'अ गुड फील्डवर्कर विल मॅरी इंटू द कम्यूनिटी ही/शी इज वर्किंग विथ, दॅट्स द ऑन्ली वे टु मेक देम ट्रस्ट यू' फील्डवर्कवरच्या व्याख्यानात अंदमानी भाषांवर परिश्रमपूर्वक काम केलेल्या बाईंनी मिश्कीलपणे म्हटलं आणि आमच्या हॉलमध्ये खसखस पिकली. पण फील्डवर्करमध्ये आपल्या कॉलेबरेटर समाजाबद्दल किती आत्मीयता असली पाहिजे, हा मॅडमनी त्यांच्या एकूणच व्याख्यानात सांगितलेला मुद्दा, तो मात्र मनात पक्का ठसला.
फील्डवर्क म्हणजे काय, याची काही व्याख्या करण्याइतका माझा अजिबातच अनुभव नाही. प्रत्येक क्षेत्राची काम करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे ही व्याख्या क्षेत्रानुसार बदलत असावी. भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील फील्डवर्कबद्दल मात्र टनभर सांगण्यासारख्या माहितीतल्या मी ऐकलेल्या मणभर माहितीतली मला समजू शकलेली कणभर माहिती इथे मांडायचा प्रयत्न करते. पण त्याआधी मी भाषाशास्त्रात का आले, आणि त्यातही फील्डवर्कबद्दल मला एवढं आकर्षण का निर्माण झालं त्याबद्दल थोडंसं.
भाषांची आवड लहानपणापासून होतीच, त्यामुळे आर्ट्सला जाणं हे आधीपासून ठरलेलं होतं. दहावीला एकूण चांगले गुण व त्यातही गणितात चांगले गुण असल्याने मला परावृत्त करायचे समाजाने यथाशक्ती प्रयत्न केले. आई-बाबांना माझ्या निर्णयक्षमतेबद्दल खात्री असल्यामुळे मी व्यवस्थित आर्ट्स अभ्यासक्रमात दाखल झाले. इतिहास ज्या पद्धतीने शिकवला जातो ती पद्धत मला मुळीच आवडायची नाही. म्हणून इतिहासाला पर्याय म्हणून लॉजिक घेतलं. तिथेच लॉजिक शिकता शिकता कदाचित मला नेमकं काय आवडतं हे समजायला सुरुवात झाली. मी आर्ट्समध्ये खूश होते, पण गोव्यात मला हवं तसं वातावरण नव्हतं, म्हणून मी बी.ए. करायला पुण्यात फर्ग्युसनला हजर झाले. फर्ग्युसनचं वातावरण वेगळंच होतं. तिथे इंग्लिश आणि त्याचसोबत टिमवितून संस्कृत विषय शिकता शिकता मला साहित्य आवडतं, पण त्याची चिरफाड करण्यापेक्षा मला शब्द आणि व्याकरणाच्या फिलॉसॉफीत रमायला जास्त आवडतं, हे लक्षात आलं. संस्कृतमध्ये न्याय आणि मीमांसा यांच्याबद्दल आमचे शिक्षक शिकवायचे, तेव्हा मला त्यात शाकुंतल शिकण्यापेक्षा जास्त रस वाटायचा. आणि इंग्लिशमध्ये वर्डस्वर्थ कितीही आवडला, तरी फोनेटिक्सवाल्या तासाची वाट जास्त बघितली जायची. इतकं असून मला प्रत्यक्ष लिंग्विस्टिक्सबद्दल सेकंड इयरपर्यंत काहीच माहीत नव्हतं. जेव्हा माहिती झाली, तेव्हा मी माझ्या शिक्षकांना विचारलं. जवळपास सगळ्यांचा प्रश्न, "हे करून तू काय करणार?" हा होता. जॉब मिळण्याच्या संधी खूप कमी आणि इंग्लिश आणि संस्कृत हे दोन्ही पर्याय उपलब्ध असताना मी असा निर्णय का घेतेय याची काळजी माझ्या शिक्षकांना होती. पण ज्याला लोक विरोध करतात, त्यातून बर्याचदा समाधान मिळतं हे आर्ट्सच्या वेळी लक्षात आलेलं होतं कदाचित, म्हणून माझा निर्णय अजून पक्का झाला.. :)
लिंग्विस्टिक्स ऑफर करणार्या बर्याच नावाजलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत. पण त्यांचा अभ्यासक्रम मला अपीलिंग वाटला नाही. डेक्कन कॉलेजला आले, आणि इथे लावलेले डायलेक्ट मॅप बघितले, विभागाचा इतिहास बघितला, आणि वाटलं - हे काहीतरी आपलं आहे. इथे मुलाखत दिली, पास झाले, आणि मग मला जरा हवेतून खाली येऊन प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करायचं भान आलं. घरी गेल्यावर बाबांना म्हटलं, "करू ना लिंग्विस्टिक्स?" "मेहनत करायची तयारी असेल तर नक्की कर, उगाच टाइमपास करण्यासाठीचा तो विषय नाही, हे लक्षात ठेव." आपले आई-वडील आपल्याला किती चांगलं ओळखतात याचं आणखी एक प्रत्यंतर! पण असा पाठिंबा मिळाल्यावर मी माझ्या निर्णयावर अजून ठाम झाले.
