परवा रात्री 'रात्रीस खेळ चाले' मालिका बघत होतो. एरवी ही मालिका फक्त मनोरंजन म्हणून पाहणारा मी पण मालिके मध्ये दाखविलेल्या काही प्रसंगांमुळे काही जुन्या आठवणी चाळवल्या.
साल १९९९, स्थळ: प्रतापगड. ओळखीच्या गटा सोबत महाबळेश्वर ते प्रतापगड हा ट्रेक करत होतो. दुपारी जेवण करून महाबळेश्वरच्या बॉबे पॉइंट वरून निघून पारगाव - अफझलखान समाधी असे करत प्रतापगड वर पोचणे हा कार्यक्रम होता. अंतर साधारण १६ किमी ( ४ तास) . प्रतापगडच्या MTDC च्या रेस्टहाऊस मध्ये रात्रीच्या जेवणाची आणि राहण्याची आधीच सोय केलेली होती. ट्रेक मस्त चालू होता. काही नव्या ओळखी झाल्या होत्या. अंतर ही तसे फार दमवणारे नव्हते. साधारण ६ च्या दरम्यान अफझलखान च्या समाधीचं दर्शन घेऊन प्रतापगड कडे निघालो. फारतर अर्धा तास राहिला होता गडावर पोचायला. मी, जळगावचे एक डॉक्टर आणि पुण्याचा एक मुलगा असे तिघे सगळ्यात पुढे होतो. बाकी चमू बराच मागे होता. गडाच्या थोडंसं अलीकडे जंगलात आम्ही तिघे बाकी चमूची वाट बघत थांबलो होतो. पुण्याचा तो मुलगा लघुशंकेसाठी झाडीत गेला. थोड्याच वेळात त्याचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही तो गेला त्या दिशेला धावलो तर तो झाडीतून आमच्या कडेच पळत येत होता. तो आम्ही उभे होतो तिथपर्यंत पोचला आणि 'ते.. ते.. तिथे.. तिथे' एवढंच बोलत होता. डॉक्टर त्याला 'अरे काय जाल? साप बघितला का? काही चावला का? ' असे विचारत होते पण तो काहीच बोलत नव्हता आणि बघता बघता तो बेशुद्ध पडला. त्यानंतर आमची बरीच धावा धावा झाली. मी बाकी लोकांना बोलवायला खाली पळालो तो पर्यंत डॉ नि त्याला उचलून रेस्टहाऊस पर्यंत नेलं होतं. आधी सगळ्यांना वाटलं त्याला काही तरी चावलं आहे म्हणून गाडीतळावर एक गाडी त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेण्यासाठी तयार ठेवण्यासाठी सांगितली होती. पण त्याच्या शरीरावर तश्या काहीच खुणा नव्हत्या आणि नाडीची जलद गती एवढं सोडलं तर बाकी काहीच लक्षण नव्हती. डॉ च्या मते तो कसल्या तरी शॉक मध्ये होता आणि त्याला थोडीशी विसरती मिळणे आवश्यक होते. डॉ नि सर्वांना धीर दिला.ह्या पूर्णं प्रसंगात नेतृत्वं आपोआपच डॉ कडे गेलं होतं. थोड्या वेळांनी त्याला जाग आली आणि तो हमसून हमसून रडायला लागला. डॉ नि सगळ्यांना बाहेर पाठवलं आणि एकटेच त्याच्याशी बोलायला थांबले. आमच्या मध्ये वय वर्षे १५ च्या आत मधली बरीच मंडळी होती (इंक्लुडींग मी) . हा असं प्रसंग कोवळ्या मनाला कितपत झेपेल आणि त्याचा पुढे किती इंपॅक्ट पडेल हा अम्हाला त्या मागचा कळवळा. त्या मुलाने डॉ ला काय झालं ती सर्व हकिकत सांगितली (जी आम्हाला बरीच नंतर कळली).
तर तो लघुशंके साठी गेला असता त्याला तिथे एक विहीर दिसली. तो विहिरी जवळ गेला आणि आतमध्ये वाकून कसले कसले आवाज काढले (बऱ्याचं लोकांना अशी सवय असते). त्या विहिरीत आवाज घुमत होता. आपल्याला नवीन एको पॉइंट मिळाला आहे हे सांगण्यासाठी तो परत अम्ही उभे होतो त्या दिशेने निघाला. त्याला मागे कोणीतरी हसण्याचा आवाज आला (विहिरीतून). त्याने मागे वळून पाहिले तर परत आवाज आला. हे सगळं त्याला सहन नाही झालं आणि आमच्या दिशेने पळत निघाला.
त्याला त्या रात्री भरपूर ताप भरला म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला स्पेशला गाडीनी आधी महाबळेश्वराला, तिथे काही प्राथमिक तपासण्याक
रून पुण्याला नेण्यात आले. ह्या सर्व प्रसंगानंतर अर्थातच आमचा ट्रेक तिथेच संपला (आमचा प्लॅन दुसऱ्या दिवशी घोणसपूर मार्गे मधुमकरंद गडावर जाण्याचा होता). आम्ही सर्व एसटी नि आपापल्या गावी परतलो.
डॉच्या मते हा केवळ भास होता आणि त्या सर्व प्रसंगाला भुताटकी च्या ऍंगल नि पाहू नये असे होते. खूप दमल्या नंतर शरीरात कमी पडलेले पाणी आणि इतर सर्व सॉल्टस मुळे मेंदूला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही आणि असे भास होतात अस त्याचं मत होतं. वाळवंटात आणि हिमालयात होणारे दृष्टिभ्रम हे त्यातलेच प्रकार. असं होण्या मागे शास्त्रिय कारण त्यांनी अम्हाला पटवून सांगण्याचा प्र्यत्न केला. त्यांना स्वथला हिमालयात ट्रेकिंगच्या वेळी प्राण्वायू कमी पडल्यामुळे आलेले अनुभव सांगितले. हा त्यातलाच प्रकार आहे हे ही पटवून दिले. त्यांनी आम्हा सर्व मुलांना बराच धीर दिला आणि घाबरून न जात हा केवळ वेगळा प्रसंग म्हणून त्याच्याकडे पाहावे हा सल्ला दिला. त्याचं तर मत होते की पुढचा कार्यक्रम रद्द न करता तसाच पुढे चालू ठेवावा असे होते. अर्थात त्या मन:स्थितीत कोणिच त्याला दुजोरा दिला नाही. प्रत्येकाला आपापल्या घरी सुरक्षित कोशात जायचे होते.
तिथल्या स्थानिक मंडळीनि नंतर तिथे घडलेल्या अजून काही अद्भुत गोष्टी सांगितल्या पण त्या सर्व अतिश्योक्ती वाटत असल्याने आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्श्य केलं.
मी त्या वेळी १५ वर्षाचा होतो आणि सहाजीकच माझ्या वर ह्या अनुभवाचा बराच प्रभाव पडला. पण ह्या सर्व प्रसंगात माझे हीरो होते डॉ. त्यांनी जे मनोधैर्य दाखवले आणि कठीण काळात पूर्णं टीमच मनोधैर्य खचू न देण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरेच वाखण्या जोगे होते. कधी कधी मी विचार करतो, त्या संध्याकाळी जेव्हा तो मुलगा झाडीतून घाबरून आमच्या दिशेने पळते येत होता, तिथे जर डॉ नसते तर मी काय केले असते? निर्णय घेणं तर सोडाच नक्की काय घडत आहे तेच मेंदू पर्यंत पोचत नव्हतं. सगळं कस स्वप्नवत चालू आहे असे वाटत होते.
त्या नंतर मी असंख्य वेळा महाबळेश्वर ला गेलो असेन. महाबळेश्वर ला गेलो की प्रतापगडला ही जातोच. प्रतापगडाला गेलो की त्या विहिरीजवळ पण जातो. पण खरचं सांगतो अजून पण आत मध्ये वाकून काही ओरडन्याचे धाडस होते नाही.
टीप : हा प्रसंग जसा घडला तसा नमूद केला आहे. कोणत्याही स्थळाची बदनामी करायचा हेतू नाही. महाबळेश्वर, प्रतापगड, मधुमकरंदगड, कमळगड, चंद्रगड, भीमाची काठी आणि परिसर हे माझ्यासारख्या भटक्या साठी काशी समान आहेत.
प्रतिक्रिया
17 Apr 2016 - 1:09 am | योगी९००
छान अनुभव कथन...!! डॉ.रांनी परिस्थिती चांगलीच हाताळली. त्या मुलाला एकटाच असताना कशाला विहीरीत डोकावून एको काढण्याची अवदसा आठजाण?
एक कळले नाही की अफजलखान समाधी ते प्रतापगड अर्धा तास कसा काय? समाधी तर लगेचच खालती आहे ना?
अवांतरः
बाकी अफजलखानसाहेबांची समाधी याचे दर्शन घेऊन त्यांचे पुण्यस्मरण केलेत याचा आम्हाला अतीव आनंद झाला.
(सेक्युलर) योगी९००
17 Apr 2016 - 5:37 am | रेवती
असेच म्हणते. कशाला एकटं असताना असलं काहीतरी करायला जायचं?
17 Apr 2016 - 2:03 pm | उगा काहितरीच
हे काही झेपलं नाही बघा ! समजाऊन सांगण्याची कृपा होईल काय ?
17 Apr 2016 - 1:38 am | ईश्वरसर्वसाक्षी
परवा रात्री 'रात्रीस खेळ चाले' मालिका बघत होतो.
माफ करा लेखक महोदय पण ह्या वाक्यानंतर नाहि हा काहि वाचलsss
17 Apr 2016 - 3:52 am | माझीही शॅम्पेन
छान अनुभव ..... अजुन लिहित राहा ...भारि आहे
17 Apr 2016 - 5:36 am | रेवती
बापरे!
17 Apr 2016 - 7:22 am | विजय पुरोहित
भयानकच!
17 Apr 2016 - 7:33 am | कंजूस
अद्भुत! आम्ही लहानपणी मामाच्या गावी सुट्टीत जायचो तेव्हा सायकली घेऊन उंदडायचो दिवसभर.आजी बजावायची रिकाम्या ओसाड विहीरीत डोकवू नका.अमका मनुष्या नंतर वेडाच झाला.आत कधी कोणी जीव दिलेला असतो त्याचं भूत वाट पाहात असतं आणि त्याला आनंद होतो कोणी आलंय भेटायला.ते हसतं आणि आपण हसतच राहातो कायमचेच.अर्थात ही पुढील माहिती आम्ही वारंवार का पाहायचं नाही हे विचारल्यावर आजीने सांगितलेली.
17 Apr 2016 - 1:02 pm | तर्राट जोकर
त्याच्या इको-नाट्याने विहिरातल्या एखाद्या घुबडासारख्या पक्षाची झोपमोड झाली असेल.
17 Apr 2016 - 3:10 pm | इरसाल
पण समाधी म्हणजे काय?
19 Apr 2016 - 1:05 pm | सविता००१
भीतीदायक
19 Apr 2016 - 1:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
ट्रेकमध्ये एकटया दुकट्याने भटकु नये हा अनुभव कधीच गाठीशी बांधलाय. काहीही इमर्जन्सी येउ शकते.
१.माहुली गडावर कल्याण दरवाजामार्गे जात असताना आमच्यातील एका कसलेल्या ट्रेकरचा घसरुन झालेला अपघाती म्रुत्यु. पुढे पोलिस केस वगैरे वगैरे
२. माहुलीवरुनच उतरताना दुसर्या ट्रेकरला फुरसे चावले. धावपळ करुन त्याला शहापुरच्या सरकारी दवाखान्यात नेले आणि सर्पदंशाचे ईंजेक्षन दिले.
३.अजुन एका ट्रेकमध्ये पाणी संपल्याने पुर्ण ग्रुपचे झालेले हाल आणि दुसर्या ग्रुपने कड्यावरुन रोपच्या सहाय्याने पाणी पुरवुन केलेली मदत.
४. अंधारात ग्रुपपासुन झालेली चुकामुक आणि चकवा लागल्याने ३-४ जणांना जंगलात काढावी लागलेली रात्र
असे स्वतःचे आणि ऐकीव अनेक अनुभव आहेत.
19 Apr 2016 - 2:54 pm | अनंत छंदी
हे जरा विस्ताराने लिहा की, वाचायला मजा येईल.
19 Apr 2016 - 4:22 pm | सह्यमित्र
हा भुताचा चकवा नसेल हो. जंगलात वाट चुकणे, दिशा चुकणे असे प्रकार बऱ्याचदा घडतात. त्याच्याशी निगडीत असावे
19 Apr 2016 - 5:30 pm | राजेंद्र मेहेंदळे
चकवा लागल्याचा अनुभव
पेबचा ट्रेक ठरला होता. रात्रीच्या कर्जत गाडीने निघायचे आणि नेरळला उतरायचे ठरले. मग पुढे काय करायचे हे ठरले नव्हते.
मंडळी नवीन आणि उत्साही होती . नेरळला उतरल्यावर जेवलो आणि नाईट ट्रेक मारायचे ठरले. माहीतगार लोक (जे नंतर नुसतेच "गार" पडले) पुढे झाले. एका ठराविक अंतरापर्यंत विद्युत महामंडळाच्या तारा डोक्यावरुन जात होत्या आणि मार्गदर्शन करत होत्या. पण नंतर त्या वळुन दरीत उतरल्या अणि तो पर्याय संपला. मग चंद्रप्रकाशात पुढची वाट शोधु लागलो. पण काही वेळाने वाट दाट झाडीत घुसली आणि चंद्र ही मावळला. मग मात्र सगळे गडबडले. बरीच शोधाशोध करुन पुन्हा पुन्हा आम्ही एकाच ठिकाणी येत होतो. पाणी संपत आले होते आणि मंडळींचा धीरही.
शेवटी वाट बदलुन पुन्हा चढाईला सुरुवात केली आणि आता अशा एका ठिकाणी येउन फसलो की तिथुन वरही जाता येईना आणि खालीही उतरता येईना. शेवटी १२-१३ जण एकाच ठिकाणी झाडाझुडपांचा आधार घेउन बसुन राहिलो. पहाटे जरा दिसु लागले तेव्हा समजले की पेबचा माथा केवळ २० फुटांवर राहिला होता. आणि पायाखाली सगळी घसरण होती. मग १-२ मोठी झाडे शोधुन त्यांना रोप बांधला आणि एकेक जण वर चढलो. त्या अनुभवानंतर आजवर खात्रीशीर माहितगार बरोबर असल्याविना नाईट ट्रेक केला नाहिये.
19 Apr 2016 - 6:30 pm | यशोधरा
ह्या अनुभवात चकव्यापेक्षा वाटेबद्दलचा अननुभव, प्रकाश नसल्याने वाट न कळणे इ गोष्टी आहेत. जी वाट माहिती नाही, ती रात्री दाट झाडीत चढण्याची चूक.
19 Apr 2016 - 7:19 pm | सह्यमित्र
+1
20 Apr 2016 - 11:24 am | वेल्लाभट
स्थळ कर्नाळा
मी आणि माझा मित्र. माझा आयुष्यातला पहिला ट्रेक. दोघेच निघालो, पक्षी बघू, किल्ला बघू असं म्हणून. फुल ऑन तयारी'विना. नेहमीच्या रस्त्याच्या ऐवजी 'मोरटाका ट्रेल' निवडली. मोर बिर दिसला एखादा तर तेवढंच जरा भारी काहीतरी अजून. मस्त जातोय गप्पा मारत हे झाड कसलं, तो आवाज कुठल्या पक्षाचा...
