संक्रांतीचे दिवस..रविवारचे दुपारचे जेवण झाल्यावर मस्त झोपण्याचा विचार सुरु असताना बायकोने आपल्याला जेवणानंतर तुळशीबागेत जायचे असल्याची घोषणा केली. उणेकरांसाठी (जगातुन पुणेकर वजा केल्यानंतर जे उरतात त्यांना मी उणेकर म्हणतो ) तुळशीबाग म्हणजे काय प्रकार आहे हे प्रथम सांगतो..तुळशीबाग हि काही फुलांची बाग नाही. तुळशीची रोपे सुद्धा येथे मिळत नाहीत... खरेदीविक्री या विषयात डबल ग्र्याजुएट महिलां तर डॉक्टरेट झालेल्या व्यावसायिक यांच्यामध्ये वस्तूच्या खरेदी विक्री साठी घासाघीस करण्याचे ठिकाण म्हणजे पुण्यातले तुळशीबाग.
बायकोच्या आग्रहाखातर मी ह्या ऐतिहासिक बागेत जाण्यासाठी तयार झालो..म्हटलं तर माझ्याजवळ दुसरा कुठला पर्यायच नव्हता. कारण हि एकटी गाडी चालवते तेव्हा मला खूप काळजी वाटते................रस्त्यावरून चालणा-या लोकांची. भर उन्हात एक तासाचा प्रवास करत आम्ही बागेत पोहचलो. गाडी पार्किंग साठी जागा नाही हे कारण पुढे करत मी बायकोला इथेच रस्त्यावर थांबतो असे सांगितले. एका छोट्या दुकानाच्या सावलीत मी वाट पहात उभा होतो....तेवढ्यात एका फुलाच्या विक्रेत्याने मला इथे दुकान मांडायचे असल्याचे कारण देत माझ्या डोक्यावरची सावली काढून घेतली. मी आता भर उन्हात गाडीवर बसून बायकोची वाट पाहू लागलो.
दोन तासानंतर बायको हात हलवत येताना दिसली... मी हि काहीसा त्रागा दाखवत पहिला प्रश्न केला... पिशवी कुठे आहे? कारण नेहेमी चार-चार पिशव्या भरून खरेदी करणारी माझी बायको रिकाम्या हाताने परतली याचा धक्का मला बसला होता. बायकोने सुरवात केली..चला गाडी सुरु करा... मी म्हटलं, काय झाले ते तर सांगशील...काही नाही हो...आपल्या घराजवळच्या मॉल मध्ये यापेक्षा कमी किमतीत सारी खरेदी होईल ..आधीच उन्हाने तापलेल्या डोक्याच्या झळा आता मेंदूला जाणवत होत्या......म्हणजे तुझा हा फक्त अभ्यासदौरा होता तर..घरीच सांगितले असते तर आजच्या दिवस भगवान भरोसे तुला एकटीलाच पाठविले असते. घरी तरी तुम्ही कुठला मोठा तीर मारला असता ..बायकोने माझ्या पेटलेल्या मेंदूवर तेल ओतले..मी सुद्धा मग येथे भर उन्हात केलेला प्रवास, वाया गेलेला वेळ ( किमती वेळ म्हणणार नाही कारण ह्या जगात माझ्या वेळेला काय भाव मिळतो ह्याची मला पूर्ण कल्पना आली आहे ) आणि वर कुठलीही खरेदी न करता रिकाम्या हाताने परत जायचं याचा चढत्या आवाजात पाढा वाचत हि संक्रांत आपल्यावरच का असा प्रश्न करत त्रागा करू लागलो. बायको यावर ..अगदीच काही चक्कर वाया गेली नाही असं सांगत ... पर्समधून खरेदी केलेली चहाची गाळणी काढत, ब-याच दिवसापासून गाळणी खराब झाल्यामुळे चहा पावडर कशी कपात जमा होत होती हे सांगू लागली..आता मात्र मला चक्कर आल्यासारखा भास होउ लागला. गाडीला किक मारली आणि तोंडातून कुठलाही शब्द न काढता घर गाठलं.
त्या दिवसापासून माझ्यालेखी जालियानवाला बागेचं इतिहासात जे स्थान आहे तेच तुळशीबागेचं...फरक इतकाच कि एक बाग इंग्रजांच्या अन्यायाचं प्रतिक तर दुसरी माझ्यावरील.. आता मित्रांनो तुम्हाला हे सांगण्याच कारण म्हणजे.. तुम्हाला कितीही फुलांची,पाखरांची किंवा फुलपाखरांची आवड असो कि तुम्हाला कितीही पक्षीनिरीक्षणाची इच्छा झाली तरीसुद्धा तूमच्यावर बायकोसोबत (स्वतःच्या ) जर कधी बागेत जायची वेळ आली तर तुम्ही, बागेत काय आहे हा प्रश्न विचारायला विसरायचं नाही .......
