एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो.
पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स. प्रकाशाचे गोळे वगैरे. त्या युद्धाची एकदम मोठी ठळक आठवण म्हणजे गल्लोगल्ली सुरु झालेले पी सी ओ / एस टी डी / आय एस डी चे फोन बूथ. मोबाईल अजून यायचे बाकी होते. म्हणून गल्फ मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांसाठी संवाद करण्याचा तो महत्वाचा दुवा होता. माझा प्रिय मित्र ओंकार पत्की याचे बाबा सौदी अरबला असायचे. जेंव्हा अमेरिकेने चढाई सुरु केली त्या दिवशी ते सौदीला परत गेले होते. त्यानंतर ओंकार आणि त्याची आई यांची जीवाची घालमेल जवळून पाहिली होती. युद्ध तसे दूरच होते ते जवळ आले होते केवळ ओंकारच्या बाबांमुळे.
नंतर करीअर आणि अभ्यास करताना हे दूरचे युद्ध विसरलो. जवळपास १० वर्षांनी स्वतःचा क्लास चालू केला क्लासमध्ये मुलांना १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामागची कारणे शिकवताना, भारतापुढील परकीय चलनाचे संकट गल्फ युद्धाने वाढले हे सांगताना युद्धाचे आर्थिक परिणाम वाचायला मिळाले. आणि दूरचे युद्ध आर्थिक अंगाने दिसू लागले. एअरलिफ्टमुळे झाले काय की या दूरच्या आणि केवळ आर्थिक बाजू दिसलेल्या युद्धाला माझ्या मनात मानवी स्पर्श मिळाला. आणि गेल्या दहा वर्षात वाचनामुळे कल्पिलेल्या आणि आंतरजालामुळे वाचू किंवा बघू शकलेल्या अनेक गोष्टी अधिक परिणामकारकपणे अनुभवता आल्या. त्यांची दाहकता अंगावर आली. आपण किती सुरक्षित जीवन जगत आहोत ते जाणवले.
२०१५ च्या एप्रिल मध्ये झालेले "ऑपरेशन राहत", ज्यात येमेनमधून ४६४० भारतीयांना आणि ९६० परदेशी लोकांना बाहेर काढले गेले त्या सुटकेचे आपण सर्व साक्षीदार होतो. आता २४ तास चालणारी माध्यमे आणि त्याशिवाय सोशल मिडियाद्वारा सतत हातात मिळणाऱ्या अपडेट्स यामुळे आपण त्याचा थरार अनुभवू शकलो होतो. पण जेंव्हा संपर्काची साधने तुटपुंजी होती त्या काळात १,७०,००० लोकांना १३ दिवस दिशाहीन आणि नंतरचे ५९ दिवस त्या युद्धकाळात वाळवंटात कसे वाटले असतील त्याची जाणीव एअरलिफ्ट अगदी यथार्थपणे करून देतो.
मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीशी मोझेस बद्दल बोललो होतो. इजिप्तच्या राजदरबारात वाढलेला मोझेस. रामसिस राजाच्या भावासारखा वाढलेला मोझेस. ४०,००,००० लोकांना केवळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा मोझेस. मग वचनात सांगितलेल्या दुधा मधाच्या प्रदेशापर्यंतची सिनाई च्या वाळवंटातील ४० वर्षाची दिशाहीन, कंटाळवाणी आणि असुरक्षित वाटचाल करणारा मोझेस. अन्न धान्याची टंचाई. अनुयायांचा अविश्वास, त्यांच्या कटकटी सहन करणारा मोझेस. देवाकडून स्पष्ट दिशानिर्देश मिळत नाही म्हणून हतबल झालेला मोझेस. जोशुआ सारख्या मदतनीसांच्या आधारे सर्व अडचणीना पुरून उरणारा मोझेस. यातील अनेक गोष्टी मला रणजीत काट्याल मध्ये दिसल्या.
इराकी सैनिक निशस्त्र कुवेती नागरिकांना जवळून डोक्यात गोळ्या घालताना पाहिले आणि दक्षिण व्हिएतनामच्या National Police चा प्रमुख असलेला लोन ग्युएन चे एडी अॅडम्स ने काढलेले जगप्रसिद्ध छायाचित्र आठवले.
