बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार
-------------------------------------------------------------------------------
"अब्बे ही बादली माझी आहे"
"अब्बे ही बादली माझी आहे"
"अब्बे ही मी विकत घेतली होती"
"अब्बे ही राजेशनं मला विकली होती"
"अब्बे कोण राजेश? राजेश बाजेश कोण मी वळखत नाय"
"अब्बे मी तुला बी वळखत नाय, चल फुट हितनं"
"अरे पण ती माझी बादली आहे"
"साल्या चोरी करताना लाज नाही वाटली"
"ए मला चोर म्हणू नको हा"
"मग काय तुझी पुजा करु?"
"बादली घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाय"
"आवो जावो घर तुम्हारा है, बसायचंय तेवढं बस, पण बादलीला हात जर लावला, तर मग बघ"
मग तो बसला. बराच वेळ बसला. खाटंवर हात टेकून पाय हलवत बसला.
मग तो उठला. म्हणाला,
"अब्बे पण ही माझी बादली आहे ना"
बोंबला.
-----------------------
दुसऱ्या सेमीस्टरला गोरखचे जवळपास सगळेच विषय उडाले. त्याच्यावर प्रचंड ताण आला. बोलला नाही दिवसभर. यातून केवळ एकच अर्थ निघत होता. पहिल्याच वर्षी तो नापास झाला होता.
मी जरी सहिसलामत निसटलो असलो तरी इंजीनीयरींगने मला गंडवलं होतं. आतापावतो स्कॉलर असणारा मी कसाबसा काठावरच पास होऊ शकलो. रात्र रात्र अभ्यास करुन डिस्टींगशनची स्वप्नं पाहिली. पण शेवटी सेंकड क्लासवर समाधान मानावे लागले.
दिलीपच्या मते मी सगळ्याच विषयात पास झालो म्हणजे खरंच मी स्कॉलर आहे. चॅकोचेही तेच मत पडले. ते मला अधिकच आदर देऊ लागले. मनातल्या मनात मी चिडून गेलो.
कशातच नाही किमान अभ्यासात तरी नाव गाजवावे तर इथे पहिल्याच वर्षी धक्का बसला.
-----------------------
दिवस कोलमडून पडण्याचे होते.
मी सकाळी खूप ऊशिरा उठायला सुरुवात केली. त्यावेळेस बाथरुमला रांगा लागलेल्या नसतात. त्यातल्या त्यात ही एक आनंदाची बाब आहे.
कुण्या एके काळी मी साडे सहाला उठायचो. त्यावेळची युद्धपरिस्थिती मी अगदी जवळून अनुभवलीय. आजकाल असे अनुभव माझ्या वाट्याला फारसे येत नाहीत.
आठ साडेआठ, नऊ, कधीकधी दहालापण मी आंघोळ करतो. तिथे कोणी काळं कुत्रंपण नसतं.
होस्टेलवर सगळ्यात शेवटी आंघोळ करणारा मी असं जर कोणी समजत असेल तर ते चूक आहे. कारण दुपारी दोनला आंघोळ करणारे काही महाभाग इथे वसतात. ते दुपारी उठतात. आंघोळ करतात. मेसला जाऊन जेवण करतात. आणि पुन्हा येऊन झोपतात.
गोरख मात्र अजिबातच कॉलेजला जात नाही. साहजिकच, नापास झालेल्या विद्यार्थ्याला कसलं आलंय कॉलेज. दिवसभर तो नुसता रुमवर पडून असतो. एक 'अभ्यास' सोडला तर त्याचे बरेच उद्योगधंदे सध्या जोरात चालू आहेत. एकंदरीत त्याची चंगळ आहे.
मी कॉलेजला जायचं कधी बंद केलं हे मलाही नीटसं आठवत नाही. पण प्रॅक्टीकल नावाचा प्रकार मला टाळता येण्यासारखा नव्हता.
तसं माझंही एक स्वप्न होतं. आपणही नापास व्हावं. दिवसभर लोळत पडावं. मन मानेल तिकडं भटकावं. पण ते माझ्या नशिबात नव्हतं.
गोरख आजकाल पुस्तकं आणून वाचतो. विशेषत: मराठी कादंबऱ्या. त्यासाठी त्यानं गावात खातंही उघडलंय. मला त्याचा हेवा वाटतो.
