बोलीले जित्ता ठेवा, मराठीले जित्ता ठेवा

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
27 Feb 2016 - 9:12 am

मराठी भासेची खासबात काये जी ? असा तुमाले कोनी विचारलनच तं सांगजाल का इच्या बोल्या ! अजी एखाद्या भासेच्या ४२-४३ बोल्या मंजे तुमाले मज्याक वाट्ते का जी ? असी बोल्याइच्या बारेत अमीर भासा मराठीच आये, हिंदी बी नसे अना बंगाली-तमिल-तेलुगु बी नसे. मंग आप्ल्याले अभिमान पायजे का नाई ? अखिन बोल्याइमंदी बी पोटबोल्या आयेतंच.. आता आमच्या झाड़ीबोलीचाच घ्या ना जी. म्हनावाले गेला तं इनमिन ४ जिल्ल्यात बोलतंत, पर असी अमीरी आये भाऊ का , का सांगू तुमाले. भंडार्‍याची( मराठीतला पयला ग्रंथ, ’विवेकसिंधु’ मुकुंदराजाने भंडार्‍यातच ’आंभोरा’ गावी संगामावरच्या पहाडीवर बसून लिखला. ) अलग, गोंदियाची अलग ,चंद्रपुराची अलग अन गड़चिरोलीची अलग. पर आये झाड़ीबोलीच. तेच मिठास; जरा सब्द अलग, जरा बोलाचा ढंग अलग आये तं का झाला ? पर काही कम-अकलीच्या मानसाइले वाट्ते का झाड़ीबोली मतलब गावठी लोकायची बोली. मराठीत लमड़ीचे हिंदी घुसाडून बोलतंत. मंग आमाले बी वाटत रायला का हंव भाऊ, हे सिकले-सवरले सयरातले लोकं मन्तेत तं सहीच बात असंल. मंग आमी बी कायले झाड़ी बोल्तो जी ? ते घरी अना दोस्तभाइसंगच बोलावाले वापरतो. पुन्यात गेलो तं आमची अखीनच पंचाइत ! मंग आमी सिद्दा हिंदीतच बोल्तो. मंग तिकड़्ले काही जन बोल्तंत का हे लोकं मराठीत नाइ बोलतं. तुमी हासना बंद करा तं आमीबी मराठीत बोलून ना जी ! स्यारेत बी झाड़ीत बोलला का सर-म्याड़म हातावर सन्नान सड़ी घुमवतंत. मी पाचवीत होतो तईची गोठ सांगतो तुमाले.. माया वर्गातला एक पोट्टा म्याडमले उत्तर देउन रायला होता तं ’हव’ मनलंन तं म्याडम म्हन्ते का ’ हव’ नाही ’हो’ म्हनाचा. ’हव’ असुद्द आये. आता भाऊ माले सांगा झाड़ीबोली तेवडी असुद्द अना परमान बोली तेवडी सुद्द असा कइ होते का ? माया तं मनना आये का मराठीच्या सप्पाच्या सप्पा बोल्याइचे सब्द प्रमान मराठीत आनले तं मराठी असी अमीर भासा बनंल का , का सांगू तुमाले. आता पाहा ना जी, तुमी ’छिद्र’ मन्ता त्याले आमी तो कसा आये हे पावुन ’सेद’ मनावचा का ’दर’ मनावचा हे पायतो. अजून एक मज्या सांगू का भाऊ, तुमी ’साप’ मन्ता तं आमी त्याले ’सरप’ मन्तो; मंजे सन्स्कृतचा ’सर्प’ अखीनबी आमी वापरतो. ’करावले काये ना धोंड्या सरप खाये’ असी एक म्हन बी आये आमच्यात. परमान मराठीत ’बेडूक’ आहे, आमी त्याले ’भेपका’ मनून अगर का तो मोटा असंल, मतलब ’टोड’ वर्गातला असंन तं, नाई तं ’भेपकी’ बी आये ना ’मंडोडरी’ बी आये.( ’फ़्रॉग’ वर्गातला असंन तं ). परमान मराठीत हेवाले सब्द काऊन नाइ आनत?

झाड़ीबोलीचा उदाहरन देल्लो कावून का हे माही बोली आये. पर असी पतली हालत तं मराठीच्या सप्पाच बोल्याइची आहे जी. सिकले सवरले लोकं बोल्याइले अनपड अनं गावठी लोकाइअची समजतंत. सयरात गेले का परमान बोलावची कोसिस करतंत. करा, बोला बी, मी त्याले नाइ नाइ मनत, पर आपल्या बोलीले विसरावाचा नाइ. आता मी का पुन्यात एकदम असली झाड़ी बोल्लो तं तेतल्या लोकाइअले समजलंच नाइ. परमान मराठीचा तोच मतलब आहे. महारास्ट्रातले दोन मराठी मानूस कोटीबी भेटले तं एकमेकाइसोबत बोलावले अड़चन नाइ आली पाइजे. पर याचा मतलब असा नाइ का दुसर्‍याच्या अना खुदच्याबी मायबोलीले नाव ठेवजाल, अना फ़क्त परमान मराठीचाच तुनतुना वाजवाल, हव का नाई ? मराठीतलेच कई सब्द आता वापरातून जाउन रायले आयेत. बोल्याइचे जतन करावले नाइ पायजे का ? तुमीच सांगा ! तं माले असा मनावाचा आये का आपन आपापल्या बोल्याइत बी लिखावाचा, आपल्या पट्ट्यातल्या लोकाइसोबत आपल्याच बोलीत बोलावचा, आपले सब्द वापराचे, दुसर्‍या भागातल्या लोकाइसोबत बोलावाले पर परमान मराठी वापरावाची. जमला तं धीरेधीरे परमान मराठीत बी आपापल्या बोल्याइतले बढियावाले सब्द आनाचे अना मराठी अमीर करून टाकाची.

मराठीच्या ४२ बोल्या , तेच्यातली बी एक बोली परमान, मंजे राहून रायल्या ४१ बोल्या. तं या ४१ बोल्याइतले सब्द, तेच्यातबी ज्या सब्दाइले परमान मराठीत बेस सब्द नसे तेच्यासाठी वापराले सुरुवात केली तं कितीक चांगला होउन जायल , सोचून पाहा जरा. अना येच्यासाठी पयले सप्पा बोल्याइचा एक बढिया सब्दकोस बनवाचा. जई मी पुन्याले आलो तई माही बहोत पंचाइत होऊन गेली होती. ’पोपट’ नावाच्या भाजीले येती ’ पांढरे वाल’ मन्तंत नाइ तं ’पावटा’ मन्तंत अना आमचा ’मिठटू’ नावाचा पक्षी येती ’पोपट’ बनला. मी ’पोपट’ मांगलो तं मन्ते का येती भाज्या भेटते ! मी मन्लो का हव मी भाजीच मांगत आहो. मंग मने का हे कोन्ती भाजी भाऊ ? मंग मी बोट दावून सांगलो का ते वाली. मंग ते सांगते का यिले आमी अलाना-फ़लाना मन्तो, कोटचे भाऊ तुमी ? ’सांभार’ मांगावले जावा तं मन्ते का भाउ हाटेलात जा ! आता सांभाराले ’कोथिंबीर’ मन्तंत आमाले का मालूम ? आमची असी होते गम्मत नं तुमाले वाटते मज्याक ! मनून मी मन्तो का असा सप्पा बोल्याइचा एक कोस पायजे.( मी ’सब्दाइचा’ कोस मनून रायलो नाइ तं तुमाले वाटल ’सापाची’ कोस ! ) आता इन्टरनेट आये, जालाची दुनिया आये, येती तं काम बोहोतच सोपा झाला आये जी. मंग कराची का सुर्वात ?

जागतिक मराठी भास्यादिनाच्या तुमाले बोहोत सुभेच्छा !

______________________________________________________________________________
टीप :
झाड़ीबोलीत श, ष, छ , ण, ळ नाहीत. श, ष, छ करिता ’स’ वापरले जाते. ’ण’चा उच्चार ’न’ होतो, ’ळ’ चा उच्चार ’र’ होतो, निमशहरी झाड़ीबोलीत मात्र ’ळ’ चा अनेकदा ’ड़’(’सड़क’चा ’ड़’) सारखा उच्चार केला जातो.

( हा लेख २०१२ चा आहे. तेव्हा सर्व बोलीभाषांचा एक संयुक्त कोश शब्दकोश तयार करायची कल्पना मांडली होती तसाच काहीसा उपक्रम मराठी विकीकोशाद्वारे राबवला जात आहे हे माहितगार ह्यांच्या लेखामुळे कळले. मी तिथे झाडीबोलीतले शब्द देण्याचा प्रयत्न करणार आहे.)

भाषाविचार

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

27 Feb 2016 - 9:35 am | बाबा योगिराज

1+
आपल्या उपक्रमास शुभेच्छा.

स्यारेत बी झाड़ीत बोलला का सर-म्याड़म हातावर सन्नान सड़ी घुमवतंत. मी पाचवीत होतो तईची गोठ सांगतो तुमाले.. माया वर्गातला एक पोट्टा म्याडमले उत्तर देउन रायला होता तं ’हव’ मनलंन तं म्याडम म्हन्ते का ’ हव’ नाही ’हो’ म्हनाचा. ’हव’ असुद्द आये. आता भाऊ माले सांगा झाड़ीबोली तेवडी असुद्द अना परमान बोली तेवडी सुद्द असा कइ होते का ? माया तं मनना आये का मराठीच्या सप्पाच्या सप्पा बोल्याइचे सब्द प्रमान मराठीत आनले तं मराठी असी अमीर भासा बनंल का , का सांगू तुमाले.

छड्यामारुन बालमनांवर ओरखडे काढण्याच्या लेव्हलचा प्रमाणभाषा गरज नसलेल्या बाबतीत थोपवण्याचा आग्रह खेदकारक आहे. हा वेगळ्या धागालेखाचा विषय नक्कीच आहे. >>...मराठीच्या सप्पाच्या सप्पा बोल्याइचे सब्द प्रमान मराठीत आनले तं मराठी असी अमीर भासा बनंल का , का सांगू तुमाले...<< या बाबत १०१ टक्के सहमत.

माहितगार's picture

27 Feb 2016 - 9:56 am | माहितगार

मराठीच्या सप्पाच्या सप्पा बोल्याइचे सब्द प्रमान मराठीत आनले तं मराठी असी अमीर भासा बनंल का , का सांगू तुमाले...

+१०१ टक्के सहमत
वरच्या प्रतिसादात माझ्याकडून कदाचित चुकीचा html सिंटॅक्स जोडला गेला म्हणून उर्वरीत प्रतिसाद पुन्हा जोडावा लागला.

नाव आडनाव's picture

27 Feb 2016 - 10:49 am | नाव आडनाव

एकदम माझ्या मनातलं लिहिलंय असं वाटलं ! मी लहान होतो तेंव्हा नगरी बोलायचो, आत्तापण बोलतो. पण आता १३ वर्ष नगरबाहेर राहतोय तर बोलण्यात थोडा फरक आहे पण अजूनही तसंच बोलतो. आधी लोक हसायचे. लोक हसू नयेत म्हणून त्यांच्या सारखं बोलायचं ठरवलं तर ते मलाच बरोबर वाटत नव्हतं. मी नाही, दुसरंच कोणतरी बोलतंय असं वाटायचं :)

इथे सदस्य ~२ वर्ष आहे पण त्याआधी ~५-६ वर्ष फक्त वाचायचो. मिसळपाववरचं सगळंच आवडतं - लेख, कविता, चर्चा. पण त्यातही बोलिभाषेत लिहिलेलं कायमंच जास्त आवडतं. कोणत्याही बोलिभाषेत लिहिलेलं जास्त "आपलं" वाटतं खरंतर. आधी मिथुन भोइर आगरी कथा लिहायचे, संदीप चांदणेंची एक आगरी कथा, तुम्ही, सोन्याबापूंनी लिहिलेली वर्‍हाडी कथा, जव्हेरगंज यांनी लिहिलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भाषेतल्या कथा आणि अश्या बाकिच्या पण कथा, कविता कायम लक्षात आहेत. वेगवेगळ्या बोलिभाषेतल्या कथांमुळे तर गेल्या ~७-८ वर्षांत मिसळपाव वाचायला सगळ्यात जास्त जर कधी आवडलं असेल तर ते गेल्या आठवड्यात.

माहित नाही इथे लिहिणं बरोबर आहे कि नाही, पण माझ्या हापिसातला एक नगरी मित्र आठवला. त्याला प्रेमविवाह करायचा होता. त्याला त्याच्या (न झालेल्या) सासर्‍याने लग्नाला नाही म्हणून सांगितलं. दोघांची जात एकंच, पोटजात सुद्धा एकंच. मित्राच्या न झालेल्या सासर्‍याला नाही म्हणायचं कारण काय होतं - मित्र नगरी बोलायचा :( भाषेवरून कायकाय मतं एकेकाची. आपापल्या बोलिभाषा सगळेच बोलले तर त्यात काही कमीपणा नाही असं समजेल एक दिवस लोकांना अशी आशा करू :) त्याच बरोबर सगळ्याच बोलिभाषा टिकतील अशी पण आशा आणि प्रयत्न सगळे मिळून करू.

बोलीभाषा लिहिली वाचली बोलली जायलाच हवी.
लेख अतिशय आवडला हेवेसांन.

सस्नेह's picture

27 Feb 2016 - 12:14 pm | सस्नेह

बोलीला प्रतिष्ठा मिळवून द्यायचीच !

अभ्या..'s picture

27 Feb 2016 - 12:21 pm | अभ्या..

काय म्हणता...
आमच्या सोलापुरीची कोल्लापुरात आन पुण्यात जेवढी मापे काढली गेली तेवढी कुठे निघाली नाहीत. ;)

प्रचेतस's picture

27 Feb 2016 - 2:58 pm | प्रचेतस

सुरेख मुक्तक.

बाकी झाडीबोलीवरुन आठवले. ह्या चंद्रपूर,गडचिरोली, नागपूर,भंडारा ह्या भागाचे मूळचे नाव झाडीमंडळ बहुत प्राचीन. थेट यादवांपासून किंवा त्याहीपूर्वीपासून चालत आलेले.

देवगिरीचा अखेरचा स्वतंत्र यादवसम्राट रामचंद्रदेवाच्या ठाणे ओवळे ताम्रपटात हेमाद्रीपंडीताने झाडीमण्डळ जिंकल्याचा उल्लेख आला आहे.

समस्त हस्तिपकाध्यक्षो निजगुणसुभगभावुके समस्तकरणाधिपत्यमंगी कुर्वाणेच निर्ज्जित झाडीमंडले मंत्रीचुडामणी गुणरत्नरोहणाद्रौहेमाद्रौ |

सर्व हत्तीदळाचा प्रमुख, करणाधिप (अर्थ खात्याचा प्रमुख), मंत्रीचुडामणी अशा सर्व गुणरत्नांनी युक्त अशा हेमाद्रीने झाडीमंडळ जिंकले आहे.

स्वामी संकेतानंद's picture

27 Feb 2016 - 8:14 pm | स्वामी संकेतानंद

यप्प. हां सन्दर्भ माहीत आहे. झाडीमंडळ चे आता झाडीपट्टी झाले असले तरी प्राचीन काळापासून 'झाडी' शब्द प्रचलित आहे हे रोचक आहे.

हा लेख २०१२ चा आहे. तेव्हा सर्व बोलीभाषांचा एक संयुक्त कोश शब्दकोश तयार करायची कल्पना -----

आपल्या मिपावर शब्दकोश नको , आता जे लेख येत आहेत तेच बरे आहेत.फारतर सर्व एका सदरात वेगळे करा.गम्मतीने शिकले की बरं वाटतं.

आणि आजपासून सर्वांनी मराठी/देवनागरी कळफलकावरूनच टंकन सुरू करा.चार ओळी कमी लिहा पण मी बोलतो मराठी,लिहितो मराठी,हसतो मराठी होऊ द्या.

स्वामी संकेतानंद's picture

27 Feb 2016 - 8:14 pm | स्वामी संकेतानंद

मिपा वर नाही, विकी वर.

विवेकपटाईत's picture

27 Feb 2016 - 5:24 pm | विवेकपटाईत

लेख आवडला.

पैसा's picture

27 Feb 2016 - 8:22 pm | पैसा

अगदी १००% पटलं. या बोली टिकवायसाठी काय आवश्यक ते केलंच पाहिजे! आणि या बोलीत लिही. कळतंय. हळूहळू सवय होईल सगळ्यांनाच. विकिवर संयुक्त शब्दकोष होऊ दे. खूप शुभेच्छा!

वेल्लाभट's picture

28 Feb 2016 - 12:41 am | वेल्लाभट

वाह !