हरिश्चंद्रगड - पूर्वार्ध : नळीची वाट

हकु's picture
हकु in भटकंती
13 Apr 2016 - 11:21 pm

हरिश्चंद्रगड. महाराष्ट्रातलं एक स्वर्गवत ठिकाण. अक्षरशः वेड लावणारं. हरिश्चंद्रगड केला नाही असा 'ट्रेकर' सापडणे अशक्य. एकदा गेलो की तिथे पुन्हा पुन्हा जावंसं वाटतंच. हल्ली तिथे गर्दी वाढली आहे असं कारण मनाशी धरून गेली साधारण तीन साडेतीन वर्षं मी काही हरिश्चंद्रगडावर गेलेलो नव्हतो, पण यावेळी मात्र कारण मिळालं होतं, ते म्हणजे 'नळीची वाट'. ते ही एकदा नाही तर चक्क दोनदा. मागे कधीतरी एकदा संध्याकाळच्या वेळी कोकण कड्यावर बसलो होतो, तेव्हा खांद्यावर लांबलचक दोराची गुंडाळी घेतलेला एक ट्रेकर दिसला. त्याच्या बाकी पेहरावावरून आणि चालण्या- बोलण्यावरून तो एक 'व्यवस्थित' ट्रेकर वाटत होता. नंतर कोणीतरी सांगितलं की तो नळीच्या वाटेने वर आलाय. नकळतच "आ" वासला गेला. "नळीची वाट! हा संध्याकाळच्या वेळी दिसतोय म्हणजे नक्कीच काहीतरी अवघड प्रकार असणार हा. सकाळी निघुन इथपर्यंत यायला संध्याकाळ होते म्हणजे! दोर-बीर घेऊन चाललाय, म्हणजे अर्थातच रॉक क्लाइंबिंग असणार! त्यातून हा रौद्रभीषण कोकण कड्याचा कातळ चढायचा म्हणजे काय सोपं काम आहे? आपल्याला कधी जमेल का हे?" असा मी त्या वेळी माझ्या मनाशीच भाबडा विचार करत बसलो. दोर लावून वगैरे चढणं, या प्रकारांमुळे स्वतः हून हा ट्रेक ठरवण्याचा पुढे कधी विचार केला नाही. अश्यात साधारण चार वर्षं गेली आणि आमच्या व आमच्या सरांच्या मनात नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड करण्याच्या कल्पनेने पुन्हा एकदा उचल खाल्ली. चौकशी अंती सरांनी बेलपाड्यातल्या 'कमा' चे नाव, नंबर वगैरे शोधून काढले आणि साधारण नोव्हेंबर चे शेवटचे शनिवार-रविवार या ट्रेक साठी ठरवले.

मी अर्थातच तत्काळ होकार दिला. इतरांचेही हळू हळू होकार आले. नळीच्या वाटेने जायचे म्हणून झाडून सगळे तयार झाले होते. पण इथे एकंदरीत ट्रेक चं स्वरूप बघता सरांनी फिटनेस ची कडक अट घातली होती. त्यामुळे २ गटांमध्ये हा ट्रेक करायचं ठरवलं. एक गट (केवळ मुलांचा) नळीच्या वाटेने येईल आणि दुसरा गट (उरलेल्या सर्वांचा) अगदी सोप्या मार्गाने म्हणजे पाचनई ने येईल असं ठरलं होतं. तरीही तनू आम्हा मुलांसोबत नळीच्या वाटेने आलीच. (अर्थातच आमच्या सरांच्या आशीर्वादाने). त्या आमच्या ट्रेक चे वर्णन राजेंद्र मेहेंदळेंनी नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड लेखात सविस्तर आणि छायाचित्रांसकट केलेले आहे. तो ट्रेक आमच्यासाठी तर उत्तम झालाच, पण पाचनई वरून येणाऱ्या मंडळींसाठी सुद्धा खूप छान झाला. आता वेळ आली होती या पाचनई वरून आलेल्या मंडळींसाठी नळीची वाट पुन्हा ठरवण्याची. कारण तसा शब्दच दिला होता. नळीच्या वाटेचा स्वतः जाऊन एकंदरीत अंदाज घेऊन, विशेषतः आमच्या कंपू मधल्या मुलींना कितीसा जमणारा आहे हे पाहणे आणि त्यानुसार त्यांना पुन्हा तिथे घेऊन जाणे असे ठरवलेले होते. त्याप्रमाणे दोन महिन्यानंतरचे सोयीस्कर दिवस निवडले आणि पुन्हा एकदा ट्रेक ठरला - हरिश्चंद्रगड: नळीची वाट.

