द रेड ट्रँगल

बोलघेवडा's picture
बोलघेवडा in जनातलं, मनातलं
1 Jul 2016 - 8:50 pm

शनिवार, दु. ४:३४
आजची सभा बनारस मधल्या त्या विस्तीर्ण मैदानात होती. मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते माळा आणि तोरणे लावून सुशोभित करण्यात आले होते. व्यासपीठावर साहेबांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली होती. तुडुंब गर्दी. लोकांना पाय ठेवायला जागा नव्हती. लाउडस्पीकरवरून होणाऱ्या घोषणा आणि जयजयकाराने सर्व मैदान अगदी दणाणून गेलं होतं. हा प्रचंड जनसमुदाय म्हणजे कार्यकर्ते किंवा भाडोत्री गर्दी नव्हती तर “लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा नेता” अशी ख्याती असलेल्या ह्या लाडक्या नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी लोकं उस्फुर्तपणे लांबून आले होते.
दुपारी चारला सुरु होणाऱ्या सभेला साहेबांचं आगमन झालं तेव्हा पाच वाजुन गेले होते. सुरक्षेच्या कारणास्तव साहेबांना स्टेजच्या मागील भागातून प्रवेश करण्याचा सल्ला देण्यात आला.
पोलीस बंदोबस्तही तेवढाच काटेकोर होता. आत येताना बरीकेड लावून मोठ्या वाहनांचा प्रवेश रोखला जात होता. मेटल डिटेक्टर लावून प्रत्येकाची, अगदी ओळखीच्या कार्यकर्त्याची सुद्धा कसून झडती घेतली जात होती. पत्रकार आणि ओबी व्हॅनला ओळखपत्र बघून प्रवेश दिला जात होता.
सगळं अगदी नेहमीप्रमाणेच. चोख, काटेकोर, दक्ष, इत्यादी इत्यादी...
सगळं अगदी नेहमीप्रमाणेच...
वेगळं असं काहीच नाही...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शनिवार, स. १०:३०
ह्या वेळेस त्यांचा प्लॅन जरा वेगळा...होता. कसलाही संशय येऊ नये म्हणून अगदी बारीक सारीक गोष्टीमध्ये कमालीची काळजी घेण्यात आली होती. त्याला देण्यात आलेली भगवी कफनी देखील अगदी तिथल्या लोकल मार्केट मधून खरेदी करण्यात आली होती. दाढी त्याला आधीपासुन होतीच पण ती देखील एखाद्या साधूप्रमाणे कातरण्यात आली होती. बाकी सर्व नीट जमून आले होते पण बरोबर असणारी झोळी जरा जास्त मोठी दिसत होती. म्हणून मग आतील सामानाचे दोन भाग करून ते दोन झोळ्यामध्ये विभागण्यात आले होते. आता त्याच्या बाह्य दर्शनात तस खटकण्याजोग काहीचं नव्हत; त्या भाउगर्दीत तो सहज खपून जाऊ शकणार होता.
तिथल्या गल्ली बोळातून वाट काढत काढत, तो त्याला ठरलेल्या पत्त्यावर पोचला. ती एक जुनी मोडकळीला आलेली तीन मजली लाकडी बिल्डींग होती. इथं अर्थातच कुणी राहत नव्हत. तो सरळ जिना चढुन वर गच्चीवर पोचला. वर कोणी येणार नव्हतचं पण तरी त्याने दाराला कडी घातली.
एकवारं समोर बघितलं. जागा अगदी योग्य निवडण्यात आली होती. त्याला पाहिजे होती तशी, अगदी “विदिन रेंज”! गच्चीतून समोरच मैदान आणि आजूबाजूचा परिसर अगदी नीट दिसत होता. आत्ता मैदानात तशी काहीच गर्दी नव्हती. व्यासपीठावरून माईक टेस्टिंगचा “हॅलो १२३” चा आवाज तेवढा घुमत होता.