"टिपू सुलतान" जहाज युनोच्या बंदीनंतर वळताना बघितले. ५०० लोक भंगार जहाजात बसून कुवेत बाहेर पडताना बघितले आणि तीन रात्री जागून रडत रडत वाचलेली “लिऑन युरिस” या लेखकाची “बाळ भागवत” यांनी भाषांतरित केलेली “एक्झोडस” ही कादंबरी आठवली. त्यातला "आरी बेन कनान" हा कणखर नायक आठवला. त्यात "आलिया बेत" (homecoming) च्या योजनेंतर्गत दोन आठवड्याच्या रेशनवर ४५०० पेक्षा जास्त ज्यू लोकांना घेऊन आखाती समुद्रात अडकलेल्या “एस एस एक्झोडस” ह्या जहाजावरील प्रवाश्यांची वेदना आणि असुरक्षितता पुन्हा जाणवली. त्यावेळी ब्रिटीश रॉयल एअर फोर्स आणि इतर ब्रिटीश सरकारी संस्थाचे, अजून ज्याला देश म्हणून मान्यता मिळाली नाही पण ज्यांनी महायुद्धाची प्रचंड झळ सोसली आहे त्या व्यक्तीसमूहाशी नियम न तोडता कसे वागावे या बद्दलची घुसमट आणि हतबलता देखील जाणवली.
सगळ्यात शेवटी अम्मानच्या विमानतळावर जाण्यासाठी जॉर्डनच्या वेशीवर भारतीयांच्या बसेस आणि कार्स येतात आणि सीमेवरचा जवान गेट उघडतो तेंव्हा या सुखांतामुळे डोळ्यात आनंदाश्रू आले तरी कुठेतरी याच्या विरुद्ध अत्यंत दुर्दैवी शोकांतिकेचा नायक असलेला तीन वर्षाचा आयलान कुर्दि आणि त्याचे कुटुंबीय आठवून खूप हळहळ वाटली. अम्मानच्या विमानतळावरची भकास चेहऱ्याची गर्दी बघून सिरियन रीफ्युजी क्रायसिस काय असू शकतो, ते दृश्य स्वरूपात जाणवले.
चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पासपोर्ट नसलेल्या लोकांना ओळखायचे कसे? ही समस्या असलेल्या भारतीय दूतावासाचा राग येत नाही. जेवणाच्या वेळी फोन न उचलणाऱ्या कोहली नामक सरकारी कर्मचाऱ्याचा, मलेशियाला जा सांगणाऱ्या सेक्रेटरीचा, कोहलीला टाळणाऱ्या मंत्र्याचा, प्रत्येक माणशी २०० डॉलर घेऊन ५०० लोकांना घेऊन जाणाऱ्या भंगार जहाजवाल्याचा, युद्ध क्षेत्रात जायला सुरवातीला नकार देणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकांचा, अम्मानच्या विमानतळावर "गर्मी मत खाओ, मुझे भी कुछ पता नही" असे अजीजीने सांगणाऱ्या कर्मचाऱ्याचा, सतत कटकट करणाऱ्या जॉर्ज किंवा पूनावालाचा, इतकेच काय शेवटी कुवेती स्त्रीला पाहून भडकलेल्या आणि नंतर भारतीय लोकांची गर्दी पाहून वरमलेल्या इराकी सैनिकाचा; कुणाचाच राग येत नाही. सगळेच त्या परिस्थितीचे बळी वाटतात. कथेच्या नायकाला देखील पळून जाण्याची किंवा हे सगळं सोडून द्यावंसं वाटणं, त्याच्या पत्नीने आधी विरोध नंतर साथ देणं; सगळं नैसर्गिक वाटतं. कटकट्या जॉर्ज शेवटी विमानात बसल्यावरसुद्धा स्वभावानुसार हवाई सुंदरीला, "फर्स्ट क्लासमध्ये कोण बसणार हे कसे ठरवले?" असे विचारतो आणि ही सगळी आपल्या आजू बाजूला वावरणाऱ्या अनेक लोकांची गोष्ट आहे याची खात्री पटते.
