राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
12 Feb 2016 - 5:35 pm

ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल.

-------------------------------------

जेंव्हा आपण शिक्षकाच्या खिजगणतीत देखील नसतो तेंव्हा त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो पण जेंव्हा तो शिक्षक आपण बेसावध असताना अख्ख्या वर्गासमोर एकदम "हां, तू पुढे ये रे, तुला हे माझ्यासाठी करायचे आहे" असे सांगतो तेंव्हा आपली जी काही पाचावर धारण, तंतरणे, बोबडी वळणे, पोटात खड्डा पडणे अश्या शब्दात व्यक्त होण्यासारखी अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था आज सकाळी मंदार काळेंचे नोटिफिकेशन पाहून मी अनुभवली. नेमका मोकळा वेळ होता आणि बऱ्याच दिवसापासून मनात ठरवून ठेवलेली कामगिरी काळे गुरुजींनी सोपवली म्हणून गांगरलेल्या अवस्थेतही आनंद झाला. आणि राशोमोनच्या मागे लागलो.

काही काही गोष्टी जुळून येतात. मी आधीच राशोमोन पाहिलेला असता तर कदाचित तो मला इतका भिडलादेखील नसता. पण माझ्या सुदैवाने मी आधी तुमची लेखमाला वाचली आणि मग चित्रपट यु ट्युबवर पाहिला म्हणून मी त्याला एका वेगळ्या पातळीवर अनुभवू शकलो. कदाचित मी शब्दचित्र समजणारा माणूस असीन आणि तुम्ही अतिशय चांगले शब्दचित्रकार असल्याने चित्रपट पाहताना त्यातील बारकावे, त्यात वापरलेली प्रतीकांची भाषा, दिग्द्शर्काचे चित्रभान आणि पटकथेची रंगत अगदी चटकन समजत होती. एका जाणकार रसिकाकडून एखादा चित्रपट पूर्ण समजून घेऊन मग तो पाहण्याचा माझा हा माझा पहिलाच अनुभव आणि तो कमालीचा आनंददायी होता. हा कल्पनातीत आनंद माझा अगदी हात धरून आग्रहाने भरभरून दिल्याबद्दल तुमचे आभार, अगदी मनापासून आभार.

तुमच्या लेखमालेबद्दल बोलायचे झाल्यास मला त्याचे दोन भाग दिसतात. एक म्हणजे तुमचे अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक प्रास्ताविक जे पहिल्या लेखात आहे आणि दुसरा म्हणजे तुम्ही संपूर्ण चित्रपटाचे केलेले वर्णन जे उरलेल्या सात भागात आहे.

सत्य निश्चिती / प्रस्थापना

लेखमालेचे प्रास्ताविक तुमच्या व्यासंगाची प्रचीती देणारे आहे. एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत.
१) सिद्ध करूच द्यायचे नाही, आणि हे स्वयंसिद्ध आहे म्हणूनच सत्य आहे असेच मांडायचे.
२) जे आपण समजतो ते आपल्या मनात नैसर्गिकरीत्या आले म्हणजे ते सत्यच असणार ही समजूत.
३) जे विश्वासार्ह व्यक्तींकडून आले ते सत्य असणारच ही समजूत.
४) जास्तीत जास्त लोक जे मानतात ते सत्य असे लोकशाहीसारखे सत्य.
५) जास्तीत जास्त लोक जे सत्य मानत असतील असा आपला समज असतो ते आपोआपच आपल्याला सत्य वाटू
लागते.

यात मला अजून एक सांगावेसे वाटते की सर्वसामान्य माणूस त्याच गोष्टीला सत्य म्हणून मान्यता देतो जी त्याला त्याच्या परंपरांच्या सरळ रेषेत ठेवता येते. उदाहरणार्थ सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक दही हंडी उत्सव, सार्वजनिक नवरात्रोत्सव; मान्य करायला आपल्याला प्रेषिताची गरज लागली नाही कारण हे सगळे आपल्या परंपरांच्या सरळ रेषेत होते. हे सत्य चटकन प्रस्थापित होते कारण ते परंपरांच्या सरळ रेषेत असते.