खाली बसून त्यानं काळजीपूर्वक झोळीतून “तिला” बाहेर काढलं आणि सवयीने जुळणी करायला घेतली आणि मोजून तीन मिनिटात “एम १० स्नायपर रायफल” जोडून तयार केली. वाऱ्याचा आणि जागेचा अंदाज घेत एक कोपरा निश्चित केला. त्या कोपऱ्यात पालथं पडून त्याने गन सेट करून प्रथम नुसत्या डोळ्याने निरीक्षण केलं. मग गनवरच्या भिंगात एक डोळा घालून त्याने बारकाईने समोरच्या मैदानावरील स्टेज न्याहाळलं. काही एक अंदाज घेऊन आजूबाजूचा परिसर डोक्यात कोरून घेतला.
आता पुढचे काही तास तो तिथेच पडून राहणार होता.
थंडगार...एखाद्या प्रेतासारखा.
एखाद्या आ वासलेल्या मगरीसारखा ढिम्म.
सावज टप्प्यात आल्यासरशी फाटकन आपला कराल जबडा मिटून सावजाचा लचका तोडण्यासाठी...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
शनिवार, सायं. ५:३७
टाळ्यांच्या गजरात आणि प्रचंड जयजयकारासोबत साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालं. आपले दोन्ही हात वर करून साहेबांनी स्मित करत जनसमुदायाला अभिवादन केलं आणि पुन्हा एकदा टाळ्यांची वर्षाव झाला. माईक वरून साहेबांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती केली गेली.
आता त्याच्या हातात थोडाच वेळ होता. व्यासपीठावर आलेले साहेब एकदा का माईक जवळच्या भागात पोचले कि मग तिथली बुलेट प्रुफ काच त्यांना भाषण संपेस्तोवर सुरक्षित करणार होती. हा मधला काळ त्यांचं ह्या इहलोकातील वास्तव्य निश्चित करणार होता.
आर या पार...बस.
त्याने त्याचा निर्णय घेतला!
सवयीनेच मग त्याचा श्वास आपोआप रोखला गेला...
शरीर गोठून गेलं आणि बोट ट्रिगरवर स्थिर झालं.
ती रायफल आणि तो जणू एक शरीर झाल्यागतं...
...
...
खट...गssssग...स्प्रिंग रीट्रॅक्ट.
खांद्याला एक जोरदार झटका...
नळीच्या बाजूला किंचित गरम स्पर्श.
हलकासा जळका वास.
गोळी???...कधीच सुटली.
खेळ खलास.
..
..
..
खात्री पटल्यावर त्यानं झोळीतून फोन काढला.
“अल्फा रिपोर्टिंग, सर.
मिशन रेड ट्रँगल अकंप्लीश्ड, सर.
...
ब्राव्हो, सोल्जर.
गेट बॅक इन शॅडो, इमीडीएटली.
येस सर.
“जय हिंद.”
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रविवार स. ६:३० वा.
“केंद्रीय मंत्र्यांचे देशात एकी राखण्याचे आवाहन...दहशतवाद मुळापासून उखडून काढण्याचे वचन...बनारस मध्ये काल झालेल्या आपल्या भाषणात त्यांनी...”
गुळगुळीत दाढी केलेल्या गालावरून हात फिरवीत त्यानं पेपर बाजूला केला. कालचं त्याचं मिशन फार वेगळं आणि अवघड होतं. एरवी कोणाला “टिपायचं” आहे हे त्याला माहित असायचं. पण कालच्या मिशनमध्ये “त्याचं” लोकेशन माहित नव्हतं.
“तो”
तोही आपल्यासारखाच... कुठेतरी दबा धरून बसलेला...थंडगार. मगरीसारखा.
...
त्याला अॅकॅडमीतले ट्रेनिन्गचे दिवस आठवले.
“ह्या मगरींच्या खेळात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जसा एखाद्याचा वेध घेता, अगदी त्याचवेळी, तुमचा वेध घेणारा अजून एखादा ‘तो’ त्या स्थळी अस्तित्वात असू शकतो”
कालच्या खेळात “तो” नेमकी हीच गोष्ट विसरला. शरीराची एक छोटीशी हालचाल त्याला महागात पडली. त्याने रचलेल्या शहावर अजून एक “काटशह” असू शकतो हे “तो” विसरला.
जणू काही घडलंच नाही अशा अविर्भावात तो आर्मी युनिफोर्ममध्ये बाहेर पडला.
तो स्वतः, “तो” आणि लक्ष्य ह्यांच्यातील त्रिकोणाचं गणित त्यानं अचूक सोडवलं होतं.
(समाप्त)

