हा लेख ईतर संस्थळावर आधी प्रकाशित केलेला आहे. तसेच लेखात काही ईतर संस्थळांचे आणी सदस्यांचे काही संदर्भ आहेत. सं.मं. ला विनंती की जर हा लेख येथे अयोग्य वाटल्यास उडवुन टाकावा.
---------------------------------------------------------------------------------
ह्या शनिवारी (२० फेब्रुवारी २०१६) मी मरिना रन २०१६ ही हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. त्या अनुभवाबद्दल आणी गेल्या अडीच तीन वर्षातील एकूण धावपळीबद्दल हा छोटेखानी(?) लेख ! पहिलाच प्रयत्न आहे माझा लिहिण्याचा, तेव्हा काही चुका असतील तर माफ करा, आणी काही सूचना असतील तर जरूर सांगा.
पाप्याचं पितर हे नाव मला फार लहानपणापासूनच चिकटलं होतं. माझी अंगकाठी पण होती तशीच, अतिशय कमी उंची आणी काडीपैलवानास साजेशी अंगयष्टी. शाळा कॉलेजात अभ्यास सोडून इतर सर्व (वायफळ) गोष्टीत सहभाग असायचा. आमची शाळा ज्या कुठल्या आंतरशालेय स्पर्धांत भाग घेत असे, त्या सर्व संघात मी असायचोच असायचो. कॉलेजमध्ये असतानाही वॉटरपोलो टीमचा मेंबर होतो. लग्न झालं तेव्हा माझं वजन निव्वळ ६० किलो होतं!!
लग्नानंतर मात्र या सगळ्यात आमूलाग्र बदल होत गेले. मुंबईत बैठा जॉब आणी अनियमित जेवणाच्या वेळा, यामुळे माझं वजन वाढतच जायला लागलं. त्यातच सोबतीला चैतन्यकांडी वगैरे सवयीपण चालू झाल्या. आपण मनात येईल तेव्हा सोडू शकतो या भ्रमात राहून, त्याच कधी व्यसन लागले ते कळले पण नाही. एकूणच तब्येतीकडे करता येईल तितके दुर्लक्ष करायला लागलो होतो. त्यात मुंबईत फार धावपळ असते, व्यायामाला वेळच मिळत नाही वगैरे सबबी स्वतःच स्वतःला पटवून देऊ लागलो होतो. बाकी पण बरेच बदल झाले - आधी पट्टा घेताना मला अॅडिशनल होल्स करून घ्यावे लागायचे, त्याची काहीच गरज उरली नाही. लग्नात घातलेला सूट कपाटात जागा अडवून बसला होता, शेवटी तो देऊन टाकला, आता मी त्याला आणि तो मला कधीच सूट होणार नाही ह्याची खात्रीच पटली होती.
होता होता वजन ६० चे ८२ च्या वर पोचलं. तरीपण मनात उगाच एक खोटा आत्मविश्वास होता की जिम लावलं किंवा पोहणं चालू केलं की २ महिन्यात वजन कमी करू शकेन मी. जिम बर्याच वेळा लावलाही, पण सर्व पैसे बहुतेक पहिल्या दिवशीच जिम करताना आलेल्या कंटाळ्यामुळे वाया गेले. पोहायलाही पैसे भरले, पण ते ५० मीटरचे ४-५ लॅप झाल्यावर गप्पा मारण्यासाठी टँकला देणगी म्हणून दिले होते. मध्ये जी.एम. डायट वगैरे प्रकारही करून पाहिले, त्याचा उपयोग माझ्यापेक्षा सब-वे दुकानवाल्यांनाच जास्ती झाला ! असो, थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्व तर्हेने शक्य असेल तेवढी हेळसांड आणी त्यांहून महत्त्वाचे म्हणजे स्वतःची फसवणूक करत अनेक वर्ष काढली.
माझ्या अनेक मित्रांना कंबरेचे आणी पाठीचे दुखणे चालू झाले होते, पण मला सतत असे वाटत असे की मी एवढे सगळे खेळ खेळणारा आहे (खरं तर तो आता फारच भूतकाळ होता) मग मला असलं काही होणे शक्यच नाही. ज्या कोणाला त्रास होत असे, तो कंबरेला पट्टा वापर, गाडीत सीटच्या पाठीला काही मणी लाव आणि दर दोन तीन महिन्याने उपचार पद्धतच बदल असे प्रकार करत असे. एकूणच वजन कमी केलंच पाहिजे आणी जीवनशैली आमूलाग्र बदलली पाहिजे असले विचारही (आचारात आणणं तर सोडाच हो) करणं सोडून, खर्चिक जे जे असेल ते सर्व करत प्रत्येक जण आपल्या मनाची समजूत घालत होता.
आधी मुंबईत घर ते स्टेशन, मग लोकलची धावपळ वगैरे हालचाल तरी होत होती. नंतर थोडी आर्थिक स्थिरस्थावर झाल्यावर स्वतःचे वाहन आले. मग काही दिवस खरंच असे असत की जेव्हा मी फक्त चैतन्यकांडीसाठी १००-२०० मीटर चालत असे ! !! बाकी व्यायाम काहीच नाही !
साधारण तीन वर्षापूर्वी नोकरी बदलून परदेशी आलो. इथली सुरुवातीची नोकरी तर फारच हेक्टीक होती. दिवसाचे कमीत कमी १३ तास ऑफिस आणी २ तास प्रवास असे काही दिवस काढले. इथेही तेच हाल, चैतन्यकांडीसाठी आता तर चालावेही लागायचे नाही. इथे पाकीट ठेवावे लागते ! त्यामुळे खिशातच पाकीट, सो चालायचे नो टेन्शन.
अखेर एक दिवस उजाडला ज्याने मी एकदम भानावर आलो. ऑफिसमध्ये काम करताना माझ्या कंबरेत भयंकर वेदना सुरू झाल्या. मला धड खुर्चीतून उठताही येईना आणी खुर्चीत नीट टेकून बसताही येईना. बरेच खेळ खेळल्याने आणी अनेक वेळा धडपडल्याने मला शारीरिक वेदना काय असते ह्याची कल्पना होती, पण हा प्रकार काही वेगळाच होता. तेव्हा पहिल्यांदी मला लक्षात आलं की आता वजन कमी करण्याशिवाय पर्याय नाही.
जिम वगैरेचा मला मनापासून तिटकारा आहे, झेपत नाहीत ती वजन उगाच आह ऊह आवाज काढत कशाला उचलायची अस मला सतत वाटत राहत. पोहणंही जमण्यासारखं नव्हत कारण इथले तलाव सकाळी ८ ला उघडतात.
तेव्हा आपण पळूया असा विचार केला. त्याच सुमारास माबो वरील मॅरॅथॉन धागा वाचत असे. मला तेव्हा खरंच असं वाटायचं की उगाच कशाला लोक ४०-४२ किमी पळत असतात ! त्यात काय असं थ्रिल असत, एक वीकांत मिळणार ५ दिवस काम करून, त्यात कशाला एवढा जीवाला त्रास करून घ्या !! पण म्हणलं , आपण वजन करण्यापुरती सुरुवात तर करू. कंबरदुखी साठी पेन किलर घेतच होतो, मग एक आठवड्याने तो शुभमुहूर्त आला.
माझ्या (जुन्या) घराखालीच एक जॉगिंग ट्रॅक होता. पहिल्या दिवशी कसा बसा सकाळी उठून गेलो, पण जोष फार टिकला नाही. साधारण ५०० मीटर (म्हणजे सलग ४.५ ते ५ मिन असेल) पळाल्यावर मला एवढा दम लागला की मी मटकन जमिनीवर बसलोच. मला असं वाटायला लागलं की कोणीतरी इथून उचलून मला घरी सोडावं, आता आपल्या पायांनी मी काही जाऊ शकणार नाही ! माझ्या अधोगतीने खरंच मलाच धक्का बसला, स्वतःची लाज वाटली मला !! पण मनाशी निश्चय केला की काही झालं तरी दररोजचे पळणे बुडवायचे नाही, फोकस फक्त नियमितपणावर ठेवायचा. पहिला एक आठवडा अगदीच जुजबी पळत असे, रोज साधारण २००-३०० मीटर्स फक्त. मग साधारण दोन तीन आठवड्याने ठरवले की आपण दर २ दिवसांनी आधीपेक्षा १ मिनटं जास्ती पळायचा प्रयत्न करूया. असे करत करत मी १.५ ते २ किमी पोचलो. माबोवरील मॅरॅथॉन हा धागा आणी हर्पेनचे धागे माझ्यासाठी गाईडिंग स्टारचे काम करत होते. त्या धाग्यावर दिग्गजांच्या प्रतिसाद वाचून बरंच शिकायला मिळत होतं.
हळू हळू २ चे ३ किमी झाले रोजचे. ३ वर बरेच महिने नियमित होतो, मग हळू हळू हुरूप वाढत गेला. शनिवारी मी जरा लांब पळायला लागलो (साधारण ६-८किमी वगैरे). रोज ३ चे मग ५ केले, आता मिनिट न वाढवता सरळ अर्धा किमी वाढवत गेलो, आणी शनिवारच्या पळण्यात पण अंतर खूप वाढवलं. ह्यात साधारण वर्ष दीड वर्ष सहज गेलं असेल. नियमितपणा ही एक साधी सवय अंगी बाणवली तर काय फायदा होऊ शकतो हे अनुभवत होतो स्वतः.
आता मी जॉगिंग ट्रॅक सोडून इथे पार्क्स मध्ये असलेल्या रनिंग ट्रॅक्स वर पळायला सुरुवात केली. पार्क्स मध्ये पळण्याचा फायदा म्हणजे सरळ रस्ता असतो आणि त्यावर अंतरे स्पष्ट अक्षरात लिहिलेली असतात.
पाहिल्या ५०० मीटरच्या दयनीय अनुभवानंतर साधारण २.५ वर्षाने मी इथे हाफ मॅरॅथॉनला रजिस्टर केलं. रात्रीची रेस होती, पण दिवसभर पाऊस झाल्याने आणि संध्याकाळी पाऊस थांबून सूर्य दिसू लागला आणी भयंकर दमट हवा असल्याने विचित्र वातावरण तयार झाले होते. तसेही आमच्या गावात दोनच ऋतू असता - उन्हाळा आणि अती उन्हाळा !! पण नियमित सराव असल्याने मी कुठेही न दमता आणी न थांबता हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. तसेच वाचलेल्या टिप्स प्रमाणे दर थोड्या वेळाने घोट घोट पाणी पीत आणि वेग अती न वाढवता तसेच कमीही न करता पळत राहिलो. माझी २१ किमी ची वेळ २ तास २५ मिन होती.
मला स्वतःला २.५-३ वर्षात माझ्यात झालेला बदल खूपच जाणवतो. मी पाहिल्यापासून बाहेरच कमीच खातो. घरीही जरी मी कधीच अती खात नसलो तरी मला खाण्यावर निर्बंध घातले की जास्ती भूक लागते. म्हणून जेव्हा व्यायाम चालू केला तेव्हाच ठरवले होते, की पाहिजे तर २ राउंड्स जास्ती मारू पण हे खाणार नाही, ते खाणार नाही असलं अजिबात करणार नाही, आणी ते पाळतही आहे. आधी मी सकाळी जर व्यायाम केला तर दमल्याने ऑफिसमध्ये झोप येते वगैरे कारणं स्वतःलाच पटवून व्यायाम टाळत असे. पण आता जर सकाळी जमले नाही तर संध्याकाळी कधीही घरी पोचलो तरी पळायला जातोच जातो. पाऊस असला तरी पळणे चुकवत नाहीच नाही. पूर्वी मला दिवसभर, खास करून दुपारी जेवल्यावर ऑफिसमध्ये प्रचंड झोप यायची, तसंच दिवसभर आळसटल्यासारखेहि वाटत असे. पण पळायला लागल्यापासून मला अजिबात (ऑफिसमध्ये) झोप येत नाही. सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि तत्सम तब्येतीच्या तक्रारी पूर्णपणे बंद झाल्या आणी माझं वजन ८२ वरून आता ६९.५ वर आलं आहे. आणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वजन हळूहळू कमी होत आल्याने कंबरदुखीने परत मान वर काढलेली नाहीये. आता २ टार्गेट आहेत, वजन ६५ वर आणणे आणि पूर्ण मॅरॅथॉन पळणे, बघू कधी जमते ते.
असो, मला माहीत आहे की २१ किमी पळणे काही एव्हरेस्ट चढण्यासारखी आणी ढोल बडवून सांगण्याइतकीही कामगिरी नाही, पण मला लिहावेसे वाटले म्हणून लिहिले आहे. होप सो तुम्हाला आवडेल. नाही आवडले तर तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल क्षमस्व.
प्रतिक्रिया
29 Feb 2016 - 8:41 am | मोदक
अभिनंदन...!!!!
29 Feb 2016 - 8:44 am | पैसा
खूपच प्रेरणा देणारा अनुभव आहे! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!
29 Feb 2016 - 9:54 am | गवि
प्रेरक धागा..संपूर्ण अनुमोदन.. शिवाय धागाकर्त्याने आयडीनाम बदलावं. मिसमॅचिंग आहे.
29 Feb 2016 - 9:04 am | एस
वा! अभिनंदन!
29 Feb 2016 - 9:13 am | जुइ
आपल्या अथक परिश्रमांचे कौतुक वाटत आहे.
29 Feb 2016 - 9:26 am | अभय म्हात्रे
खूपच प्रेरणा देणारा अनुभव आहे!
29 Feb 2016 - 9:36 am | स्पा
मस्तच अनुभव असेच पळत रहा :)
29 Feb 2016 - 9:37 am | प्रकाश घाटपांडे
आत्मपरिक्शणात्मक छान लेख. चैतन्यकांडी सोडलीत की नाही?
29 Feb 2016 - 9:51 am | खेडूत
अभिनंदन!
अनुभव कथन आवडले.
नियमित्पणा आणि आनंदी रहाणं याचा मला फार उपयोग झाला आहे. मला कुणी 'पळ ए!' म्हणालं तरी मी सकारात्मक रितीने घेऊन पळत असे. त्यामुळे गेली वीस वर्षे माझं चजन ६८ आहे. देश-आहार-प्रवास वैग्रे कशाचाही परिणाम होत नाही!
29 Feb 2016 - 9:51 am | नाना स्कॉच
तुमची ऊंची किती? त्यावर तुमचे आदर्श वजन किती असावे ते ठरते न??
29 Feb 2016 - 9:54 am | बेकार तरुण
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
प्रकाशजी - अजुन नाही, पण प्रमाण खूपच कमी वर आले आहे.
नाना - ऊंची कमी आहे, साधारण ५ फूट ३ ईंच वगैरे असेल. त्या प्रमाणे आदर्श वजन ६५ येतं माझं (१-२ किलो ईकडे ति़कडे असेल).
29 Feb 2016 - 10:22 am | साधा मुलगा
नियमितपणा ही एक साधी सवय अंगी बाणवली तर काय फायदा होऊ शकतो.
याला +10000
29 Feb 2016 - 11:38 am | सुबोध खरे
बेकार तरुण -
तुमच्या निश्चय आणि नियमितपणा कडे पाहून मला स्वतः बद्दल लाज वाटू लागली आहे. माझी बायको अर्ध म्यारेथोन धावते आणि मी व्यायाम करायचा असा बरीच वर्षे निश्चय करतो आहे. पण रोज ४-५ किमी चालण्या व्यतिरिक्त काहीच होत नाहीये.
सुदैवाने मी माझे वजन मात्र गेली २५ वर्षे टिकवून आहे.
असो. आपल्या लेखनातून आज तरी स्फूर्ती घेतली आहे पळायला सुरुवात करायची.
पाहूया काय होते आहे.
29 Feb 2016 - 11:41 am | स्पा
कशाला एवढी मेहनत करताय डॉक
तुम्ही तसेही फिट हात
29 Feb 2016 - 11:42 am | मृत्युन्जय
ज्जेब्बात, लढ बाप्पू. अशी कमिटमेंट हवी. असले काही वाचले की पळायला सुरुवात करण्याचे स्फुरण चढते आणी मग २ दिवसात उतरते, हे आतुनच वाटले पाहिजे. तुझ्या निश्चयाला आणि जिद्दीला सलाम.
29 Feb 2016 - 11:52 am | नाखु
जब जागो तब सबेरा बद्दल अभिनंदन...
आणि तुमचा हा लेख अजिबात बेकार नाही तर चिरतरुण आहे याची खात्री बाळगा.
सध्या चालता राहण्याची शिकस्त करीत असलेला वारकरी नाखु
29 Feb 2016 - 12:03 pm | पिलीयन रायडर
छान लिहीलय! अभिनंदन!
29 Feb 2016 - 12:39 pm | गॅरी ट्रुमन
अरे वा. खूपच प्रेरणादायी. लेख आवडला.
29 Feb 2016 - 12:48 pm | अजया
प्रेरणादायी लेख.सध्या प्रेरणेची जरुरी होतीच!
29 Feb 2016 - 12:51 pm | बॅटमॅन
जादू वगैरे खरेच असते , फक्त पाहिजे त्या रूपात दिसत नै इतकेच.
हा लेख वाचून त्याचेच प्रत्यंतर आले. असेच पळत रहा आणि स्वतःला फिट ठेवा. अनेकोत्तम शुभेच्छा.
29 Feb 2016 - 6:50 pm | जगप्रवासी
तुमचं पळण वाढत राहो आणि लवकरच पूर्ण मॅरॅथॉन वरील लेख येवो हि सदिच्छा
29 Feb 2016 - 7:04 pm | आदूबाळ
छान लिहिलं आहे. आयडीनाम बदललं पाहिजे याच्याशी सहमत.
29 Feb 2016 - 7:26 pm | नपा
त्यांहून महत्त्वाचे म्हणजे स्वतःची फसवणूक करत अनेक वर्ष काढली.
हे म्हणजे आत्मपरीक्षण करायला लावणारे वाक्य आहे.. सध्याच्या जीवनशैलीला खूपच समर्पक
29 Feb 2016 - 7:26 pm | मितान
नियमितपणे व्यायाम करणे यासाठी निर्धार च लागतो ! तुमच्याकडे तो आहे याबद्दल अभिनंदन. तुमच्या अनुभवावरून इतरांना ही प्रेरणा मिळेल. लिहीत रहा:)
1 Mar 2016 - 3:18 am | श्रीरंग_जोशी
माणसाचा सर्वात महत्वाचा प्रवास स्वतःच्याच दिशेने असतो अशा आशयाचे एक वाक्य इंग्रजीत वाचले आहे. तुमचे अनुभवकथन वाचून त्याची प्रचिती आली.
बाह्य घटकांवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वतःच्या सवयींना बदलून दीर्घकालिन उपाययोजना राबवून ज्याप्रकारे तुम्ही तुमचे लक्ष्य गाठले ते खूपच प्रेरणादायी आहे.
1 Mar 2016 - 5:51 am | स्रुजा
फार च कौतुकास्पद ! प्रेरणादायी तर आहेच. पळताना घ्यायच्या काळजीबद्दल पण लिहाल का ? म्हणजे गुडघ्यांवर , पाठीवर ताण न येऊ देणारं पोश्चर वगैरे..
1 Mar 2016 - 8:18 am | बेकार तरुण
स्रुजा ताई,
मी नक्कीच ह्या क्षेत्रातला तज्ञ नाही. त्यामुळे मी, मी स्वतः काय केलं हे सांगु शकतो. गेल्या २.५ - ३ वर्षात तरि मला काही गंभीर इजा झालेली नाही.अगदी बेसिक गोष्टी म्हणजे पाणी भरपूर पीणे वगैरे, बाकी काही गोष्टी मी जश्या केल्या (अनुभवल्या) तश्या लिहित आहे.
१. सुरुवात अतिशय थोड्या अंतराने केली (मोअर आउट ओफ कंपल्शन हे नमुद केल आहेच), पण तरि झेपेल तेवढाच सुरुवातीला व्यायाम केला. होतं काय की आपण ज्या दिवशी जोषात असतो व्यायामाच्या, तो दिवस आपण आठवड्याभराचा व्यायाम करतो आणी दुसर्या दिवशी पाय-हात दुखतो सबबीखाली सगळं बंदच पडतं. पहिले काही दिवस तरि मी फक्त नियमितपणा ह्या एकाच गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देत होतो. वेग वगैरे वर तर अजिबातच लक्ष दिलं नाही. आणी अजुन एक रुल स्वतःसाठीच बनवला होता की काल जेवढ पळलो तेवढ तर नक्कीच पळणार आणी वाटल तर थोड (अगदीच थोडं, २० मीटर वगैरे) अंतर वाढवु.
२. चांगले रनिंग शूज. मी ईतर ठिकाणी बेअर फूट रनिंग आणी बरेच अत्याधुनिक पायताणांविषयी वाचल, पण मला तरि रनिंग शूजच आरामदायक वाटले. ह्या विषयी नेट वर ढीगाने वाचायला माल मसाला उपलब्ध आहे, सगळे वाचुन आणी अत्यंत गोंधळल्यानी मी तरी रनिंग शूजच वापरायचा निर्णय घेतला.
३. मी काही दिवसांनी थोडे ईतर व्यायाम चालु केले, जसे की सूर्यनमस्कार वगैरे. पण पळणे हाच मुख्य व्यायाम प्रकार होता. अधुन मधुन थोडं सायकलिंग हि करतो, पण मला फारस आवडल नाही काहीच (रोज करण्याच्या दृष्टिने)
४. सुरुवातीला जेव्हा साधारण ५०० ते ७५० मीटर फक्त पळत असे, तेव्हा मी काहीच स्ट्रेचिंग वगैरे करत नसे. तेव्हा जास्ती फोकस दमसास वाढवणे वगैरे वरच ठेवला होता. आता जेव्हा मी रोज ५-६ करतो तेव्हा आधी आणी नंतर असे दोन्ही वेळा स्ट्रेचिंग बेंडिंग वगैरे प्रकार करतो. पायाला पण छान आराम वाटतो.
५. नशीबाने मला अजुन तरि काही ईजा नाही झालेली. मधे एक दोनदा क्रँप्स येणे वगैरे प्रकार झाले, पण ते किरकोळ प्रकारात मोडतात.
होप सो, मी तुम्हाला अजुन फन्फ्युज नसेल केले
बे.त.
1 Mar 2016 - 7:44 am | बेकार तरुण
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद. लेख लिहिताना खरच वाटल नव्हत की प्रेरणादायी असेल वगैरे. लिहावासा वाटला म्हणुन लिहिला होता. पहिलाच लेख असल्याने बरीच धाकधुकहि होती (जिलबी कॅटेगरी वाटतो का वगैरे) पण तुमचे प्रतिसाद वाचुन हुरुप वाढला लिहायचा.
तुम्ही रोजचा अल्पसा का होईना व्यायाम नक्की चालु करा, ती सगळ्यात मोठी आणी महत्वाची पावती असेल. :)
श्रीरंगचे विषेश आभार कारण त्याने अनेक शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करुन दिल्या.
आयडी बदलायचं बघतो!!!
1 Mar 2016 - 9:34 am | मुक्त विहारि
खालीला वाक्यांना फ्रेम करून ठेवले आहे.
"नियमितपणा ही एक साधी सवय अंगी बाणवली, तर काय फायदा होऊ शकतो हे स्वतः अनुभवत होतो."
आणि
"जर सकाळी जमले नाही तर संध्याकाळी कधीही घरी पोचलो तरी पळायला जातोच जातो. पाऊस असला तरी पळणे चुकवत नाहीच नाही."
वाखूसा.
1 Mar 2016 - 1:42 pm | भरत्_पलुसकर
भले शाब्बास! आवडली तुमची धावपळ. आता थांबायचं नाय!
1 Mar 2016 - 4:12 pm | असा मी असामी
खूपच प्रेरणादायी.विशेषतः मला.सकाळी थोडेफार चालणे आणि पळणे चालु केले आहे. तुमच्या लेखाने अजुन बळ मिळाले.
1 Mar 2016 - 4:22 pm | असा मी असामी
माबो च्या धाग्याचे संदर्भ देऊ शकाल का? अर्थात सं.मं. ची परवानगी असेल तर
1 Mar 2016 - 4:43 pm | विवेक ठाकूर
आवडला !
27 May 2016 - 5:18 pm | मी-सौरभ
प्रेरणा देणारे लेखन आहे फक्त ती (प्रेरणा) ऊद्या सकाळ पर्यंत टिकली पाहिजे.
27 May 2016 - 10:32 pm | मयुरा गुप्ते
चांगलीच मजल मारली आहे, आता पूर्ण मॅरॅथॉनही करुन टाकाच. सोप्पी आहे असं नाही म्हणणार मी पण त्या दृष्टीने प्रयत्न केले तर नक्किच पूर्ण करु शकाल.
रनिंग साठी चांगले तुमच्या पायाला आणि तुमच्या चालीला योग्य असे शुज घेउन त्यावर प्रॅक्टीस करणं चांअगलं.
पूर्ण मॅरॅथॉन साठी शुभेच्च्छा.
-मयुरा
27 May 2016 - 10:50 pm | चतुरंग
सातत्याने व्यायाम करणे हे सोपे नाहीच, चिकाटी आणि जिद्द हवीच.
नियमितपणाने पळून तुम्ही वजन आटोक्यात आणि हाफ मॅरेथॉन अशी दोन उद्दिष्टे साध्य केलेली आहेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन! :)
पूर्ण मॅरेथॉनसाठी शुभेच्छा.
(व्यायामप्रेमी)रंगा
30 May 2016 - 9:09 am | बेकार तरुण
नवीन प्रतिसाद देणार्यांचा परत एकदा आभारी आहे
पूर्ण मॅरेथोन काही अजुन झाली नाही पण रोजचा व्यायाम मात्र चालु आहे. जमेल नक्की कधीतरी पूर्ण मॅरेथोन !