वाटले की शेवटी होकार झाला

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
16 Sep 2008 - 3:30 am

******************
वाटले की शेवटी होकार झाला -
का विचारे मी पुन्हा इन्कार झाला?
***
जो कवी आनंद होता वांझ होता
घात होता तो बघा फनकार झाला!
***
ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी
तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला.
***
काल रात्री काजव्याला देखिले ज्या
काळरात्री तो जणू अंगार झाला.
***
धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले
त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला.
***
होत गेला हो जयाला पारखा जो
होउनी आराध्य तो साकार झाला.
******************
-धनंजय (सप्टेंबर १५, २००८)

कवितागझलविरंगुळा

प्रतिक्रिया

राघव's picture

16 Sep 2008 - 5:16 am | राघव

छान लिहिलेत.

काल रात्री काजव्याला देखिले ज्या
काळरात्री तो जणू अंगार झाला.

या ओळी विशेष आवडल्यात. :)
मुमुक्षु

प्राजु's picture

16 Sep 2008 - 5:21 am | प्राजु

काल रात्री काजव्याला देखिले ज्या
काळरात्री तो जणू अंगार झाला.
हे खूप छान..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रामदास's picture

16 Sep 2008 - 6:30 am | रामदास

आवडली. खास करून घात होता तो बघा फनकार झाला!

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

फटू's picture

16 Sep 2008 - 6:54 am | फटू

होत गेला हो जयाला पारखा जो
होउनी आराध्य तो साकार झाला.

या ओळी हेच तर सांगत नाहीत ना की शाळेत मध्ये ढब्बू म्हणून हिणवला गेलेला एखादा गुणी मुलगा पुढे मेहनतीच्या जोरावर नाव कमवतो :)

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मनीषा's picture

16 Sep 2008 - 9:44 am | मनीषा

आवडली !
ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी
तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला. ..छान आहे

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 9:19 am | विसोबा खेचर

आयला धन्याशेठ!

लै भारी गझल लिहिली आहेस बाबा!

समजायला अंमळ कठीणच गेली....

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 10:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

होत गेला हो जयाला पारखा जो
होउनी आराध्य तो साकार झाला.

मस्त! अपयश ही यशाची पहिली पायरी असते एवढंच म्या औरंगजेबाचं म्हणणं! काव्य छान आहे.

विसुनाना's picture

16 Sep 2008 - 10:31 am | विसुनाना

कल्पना चांगल्या आहेत.
गझल आवडली.
सातत्याने गझला करण्याचा विचार करू शकता.

मात्रांबद्दल तुम्हाला उत्तम जाण आहेच.
'कार' - 'गार' याबद्दल 'बाराखडी' आहे.
सु'संस्कृत' मराठी माणसाच्या सुरुवातीच्या गझल अशाच असतात.
अजून सोपे शब्द वापरायचा प्रयत्न करावा. जाणकारांचे मत घ्यावे.
जमते जमते जमेगा.
बाकी हे मत 'माझे सूर्यासमोर काजवे चमकावणे आहे'.

ऋषिकेश's picture

16 Sep 2008 - 10:44 am | ऋषिकेश

काल रात्री काजव्याला देखिले ज्या
काळरात्री तो जणू अंगार झाला.

हे आवडले..

बाकी किंचित जड गेली समजायला याच्याशी सहमत.. तुम्हीच काहि कठीण शेरांचे रसग्रहण कराल काय?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू's picture

16 Sep 2008 - 12:28 pm | बेसनलाडू

गझलेस पोषक गुणः
१. मात्रांची आणि वृत्तांची उत्तम जाण - वृत्तांची नावे काय वगैरे पुस्तकी सामान्यज्ञान अवगत असलेनसले तरी मात्रा आणि लय यांची चांगली जाणीव असल्याने ओळींमध्ये आलेली सहजता
२. द्विपदींमधून दिसत असलेले गझलेचा आकृतीबंध आणि व्याकरण - एकंदरीत तंत्र अवगत आहे.
३. 'मला काय सांगायचे आहे', हे नक्की(च) माहीत आहे.
पण मंत्राचे काय? वास्तविक हा प्रश्न विचारण्याइतका अधिकार माझ्याकडे नाही; पण एकूणच जे शिकले आहे, अनुभवले आहे, थोरामोठ्यांकडून ऐकले आहे त्यावरून हे लिहिण्याचे धाडस करतो आहे.
(माझ्या मते मला) दिसत असलेले कच्चे दुवे -
१. संस्कृतप्रचुरता, 'सौरभ' सारखे असामान्य मराठी शब्द; पुसणे,जयाला यांसारखे जुन्या वळणाचे/ क्लासिकल मराठी कवितांमधील शब्द - सामान्य मराठी शब्दांपासून द्विपदी जितक्या दूर, तितके आस्वादक आनंदापासून, गझलेपासून दूर. जुनी वळणे शक्यतो टाळता आल्यास उत्तम!
२. द्विपदींच्या ओळींचा कमकुवत परस्परसंबंध - हा संबंध, ओळींची वीण जितकी घट्ट, तितका शेर दमदार आणि कल्पना स्पष्ट. वर बरेच आस्वादकांनी शेर न कळल्याची तक्रार, रसग्रहणाची विनंती केली आहे त्याचे हे मूळ कारण - ओळींचा सैल संबंध आणि अस्पष्ट कल्पना. मलाही अनेक शेर कळले नाहीत. मला सगळेच कळले पाहिजे असे नाही,पण बरेचसे कळले नाही, तर साहजिकच मी गझलेपासून दूर जाणार. बहुतेक वाचकांचे हेच झाले असल्याचा (माझा) अंदाज आहे. असो.
सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक म्हणजे गझलेचे नवनीत असलेली बाराखडी. तुमच्या आधीच्या रचना आणि कवितांवरील चर्चेतील सहभाग व विचार पाहता तुम्ही तंत्राबरोबरच मंत्र अवगत केल्यास बहारदार गझला लिहू शकाल, अशी खात्री आहे. वानगीदाखल चित्तरंजन भट, सुभाषचंद्र आपटे, मिलिंद फणसे, प्रसाद शिरगांवकर, प्रदीप कुलकर्णी, अभिमन्यू आळतेकर यांच्या गझला जरूर वाचाव्यात.
मनःपूर्वक शुभेच्छा!
(गझलप्रेमी)बेसनलाडू

धनंजय's picture

17 Sep 2008 - 12:47 am | धनंजय

कवीने करू नये! कवीला अभिप्रेत नसलेले अर्थही जर वाचकाला सापडलेत तर ते चूक नसतात. वाचकाला अर्थच जाणवला नाही, निरर्थक तालकाव्य म्हणून वाचले तरीही काही चूक नसते.

पण लिहिताना मनात काय विचार होते, ते खाली पांढर्‍या अक्षरांत टंकलेले आहेत.

चौकट अशी आहे. प्रत्येक द्विपदीत आधी आनंद देणारी गोष्ट बदलून दु:ख देते. द्विपदींना जोडणारा "सिलसिला" - ती जी दु:खदायक गोष्ट आहे ती टप्प्या-टप्प्याने अधिक उदात्त होत जाते. शक्यतोवर शेवटी बदललेली "दु:खद" परिस्थिती पूर्वीच्या "सुखद" परिस्थितीपेक्षाही आशादायी वाटली पाहिजे.
१, २ :पहिले दोन शेर - शाब्दिक स्पष्ट
३ : जीव (माणसाचा जीव किंवा लहान प्राणी : श्लेष); जिवाणू (सर्प/विषारी जंतू किंवा जिवाचे परमतत्त्व : श्लेष) - पर्म्युटेशन-काँबिनेशनने वेगवेगळे अर्थ
४ : शब्दार्थ स्पष्ट (अंगार हा ऊब देणारा की जाळणारा हे संदिग्ध)
५. "अंतर" (दूर किंवा आतमध्ये : श्लेष) - पर्म्युटेशन-काँबिनेशनने वेगवेगळे अर्थ
६. जयाने (तीन अर्थी श्लेष : कवीचे नाव, ज्याने=जयाने, विजयाने=जयाने) - काँबिनेशनने वेगवेगळे अर्थ

विसोबा खेचर's picture

17 Sep 2008 - 12:58 am | विसोबा खेचर

छ्या! मनातले विचारदेखील वाचायला अंमळ कठीणच गेले! काही समजलं नाही, डोक्यावरूनच गेलं! :)

अरे धन्याशेठ, तुझ्या उत्तुंग प्रतिभेबद्दल पूर्ण आदर राखून तुला एक विचारतो, की काय रे - साधी, समजायला सहजसोपी अशी एखादी कविता तू का लिहित नाहीस रे?

लिही पाहू प्लीज माझ्याकरता! :)

तात्या.

धनंजय's picture

17 Sep 2008 - 3:49 am | धनंजय

सर्वांना धन्यवाद. गझल करायचा प्रथमच प्रयत्न असल्यामुळे काही दोष होणारच होते. सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद.

काही संस्कृताळलेले आणि जुन्या वळणाचे शब्द बदलले आहेत. प्रतिसादांचा रोख कळावा म्हणून मुळातल्या द्विपदी येथे देत आहे.

१.
वाटले की शेवटी होकार झाला -
का पुन्हा पुसता तुम्हा इन्कार झाला?
२.
सौख्यवाचा ज्या कवीची वांझ होती
घात होता तो बघा फनकार झाला!
५.
सौरभाने ज्या फुलाला अंतरीले
अंतरी त्या भृंगही स्वीकार झाला.