परंपरांना छेद देणारी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रेषितांची गरज भासते. असे प्रेषित जे केल्या कामाची फळे चाखत नाहीत, बलिदान देतात किंवा मग त्यांच्या कामाला त्यांच्या हयातीतच इतकी प्रचंड फळे येतात की त्यांनी चाखलेली फळे नगण्य वाटू लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, मोझेसने त्याच्या हयातीत ज्यू लोकांना इजिप्त मधून बाहेर काढले नसते आणि यहोवाच्या प्रार्थनेत वळवले नसते तर अजून हजारो वर्षे ज्यू लोक इजिप्शियन देवांची पूजा करत गुलामीचे जीवन जगणे सत्य मानत राहिले असते. जर येशूने नवा करार आणला नसता तर ख्रिश्चन जुन्या कराराखाली ज्यू म्हणूनच जगणे सत्य मानून राहिले असते. जर मुहम्मदांनी त्यांच्या हयातीत जेरुसलेमच्या दिशेने प्रार्थना करणे बंद करून मक्केची दिशा पकडली नसती तर आजही मुस्लिम समाज जेरुसलेमच्या दिशेने नमाज अदा करणे आपल्या ईश्वराप्रती समर्पणाची सत्य अभिव्यक्ती आहे असे समजून राहिला असता. किंवा अनेक अरबी टोळ्या काबाच्या देवालयात आपापल्या कुल / टोळी देवतेच्या मूर्तीची पूजा करत राहिल्या असत्या.

परंपरांना छेद देणारी गोष्ट प्रेषिताशिवाय गळी उतरवण्याचा प्रयत्न केला की त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढीत रहातात. मग ती सतीबंदी असो किंवा अस्पृश्यता असो किंवा जाती प्रथा असोत. एका झटक्यात प्रवाहाचे सत्य बदलत नाही, त्यासाठी प्रेषिताचे बलिदान लागते किंवा विजयी संस्कृतीचा पराभूतांवर सर्वंकष विजय लागतो.

सत्याचे अन्वेषण / आकलन

या प्रस्तावनेत तुम्ही सत्याचे खंडश: प्रकट होणारे आणि अंशात्मक सत्य (या ठिकाणी मला 'अंशतः सत्य' हा शब्द जास्त चपखल वाटतो) असे दोन प्रकार सांगितले आहेत, ते या विषयावर मी आत्तापर्यंत वाचलेले सर्वात परिष्कृत विचार आहेत.

सत्याचे अन्वेषण करण्याच्या संदर्भात आपण जी मते मांडली आहेत त्या संदर्भात मला अजून एक सांगावेसे वाटते की, एखाद्या गोष्टीचे आकलन आपल्याला ज्ञानेन्द्रीयांद्वारे होते. म्हणजे ज्ञानेन्द्रीयांद्वारे घटना आपल्याला जाणवतात. ही ज्ञानेंद्रिये सगळ्यांना सारखी असतील याची खात्री नाही. त्यामुळे डोळस, आंधळा, रंगांधळा यांची होणारी फसगत आणि त्यामुळे होणारे सत्याचे अपूर्ण दर्शन हा मुद्दा आपण छान मांडला आहे.

त्यापुढे जाऊन मी असे म्हणीन की, जरी आपण सर्व साक्षीदारांना सर्व ज्ञानेंद्रिये सारख्याच क्षमतेची दिली, त्यांची आकलनक्षमता सारखीच असू दिली तर त्या सर्वांना होणारे सत्याचे दर्शन सारखेच असले तरी ते पूर्ण सत्य असेल याची खात्री नाही. कारण ज्ञानेद्रीयांची सत्य ग्रहण करण्याची मर्यादा हा मुद्दा आपण विचारात घेतला नाही.

आत्ता या क्षणी माझ्या घरात आम्ही पाच जण नाक, कान, डोळे यांची पूर्ण क्षमता वापरू शकणारे असलो तरीही आम्ही या क्षणी घरात फिरणाऱ्या रेडीओ लहरींना रेडीओ न लावता ऐकू शकत नाही आणि केबल कनेक्शन व टी व्ही शिवाय आम्हाला वेढून टाकणाऱ्या टी व्हीच्या लहरी आम्हाला जाणवत नाहीत. पूर्ण विकसित ज्ञानेंद्रिय असून देखील आम्हा पाचजणांना या लहरींचे सत्य अस्तित्व जाणवत नाही. थोडक्यात आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा हा देखील आपल्याला सत्याचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्याच्या मार्गातील अडथळा असतो.

