92 सालचे बार्सीलोना ऑलिम्पिक सुरु असतानाची गोष्ट. त्यावेळी बार्सीलोना आणि ऑलिम्पिक ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ कळत नव्हते. कोणीतरी,कुठेतरी,काहीतरी खेळतायेत एव्हढंच कळायचं. दूरदर्शनवर रात्री दिवसभरातल्या सामन्यांचे हायलाइट्स दाखवायचे. त्यात बरोब्बर साडेदहा वाजता संसद अधिवेशनाचे वृत्तांकन करणाऱ्या दहा मिनिटाच्या 'पार्लियामेंट न्युज ' सुरु व्हायच्या. 'आज मी पार्लमेंट नंतर सुद्धा ऑलिम्पिक बघणार' असं म्हणणारा मी बातम्या संपेपर्यंत झोपलेला असायचो.असो. तर त्या ऑलिम्पिकमध्ये मला आवडलेला खेळ म्हणजे उड्या मारण्याचा ! एक माणूस दुरून तिरप्या दिशेने धावत यायचा,आणि तिथे लावलेला आडव्या बारवरून उडी घेऊन पलीकडल्या गादीवर पडायचा!! मी हाच खेळ खेळायचे ठरवले. फक्त मी बार न लावता डायरेक्ट पलंगावर उडी मारायचो. पुढे पलंगाला बाक येणं सुरु झाल्यावर माझं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न पाठीत धपाटा खाऊन भंगलं. दुसरा खेळ म्हणजे, धावत येऊन मातीत उडी मारायची. त्यावेळी घरी बांधकाम सुरु होतं. भिंतीला लागून असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर उड्या मारून ती पूर्ण रस्त्यावर पसरावायचं काम मी इमाने इतबारे केलं. यावेळी त्यातल्या त्यात प्रगती म्हणजे वडिलांनी भर रस्त्यात मला फटक्यांचं पदक बहाल केलं ! मधल्या काळात 1996 आणि 2000 साली भारताने अनुक्रमे टेनिस आणि वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवलं. घरात टेनिस रॅकेट असण्याचा काही प्रश्नच नव्हता. मग जुन्या बॅडमिंटन रॅकेटने रबरी बॉल वापरून मी मोठ्या भावासोबत टेनिस खेळायचो. नेट म्हणून वापरायला आमच्या सायकली होत्याच. पण आमच्या खेळण्यात रॅली हा प्रकार कधी घडतच नव्हता. कारण सर्विस केल्यावर बॉल सायकलवर आदळून कुठेतरी भरकटायचा किंवा भावाच्या जोरदार फटक्याने तो आंगणाबाहेर तरी जायचा. वेटलिफ्टिंगचा सराव करण्यासाठी घरात एवढी वजनदार वस्तू नव्हती. पाण्याने भरलेली बादली डोक्यापर्यंत उचलायचा प्रयत्न करताना मी स्वतःला अभिषेक करून घ्यायचो. आता हे असं सगळं असताना आम्ही ऑलिम्पिकमध्ये जाण्याचा प्रयत्न कसा करावा ?
तरीसुद्धा मी बरेच खेळ खेळलो पण त्यातले बरेच ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जात नव्हते. म्हणजे बघा, चौथीत असताना आंतरशालेय लंगडी स्पर्धेत मी राखीव खेळाडू होतो. (शाळेच्या संघात खेळणारे चार-पाच जण सोडले तर उरलेली पूर्ण शाळाच राखीव असायची हा भाग वेगळा!) ह्याच स्पर्धेत खो-खो च्या एका सामन्यात मी पूर्ण दोन मिनिटे मैदानावर होतो. पण त्याच झालं असं की, प्रतिस्पर्धी खेळाडू धावत असताना तो ज्या बाजूला जायचा तिकडे मी वळून बसायचो. दोन मिनिटानंतर आमचा पूर्ण संघच बाद ठरवण्यात आला ! त्यावेळीतर अख्ख्या शाळेसमोर माझा जाहीर सत्कार झाला होता. धावण्याच्या स्पर्धेत मी वर्गातून एकोणतिसावा आलो असलो तरी माझ्या बेंचवरील तीन मुलांमध्ये मी पहिला होतो! त्यानंतर आणखी एका खेळात मी प्राविण्य मिळवलं. फूटबॉल ! पण माझं मैदान घरातल्या आंगणापर्यंत मर्यादित होतं. शाळेतल्या मोठया मैदानावर खेळण्याची इच्छा होती. पण पाचवी ते दहावी या सहा वर्षात पंक्चर नसलेला, पूर्ण हवा भरलेला फुटबॉल शाळेच्या साहित्यात मला एकदाही दिसला नाही. (शाळेची फुटबॉल टीमसुध्दा होती म्हणे. एक-दोन वेळा मैदानात छोटा रबरी बॉल घेऊन खेळताना मी काही पोरांना पाहिलं होतं, तीच असावी बहुतेक ! पण ते फुटबॉल कमी आणि रग्बी जास्त खेळतायेत असं वाटायचं!) आमच्या शाळेच्या क्रीडासाहित्यात कुठल्याही एका खेळाचे साहित्य पूर्ण सापडेल तर शप्पथ! बॅडमिंटनच्या रॅकेट्स असल्या तर शटलची कोंबडीच्या पिसासारखी पूर्ण पिसे निघालेली तरी असतील किंवा शटल चांगले असले तर रॅकेटच्या जाळीने आ वासलेला असेल ! टेबल टेनिसचा टेबल तर शाळेच्या सगळ्या कार्यक्रमात टेबलक्लॉथ आणि फुलदाणी अंगावर घेऊन मिरवायचा. क्रिकेटच्या सामानात स्टंप,बॅट,ग्लोव्हस,पॅड वगैरे असलं तरी बॉल आम्ही वर्गणी गोळा करून आणावा अशी शाळेची इच्छा असायची. हॉकी वगैरे श्रीमंत खेळ तर शाळेच्या आवाक्याबाहेरचे होते. पण आवाक्यातले असते तरी सुस्थितीतल्या अकरा हॉकी स्टिक्स शोधण्यापेक्षा मंगळावर पाणी शोधणे सोपे ठरले असते. आमचे स्पोर्ट्सचे सर सुद्धा एक वेगळीच असामी होती. (म्हणजे पीटीचे सर तेच स्पोर्ट्सचे सर आणि स्पोर्ट्सचे सर तेच पीटीचे सर असं सरळ साधा हिशोब होता!) त्यांनी आम्हाला शिकवलेला एकमेव मैदानी खेळ म्हणजे रस्सीखेच ! तेसुद्धा योग्यवेळी दोरी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही हाताने खेळायचो. वर्गातल्या मुलींना तर त्या सरांनी 'कानगोष्टी' हा मैदानी खेळ म्हणून शिकवला होता! हेच सर आंतरशालेय स्पर्धांसाठी मुलांना निवडायचे. खेळ कुठलाही असो, त्यांचे क्रायटेरिया ठरलेले होते. मैदानी खेळ असेल तर शाळेतले उंच मुलं निवडायचे. आणि बुद्धीबळ वगैरे बैठ्या खेळांसाठी हुशार मुलं निवडायचे. ह्यातल्या एकाही क्रायटेरियात मी बसत नव्हतोच. मला नेहमी प्रश्न पडायचा, व्हॉलीबॉल वगैरे ठीक आहे पण कुस्तीसाठी उंच काडी पहलवान मुलाचा काय उपयोग ?? आणि 'घोकणे' हा बुद्धीचा एकमेव उपयोग माहिती असलेल्या मुलाला बुद्धीबळ कसा खेळता येईल ?
अखेरीस माझ्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या प्रयत्नांचा शेवटचा पर्याय म्हणून मी एक धाडसी निर्णय घेतला. आमच्या गावात एक क्रीडा विद्यापीठ आहे. देशातल्या कानाकोपरयातून खेळाडू तिथं प्रशिक्षणासाठी येतात. मी तिथं स्विमिंग शिकण्यासाठी प्रवेश केला. तीन-चार दिवस पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यावर आमच्या ट्रेनरने साधारण पंधरा फूट उंचीवरून पाण्यात उडी मारायला सांगितली. त्या उंचीवरून थोड्यावेळ पाण्याकडे बघितल्यावर मला घेरी यायचीच बाकी होती. मनाशी काहीतरी ठरवून मी थेट घरी आलो.
"बस्स झालं आता खेळणं ! काही अभ्यास वगैरे आहे की नाही ! "
आणि अश्या तर्हेने भारत काही ऑलिम्पिक पदकांना मुकला !!
-- चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/
प्रतिक्रिया
19 Aug 2016 - 5:56 pm | संदीप डांगे
मार्मिक!!
19 Aug 2016 - 5:57 pm | यशोधरा
=)) भारी!
19 Aug 2016 - 5:59 pm | अभ्या..
आणि अशा तर्हेने मी एक क्लासिक बॅनर करायला मुकलो.
19 Aug 2016 - 6:39 pm | संजय पाटिल
अरेरे...
बाकि अभ्यादादा, बॅनर एक नंबरच आणि ते बॅनर मधलं फुलराणी शेजारचं फुल पण मस्तच दिसतय!
19 Aug 2016 - 6:14 pm | सानझरी
मस्त लेख :D
19 Aug 2016 - 6:56 pm | टवाळ कार्टा
=))
19 Aug 2016 - 7:58 pm | एस
हेहेहे!
19 Aug 2016 - 9:20 pm | क्षमस्व
खिक्क।।।
19 Aug 2016 - 9:20 pm | क्षमस्व
खिक्क।।।
19 Aug 2016 - 11:55 pm | अमितदादा
हलकाफुलका लेख...आवडला..
20 Aug 2016 - 5:51 am | अभिजीत अवलिया
आवडला ...
आम्ही तर सर्जी बुबका चा खेळ pole vault खेळायचा प्रयत्न केला होता. फक्त एक बांबू घेऊन किती ऊंच उडी मारता येतेय ते बघायचो. 2 फुटाच्या वर कधी गेलो नाही.
20 Aug 2016 - 9:27 am | चिनार
धन्यवाद !!
20 Aug 2016 - 12:19 pm | महासंग्राम
HVPM काय ????
20 Aug 2016 - 12:32 pm | चिनार
हो...तेच ते..
20 Aug 2016 - 1:03 pm | इरसाल
चिनार्या निदान दोन तरी मेडलं मिळाली असती की रे.......आताच बया का गठाळलं ??????
22 Aug 2016 - 10:22 am | नाखु
+१ फक्त दुरुस्तीसह
चिनार्या निदान दोन तरी मेडलं मिळाली असती की रे.......आताच बया का गळाठलं ??????
"चिनार भौ आगे बढो हम तुम्हारे साथ है" संघटना आणि मिपा बसल्या जागी ऑलेंपिंक संघाची संयुक्त मागणी निवेदन
22 Aug 2016 - 11:23 am | चिनार
:-) :-)
22 Aug 2016 - 10:11 am | चिनार
धन्यवाद !!
22 Aug 2016 - 1:07 pm | जिन्गल बेल
भारीच!! :)
22 Aug 2016 - 6:36 pm | राजाभाउ
मस्त खुसखुशीत लेख.
ते मैदानात बसुन कानगोष्टी करत असतील, म्हणुन त्याला मैदानी खेळ म्हणत असतील.
22 Aug 2016 - 7:01 pm | जव्हेरगंज
लय भारी!
=))
23 Aug 2016 - 10:45 am | चिनार
धन्यवाद !!
23 Aug 2016 - 3:20 pm | पाटीलभाऊ
हाहाहा...अत्यंत मार्मिक !
23 Aug 2016 - 3:42 pm | चाणक्य
मजा आली वाचताना.
23 Aug 2016 - 3:47 pm | इल्यूमिनाटस
मस्त
23 Aug 2016 - 3:59 pm | किसन शिंदे
हाहाहा !!
जाम भारी रं दादूस
23 Aug 2016 - 7:00 pm | पैसा
एकदम खुसखुशीत झालाय!
24 Aug 2016 - 12:26 am | रुपी
+१
24 Aug 2016 - 1:35 pm | चिनार
धन्यवाद !!