‘‘जेव्हा त्याच्या संवेदनांना ठेच पोहोचते तेव्हाच लेखक त्याची लेखणी उचलतो.....’’
- मन्टो त्याच्यावर चालविलेल्या गेलेल्या खटल्यात न्यायधिशाला.
सादत मन्टो आदरांजली-१
सादत मन्टो आदरांजली-२
सादत मन्टो आदरांजली-३
थंडा गोष्त..
इश्र्वर सिंह हॉटेलच्या खोलीत आला. त्याला पाहताच कुलवंत कौर पलंगावरुन उठली. तिखट नजरेने तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि दरवाजा खिट्टी लाऊन आतून बंद केला. रात्रीचे बारा वाजले होते. शहराच्या आसमंतात एक प्रकारची भयाण शांतता पसरली होती.
कुलवंत कौरने पलंगावर पालथी मांडी घातली. इश्र्वरसिंह बहुतेक आपल्या गत आयुष्यातील आठवणींच्या खपल्या काढत एका कोपऱ्यात उभा होता. हातात त्याचे कृपाण चमकत होते. काही क्षण असेच शांततेत गेले. ती शांतता असह्य झाल्यावर कुलवंत कौरने आपली मांडी सोडली व तिने पलंगाच्या काठावर बसून आपले पाय खाली सोडले ते एका तालात हलवित बसली, पण ईश्र्वर सिंहने तोंडातून एक चकार शब्द काढला नाही.
कुलवंत कौरचा बांधा उफाड्याचा होता. रुंद नितंब, डोळ्यात भरणारे उन्नत उरोज व जाड महिरपी ओठ तिच्या माद्कपणात भरच घालत असत. केसांच्या गालावर विखुरलेल्या बटा तिचे सौंदर्य खुलवीत. या सगळ्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्र्वास डोकावत असे. पण इश्र्वरसिंह कोपऱ्यात मान खाली घालून तसाच उभा होता. एरवी कसलेली त्याची पगडी सैल झाली होती व कृपाण घेतलेले हात आता थरथरत होते. पण त्याच्या तगड्या, मर्दानी रुबाबदार शरीराकडे पाहताना तो कुलवंत कौरला अगदी शोभणारा होता हे खरेच. थोडे क्षण असेच गेल्यावर ती शांतता भेदत लाडिकपणे म्हणाली,
‘‘इश्र्वर सैंय्या !’’
त्याने मान वर करुन तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. तिच्या नजरेने घायाळ न होता त्याने दुसरीकडे मान फिरवली.
ते पाहून तिने आवाज चढवला पण लगेचच तो खाली करत तिने त्याला साद घातली,
‘‘ इश्र्वर सैय्या.. कुठे होतास इतके दिवस ?
आपल्या सुकलेल्या ओठावरुन जिभ फिरवत त्याने उत्तर दिले,
‘‘ माहीत नाही ! ’’
कुलवंत कौरच्या भुवया वर गेल्या. ‘‘ म्हणजे काय !’’
इश्र्वरसिंहने हातातील कृपाण बाजूला फेकले आणि तो पलंगावर लवंडला. त्याच्या चेहऱ्यावरुन तर असे वाटत होते की तो बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. पलंगावर त्याचा तगडा देह असा पडलेला पाहून तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम दाटून आले. त्याच्या डोक्यावरुन तिने हात फिरवला व हात कपाळावर ठेवून तिने मोठ्या प्रेमाने विचारले,
‘‘ काय झालेय तुला ?’’
इश्र्वरसिंह छताकडे डोळे लाऊन पडला होता. त्याने छतावरची नजर हटवली व तो कुलवंत कौरच्या निरागस चेहरा न्याहाळू लागला. त्याने एकदम तिला जड आवाजात हाक मारली,
‘‘कुलवंत !’’. ती साद ऐकताच कुलवंत त्याला बिलगली. ‘‘ हां जानी....’’
इश्र्वरसिंहने आपली पगडी काढली. तिच्याकडे त्याने असहाय्य नजरेने पाहिले. तिच्या मासल पार्श्वभागावर त्याने हलकेच थोपटले व आपल्या मानेला एक झटका देऊन तो स्वत:शीच पुटपुटला, ‘‘ या बाईचे डोके फिरलंय बहुतेक.’’
त्या झटक्याने त्याचे बांधलेले केस मोकळे झाले. त्या सुटलेल्या केसातून प्रेमाने बोटे फिरवत कुलवंतने विचारले,
‘‘ इशरसैंया कुठे होतास इतके दिवस तू ? इकडे माझे काय हाल झाले माहिती आहे का...?’’
