जमलंच तुला...... तर
जमलंच तुला...... तर
करुण दू: खानं ओथंबलेल्या डोळ्यांना
धागा (सुखाचा) दे विसावण्यासाठी
या लोकशाहीला थोड़ी जागा दे प्रसवण्यासाठी
त्यामुळं उघड्यावर होणारे तिचे प्रसव टळतील
नाहीतर उगाच लोक बड़बड़तील
काहीही अन कुठेही ?
जमलंच तुला...... तर
कान फूंक त्या बलातकाय्रांचे
दे पाणी त्यांना मर्दानी कर्तुत्वाचं !
एरवी गंज चढलाय त्यांच्या माणूसपणाला
पौरुषत्वाची एक ठिणगी असते कायम
पण तीही पेट घेते फ़क्त वासनेच्या वाय्रानेच
त्यांचा पुरुषार्थ शोभून दिसतो
टेबलावरच्या कागदी फुलांच्या ताटव्यांत
अगदी गुबगुबीत, गुलाबासारखा
ना गंध, ना वास!
फूल आहे, तेवढा भास !
जमलंच तुला...... तर
दे निवारा त्यांना
ज्यांच्या झोपडितला प्रकाश
घासागणिक गिळला जातो
अंधरानं जीव पिळला जातो
मग त्यांचंही अवसान गळायला लागतं
यातलं थोडं थोडं कळायला लागतं
पण सांगणार कुणाला?
कि आमच्या
धारदार तलवारी चोरल्या जातात
छातीवर शिलालेख कोरल्या जातात
काळोखाच्या अजरामरतेचे...
जमलंच तुला...... तर
हाणून पाड त्या बहुरूपी
गिधाडांना.....
जे हुडकतात माणसांच्या वस्त्या
माणुसकीचे लचके तोडण्यासाठी
हृद्यातल्या 'माणुसपणा'वर
असते त्यांची नजर
माणूस दिसला....कि
हे चोच मारायला हजर
हे दयाळा !!
इथे खुलेआम हिंडतात मवाली
गळे कापत मानवतेच्या पुजाय्राचे....
पिंडाला शिवण्यासाठी कावळे
शोधावे लागतात......
मरणासाठी स्मशानाचे
परवाने लागतात.....
माणसाअभावी वसाण पडलेल्या वस्त्यांना
लागतेय वाळवी....
तुझ्या साक्षीने...जातियतेची, धर्मांधतेची
कवी:निवृत्ती पां हागे,पुणे