प्रतिक्रिया
13 Mar 2016 - 8:48 pm | बहुगुणी
जगातुन पुणेकर वजा केल्यानंतर जे उरतात त्यांना मी उणेकर म्हणतो
शब्द आवडलेला आहे :-)(मराठी भाषेला ही खरोखर तुमची स्वतःचीच देणगी आहे असं गृहीत धरून मी म्हणेन की) उणेकरांकडून शिव्या खायला तयार व्हा! आणि हो, तुळशीबागेला नावे ठेवल्याबद्दल पुणेकरांकडूनही :-) जय मृदुंग!
13 Mar 2016 - 8:53 pm | अभ्या..
मृदुंग की मृदंग वरुन आठवले, असाच कोणतरी पियुश मृदुंग नावाचा आय्डी येऊन गेलेला हो. ;)
ते बी कटाळून गेलेलं. :(
13 Mar 2016 - 9:25 pm | एस
हम्म. यात विनोद कुठे आहे!
14 Mar 2016 - 6:11 am | कंजूस
विनोद शोधला तर सापडेल.दुपारची झोप घालवून दोन तास उन्हात उभे राहून कारचे पेट्रोल वाया घालवून गाळणे आणले नसते तर पाच वाजता चहा मिळाला नसता.
एका हडपसरच्या ओळखीच्यांकडे गेलेलो.त्या गृहिणीने तुळशीबागेचा विषय निघताच दोन्ही हात कानावर ठेवून बाssई तुळsssशी बाssssग असे म्हणून आनंदाने जो काय अभिनय केलाय त्याला फिल्म इंस्टिट्युटात धडा म्हणून घेण्यास यावा.हे नाव प्रथमच ऐकत होतो ( उणेकर असून पुणेकर -पुणेखर परिसरकरांकडून ) तेव्हा खरोखरच इकडे जायला पाहिजे ही भावना झाली.तीनचार दिवसांनी महिलामंडळासह तिकडे जाण्याचा योग आला.हा बाजार कल्याणी-राष्ट्रकुट काळापासून चालत असणार अशी कल्पना चमकून गेली.लेख सापडेलच कुठेतरी.अशा गल्ल्या मालाड बोरिवलीत छप्पन्न आहेत हा विचार मंडळाच्या आनंदावर विरजण घालेल म्हणून उघड केला नव्हता.एकुण या ठिकाणाचे अप्रुप अजिबात कमी झालेले नाही किंबहुना लक्ष्मी रोड आणि तपकिर गल्लीपेक्षाही याची कीर्ती अधिक आहे.
14 Mar 2016 - 8:26 am | Dinesh Satpute
धन्यवाद...आपला प्रतिसाद आवडला.
14 Mar 2016 - 8:45 am | स्पा
एक लंबर प्रतिसाद कंजूष काका
14 Mar 2016 - 7:19 am | रेवती
लेखन आवडले. उणेकर शब्द आवडला. पुरुषांना आवडण्यासारखे फारसे तिथे काही नाही. चहाची गाळणी मिळाली ना पण! ;)
14 Mar 2016 - 8:27 am | Dinesh Satpute
धन्यवाद
14 Mar 2016 - 8:24 am | Dinesh Satpute
पहिल्या तीन प्रतिक्रिया वाचून मिपावर लेख लिहिण्याचे बंद करण्याच्या विचारात होतो पण नंतरच्या प्रतिक्रिया पाहून ज्यांना माझे लेख आवडतात त्यांचासाठी लिहायला काय हरकत आहे असा विचार केला....खूप खूप धन्यवाद.
14 Mar 2016 - 8:49 am | माहितगार
काय दिनेशराव स्त्रीयांनी तुमची तुळशीबाग खुल्या मनाने वाचावी हि अपेक्षा, आणि तुम्ही मात्र आलेले प्रतिसाद खुल्या मनाने स्विकारणार नाही, 'ये बात कुछ जमी नही !'
विनोद जाणवतो अथवा नाही इन एनी केस आपले लेखन ललित लेखन म्हणून वाचनीय आहे. लिहित रहा. लेख अनपेक्षितपणे वाचला तर विनोद नक्कीच जाणवतो. लेख दुसर्यांदा वाचला तर विनोद कदाचित तेवढा जाणवणार नाही. हि तुमच्या लेखनाची नव्हे तर 'विनोद' या प्रकाराची मर्यादा असावी. कदाचित ज्यांचे तुळशीबागे बद्दल-स्त्री खरेदी बद्दल बरेच विनोद वाचून झालेत त्यांना कदाचित विनोद तेवढा जाणवणार नाही हे शक्य असावे.
16 Mar 2016 - 9:05 pm | Dinesh Satpute
धन्यवाद...आपली प्रतिक्रिया आवडली आणि समजली सुद्धा.