सत्याचे प्रकटीकरण

जी गत ज्ञानेन्द्रीयांची तीच गत कर्मेंद्रियांची. जर जाणवलेच अर्धे मुर्धे, त्यातले आकळलेच अजूनही थोडे मग त्याचे पुन्हा प्रकटीकरण करण्यासाठी वापरायची साधने शब्द, चित्र, शिल्प, नृत्य, अभिनय अशी एकांगी आणि तुटपुंजी तर मग आपल्यासमोर प्रकटलेले सत्य इतरांसमोर जसेच्या तसे प्रकट करण्यात आपण अपयशी ठरलो नाही तरच नवल. वर ते सत्य जर आपल्या स्वतः संबंधी असेल तर मग अहंकार आणि स्व- प्रतिमा प्रेम, जाणवलेल्या सत्यावर आरूढ होतात. समाजाने मानलेल्या आदर्शांप्रमाणेच आपले वागणे होते हे दाखवण्याच्या नादात आपण जे प्रकट करतो ते जाणवलेले सत्य (experienced truth) नसून आपण उत्पादन केलेले सत्य (manufactured truth) असते.

जंगल वाटांवरचे कवडसे

चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र म्हणजे एकच प्रसंग विविध व्यक्तींच्या दृष्टीकोनातून वेगवेगळा दिसत असताना त्यातले त्या प्रसंगाचे सत्य स्वरूप कोणते मानायचे? हा आहे. आणि मग या मध्यवर्ती सूत्राची, तुम्ही, मला माहित नसलेला बंडखोर हा प्रवचन संग्रह, माझ्या आवडीच्या, जी एंच्या ठिपका, कळसूत्र, विदूषक आणि यात्रिक या कथांबरोबरच ऑस्कर वाईल्डचा डोरायन ग्रे; या विविध संदर्भांबरोबर, केलेली गुंफण तुमच्यातील सृजनशीलतेची साक्ष देणारा आहे.

इथे एक प्रश्न येतो की, सृजनशीलता म्हणजे तरी नक्की काय? दोन गोष्टींमधला संबंध चटकन जाणवत नसला तरीही तो उलगडून दाखवणे किंबहुना विस्कळीत, स्वयंपूर्ण गोष्टींना एका सूत्रात गोवून त्यांची एक सुसंगती निर्माण करणे म्हणजेच सृजनशीलता. जेंव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीचे सृजन करीत असतो तेंव्हा प्रत्यक्षात विस्कळीत आणि स्वयंपूर्ण गोष्टींना एकत्र रचत असतो. जितकी आपली रचना मनाला सुसंगत वाटते तितकी ती कृत्रिम न वाटता सत्य वाटू लागते. या अर्थाने सृजन हे देखील एक प्रकारे सत्यापलाप ठरते. परंतू स्वभावतः विसंगत गोष्टींमध्ये सुसंगती मानून त्यात अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची मानवाची प्रवृत्ती नैसर्गिक असल्याने आपण सृजनशीलतेला सत्याचा अपलाप करणारा दुर्गुण न मानता; निरर्थक सत्याला मान्य करण्यासाठी, त्याची दाहकता कमी करण्यासाठी निसर्गाने माणसाला दिलेले वरदान समजूया.

या अर्थाने जेंव्हा मी संपूर्ण लेखमालेचे शीर्षक वाचतो तेंव्हा मला खरेच तुमच्या समर्पक शब्दयोजनेने अतिशय आनंद होतो. आपला सत्याला जाणण्याचा प्रवास म्हणजे, जंगलात पडलेल्या पाचोळ्यात जन्म घेऊन त्या पाचोळ्यातच मरण पावणाऱ्या क्षुद्र किड्याने, प्रकाशाच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने तयार झालेल्या कवडश्यांकडे पाहून त्या प्रकाशाचा स्त्रोत कसा असेल याचे आडाखे बांधण्यासारखा आहे.

भलेही आपण या सत्यान्वेषणामध्ये असफल होऊ आणि भलेही जी एंच्या यात्रिक मधला न्हावी सॅंचोला सांगत असेल की 'शेवटी अंधारात सगळीच मांजरे काळी'. तरीही प्रकाशात ती कशी दिसत असतील याचा शोध आपण घेतच राहू. मग तो प्रकाश कवडशांच्या रूपात का असेना.

क्रमश

चित्रपटप्रतिक्रियाआस्वादलेखमतविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पा भाऊ किंवा स्पा ताई, प्रतिसादाबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार.
माझ्या लेखनामुळे म्हणा किंवा स्वतःचा पूर्वग्रह कायम ठेवावा अथवा तोडावा या विचाराने म्हणा, पण तुम्ही चित्रपट पाहिलात. तुमचे खरोखर कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. या लेखमालेवरचा प्रतिसाद पहाता कोणी हा चित्रपट पाहील अशी मी आशाच सोडली होती. पण तुम्ही आणि सतीश गावडेंनी चित्रपट पाहिलात. मला उगाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय.
पण सतीशना आवडल्याबद्दल ते मला काही देणार नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला न आवडल्याबद्दल मी तुम्हाला काही नुकसान भरपाई देणार नाही आहे. ;-)
मला तर वाटते आहे की मी आता कुरोसावाकडून आणि ररांकडून मार्केटिंग चे पैसे घ्यावेत. ;-)

अभ्या..'s picture

20 Feb 2016 - 1:27 pm | अभ्या..

आनंदराव नमस्कार.