नोव्हेंबर मध्ये नळीची वाट केलेल्यांपैकी सर, विनीत, पीके आणि मी असे चौघे जण या जानेवारी मधल्या नळीच्या वाटेला पुन्हा येणार होतो. ज्यांच्यासाठी हा ट्रेक ठरवला होता त्या किरण, मयुरा आणि नेहा या मुलींचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता. सरांचे कचेरीतले सहकारी गायकवाड साहेब, सरांचा अकरावीतला पुतण्या आदित्य, नेहाचा तिच्यासारखाच सडपातळ असलेला लहान भाऊ कैवल्य, दुबईरिटर्न तुषार आणि माझा मित्र नाना व कुणाल अशी इतर मंडळी होती. एकदा नळीची वाट करून झाल्याने व्यवस्थित अंदाज आला होता. त्यामुळे ह्या सर्वांना आरामात नेऊ शकू असा आत्मविश्वास वाटत होता. आधीच्या वेळी जसं वेळापत्रक होतं, तसंच या ही ट्रेक साठी ठरवलं. फक्त थोडासा बदल केला होता, तो म्हणजे परततानाच्या रस्त्यात. गेल्या वेळी आम्ही १७ जणांसाठीची छोटी बस आणली होती आणि ती पाचनई ला उभी केली होती. त्यामुळे उतरताना तिकडे उतरलो होतो. यावेळी कल्याणचे सर्व जण महामंडळाच्या येष्टीने मोरोशीपर्यंत येणार होतो, म्हणून परत कल्याणला जाताना ही तसेच येष्टीने जायचे होते. त्यामुळे जुन्नर दरवाज्याने खिरेश्वर ला उतरावे असे ठरले होते. पण आयत्या वेळी सरांनी कार्यक्रम बदलला. ते गायकवाड साहेबांच्या चार चाकी गाडीने येणार असल्याने त्यांनी कोकण दरवाज्या मार्गे- साधले (सादडे) घाटमार्गे परत बेलपाड्याला उतरण्याचे ठरवले आणि हा त्यांचा निर्णय ऐतिहासिक ठरला. कसा ते पुढे समजेलच.