‘‘ घरी गेलो होतो’’ हे बोलताना त्याचे हात आपोआप तिच्या स्तनांकडे वळले.
‘‘ बाई असावी तर अशी’’ तो मोठ्याने म्हणाला. कुलवंतने फणकाऱ्याने त्याचा हात झटकला व म्हणाली,
‘‘ कुठे होतास ? तालुक्याला गेला होतास का ?’’
एका हाताने आपले केस पिरगळत इश्र्वर सिंहाने उत्तर दिले, ‘‘ नाही !’’
ते उत्तर ऐकून कुलवंत चिडली.
‘‘ मला माहीत आहे तू शहराकडेच गेला होतास.. तू बरीच लूट केली आहेस आणि ती माझ्यापासून लपवतो आहेस.’’
‘‘मी माझ्या बापाची अवलाद असेन तर तुझ्याशी खोटे बोलणार नाही !’’ ते उत्तर ऐकून कुलवंत चूप झाली पण लगेच खवळून म्हणाली,
‘‘ पण मला हे समजत नाही की त्या रात्री तुला झाले तरी काय.. चांगला माझ्याबरोबर झोपला होतास... आदल्या दिवशी लुटून आणलेल्या दागिन्यांनी मला मढवले होतेस, माझ्यावर चुंबनांची बरसात करत होतास पण एकदम काय झाले की तू उठून कपडे करुन बाहेर निघून गेलास ते ?’’
ते ऐकून इश्र्वरसिंहचा चेहरा पडला.
कुलवंत म्हणाली, ‘‘ सैंय्या जरुर काहीतरी गडबड आहे.’’
‘‘तुझी शपथ, काही नाही कौर !’’ इश्र्वरसिंह म्हणाला. तो म्हणाला खरा पण त्यात काही दम नव्हता. कुलवंतने आपला खालचा ओठ दाताखाली चावला आणि म्हणाली,
‘‘ इश्र्वर आज तू नेहमीचा इश्र्वर नाहीस...’’ ते ऐकल्यावर मात्र तो ताडकन उठला. जणू काही त्याला तिच्यावर हल्लाच करायचा होता. तिला मिठी मारुन म्हणाला,
‘‘लाडके मी तोच आहे हे तुला थोड्या वेळातच कळेल....’’ तो तिला काहीबाही सांगत राहिला पण तिचा त्यावर विश्र्वास बसला नाही. ती त्याला सारखे तेच तेच विचारु लागली.
‘‘त्या रात्री कुठे गेला होतास ?’’
‘‘आईकडे ?’’
‘‘मला नाही सांगणार ?’’
‘‘ काही असेल तर सांगणार ना ?’’
‘‘मला खरंखरं सांग नाहीतर मला जाळून टाक’’
हे ऐकल्यावर इश्र्वरसिंहने तिला परत मिठीत घेतले. या गडबडीत त्याच्या मिशीचे केस तिच्या नाकपुड्यात हुळहुळले आणि तिला जोरदार शिंका आल्या. ते पाहताच दोघांना हसू आवरेना.... आपला कुडता काढून इश्र्वरसिंह तिला म्हणाला, ‘‘ चल पत्याचा डाव टाकू.’’
‘‘ चल फुट’’ कुलवंतने फणकाऱ्याने उत्तर दिले.
इश्वरसिंहने तिच्या पार्श्वभागाला एक जोरदार चिमटा काढला. कुलवंत चित्कारुन बाजूला झाली,
‘‘ नको ..रे.. इश्र्वर दुखंतं ना मला.’’
इश्र्वरसिंहने पुढे होऊन तिचे ओठ आपल्या दातात पकडले... त्यानंतर मात्र कुलवंतने स्वत:ला त्याच्या स्वाधीन केले. इश्र्वर सिंहने आपला कुडता काढून जमिनीवर फेकला आणि म्हणाला, ‘‘ चल होऊन जाउदेत एक पत्त्याचा डाव !’’
पुढील सुखाच्या कल्पनेनेच कुलवंतचे ओठ थरथरु लागले. इश्र्वरने बकरा सोलतात तसा तिचा कुडता दोन्ही हाताने पकडून डोक्यातून बाहेर काढला व बाजूला ठेवून दिला. जरा दूर होऊन त्याने तिच्या नग्न शरिराकडे एक अधाशी नजर टाकली...पुढे होऊन तिच्या दंडांला चिमटा काढला. ‘‘ कुलवंत शपथ् सांगतो, फार मस्त आहेस तू...’’
आपल्या दंडावरील काळ्या निळ्या झालेल्या गोलाकार डागाकडे पहात ती हसत म्हणाली, ‘‘ चावट आहेस तू सैंय्या...’’
मिशीतल्या मिशीत हासत इश्र्वएअसिंह तिच्या कानात कुजबुजला, ‘‘ मग होऊन जाऊ देत का आज कुलवंत ?’’ असे म्हणून त्याने तिला मिठीत घेतले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला, तिच्या नितंबावर चापट्या मारल्या, कानाच्या पाळ्या चावल्या, गाल चुरगाळून लाल केले... पत्ते इतके पिसले की कुलवंत एखाद्या उकळणाऱ्या दुधासारखी आतून उकळू लागली. पण इश्र्वरसिंह आणि कुलवंतच्या या कामक्रिडेत कुलवंत पेटली, मात्र इश्र्वरसिंह मात्र पेटून उठलाच नाही. दुध उतू जात होते आणि खाली विस्तव विझत चालला होता. शेवटी त्याच्या या निष्फळ पोरकट चाळ्यांना कंटाळून कुलवंत फिस्कारली,
‘‘ इश्र्वर सैंया, पत्ते पिसणे खूप झाले...आता हुकमाचा पत्ता टाक.. हुकमाचा !’’
ते ऐकताच इश्र्वर सिंहाचा एकदम बर्फाचा गोळा झाला, त्याचा चेहरा गोरामोरा झाला. जणू काही पत्ते पिसताना त्याच्या हातून पत्ते निसटले.. त्याने तसेच कुलवंतच्या दंडावर आपले डोके टेकले व तो हळूच तिच्या कुशीत शिरला. त्याच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा होऊ लागले. कुलवंतने त्याला उभारी देण्याचा बराच प्रयत्न केला पण छे ! आत्तापर्यंत सरव काही बेफामपणे मुकावस्थेच चालले होते. आपली कामेच्छा पूर्ण होण्याची शक्यता नाही असे दिसताच कुलवंत चिडून पलंगावरुन खाली उतरली. आजवर असे कधी झाली नव्हते. नको नको म्हणेपर्यंत तो तिच्या पदरात सूख ओतत होता. मग आता काय झाले असेल ? तिच्या मनात एक विचार चमकून गेला. समोरच्या खुंटीवर चादर लटकत होती. तिने घाईघाईने ती स्वत: भोवती लपेटली. शंकेने तिच्या मनाचा ताबा घेतला आणि राग तिच्या डोळ्यात उतरला. नाकपुड्या फुलवत ती किंचाळली,
‘‘ इश्र्वर, मी विचारते, कोण आहे ती ? कोण आहे ती हरामजादी जिच्याकडे तू इतके दिवस मुक्काम ठोकला होतास? कोणा चांडाळणीने तुला पिळलं आहे ते सांग !’’
इश्र्वसिंहाने काहीच उत्तर दिले नाही. तो तसाच पलंगावर पडून राहिला.
इकडे कुलबवंतच्या रागाचा पारा चढत होता, ‘‘मी विचारते आहे कोण आहे ती ? कोण आहे ‘चोर पत्ता ’ ?
इश्र्वरसिंहने खालच्या आवाजात उत्तर दिले, ‘‘ कोणी नाही, कुलवंत कोणी नाही.’’
आपल्या कमरेवर हात ठेवून कुलवंत म्हणाली,
‘‘ मी आज, ती कोण आहे हे शोधणारच आहे ! घे वाह गुरुची शपथ आणि सांग तुझी कोणी बाई नाही...’’ इश्र्वरसिंह काही बोलणार तेवढ्यात ती फणफणली,
‘‘ शपथ घेण्याआधी लक्षात ठेव.... मी सरदार निहाल सिंहाची मुलगी आहे.. खोटं बोललास तर तुकडे करेन तुझे. बोल ठेवली आहेस की नाही बाई ? हं घे आता शपथ...!’’
यावर उत्तर म्हणून इश्र्वरसिंहने नुसतीच मान हलविली. ते पाहून कुलवंतच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने पटकन तेथेच पडलेले कृपाण उचलले. कृपाण उपसून म्यान बाजूला फेकले आणि इश्र्वर सिंहाच्या मानेवर वार केला. रक्ताची चिळकांडी उडाली. याने समाधान न होऊन तिने त्याचे केस पकडले आणि त्याला गदागदा हलविण्यास सुरुवात केली. तोंडातून शिव्यांचा भडिमार चालू होताच.
इश्र्वरसिंहने मान हलविली. कापत्या आवाजात म्हण्ला, ‘‘ जाऊ देत कुलवं.... ऐक माझे, दे सोडून !’’
त्याचा आवाज ऐकून कुलवंत थबकली. त्याचा असा रडवेला आवाज तिने आजवर ऐकला नव्हता. ती मागे सरली. मानेतून रक्ताची धार त्याच्या मिशीवर उडत होती. त्याने कुलवंतकडे नजर टाकली. त्या नजरेत राग, असहाय्यता भरली होती.
‘‘ कुलवंत, प्यारी, जरा घाईच केलीस तू !’ पण ठीक आहे, मी समजू शकतो’’
कुलवंतने परत कृपाण उचलले, ‘‘ कोण होती ती ? तुझी आई ?’’
रक्त आता त्याच्या ओठावर उतरले होते. त्याने त्या रक्ताची चव घेतली. त्याच्या अंगावर शहारा आला.
‘‘ मी याच कृपाणाने सहा जणांना ठार मारले आहे लक्षात ठेव कुलवंत सहा जणांना !’’
‘‘ मी विचारते आहे, कोण होती ती हरामजादी, कुत्री ? !’’
इश्र्वर सिंहाचे डोळे चमकले.
‘‘तिला शिव्या देऊ नकोस.’’
त्याने आपल्या जखमेवरुन बोटे फिरविली. त्याच्या गळ्यातून आवाज फुटेना. हाताला लागलेले रक्त पाहून त्याच्या ओठावर हसू उमटले.
‘‘सांगतो ! माणूस पण एक अजब रसायन आहे खरे !’’
‘‘ इश्र्वर सैंया कामाचे बोल !’’
‘‘तेच सांगतोय...जरा धीर धर !’’
त्याने सांगण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला परत घाम फुटला. त्याचे बिंदू त्याच्या कपाळावर जमा झाले. आपल्या मिशीवर जमलेले रक्त फुंकरीने उडवत तो म्हणाला,
‘‘ ज्या घरावर मी हल्ला चढवला ..त्यात सात माणसे होती.. सहांची तर मी कत्तल केली. याच कृपाणाने ज्याने तू माझ्यावर वार.... ते सोड... ऐक सातवी एक सुंदर मुलगी होती.. तिला मी उचलले.’’
कुलवंत चुपचाप ऐकत राहिली. तिची शंका बरोबर ठरली होती तर ! इश्वरसिंहाने परत ओठावरचे रक्त उडवले.
‘‘ कुलवंत काय सांगू किती सुंदर होती ती... मी तिलाही ठार मारले असते पण म्हटले इश्र्वर, कुलवंतची तर रोज मजा घेतोस, हाही खवा चाखून बघ !’’
‘‘ हंऽऽऽऽ’’
‘‘मी रस्त्यात... काय बरे सांगत होतो मी ... कॅनॉलच्या कडेला, जी झाडी माजली आहे, तेथे तिला मी जमिनीवर टाकले. विचार केला तेथेच तिची मजा घ्यावी...’’ हे सांगताना इश्र्वर सिंहाचा घसा दाटून आल... ओठ कोरडे पडले. त्याच्या घशातून शब्द फुटेना..
कुलवंतने आवंढा गिळला, ‘‘ मग ?’’
मोठ्या कष्टाने त्याच्या तोंडातून शब्द फुटले, ‘‘ मी हुकमाचा पत्ता टाकला... पण ..पण...!’’
कुलवंतने त्याला खडसावून विचारले, ‘‘ पुढे काय झाले ते सांग !’’
इश्र्वर सिंहाने आपले डोळे उघडले व कुलवंतच्या शरिराकडे एक नजर टाकली... ती रागाने थरथर कापत होती..
‘‘ मी तिचा उपभोग घेतला...कुलवंत..! तिचे शरीर थंडगार पडले होते.. कुलवंत ती मेली होती.. एकदम ठंडा गोष्त !... मला हात दे कुलवंत !
कुलवंत कौरने आपला हात इश्र्वरसिंहच्या हातावर ठेवला.. जो बर्फासारखा थंडगार पडला होता...
अनुवाद : जयंत कुलकर्णी.
अशा प्रकारे सादत हसन मन्टोच्या तीन कथांचे भाषांतर पूर्ण झाले आहे. आपल्याला हे तीन अनुवाद आवडले असतील अशी आशा आहे....परत भेट पुढच्या आदरांजलीसाठी...
