आमचा एक विषाणू दिवस

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
21 Nov 2007 - 12:15 am

२५ एप्रिल १९९९.
संध्याकाळी ६/७ च्या दरम्यान मी माझ्या संगणकावर DOS मध्ये विषाणूविरोधी संरक्षणाची संहिता चालवत होतो. का माहित नाही पण माझ्या संगणकावर विंडोजवर ते चालत नव्हते. त्यात त्याला C ड्राईव्ह मध्ये काही विषाणू मिळाले. ते मी काढून टाकले. पण D ड्राईव्ह तपासता आली नाही. कारण ती संकुचित होती(compressed). तेव्हा विषाणू मिळणे म्हणजे खास काही वाटत नव्हते.

२६ एप्रिल १९९९.
मी सकाळी झोपलो होतो. ७:३० किंवा ८ च्या दरम्यान स्नेहांशू मला उठवायला आला."ए, चल ना." "थांब रे जरा.", मी आपला उठायच्या मनस्थितीत नव्हतो.

५/१० मिनिटानी अमीत आला. त्याला स्नेहांशू म्हणाला "संगणक चालू होत नाही." आता संगणक चालू होत नाही म्हटल्यावर माझी झोप उडाली. मी ताडकन उठून बसलो. स्नेहांशू म्हणाला, "संगणक बूट होत नाही आहे". आम्ही तडकाफडकी त्याच्या खोलीवर गेलो (वरच्याच मजल्यावर).

अमीतचा संगणकही स्नेहांशूच्याच खोलीत होता. दोघांचेही संगणक चालू होत नव्हते. संगणकांवर संदेश: Please insert the boot disk. आमच्याकडील bootable फ्लॉपीने संगणक सुरू करून बघितले तर हार्ड डिस्क एकदम साफ. अगदी नवी कोरी असते तशी. मग एका संगणकावर विंडोज टाकले. आवश्यक सॉफ्टवेयर टाकले. काय करणार, त्यांचे प्रोजेक्ट चे काम बाकी होते, परिक्षा होती पुढे. त्यात एक (कुठली/कोणाची ते आठवत नाही) हार्ड डिस्क तपासली तर कळले की एक विषाणू आहे. त्याची माहिती काढली तर कळले, तो होता Win-CIH विषाणू. २६ एप्रिलला कार्यरत होतो. त्यानेच त्या हार्ड डिस्कला पूर्ण चाटून पुसून साफ केले होते.

मग काय... दवंडी पिटविली वसतीगृहात. आजच्या दिवसात संगणक चालू करू नका. (तारीख बदलणे म्हणजे संगणक चालू करावा लागेल.) जो कोणी संगणक असलेला आमच्या ओळखीचा होता त्या प्रत्येकाला सांगितले. संतोष म्हणाला,"मी बाहेर जातो आहे. कोणाला काही संदेश द्यायचा असेल तर सांगा". आमचा काय एकच संदेश, ’संगणक चालू नका करू. हार्ड डिस्क घेऊन आमच्याकडे पाठव.’ कारण ज्या विषाणूविरोधी संरक्षण संहितेने तो विषाणू पकडला होता त्याची सीडी आमच्याकडे होती. इतर कोणाकडे असेल तर त्याची माहिती आम्हाला नव्हती.

थोड्या वेळाने सुमीत आपल्या संगणकाची हार्ड डिस्क घेऊन आला. सुमीत कॉलेजच्या वसतीगृहापासून थोड्या अंतरावरील एका खासगी वसतिगृहात राहत होता. संतोषने संदेश दिल्यावर तो आमच्याकडे आला होता. तो म्हणाला, "रात्री मी संगणक चालू केला. तेव्हापासून गालावर हात ठेवून बसलो होतो". म्हणजे सुमित आमच्यातील सर्वात पहिला बकरा होता तर.

वसतीगृहातील इतर मुलेही आमच्याकडून माहिती घेत होते. आम्ही आपली एक सूचना दारावर लावली.
"येथे संगणक विषाणू काढला जाईल. प्रत्येक फाईलचा १ रू".
तोपर्यंत बहुधा आम्ही २/३ हार्ड डिस्क जमा केल्या होत्या पैसे कमावण्याकरीता ;) (हे गमतीत. कारण सर्व आपलेच मित्र तर त्यांचे काम ही करावे लागेलच ना)

चर्चेतून आम्हाला ह्यामागील कारण कळले. आम्ही सगळे खेळ/छायाचित्रे/सॉफ्ट्वेअर देण्यासाठी सरळ हार्ड डिस्कच इकडे तिकडे फिरवत होतो. त्यातच कुठल्या तरी एकातून तो विषाणू आला असेल. कोण होता तो पापी काय माहित.;) पण आता सर्व झाल्यावर काय करणार, कोणाला काय म्हणणार? चुकी आमचीही होतीच.

ह्या गोंधळात मुफद्दल आला स्नेहांशूच्या खोलीवर. तो म्हणाला की मी ही हार्ड डिस्क घेऊन येतो. आधीच २/३ हार्ड डिस्क होत्या रांगेत. म्हणून आम्ही त्याला ती सीडी दिली आणि सांगितले की हे हे सॉफ़्टवेयर टाकून विषाणू काढून टाकता येईल. तो सीडी घेऊन गेला. बोलता बोलता ध्यानात आले की मुफद्दलने जर का संगणक चालू केला तर?.....
मी आणि एकजण लगेच त्याच्या खोलीवर गेलो धावत, ओरडत. तिकडे गेल्यावर कळले, त्याने ही संगणक चालू केला होता. पण तो चालू नाही झाला. आमच्या संगणकावर काही संदेश तरी येत होते. त्याचा संगणक बिलकूल सुरू नाही झाला. आता काय करावे. पुढे काही दिवसांनी कळले त्या बिचाऱ्याच्या संगणकाचा BIOS उडाला होता. ह्यालाच म्हणतात का स्वत:च्या पायावर कुहाड मारून घेणे?

