काल मुलाला घेऊन शाळेत गेलो होतो. आज सुट्टी होती परंतु त्याची शाळेत समूहगीताची स्पर्धा होती . त्यांच्या शाळेची 10-12 मुले आलेली होती. अन स्पर्धा रामकृष्ण मठात होती. त्यांचा सर्वांचा व्यवस्थित गणवेश पाहून आणि तयारी पाहून मला माझ्या समूहगीताच्या स्पर्धेची आठवण आली.
1985-86 सालची गोष्ट असेल. त्यावेळी मी बहुधा 6 वीत होतो. आणि सांस्कृतिक स्पर्धेत तेव्हा मी नेहमी भाग घेत असे. कोणताही कार्यक्रम असो माझे गाणे अथवा भाषण ठरलेले असायचे. अश्याच एका तालुका लेव्हल स्पर्धेसाठी आमचा एक गट बनवला होता. माझ्यासारखेच वयक्तिक गाणी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरांनी गट बनविला होता. जोर्वेकर सर होते . नेहेमीच गाणी म्हणणारी पोर म्हणून आमचा सराव घ्यायची त्यांनी काही तसदी घेतली नाही. पहिल्या दिवशी तेव्हढे गाऊन घेतले. बरीच सुधारणा आवश्यक होती परंतु सरांनी एव्हढे काही मनावर घेतले नाही. स्पर्धेला बहुधा 15-20 दिवसांचा अवकाश होता.
एव्हढ्या दिवसात आम्ही आमची काहीतरी स्पर्धा आहे विसरूनच गेलो होतो. आणि बहुतेक सरही विसरले असणार. कारण त्यांनीही काही स्पर्धेविषयी ब्र काढला नव्हता.
आणि अचानक सायकलवर गावात उंडारतांना माझा शाळेतला मित्र ( हाही त्या गटात होता , अन माझ्यापुढे 2 वर्षे असेल ) भेटला. त्याने स्पर्धेविषयी सांगितले , उद्या स्पर्धा आहे , लक्षात आहे ना ? अरे बापरे , मी तर विसरलोच होतो. बरोबर उद्या तो रविवार होता . त्याला वेळ विचारून मी तडक घरी पळालो.
आता स्पर्धेचे ठिकाण माहित होते , गावात कन्या शाळेत स्पर्धा होती , 11 वाजता. सकाळी आवरून सायकलवर टांग मारली. शाळेत पोहोचलो. अजून आमचे सहकारी आलेले नव्हते. हळूहळू एकेक जण विविध अवतारात यायला लागला.मी तर गणवेशात नव्हतोच , परंतु तिघे चौघेही गणवेशात नव्हते. 3 जण गणवेशात होते. आमच्या पैकी दोन जण बिना चपलांचेच आले होते . मी स्लीपर वर होतो , बिचारे गणवेश वाले मस्त बूट , मोजे घालून एकदम टापटीप आलेले होते. आम्ही सरावाच्या वेळी 12 जण होतो आणि आता तर 8 जणच आलेले होते. सरांचाही पत्ता नव्हता. आणि विशेष म्हणजे आम्ही हि स्पर्धा जेवढी गांभीर्याने घेतलेली नव्हती ( हे आमच्या अवतारावरून दिसत होते.) तेव्हढी मात्र बाकीच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी पुरेपूर घेतलेली होती. सगळे एकदम चकाचक गणवेशात आणि बूट मोज्यात आलेले होते. आता तालुका लेव्हल म्हणजे बऱ्याच शाळांचे विद्यार्थी होते. त्यात आम्ही म्हणजे अगदीच गबाळ छाप होतो.
स्पर्धा चालू झाली. अन आम्ही मात्र भेदर्लो. कारण सगळ्यांची तयारी एकदम जोरात आणि समूहगीतेही अगदी जोशात अन तालात म्हणत होती. जसजसा आमचा नंबर जवळ यायला लागला , आम्हाला घाम फुटायला लागला.
तेवढ्यात आमचे जमदग्नी हि अवतरले. (सर). त्यांनी जेव्हा आमचा अवतार पहिला, त्यांना आता हि धरणी दुभंगवी आणि आपण लुप्त व्हावे असेच वाटले असावे कारण त्यांच्या डोळ्यात अंगार फुललेला आमच्यासाठी आम्ही पहिला अन त्याच वेळी चेहऱ्यावर भयानक शरमेची भावनाही पहिली.
जेव्हा आमचा नंबर पुकारला गेला आणि आम्ही स्टेज कडे निघालो , तेव्हा मात्र मला आमचे सर हळूहळू दरवाज्याकडे सरकतांना दिसले. आम्ही स्टेज वर चढलो , कोणी कसे उभे राहावे ,हेही आम्हाला माहित नव्हते. बरं, 3 जण वरिष्ठ विद्यार्थी होते (हेच गणवेशात होते) , त्यांनी कसेबसे आम्हाला उभे केले. आता गाण्याची वेळ होती.
आणि तो विनोदी प्रसंग चालू झाला , त्याचवेळी आमचे सर बाहेर घाईघाईने पडतांना दिसले. मी सर्वात लहान असल्याने पुढेच उभा होतो त्यामुळे पुढचे स्पष्ट दिसत होते.