अक्षय कुमारचे चाहते हा पिक्चर तर बघतीलच आणि कदाचित निम्रत कौरचे देखील पण आपल्या आजूबाजूला सद्य काळात घडत असणाऱ्या घटनांची भीषणता जाणवून घेण्यासाठी आणि व्यवस्था आपले काम कसे करते, त्यात इच्छाशक्ती आणि भावना किती महत्वाचा भाग पार पाडते ते समजण्यासाठी तर हा चित्रपट सर्वांनी पहायला हवा.
प्रतिक्रिया
31 Jan 2016 - 10:50 pm | भंकस बाबा
चित्रपटापेक्षा तुमचा लेख आवडला.
3 Feb 2016 - 3:52 pm | Anand More
मला मी अक्षय कुमारला टक्कर देतोय अशी स्वप्न दिसू लागली. पण पुढे आलेल्या पोटाने घात केला. आणि किंचित कमी उंचीने… आणि विरळ होत चाललेल्या केसांनी…. आणि बायकोचे नाव ट्विंकल नसल्याने… जाऊ द्या … प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ;-)
1 Feb 2016 - 10:48 am | प्रभाकर पेठकर
ही डॉक्यूमेंटरी नसून व्यावसायिक चित्रपट आहे ह्यात वाद नाही.
१७०००० लोकं वाहनातून १००० किमी प्रवास करत आहेत असं जाणवत नाही तसेच ३-४ जणांनी एव्हढ्या मोठ्या जनसमुदायाची खाण्यापिण्याची, टॉयलेटची व्यवस्था पाहणे अशक्य कोटीतील आहे हेही चित्रपट पाहताना जाणवत होते. त्यातील गाणी तर अगदी ठिगळासारखी जोडलेली वाटतात. भारतिय सरकारी पातळीवरील 'हालचाल' अजून विस्ताराने दाखविता आली असती पण दोन अडीच तासात सर्व दाखविणे, वास्तव उभे करणे शक्य नाही. शिवाय चित्रपट रटाळ होऊ नये हा ही प्रयत्न ठेवावा लागतो. सतत दु:ख, त्रास आणि अपयश बघुनही प्रेक्षक कंटाळतो आणि चित्रपटाचा मुळ उद्देश काळवंडतो. एवढ्या मोठ्या ऑपरेशनची 'क्षणचित्रे' एकसंघ दाखवूनच प्रसंगाचे गांभिर्य, भयानकता दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. विमानाच्या ५०० फेर्या दाखविल्या असत्या तर त्या बघत बसणे प्रेक्षकाला सुसह्य झाले असते का? तो चित्रपट रटाळ झाला असता. पण भारतिय प्रवासी विमानांनी भारतियांना उचलण्यास सुरुवात केली आहे हे दाखविणे महत्त्वाचे होते. कोहलीच्या रुपातून प्रशासन हलल्याचे दर्शविले आहे. पण शेवटच्या प्रसंगात मंत्री, जो आपले सरकार अस्थिर आहे ह्या कारणास्तव, विशेष हालचाल करीत नाही तो शेवटच्या प्रसंगात सर्व 'भारतियांच्या सुटकेचे' श्रेय मात्र स्वतःकडे घेतो आणि कोहली दूर एकटा उभा असतो हा प्रसंग बहुतेकांच्या नजरेतून सुटला आहे.
त्या काळातील सरकारी हालचाली अगदी एकांगी दाखविल्याचे वाटंत होते. सरकारी हालचालींचा सर्वांगिण अभ्यास करून दिग्दर्शकाने त्या हालचालींना जरा जास्त महत्व द्यायला हवे होते आणि दृश्यीकरण करायला हवे होते असे वाटले.
त्या काळात 'वॉर झोन' मध्ये असल्यामुळे जे भितीचे सावट अनुभवले आहे त्यामुळे प्रत्यक्ष कुवेत मधील परिस्थितीची भयानकता, दहशत, भारतिय दूतावासाचे महत्व आणि हतबलता हे सर्व जास्त प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे अनेक त्रूटी असूनही चित्रपट बरा वाटला. एकदा नक्कीच पाहावा.
