गावापासुन पुण्यापर्यंतचा प्रवास त्यानं रेल्वेनं केलेला. पुण्याला उतरल्यावर थोडा चेंज म्हणुन, पुढचा प्रवास बसने करायचा त्यानं बेत केला. लग्नाचे वय झाल्यापासून त्याचा असा 'चेंज'चा उत्साह फारच वाढलेला. रेल्वेचं कल्याणपर्यंतच तिकीट सोडून एशियाड गाठली. रेल्वेत अंग पार ताठरुन गेले होते, इथे मस्त मऊ मऊ सिट मिळालं.
शेजारी एक गृहस्थ म.टा. वाचत बसलेले. मुख्य पान ते वाचत होते आणि बाकीची पानं त्यांनी मांडीवर ठेवलेली.
त्यानं, न विचारताच त्यातलं एक पान घेतलं आणि वाचत बसला. गृहस्तांनी चष्म्याच्यावरून एक तिरकस कटाक्ष टाकून त्याला न्याहाळले आणि परत पेपर वाचन्यात मग्न झाले.
त्यांना एक बातमी वाचेपर्यंत त्यानं उर्वरित सर्व पानं एक एक करत पाहुन (अथवा वाचुन) परत ठेवली.
गृहस्त हातातलेच पान वाचत होते. तो थोडा तिरका बसला आणि त्यांच्या हातातले पान वाचु लागला. थोडं सरकत आणि थोडं खाली वाकत त्यानं त्या पानाची एक बाजु वाचुन काढली.
मग थोडं इकडं तिकड़ं पाहिलं आणि त्या गृहस्तांकडे पाहिले, ते वाचण्यात दंग होते.
मग त्यानं केसावरून हात फिरवला आणि परत त्यांच्याकडे पाहिले, ते वाचण्यात दंग.
मग त्यानं घुडव्यावर हात ठेवुन बोटाने कुठलीतरि चाल वाजवली आणि त्यांच्याकडे पाहिले, ते दंगच्.
मग दोन्ही हातांची बोटे मोडली आणि त्यांच्याकडे पाहिले, त्यांची नजर पेपरवरच.
मग तो थोडा खाली वाकला, त्यांच्या हातातल्या पानाचा खालचा कोपरा स्वतःकडे केला आणि वाचु लागला. त्यांनी मान खाली करून, चष्म्याच्यावरून त्याच्याकडे पाहत विरोध दर्शावाला तरि तो वाचतच होता. त्यांनी शांतपणे हातातल्या पानाची घडी केली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं ते पान हातात घेतलं आणि वाचण्यात गढुन गेला.
"सरकारने हि सगळी डोंगरं, झाडं साफ़ करुन शेतकऱ्यांना तिथे शेतीसाठी उपयुक्त अश्या जमीनी तयार करुन द्यायला पाहीजी" हातातल्या पानाची पुंगळी करुन तिनाच् खिड़की बाहेराचा नजारा दाखवत तो बोलला.
त्याच्या हातातलि पुंगळी घेऊन पान सरळ करत करत त्यांनी चष्म्याच्यावरून एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला.
"हिकडं पानी बी भरपुर दिस्तय" तो खिड़कीतून बाहेर पाहत परत बोलला.
बाहेरच्या मोठ मोठाल्या दऱ्या टोपल्याने माती टाकुन बुजवायचं आणि अडदांड डोंगरं पहारिणे फोडायचं काम स्वतःकड़े आल्याचं टेंशन चेहऱ्यावर आनत त्यांनी त्याच्याकडे बघितले आणि डोळे मिटवुन टेकुन बसले.
त्यांच्याकडे पाहुन तोंडात आलेले शब्द गिळत तो ही शांत बसला.
त्यांना चांगली झोप लागलेली. लोणावळा स्टेशनवर गाडी थांबली. चिक्किवाले आत शिरले तसं त्यानं त्या म.टा.वाल्या बाबांना जोराने हलवले. त्यांना शांत झोप लागलेली. त्यानं अचानकपने हाताला दिलेल्या झटक्यानं ते ताटकन उठून बसले.
"काहे?" त्यांनी चिडक्या स्वरात विचारले.
"इथली चिक्की खुप फेमस आहे" तो.
"मग घ्या की दोन चार किलो. मला कश्याला उठवताय?" ते अणखी जास्त चिडुन बोलले.
"नाही... मला वाटले तुम्हाला.. अ.. माहित नसल.. म्ह..नुन सांगितले" तो.
मटावाले उठले तोंडावर पानी मारून, रुमालाने तोंड पुसत परत जागेवर येऊन बसले.
गाडीने वेग घेतल्यानंतर तो परत रिलॅक्स झाला.
"ती शेवटच्या पानावर बातमी आहे की, 'एका बाईने एकाचवेळी सात मुलांना.."