तर त्या दिवशी मी सकाळी उठलो. आंघोळ केली. आणि शाबुद्दीनच्या गाड्यावर नाष्टा करायला गेलो. त्याच्या गाड्यावर चविष्ट पोहे तीन रुपयाला मिळतात ही कमाल गोष्ट होती. मी डबल प्लेट पोहे खाल्ल्यावर चार रुपयाचा समोसाही घेतला. दहा रुपयात जेवणंच झाल्यासारखं वाटलं.
शेवटी मी चहा मागवला. आणि खिशात बारा रुपयाची जुळवाजुळव करत असताना एक गुळगुळीत टकला, आणि जवळपास म्हणायलाच पाहीजे असा जाडा, आणि ज्याला माणूसंच म्हटले पाहीजे असा सांड तिथे आला.
"खाते पे लिख देना बे" बहुदा त्याचा नाष्टा नुकताच झाला असावा.
"पैतीस हुआ ना?" असं शाबुद्दीननंच त्याला उलटं विचारलं. आणि पेनाच्या नावाखाली वापरत असलेल्या 'कांडी'नं वहीवर गिरवलं. ती कांडीसुद्धा सुतळीनं बांधून ठेवलेली. लोकं आठाण्याची कांडीसुद्धा चोरतात.
पस्तीस रुपयाचं या अवाढव्य मुलानं नक्की काय काय खाल्लं असावं, याचा विचार करत मी बराच वेळ चहा पीत उभा होतो. हा आमच्या कॉलेजमध्ये कसा हाही प्रश्न मला सुटत नव्हता. तो स्टुडंट आहे हे कळल्यावर मला प्रचंड यातना झाल्या.
तो गुळगुळीत टकला मुलगा साधारण आठ दहा खोल्या सोडून कोपऱ्यातल्या खोलीत रहात होता. एवढ्या दिवस तो कुठे होता याची मला माहीती नाही. त्याच्या मनात आलं म्हणून तो सरळ कॉलेजवर आला होता.
गेली बरीच वर्षे तो कोपऱ्यातली खोली अडवून बसलाय. वीरप्पनलाही सांगता येत नाही, नक्की तो कॉलेजमध्ये कधीपासून आहे.
तो जब्बार नावाचा गब्बर माणूस होता. आल्या आल्याच त्याने एका बिहारी पोराशी पंगा घेतला. सगळं होस्टेल जमलं. नक्की काय प्रकार झाला समजलंच नाही. मात्र जब्बारचा आवाज साधारण पंधरा मिनिटे पुर्ण होस्टेलवर घुमत राहीला. असेल कायतरी जुनं म्हणून आम्ही झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी दिलीप त्याची सहज म्हणून चौकशी करायला गेला आणि त्यांचीही जोरजोरात भांडणे सुरु झाली. दिलीपनं टक्कर दिली खरी पण शेवटी तोही शरणागती पत्करुन परत आला.
मला म्हणाला, येडं आहे रे ते, छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडत बसतंय.
दिलीपनं त्याला फक्त काल काय झालतं एवढंच विचारलं. पण तू मला विचारणार कोण? म्हणून त्यांचही भांडण पेटलं.
नंतर तो गोरखकडं कसलंस कॅसेट मागायला आला. गोरखनं दिलं ही. पण जेव्हा गोरख परत मागायला त्याच्या रुमवर गेला तेव्हा त्यांचही भांडण पेटलं.
एकूणच आजकाल रोज रात्री दहा वाजता कुठेनाकुठेतरी भांडणाचा प्रोग्राम हा ठरलेला असतो.
जब्बारला सगळेच घाबरतात. मी ही घाबरतो.नव्हे वॉचमनही घाबरतो. जब्बारने सगळ्यांवर दहशत बसवली आहे. पण त्याचा बांबू पोकळच आहे आम्हाला जरा ऊशिराच समजले.
त्याचं असं झालं की सुनीलच्या रुमवर आम्ही सगळे चिवडा खात असताना तो आला.
अर्थात खोली सुनीलची म्हणून त्याने सुनीलला नाव गाव विचारलं.
मग म्हणाला,
"तुझा बाप काय करतो?"
सुनील अचानक उठून त्याला धमकी देत म्हणाला,
"बाप नाही म्हणायचं, बाबा म्हणायचं"
मग जब्बार गोधळला, म्हणाला
"बाबाच म्हणालो मी, तुझा बाबा काय करतो असंच म्हणालो मी"
"तुझा नाय तुझे, तुझे बाबा काय करतात, असं नीट विचार"
मला इथे मराठी व्याकरणाचा तास सुरु असल्यासारखं वाटलं.
