प्रकार इथे नसावा हीच अपेक्षा आहे.
17 Sep 2016 - 12:34 am | खटपट्या
हेच म्हणतोय की जर महाराष्ट्रातून कोणी तक्रार रजीस्टर केलीय आणि त्याला मराठीतून प्रतिसाद मिळत नसेल तर प्रोब्लेम आहे.
हा सीनारीयो घ्या - महाराष्ट्रातून कन्नड भाषीकाने तक्रार रजीस्टर केलीय. ती तक्रार मराठीत सपोर्ट देणार्या कॉलसेंटरला गेली. कॉलसेंटर बँगलोरात आहे. त्यात सगळी मराठी मुले बसली आहेत. त्यांना कन्नड येत नाही. आता जर तो कानडी म्हणाला की "कॉलसेंटर बॅंगलोरात आहे, मला कानडीमधेच बोलायचे आहे". तर काय करणार?
कॉलसेंटर्स ही कुठेही असू शकतात. मिळणारी जागा, लागणार्या टेलीफोन सुवीधेची उपलब्धतता, इंटरनेट बँडविड्थची उपलब्धता, बाकी तंत्रज्ञान हे सर्व टाटा कंपनीला पुण्यात स्वस्तात उपलब्ध झाले असल्यास त्यांनी इथे कॉलसेंटर उघडले असणार.
Make sense?
17 Sep 2016 - 9:07 am | नमकिन
कुठुनही कुठल्याही (ग्राहकाच्या) भाषेत संवाद साधता यावेत यासाठीच तर "कॅाल सेंटर" चा उदय झालेला. ग्राहकाची आग्रहाची विनंती होती तर मराठी भाषेतून संपर्क प्रस्थापित करता येणे हे आजच्या संपर्क क्रांती युगात सहज शक्य होते.
जिथे टाटा समूह स्वतः या क्षेत्रात आहे तेव्हा मराठी भाषी ग्राहक कुठल्याही राज्यातून संपर्क साधता त्याला त्याच्या भाषेत संपर्क करण्यास काही अडचण उद्भवू नये
16 Sep 2016 - 10:58 pm | त्रिवेणी
आमच्या ह्यांना विचारुन सांगते.
16 Sep 2016 - 10:59 pm | दासबोध.कॊम
वरील प्रतिक्रियांशी सहमत...धाग्याला समानांतर विषयांतर
बंगलोर हे शहर शहाजी महाराज भोसल्यानी शून्यापासून वसवलेले आहे बरे! तसेच मैसूर संस्थानात सुमारे 40,000 मराठी भाषक लोक आजही राहातात! त्यांचे मराठी अर्थातच आपल्याला न कळणारे आहे! पण ऐकायला मजा येते ते!
फारसी भाषेची लागण झालेला एकही शब्द नसलेले शिवकालीन शुद्ध मराठी आहे ते!
उदा. आपला फोन प्राप्त जाहला. कुशल ज्ञात जाहले! (समजले हा देखील फार्सी शब्द!) येण्याचे करावे.
आम्ही प्रस्थान ठेवतो आहोत.कैशिया प्रकारे म्हणून याल ते? (प्रत्येक वाक्यात उगाचच "म्हणून" हा शब्द टाकतात )
मराठ्यांनी एके काळी उभ्या देशावर राज्य केले आहे हे खरेच तिथे राहायला गेल्यावरच कळते...आणि भारी वाटते!
16 Sep 2016 - 11:07 pm | अमितदादा
विकिपीडिया तर वेगळी माहिती सांगते, बंगलोर शहराचा इतिहास फारच जुना आहे. माहिती नवीन वाटली म्हणून तपासून पहिली.
16 Sep 2016 - 11:27 pm | बॅटमॅन
साफ चूक. बेंगळूरू शहर किमान हजार वर्षे जुने आहे. त्यापासून जवळ असलेल्या बेगूर नामक गावातील हजारेक वर्षांपूर्वीच्या शिलालेखात बेंगळूरू हे नाव येते.
http://bangalore.citizenmatters.in/articles/1632-begur-temple
बायदवे शहाजीराजांच्या बंगळूरमधील राजवाड्याचे स्थान माहिती नसले तरी त्याचे नाव गौरीविलास असे होते अशी माहिती बहुधा जयराम पिंड्येकृत राधामाधवविलासचंपू या काव्यामध्ये आहे.