"हो वाचलीय मी" त्याला मधेच तोडत ते एकदम कड़क आवाजात बोलले.
"नाही..तसं नाही.. म्हणजे खरं असल का हो ते..?"
"आता ते मला काय माहित?" ते आणखी कड़क पण चिडक्या स्वरात बोलले.
"नाही.. ते तुमच्या पेपरात.."
"माझा पेपर?. मी विकत घेतलाय... म्हणजे साऱ्या बातम्या मीच छापल्यात का? आणि जास्तच माहिती हवी असेल त् तो पत्ता लिहुन घ्या आणि जा तिथे.. आणि खुद्द त्या बाइलाच या विचारुण" बाबा आता जास्तच चिडले होते.
उजव्या बोटांच्या नखांना डाव्या बोटांच्या नखांनी घासत तो तसाच बसुन राहिला.
पंधरा विस मिनिटांनंतर त्यांनी बॅगमधुन चिप्सचा पुडा काढला. एक दोन चिप्स खाऊन झाल्यानंतर त्यांनी पुडा त्याच्यासमोर धरला.
तो परत रिलॅक्स झाला.
"आपण मुळचे कुठले आहात?" पुड्यातला एक चिप्स तोंडात टाकत त्यानं विचारलं.
"इथलाच" त्याच्याकडे न पाहताच त्यांनी उत्तर दिलं.
गोंधळून खिड़कीतून बाहेरचि मोठाली डोंगरझाडी पाहत त्यानं चावलेला चिप्स गिळला.
ते स्वतःच्या तोंडाजवळ पुडा धरून खात होते. तोंडाला चिप्सचि चव आलेली. त्याचा हात आपसुक पुड्याजवळ गेला. दोन बोटें पुड़यात फिरलि. एक ही चिप्स शिल्लक नव्हता. मोकळ्या पुड्यात बोट फिरवत त्यानं त्यांच्याकडे पाहिले. ते त्यालाच निरखत होते. त्यानं चटकन हात मागे घेतला आणि खाली मान घालुन बसला.
त्याला देण्यासाठी बॅग मधला दुसरा पुडा काढायला ते खाली वाकले, तसा ड्राईवरने अचानक ब्रेक मारला. समोरच्या शीट च्या दांडीवर चष्मा अदळला आणि काचेला तडा गेला. हातातला पुडा त्याच्या अंगावर फेकुन, तड़कलेला चष्मा डोळ्यावर लाउन ते शांत बसले.
त्याला खुप वाइट वाटले. काच तुटली म्हणजे शे दिडशेचे तरी नुकसान झालेच असणार.
"काय करता हो आपण?" हातातला पुडा खाऊन झाल्यानंतर पँटला हात पुसत त्यानं शांतपणे विचारलं.
"काय करायच्या हो तुमाला नुसत्या चौकश्या? बसमधे बसल्या पासून नुसती बुळ बुळ लावलिय" ते चांगलेच तापले.
"नाही.. हो.. आपली अशीच ओळख म्हणून आणि गप्पात वेळ पण लवकर जातो म्हणून..."
"डोळे मिटुन पड़ा की गपगार!.. मग जातो वेळ लवकर! लवकर!" ते खुपच चिडलेले.
"तुम्हाला मानुसकीच नाही फारच मानुसघाने दिसताय तुम्ही" म्हणत तो डोळे मिटवुन बसला.
'मानुसघाणा' हा शब्द ऐकून ते चांगलेच चवताळले. त्याच्या एक कानाखाली वाजवावी म्हणून उभा राहिले आणि त्याचे बंद डोळे पाहुन चरफटत खाली बसले.
त्याला चांगलीच झोप लागलेली. वाहकाने उठवले तेव्हा सर्व प्रवासी उतरून गेलेले. तो ही उतरला. कल्याण बस स्टॅंडच्या बाहेर येऊन तो रेल्वे स्टेशनमधे घुसला.
"हेलो..मामा, मी बोलतोय. मी आलोय इथे कल्याणला"
"बरं! बर्ं! अता लोकल पकड़ आणि डोम्बिवलित उतरुन वेस्टला एक्सिस च्या ए टी एम जवळ थांब, मी आलोच" मामा.
"हो, हो"
मामाशी बोलत बोलत तो प्लेटफॉर्मवर येऊन पोहचला.
प्रवास्यांची वाट पाहत उभा असलेली 'ठाणे स्लो' पकडून तो डोंबिवलीत उतरला.