1 Feb 2016 - 11:40 am | कैलासवासी सोन्याबापु
सरकारी अनास्था ही दाखवणे गरजेचे होते असे वाटते, ओरिजिनली सरकारी यंत्रणा हालते बरीच जास्त हे ह्या वेळच्या सीरिया एयरलिफ्ट मधे ही दिसले (थैंक्स टु सोशल मीडिया अन एग्रेसिव साइबर सेल) अन जुन्या एयरलिफ्ट मधे सुद्धा होतेच, ह्यावेळी कनेक्ट झाले कारण स्वतः कळत्या वयाचे आहोत अन सगळे एफर्ट पाहतोय.
आमचे एक परममित्र आहेत त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वैनीसाहेब एयर इंडीया ला केबिन क्रू हेड आहेत, सीरिया एयरलिफ्ट सुरु झाले तेव्हा त्याच दिवशी त्यांना लहानाचे मोठे करणाऱ्या काकांचे निधन झाले होते, ते दुःख बाजुला सारून नवरा अन ६ वर्षांची एकुलती एक छोकरी सोडुन आमच्या वहिनी एयरलिफ्ट ऑपरेशन्स मधे क्रू मॅनेज्मेंट करायला म्हणून ग्राउंड जीरो वर ड्यूटी ला हजर होत्या दुसऱ्यां दिवशी, अश्या कमिटेड सिविल लोकांचा विलक्षण आदर वाटतो आम्हाला :)
1 Feb 2016 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर
विनम्र प्रणाम.
3 Feb 2016 - 3:49 pm | Anand More
_/\_
3 Feb 2016 - 8:55 pm | यशोधरा
घ्या! आणि वर तर इथेच एइं ला शिव्या घातल्यात अगदी बेकार सेवा वगैरे म्हणून!
1 Feb 2016 - 3:49 pm | गॅरी ट्रुमन
चित्रपट बघितला. मी स्वतः चित्रपटांच्या बाबतीत फारच अनुत्सुक असल्यामुळे चित्रपट आवडला असे म्हणत नाही आणि आवडला नाही असेही म्हणत नाही.
तरीही चित्रपटांमध्ये दाखविलेल्या गोष्टींची सत्यासत्यता कितपत आहे याबाबतीत शंका तर वाटतच आहे. एकतर तत्कालीन परराष्ट्रमंत्री इंद्रकुमार गुजराल यांना अगदीच बेपर्वा, परिस्थितीची आणि जबाबदारीची जाणीव नसलेले इत्यादी इत्यादी दाखविले आहे.माझ्या माहितीप्रमाणे इराकने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर काही दिवसातच गुजराल बगदादला जाऊन सद्दाम हुसेनला भेटले होते आणि भारतीयांना कुवेतमधून बाहेर आणण्यासाठी बोलणी केली होती.(या भेटीदरम्यान गुजराल यांनी सद्दामला मिठीही मारली होती.त्यामुळे त्यांच्यावर बरीच टिकाही झाली होती.) तसेच असे संकट अचानक आल्यानंतर त्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करणे भारत सरकारला तितक्या प्रमाणात सोपे नक्कीच गेले नसणार. तसेच धसमुसळेपणाने काहीतरी केले असते तर आपल्याच लोकांचे प्राण धोक्यात आले असते तर तो दोषही सरकारच्याच माथी आला असता. एकूणच सरकार काही करत नाही म्हणून नुसती टिका करण्याचा प्रकार वाटला. त्यावेळी कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांची सरकारकडून अधिक अपेक्षा असेल हे समजू शकतो. पण त्या घटनेनंतर २५ वर्षांनंतर निघालेल्या चित्रपटात आपल्याच सरकारला बावळट दाखविणे हे काही फारसे पटले नाही. यासाठी बेंचमार्कींगसाठी एक उदाहरण द्यायचे झाले तर १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली आणि अयातुल्ला खोमेनी सत्तेवर आला.त्यावेळी अमेरिकन वकिलातीतील कर्मचार्यांना दीडेक वर्ष ओलीस ठेवले गेले होते.अमेरिकेसारखी महासत्ताही त्यावेळी ५००+ दिवस फार काही करू शकली नव्हती. मान्य आहे दीड लाख भारतीयांना ओलीस ठेवले गेले नव्हते. पण त्याचवेळी १९९० मध्ये आपली जगातील वठ आणि कुवेतमधली परिस्थिती लक्षात घेता भारत सरकार सद्दामबरोबर बोलणी करून आपल्या लोकांना सेफ पॅसेज उपलब्ध करून घेऊन सोडविण्याव्यतिरिक्त काय करू शकणार होते? एकूणच आपल्याच सरकारला बावळट दाखवायचा प्रकार फारसा रूचला नाही. याबाबतीत चित्रपटाविषयीचे माझे मत निगेटिव्ह.
दुसरे म्हणजे इराक्यांनी कुवेतमध्ये केलेले अत्याचार चित्रपटात दाखविले यामुळे सद्दाम हुसेन कित्ती कित्ती चांगला होता असे वाटत असलेल्या भारतीयांना सद्दामने नक्की काय केले हे समजून येईल अशी आशा आहे. याबाबतीत माझे मत पॉझिटिव्ह.
एक गोष्ट समजत नाही. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे असे काही एन.आर.आय तिकडे गेले की कायमचेच तिकडचे होऊन जातात आणि भारतीय असे म्हणण्यापेक्षा त्यांना कुवेती (किंवा अन्य कोणी) म्हणणे भूषणावह वाटते. पण असे काही संकट आले की मग मात्र भारताचीच आठवण कशी होते? आयत्यावेळी रथाचे चाक अडकल्यावर कर्णाला धर्म कसा आठवतो?
1 Feb 2016 - 5:10 pm | संदीप डांगे
एक गोष्ट समजत नाही. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे असे काही एन.आर.आय तिकडे गेले की कायमचेच तिकडचे होऊन जातात आणि भारतीय असे म्हणण्यापेक्षा त्यांना कुवेती (किंवा अन्य कोणी) म्हणणे भूषणावह वाटते. पण असे काही संकट आले की मग मात्र भारताचीच आठवण कशी होते? आयत्यावेळी रथाचे चाक अडकल्यावर कर्णाला धर्म कसा आठवतो?
अगदी अगदी, ट्रेलर पाहल्यावर हाच प्रश्न पडला होता.
3 Feb 2016 - 3:42 pm | भुमन्यु
अशी लोकं सरकारच्या प्रयत्नामुळे सुखरुप बाहेर पडली तरी धन्यवाद अल्लाला - देवाला किंवा गॉडलाच देतात.
3 Feb 2016 - 4:55 pm | ब़जरबट्टू
जल्ला तुम्ही चित्रपट पायाला नाय राव बरोबर.. अक्किभाउ म्हणते नाही का "जब चोट लागती ही, तो मा की ही याद पहले आती हॆ.. :)
3 Feb 2016 - 5:07 pm | संदीप डांगे
नाय, मी अजुन पायला नाय. ट्रेलरमधलं वाक्य खटकलं, काय तरी हम सब अपने वतन को भुला चुके थे समथिंग... म्हणजे गरज लागली की आई आठवते हा शुद्ध स्वार्थीपणा आहे. बाकी असो. जास्त टिप्पणी नक्को. पबलिक भडकंल.. पिच्चर पाऊन आल्यावर बघू...
10 Feb 2016 - 5:04 am | निनाद मुक्काम प...
त्यावेळी भारताची जगात राजकीय आर्थिक स्थान आजच्या मानाने नगण्य होते
भारत बाजारपेठ नव्हता उलटपक्षी तो रशियाच्या कळपातील असल्याने वेस्टन वल्ड भारतीय राजनेत्यांच्या कडे वक्रदृष्टीने पाहायचे
खरे सांगायचे तर अनिवासी भारतीयांना गेल्या १५ वर्षात भारतीय सरकार कडून बरी वागणूक मिळायला लागली
त्यावेळी राजकीय परिस्थिती व नेत्यांची जनतेकडून व जनतेची नेत्यांकडून पाहर काही अपेक्षा नसायची .
आखतात पाकिस्तान चा भयानक प्रभाव असल्याने तेथील देश भारताला दुयय्म स्थान देत
अश्यावेळी तत्कलीन सरकार ने सुरवातीच्या काळात बेपर्वाइ दाखवली असेल
मुळात तत्कालीन सरकार वर सिनेमात एवढे ताशेरे ओढले गेले तरी आजच्या युपीए मधील कोणीच त्यावर भाष्य करत नाही आहे ह्यावरून काय ते समजून घ्या.
लालफितीचा कारभार हा त्यावेळी जास्त व सरकार व जनतामान्य होता.
त्यामुळ सिनेमात दाखवले त्यात मला ७० टक्के तथ्य वाटते
एअर इंडिया च्या पायलट चे कौतुक वाटते.
8 Feb 2016 - 12:54 pm | मराठी कथालेखक
मला चित्रपट आवडला नाही.
मुख्यतः पिरा आणि ब़जरबट्टू याच्या प्रतिसादात अनेक मुद्दे आले आहे.
भारतीय दूतावासाने वा परराष्ट्र व्यहवार मंत्रालयाने सुरवातीचे अनेक दिवस अगदीच काहीही हालचाल केली नाही व कट्याल फोन करत राहिला वा नंतर फक्त कोहलीने मनावर घेतले म्हणून रेस्क्यू मोहीम घडली हे अगदी अशक्य आहे ते ही कुवैत मध्ये पावणे दोन लाख भारतीय असताना ? केवळ अशक्य ... भारतीय विमानाचे अपहरण केले गेले होते तेव्हा फक्त पावणे दोनशे लोकांकरिता केंद्रीय मंत्री स्वतः कंदहारला गेले होते. इथे तर पावणेदोन लाख होते.
नाहीच काहीतर या पावणे दोन लाखांच्या भारतातील नातेवाईकांच्या दबावामूळे तरी सरकारी यंत्रणा कामाला लागलीच असती. भारताची प्रतिमा कलंकित करणारे असे काहीतरी दाखवले असून या मुद्द्यावर खरतर सेन्सॉरने चित्रपट अडवायला हवा होता.
बाकी त्याखेरीज अन्य बारकावे काहीच दाखवले नाहीत. मान्य आहे की पावणेदोन लाखाची गर्दी दाखवणे शक्य नाही पण निदान पावणे दोन लाख लोक राहू शकतील इतकी मोठी शाळा तरी दाखवावी..
बाकी इतके लोक १००० किमी चा प्रवास कसा करतात ? किती गाड्या लागल्यात ... एका बस मध्ये खच्चून १०० माणसे कोंबलीत तरी १७०० बसेस लागतील.. (आणि खच्चून भरलेले दाखवलेही नाही. सगळे मस्त सिटांवर बसलेले, खाली बसलेले, उभे राहिलेले कुणीच नाही) इतक्या गाड्या सहजतेने कशा मिळाल्या ? बाकी प्रवासात काही अडचणी ? फक्त एकदाच सैनिक नायकाची गाडी अडवतात ते सोडल्यास काहीच अडचणी नाहीत ?
जॉर्दनला पोहोचल्यावर तिथे छावणी कशी लागते ? भारताकडे उड्डाण करण्यासाठी प्रतीक्षा करताना लोकांना काय अडचणी येतात काहीच दाखवले नाही.
एयरलिफ्ट हे शीर्षक असून प्रत्यक्ष मोहीम अक्षरशः उरकून टाकली आहे.
बाकी क्लायमॅक्सला तिरंगा फडकणे, मग देशभक्ती मनात जागी होणे , एक भावूक गाणे वगैरे तर फारच टिपिकल.
शेवटी: यापेक्षा पुर्ण काल्पनिक आणि काहीसा मसाला असलेला फँटम खूप जास्त आवडला.
8 Feb 2016 - 1:28 pm | मराठी कथालेखक
एक प्रश्न : १९९० मध्ये कुवैतमध्ये ATM होते ?
8 Feb 2016 - 4:52 pm | अजया
चित्रपट परत पाहिला या धाग्यावरचे रेफरन्सेस वाचून.परत आवडला.अक्षयकुमार आय कॅन्डी आहे तुझ्या वेळच्या सगळ्या हिरोंमध्ये असे मुलाचे मतही विचारात घेतले ;)
8 Feb 2016 - 4:53 pm | अजया
धाग्याची पहिली शंभरी गाठल्याबद्दल आनंदला खेळातल्या विमानाने लिफ्ट करुन डोंबिवलीत सत्कार करून एअरलिफ्टचे तिकिट देण्यात येत आहे !
8 Feb 2016 - 4:58 pm | Anand More
धन्यवाद ....तुम्ही शेवटच्या दोन रन काढून दिल्या नसत्या तर मी बहुतेक तेंडूलकरसारखा शतक पुरं न करताच परतणार होतो. :-)
8 Feb 2016 - 9:08 pm | नूतन सावंत
एअरलिफ्ट कालच पाहिला.पाहिल्यावरच धागा वाचायचं ठरवलं होतं.त्याप्रमाणे वाचला.माझी सख्खी मामेबहीण आशा भाटकर त्यावेळी तिथे होती.तिचे पती यशवंत भाटकर तिथल्या शासकीय सेवेत होते.तो इराकी कमांडर ही खरी व्यक्तिरेखा होती.युद्धात इराकी सैनिकानी कबजा केल्यावर त्यांनी,भारतीय मुलांना म्हजे ज्यांचे पासपोर्ट भारतीय आहेत अशा मुलांना सुरू असलेल्या विमानसेवेमार्फत भारतात जायची परवानगी दिली.सुदैवाने दोन्हीही बाळंतपणं मुंबईत झाल्यामुळे ती अडचण नव्हती.पण मुलगी दहावीत आणि मुलगा सहावीत म्हणजे कळत्या वयाचे होते.आईबाबांना सोडून येण्यासाठी त्यांची समजूत काढणेच कठीण होते.येणाऱ्या मुलांमध्ये नीता सगळ्यात मोठी म्हणजे पंधरा वर्षांची होती.तिला असे पाठवणे हे बहिणीलाच काय आम्हालाही पटत नव्हते.पण दुसरा इलाजच नव्हता.विमानात बसून विमान ऊडेपर्यंत काही झालं तर.....या जीवघेण्या विचाराने काही सुचत नव्हतं.पण ही मुलं सुखरुप भारतात आली एकदाची.घर सोडल्यापासून सहा दिवसांनी.महाराष्ट्र सरकारने परराष्ट्रखात्याच्या आदेशावरुन या मुलांच्या शाळाप्रवेशासाठी स्पेशल जी.आर काढला होता.त्यानुसार निखील व्हिक्टोरिया स्कूल आणि नीताला कनोसामध्ये प्रवेश मिळाला.
आता ताई आणि भाऊंची वाट पहाणे सुरु झाले.मी व माझे पती शासकीय सेवेत.राजशिष्टाचार शाखेत असल्याने दिल्लीला संपर्क साधू शकत होतो.तिथून कुवेतमध्ये कोणीतरी माझ्या मेहुण्यांशी संपर्क साधून आम्हांला निरोप देत असत.दोन्हीही मुलं दररोज शाळेतून आली की,फोन करत.कधी निरोप असे.कधी नसे.मुलांना समजावणे कठीण व्हायचे.मामाही हवालदिल झालेला.
दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत होती.त्यांना घरी रहायची परवानगी असल्याने ताई पासपोर्ट आणि दोन सोन्याची बिस्किटे अंगावरच ठेवत असे.सिनेमात दाखवल्याप्रमाणे इराकी सैनिक कोणत्याही घरात घुसत असत.त्प्रयांना प्रतिकार करण्यासाठी माझी ताई कोयता,मिरचीपूड,धुणे वाळत घालायची काठी ई.साधने हाताशी ठेवून जय्यत तयारीत असायची.
सिनेमात दाखवल्याप्रमाणे अकबर जहाज एकदा वळले तरी नंतर पुन्हा अकबर जहाजातूनच काही लोक आले त्यातून ताई आली.त्याला तीन महिने लागले.ती भाऊच्या धक्क्यावर ऊतरेपर्यंत बातमी मामा व मुलांना सांगितली नव्हती.फक्त भावाला सांगितलं होतं.ती घरी येताच एकच हलकल्लोळ झाला.अजूनही एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्यात दुःखाश्रू होते.कारण अजूनही कुवैतमध्ये इराकी राजवट होती आणि मेव्हणे तिथेच होते.फक्त अधूनमधून दिल्लीला जाऊन संपर्क साधता यायचा.
नीता,निखीलची परीक्षा झाल्यावर माझी ताई रत्नागिरीला मांडवी येथे त्यांच्या घरी रहावयास गेली.मेव्हणे येईपर्यंत हिमतीने एकटी मुलांना घेऊन राहिली.मुलांच्या मनाची तयारी तिथल्या शाळाकॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी करत.कारण मुंबईत तिचे स्वतःचे घर नव्हते.एप्रिल संपता संपता मेव्हणेही आले.