२१ जानेवारीला ठरलेले सर्व जण कल्याण हून मोरोशीला बस ने ठरलेल्या वेळेत येउन पोहोचलो. मागच्या वेळी जेवलो तिथेच याही वेळी जेवणाची सोय झाली आणि जेवण याही वेळी चविष्ट होतं. यथावकाश चारचाकीने सर, गायकवाड साहेब आणि आदित्य येउन पोहोचले आणि जेवण वगैरे आटपून आम्ही साडे अकरा पर्यंत कमा- कमळू च्या घरी येउन पोहोचलो. मुलींसकट बऱ्याच जणांनी त्यांच्या अंगणातच झोपायची इच्छा व्यक्त केली आणि तारे बघत जमतील तसे सर्वांनी डोळे मिटले. साधारण सकाळी साडे पाचला उठलो तर असं कळलं की काही जणांच्या (बहुतकरून माझ्याच) घोरण्यामुळे मुलींना झोप लागली नाही, पण आता इलाज नव्हता. रात्र भरात इतरही काही मंडळी नळीच्या वाटेने जाण्यासाठी तिथे येउन पोहोचली होती. उठलो तेव्हा त्यांची आवरा-आवरी चालू होती. आम्ही तयारी करायला घेतली आणि चहा नाश्ता करून सव्वा सातला आमच्या तेरा जणांचा एक गृप फोटो काढून आम्ही कोकणकड्याच्या दिशेने निघालो. आमच्या पुढे काही मिनिट आधी एका गृप सोबत कमळू पुढे गेला होता. त्या गृप साठी तो पुढे दोर लावणार होताच, तोच आम्हालाही उपयोगी पडणार होता. दोन महिन्यांपूर्वीच या वाटेवरून गेल्यामुळे वाट बऱ्यापैकी लक्षात होती. त्यामुळे आम्ही आमच्यासोबत या वेळी कोणीही वाटाड्या घेतला नव्हता. नुकतंच थोडं थोडं उजाडू लागलं होतं. समोरचा भव्य दिव्य कोकण कडा आम्हाला त्याच्याकडे यायला खुणावत होता. आम्हीही उत्साहाने पुन्हा एकदा नळीची वाट पायाखाली घालायला उत्सुक होतो. कोकण कडा पश्चिम दिशेला आपले बाहू पसरून उभा आहे. त्याच्या बरोब्बर मागच्या बाजूला सूर्योदय होतो. त्यामुळे सूर्योदय झाला तरी प्रत्यक्षात कोकण कड्याच्या समोरच्या भागात सूर्य किरण पोहोचायला खूप उशीर लागतो आणि कड्याच्या भिंतीवर सूर्यकिरण पोहोचेपर्यंत अर्थातच मध्यान्हाची वेळ टळून गेलेली असते. त्यामुळे सकाळी आम्ही कड्याच्या दिशेने निघालो तेव्हा नुसतेच उजाडलेले होते, सूर्यकिरण काही पोहोचलेले नव्हते. गावापासून निघून थोडे डाव्या बाजूने पायवाटांनी चालत जाऊन मग पुढे आपल्याला खरी नळी लागते. या पायवाटांनी डावीकडे जाण्याच्या गडबडीत आम्ही रस्ता चुकलो. तो नसतो चुकलो तरच नवल! तिथे एका म्हातारबाबांची झोपडी लागली. म्हातारबाबा स्वतः आमच्या सोबत निघाले आणि २ मिनिटातच त्यांनी आम्हाला योग्य रस्त्याला लावून दिले. अंगात मळकट बंडी, कमरेला गुंडाळलेलं मांडीच्याही बरंच वर जाणारं धोतर, त्यातून खाली जमिनीपर्यंत पोहोचणारे, रापलेले आणि सुरकुत्या पडलेले पाय आणि डोक्याला भगवं मुंडासं अश्या अवतारातल्या पंच्यात्तरीच्याही पुढच्या म्हातारबाबांनी आमच्याकडे "गरिबाला काहीतरी द्या" अशी मागणी केली. आम्हीही त्यांच्या वार्धक्याला प्रमाण मानून लगेच खिशातून एक नोट काढून त्यांच्या हातावर टेकवली. बाबा समाधान पावले. आपल्या बोळक्यासहित तोंडभर हसले. मग मागून येणाऱ्या प्रत्येकाला ते समोरच दिसणारी वाट पुन्हा पुन्हा दाखवत होते. "सावकाश जा बाबांनो.." वगैरे सदिच्छाही मनापासून देत होते. आम्हीही त्यांना राम राम घालुन पुढे निघालो. काही पावलं पुढे गेलो आणि पायवाट संपून डाव्या बाजूला वळणारी मोठमोठाल्या दगडांची नळीची वाट 'भेटली'. दोन्ही बाजूला झाडी आणि मध्ये ही दगडा-दगडांची वाट. तशी चांगलीच रुंद. म्हणजे भर पावसाळ्यात इथे पाण्याचा जोर आणि प्रवाहाची खोली किती असेल याचा अंदाज येतो. गडावरचा आषाढातला पाऊस म्हणजे अगदी भीषण रूप धारण केलेला असाच असतो आणि तो अश्या वेगवेगळ्या ओढ्यांवाटे कोकण कडा उतरून खाली येत असतो. म्हणजे पावसाळ्यातलं इथलं दृश्य काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. आता ही वाट अशीच अगदी शेवटपर्यंत जाते. आता चुकायचा काही संभव नाही. (असं आम्हाला वाटलं होतं!) पण साधारण दीड दोन तास चालून झाल्यावर आमच्या विनीत ला शंका आली की आपण रस्ता चुकतोय की काय! पहिल्यांदा तर मी त्याची शंका फेटाळूनच लावली. पण पुन्हा थोडी पावलं चालून गेल्यावर त्याला पुन्हा शंका आली. मग मात्र सर्वांना होतो तिथेच थांबवलं. विनीत वाट पडताळून बघण्यासाठी तसाच पुढे गेला आणि शेवटी असलेले सर मागच्या मागे रस्ता शोधण्यासाठी गेले. मी ही त्यांच्या मागोमाग गेलो. नंतर खाली सरांना, आम्ही जिथून चढत होतो त्याच्याच डाव्या बाजूला तशीच एक वाट दिसली. ती पुढे जाऊन कोकण कड्याच्या उजव्या कुशीत, म्हणजे आमच्या डाव्या बाजूला वळत होती. तीच योग्य वाट होती. पुढे गेलेल्या विनीत ला त्याच्या पायाखालची वाट कोकण कड्याच्या सरळ पोटात जाताना दिसत होती. मग सर्वांना पुन्हा मागे वळायला सांगितले. मध्ये झाडांमधून एक बरी वाट सरांनी शोधून काढली आणि १० मिनिटात आम्ही योग्य वाटेला लागलो. एव्हाना आमच्यातल्या काही जणांच्या बॅगांमधल्या काही पेरुंचं वजन कमी झालं होतं.
nalichi vaat
आता उन्हाची तिरीप थोडी थोडी अंगावर येऊ लागली होती. एक एक पाऊल उचलत सर्व जण पुढे जात होते. मध्येच थोडी विश्रांती घेत पुन्हा उठून पुढे चालत होते. साधारण चार तास चाल झाली होती. कोकण कड्याचा माथा इंचा इंचाने जवळ येत होता. आता ही ऐसपैस वाट एकदम कड्याला येउन भिडली. चढ तीव्र झाला. पावलं ठेवायच्या जागा अरुंद झाल्या. आजूबाजूच्या जंगलाची, झाडांची जागा आता डोंगर कड्यांनी घेतली. त्यातल्या त्यात कमी उतार आणि सेफ वाट कोणती याचा अंदाज घेत घेत पुढे जायचं होतं. अशातच आमच्यापैकी काहींच्या पावलांच्या दिशेची गफलत झाली. खरी वाट डाव्या बाजूने होती आणि चालता चालता काही जण उजव्या दिशेने पुढे गेले. मग योग्य रस्ता लक्षात आल्यावर थोडं खाली उतरून पुन्हा डाव्या बाजूला वळून मुख्य वाटेच्या दिशेने ते सर्व जण येऊ लागले. तशातच किरण चा पाय एका ठिकाणी थोडासा घसरला आणि लचकला. पण फार काही जाणवू न देता ती पुन्हा पुढे चालू लागली.
nalichi vaat
बारा वाजत आले होते. सूर्य आता अगदी डोक्यावर आलाच होता. दोन बाजूंना दोन डोंगर कड्यांना ठेऊन पायांबरोबरच हातांचाही आधार घेत घेत पहिल्या रॉक पॅच च्या दिशेने आम्ही पुढे चढत होतो. शेवटी एक एक करून सर्व जण त्या पहिल्या रॉक पॅच च्या पुढ्यात येऊन पोहोचलो. आमच्या आधी निघालेल्या दोन गृप्स मधल्या मुला-मुलींची चढाई चालू होती. सर्व जण तो पॅच चढून जाई पर्यंत आम्हाला तिथेच थोडी सावली बघून बसायचं होतं. साधारण २० मिनिटं तर सहज लागणार होती. मग साहजिकच बऱ्याच जणांनी आपापल्या बॅगा रिकाम्या करायला आणि आपापली पोटं भरायला सुरुवात केली. अश्या ट्रेक्स मध्ये पाणी आणि अन्न यांना उत्तम पर्याय म्हणजे संत्री. आमच्या विनीत ने सुचवल्या प्रमाणे गेल्या वेळी नळीच्या वाटेने जाताना आम्ही याचा अनुभव घेतला होता. त्यामुळे या वेळी सोबत आणायच्या सामानाच्या यादीत ही सुद्धा एक वस्तू होती. मग एक एक करून सर्वांच्या बॅगांमधली संत्री बाहेर आली. थोडा सुका मेवा, चकली, बाकरवडी अश्याही वस्तू बाहेर पडल्या. आधीचा ट्राफिक क्लिअर होईपर्यंत भरपूर वेळ मिळाला. या मधल्या वेळेत सरांनी त्यांच्या मोबाईल वर त्यांची आवडती जुनी हिंदी गाणी लावली. लता, आशा, ओपी, रफी अश्या दिग्गजांची जादू आमच्यावर मोहिनी घालू लागली होती. अशातच एक गाणं लागलं रफी साहेबांचं 'मेरी महोब्बत जवां रहेगी, सदा रही ही सदा रहेगी'. मी हे गाणं पहिल्यांदाच ऐकत होतो. मला गाणं प्रचंड आवडलं. त्याची चाल, शंकर-जयकिशन चं संगीत, रफी साहेबांचा आवाज, सगळंच लाजवाब! पुढचं गाणं लागलं नितीन मुकेश आणि लता बाईंचं 'गापू ची गापू ची गम गम'. तेही पहिल्यांदाच ऐकत होतो. या गाण्याच्या शब्दांवर हसायला येत होतं. पण हेही गाणं जाम आवडलं. या दोन्ही गाण्यांनी माझ्या मनात (आणि थोड्या वेळाने इतरांच्याही) घर केलं होतं. एव्हाना आमचा रस्ता मोकळा झाला होता. पुढे गेलेल्या त्या मुलांसोबत एक वाटाड्या होता. आम्ही त्याला, त्याने लावलेला दोर आमच्यासाठी तिथेच ठेवायची विनंती केली. प्रथम विनीत दोराशिवाय चढून गेला आणि वर जाऊन बसला. मग त्याने दोर खाली सोडला. यावेळी शक्यतो प्रत्येकाला कंबरेला दोर बांधून वर चढवायचं ठरवलं होतं. मग पिकेला पुढे पाठवलं. नंतर नाना चढला. गायकवाड साहेब तयार होतेच. तेही चढून गेले. हे गायकवाड साहेब म्हणजे दणकट व्यक्तिमत्व. धष्टपुष्ट शरीरयष्टी. खणखणीत आवाज आणि ह्या सगळ्याला शोभेल असं गडगडाटी हास्य. त्यांचा स्टॅमिना ही तरुणांना लाजवेल असा. संपूर्ण ट्रेक भर ते कायम आमच्या पुढेच चालत होते. नाना जाईपर्यंत कोणी वर पोहोचला की आम्ही फक्त "सही रे! मस्त रे!" इतकंच म्हणून त्याला प्रोत्साहन द्यायचो. पण गायकवाड साहेब वर पोहोचल्यावर मी जोरात आवाज दिला, "थ्री चिअर्स फॉर गायकवाड काका. हिप हिप हुर्रे!" साहेब एकदम खुश! ही त्यांच्या आवडीची घोषणा. पुढे जो कोणी वर पोहोचेल त्याच्या नावाने ते स्वतःच जोरदार घोषणा द्यायचे, "थ्री चिअर्स फॉर अमुक अमुक. . . .!" बाकीचेही त्यांना साथ देत होते. विनीत वर बसल्या बसल्या खालून वर येणाऱ्यांचं शूटिंग (चलचित्रीकरण) करत बसला होता. एक एक करून सर्व जण वर चढून गेले. मुलीही व्यवस्थित चढल्या. मी आणि सरांनी मागे थांबून सर्वांच्या पाठीच्या बॅग्ज दोरीला बांधून वर पाठवल्या. मग सर पुढे गेले आणि सर्वात शेवटी मी गेलो. एकंदरीत वीस फुटांचा पॅच असेल. सुरुवातीला काही पावलं खडा चढ आहे, मग नव्वद अंशांचा कोन थोडा कमी होत जातो. पण पाय ठेवायला, हाताला पकड मिळवायला पुरेश्या खाचा-खोबणी आहेत. दोराशिवाय जाण्याजोगा चढ आहे. मी चढून गेल्यावर माझ्या नावानेही "थ्री चिअर्स" म्हणून गडगडाट झाला. विनीत, पिके खुदुखुदु हसले आणि आम्ही पुढे निघालो. या दोघांचा या ट्रेक मध्ये एक आवडता उद्योग होता. ते भरभर चढून पुढे जायचे आणि आमच्या न आलेल्या मित्रांची नक्कल करत बसायचे आणि त्यांना दाखवायला त्याचा व्हिडीओ सुद्धा काढायचे. आता माझाही आवडता उद्योग सुरु झाला होता. मघासचं 'मेरी महोब्बत जवां रहेगी...... ' हे गाणं माझ्या चांगलंच मनात बसलं होतं. आता या गाण्याची रेकॉर्ड माझ्या तोंडून मोठमोठ्याने सुरु झाली होती. माझ्या मित्र-मैत्रिणींनाही कळून चुकलं होतं की आता दिवसभर आपल्याला हेच गाणं ऐकावं लागणार. पण आता नाईलाज होता. त्यांचाही आणि माझाही!