मागच्या वेळेस तो ठाण्याहून डोंबिवलीला आलेला. तेव्हा 'वेस्ट' उजव्या हाताला होते की डाव्या हाताला, त्याला काहीच अठवेना. जवळ काही बोर्ड किंवा ओळखीची काही खून पण दिसेना. तिथे उभा असलेल्या एकाला विचारले. तो म्हणाला;
"ओ उदर सीडी है, उससे चढ़कर ओ बाजू में जाव"
तो तसाच एका बाजुने चालु लागला. पायऱ्या जवळ आल्यावर परत खात्री करुन घ्यावी म्हणुन, हातात कोट धरून रेल्वे रूममधे घुसणाऱ्या एकाला त्याने परत विचारले;
"साब, डोंबीवली वेस्ट ओ बाजुमे है ना?"
"हा..हा..कहासे आये हो" म्हणत तो कोटवाला जवळ आला.
तो रेल्वे टीसी होता. तो तिकीट दाखव म्हटल्यावर आपण तिकीट काढलं नसल्याची त्याला आठवण झाली.
तिकीट नाही म्हटल्यावर टीसीने त्याला हाताला धरून बाजूला नेले. मामा इथेच कुठेतरी वाट पाहत असल, त्याच्या ही गोष्ट लक्षात यायला नको म्हणुन, टीसीचा हात सोडवत तो हळूच म्हणाला;
"साब, ये लो पचास रूपया, जाने दो"
"मेरे को रीश्वत देता है क्या रे" म्हणत टीसीने त्याला आणखी घट्ट धरले.
"साब, रिश्वत नहीं ऐसे ही कॉपरेट कर रहा था" तो.
"तो चल फिर अंदर, उधर बड़े साब के सामने कर कोपरेट" टीसीने त्याला एका कोपऱ्यात नेले.
कसा बसा दोनशे रुपये देऊन त्यानं हात सोडून घेतला आणि वापस फिरला त् मामा तिथेच त्याच्याकडे पाहत उभा.
"तिकीट काढायला काय झालतं रे तुला?, लग्नाचं वय झालय् हा बावळटपणा सोडा आता" मामा रागातच बोलला आणि चालाया लागला.
घरी आल्यावर मामाणे चटकन फ्रेश व्हायला सांगितले.
फ्रेश झाल्यावर मामा त्याला मागे गाडीवर बसवुन बाहेर घेऊन गेले.
एका मोठ्या इमरतीच्या पार्किंगमधे गाडी लाउन दोघे लिफ्टमधे घुसले.
"बापाचे ते अचाट कर्तुत्व आणि तुमचे हे असले उद्योग. अख्ख्या पंचक्रोशित तुला कुणी पोरगी द्यायना. अता बहिनीकडे पाहुन तुझ्यासाठी हे स्थळ आनलय. चुपचाप बसुन रहा, तोंड उघडु नकोस. पोरगी चांगली आहे. तु फ़क्त विचारले तेवढेच बोल. बाकी मी बोलतो काय बोलायचे ते....." लिफ्ट पाचव्या मजल्यावर जाईपर्यंत मामाचे सुचना देने चालुच होते.
पाचव्या मजल्यावरच्या एका फ्लॅट जवळ गेल्यावर दरवाज्या जवळच्या खिड़कीतून आत दाखवत मामा बोलू लागले;
"ते बघ, आत पेपर वाचताय ते मुलीचे वडील. आत गेल्या गेल्या त्यांचे दर्शन घे"
मामा डोर बेल वाजवायला पुढे सरकले तशी त्याची आत नजर गेली.
आंत सोफ्यावर, तड़कलेला चष्मा घालून म.टा. वाचत बसलेल्या त्या गृहस्थाला पाहुन, मामाला पायातले बूट काढेपर्यंत तो मागचं मागेच पळाला ते थेट कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमधेच जाऊन थांबला.
प्रतिक्रिया
18 Jan 2016 - 6:15 am | पीके
सुभ्या...
नंतर एकदम सुभ्या...(७) ? मधलं कुठाय?
बायदवे छान आहे .....
18 Jan 2016 - 12:46 pm | राजाभाउ
हेच म्हणायला आलोतो.
पण मस्त आहे सुभ्या.
18 Jan 2016 - 5:20 pm | आनंद कांबीकर
कुठला हि भाग केव्हा हि प्रकाशित झाला तरी वाचकास अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.
18 Jan 2016 - 10:25 am | नितिन५८८
पहिले भाग पण टाका
18 Jan 2016 - 7:14 pm | जव्हेरगंज
+1
18 Jan 2016 - 10:48 am | विवेक ठाकूर
लगे रहो.
18 Jan 2016 - 10:53 pm | आनंद कांबीकर
कथेत कुठल्याच पात्राला नांव नाही त्यामुळे 'सुभ्याच्या' भानगड़ित पडत नाही.
नविन शीर्षक
19 Jan 2016 - 3:53 pm | उगा काहितरीच
मस्त खुसखुसीत !!!
20 Jan 2016 - 11:20 pm | आनंद कांबीकर
29 Jan 2016 - 8:25 pm | आनंद कांबीकर
-----^-----
21 Jan 2016 - 7:15 pm | शलभ
+१