युद्ध संपल्यानंतर कुवैत सरकारने बोलावलेल्या पहिल्या तिघांत ते होते.घडी बसून शाळाकॉलेजे सुरु झाल्यावर मुले वडिलांकडे गेली.ताई नोकरी करत नसाल्याने आता तिला जाणे कठीण होते.पण अठ्ठेचाळीसाव्या वर्षी तिने जिद्दीने कम्प्यूटर आणि टूरिझमचा कोर्स करून नोकरी मिळवून कुवैतमध्ये यशस्वी पदार्पण केले.अजूनही तिथेच आहे.मेव्हणे मात्र आता नाहीत.
अक्षयने जी व्यक्तिरेखा केलीय ती व्यक्ती म्हणजे श्री.रंजन कटियाल.त्यांनी एका जागी काही लोकांची व्यवस्था जरुर केली होती.पण सर्व लोक त्यांच्यासोबत नव्हते,एवढं मला नक्की माहिती आहे.
8 Feb 2016 - 9:16 pm | टवाळ कार्टा
कहर आहे....
8 Feb 2016 - 9:21 pm | Anand More
सुरस अरबी कहाणी वाटावी असा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या कुटुंबियांसाठी माझ्या शुभेच्छा.
10 Feb 2016 - 2:14 am | अर्धवटराव
कल्पनेनेच अंगावर शहारा येतो.
10 Feb 2016 - 3:03 am | स्रुजा
बाप रे !!
हा आणि पिराचा प्रतिसाद फार आवडला. बाकी ही बिकादा, पेठकर काकांचे प्रतिसाद विचार करण्यासारखे.
मला सिनेमा लेखक म्हणतात त्याप्रमाणे अनेक गोष्टींना स्पर्शुन आल्यासारखा वाटला. सिनेमा आवडला का? तर पूर्ण नाही. नायकाला लार्जर दॅन लाईफ करण्याच्या नादात आपल्या सरकारचं चित्रण मुळीच आवडलं नाही. पण , मी सध्या इथे असताना आणि आयसिस चं वारं घोंगावत असताना , कुठेतरी हलवुन गेला. अक्षय कुमारचं "आखिर मा ही याद आती है" हे स्वार्थी नाही वाटलं. अशा वेळी "लाख लुभाये मेहल पराये, अपना घर फिर अपना है" हे मनापासून पटुन जातं. सिरियन रेफ्युजीज बद्दल खरंच कणव वाटली.
आणि यशो शी १०० वेळा सहमत. बाहेर राहताना एअर इंडिया आणि भारतीय दूतावासाचे चांगलेच अनुभव पदरी आहेत. आणि थोडं उन्नीस बीस झालं तरी ते "आपले (म्हणजे भारतीय)" लोकं आहेत म्हणुन मी त्यांनाच बेनेफिट ऑफ डाऊट देणार हे नक्की.
11 Feb 2016 - 4:16 am | यशोधरा
अगदी अगदी स्रुजा.
8 Feb 2016 - 9:57 pm | नूतन सावंत
ते दिवस अजूनही आठवले की,प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांच्या कुटुंबियांना काय सहन करावे लागतअसेल याची कल्पनाही करवत नाही.
माझी मामी तेव्हा हयात नव्हती.मामाने हे सारं कसं सहन केलं असेल?याची कल्पना ताई रत्नागिरीला गेली तेव्हा एकदाच आली.ती गेल्यानंतर तो हमसाहमशी रडत म्हणाला होता,"ती अशीच दिसेल ना पुन्हा मला?"(त्याला मेव्हण्यांची चिंता होती.)
8 Feb 2016 - 10:15 pm | Maharani
Chan lihilay..
Surangitai tuzi kahani pan halava karanari....kiti tension aasel tenva tumchya ghari kalpanach karavat kahi.
9 Feb 2016 - 7:14 pm | गामा पैलवान
ही बातमी कितपत विश्वासार्ह आहे?
http://timesofindia.indiatimes.com/india/Old-Air-India-planes-a-disaster...
-गा.पै.