कथा ( भाग ४ )

अँन्ड्रोमेडा's picture
अँन्ड्रोमेडा in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 8:03 pm

"अहो सर कशाला विषाची परीक्षा घ्यायला निघाला आहात तुम्ही ? आणि बाकी फक्त तुम्ही तुमच्यापुरता निर्णय घेत असता तर माझा काही अधिकारही नव्हता तुम्हाला विरोध करायचा पण तुम्ही इतक्या मुलांना सोबत घेऊन जायचं म्हणत आहात मी कशी परवानगी देऊ ? आणि ज्यांना घेऊन जाणार आहात त्या मुलांच्या पालकांची परवानगी नको का ? आणि एकदा का त्यांना समजलं की मुलांना कुठे घेऊन जायचं म्हणत आहात तर शाळेवरची कौलच काय पण आपल्या डोक्यावरचे केसही शिल्लक राहणार नाहीत . "

" ते का सर ? "

" अहो इतके जोडे पडल्यानंतर केस राहतील का ? "

" ते नाही सर मी म्हणतोय ते लोक अस का करतील ? "

" अहो सर तुमचा विश्वास नाही ठीक आहे पण या लोकांचा या गोष्टींवर विश्वास आहे आणि आपण इथं राहतो , काम करतो तिथल्या लोकांच्या विरोधात कशाला जायच ? "

" अस कस म्हणता सर तुम्ही ? आपण शिक्षणाच व्रत हाती घेतलं आहे . अशा अंधश्रद्धांपासून लोकांना बाहेर काढण आपल कर्तव्य आहे . "

" हे पहा पाटील सर तुम्ही तरूण आहात साहसी आहात तुमच्यात काम करण्याची धडाडी आहे . पण हे सगळे गुण मुलांना शिकवताना वर्गात वापरा . उगाचच विनाकारण कुठलीही माहिती नसताना एखाद्या परिसरात जाणं कितपत योग्य आहे ? बर अंधश्रद्धा राहू द्या बाजूला पण तिथं काय जंगली जनावर असतील इतर काही धोके असू शकतात . तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जात होता ते सगळे लोक तरूण होते सज्ञान होते .बाकी ही मुलं ना धड लहान ना धड मोठी , अडनिड वय आहे त्यांच . या वयात भलत साहस करण्याची इच्छा होते . त्यातुन कुणाला काय इजा झाली , दुखापत झाली तर एवढ्या बिकट जागी मदत तरी कशी पोहोचवायची ? सोबत मुली आहेत . अहो केवढी जवाबदारी आहे ही . आणि तुम्हाला आणि तुमच्या सोबत एका शिपायाला हे सगळं झेपेल का ? आणि मुख्य म्हणजे आपल्याला शैक्षणिक सहल काढायची असते . हा कसला जंगल भ्रमणाचा कार्यक्रम आखताय तुम्ही ? नाही . अजिबात नाही मी साफ सांगतो मी याला अजिबात परवानगी देणार नाही . "

" अहो सर मुलांना आपला परिसर समजेल झाडांची प्राण्यांची ओळख होईल . त्या परिसरात एक प्राचीन मंदिर आहे ते दाखवता येईल . "

" सर कोणते प्राणी आहेत तुम्हाला तरी माहीत आहे का ? वाघ , बिबट्या , रानडुक्कर असे प्राणी नसतील याची खात्री आहे का तुम्हाला तरी ? बर आपल्या आसपासची माहितीतील झाड सोडली तर इतर झाड तुम्हाला तरी ओळखता येतात का ? काय सांगणार आहात तुम्ही त्यांना ? आणि ते मंदिर त्यात कुठला देव आहे ते गावातही कुणाला माहिती नाही . तर आता हा विषय इथच संपवा . "

" पण सर ... "

" या उपर तुम्हाला तिकडं जायची हौस असेलच तर आधी तुम्ही एकटे जाऊन या तिकडे आणि जगला वाचला तर मग आपण बघू . "

