कथा कढईभर शिऱ्याची!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
9 Sep 2008 - 7:03 pm

खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता. उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली.
तेव्हा रत्नागिरीत राहत होतो. दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं. वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं. (क्रिकेटच्या मॅच आणि नातेवाइकांची लग्नं परीक्षेच्या काळातच का घेतात, हा बालमनाला पडलेला प्रश्‍न अजूनही सुटला नाही!) घरच्यांचा आग्रह होता, मीही यावं असा; पण दहावीच्या अभ्यासाचा "कोंडाण्या' सर करण्याच्या जिद्दीपुढे मला आत्तेबहिणीच्या लग्नातल्या आनंदाची फिकीर नव्हती. तीन-चार दिवस आई-बाबा पुण्याला जाणार होते. घरात आमचं एकट्याचंच राज्य होतं. दूध बरंच शिल्लक होतं, म्हणून त्याचं दही लावलं. तेही शिल्लक राहिलं, तेव्हा काय करायचं, असा प्रश्‍न पडला नाही. सुपीक डोक्‍यात श्रीखंडाची कल्पना शिजली. (धोतराच्या फाडलेल्या) मऊसूत फडक्‍यात रीतसर दही टांगून ठेवून चक्का वगैरे केला. दीड-एक दिवसानं घट्ट चक्का झाला. मग त्यात साखरबिखर घालून, घाटून श्रीखंड केलं. तशी पोळी-भाजी रोज करत होतोच; पण श्रीखंड पोळीबरोबर कसं खायचं? म्हणून पुऱ्या लाटून तळल्या. फर्मास बेत झाला. घरी एकट्यानं मांड ठोकून त्यावर ताव मारला. कुणी वाटेकरी नको, की कुणाची अडचण नको.
दुसऱ्या दिवशी शिऱ्याचा बेत आखला होता. माझा पहिलाच स्वतंत्र प्रयोग होता. तशी रेसिपी माहीत होती; पण प्रत्यक्ष कधी प्रयोग केला नव्हता. साधारण जेवढी कढई भरून शिरा हवा, तेवढाच रवा, या हिशेबानं पाच सहा मुठी रवा घेतला. सुमारे तासभर लागला असेल, शिरा व्हायला. एवढं करून तो गोळाच्या गोळा. दोन दिवस फक्त शिराच खात होतो!
चौथ्या दिवशी आई पुण्याहून आली आणि सगळी आवराआवर करताना उरलेला अर्धी कढई शिरा तिला फ्रीजमध्ये दिसला. त्यानंतर काय रामायण झालं असेल, याचा अंदाज कुणालाही येऊ शकेल.
""अभ्यास करायचा म्हणून लग्नाला आला नाहीस आणि तुझे हे धंदे?''
...जणू काही मी घरच विकून खाल्लं होतं! पण ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता.
त्या दिवशी मला भूक नसतानाही एका जागी मांडी ठोकून तो शिरा तिनं (प्रेमानं) खायला घातला.
...पुढचं वर्षभर मी शिऱ्याचं नाव काढलं नाही!

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

9 Sep 2008 - 7:06 pm | आनंदयात्री

भारी !!

>> श्रीखंड पोळीबरोबर कसं खायचं? म्हणून पुऱ्या लाटून तळल्या. फर्मास बेत झाला.

श्रीखंडाच्या पुर्‍या कश्या करतात बॉ ??
;)

स्वाती दिनेश's picture

9 Sep 2008 - 7:09 pm | स्वाती दिनेश

कढईभर शिर्‍याची कथा आवडली,:)
स्वाती

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 11:50 am | विसोबा खेचर

कढईभर शिर्‍याची कथा आवडली

हेच म्हणतो..! :)

(शिराप्रेमी) तात्या.

शितल's picture

9 Sep 2008 - 7:15 pm | शितल

मस्त किस्स्सा.. :)
मी ही सध्या बेसनाचे लाडु केले त्यात तुप आणि साखर दोन्ही जास्त झाल्याने मी ते पुरणपोळीत कसे सारण भरतात तसे करून ते संपवत आहे.
पण त्या सारण भरून केलेल्या पोळ्या तुफान लागतात..

अनामिक's picture

9 Sep 2008 - 8:46 pm | अनामिक

माझी आई बर्‍याचवेळा करते बेसनाच्या पोळ्या. मला तरी पुरण्पोळीपेक्षा बेसनपोळीच जास्त आवडते. कृती विचारुन सांगावी लागेल.

रेवती's picture

9 Sep 2008 - 7:16 pm | रेवती

ह्यावरून काय शिकायला मिळाले, तर दहावीच्या वर्षात सिनेमा पाहू नये, खेळ बंद, लग्नंकार्ये व इतर समारंभ बंद, शिरा बंद.
मी एकदा आई नसताना दहीवडे केले होते. ते इतके झाले की शेजारपाजार खूष होऊन गेला. घरातलं दही संपलं शेवटी विकत आणलं. बाबा रागावले की ही कीती तास (म्हणजे पाच ते सहा तास) एकच काम करतीये. पुन्हा दहीवडे पाच एक वर्षांनीच केले.

रेवती

संदीप चित्रे's picture

9 Sep 2008 - 8:47 pm | संदीप चित्रे

भेळेपासून सुरू झाले आणि मॅगी नूडल्सपाशी संपले ;)
------
तू तर माझ्या लेखी महान वगैरे आहेस अभिजीत :)

अनामिक's picture

9 Sep 2008 - 8:50 pm | अनामिक

मला आठवतं कि एक दोन वेळ आई बाबा बाहेरगावी गेले तेव्हा तुरीच्या डाळी ऐवजी चणाडाळीचे वरण केले, अन उडिद डाळीची खिचडी. बाकी माझं पाककौशल्य तसं बरं आहे.

अनामिक

प्राजु's picture

9 Sep 2008 - 9:58 pm | प्राजु

माझे काका पुण्यात नोकरी निमित्त एकटे रहात होते. त्यांनी रव्याचे लाडू केले. पण ते इतके घट्ट झाले की, की हातोडीने फोडून खाण्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्यांनी एक युक्ती लढवली. रोज सकाळी ऑफिसला जाताना पाणी कडकडीत गरम करून त्यात एक लाडू सोडून त्याचा शिरा करून खाणे. अशाप्रकारे सगळे लाडू संपवले त्यांनी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ईश्वरी's picture

9 Sep 2008 - 10:13 pm | ईश्वरी

मस्त किस्सा
ईश्वरी

बेसनलाडू's picture

10 Sep 2008 - 4:28 am | बेसनलाडू

(स्वयंपाकी)बेसनलाडू

वेताळ's picture

10 Sep 2008 - 5:09 pm | वेताळ

मी नवीन कोणताही पदार्थ केला व तो बिघडला तर त्याचा पुरावा पाठिमागे ठेवत नाही.
वेताळ

जैनाचं कार्ट's picture

10 Sep 2008 - 5:14 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हे मात्र जबरा !!
:D

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

राघव's picture

16 Sep 2008 - 6:22 am | राघव

दोन दिवस फक्त शिराच खात होतो!
हा हा हा.. मस्त किस्सा!
मीही एकदा घरी एकटा असतांना, कांद्याचा वर्‍हाडी पद्धतीचा झुणका करायचा प्रयत्न केला होता. पद्धत तशी ऐकून माहित होती. पण शेवटी बिनसायचे ते बिनसलेच. झुणक्याची पार उकरपेंडी झाली. :D पोळ्या करायची गरजच पडली नाही!! तरीही तो उरलाच..
दुर्दैव असे की आई दुसर्‍या दिवशी येणार ती त्याच दिवशी संध्याकाळी परत आली. हर हर.. अजुन माझा उजवा कान पिळला गेलेला आठवतोय मला!!
(खादाड) मुमुक्षु

झकासराव's picture

16 Sep 2008 - 10:11 am | झकासराव

दोन दिवस फक्त शिराच खात होतो>>>>>>.
:))
मस्त किस्सा रे.
मी एकदा घरी उप्पीट करत होतो आणि पाणी एवढ घातल त्यात की एक तास झाला तरी ते उप्पीट काय बनेना. शेवटी वैतागुन "रव्याची तिखट खीर" अशी रेसिपी समजुन प्यायलो. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao