हे नटराजा
तुझी सोडून मी कधीच दुसऱ्या कशाची उपासना केली नाही..
पण माझ्या प्राक्तनात आले स्मशानवत बैरागी भोग आणि टाळ्या घेण्याच्या मस्तीची शकले उडून दूरवर जाऊन पडली..
भयावेगात मी जाळून टाकल्या उर्मी आविष्काराच्या आणि ती राख सावडत अश्रू ढाळत बसतो सध्या..
तुझ्या अधिष्ठानाबद्दल कधीच शंका नव्हती मनात माझ्या पण गलितगात्रतेच्या विचारांची धार फोडत गेली माझा निर्धार आणि मी थंडपणे बंद केल्या तुझ्या जाणिवांच्या आकर्षक वाटा
तुझ्यापेक्षा मोठे तुझे वेड-पण चौथ्या भिंतीपलिकडे बसलेल्या भेसूर दुःस्वप्नांना मी घाबरतो..
आता रिकाम्या हातांमध्ये बांधून मणाच्या वजनाचे दगड, खुरडतो आहे ठराविक चाकोरीत..
हे नटराजा
मला माफ कर-मी निष्ठूर नाही, आतयायी पण नाही, मी एक अस्सल भेकड आहे..
कदाचित अजूनही आहे तुझेे वेड माझ्या पेशींमध्ये आणि तुझ्या अस्तित्वाचा अंश वाहतोय अजूनही धमन्यांमधून
माझ्या राखेसोबत तो रूजेल मातीत-जन्मेल पुन्हा एक गुणा कागलकर... नटरंग.
प्रतिक्रिया
13 Oct 2015 - 11:20 am | पद्मावति
सुरेख.
कलावंताची मानसिक तगमग छान मांडलीय.
13 Oct 2015 - 11:35 am | एच्टूओ
धन्यवाद