" ठीक आहे सर मान्य आहे मला . चला सर येतो मी . " एवढ बोलून पाटील सर आपल्या वर्गावर गेले .ते गेलेले पाहून शाळेचा शिपाई पांडू मुख्याध्यापकांच्या खोलीत आला .
" काय साहेब मग मलापण जाव लागेल तिकडं . कशाला अस करताय ? पाटील सरांना समजावून सांगायचं सोडून परवानगी दिली तुम्ही ? "

" अरे नविन खोंड आहे कानात वारं भरलं की उधळायचच . बाकी समजावण्याच काम मी केल . त्यांना नाही ऐकायचं त्याला आपण काय करणार ? जाऊदे एकदा तिकडं , वाटेतच चांगली टरकेल तेव्हा येईल ताळ्यावर . आणि बाकी जगला वाचलाच तर शेवटी पालकांना कुठं जायचं त्याची माहिती द्यावी लागेलच . आणि त्यांच्या परवानगी शिवाय तर काम करता येणार नाही ना . मग झाल तर आणि ते काम त्याच्यावरच सोपवेन . तोंडावर पडून येईल माघारी . बाकी काय जोडे खायचे आहेत ते त्याला खाऊदे . ठीक आहे ? तू नको करु काळजी . जा आता ."

पांडू बाहेर येऊन बसला . काय साहेब येडा झालाय का म्हणे जगला वाचला तर पुढचं बघु . तिकडं मरनाच्या दारातन कोन आलय का माघारी ?

घण् घण् घण् ... पांडू घंटा वाजवत होता . ती आणि त्याच्या डोक्यात वाजणारी घंटा यात कोणती जास्त वाजते आहे ते समजत नव्हत .

सदू वेडापिसा होऊन धावत होता . कुणाच्या थांबण्यान तो थांबत नव्हता . मागं वळून पहात पहात परत वेग वाढवून जिवाच्या आकांतान पळत होता . काय होतं मागं जे त्याला दिसत होत ? एका दगडाला ठेच लागून तो पडला . लोकांनी त्याच्या भोवती घोळका केला . लोक त्याला अनेक प्रश्न विचारत होते पण त्याच चित्त था-यावर नव्हत . त्याचे डोळे पांढरे होत होते . नजर भिरभिरत होती . कोणीतरी त्याला पाणी देऊ केल . त्यान एखादा घोट पिला आणि घाबरून किंकाळी फोडली . या सगळ्या प्रकारानं सगळेच चरकले . शेवटी त्याला उचलून त्याच्या घरी नेहून सोडल . तो अंगाचं मुटकुळ करून पडला होता . पण त्याची ती नजर , ते ओरडण सारच बेचैन करत होतं . तो पुढे चार दिवस जगला . पण त्या चार दिवसात त्याची अवस्था पाहून कुणालाही असच वाटायचं असे हाल होण्यापेक्षा याला मरण आल तर बर होईल , सुटेल बिचारा . सुटला शेवटी . एक जीव त्या मरणापेक्षा वाईट जगण्यातून सुटला होता .

" सदू अरे सदू कुठे तंद्री लागली आहे तुझी ? "

" काय नाही सर बस आपल असच . "

" अरे मुख्याध्यापक आहेत का मोकळे का काही कामात आहेत ? "

" अं . नाही .. मी .. मी बघतो . "

" अरे तू राहूदे चित्त था-यावर नाही तुझं. मीचं बघतो . "

राऊत सर गेले आणि पांडू विचार करू लागला . चित्त कस था-यावर असेल . काहीतरी अघटीत घडण्याचे संकेत वाटताहेत सगळे . आँ राऊत सर मला सदू म्हणले काय ? नाही नाही माझीच ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल . देवा सगळ्यांना सदबुद्धी दे आणि गावावर नजर असू दे बाबा ...

... क्रमशः
भाग १
भाग २
भाग ३

कथा

प्रतिक्रिया

एस's picture

25 Feb 2016 - 8:56 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

अँन्ड्रोमेडा's picture

26 Feb 2016 - 11:11 am | अँन्ड्रोमेडा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद