माटुंग्याचे वामनकाका

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
17 Sep 2008 - 9:29 pm

ते आमच्या वडीलांचे काका, आम्ही त्याना,
"माटुंग्याचे आजोबा" म्हणायचो.
नावाप्रमाणे वामनकाका उंचीने "वामनमुर्ती"च होते.शिक्षण एव्हडं तेव्हडंच त्यामुळे उपजीवीकेचं सोपं साधन म्हणजे "आचारी" होणं.संध्याकाळी पाच वाजल्यावर खांद्यावर सफेत झोळी जिच्यात किलो दोन किलोच्या दोन चार भाज्या, कोथिंबीर, मिरची, नारळ, वगैरे मसाला पुरेल एव्हड्या आकाराची असायची.सुरवातीला होता तो तिचा सफेद रंग आता सुरण,अळू,आणि असल्याच काही भाज्यांमुळे त्या झोळीचं सफेदपण जाऊन रंगी बेरंगीपणा आला होता.

पायात चांबड्याची पट्या पट्याची चप्पल डोक्यावर "गांधी "टोपी,डोळ्यावर गांधी टाइप गोलाकृती आणि कानावर काड्या ओडून बसवतात तसा काळा चष्मा, अंगात एक सफेद झब्बा आणि कमरेखाली पंचे वजा,म्हटल्यास सफेद धोतर असा पेहराव करून पाय घासत घासत जीआयपी माटुंगाच्या स्टेशनावरच्या बाहेरच्या रस्त्यावर रोज भरणाऱ्या बाजारात खरेदीसाठी जात.संध्याकाळच्या जेवण्याची ही तयारी त्यांच्या छोट्याश्या खाणावळीसाठी व्हायची.

बाजाराजवळच पुर्वीच्या पण मजबूत असलेल्या बिल्डिंगमधे तळावरच आमनेसामने दोन खोल्या घेवून ते रहात असत. समोरच्या खोली त्यांची, त्यांच्या पत्नीची आणि एकुलत्या एक मुलीची उठण्या बसण्या आणि रहाण्यासाठी वापरीत असत आणि त्याच्या समोरच्या खोलीत मधे पार्टीशन घालून बाहेरच्या भागात पाच सहा टेबलं खुर्च्या मावतील आणि आतल्या बाजूस जेवणकरण्याचे स्वयंपाक घर.चपात्या करायला एक वयस्कर माणूस होता ह्याच्या गैहजेरीत त्यांची पत्नी चपात्या करायला मदत करायची.

"वामानकाकी" आम्ही तीला माटुंग्याची आजी म्हणायचो तशी अंगा खांद्याने मजबूत काकांपेक्षा दीड फूटाने उंच होती.तिचा अवाज करारी होता एखाद्याला हांक मारली तर सर्व मजल्यावर ऐकायला येईल असा भारदस्त होता.चापचापून नेसलेले नऊवारी रंगीत पातळ ते सुद्धा जेमतेम पोटऱ्या झाकतील एव्हडे खाली आलेलं अंगात सफेद स्वच्छ ब्लाऊझ गळ्यात घसघशीत सोन्याचं मंगळसुत्र असायचं.नाकात एक चमकी,केस पांढरे सफेद झालेले आणि कपाळावर मोट्ठं कुंकू असायचं.

संध्याकाळ झाली की काळोख पडल्यावर जेवायला गिऱ्हाईकांची वर्दळ सुरू व्हायची.
जेवणारे सर्व कायम स्वरुपाचे असायचे.जवळच्या खालसा कॉलेजचे प्रोफेसर,काही काटकसरी विद्यार्थी,आणि तोंड ओळखीने आलेले पंधरा वीस जेवायला येणारे लोक जागा असेल तर खुर्ची टेबलावर बसायचे, नसेल तर काही बाहेर ठेवलेल्या कळकट
अर्धवट मोडलेल्या बाकावर वाट बघत व्हरांड्यात बसायचे आणि विषेश ओळख असलेला एखाददुसरा त्यांच्यारहात्या खोलीत एखाद्या खुर्ची वर बसायचा.