आपले लिखाण कसदार आहे, पण आपण जे प्रतिसाद/उपप्रतिसाद देत आहात ते दिवसेंदिवस अधिक कृत्रिम आणि मानभावी होत चालले आहेत असे निरिक्षण नोंदवतो.

अस्सल जीवनात कोणी इतका सालस माणूस भेटला नसल्यानही असे वाटू शकते तस्मात क्षमस्व.

मला भेटा…इतकेच म्हणीन.

अभ्या..'s picture

20 Feb 2016 - 1:37 pm | अभ्या..

अवश्य. मला आनंद वाटेल. तेंव्हा आपण थोडी हलक्या फुलक्या लेखनावर चर्चा करुयात. ;) माझा लेखनातला क्रियेटीव्ह ब्लॉक निघायला मदत झाली त्याने तर जास्त चांगले.

एकदा वाटलं तुम्हाला खरड किंवा व्यनि पाठवावा. पण मग म्हटलं की तुम्ही लिहिताय, पण तुमच्या सारखे मत असूनही न लिहिणारे अनेक जण असतील कदाचित मिपावर. म्हणून मग इथेच प्रतिसाद द्यायचे ठरवले.
या लेखावरचे प्रतिसाद चार प्रकारचे आहेत.
१) पुभाप्र किंवा कळले नाही असा प्रांजळ अभिप्राय देणारे प्रतिसाद. मी त्यांना उप प्रतिसाद दिले नाहीत.
२) लेख सोडून नवीन मुद्दा मांडून त्यावर चर्चा करणारे. बोका - ए - आझम यांचा प्रतिसाद आणि त्यावरचे प्रतिसाद. त्यालाही मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
३) लेखाला आणि त्याच्या मागच्या विचाराला समजून घेण्याचा प्रयत्न करणारे प्रतिसाद: सटक यांच्या प्रतिसादावर मी विषयाला आणि प्रतिसादाला साजेशी प्रतिक्रिया दिली आहे असे मला वाटते.
४) लेखाच्या केंद्रस्थानी असलेला कुरोसावाचा चित्रपट, ररांची लेखमाला, आणि स्वतः ररा यांच्याबद्दल पूर्वग्रह असलेले आणि त्यामुळे लेखाच्या मुद्द्यावर काहीही न बोलता तीव्र शब्दांचा उपयोग करून धूळ उडवण्याचा प्रयत्न करणारे. मला एखादी गोष्ट आवडली की मी तिचे तोंड भरून कौतुक करतो. पण आवडली नाही तर मात्र तिच्यातील वैगुण्ये शोधत बसण्याऐवजी तिच्याकडे दुर्लक्ष करून माझे मन दुसरीकडे गुंतवतो. माझ्या अश्या स्वभावामुळे,या चौथ्या प्रकारच्या प्रतिसादांनी, मला सुरवातील थोडा त्रास झाला पण मग मला ते सगळेच एकदम गमतीदार वाटू लागले. आणि मी अश्या प्रतिसादांना साजेसेच प्रतिसाद देऊ लागलो. कुणाला दुखावण्यापेक्षा त्याच्या बोलण्यातील विसंगती हळूचपणे दाखवणे मला जास्त आवडते. त्यामुळे मी वाद घालीत असलो तरी संवाद चालू राहील आणि प्रतिपक्षाला बाहेर निघायला जागा राहील याची काळजी घेतो. समर्थांच्या "तुटे वाद संवाद तो हीतकारी" या वचनावर माझा विश्वास आहे. पण समोरच्याचा मान ठेवून अलगद त्याला आपले म्हणणे मान्य करायला लावणे थोडी कठीण कला आहे. त्यात मी कच्चा असावा. त्यामुळे तुम्हाला माझे असले प्रतिसाद कृत्रिम वाटणे शक्य आहे. आणि हेच प्रतिसाद जास्त असल्यामुळे तुम्हाला, मानभावीपणाचा वास येऊ लागला असेल.

त्याही पुढे जाऊन मी असे म्हणीन, की माझ्या लेखनाच्या विषयांबद्दल जर तुमच्यासह इतर कुणाचा काही पूर्वग्रह झालेला दिसतोय. मिपावर मी आधी विनोदी लिखाण टाकले आणि मग थोडे वेगळे लिखाण टाकले त्यामुळे असे झाले असेल. फेसबुकवर याच्या अगदी उलट झाले. कारण तिथे मी कायम गंभीर विषय माझ्या परीने लिहीत होतो. आणि जेंव्हा मी तिथे विनोदी लेखन टाकले तेंव्हा अनेकांना धक्का बसला. माझी reunion ची कथा अनेकांनी स्वानुभव कथन म्हणून वाचली आणि त्यामुळे अनेकांना तिचा शेवट आवडला नाही. खरा स्वानुभव सांगायचे तर मी reunion ला येणार नाही, कारण अश्या कार्यक्रमात मी कानकोन्डला होतो, ते मला आवडत नाहीत, हे त्याच्या आयोजकांना सकारण सांगितले होते. पण मग त्याच्यावर एक कथा चांगली होईल असे मला वाटले. म्हणून मी ती लिहिली. तिचा वेगळा शेवट मी फेसबुकवर टाकला आहे.

माझे तुम्हाला एकच सांगणे आहे. मी वेगवेगळे विषय हाताळतो. सगळ्यात मी समर्थपणे लिहू शकणार नाही याची मला खात्री आहे. आणि त्या त्या विषयावर माझे लेखन जरी सकस असले तरी ते प्रत्येकाला आवडेलच याची खात्री नाही. त्यावर कुणी विषयाला धरून साद दिली तर मी देखील तसाच प्रतिसाद देईन. अन्यथा या लेखामुळे मला कृत्रिम आणि मानभावी प्रतिसाद देण्याचा चांगलाच सराव झाला आहे.

अभ्या..'s picture

20 Feb 2016 - 4:11 pm | अभ्या..

असो. अपली भूमिका कळाली. जनातले मनातले यात साहित्यासाठी स्तुतीप्रतिसाद अथवा न आवडल्याची पावती असावी, कारणासहित दिले तर उत्तमच, क्वचित एक्स्ट्रा रेफरन्स द्यावेत कुणी एवढीच अपेक्षा असते. त्यावर समग्र चर्चेसाठी काथ्याकूट आहेच. तिथे धुळवड होउदे अथवा दिवाळी. देणेघेणे नाहीच. मिपावर आधी कुणीतरी म्हणल्याप्रमाणे लेखकाने ललित साहित्य एकदा लिहून झाल्यावर जास्त खुलासेही देऊ नये आणि उपप्रतिसादाची फेस्बुकी लाईनही लावू नये या मताचा मी आहे.
आपणास आगामी लेखनासाठी शुभेच्छा. बाकी लेखनसीमा.

इट्सस फाइन मोरे काका/काकु

फक्त काका. काकू लिहित नाहीत. इतकेच काय पण मी लिहिलेले वाचीत सुद्धा नाहीत. किंबहुना, "इथे माझे डोके खाण्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग शोधा" या त्यांच्या सल्ल्यामुळेच मी इथे आलो आहे.

प्रचेतस's picture

20 Feb 2016 - 5:35 pm | प्रचेतस

हा स्पा केवळ शारुक मिथुनआदींचे सुमार चित्रपट बघत असल्याने त्याला अभिजात चित्रपट कळेनासे झालेत असं वाटतंय.

शतक पूर्तीसाठी लिहितोय.… बाकी प्रत्येकाला त्याची आवड अभिजात वाटू शकते शकते… त्यामुळे स्पा ना शुभेच्छा

मला शुबेच्चा दिल्यात म्हणून लिहितोय, मला अभिजात वेग्रे काही कळत नाही, मला कुठलेही सत्य उमगवायचे नाही, आयुष्य सरळ सोपे आहे, उगा रोशोमानिक काॅन्स्टिपेटेड चित्रपट पाहाण्यापेक्षा मी मिथुन चे चित्रपट बघिन .

बाकी काही लोक सातवाहन कालिन दगडातही रमतात, ज्याची त्याची आवड

प्रचेतस's picture

21 Feb 2016 - 4:19 pm | प्रचेतस

खी खी खी.

दगड सातवाहनकालीन नसतो ओ, तो क्याम्ब्रियनपूर्वकालीन असतो.

अभिनंदन पहिल्या शतकानिमित्त..
आता यापुढे उपप्रतिसाद देण्याची गरज नाहीं ;)

तर्राट जोकर's picture

21 Feb 2016 - 1:20 pm | तर्राट जोकर

आवरा..खरंच ;-)