गाणं म्हणता म्हणताच दुसऱ्या रॉक पॅच पाशी येउन पोहोचलो. आपल्या दोन बाजूंना असलेले दोन्ही डोंगरकडे या ठिकाणी एकत्र येतात. इथून पुढे सरळ जायची वाट संपते, आपण समोर एका उंच भिंतीपाशी येउन पोहोचतो आणि आपल्याला उजव्या बाजूच्या कड्यावर चढून एक वळसा घालून मग पुढे वर चढून जायचे असते. हीच ती जागा जिथे खालपासून वरपर्यंत येणारी दोन डोंगरांच्या मधली ‘नळी’ संपते. आता उजव्या बाजूच्या कड्यावर साधारण दहा-बारा फूट चढून जायचं होतं. अंतर फार नाही, पण इथे हात पाय रोवायला पुरेशी जागा नाहीये. याच्या खाली असलेली तीव्र उताराची नळी त्यात थोडी भीती घालत असते. जिथून आपल्याला हा रॉक पॅच चढायचा असतो, तिथेही सरळ उभं राहता येत नाही. शिवाय पायाखालची मातीही भुसभुशीत. त्यामुळे इथे दोरीशिवाय जाणं म्हणजे मोठंच धाडस होईल. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा इथेही थोडा ट्राफिक जाम होताच. पण इथे एका ऐवजी दोन दोर लावले होते. त्यामुळे कमी वेळेत भरभर बरेच जण चढून वर गेले. आम्हाला काही फार काळ वाट पाहत थांबावं लागलं नाही. आमच्यासाठी खालच्या पॅच ला सोडलेला दोर आम्ही वर घेऊन आलो होतो. कमळू इथेच थांबला होता. त्याला तो दोर दिला. त्याने तो ही दोर बांधला. एक दोर हाताला धरण्यासाठी आणि दुसरा कंबरेला बांधण्यासाठी. या वेळी इथे दोराला गाठी मारल्या होत्या. त्यामुळे दोर पकडणं सोयीचं जात होतं. आमच्यातला एक एक जण चढून वर जाऊ लागला. मुली लांब बसून भेदरलेल्या नजरेने बघत होत्या. नानाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसत होते. बाकी कोणालाही काही विशेष त्रास झाला नाही, पण नानाचा पहिला प्रयत्न फसला. पहिलं पाऊल ठेऊन हातांची ग्रीप घेऊन दुसरं पाऊल वर टाकायलाच त्याला जमेना. मग तो थोडा थांबला. मनातली भीती मोठ्या प्रयासाने त्याने दाबून धरली. मग किरण ला वर जाण्यासाठी बोलवलं. मयुरा आणि नेहा या दोघीही अंगाने शिडशिडीत आणि वजनाने हलक्या होत्या, पण किरण चं तसं नव्हतं. तीही मनातून घाबरलेली होतीच. 'हा टप्पा पूर्ण केला म्हणजे नळीची वाट संपली. मग गडावर पोहोचलातच असं समजा!' असं मी या सर्वांना सांगून ठेवलं होतं. त्यामुळे हाच टप्पा सर्वात जास्त महत्वाचा होता. किरणच्याच सांगण्यावरून मी तिच्या कंबरेला दोर थोडा ढिला बांधला. तिने चढायला सुरुवात केली. जिथे पायाला ग्रीप मिळत नव्हती तिथे मी हात ठेऊन ग्रीप देण्याचा प्रयत्न करत होतो. सांगितल्याप्रमाणे एक एक पाऊल टाकत किरण वर चढत होती. वरून कमळू तिच्या कंबरेला बांधलेला दोर धरून खेचत होता. हळू हळू एक एक पाऊल रोवत, हातातला दोर खेचत किरण वर जाऊन पोहोचली. आनंदाने टाळ्या, आरडा-ओरडा झाला. नळीची वाट करण्याचं किरण चं स्वप्न पूर्ण झालं होतं. पुन्हा नाना ला बोलावलं. कंबरेला दोर बांधला आणि वर चढवलं. या वेळी मात्र नाना धीराने चढला आणि सुखरूप वर जाऊन पोहोचला. आता खाली राहिलो होतो नेहा, मयुरा, विनीत आणि मी. आता मयुराला बोलवलं. तिच्या मनातही प्रचंड धाकधूक होती. कंबरेला दोर बांधत असताना मला म्हणाली, "खूप भीती वाटतेय!!"
मी म्हंटलं, "बिलकुल घाबरू नकोस. दोरीचा मल्लखांब येतो ना?"
मयुरा "हो." म्हणाली.
मग म्हंटलं, "इथे काही वेगळं नाहीये. तसंच जायचंय दोरीवरून वरती. हवं तर पायाच्या अंगठ्यात दोरी पकडत पकडत जा!"
मयुरा माझ्याकडे डोळे विस्फारून बघतच राहिली.
मी हसत हसत म्हंटलं, "बूट-मोजे इथे काढ आणि जा अनवाणी."
मयुरा म्हणाली, "तू खरंच सांगतोयेस?"
बाजूलाच बसलेला विनीत म्हणाला, "अगं अश्या मोमेंट ला हा मस्करी नाही करणार."
अजूनही मी काय म्हणतोय ते तिला काही झेपत नव्हतं. मी तिला बूट-मोजे काढायला लावले. अनवाणी पायांनी चढायला मयुरा तयार झाली. पहिलं पाऊल भिंतीच्या एका कपचीत रोवून आणि हाताने दोराची घट्ट पकड करत तिने स्वतः ला वर उचललं. तेव्हड्यात दोरीचा थोडासा झोल बसला आणि ती गोल फिरून उजव्या बाजूला कड्यावर आपटली. पण लगेच तिने स्वतःला सावरलं आणि दोरी खेचत अक्षरशः पुढच्या काही सेकांदांत ती सर-सर चढून वर पोहोचली. माझी मल्लखांबाची आयडिया कामी आली होती. वर पोहोचल्यावर तिला आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं. अर्थातच जल्लोष झाला. आता फक्त शेवटची एक महत्वाची कामगिरी बाकी होती ती म्हणजे नेहा ला वर पोहोचवायची. खरं तर नेहा ही मयुरा इतकीच शिडशिडीत अंगकाठीची आणि तेवढीच काटक. पण तरीही तिच्या तब्येतीची थोडी काळजी असतेच. आता मयुराचं बघून तिनेही बूट मोजे काढून ठेवले होते. तिलाही दोर बांधला आणि "कमॉन नेहा! शाब्बास! शाब्बास!!. . . . " असं म्हणता म्हणता तीही सरसर सरसर वर जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा मोठ्याने जल्लोष झाला. ट्रेक चा सर्वात महत्वाचा टप्पा यशस्वी रित्या पार झाला होता. मुलींच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. आता खाली उरलेल्या आम्ही दोघांनी सर्वांच्या बॅग्ज एक-एक करून वर पाठवायला सुरुवात केली. मग विनीत चढला. त्यालाही त्याची इच्छा नसताना पोटाला दोर बांधून वर पाठवलं आणि सरते शेवटी मी ही स्वतः पोटाला दोर बांधून वर येउन पोहोचलो. माझ्याकरता ठेवलेलं शेवटचं लिंबू सरबत समाधानाने प्यायलो. जल्लोष तर काही कमी होत नव्हताच. कोकण कडा अजून खूप दूर होता पण आता ती निव्वळ औपचारिकता राहिली होती. आत्मविश्वासाची पातळी प्रचंड वाढली होती. "आपण प्रत्यक्ष नळीची वाट करून आलो. आता काही कठीण नाही." अशी भावना जागृत झाली होती. नळीची वाट प्रथमच करणाऱ्यांची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली होती. सर्वांचा आनंद अवघ्या कोकण कड्यात मावत नव्हता!