जेवण्याच्या ताटात,उजव्या बाजुला चिमटीत सापडेल एव्हडी खोबऱ्याची मिरची बरोबर वाटलेली चटणी, त्याच्या पुढे चिमटी भर मीठ,गरम गरम चतकोर आकाराच्यादोन तुप फासलेल्या चपात्या, वाटीभर गरम भात शिवाय एका वाटीत डाळीची आमटी आणि बाजूला कसली तरी भाजी असा थाट असायचा.नंतरच्या फेरीत आजोबा हात आवरून पण आग्रहकरून आणखी काही लागलं तर आनंदाने वाढायचे.

दुसऱ्या दिवशी सकाळी वामनकाका लांब लचक वही वजा पुस्तकात खाणावळीतल्या मेंबरांच्या नावासमोर काल रात्री आलेले आणि न आलेले ध्यान्यात ठेवून हजेरी गैरहजेरीची नोंद करायचे.दोन्ही खोल्यात जरी काळोख असला तरी पुर्वेकडच्या खोलीच्या खिडकी समोरून येणाऱ्या प्रकाशाचा फायदा घेऊन ते लिहीत बसायचे. कित्येक वर्ष चालेली ही त्यांची खानावळ त्यांच्या जाण्या नंतर बंद झाली.
लगेचच काकी पण कालवश झाली आणि त्यांच्या मुलीचे तत्पुर्वी लग्न झालं आणि जांवयाने दोन्ही खोल्या नीट सजवून खानावळ बंद करून रहाती जागा केली.

कधी मधी मी त्या बाजुला गेल्यावर त्यांच्या घरी भेट देतो.आणि मग
"माटुंगयाच्या अजोबांच्या "
जुन्या आठवणी येवून मन सुखावतं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 Sep 2008 - 1:32 am | प्राजु

या आठवणी आवडल्या. माटुंग्याचे आजोबाही डोळ्यासमोर उभे राहिले..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Sep 2008 - 3:48 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धनंजय's picture

18 Sep 2008 - 8:21 am | धनंजय

पिशवीच्या रंगाचा तपशील खासच!

दोन किलो भाजीत इतके सगळे लोक जेवायचे, म्हणजे भाजीत रस भरपूर अशी आमच्या कोकणाकडची पाककृती असणार. (शतके ठोकणार्‍या फलंदाजाच्या एकेका सुरेख खेळीकडे दुर्लक्ष होते खरे. पण दुर्लक्ष झाले, तरी ही खेळी सफाईदार आहे, हे निश्चित.)

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Sep 2008 - 10:05 pm | श्रीकृष्ण सामंत

धनंजयजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"किलो दोन किलोच्या दोन चार भाज्या,"असं मी म्हटलंय.
"दोनच किलोची भाजी " असं म्हटलं नाही.

दोन चार भाज्या प्रत्येकी किलो दोन किलोच्या असं मल म्हणायचं होतं.
किलो दोन किलोच्या कुणी दोन चार भाज्या घेत नाहीत.असं मला वाटतं.
कोकणच्या पाककृतीत "स्टॅंन्डींग भाजी आणि रनिंग आमटी" नसते. बर्‍याचश्या भाज्या पातळ असतातच आणि आमटी जरूर जाड नारळाच्या रसाची असते.
माटुंग्याचे आजोबा कोकणातले असल्याने त्यांना हे जेवण माहित होतं.
आता शतक काढताना कुणीतरी एल.बी.डब्ल्युचे अपील करणारच.ते अपेक्षीत असतं.
त्यामुळे पुढची खेळी काळजी घेऊन केली जाते.अपील करणार्‍याचे आभार मानले पाहिजेत.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com