समूहगीताचे काय वर्णन करावे ? कोण काय गात होते , कोणालाच कळत नव्हते. बहुतेक सर्वजण सवयीप्रमाणे वयक्तिक गात होते. रेकल्यागत कोणीही कुठेही सूर लावत होते .कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. बहुधा समोरच्या प्रेक्षकांना ( सगळ्या शाळांमधील स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक विद्यार्थीच प्रेक्षक होते .), हा मधला ब्रेक असावा असे वाटले अन सगळे लघुशंका किंवा पाणी प्यायला निघाले. त्यामुळे आमची शोभा मर्यादित राहिली. आणि विशेष म्हणजे जी पोर आलेली होती ती नेमकी वरच्या पट्टीत गाणारी होती आणि त्यांना सांभाळून घेणारी नेमकी आलेली नव्हती त्यामुळे झाले काय आमचे गाणे अखंड वरच्या पट्टीतच चालले. मी पुढे असल्याने बऱ्याच जणांनी आपले हात कानावर ठेवल्याचे मला पुसटसे आठवते.
गाणे संपल्यावरही एकजण त्याच्या धुंदीत होता , बहुतेक त्याची समाधी लागली असावी कारण तो अजूनही रेकत होता. आमच्या वरिष्ठांनी त्याला ओढल्याचेही मला आठवते. परंतु मी पुढे असल्याने हे मला दिसले नाही , माझ्या एका सहकार्याने मला पायऱ्या उतरतांना सांगितले. आता आम्ही लहान असल्याने मला एवढे काही वाटत नव्हते परंतु आमच्या वरिष्ठांनी आम्हाला ज्या पद्धतीने तिथून हाकलून दिले त्यावरून काहीतरी खरोखरीच भयंकर घडले आहे असे वाटले, कारण आम्हाला तिथे बसून पुढचा कार्यक्रम बघायचा होता.
मी सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो. त्यावेळी बरेच स्पर्धक आमच्याकडे बघून हसत असल्याचेही मला अंधुकसे स्मरते.
दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही काय घाण केली हे आम्हाला प्रार्थनेच्या वेळी समजले. जोर्वेकर सर फारच संतापलेले दिसत होते. अक्षरशः माईक मधून अंगारे फेकत होते. सगळ्या शाळेची मान आम्ही खाली घातली म्हणून ओरडत होते. आम्ही मात्र निवांत होतो.
प्रतिक्रिया
26 Aug 2016 - 2:33 pm | कवट्या महांकाळ
हा हा हा ..
26 Aug 2016 - 2:36 pm | शि बि आय
हा हा हा.. मस्त
26 Aug 2016 - 2:51 pm | सिरुसेरि
मस्त .. बच्चे मन के सच्चे .
26 Aug 2016 - 3:22 pm | मुक्त विहारि
अशा चुका करणारा मी एकटाच नाही....
26 Aug 2016 - 4:07 pm | एस
मीपण! मीपण! ;-)
26 Aug 2016 - 6:42 pm | गामा पैलवान
भम्पक,
>> परंतु सरांनी एव्हढे काही मनावर घेतले नाही. स्पर्धेला बहुधा 15-20 दिवसांचा अवकाश होता.
हा काय प्रकार आहे? मला तर यांत जोरवेकर गुरुजींचा दोष दिसतो आहे.
आ.न.,
-गा.पै.
26 Aug 2016 - 7:22 pm | भम्पक
अर्रर्रर्रर्रर्र गामा बराबर कि पण मांजराच्या गळ्यात कोण घंटी घालणार भो....?
26 Aug 2016 - 9:17 pm | सतिश गावडे
हही हही हही
27 Aug 2016 - 2:45 am | जयन्त बा शिम्पि
माझेही असेच थोडेफार झाले होते, फक्त समुहगान ऐवजी भाषण होते. इयत्ता सातवीत असतांना,सुचना आली की' लोकमान्य टिळक"यांच्याबद्दल तीन मिनिटांचे भाषण करण्यासाठी नावे द्या. नावे तर दिली,पण मी मित्रांमध्ये चर्चा करु लागलो की तीन मिनिटात कसे काय बोलून भाषण पुर्ण करता येईल?जास्त वेळ द्यायला हवा होता.घरी सगळं काही म्हणजे तेच आपलं शेंगाची टरफलं वगैरे पाठ करुन झालं. प्रत्यक्ष भाषण सुरु केलं,पण,एका मिनिटात, भाषण संपलं देखील !पुढे काही बोलताच येईना,नाईलाजाने खाली बसावे लागले.मग त्यावेळी जाणीव झाली की तीन मिनिटं म्हणजे खुप खुप तयारी करावयास हवी होती.
29 Aug 2016 - 12:46 am | शुंभ
>>> दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही काय घाण केली हे आम्हाला प्रार्थनेच्या वेळी समजले. >>>>
हे वाचून आमचे एक कोकणातले काका समूहगायनाला स. मू . "हगायन " म्हणायचे त्याची आठवण झाली. :) :)