एक पठार लागतं मधे. ते ओलांडून आम्ही गेलो, आणि पुन्हा जेंव्हा तसंच पठार, तेच झाड लागलं, तेंव्हा मी मित्राला म्हटलं, 'अरे मगाशी असंच एक पठार लागलेलं ना?' 'हो रे मला पण वाटलं असं अत्ता.'
पुन्हा तिसर्यांदा तेच झाड, 'अरे काय चाललंय... आपण पुन्हा तिथेच आलोत'
हे अजून एकदा झालं. अडीच तास उलटून गेलेला. कर्नाळ्याचा अंगठा आमच्या मागच्या बाजूला. फुल येडे झालो. मग म्हटलं आता एक काम करू.. ही वाट सोडू आणि पुढे/मागे न जाता डावीकडे सरळ चढत जाऊ. काटकोनात वळून समोर येईल तसा चढ चढत गेलो. पाच मिनिटात मूळ वाटेला लागलो आणि पुढच्या अर्ध्या तासात गडावर.
चकवा तेंव्हा कळला.
फार काही भयावह वगैरे नव्हतं हे. पण असो.
19 Apr 2016 - 4:20 pm | सह्यमित्र
डॉक्टर त्यावेळेला म्हणाले ते बरोबरच. . ट्रेक्स दरम्यान हे असे अनुभव मुख्यतः ,नवखे पणा , दमलेले असणे, अंधाराची भीती अशा गोष्टींमुळे येतात. त्याच्या मागे अमानवी शक्ती असतील असे मानणे चुकीचे आहे.
आणि राजेंद्र म्हणत आहेत त्या प्रमाणे ट्रेक मध्ये एकट्याने भटकणे शक्यतो नकोच. भूत बित नाही पण इतर वर उल्लेखलेल्या प्रसंगात बरोबर कोणीतरी असणे अत्यंत गरजेचे आहे.
19 Apr 2016 - 5:09 pm | अभिजित - १
हे अनिस वाले डरपोक असतात. १५/२० जन एकत्र जातात . स्मशान / डेंजर जागी. मग त्यांना काही अनुभव येत नाही. मग सब झुठ है अशी बोंब ठोकायला मोकळे.
हिम्मत असेल तर यातल्या १० लोकांना वेगवेगळ्या कुप्रसिद्ध ठिकाणी एकेकटे सोडा. मग बघू. मुळात ते याला तयारच होणार नाहीत. कारण तसे करायला फाटते त्यांची.
19 Apr 2016 - 5:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
अनिस वाले १५ /२० जण एकत्र जात असतील तर भुतांना पण १५/२० चा गट करुन यायला काय हरकत आहे? प्रत्येक भुताने एक एक झाड निवडायचे.
बाकी अनिसवाल्यांना डरपोक म्हणण्या ऐवजी तुमचा या बाबत काही अनुभव असला तर तो लिहा ना.....
पैजारबुवा,
19 Apr 2016 - 7:03 pm | अभिजित - १
भुतांना पण १५/२० चा गट करुन यायला काय हरकत आहे? >>
ते तुम्ही त्या भूत वर्गात सामील झाल्यावर करा कि .. अजून ३०/४०/५० वर्षांनी . जे काही विधिलिखित असेल त्या प्रमाणे. तुम्ही लवकर तिकडे जावे असे माझे अजिबात म्हणे नाही.
पण इतके वर्ष थांबण्य पेक्षा हे अनिस वाले का एकेकटे जात नाही मोहिमेवर ? किवा फाटते बुवा हे सरळ सरळ काबुल का करत नाहीत ते ?