"तुझे बाबा काय करतात, असंच म्हणालो मी" जब्बारचा आवाज आता मांजरीएवढा झाला होता. कारण सुनीलचा हात कधीही त्याचं मुस्काट फोडू शकला असता.
"का?"
"काही नाही असंच विचारलं"
"ते शिक्षक आहेत"
"ठिक, चालेल" म्हणून जब्बार हार पत्करुन सुनीलच्या रुमबाहेर निघून गेला.
त्यानंतर आम्हालाच काय त्याने कुणालाच त्रास दिला नाही. त्याला कोणीच भाव देईनासे झाले. दिलीपने त्याला पोर्चमध्ये गाठून शिव्याही दिल्या. नंतर जब्बारने आमच्याशी मैत्री करण्याचाही प्रयत्न केला. पण कुत्र्याचं शेपूट सरळ थोडीच होणार. जर कधी समोर आलाच तर लाथ घालायची तयारी असावी असा मी मनोमन विचार केला.
अगोदर गोरखने त्याच्याशी मैत्री केली. तसंही गोरखला दिवसभर काम नसायचं. दिवसभर त्या जब्बारच्या रुममध्ये जावून तो गाणी ऐकायचा. त्याने जब्बारच्या बऱ्याच आतल्या गोष्टी माहीत करुन घेतल्या. कॉलेजच्या जुन्या दिवसांतल्या गोष्टीही त्याने काढून घेतल्या ज्या नंतर गोरखने मला सांगितल्या. एकंदरीत त्या दिवसांत कॉलेजमध्ये बरीच लफडी अस्तित्वात होती.
तर असा हा जब्बार एक दिवस माझ्या रुममध्ये आला. कॉटखाली त्याने वाकून बघितले, आणि म्हणाला,
"अब्बे ही बादली माझी आहे"
-------------------------------------------------------------------------------
क्रमशः
प्रतिक्रिया
8 Aug 2016 - 1:18 am | एस
नमुना आहे.
8 Aug 2016 - 1:25 am | ज्योति अळवणी
मस्त.... पुढच्या भागाची उत्सुकता लागली आहे
8 Aug 2016 - 1:26 am | कपिलमुनी
प्रत्येक इंजिनिरींग कँपसमधे असे पुराणपुरुष असतात.
१९९७ साली १२ वी होउन २०१० साली डिग्री झालेली रुममेट होता, ( याची जुनियर याला लेक्चरर म्हणून शिकवायला आली होती)
8 Aug 2016 - 2:21 am | सेलफोन
मस्त चाललीय लेखमाला. माझ्या इन्जिनिअरिन्गचि आठवण झाली.कोणतं कॉलेज हे तुमचं?
8 Aug 2016 - 5:01 am | निखिल निरगुडे
क्लास! आणखी काय लिहिणार :)
पु भा प्र....
8 Aug 2016 - 6:15 am | कंजूस
आता सांडाशी टक्कर होताहोता वाचली.
8 Aug 2016 - 6:38 am | अनिरुद्ध.वैद्य
एन्ट्री अशीच व्हायची त्येंची!! टपरीवाले एकदम आदराने चा वगैरे नेऊन द्याचे.
8 Aug 2016 - 7:34 am | संजय पाटिल
हंगाशि .... आता बादली पुन्हा लायनिवर आली....
8 Aug 2016 - 8:09 am | लालगरूड
+1 बादली लयचं प्रिय आहे
8 Aug 2016 - 8:34 am | नाखु
बदली जो एक जगह ठहरतीही नही...
दैनीक मिपाभारत समाचार.
आस्वादक नाखु
8 Aug 2016 - 9:13 am | अजया
आला का विषय परत बादलीवर!!
आमच्या काॅलेजातले पुराणपुरुष क्राॅनिक नावाने ओळखले जात!
8 Aug 2016 - 9:33 am | स्पा
लोल, भारी सुरुये
8 Aug 2016 - 9:50 am | अभ्या..
भारी, एकेक सॅम्पल येताहेत.
8 Aug 2016 - 10:04 am | पैसा
लै भारी! कथेतल्या नायकाच्या त्या वयात आणि परिस्थितीत बादली हा मोठाच इश्यू असणे साहजिक आहे. पण यानिमित्ताने मनाने अजून त्या वयातून बाहेर न आलेली आणि आंतरजालावर बादलीला कवटाळून काल्पनिक युद्ध सुरू आहे असे समजणारी काही महनीय आंतरजालीय व्यक्तिमत्वे आठवली. तुमचं लिखाण या लेख/कथामालिकेत तरी वैश्विक झालं आहे. जियो!
8 Aug 2016 - 1:20 pm | साहेब..
कहर निरीक्षण आहे.
8 Aug 2016 - 1:20 pm | साहेब..
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
9 Aug 2016 - 10:26 am | अनुप ढेरे
आणि लोकांच्या बादली युद्धात अंपायरगिरी करणार्या लोकांबद्दल काय मत आहे आपलं?
9 Aug 2016 - 1:28 pm | पैसा
जव्हेरगंज भाऊंची कथा वाचताय ना? कथा कशी वाटली ते जरूर लिहा! :)
9 Aug 2016 - 1:34 pm | अनुप ढेरे
उत्तर केव्हा देताय?
ते लिहिलं आहेच हो! पण लेख वैश्विक असल्याने वरील विचार देखील आला मनात!
9 Aug 2016 - 1:38 pm | पैसा
मी उत्तर का देऊ? चांगला धागा आहे त्याचा आस्वाद घ्या हा माझा फुकटचा सल्ला. ऐकलाच पाहिजे असे तुमच्यावर बंधन नाही. पण माझ्यावर नक्कीच आहे. तेव्हा रामाराम.
8 Aug 2016 - 11:36 am | कंजूस
"अजून त्या वयातून बाहेर न आलेली आणि आंतरजालावर बादलीला कवटाळून काल्पनिक युद्ध सुरू आहे असे समजणारी------"
आणि फुटक्या बादलीला परत परत पलास्टिकचे तुकडे गरम सळीने चिकटवून घेऊन लढायला हजर होतात
8 Aug 2016 - 11:50 am | पैसा
=))
8 Aug 2016 - 1:30 pm | नीलमोहर
बादली आहे की हिरॉईन आहे, जो तो हिरो माझीय माझीय करतोय :)
8 Aug 2016 - 2:33 pm | पेशवा भट
मस्त आवडली.
8 Aug 2016 - 4:56 pm | रातराणी
आहाहा डोळे निवले!
8 Aug 2016 - 6:42 pm | विप्लव
कॉलेजचे दिवस आठवले राव
मस्तच
8 Aug 2016 - 10:10 pm | चांदणे संदीप
ह्या जब्बारच्या! बादली माझी आहे!
Sandy
8 Aug 2016 - 10:22 pm | अभिजीत अवलिया
डोळ्यासमोर चित्र उभं राहतंय. मस्तच आहे ही बादली.
@कपिलमुनी,
१९९७ साली १२ वी होउन २०१० साली डिग्री झालेली रुममेट होता.
-- पण इंजिनीरिंग पूर्ण करायला 8 का 10 वर्ष लिमिट आहे ना?
9 Aug 2016 - 4:42 pm | एस.योगी
६ वर्ष असते
त्या पॅटर्न पुरताच लागू असतो नियम. (उदा. २०१२ पॅटर्न)
एकदा प्रवेश घेतला कि तिथून पुढे ६ वर्ष.
उदा. २०११ मध्ये प्रवेश घेतला असेल तर लास्ट चान्स एप्रिल-मे २०१७.
त्यानंतर राहिलेले वर्ष नवीन पॅटर्न प्रमाणे ऍडमिशन घ्यावे लागते.
अशाप्रमाणे १०-१५ वर्ष आरामात निघून जातात.
9 Aug 2016 - 12:02 pm | patilachaganya
आवडले पुढील भागाची प्रतीक्षा पुलेशु
9 Aug 2016 - 4:09 pm | सिरुसेरि
-- पण इंजिनीरिंग पूर्ण करायला 8 का 10 वर्ष लिमिट आहे ना?
+१ . नाहि तर NFTE बसते .
9 Aug 2016 - 9:08 pm | खटपट्या
वा मस्त,

बादली पलटी, पोरे पशार.
21 Aug 2016 - 11:21 am | वगिश
वालचंद ची बॉक्स रुम आठवली.