आता राहिला माझा संगणक. संध्याकाळी मला आठवले की काल मला तो वायरस दिसला होता. मी तो C मधून काढला ही होता. त्यामुळे मला जास्त भीती वाटत नव्हती. पण माझा संगणकही सुरू झाला नाही. मनात शंकेची पाल चुकचुकली. माझ्या संगणकाची हार्डडिस्क अमितच्या संगणकावर लावून बघितली. ती ही मस्त चकचकीत फळ्यासारखी होती. कोरी करकरीत. ह्याचा अर्थ माझा संगणक ही आज दिवसभरात सुरू झाला होता आणि दुसऱ्या ड्राईव्हमध्ये असणाऱ्या विषाणूने माझ्या हार्डडिस्कचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता.

चला, आम्ही ही पुन्हा सुरुवातीपासून सर्व सॉफ्टवेयर टाकण्यास सुरुवात केली.

अजून ही एका फ्लॉपीमध्ये तो विषाणू मी साठवून ठेवला आहे. कोणास पाहिजे असेल तर संपर्क साधावा. :)

जीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

21 Nov 2007 - 9:14 am | प्रमोद देव

जबरदस्त अनुभव! मजा आली वाचताना!
एक माझाही अनुभवः
संगणकाच्या विषाणूने होणारी धावपळ मी स्वतः अनुभवलेली आहे.
साधारण २००० सालची ही घटना आहे. मी ऑफिसातून घरी यायला त्या दिवशी रात्रीचे साडेनऊ वाजले होते.
माझी आठवीतली मुलगी माझी वाट पाहात रस्त्यावर येऊन थांबली होती. मी दिसताच ती धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली, "बाबा लवकर चला. आपल्या काँप्युटर मध्ये व्हायरस घुसलाय. आत्ता पर्यंत त्याने आपल्या काँप्युटरला खाल्ले पण असेल.आता आपल्याला नवीन काँप्युटर घ्यावा लागेल ना?"
तिच्या त्या बालसुलभ वक्तव्यावर मी हसलो. तिची समजूत घातली. घरी आल्यावर अँटी व्हायरस प्रोग्रॅमने तो व्हायरस काढून टाकला तेव्हा तिच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद मी आजही विसरु शकत नाहीये.त्यानंतर मला व्हायरस बद्दल असलेली तुटपुंजी माहिती तिला सांगून मी तिची भिती दूर केली.
खरे तर मीही संगणकाच्या बाबतीत नवखा होतो त्यामुळे माझ्या मुलीच्या शंकेचे मला जरी हसू आले तरी तिला दोष देता आला नाही. कारण राक्षसासारखे दिसणारे त्यांचे आकार पाहून ती घाबरली होती. त्यातून संगणकातला व्हायरस आणि आपल्या शरीरावर हल्ला चढवणारा व्हायरस हे एकच असतात असा कितीतरी मोठ्या लोकांच्यात असणारा गैरसमजही मी पाहिलेला आहे.

जुना अभिजित's picture

21 Nov 2007 - 9:20 am | जुना अभिजित

मजा आली. बर्‍याच दिवसांनी हॉस्टेलच्या उचापती वाचायला मिळाल्या. आमच्या इकडेही एक टीकिडस नावाचा व्हायरस होता. ६० सेकंदात मशिन बंद करा. रिमोट प्रोसिजर कॉल सर्विस बंद करायचा साला.

शेवटी एक पॅच मिळाला आणी त्याचा बिमोड झाला.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

देवदत्त's picture

28 Nov 2007 - 12:09 am | देवदत्त

आपले अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
आणखी ही एकदा थोडाफार त्रास झाला होता वायरसचा. बहुधा माझ्याकडून माझ्या मित्राला ईमेल ने गेला होता. मग काय, तो मित्र (कलकत्त्यात), मी (ठाण्यात) आणि त्याचा एक मित्र (अमेरिका की पुणे नक्की आठवत नाही. कॉलेज मध्ये वरिष्ठ होता तो आम्हाला) मिळून, याहू चॅट ने संभाषण करून, त्या विषाणूचा माग काढला. विषाणू प्रतिरोधक संहितेने तो काढला पण त्याच्या विंडोज रजिस्ट्री मधील लिखाण आम्हालाच शोधून काढावे लागले. अर्थात कसे ते सर्व त्या मित्राने सांगितले.

सखाराम_गटणे™'s picture

28 Aug 2008 - 9:32 am | सखाराम_गटणे™

माझ्या लेपटोप ची २-३ वेळा वाट लागली आहे.
याहु मेसेंजर आणि इंटरनेट चालयचे नाही.

जेव्हा पासुन AVG ७-८ वापरतो, तेव्हा पासुन काही अडचण नाही.

माझ्याकडे सुदधा, सगळे व्हायरस आहेत. डी वी डी वर आहेत.
सखाराम गटणे

विजुभाऊ's picture

28 Aug 2008 - 11:45 am | विजुभाऊ

एका शासकीय कार्यालयात सर्दी झालेल्या कर्माचार्‍याला प्रवेश नाकारला जायचा.
कारण विचारल्यावर कळले की कॉम्प्युटरला व्हायरस लागु नये म्हणुन ही काळजी होती
दुसर्‍या एका केस मध्ये पोलिसानी जप्त केलेल्या फ्लॉपीस पंचिंग मशीन ने पंच करुन व्यवस्थीत फाईल करुन ठेवल्या होत्या पुरावा म्हणुन.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत