जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 1:22 am

जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो
कढईतली मोहरी चुर्रर करते
हळद मीठ तेल टाकुन शेंगदाने खरपुस भाजले जातात
मी बाहेरच बसलेला असतो पेपर वाचत
कांद्यापोह्याच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा गाठोडी ईकडे तिकडे सरकतात
पोटमाळ्यावरची झुरळं तर्रर पळतात
झाडू बादली पाणी घेऊन भिंत पुसली जाते
मी खालीच ऊभा असतो स्टुल घेऊन
जळमटं काढायच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा साखरेचं माप होत असतं
तेव्हा मालक सुर्रर करत चहा पितो
डाळी तांदुळ कडीपत्ता पिशवीत कोंबुन भरला जातो
मी तिथेच ऊभा असतो काऊंटरजवळ
बिलाच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा माहेरचा पाहुणा घरी येतो
सगळा शिणवटा अर्रर करुन पळुन जातो
पुरणपोळी आंबरस चकल्या ताटात आग्रहाने वाढल्या जातात
मी पाटावर बसुन असतो हवापाण्याच्या गप्पा करत
निरोपाच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा म्हैस दावणीची सुटते
तेव्हा वाडी फुर्रर करते
लगबग धावपळ घाई करत वेसण घातली जाते
मी सावलीत पडलेला असतो उंबराच्या झाडाखाली
निद्रेच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा जोंधळ्यावर कणसं फुटायला लागतात
तेव्हा पाखरं भुर्रर करत ऊडत येतात
गोफण दगड मचाण बुजगावणंसुद्धा मारा करतं
मी दंडावर ऊभा असतो बैलांना पाणी पाजत
ऊनं ऊतरायच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा पाऊस वादळी पडतो
तेव्हा आभाळ टर्रर करुन फाटत जातं
वीजा वारा ऊन आकाशात कडाडुन खेळत सुटतं
मी भिजुन बसलेला असतो ओसरीवर कुडकुडत
ऊफाळत्या चहाच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा मला ऊशीर होतो
तेव्हा रात्र किर्रर होते
पणती ऊदबत्ती समई लावुन घराची ऊजळणी होते
तु प्रसन्न बसलेली असते अंगाईगीत म्हणत
माझ्या प्रतिक्षेत

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

9 Nov 2015 - 3:28 am | शिव कन्या

छान लिहीलेय.

वाह! जव्हेरगंज!उत्कृष्टच आहे कविता. शेवटची २ कडवी तर क्लासच!

चाणक्य's picture

9 Nov 2015 - 8:52 am | चाणक्य

छान लिहीली आहे.

मुक्त विहारि's picture

9 Nov 2015 - 9:09 am | मुक्त विहारि

आपल्या आयुष्यात प्रतिक्षे शिवाय कुणीही आपले नसते.

थोडी भर....

मार्च महिन्यांत सगळीकडे फुकटची धावाधाव सुरु असते.
अनावश्यक माहितींनी मेल बॉक्सेस सजलेल्ल्या असतात
अप्रायझल सबमिशनची डेड-लाइन जवळ येत असते.
काही ठराविक मंडळी त्यांच्या-त्यांच्या साहेबांपाशी बसूनच असतात.
मी मात्र एका कोपर्‍यात, शांतपणे, नविन कामाची आखणी करत असतो
कुठल्याही प्रकारच्या पगारवाढीच्या अपेक्षेला बाजूला सारून....
....नाहीतरी, मालकाला कुठली पगारवाढ आणि कुठला बोनस??????

जव्हेरगंज's picture

9 Nov 2015 - 9:18 am | जव्हेरगंज

h

नाव आडनाव's picture

9 Nov 2015 - 9:35 am | नाव आडनाव

आवडली.

टवाळ कार्टा's picture

9 Nov 2015 - 1:20 pm | टवाळ कार्टा

मस्तय

पीके's picture

9 Nov 2015 - 9:54 pm | पीके

काय समजलं नाय भौ..

जव्हेरगंज's picture

9 Nov 2015 - 10:54 pm | जव्हेरगंज

ही कविता आहे मालक, कथा नाही.
आता यात काय समजलं नाही ते तरी सांगा..!

विशाल कुलकर्णी's picture

9 Nov 2015 - 10:12 pm | विशाल कुलकर्णी

वाह...
शेवटची दोन कङवी विशेष आवडली.

आनंद कांबीकर's picture

10 Nov 2015 - 12:11 am | आनंद कांबीकर

..