14 Mar 2016 - 8:36 am | माहितगार
लेख आवडला खास करून तुळशी बागेतील व्यावसायिक आणि ग्राहकांची अशी ओळख
14 Mar 2016 - 9:00 am | अजया
गाळणं तरी आणलं ना! मी एकदा असंच नवर्याला तुळशीबागेत बसवून ठेवुन काही न घेता आलेले.वर पुणं किती महाग आहे आपल्यापेक्षा असा साक्षात्कार सांगितलेला दोन तासानी.नशीब त्याने लेख नाही लिहिला.मिपा एका विद्रोही लेखकाला मुकलं ;)
14 Mar 2016 - 9:09 am | कंजूस
बायकांना ( लग्न झाल्यावर ) खरेदीचं खूळ आणि भूत मानगुटीवर बसतं. लग्नाअगोदर दुकानात जाऊन पटकन दोनशे रुपयांची लिपस्टिक खरेदी करणारी मुलगी नंतर पन्नास रुपयांची हेएरपिनसुद्धा ----- जाऊ दे तुळशीबागेच्या लेखाला तीटच लावावी लागेल आणि कंजुषकाकाच्या बैलाला ढोsssल.
14 Mar 2016 - 9:51 am | विद्यार्थी
विंडो शॉपिंगला वापरलेला अभ्यासदौरा हा शब्द भन्नाट आहे.
"जगातुन पुणेकर वजा केल्यानंतर जे उरतात त्यांना मी उणेकर म्हणतो" हा तर कळसच झाला. असेच लेख लिहित राहा. दिवसभराचा ताण दूर होण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद.
16 Mar 2016 - 9:08 pm | Dinesh Satpute
धन्यवाद...आपल्या प्रतिक्रियेमुळे माझ्या लेखनाचा मूळ उद्देश साध्य होतोय हे समजले...
16 Mar 2016 - 9:51 pm | अभ्या..
ते १४ तारखेचा ताण रिलीज झाला म्हणताहेत,
१५ - १६ चे काय? का आठवडी योजना आहे?
16 Mar 2016 - 9:08 pm | शान्तिप्रिय
आतिशय खुमासदार लेख.
16 Mar 2016 - 10:22 pm | पैसा
खुसखुशीत! पुणेकर असून प्रतिक्रियांना घाबरलात?
16 Mar 2016 - 11:17 pm | Dinesh Satpute
तसा मी उनेकर..पण कुणी इथे राहतो म्हणून पुणेकर म्हटलं तरी ते सुद्धा अभिमानास्पद आहे..आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..तसा मी प्रतिक्रियांना घाबरणारा नाही पण मी अगदी अलीकडेच लेखनाला सुरुवात केली आहे..काही प्रतिक्रिया वाचून माझा भ्रमनिरास झाला होता ..हा प्रांत आपला नाही असे समजून लिखाण बंद करण्याचे विचार आले होते..पण त्या नंतरच्या आपणा सारख्यांच्या प्रतिक्रिया वाचून लिहित राहण्याचे ठरविले आहे..पुन्हा एकदा धन्यवाद.
16 Mar 2016 - 11:27 pm | विवेक ठाकूर
लगे रहो .
17 Mar 2016 - 12:49 am | पद्मावति
:) छान लिहिलंय.
17 Mar 2016 - 10:28 am | रातराणी
छान! ;)
17 Mar 2016 - 10:34 am | याॅर्कर
मस्त आहे.
17 Mar 2016 - 10:51 am | ब़जरबट्टू
अजून फुलवा.. तुळशीबाग आणि वर पुणे असे दोहेरी अनुबाम्ब असताना एव्हढ्या लवकर आटपले म्हणून निक्षेष्ढ !!
17 Mar 2016 - 1:48 pm | मित्रहो
सापडला नाही परंतु उणेकर हा अफलातून शब्द सापडला. आम्ही पुण्यात नसनारे उणेकर.
तुळशीबागेपेक्षा पुण्यातल्या म़ॉलमधे स्वस्त मिळते. पटल नाही. घरगृहस्थीला लागनाऱ्या छोट्या छोट्या वस्तू तुळशीबागेत मिळतात आणि वाजवी किंमतीत. तशी चांगली जागा आहे.
1 Apr 2016 - 6:45 pm | gogglya
खरेदी मोहीमेची आठवण झाली. नवे नवे लग्न झालेले आणी नवर्याने उत्साहाने बायकोला वॉशिंग मशीन घेऊया म्हणून खरेदीसाठी नेले. शेवटी प्रेशर कूकर घेऊन घरी परतले...
1 Apr 2016 - 7:10 pm | उल्का
अक्खा जन्म मुंबईत गेला म्हणून मी पक्की मुंबईकर पण आज कळले पुणेकरांसाठी मात्र उणेकर :)
आवडला लेख. मी माझ्या पहिल्या पुणे भेटीत नवऱ्याकडे हट्ट केला होता आणि तुळशी बागेत गेले होते. ती आठवण ताजी झाली.
1 Apr 2016 - 7:59 pm | पुतळाचैतन्याचा
संक्रांतीच्या दिवशी पानिपत झाला होत हा इतिहास विसरणार्या लोकांना इतिहास माफ करत नाही...पण बंगलोर मध्ये आम्ही राहतो तिकडे काहीच चांगला मिळत नाही म्हणून एक पुरुष असून पण मी पुण्यात आणि मुंबईत आलो कि आधाशा सारखी खरेदी करतो...अगदी कुबल लोणची पण सोडत नाही.