एका रविवारची ही गोष्ट. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचाही कंटाळा आला होता. ऊन तर मी म्हणत होते. कुठे बाहेर जाऊ नये असं बेकार ऊन. सुट्ट्यात पाहुण्यांचा गोतावळा. घर गजबजून गेलेलं. मलाच जरा सुटका हवी होती. मग निघालो आमच्या औरंगाबादच्या लेणीला.
ही वाट लेणी कडे जाते..
बोधीसत्व..
मराठवाड्यात जगप्रसिद्ध अशा लेण्या आहेत, आता त्या माहिती बाबत काही नवीन राहीलं नाही. स्थापत्य आणि शिल्पकलेच्या परमोत्कर्ष वेरुळ येथील कैलास लेणी व अन्य लेणीत दिसून येतो. प्राचीन शिल्प स्थापत्य आणि चित्रकलांचा उत्कर्ष अजिंठा लेणीत बघायला मिळतो. शैलगृह स्थापत्याचा दक्षिणेतील पहिला आणि उत्तम आविष्कार म्हणजे पितळखोरा येथील लेणी. (वल्ली बरोबर जायचं आहे, म्हणून मी तिथे जात नाही) या शिवाय, धाराशीव, खरोसा, आणि आमची औरंगाबादची बौद्ध लेणी. या सर्व लेण्यांनी मराठवाड्याच्याच नव्हे देशाच्या वैभवात भर घातली आहे. आमचा मराठवाडा संतांची भूमी. आमच्या मराठवाड्याला समृद्ध अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, परंपरेचा इतिहास आहे. मराठवाड्याचा शिल्पकलेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात ''जावे पा वेरुळा जेथे, विश्वकर्मियाने सृष्टी केली'' वेरुळची लेणी म्हणजे प्रत्यक्ष विश्वकर्म्याने घडवलेली अद्भूत सृष्टी.
मराठवाड्याच्या या शिल्प स्थापत्य परंपरांचा प्रारंभ इसवी सन पूर्वी पहिल्या शतकात झाला असे म्हणतात. प्रतिष्ठानच्या सातवाहन सत्तेचा उदय झाला आणि शिल्प स्थापत्य कलेला बहर आला. अजिंठ्याचा दगड म्हणजे कठीण खडक. ज्वालामुखी किंवा तत्सम गोष्टींमुळे त्याला एक टणकपणा आलेला तो खडक. बारीक छिद्र असलेल्या या खडकाला. कारागिरांनी घासून चांगला गुळगुळीत केला त्यावर चिखलांचा लेप दिला. अभियंते आणि अभ्यासक त्याला 'स्टको प्लास्टर' असे म्हणतात. सांगायची गोष्ट अशी की आमच्या औरंगाबादपासून डोंगरांची रांग सुरु होते, ती रांग थेट वेरुळ आणि पुढेही जाते. वेरुळच्या लेणी अगोदर औरंगाबादची लेणी कारागिरांनी कोरली असावी असे मला वाटते. कारण इथे हा प्रयोग फ़सला आणि कलाकार पुढे डोंगररांगांकडे गेले असावेत असे मला वाटते. (माझ्या म्हनण्याला काहीही आधार नाही) अशाच बौद्ध लेणीची ही गोष्ट.बोधीसत्व
धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत बुद्धबौद्ध धर्मीय लेण्यांचा कालखंड साधारणपणे पाचशे पन्नास ते सातशे पन्नास समजला जातो. गिरीशिल्प खोदण्याची कल्पना ही बौद्धांचीच असे म्हटल्या जाते. बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी तसेच भिक्षूंना वास्तव्य करण्यासाठी विहार आणि चैत्य रुपाने या लेण्या खोदण्याची प्रथा सुरु झाली. हिंदूंनी आणि जैनांनी त्याचं अनुकरण केलं. अर्थातच इ.स.पूर्व शतकात सुरु झालेली ही गिरीशिल्पांची निर्मिती सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रागतिक अवस्थेत होती. मुळातच हीनयात काळात बौद्धधर्मप्रसाराचे तंत्र मूर्तीपूजनाच्या पलीकडील होते. केवळ प्रतिकात्मक गोष्टींचा उपयोग करुनच धर्मप्रसाराची दिशा ठरवली जात असे. त्यामुळे लेण्यामधील शिल्पकधा तशी साधीसूधीच आहे.