तिथेच नळीची वाट पाठीमागे ठेऊन काही 'सेल्फी' काढले आणि कड्याला वळसा घालून पुढे जायला निघालो. नळीच्या वाटेच्या शेवटी उजवीकडे जो डोंगरकडा होता, त्यावर आता आम्ही चढून जात होतो. दुर्गमता बरीचशी संपली होती, पण चढ अजूनही तीव्र होता. इतर किल्ल्यांवर जसं आपण जंगलातून चढत जातो तशीच ही वाट होती. अधून मधून चार पायांचा वापर करावा लागत होता, पण आता काही त्याचं विशेष वाटत नव्हतं. 'मेरी महोब्बत जवां रहेगी...... ' म्हणत म्हणत आणि इतरांना बळजबरीने ऐकवत ऐकवत हा एवढा भाग ही आरामात पार केला. थोडं चढून गेल्यावर एका मोकळ्या पठारावर येऊन पोहोचलो. मागे वळून बघितलं तर नळीच्या वाटेचा काही भाग दिसत होता. पुढे सरळ समोर झाडांमध्ये घुसणारी एक वाट दिसत होती. तिथून पुढे साधारण २० मिनिटं चढून गेल्यावर कोकण कड्यावरच्या पठारावर पोहोचणार होतो. इथे या वाटेच्या तोंडाशी आराम करायला बसलो. आज जेवण म्हणावं असं काही झालं नव्हतं, पण पोट अगदीच रिकामं ही नव्हतं. दुसरा रॉक पॅच चढून गेलो तेव्हा साधारण दुपारचे दोन वाजत आले होते. इथे या पठारावर आराम करायला बसलो तेव्हा तीन वाजून गेले होते. कोकण कड्यावर पोहोचे पर्यंत चार आणि तिथून तुकारामच्या झोपडीपर्यंत पोहोचेपर्यंत कमीत कमी साडेचार तरी वाजले असते. म्हणजे जेवण वगैरे करून पुन्हा सूर्यास्त पहायचं म्हंटलं असतं तर ते या सर्व मंडळींचा विचार करता शक्य नव्हतं. मागच्या ट्रेकला मी, नेहा आणि किरण चा सूर्यास्त थोडक्यात बघायचा हुकला होता. त्यामुळे आज कोकण कड्यावरून सूर्यास्त बघायचाच असं सर्वांनी ठरवलं. म्हणजे सूर्यास्त बघून मगच तुकारामच्या झोपडीकडे म्हणजेच हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे जायचं असं ठरवलं. आता आमच्याकडे बराच वेळ होता. घाई काहीही नव्हती. तिथेच त्या वाटेच्या तोंडापाशी पुन्हा काही जणांच्या बॅगांमधले खाद्यपदार्थ बाहेर आले. गप्पा गोष्टी करत करत तेही खाऊन झाले. तेव्हाच 'तुषार' हा आमच्यातला सर्वात सुखी प्राणी आहे हे तिथे कळलं. बूड जमिनीवर आणि पाठ बॅगांना टेकवतो न टेकवतो, तोच हा पठ्ठ्ठ्या डोळे मिटून घोरायला लागला होता. खाऊन झाल्यावर थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा तोंडाची गाण्याची रेकॉर्ड चालू करत (आणि त्याबद्दल इतरांच्या शिव्या खात) उठलो व पुढे जाऊ लागलो. खरं तर चालायचा आता कंटाळा आला होता. वेळ ही बऱ्यापैकी हातात होता. त्यामुळे वेग चांगलाच मंदावला होता. आमचा 'ड्यूड' विनीत चं फावल्या वेळात फोटोसेशन चालू होतं. शेवटी कोकण कड्याच्या उजव्या बाजूच्या पठारावर पोहोचलो. बेलपाड्यापासून तब्बल दहा तासांनी आम्ही कोकण कड्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो.
kokan kADA
केवळ पन्नास दिवसांतच दुसऱ्यांदा याच नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडावर यायचा योग आला होता. पुन्हा एकदा ही वाट यशस्वीपणे पालथी घातल्याचं खूप समाधान वाटत होतं. कोकण कड्याच्या काठावर बसून तो भराट वारा अंगावर झेलताना आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याची शोभा बघताना आजच्या परिश्रमाचं सार्थक झाल्याचं जाणवत होतं. मन आणि शरीर आता पूर्णपणे निवांत झालं होतं. आमच्यातले सर्व जण नि:शब्द झाले होते. त्या दिवशी तिथे कुठल्याश्या संस्थेचा 'कोकण कडा ह्वॅली क्रॉसिंग' चा कार्यक्रम चालू होता. त्या संस्थेचे कार्यकर्ते आणि ह्वॅली क्रॉसिंग चा अनुभव घेण्यासाठी आलेले पर्यटक/ ट्रेकर्स यांची तिथे गर्दी होती. त्यातल्या त्यात मोकळी जागा बघून आम्ही सर्व ओळीने शांत बसलो होतो. काहींनी डोळे मिटले होते. (त्यातल्या काहींचा डोळाही लागला होता.) आम्हाला कोकण कड्यातून दूरवर खाली नळीची वाट दिसत होती. दिवसभर प्रवास करून आम्ही तिथून इथे वर पर्यंत आलो होतो आणि सुर्य नारायण त्यांचा रोजचा प्रवास संपवून अस्ताला चालले होते. त्यांच्यासाठी आजचा दिवस रोजच्याप्रमाणेच सामान्य असावा, पण आमच्यासाठी मात्र विशेष होता. साक्षात कोकण कड्यावरून समोर अस्ताला जाणाऱ्या सूर्याची शोभा आम्ही बघत होतो आणि या दृश्यासाठी नळीच्या वाटेने येण्याचा आटापिटा आम्ही केला होता, याचं आम्हालाच आमचं कौतुक वाटत होतं.
kokan kada
सूर्यास्ताची वेळ झाली होती. हळू हळू ढगांच्या आड बारीक बारीक होत सूर्य दिसेनासा झाला. थोड्या फार प्रमाणात कॅमेरात आणि बरंचसं डोळ्यात हे दृश्य साठवून घेतलं. अजूनही मौनावस्थेतून बाहेर यायची फारशी कोणाची तयारी नव्हती. त्या जागेवरून उठून जावंसं वाटत नव्हतं. पण सूर्यनारायणाप्रमाणे आम्हालाही मार्गस्थ होणं भाग होतं. सावकाश तिथून उठलो, आपापल्या बॅगा पाठीवर घेतल्या, विजेऱ्या हातात काढून ठेवल्या आणि मागे वळून हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाकडे जायला निघालो.

पर्यटकांची, तंबूंची, दुकानांची दाटी बघत बघत चालत होतो तेवढ्यात उजव्या हाताला झाडांच्या फांद्यांमागे वर काहीतरी तेज दिसल्याचा भास झाला. मान त्या दिशेला वळवतोय तोपर्यंत एक पाऊल पुढे आलं होतं आणि मघासच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्यापेक्षाही तेजस्वी असा गरगरीत थाळीसारखा चांदोबा आमच्याकडे हसत पाहत होता. सूर्यास्ताच्या वेळी नकळत मनाला आलेली एक प्रकारची मरगळ अगदी क्षणार्धात नाहीशी झाली. आता आजची पूर्ण रात्र हा "चौधवी का चांद" आमची सोबत करणार होता. व्वा! अगदी मूडच बनला. आज खरंच आयुष्यात पहिल्यांदाच कळलं की ह्या चंद्राने पुथ्वीवरच्या सर्वांना इतकं वेड का लावलं ते. हे सौंदर्य बघून सगळे अगदी हरखून गेले होते. मी लगेच माझ्या हातातली विजेरी खिशात टाकली आणि पुन्हा तोंडाच्या टेपरोकॉर्ड वरचं थांबलेलं "मेरी महोब्बत. . . . . " चालू करत समोरच्या वाटेने चालू लागलो.

गप्पा गोष्टी करत, हसत - खिदळत हरिश्चंद्रेश्वराच्या देवळासमोर येऊन पोहोचलो. तुकारामने झक्कास पैकी चहा देत आमचं स्वागत केलं. चहाबरोबरच थोड्या वेळाने पापड ही आले. अर्ध्या मिनिटाच्या आत फस्त झाले. थोड्या वेळाने मागच्या ट्रेक मध्ये ठरवल्याप्रमाणे आमच्या सरांनी तुकाराम साठी भेट आणलेला मोटो- ई त्याच्या हातात दिला. लगेच स्वारी खुश झाली. मग जेवणापर्यंतचा बराचसा वेळ त्याला 'तो मोबाईल कसा वापरायचा' हे समजावण्यात गेला. नेहमीप्रमाणे जेवण याही वेळी रुचकर होतं. यावेळी तुकाराम ने तंबूंमध्ये आमची झोपायची व्यवस्था केली होती. जेवण झाल्यावर आम्ही काही मित्र-मैत्रिणी चांदण्यात कोकण कड्यावर फिरायला गेलो. तुकाराम ला अर्थातच याची कल्पना देऊन (आणि त्याची परवानगी घेऊन) मगच निघालो होतो. कोकण कडा, भरभरून वाहणारा गार गार वारा आणि आकाशातला चतुर्दशीचा चंद्र! कोम्बिनेशनच काहीतरी अजब होतं. कड्यावर मनसोक्त वेळ घालवला आणि फार उशीर न करता पुन्हा तंबूपाशी आलो.
सर्वांची व्यवस्था बघून शेवटी माझ्या तंबूत शिरलो. पडल्या पडल्या झोप लागणार याची खात्री होती. फार काही विचार मनात येत नव्हते, मात्र समाधान नक्कीच वाटत होतं. हा ट्रेक आता जवळ जवळ पूर्ण झाल्यातच जमा होता. मुख्य उद्दिष्ट म्हणजे 'नळीची वाट', हे साध्य झालं होतं. आता काही फार विशेष बाकी राहिलं नव्हतं. आता उद्या उठायचं आणि गड उतरून घरी जायचं. बस्स! एवढंच!! पण खरंच हे त्या क्षणी तंबूत आडवं होताना वाटत होतं तितकं सोपं होतं? खरंच हे 'एवढंच' म्हणण्या इतपत होतं? उद्या आमच्या पुढ्यात काय वाढलं जाणार होतं? अज्ञानात सुख असतं म्हणतात आणि त्या सुखातच मला अगदी गाढ झोप लागली होती.

क्रमश:-

प्रतिक्रिया

कंजूस's picture

14 Apr 2016 - 4:56 am | कंजूस

जळजळ वाढतेय.

वेल्लाभट's picture

14 Apr 2016 - 11:31 am | वेल्लाभट

अनेक महिने ट्रेक या गोष्टीपासून वंचित असलेला
वेल्लाभट

sagarpdy's picture

14 Apr 2016 - 1:50 pm | sagarpdy

मस्त वर्णन.
हरिश्चंद्रगड आणि नळीची वाट म्हणजे ट्रेकर्स साठी दुग्धशर्करायोग

विजय पुरोहित's picture

15 Apr 2016 - 9:04 pm | विजय पुरोहित

सुंदर लेखन हकु...
इथल्या भांडखोर काकूपेक्षा असले लेखन 1,00,000 टक्के चांगले...

फारच छान वृत्तांत. पुढील भागाची उत्कंठा लागून राहिली आहे.

अजया's picture

16 Apr 2016 - 10:35 pm | अजया

पुभाप्र

संजय पाटिल's picture

17 Apr 2016 - 6:33 pm | संजय पाटिल

पुभाप्र !!!

रेश्मा इन्गोले's picture

18 Apr 2016 - 1:07 am | रेश्मा इन्गोले

अप्रतिम

रेश्मा इन्गोले's picture

18 Apr 2016 - 1:08 am | रेश्मा इन्गोले

अप्रतिम

जगप्रवासी's picture

18 Apr 2016 - 4:41 pm | जगप्रवासी

केवळ पन्नास दिवसांतच दुसऱ्यांदा याच नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडावर यायचा योग आला होता.>>>> खूपच नशीबवान आहात, पुढचा भाग लवकर टाका. छान लेख

अनिरुद्ध.वैद्य's picture

18 Apr 2016 - 4:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

लेख उत्तम अन फोटो झकास!
परत सांगतो हेवा वाटला दोन दोन दा जाउन आलात!

पण ... पर्यटकांची, तंबूंची, दुकानांची दाटी ?? ह्याचाही सिंहगड झाला की काय? :(

(बाकी पुढल्या वेळी आम्हालाही कळवाल :) )

खरंच तंबूंची, दुकानांची संख्या भरपूर वाढली आहे. प्रत्यक्ष कोकण कड्यावरच चहा, सरबत, जेवण पुरवणारी दोन तीन दुकानं (हॉटेल्स) आहेत. त्याच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत तंबू थाटून बरेच जण मुक्कामाला होते. या दोन पैकी प्रथम जेव्हा कोकण कड्यावर गेलो तेव्हा सूर्यास्ताच्या वेळी खरंच माथेरान, महाबळेश्वर च्या सनसेट पोइन्ट ची आठवण आली.

गामा पैलवान's picture

18 Apr 2016 - 5:47 pm | गामा पैलवान

हकु,

वर्णन मस्त जमलंय. एक शंका आहे. कोकणकड्यावर क्रॉस करायला व्हॅली नाही. बहुतेक कड्यावरून खाली लटकून उतरायचा आणि पुढे रॅपालिंग करून पूर्ण कडा खाली उतरून जायचा बेत असावा.

आ.न.,
-गा.पै.

गा. पै. साहेब,
इथे ह्वॅली क्रॉसिंग च त्यांनी आयोजित केले होते. वर्तुळाकार कोकण कड्यावरचे दोन बिंदू पकडून त्यांच्यामध्ये दोर बांधला होता. उदाहरणार्थ, इंग्रजी C अक्षराची दोन टोके सरळ रेषेत एकमेकांना जोडणे. म्हणजे प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या डोंगरांच्या मधली दरी पार करणे असा प्रकार नव्हताच.

गामा पैलवान's picture

20 Apr 2016 - 5:59 pm | गामा पैलवान

हकु,

हे असं चालतं होय! आमच्या वेळेस फक्त कडा उतरून जायचे लोकं. मीही एकदा गेलोय. त्याला काही दशके होऊन गेली. माहितीबद्दल धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

प्रतिसाद व शुभेच्छांसाठी सर्वांचे खूप खूप आभार! _/\_

dhananjay.khadilkar's picture

21 Apr 2016 - 12:00 pm | dhananjay.khadilkar

फारच छान वृत्तांत. माहितीबद्दल धन्यवाद