माझी मस्तानी

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जे न देखे रवी...
3 Jan 2016 - 9:04 am

‘बाजीराव-मस्तानी’ सिनेमा पाहताना
ही मुसमुसत होती, मस्तानी जगताना.
ठरवले ह्याच क्षणी सांगावे हिला मनोगत
सहज पूर्ण होईल जीवनाचे मनोरथ.

“मी पण आणू म्हणतो मस्तानी आपल्या आयुष्यात”
फक्त पुढचे काही क्षण गेले मौनात, मा‍झ्या जीवनात.
डोळे बरसू लागले तोफ गोळे आणि जिव्हा, तप्त लाव्हा
‘मुलुख मैदानी’च्या वर्षावात सर्व झाले स्वाहा.

बाळगा जरा मनाची, असलं काही बोलायला,
पोरीचे हात पिवळे करायचे, तर निघाले तोंड काळे करायला.
कोण आहे तुमची मस्तानी, आणा तर खरं समोर,
उपटते झिंज्या आणि करते कपड्यांच्या चिंध्या.

तो महापराक्रमी, त्याची मदत छत्रसालाला,
येते का तुम्हाला साधी छत्री दुरुस्त करायला ?
नाचवली त्याने मुघलांच्या छाताडावर घोडी अलबेली,
आणि तुम्ही ? “कहां राजा भोज और कहा गंगू तेली”

हरवले त्याने मुघलांना, जिंकले त्यांचे कोट,
आणि तुमचे मात्र नुसतेच सुटले आहे पोट.
गाजवत होता तो रणमैदान, घेई घोड्यावरतीच झोप,
साधी सायकल मेली पाडते कपाळावरती खोक.

खात होता तो कणसं हातावर मळून,
आणलंय का तुम्ही कधी साधं पीठ दळून ?
कसली शिरलीय मस्ती अंगात, निघाले मस्तानी आणायला ?
कठीण झालंय इथे इनमिन तिघांचे पोट भरायला.

मस्तानीचे दु:ख बोचले आणि काशीचेही तितकेच टोचले
नका उध्वस्तू संसार, पुरविण्या पुरुषी अहंकार आणि चोचले.
न्याय देता येत नसेल तर अन्याय करू नका
मस्तानी देखील होती एक स्त्री, हे कधी विसरू नका.

तुमच्यासाठी सोडले गाव, नाव, सोसले अगणित घाव,
तरी जन्मोजन्मीची साथ लाभली, हाच मनी एक भाव.
झाले एकरूप तुमच्याशी, का हाच माझा गुन्हा ?
शपथ घ्या मस्तानीचे नाव घेणार नाही पुन्हा.

शपथ घ्या मस्तानीचे नाव घेणार नाही पुन्हा.

कविता माझीभावकवितामुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

3 Jan 2016 - 12:00 pm | एक एकटा एकटाच

मस्तय

पैसा's picture

3 Jan 2016 - 12:08 pm | पैसा

छान!

शब्दानुज's picture

3 Jan 2016 - 12:26 pm | शब्दानुज

आवडली!!

पद्मावति's picture

3 Jan 2016 - 2:26 pm | पद्मावति

खूप छान. आवडली.

ravi bhagwat's picture

3 Jan 2016 - 11:53 pm | ravi bhagwat

वा अप्रतिम

श्रीरंग_जोशी's picture

4 Jan 2016 - 12:39 am | श्रीरंग_जोशी

खूपच आवडली ही कविता.

सौन्दर्य's picture

4 Jan 2016 - 8:30 am | सौन्दर्य

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

सप्तरंगी's picture

4 Jan 2016 - 2:44 pm | सप्तरंगी

छानच आहे तुमची कविता, अहो पण बायकोला विचारायची चुक केलीत, मस्तानी कुणी बायकोला विचारून आणतो का :)

सौन्दर्य's picture

5 Jan 2016 - 3:23 am | सौन्दर्य

अहो बायकोला सिनेमा पाहताना मुसमुसून रडताना पाहून वाटल की तीची मस्तानीला खुप सहानुभूती असेल,त्यामुळे तीच सहानुभूती माझ्या मस्तानीच्या वाट्याला येईल, पण एकदम भलतच झालं हो. पुढच्या वेळी तुमचा सल्ला घेतल्याशिवाय जीभ उचलणार नाही::-)

नाखु's picture

4 Jan 2016 - 2:57 pm | नाखु

फक्त शपथेवर सोडले म्हणजे ठीकच झाले म्हणायचे.....

वा.मा. नाखु

सौन्दर्य's picture

5 Jan 2016 - 3:24 am | सौन्दर्य

अहो पण अद्वातद्वा बोलूनही झालं की !

मित्रहो's picture

5 Jan 2016 - 11:34 am | मित्रहो

अप्रतिम

तो महापराक्रमी, त्याची मदत छत्रसालाला,
येते का तुम्हाला साधी छत्री दुरुस्त करायला ?

जबरी हसलो. परिस्थिती काही फार वेगळी नाही.

एस's picture

5 Jan 2016 - 5:07 pm | एस

कुणाचीच नसते हो!

यावरून आठवलं की घरातली एकुलती एक मोडकी छत्री दुरुस्त करायचा अल्टिमेटम 'आतल्या आवाजा'कडून परवाच आलेला आहे.

कविता.खास..!

समीर१२३४५६'s picture

5 Jan 2016 - 2:09 pm | समीर१२३४५६

मस्‍त अप्रतिम सादरीकरण

सस्नेह's picture

5 Jan 2016 - 4:41 pm | सस्नेह

शेवटी म्हणून टाकायचे, 'तूच माझी मस्तानी !', हाकानाका.

इशा१२३'s picture

5 Jan 2016 - 5:49 pm | इशा१२३

मस्तच!

संदीप डांगे's picture

5 Jan 2016 - 8:36 pm | संदीप डांगे

साठीच्या दशकातलं काव्य...!

सौन्दर्य's picture

6 Jan 2016 - 8:40 am | सौन्दर्य

कविता आवडल्याबद्दल आभार.