औरंगाबादला पोहचलात की बीबीका मकबरा, पाणचक्की, ऐतिहासिक दरवाजे पाहून झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अगदी जवळ असलेल्या ही बौद्ध लेणी. लेणीच्या पायथ्याशी आपल्या माता-पित्याच्या स्मरणार्थ अनेकांनी गौतमबुद्धांच्या धातूतील मूर्त्या लावलेल्या दिसून येतात. शंभर एक पाय-या चढून गेलात की तिकिट घर लागते. दहा रुपये देऊन तुम्हाला लेणीकडे जाण्यासाठी प्रवेश मिळतो. या डोंगररांगावर ऐकून पाच लेण्या आहेत.
सुरुवातीची लेणी आकारमान व शिल्पकला यांच्या दृष्टीने हे लेणी मनात भरणारी नाही. भिक्कूंच्या निवासस्थानासाठी ही जागा वापरली जात असावी. या लेणीची गंमत अशी सांगितल्या जाते की भगवान बुद्धाला पार्श्वनाथ किंवा महावीर समजून काही जैनमुनींनी लेणीचा ताबा घेतला होता व तो पुढे सोडलाही होता. (संदर्भ नाही) लेण्यांची शैली पहिल्या शतकातील व मथुरा शैली अथवा गांधार शैलीमधे मोडत असावी. अजिंठा लेण्यातील बहुतेक प्रतिमा या धम्मचक्रप्रवर्तनमुद्रेमधे हात असलेले आहेत आणि इथेही तशाच प्रतिमा आहेत तेव्हा लेणींचा काळ सारखा असावा असे वाटायला लागते.
ध्यानमुद्रेतील बुद्ध
बहुधा बोधीसत्व आणि मद्दी (विश्वंतर जातक)
लेणी क्रमांक चार. चैत्यगृह आणि स्तूप. एक साधे शिल्प आहे . सामुदायिक पुजेअर्चेसाठी ही जागा वापरली जात असावी. समोरचा भाग नष्ट झालेला दिसतो. छत कमानदार असून अष्टकोणी खांबावर आधारलेला आहे. स्तूपावर कोणत्याही प्रकारचे कोरीव काम नाही. सूर्याची किरणे सरळ या स्तूपावर पडावीत अशा पद्धतीने त्याची रचना केलेली दिसते, मात्र याच उद्देश्यानं हा स्तूप केला असावा असे म्हणायला काहीही आधार नाही.
लेणी क्रमांक तीन हे एक विहार असून पहिल्या आणि दुसर्या लेण्यातील विहारापेक्षा याचे स्वरूप जरा वेगळे आहे. आतील प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेले दिसून येते. छताच्या वरच्या बाजूला पाने, फुले कोरलेली दिसतात त्या खाली उभ्या असलेल्या शालभंजिका कोरल्या आहेत. पत्येक खांबावर चक्रकार पट्टे कोरले असून त्यात सुंदर गुलाब पुष्पांचे कोरीव काम आहे. जवळ जवळ बारा खांब आहेत. वंदनागृहाच्या गाभार्यात भगवान बुद्धाची भव्य प्रतिमा खाली पाय सोडून धम्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहेत. एकाबाजूला सात पुरुष उपासिका आणि एका बाजूला सहा स्त्री उपासिका आराधनेसाठी बसलेल्या दिसतात. स्त्रीयांच्या अंगावर विविध अलंकार हातात पुष्पमाळा दिसतात. याच लेणीतील पट्टुयांवर युद्धाचे दृष्य कोरलेले दिसून येते. तिथेच भगवान बुद्ध कोचावर पहुडलेले दिसून येतात. हीच लेणी या लेण्यांचा आत्मा आहे.
स्तंभ
धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्ध
लेणीक्रमांक दोन. हा एक विहार असून यात भिक्कूंना राहण्यासाठी आजूबाजूला खोल्या नाहीत. हे चैत्य नेहमीप्रमाणे नाही. हिंदू मंदिराप्रमाणे त्याची अनुकरण केल्यासारखे वाटते. विहार भव्य आहे. अंतगृहही विशाल आहे. प्रवेशद्वार मोठे आकर्षक आहे. प्रवेशद्वारी दोन्ही बाजूला कमळपुष्प घेतलेले दोन उंच द्वारपाल आहेत. त्यापैकी एक विद्याधर आणि एकाच्या मस्तकावर पाच फणे असलेला नाग आहे. विहाराच्या गाभार्यातील मुख्य प्रतिमा भगवान बुद्धाची आहे. खांबाच्या वरच्या बाजूला गंधर्व असून जवळच चामरधारकही आहेत. भगवान बुद्धाच्या प्रतिमेकडे आदरपूर्वक पाहत असलेले काही उपासक आणि उपासिका दिसतात.
लेणीक्रमांक एक हाही एक मोठा विहार आहे. दरवाजा खिडक्या असलेले अंतगृह आहे. त्यावरील कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. पडवीत खांब आहेत. खांबावर नक्षीकाम केलेले दिसून येते. छताचे वजन पेलण्यासाठी उभ्या केलेल्यां खांबांवर सुंदर स्त्री शिल्पे आहेत. वस्त्र, अलंकार त्या काळातील वेशभूषांचे आणि अलंकाराचे उत्कृष्ट दर्शन घडवितात. कलाकुसर अत्यंत मनोहर आहे. प्रवेश द्वाराची चौकट नक्षीकामाने मढवून काढलेली आहेत. विहाराच्या पश्चिम बाजूला खिडकी दरवाजांच्यामधे कमलासानावर भगवान बुद्धाची प्रतिमा विराजमान असून त्यांच्या बाजूला चामरधारी सेवक आहेत. त्यांचे सिंहासन पाच फणे असलेल्या नागराजाने स्वतःच्या डोक्यावर धारण केले आहे. याच भिंतीच्या पडवीत डाव्या भागात भगवान बुद्धांच्या सात आकृती ओळीने कोरलेल्या आहेत. त्यांच्या बाजूलाच दोन बोधिसत्वाची सुंदर शिल्प आहेत. लेण्यांच्या एका भिंतीवर कोरण्यात आलेली एक सुंदर मत्स्याकृतीही आहे. नंद उपनंद नाग अनुयायींसह बुद्धमूर्ती
उपासकांसाठीच्या खोल्या
लेण्यांमधे खूप शिल्प नाहीत. पडवीत मात्र खूप शिल्प आहेत. उजेडाची कोणतीही सोय नसल्यामुळे फोटो काढणे कठीण जाते. बाकीच्या तीन लेण्या या लेण्यांच्या विरुद्ध बाजूला आहेत. काही दोन एकशे पाय-या चढून गेलात की एक मोठी दगडी कपार लागते. सुरुवातीलाच एक क्रमांकाच्या लेणी म्हणून जी आहे तिथे दोन शयनकक्ष आहेत. दुसरी लेणी म्हणून जे आहे ते चैत्यगृह आहे. आणि आत स्तूप आहे. तिस-या आणि चौथ्या लेणीत गौतमबुद्धांचे विविध शिल्प कोरलेले दिसून येतात. पाचव्या लेणीत खांब आणि काही गौतमबुद्धांची शिल्प आहेत. प्रामुख्याने खांबांवर नक्षीकाम अधिक दिसून येते तर जागोजागी गौतम बुद्धांची शिल्प दिसतात म्हणूनच या लेणीला दिलेलं बुद्ध लेणी हे नाव सार्थ ठरतं.
अवलोकितेश्वर पद्मपाणी
चैत्यगृह सायंकाळी मी चार वाजता लेणी बघण्यासाठी गेलो होतो. अंधार पडल्यावर लेणी उतरु लागलो. आणि इतिहासाच्या आठवणी ढवळून निघाल्या. देवगिरीचा यादव सम्राट ज्याने कलाकारांना राजाश्रय दिला. चालूक्य कला परंपरांची आठवण झाली. यादव शैलीने स्वत:चा एक ठसा उमटवला होता. मंदिरं असो, लेण्या असो, मराठवाड्याची कला दिमाखाने आजही मिरवत आहे, विद्यापीठाच्या जवळ असलेल्या या बौद्ध लेणीनेही वैभवात भरच घातली आहे. गौतम बुद्धांच्या विविध प्रतिमा आणि वेगवेगळी शिल्प इथे आहेत. पण, इथे लागतो उत्तम छायाचित्रे काढणारा आणि इतिहास माहिती असणारा माणूस. (वल्लीसारखाच) विद्यापीठाजवळील पहिल्या पाच लेण्यांची तोंडओळख आपण पाहिली. बाकीच्या चार लेण्यांची माहिती पुढील भागात.... पहिल्या गटाच्या पूर्वेला दुसर्या गटापर्यंत जाण्यास त्याच डोंगररांगामधून मार्ग आहे. क्रमांक सहापासून नऊपर्यंत जी लेणी आहे, ती दुसर्या गटात मोडते. पहिल्या लेण्यांपेक्षा हा भाग जरा उंचीवर आहे. दुसर्या गटातील नववे लेणे सर्वात मोठे आहे. लवकरच लिहितो....!
वज्रपाणी
बोधीसत्व ----> शलभंजिका
एकेक शिल्प आणि त्यांची ओळख वाट्सपवर करुन दिल्याबद्दल..... वल्लीचे उर्फ प्रचेतसचे मनःपूर्वक आभार. मी लेणी बघत होतो आणि वाट्सपवर हे कशाचं शिल्प, ते कशाचं शिल्प असं विचारत होतो, त्यांच्याच कटकटीमुळे हे लेखन करावं लागलं. थँक्स रे मित्रा.
प्रतिक्रिया
19 Jul 2016 - 6:15 pm | यशोधरा
लेख आणि माहिती आवडली.
19 Jul 2016 - 6:20 pm | प्रचेतस
:)
19 Jul 2016 - 6:58 pm | अभ्या..
आह्ह,
मस्तच.
गुरुपौर्णिमेला पण गुरुच देत आहे काहीतरी. दंडवत हो सर.__________/\_________
19 Jul 2016 - 7:28 pm | मुक्त विहारि
कॉलींग वल्ली.
लवकर एखादी छोटेखानी सहल (एक ८-१० दिवसांची) ठरवायला पाहिजे.
(ह्या वल्ली बरोबर वेरूळला जायचे म्हणजे इतके दिवस हाताशी हवेतच.)
19 Jul 2016 - 7:47 pm | एस
वा!
19 Jul 2016 - 9:27 pm | प्रचेतस
सर, खूप छान लिहिलंत.
वर अभ्यानं म्हटल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी उचित उपहार दिलात.
ह्या लेण्यांचा काळ साधारण ६ वे ८ व्या शतकाच्या दरम्यानचा. म्हणजे अजिंठ्यानंतर आणि वेरुळच्या आधीचा. कदाचित कलचुरी राजवटीच्या अमदानीत ही लेणी खोदली गेली असावीत.
इथे फ्रेस्को आहेत का? तुमच्या लेखात तसा उल्लेख नाही.
इथली शैली गांधार अजिबात नाही पण मथुरा शैलीतून पुढे विस्तार पावलेल्या अजंठा स्कूल ऑफ़ आर्ट्सशी खूपच मिळतीजुळती आहे.
बहुतेक बुद्ध धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत आहेत. काही बुद्ध ध्यानी बुद्ध दिसताहेत. अवलोकितेश्वर पद्मपाणी आणि वज्रपाणी पण दिसत आहेत.
येथे काही वज्रयान शिल्पे आहेत का? तारा, महामायुरी वगैरे? वर स्त्री उपासकांचा उल्लेख तुमच्या लेखात दिसतोय. हे स्त्री उपासक नसून मला स्त्री बोधिसत्व वाटतात. लेणी प्रत्यक्ष बघायलाच हवीत.
ते सात पुरुष उपासक म्हणजे मानुषी बुद्ध असावेत.
महायान पंथ २४ बुद्धावतार मानतात. पैकी महायान शेवटच्या सात अवतारांना मानुषी बुद्ध असे नाव देतात. शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे जसे हिंदू 'कल्की' यास भविष्यातील विष्णू अवतार मानतात.
हे सात मानुषी बुद्ध पुढीलप्रमाणे. यातील प्रत्येकास त्यांचा स्वतंत्र बोधीवृक्ष आहे.
१. विपश्यी
२. शिखी
३. विश्वभू
४. क्रकुच्छन्द
५. कनकमुनी
६. काश्यप
७. शाक्यमुनी
यातील सातव्या शाक्यमुनीलाच गौतम बुद्ध असेही मानले जाते.
पुढच्या भागाची जाम उत्सुकता लागलेली आहे तेव्हा लवकरात लवकर पुढील भाग येऊ द्यात.
माझ्याच्याने ही लेणी बघणं होईल असं काही वाटत नाही.
आणि विनंतीला मान देऊन लिहिल्याबद्दल अनेकानेक आभार.
20 Jul 2016 - 8:46 pm | मुक्त विहारि
माझ्याच्याने ही लेणी बघणं "इतक्यात तरी" होईल असं काही वाटत नाही.
असे म्हणायचे होते का?
कारण,
तुमच्या शिवाय लेणी अनुभवणे, म्हणजे "जेम्स बाँड"च्या सिनेमात "जेम्स बाँड" नसणे.
20 Jul 2016 - 9:41 pm | प्रचेतस
नाही.
ही लेणी खरंच बघणं होणार नाही असं म्हणायचं होतं.
म्हणजे बघायची इच्छा आहे पण वेळेअभावी जमणे खूपच अवघड जाईल.
20 Jul 2016 - 10:15 pm | मुक्त विहारि
जमवू या हो.
ह्या वर्षी नाही जमले तर पुढच्या वर्षी.
पण...
वेरुळची लेणी बघायला जावू, त्यावेळी एक दिवस वेळ काढून ही पण लेणी बघून येवू.
20 Jul 2016 - 10:27 pm | प्रचेतस
पितळखोरं पहिल्या यादीत आहे. :)
20 Jul 2016 - 12:07 pm | नीलमोहर
आणि त्यात बुध्दाच्या अनेकविध प्रकारच्या मूर्ती म्हणजे पहायलाच हवे असे,
तो पहिला वाटेचा फोटो पाहूनच जावेसे वाटू लागले आहे इथे,
आपल्या महाराष्ट्रात एवढी सुंदर ठिकाणे आहेत पण आपल्याला त्याची माहिती नाही खरं.
उत्तम माहिती दिलीत सर, धन्यवाद.
20 Jul 2016 - 12:16 pm | कंजूस
इतके गावातले आहात तर काहितरी शिक्रेट सांगा.लेख मस्तय.
20 Jul 2016 - 12:31 pm | बरखा
खुप छान माहीती. फोटो पण छान आहेत.
20 Jul 2016 - 7:03 pm | आनंदयात्री
>>वेरुळच्या लेणी अगोदर औरंगाबादची लेणी कारागिरांनी कोरली असावी असे मला वाटते. कारण इथे हा प्रयोग फ़सला आणि कलाकार पुढे डोंगररांगांकडे गेले असावेत असे मला वाटते. (माझ्या म्हनण्याला काहीही आधार नाही)
हेच, अगदी असेच लहानपणी ऐकले आहे. लेख उत्तम. आता तिकीटघर वैगेरे आहे म्हणजे आता लेण्याची देखभाल होत असावी. लहानपणी आधी मकबरा, मग हनुमान टेकडी आणि घरातला कोणताही स्त्रीवर्ग बरोबर नसेल तर मग ही लेणी असा कार्यक्रम वर्षातून 2-4 वेळा तरी होत असे. पुढे दंगेधोपे वाढले मग नामांतराची दोनेक वर्षे गेली, या दिवसात तिकडे जाणे कमी झाले. तुमच्या या लेखाने आता तिथे जाण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली, जायला हवे.
20 Jul 2016 - 8:55 pm | सतिश गावडे
सर, तुम्हाला भेटायला यायला एक नवा बहाणा मिळाला.
20 Jul 2016 - 9:10 pm | पद्मावति
खूप छान लेख.
20 Jul 2016 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
''लो आ गई उनकी याद ओ नही आये... ''
लेखन आवडले असे कळविल्याबद्दल यशोधरा, प्रचेतस, अभ्या, मुवी, एस, निमो, कंजूस, पल्लवी, गावमित्र आनंदयात्री, सगा उर्फ धन्या, आणि पद्मावती यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या प्रतिसादांनी लिहिण्याचा हुरुप वाढला आहे, लवकरच (म्हणजे पुढच्या वर्षीचा जुलैच उजाडेल असे वाटते, आळस दुसरे काय) दुसरा भाग टाकतो. लेखनावर आणि लेखकावर असंच प्रेम असू द्या. मिपा वाचकांचेही मनःपूर्वक आभार :)
वल्लीसाठी प्रतिसाद. वल्ली, मथूरा शैली मला अजिबात वाटत नाही. मथूरा शैली म्हणजे शिल्प अधिक वास्तवतेकडे झूकणारे असतात. विशेषतः स्त्री सौंदर्याच्या बाबतीत आकार अधिक उठावदार चैतन्यपूर्ण पुषकळसा निसर्गनियमानुसार जे जे दाखवता येईल ते ते...सर्व मथुरा शिल्पात असावे असे वाटते. एक शलभंजिका ज्याचे मी छायाचित्र टाकले आहेत तीची तेवढी जरा कंबर बारीक, पुष्ट वक्षःस्थळ व अलंकार यांनी युक्त अशी दिसते. म्हणजे खात्रीशीर मी सांगू शकत नाही.
गांधार शिल्पांचे विषय प्रामुख्याने बुद्धांच्या जीवनातील प्रसंग, जातककथा, बुद्ध व बोधिसत्व यांच्या मूर्ती हे त्यांचे विषय म्हणून मला या शिल्पांचे नाते गांधार शैलीचे वाटते. बाकी स्त्रीया मला उपासिका वाटतात. चुभुदेघे. आपला अभ्यास अधिक आहे, म्हणून जरा दचकत दचकत लिहिले आहे. चुकलं तर बिंधास्त सांगा. पुढील भागात अजून बोलूच. लो यू. ;)
-दिलीप बिरुटे
20 Jul 2016 - 10:25 pm | प्रचेतस
ही गांधार शैली अजिबात नाही. गांधार शैलीवर हेलेनिस्टिक प्रभाव आहे. तसा इकडील शिल्पांवर अजिबात दिसत नाही. मग इथली शैली गांधार नाही तर मथुरा आहे का? तर तसेही नाही.
मथुरा शैलीतून गुप्त काळातील शिल्पे हळूहळू विकसित होत गेली. गुप्त शिल्पकलेचा मोठा प्रभाव वाकाटक राजवटीवर पडला. ह्याच वाकाटक काळात अजिंठ्याची जगप्रसिद्ध शिल्पे आणि चित्रे विकसित झाली. आणि अजिंठ्याची नवीनच शैली तयार झाली. आज अजिंठा म्हटलं की सर्वांच्या डोळ्यांसमोर चित्रेच येतात पण तिथे काही फ़्याण्टास्टीक शिल्पे आहेत. जसं लेणी क्र.१ मध्ये ज्म्भाल आणि हरिती, लेणी क्र. २६ मध्ये महानिर्वाण, मारविजय, लेणी क्र. २० मध्ये नागराज.
ह्या शिल्पांचा मोठा प्रभाव औरंगाबाद लेणीवर दिसतो. कलचुरींच्या काळात हाताची घडी घातलेल्या काही आयुधपुरुष मूर्ती दिसतात. तशा औरंगाबाद लेणीत आहे की नाही ते माहीत नाही पण तुम्ही लेखात दिलेल्या वज्रपाणीची मूर्ती तशी असावी असे वाटते.
तसंही महायान स्थापत्यशैलीत शालभंजिका आणि स्त्री बोधिसत्व सोडले तर स्त्रीशिल्पांना फारसे स्थान नाही. शिवाय बौद्ध धर्मातल्या ह्या मूर्ती असल्याने स्त्रीसौंदर्याला फारसे स्थान न मिळता जास्त करून वैराग्यस्वरूपच असतात.