17 Sep 2016 - 6:46 am | A.N.Bapat
बॅटमॅन , राधामधवविलासचम्पू ची कॉपी कुठे मिळेल सांगू शकाल का ? माझी कॉपी कोणी तरी गहाळ केली आहे .
17 Sep 2016 - 12:25 pm | आदूबाळ
राजवाडे प्रत बुकगंगावर मिळते
http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4739285438633860793
17 Sep 2016 - 10:01 am | कानडाऊ योगेशु
बेगुरहे सध्याही एकुण बेंगलोरच्या मानाने त्यामानाने कमी विकसित उपनगर बनुन राहीले आहे. इतिहासात त्याला इतके महत्व असावे हे जाणवत नाही. काहीसे मुंबईच्या नालासोपार्यासारखा प्रकार झाला आहे.
16 Sep 2016 - 11:45 pm | अमितदादा
तसेच हे हि वाक्य तपासून घ्यावे वाटते, मला नक्की माहिती नाही आणि जालावर पण अचूक संदर्भ मिळेनात. हे वाक्य प्रतिसाद कर्त्याच आहे की ऑथेंटिक माहिती आहे हे कळल्यास बरे होईल.
17 Sep 2016 - 7:48 am | दिगोचि
मला वाटते तुमच्या लिहिण्यात काही चुक झाली आहे. हे शहरच्या ठिकाणी १५३७ मधे केम्पे गोउडा याने एक किल्लेवजा स्त्रक्चर येथे बान्धले. त्यानन्तर १०० वर्शानी मरठ्यानी यावर राज्य केले.याचा अर्थ शाजीराजानी ते वसवले असा होत नाही.
17 Sep 2016 - 9:31 am | दासबोध.कॊम
शहाजी राजांच्या काळात ते एक लहान शहर होते. जसे पुणे हे शहर शिवाजी महाराजांपुर्वी होतेच परंतु इथला व्यापार उदीम शेती भाती सर्व थांबून लोक परागंदा झालेले होते, शिवाजी महाराजानी ती घडी पुन्हा बसवली, बाजारपेठ उभी केली लोकांना परत बोलावून आणले, व्यापार सुरु केला अगदी तेच शहाजी महाराजांनी लहानशा बेंगळुरू शहराचे केले. शून्यापासून वसवले ही शब्दरचना चुकली...शून्य याचा अर्थ तिथे काहीच नव्हते असा अपेक्षित नव्हता.साधे शहर होते जे बहामनी सुलतानांच्या जाचाने विस्कळीत झालेले होते. अजून एक सल्ला, विकिपीडिया ला कधीही संदर्भ साधन मनू नका, त्यातली माहिती कधीही, कुणीही व कितीही बदलू शकतो. आपणही बदलू शकतो.
भाषेचे म्हणाल तर मी स्वत: पाहून आलोय तेच लिहिले आहे. तंजावरी मराठी जशी आहे तशीच मैसुरी मराठी पण आहे इतकेच काय कारवारी मराठी पण वेगळी आहे.
17 Sep 2016 - 10:59 am | अमितदादा
धन्यवाद. विकिपीडिया बद्दल ची सूचना मान्य आहे, पण प्राथमिक माहिती साठी ( संशोधनासाठी नाही) हा संदर्भ देऊ शकतो करणं माहिती मोठ्या प्रमाणात बरोबर असते.
17 Sep 2016 - 12:54 am | गामा पैलवान
कानडाऊ योगेशु,
मराठीला दुय्यम स्थान आहे हे नक्की. यामागील इतिहासात मी जात नाही.
यावर उपाय म्हणजे आपण मराठीप्रेमींनी जितकी मरठी वापरता येईल तितकी वापरणे. आज इंग्रजीच्या आक्रमणापुढे हिंदीने नांगी टाकली आहे. बाकीच्या भाषांबद्दल माहीत नाही. आपल्याला मराठी हिंदीच्या वळणाने जायला नकोय. आपण आपापसांत मराठी वापरून तिला जिवंत ठेवणं अतीव महत्त्वाचं आहे. संतवाङ्मय ही मराठीतली सृजनशक्ती आहे. एकदा का मराठीची ताकद कळली की इतर भाषिक आपसूक आकर्षित होतील. तोवर तिला आपल्यांत जिवंत ठेवायला हवी.
आ.न.,
-गा.पै.
17 Sep 2016 - 9:58 am | कानडाऊ योगेशु
तुमच्याशी सहमत आहे. व त्याहेतुनेच जर कानडीमध्ये सर्विस उपलब्ध आहे तर मराठीत का नसावी ह्या विचाराने मी मराठीत संभाषण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कॉलसेंटर्समध्ये कानडी + हिंदी + इंग्लिश अश्या तिन्ही भाषात संभाषण करु शकणारे प्रतिनिधी होते तर कानडी + मराठी + हिंदी + इंग्लिश अश्या चारही भाषात संभाषण करु शकणारे प्रतिनीधी असावयाला काहीही हरकत नव्हती तेही जेव्हा कॉलसेंटर पुण्यामध्ये आहे. इतरत्र असले असते तर काही तक्रार नव्हती.
17 Sep 2016 - 10:25 am | तुषार काळभोर
ते बंगळूरातही असू शकते.
मी एम्फॅसिस मध्ये असताना अमेरिकेतील कॉम्प्युटर युजर्स त्यांच्या लोकल नंबरला कॉल करायचे, जो आम्ही मगरपट्ट्यात उचलायचो.
अ-इंग्रजी देशातील युजर्स तेथील लोकल नंबरला कॉल करायचे (ब्राजील, जापान , चीन). तो पण आम्ही मगरपट्ट्यात घेऊन इंग्रजीत सुरुवात करायचो. समोरच्याला इंग्रजी येत नाही, हे समजल्यावर (मला त्याची भाषा/त्याला इंग्रजी न येणे, ही चू़क दोघांपैकी कोणाचीच नाही.) त्याला 'प्लीज वेट फॉर टू मिनिट्स, आय विल गेट अ ट्रान्सलेटर' असे सांगून दुभाष्याकरवी संभाषण होऊन त्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला जायचा. पण त्याला इंग्रजी ने येण्याबद्दल ना माझ्या मनात राग असायचा, अन् मला पोर्तुगीज/जापानी/चिनी न येण्याबद्दल ना त्याच्या मनात राग असायचा.
त्यामुळे तुम्ही टाटाच्या कॉलसेंटरला कॉल लावला तो पुण्याच्या नंबरवर गेला/किंवा पुण्याच्या नंबरवरून कॉल आला, म्हणजे तो पुण्यात बसूनच केला गेला पाहिजे, असं नाही. तुमचा कॉल बंगळूरातून आल्यामुळे तो अशा कॉलसेंटरमध्ये गेला जिथे कानडी बोलणारे कर्मचारी आहेत व तिथल्या 'प्रादेशिक अस्मिते'मुळे कन्नडमधुन स्वागत व ते येत नसल्यास हिंदी/इंग्रजीत संभाषण अशी पॉलिसी असेल टाटाची.
स्थानिक भाषेत संभाषण करून 'बहुसंख्य' स्थानिकांना खूश करण्याचा प्रयत्न करणे, हे बर्याच कंपन्यांचे धोरण असते.
पुण्यातून कॉल केल्यास मराठी बोलणारे कर्मचारी उपलब्ध असतील का, ते पाहायला हवे.
शिवाय, बंगळूरातून फोन केल्यावर जर हिंदीत स्वागत झाले (व कर्मचार्याला कन्नड येत नसेल,) तर टाटाच्या मार्केटवर (कदाचित) परिणाम होऊ शकतो. पण पुण्यातून फोन केल्यावर जर हिंदीत स्वागत केले (व कर्मचार्याला मराठी येत नसेल,) तर टाटाच्या मार्केटवर किती परिणाम होईल, त्याचा अंदाज करायला हवा.
17 Sep 2016 - 12:48 pm | अद्द्या
मी बेंगलोरमधुन तक्रार रजिस्टर केली
^^^
इथेच संपतो ना विषय ?
आणि हो , या कन्नड (दु)आग्रहाचा त्रास झालाय काही वेळा , तरीही हे म्हणेन . कि कर्नाटक , आंध्र , तामिळ . इथली माणसे पहिला भेटीतलं / बोलतील तेव्हा पहिला शब्द त्यांच्याच भाषेत असेल . मुद्दाम करतात असं नाही.. सवय असते . आणि ती खूप चांगली सवय आहे..
आपलेच लोक साले "और भैईया कैसे हो ? " म्हणत सुरुवात करतात .
असो .. जिथे राहणार असाल तिथे भाषा शिकणे हे रोजच्या गोष्टी सोप्प्या करतात :)
मग जबरदस्तीने शिका व खुशीने .