बेसनलाडू's picture

17 Sep 2008 - 4:14 am | बेसनलाडू

हा शेर मूळ शेराच्या तुलनेत आता पूर्णपणे स्पष्ट झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. अर्थात सौरभ = सुगंध आणि भृंग = भुंगा हे स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दिवसांपासून पाठ केलेले समानार्थी शब्द असल्याने शेरामागच्या भावना मूळ शेरातून स्पष्ट होत नव्हत्या असे नाही; मात्र सामान्य मराठी वाचकवर्गासाठी शेरातून "संवाद" साधला जात नव्हता असे वाटते. आजच्या दिवसात सुगंधाला सुगंध/सुवास म्हणणे, भुंग्याला भुंगा म्हणणे आणि नल-दमयंती सारख्या काव्यांचे भाषांतर, जुन्या संगीत नाटकांमधून असलेले "भृंगासम गुणगुणायचे हृदय हे" सारखे 'नाटकी' संवाद यांत जो फरक, तोच फरक मूळ शेर आणि नवी आवृत्ती यात आहे. सर्वसामान्यांना कळेलशा भाषेत मनातले विचार - मग ते गूढ असोत वा साधेसोपे,सामान्य - पोचवताना काय शब्दयोजना असावी आणि काय असू नये (नियम म्हणून नाही तर सुलभता,सहजता,सुगमता म्हणून) याचे हे छान उदाहरण म्हणता येईल.
(स्पष्ट)बेसनलाडू

विसुनाना's picture

17 Sep 2008 - 10:42 am | विसुनाना

जयभाऊ, चला आता आपल्या सहजसुंदर गझला वाचायला मिळणार तर!

जितेन्द्र's picture

17 Sep 2008 - 1:41 pm | जितेन्द्र

उत्तम्!!!

मुक्तसुनीत's picture

17 Sep 2008 - 6:52 pm | मुक्तसुनीत

तुमच्या कविता एरवी आवडतात. पण इथे शब्द फारच अवघडल्यासारखे झाले आहेतसे वाटते - अगदी तुमच्या नवीन , व्याकरणादृष्ट्या सुधारित आवृत्तीमधे सुद्धा. ही संकल्पनेची किंवा शब्दरचनेची दुर्बोधता नव्हे. अगदी साधी गोष्ट. मराठीमधे होकार "येतो", "होत" नाही. (तुमचे "इकरार हुवा है" चे भाषांतर इथे थोडे चुकले आहेसे वाटते.) "जो कवी आनंद होता वांझ होता" ही ओळ मला पार हुकलेली वाटते. एकूण तुमची जादूची कांडी इथे फिरली नाही बुवा.

असो. आपल्या लेखनकृतीवरच्या टीकेला व्यक्तिगत न घेण्याचा दुर्मिळ गुण तुमच्यात आहे हे मनात असल्यानेच उपरोक्त धाडसी विधाने केली आहेत. युवर क्लास इज पर्मनंट ; आय मिस्ड द फॉर्म इन धिस वन...

चतुरंग's picture

17 Sep 2008 - 8:01 pm | चतुरंग

परीक्षानळी आणि चंचुपात्रातून गजलेचा प्रवास लवकरच नक्षीदार सुरईकडे होईल ही खात्री आहे! B)
पुलेशु.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

18 Sep 2008 - 12:13 am | विसोबा खेचर

परीक्षानळी आणि चंचुपात्रातून गजलेचा प्रवास लवकरच नक्षीदार सुरईकडे होईल ही खात्री आहे!

धन्याशेठ, ऐकतो आहेस ना बाबा? :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2008 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय,
एका ज्ञानकार माणसाला आम्ही काय गझल समजावून सांगावी ! तसे आम्हाला गझल कुठे कळते. पण गझलेतला शेराचा मेंदूत अर्थ जातो न जातो तोच, परस्पर र्‍हदयातून आवाज आला पाहिजे. 'व्वा ! क्या बात है , असा. ती गझल उत्तम हे आमचं ज्ञान !!!

आपल्या गझलेत कोणता गूण दिसला म्हणाल, तर मला दोन ओळींचा परस्परांशी असलेला संबंध दिसला आणि त्या ओळीही विशेष आवडल्या !!!

काल रात्री काजव्याला देखिले ज्या
आणि
काळरात्री तो जणू अंगार झाला.

धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले
आणि
त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला.

शेरात जे सांगायचे त्याची प्रस्तावना पहिली ओळ आणि पहिल्या ओळीचा प्रभावी समारोप म्हणजे दुसरी ओळ हे तर आपल्या रचनेत आलेच आहे. मात्र आपल्याकडून दमदार गझलेसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, हेही आम्हाला माहित आहे.