20 Jul 2016 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारताच्या पच्छिमेस ग्रीक राज्य होती त्यामुळे ग्रीक रोमन कलेशी भारतीय कलाकारांचा परिचय झाला. बौद्ध धर्मात महायन पंथाचे अधिक प्राबल्य वाढल्यामुळे बुद्धाची मूर्ती घडविण्यास असलेल्या हीनयान पंथांच्या विरोधाची धार नाहीशी झाली . ग्रीक देवदेवतांच्या आदर्शवादी मूर्तीप्रमाणे भारतात पहिल्यांदाच अशा बुद्धांच्या आणि बोधीसत्वाच्या मूर्ती मानवस्वरुपात घडविण्यात आल्या. ग्रीक रोमन वास्ववादी शैली आणि भारतीय सांकेतिक अलंकारिक शैली यांच्या मिश्रण किंवा विकास होऊन जी शैली निर्माण झाली ती शैली गांधार शैली. ( बरोबर की चूक)
बुद्ध व बोधीसत्व मूर्तीवरील प्रवाही व लयदार झुपके, केशकलाप, अंगावर वस्त्र घेण्याच्या पद्धत. वस्त्राच्या वास्तववादी पद्धतीने (थ्रीडी) चुण्या यामधे ग्रीम रोमन कलेचा स्पष्ट प्रभाव दिसतो.
मानवी स्वरुपातील बुद्धमुर्तीत देवत्वाचा प्रत्यय यावा म्हणून डोक्याच्या वर बांधलेली केसांची उष्णीशा नावाची गाठ, दोन भूवयामधे तृतीय नेत्र, कानांची खाली लोंबणारी पाळी, डोक्याच्या मागे प्रभावलय. हाताचा पंजा व तळपाय यावरील चक्र...हाताच्या पारंपरिक मुद्रा.... याप्की उष्णिशा ही केसांची गाठ अपोलो या ग्रीक देवाच्या मूर्तीतही आढळते. बाकी लक्षणे मात्र भारतीय आहेत.
-दिलीप बिरुटे
20 Jul 2016 - 10:49 pm | प्रचेतस
गांधार शैलीबद्दल तुमचं विवेचन बरोबर आहे.
पण ह्या शिल्पांवर हेलेनिस्टीक प्रभाव अजिबात दिसत नाही. दिसलाच तर नगण्य.
तसं बघायला गेलं तर कान्हेरीच्या चैत्यातील उपमंडपात असलेल्या अवलोकितेश्वराच्या मूर्तीवर गांधार कलेचा प्रभाव दिसतो पण इतर ठिकाणी नाही.
इथल्या बुद्धमूर्तींची वस्त्रे चुणीदार अजिबात नाहीत. आता केशकलाप म्हणाल तर बुद्धमूर्तीचे ते व्यवच्छेदक लक्षण आहे. पण इतर सर्व लक्षणे भारतीयच आहेत.
जाताजाता अवांतर- जुन्या बुद्ध साहित्यामध्ये बुद्धाचे वर्णन मुंडन केलेले असे आहे. बुद्धाचा केशकलाप हा महायानकाळात मूर्तीवर चढवला गेला.
20 Jul 2016 - 11:10 pm | अभ्या..
हेलेनिस्टिक प्रभाव अगदी नावापुरताय. बाकी हि अजंठा शैली अस्सल भारतीय अन मथुरा शैलीवरूनच विकसित झालीय. समांतर वस्त्रचुण्या, रिअलैस्टीक नाही पण सांकेतिक शरीर चिन्हे, लघुचित्रात आढळणारी चेहऱ्याची वक्राकार ठेवण, आम्रफळाप्रमाणे चेहरे आणि इतर सर्व अस्सल भारतीय कलावैशिष्ये (कृषकटी, घटा प्रमाणे स्तनभार, त्रिभंन्ग अथवा समभंग उभे राहण्याची पध्द्त, स्नायू ऐवजी बाह्याकार महत्व)अजंठा शैली हि गांधार शैली किंवा त्यावरून प्रेरित नाही हेच सिद्ध करते. हि विकसित मथुरा शैलीच.
20 Jul 2016 - 11:15 pm | प्रचेतस
तू हे शैलींचं डिटेलिंग अधिक करू शकशील असं वाटलंच होतं. मला ते नीटसं नाही करता आलं.
20 Jul 2016 - 11:20 pm | अभ्या..
जाऊयात एकदा सरासोबत. अविस्मरणीय कट्टा होईल. धनाजीराव असतीलच, बुवा अथवा किसना हवेत मात्र.
21 Jul 2016 - 6:51 am | प्रचेतस
कधीपण.
सर तयारच असतेत.
20 Jul 2016 - 11:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे यार. मोहक पण गंभीर चेहरे, प्रमाणबद्ध शरीरयश्टी. रोमन टोग्यासारखी वस्त्रे, अर्धोन्मीलित नयनांनी धानस्थ अवस्थेत बुद्धाची मानवस्वरुपात विलोभनीय मूर्ती ही गांधार शैलीची वैशिष्टे आहेत रे....
वल्लीची आणि तूमची मैत्री इथे धाग्यात नै चालणार हं. ;)
-दिलीप बिरुटे
20 Jul 2016 - 11:21 pm | अभ्या..
बरं सर, गांधार तर गांधार.
आम्हाला बोलवा एकदा मग कन्फर्म सांगतो मथुरा म्हणून. ;)
20 Jul 2016 - 10:45 pm | पैसा
सुंदर लेख! फोटोही आवडले.
20 Jul 2016 - 10:55 pm | खटपट्या
लेख वाचतोच आहे. पण सर, तुम्ही ते मजकूराच्या बाजुला फोटो कसा डकवता ते सांगा ना.
पहीलेही एकदा विचारले होते.
20 Jul 2016 - 11:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोपनिय शैली आहे ती. सर्वांनाच सांगितलं तर सर्वच तसे लेखन करतील. मग माझ्या लेखनाचे वेगळेपण काय राहणार ?
म्हणून आम्ही ती शैली कोणाला सांगत नाही. ;) सांगेन. पण, गुरुदक्षिणा काय देणार ? अट अशी राहील की विद्या शिकवेन पण तिचा उपयोग करायचा नाही. आहे का तयारी. ?
-दिलीप बिरुटे
20 Jul 2016 - 11:26 pm | खटपट्या
चालेलकी, तसेही मी खूप कमीच लीहीतो. कधी माझ्या ललीत लेखनात एखादा नटीचा फोटो टाकला तर. गुरुदक्षिणा काय मागाल ती. सद्या हीरव्या देशात आहे. इकडून एखादी स्पेशल बाटली हवी असेल तर सांगा.
20 Jul 2016 - 11:31 pm | अभ्या..
मपो झाले आता काय इंटरपोल मध्ये पाठवलंय कि काय? का तिखडच्या पोलिसांनी बोलावलंय धूम3 सारखं?
20 Jul 2016 - 11:39 pm | खटपट्या
हीकडे काही शेतकरी माजलेत, कविता करतेत सारखे, काय बोलले की पत्ता विचारतेत. म्हणून खास थर्ड डीग्रीसाठी आलोय...
21 Jul 2016 - 12:56 am | कंजूस
वेरूळच्या लेणीसारखी लेणी ( वरून खाली खोदलेली )परंतू वेरूळच्या थोडे अगोदरची म्हणून दक्षिणेत कुठेतरी "कालुगुमलाय" आहे म्हणतात. (संदर्भ: डीडीभारती वेरूळ )ती कुठे आहेत?
21 Jul 2016 - 6:57 am | प्रचेतस
बहुतेक सर्वच प्रकारची लेणी आधी कळस मग पाया अशाच स्वरुपाची असतात.
ह्याचे उदाहरण बघण्यासाठी अजिंठ्याचे क्र. २९ चे अर्धवट खोदलेले चैत्य पहावे. नुसतीच चैत्यकमान अर्धवट खोदून सोडून दिल्ये. वेरूळात जगन्नाथ सभेत असेच खोदाकामासाठी भिंतीत केलेल्या खाचा, पावठ्या आजही दिसतात. खुद्द पुण्यात पाताळेश्वराचे लेणेही असेच वरून खाली खोदत नेलेय.
21 Jul 2016 - 8:28 am | कंजूस
कैलास लेणी त्याचीच प्रतिकृती आहे.
21 Jul 2016 - 8:38 am | प्रचेतस
कशाची?
21 Jul 2016 - 8:18 am | मराठमोळा
फार पुर्वी लहान असताना ही लेणी पाहिली होती. ५-१० किलो दगडगोटे, गारगोटे जमा करुन आणले होते असं आठवतंय. एक गोष्ट प्रखरपणे आठवते ती म्हणजे आसपासच्या गावात सगळीकडे उर्दू मधे असलेले हिरवे फलक. आता काय परिस्थिती आहे माहित नाही. पुन्हा जाण्याचा योग नाही आला. लेख आणि माहिती छान. धन्यवाद.