कथाआस्वादलेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2016 - 9:48 pm | टवाळ कार्टा

भारी

खूप लवकर सस्पेन्स संपला. कथा आणखी फुलवता आली असती.

पुढील लिखाणास शुभेच्छा..!!

यशोधरा's picture

1 Jul 2016 - 10:06 pm | यशोधरा

आवडली.

बोका-ए-आझम's picture

1 Jul 2016 - 10:20 pm | बोका-ए-आझम

अजून फुलवता आली असती याच्याशी सहमत.

महासंग्राम's picture

2 Jul 2016 - 10:52 am | महासंग्राम

अण्णा तेवढं आपलं मोसाद बघा की ( पळतो आता )

संजय पाटिल's picture

2 Jul 2016 - 6:49 pm | संजय पाटिल

असच म्हणतो आणि मी पण पळतो..
जाता जाता कथा भारीये..

राजाभाउ's picture

4 Jul 2016 - 1:54 pm | राजाभाउ

कथा भारीय एकदम

बोक्या भाउ बद्दल च्या प्रतिसादाला +१
ए आलो कि मी थांबा जरा.

चांगलंय... अजून रंगवली असती तर मजा आली असती..

धन्यवाद..

तुषार काळभोर's picture

2 Jul 2016 - 11:11 am | तुषार काळभोर

काही तरी भारी वाचतोय असं वाटलं खरं, पण आईशप्पथ डोक्यावरनं गेलं. 'तो', 'त्याचं' सगळं हवेत!

माजी बुद्दीमत्ता वाईच कमी समजा, पण कुनी तरी इस्कटून सांगता का राव?

माझ्या अल्पमतीप्रमाणे नेत्याला उडवायला आलेल्या शार्ट शूटरचाच आर्मीतल्या स्नायपरने गेम केला असं कथानक दिसलं.

तुषार काळभोर's picture

2 Jul 2016 - 11:11 am | तुषार काळभोर

काही तरी भारी वाचतोय असं वाटलं खरं, पण आईशप्पथ डोक्यावरनं गेलं. 'तो', 'त्याचं' सगळं हवेत!

माजी बुद्दीमत्ता वाईच कमी समजा, पण कुनी तरी इस्कटून सांगता का राव?

सुबोध खरे's picture

2 Jul 2016 - 11:41 am | सुबोध खरे

सुंदर
आहे ती छोटीशी पण सुंदर आहे
कथा अजून फुलवण्यात पाणचट झाली असती तर?

मुक्त विहारि's picture

2 Jul 2016 - 2:01 pm | मुक्त विहारि

थोडक्यात आणि एकदम आटोपशीर.

बोलघेवडा's picture

2 Jul 2016 - 6:31 pm | बोलघेवडा

धन्यवाद.

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.

किसन शिंदे यांनी वर म्हणल्याप्रमाणेच कथानक आहे.

जव्हेरगंज's picture

3 Jul 2016 - 7:17 pm | जव्हेरगंज

Tumko Na Bhool Paayenge

मधला एक सीन आठवला.

जेपी's picture

2 Jul 2016 - 9:51 pm | जेपी

चांगलय..

विअर्ड विक्स's picture

3 Jul 2016 - 1:46 am | विअर्ड विक्स

झोळीमुळे थोडा झोल वाटतोय कथेत !
तो नि तो स्वतः दोघेही झोळी घेऊन फिरतायेत का ?
बाकी वातावरण निर्मिती छान !!!!

जव्हेरगंज's picture

3 Jul 2016 - 7:25 pm | जव्हेरगंज

शरीराची एक छोटीशी हालचाल त्याला महागात पडली.

कशाप्रकारे?

बारीक सारीक गोष्टीमध्ये कमालीची काळजी घेण्यात आली होती. त्याला देण्यात आलेली भगवी कफनी देखील अगदी तिथल्या लोकल मार्केट मधून खरेदी करण्यात आली होती. दाढी त्याला आधीपासुन होतीच पण ती देखील एखाद्या साधूप्रमाणे कातरण्यात आली होती. बाकी सर्व नीट जमून आले होते पण बरोबर असणारी झोळी जरा जास्त मोठी दिसत होती. म्हणून मग आतील सामानाचे दोन भाग करून ते दोन झोळ्यामध्ये विभागण्यात आले होते.

हे कोणाचं वर्णन आहे? दहशतवादी की आर्मीवाल्याचं?

दुसरा परिच्छेद - दहशतवादी.
तिसरा व चौथा परिच्छेद - आर्मी स्नायपर.

कथा जबरदस्त लिहिलीयं. 'एम १०' झोळीमध्ये लपवून नेता येईल का याबद्दल किंचित साशंक. पण तो उगीचच छिद्रान्वेषीपणा होईल. पुलेशु.

रातराणी's picture

4 Jul 2016 - 10:58 am | रातराणी

सही कथा!

सिरुसेरि's picture

4 Jul 2016 - 3:00 pm | सिरुसेरि

मार्क वॉलबर्गचा "शुटर" , महेश बाबुचा "अथडु" आठवले .

आजच्या दिनाचे औचित्य साधून हि कथा वर काढत आहे