19 Apr 2016 - 7:15 pm | सह्यमित्र
मी अनिस वाला तर नाहीच आणि मला त्यांची बहुसंख्य मते पटत पण नाहीत. तरी पण एक सांगावेसे वाटले म्हणून लिहितो. निर्जन, सुनसान ठिकाणी विशेषतः रात्री एकट्याने जाण्याची भीती बहुसंख्य लोकांना वाटते. पण त्या मागचे कारण माणूस मूलतःच अंधार, एकटे पणा, अज्ञात जागा, आकार, आवाज ह्यांना घाबरतो हे आहे. त्यामुळे तार्किक बुद्धी कितीही सांगत असली कि असे काही नसते तरी मनातून भीती वाटतेच. त्याचे प्रमाण व्यक्ती परत्वे बदलते इतकेच.
ट्रेक दरम्यान अनेकदा गूढ आकार आवाज सावल्या इत्यादी चा अनुभव येतो पण हे मुख्यत्वे रात्रीच. सकाळी त्याच ठिकाणी परत गेल्यावर काल घाबरलो तो आकार म्हणजे जुने वाळलेले झाड, एखादा दगड इत्यादी असल्याचे निदर्शनास येते. तस्मात अशा अनुभवांमुळे उगाच फार घाबरून भलतेच गैरसमज पसरविण्याची गरज नाहि.
19 Apr 2016 - 10:07 pm | पैसा
तुम्हा लोकांचे नशीब क्जी एवढे चांगले डॉक्टर तुमच्या सोबत होते. नाहीतर कायमची भीती बसली असती.
19 Apr 2016 - 10:21 pm | चंद्रनील मुल्हेरकर
चिपळुण जवळ एकदा भैरवगड ट्रेक करायला गेलो होतो ,तेव्हा आलेला एक अनुभव ईथे शेअर करीन नंतर ,तोपर्यंत येऊ द्या प्रतिसाद.
20 Apr 2016 - 8:34 am | कंजूस
ढाकच्या खालच्या मैदानावर हमखास नवीन मणूस चुकतो आणि फिरत राहातो.सर्व पाउलवाटावर गुरांचे शेण असते नक्की कोणती वाट खाली अथवा वरती जाते कळतच नाही.तैलबैला-सुधागड मधला डोंगराळ भाग.उन्हाळ्यात पाणी संपले की व्याकुळ होतो.
एखाद्या जागेला भुत आहे वगैरे गोष्टी माहीत नसलेल्यास काहीच भीती वाटत नाही.
20 Apr 2016 - 9:22 am | विटेकर
या चर्चेत तोरण्यावरची वेताळाची पालखी अजून कशी आली नाही?
20 Apr 2016 - 1:23 pm | कंजूस
जेवढ्या प्रमाणात राजगडावर पाणी आणि निवारा आहे तसा तोरण्यावर नसल्याने तिथे वस्ती करायला फारच कमी लोक जातात.गुणाजीच्या पुस्तकात उल्लेख आहे दिवेकराच्या भुताचा.
हरिश्चंद्रगडावर अमावस्येला आकाशात भुतं उजेड पाडतात असं एक गावकरी मला तिथे संध्याकाळी सांगत होता.मी हसून म्हटलं म्हणून तर आलोय आज."अरेच्चा उद्या अमुश्या नाही का,"असं म्हणत माझ्या पायांकडे बघत तो लगेच तिकडून जातो जातो म्हणाला ते आठवलं.
20 Apr 2016 - 2:03 pm | मालोजीराव
प्रचीतगड ट्रेक च्या वेळी, पाथरपुंज गावाजवळच्या एका निर्जन खोपट्यात मुक्काम केलेला, ८-९ जण होतो. हिवाळ्याचे दिवस होते मस्त गाढ झोप लागलेली, अचानक रात्रीच्या दोनेक वाजता खोपट्याच पत्र्याच दार वाजवायचा आवाज आला. वार्याने वाजलं असेल म्हणून झोपलो परत, थोड्या वेळाने परत २-३ वेळा सलग आवाज आला, सगळेच झोपेतून उठून बसलो. आमच्यातले बरेच जण भुताटकी चित्रपट प्रेमी असल्याने दार न उघडण्याचा निर्णय सर्वमते घेण्यात आला, त्यानंतर पुन्हा दरवाजा वाजल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ "लिंबू पाहिजे होत, लिंबू हाये का कुणाकड" असा आवाज आला, आतून कुणीही प्रतिसाद दिला नाही, परत दोन तीनदा दर वाजवलं गेलं आणि आवाज दिले. त्यांनतर परत शांतता.
सकाळी पाथरपुंज गावात जाऊन चौकशी केली (गाव टीचभर आहे, २०-२५ उंबरे ), गावात सांगितलं कि कोणीच आल नव्हत रात्री तिकडच्या बाजूला. रात्री फारशी भीती वाटली नव्हती पण सकाळी अवस्था जाम वाईट झाली सगळ्यांची.
तिथून जवळ कंधारडोह म्हणून ठिकाण आहे, त्या डोहात राहणाऱ्या सातीआसरा आणि जलपर्यान्च्या स्टोर्या फ़ेमस आहेत, अर्थात ऐकीव आहेत.
20 Apr 2016 - 5:26 pm | नुस्त्या उचापती
मिपावरील तज्ञ , सुज्ञ ,सुशिक्षित , विचारवंतांचा भुता -खेतांवर विश्वास आहे . याचा विश्वास बसत नाही .
20 Apr 2016 - 5:51 pm | सह्यमित्र
एक निरीक्षण, एरवी श्रद्दधा- अंधश्रद्धा , आस्तिक-नास्तिक अशा धाग्यांवर देव अस्तित्वात नाहीच असे मत हिरिरी ने मांडणारे कित्येक प्रतिसाद येतात. त्या तुलनेत ह्या अशा भुताटकीच्या अनुभवाच्या धाग्यांवर असे काही नसते असे मत मांडणारे प्रतिसाद बरेच कमी असतात.
21 Apr 2016 - 6:22 am | कंजूस
"मिपावरील तज्ञ , सुज्ञ ,सुशिक्षित , विचारवंतांचा भुता -खेतांवर विश्वास आहे . याचा विश्वास बसत नाही ."--
विशेषणांबद्दल धन्यवाद.असल्या गोष्टी न घाबरणारेच लिहितात वाचतात.घाबरट ते उल्लेखही टाळतात.बाकी भटकंतीत कुणी भूतकथा सांगत असल्यास एकप्रकारची करमणूक होत असते तेव्हा सांगणाय्राला अरे असले काही नसते वगैरे लेक्चर मारणे बावळटपणाच.ऐकून वावा म्हणायचं आणि खरंच भूत भेटलं तर त्याच्याशी गप्पा मारून लेखाचा कच्चा माल मिळेल या आशेवर असतो.पण भुतांचं दुर्दैव त्यांना मिपावर मुलाखत मिळण्याचं.
20 Apr 2016 - 11:59 pm | एस
मला रात्री अशा जंगलांत, किल्ल्यांवर इत्यादी आणि विशेषतः भुताटकीच्या म्हणून सांगितल्या जाणार्या ठिकाणी एकट्यानेच फिरायला जाम आवडते. तोरण्यावर तर कितीदा फिरलो - पौर्णिमा-अमावस्येलाही. पण आजवर माझ्या इतक्या भटकंतीच्या अनुभवात मला मी सोडून दुसरे कोणतेही भूतबित दिसलेले नाही ;-)
21 Apr 2016 - 12:07 am | रेवती
बाबौ!
21 Apr 2016 - 8:51 am | नाखु
भी उसूल होते है! एक भूत दुसरे भूत के एरिया मे जाता नही और पेहचान दिखाता नही !!
संवाद लेखक नाखु बॉलीवूड्वाला..
आगामी सिनेमा : मिपा भुतोंकी कहानी
21 Apr 2016 - 7:49 am | हेमंत लाटकर
भुते तुम्हाला घाबरत असावीत:)
21 Apr 2016 - 3:19 pm | उगा काहितरीच
भुताचा एक किस्सा... आमचे कॉलेज गावाच्या बाहेर . रात्री ७-८ नंतर स्वतःचे वाहन नसेल तर कुठेही जाणे अवघड. बरोबर ९ वाजता मुलींच्या होस्टेलचे गेट बंद होत असे व १० वाजता मुलांच्या . काही महत्त्वाचे काम असल्याशिवाय कुठे जाऊ देत नसत. त्यामुळे रात्री चौकीदारांशिवाय कुणीच कॕंम्पस मधे फिरताना दिसत नसे. चौकीदारपण एक नंबर कलाकार होते, खुर्चीत बसल्या बसल्या झोपायची अनोखी कला त्यांना अवगत होती. तर अशा वातावरणात साहजिकच भुताचा जन्म होतो. तर झालं असं रात्री १:३० ची वेळ असावी चौकीदाराला staff quarters च्या गच्चीवर भुत नाचताना दिसले. एक दोन चौकिदाराला दाखविले व staff quarters च्या गच्चीवर भुत आहे.या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले. मग एका जुन्या चौकीदाराने त्या बिल्डिंगवरून एक मजूर काम करतांना पडून मेला होता ही मोलाची माहिती दिली. मग काय भुत तो कॉलेज मे वर्ल्ड फेमस हो गया... पसरत पसरत बातमी रेक्टरच्या कानापर्यंत गेली रेक्कर सर म्हणजे भुता बिताला न घाबरणारा मिल्ट्री रिटायर्ड माणूस ! आम्हाला म्हणे भूत बीत काही नसते याचा छडा लावायचाच. रात्री सर आमच्या फ्लॅटवर आले. ( बहुतेक स्टाफ पुण्याचाच असल्यामुळे ४-५ फ्लॅट रिकामे होते staff quarters चे . त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ते फ्लॅट मिळाले होते.) चला भुत बीत काय असते ते बघायला . मग सर , एक चौकीदार अन् आम्ही सात-आठ जण दबकत दबकत गच्चीवर जाऊ लागलो. सर जवळ एक टॉर्च आणि एक छोटी काठी होती. गच्चीजवळ गेल्यावर खरंच नाचण्याचा आवाज येत होता. वातावरण अगदी शांत ... आता नाही म्हटलं तरी सगळ्यांची थोडीतरी फाटली होती. सर सगळ्यात पुढे सरांनी हळूच गच्चीचा दरवाजा उघडला आणी समोर...
आमच्या समोरच्या फ्लॅटमधे रहाणारा कार्यकर्ता कानात हेडफोन घालून मस्त नाचत होता. ;-) नंतर त्याला यथ्थेच्च रागावून वगैरे झाल्यावर कॉलेजच्या भुताचा शेवट झाला...
21 Apr 2016 - 4:16 pm | एस
हसून हसून निर्वाण पावलो आहे. =))
21 Apr 2016 - 4:19 pm | सिरुसेरि
किरो यांच्या भुताच्या गोष्टी रोचक आहेत .
21 Apr 2016 - 4:32 pm | पिलीयन रायडर
डॉक्टरांचे कौतुक वाटले. त्यांचा तर्क योग्यच वाटत आहे.
रच्याकने.. रात्रीस खेळ चालेचं गाणं कुणी लिहीलं आहे? ते दाखवत नाहीत गीतकाराचे नाव. छान आहे.
21 Apr 2016 - 5:09 pm | हेमंत लाटकर
दादाजी कोंडदेव, समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत म्हणणार्यांना शिवरायांना मारायला आलेल्या अफजलखानाची प्रतापगडावरची समाधी कशी काय चालते.