प्रतिक्रिया
29 Aug 2016 - 8:29 pm | शिवोऽहम्
मूळ भाषेतला ठसका आणि विखार काही औरच, पण हेही छान जमले आहे.
29 Aug 2016 - 8:43 pm | जयंत कुलकर्णी
हं, बरेच सौम्य मुद्दामच केले आहे...
29 Aug 2016 - 8:51 pm | संदीप डांगे
तरीही अंगावर येतंय...
हॅट्सऑफ सर.. कमाल त्या मन्टोची आणि तुमचीही...
29 Aug 2016 - 9:29 pm | अमितदादा
अनुवाद आवडले.
29 Aug 2016 - 9:31 pm | बोका-ए-आझम
अप्रतिम भाषांतर!
29 Aug 2016 - 9:33 pm | महासंग्राम
धन्यवाद,काका ही इच्छा पूर्ण केल्याबद्दल.... तुफान झालाय हा भाग
29 Aug 2016 - 9:36 pm | जव्हेरगंज
अनुवाद उत्तम जमलाय!
पण यातलं मूळ कथाबीच मला तितकं जहाल वाटलं नाही.
उगाचच एखादी कल्पोकल्पित रचलेली स्टोरी वाटतेय!
ठंडा गोश्त ने निराश केले. असो.
30 Aug 2016 - 2:52 am | गामा पैलवान
जयंत कुलकर्णी,
अनुवाद फक्कड जमला आहे. फक्त एक शंका आली.
इथे कुलवंतने खडसावून विचारलं असं हवं होतं ना?
आ.न.,
-गा.पै.
30 Aug 2016 - 6:15 am | पिलीयन रायडर
ही कथा थोडी रेंगाळते असं वाटलं.. त्यामुळे बाकी कथांएवढी अंगावर आली नाही. आणि पहिल्या क्षणापासुन ज्या रहस्याभोवती कथा फिरते ते ही तेवढ्या प्रभावीपणे उलगडत नाही.
माफ करा काका, अनुवाद चांगलाच असला तरी बाकी कथा जास्त चांगल्या अनुवादित वाटल्या, म्हणजे खरं तर अनुवादित वाटल्याच नाहीत. अगदी तुम्हीच लिहीताय असं वाटलं. पण ही मात्र क्षणोक्षणी अनुवादित आहे हे जाणवत होतं. मला व्यक्तिशः "लाडके" सारखे शब्द वाचताना अडखळायला होतं. अजुन एक असेच वाक्य म्हणजे "केळे सोलावे तसे म्यान काढले". रागात म्यान काढताना असणारा आवेश ह्या उपमेतुन अजिबातच व्यक्त होत नाहीये. मुळ कथेतच तसे असले तरीही खटकलेच असते.
पण तुमचे कोणतेही लेखन नेहमीच मिपावरच्या अप्रतिम लिखाणांपैकी एक असतेच. तेव्हा असेच सुंदर अनुवाद करत रहा!
30 Aug 2016 - 7:41 am | प्राची अश्विनी
कथा आवडली होतीच, अनुवादही छान झालाय.
30 Aug 2016 - 8:34 am | नाखु
पण तरीही इथे काढलेल्या ७०-८० धांवांचे मोल अजिबात कमी होत नाही.
दोन आकडी धावसंख्याही काढू न शकलेला बनचुका वाचक नाखु
30 Aug 2016 - 8:40 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
30 Aug 2016 - 8:51 am | क्षमस्व
सर हाही अनुवाद छान जमलाय,
पण खोल दो सगळ्यात बेस्ट जमली होती।
30 Aug 2016 - 9:06 am | ब़जरबट्टू
वारिजनल थंडा गोश्त वाचली आहे. अनुवाद थोडा फसलाय..
पण ह्या आदरांजलीबद्दल धन्यवाद. :)
30 Aug 2016 - 1:00 pm | चंपाबाई
Nice
9 Sep 2016 - 5:51 pm | मी-सौरभ
काका,
तुम्ही आम्हा पामरांना ह्या लेखकांची ओळख करुन देताय त्याबद्दल शि.सा.न.
असाच लोभ असू द्या.
9 Sep 2016 - 7:27 pm | पैसा
!!!
15 Dec 2018 - 5:33 pm | कुमार१
आज ‘मंटो’ चित्रपट पहिला. म्हणून मुद्दाम ही कथा शोधून वाचली.
चांगला अनुवाद. कथा व चित्रपटातला प्रसंग दोन्ही ठीक वाटले.
कदाचित असेही असू शकते की ५० वर्षांपूर्वीची कथा आज तितकी भावत नाही.