इथला अभ्यासक्रम सोपा नव्हता. आर्ट्स करून आलेल्यांना बर्याच गोष्टी सुरुवातीला झेपत पण नाहीत. माझ्या बॅचमधले जवळपास सगळे लोक गळून गेले. बर्याचदा क्लासमध्ये मला एकटीला शिक्षक शिकवायचे! पण ती सेशन्स खरं तर खूप छान वाटायची मला. सगळ्या शिक्षकांनी एकटीला शिकवण्याचा बिलकुल कंटाळा न करता भरभरून ज्ञान दिलं. माझ्या एक मॅडम क्लासमध्ये आल्यावर मला एकटीला बघितलं, की म्हणायच्या "ओह, सो इट इज द प्रायवेट ट्यूशन डे टुडे.."
या लेक्चर्समधूनच फील्डवर्कबद्दल माझं कुतूहल वाढलं. एक तर आमच्या कॉलेजला फील्डवर्कची तगडी परंपरा आहे, आणि दुसरं हे सगळे शिक्षक स्वतः फील्डवर्कर आहेत. भारतातील चारही प्रमुख भाषाकुळांवर आणि अंदमानी व 'लँग्वेज आयसोलेट' निहालीवर काम केलेल्या शिक्षकांनी मला शिकवलं, हे माझं भाग्यच आहे. या सगळ्याचा प्रभाव म्हणून मी माझा एम.ए.चा प्रकल्पही फील्डवर्क बेस्ड निवडला. आणि फील्डवर्क या गोष्टीच्या प्रेमातच पडले. एम.ए. होताना व झाल्यानंतर मी स्पेलचेकर, पीओएस टॅगिंग, भाषांतर अशा सध्याच्या आमच्या क्षेत्रातल्या 'हॅपनिंग' गोष्टीही करून बघितल्या. पण जीव फील्डवर्कमध्येच अजूनतरी अडकलेला आहे. अजून मी या क्षेत्रात खूप नवखी असल्याने माझं जे काम झालंय ते अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून झालेलं आहे. त्याचे तपशील देणं हे त्यामुळे मला शक्य नाही. पण जेवढं शक्य आहे, तेवढं इथे मी सांगायचा प्रयत्न करते.
भाषाशास्त्राबद्दल बर्याच जणांना कुतूहल असतं, जाणून घेण्याची इच्छा असते, पण तेवढेच गैरसमजही असतात, कारण अन्य संशोधनात्मक विषयांप्रमाणेच इथलेही संशोधक प्रत्येक गोष्ट जगापर्यंत पोहोचवू शकत नाहीत. एक म्हणजे भाषा हा विषय राजकीयदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतो. आणि दुसरं म्हणजे तो आपल्या नेहमीच्या वापरातला भाग असल्यामुळे स्वतःच्या भावना आणि स्वतःची पर्सेप्शन्स कोणत्याही मुद्द्यावर लादून आणि अनेक खुस्पटं काढून संशोधनात्मक गोष्टी नाकारणं, हे स्वघोषित भाषातज्ज्ञांना सोपं जातं. त्यात पुन्हा एखादं संशोधन पूर्ण अवस्थेला येईपर्यंत त्यातील माहिती उघड न करता येणं, कॉपीराइट्स वगैरे प्रश्न असल्यामुळे 'सकाळचा चहा पिता पिता पेपरमधला भाषाशास्त्रावरचा लेख वाचू' ही शक्यता अगदीच नगण्य बनून जाते. त्यामुळे हा विषय तसा रिसर्च पेपर्समध्येच अडकलेला दिसला, तरी त्याला एक खास मानवी अंग आहे. भाषा म्हटली की बोलणं आलं, आणि बोलणं आलं, की माणूस आलाच. अगदी अशिक्षित, खेडवळ माणसापासून ते अति-शिक्षित प्रत्येकाला दुसर्या माणसांशी जोडणारी मानवी भाषा कशी एकाच प्रकारे नियमबद्ध असते, हे समजणंही थक्क करून टाकतं. या नियमांचा, त्यांच्या परिणामांचा, त्यांच्यावर परिणाम होणार्या गोष्टींचा धांडोळा घेणं हे कोणत्याही भाषाशास्त्रज्ञाला आकृष्ट करतंच. हा धांडोळा घेण्याच्या पद्धतींचा आवाका खूप मोठा असला, तरी त्यातील 'फील्डवर्क'ची पद्धत मात्र एखाद्या संशोधकाला त्याच्या ग्रंथालयातून अगदी थेट भाषा वापरणार्या माणसांमध्ये आणून सोडते. त्या माणसांमधलाच एक बनल्याशिवाय त्याला हुलकावणी देणारी भाषेची गुपितं उकलत नाहीत. अशा या 'थेट जनमानसात' आणणार्या पद्धतीबद्दलचे माझ्या शिक्षकांचे ऐकलेले अनुभव आणि माझे स्वतःचे तुटपुंजे अनुभव आठवत हा लेख लिहायचा प्रयत्न करत आहे.
एक भाषाशास्त्रज्ञ फील्डवर्क का करतो? याचं उत्तर 'भाषेच्या अंतरंगाची उकल करण्यासाठी' इथपासून ते 'नसती खाज असते म्हणून' या रेंजमध्ये कोणतंही असलं तरी त्याला तुम्ही प्रामाणिक म्हणू शकता. एक तर भरभक्कम फंडिंग असल्याशिवाय किंवा खरोखर प्रामाणिकपणा असल्याशिवाय कुणीही उन्हातान्हाचं तळपत लोकांच्या घरांमध्ये फिरत नाही. आणि भरभक्कम फंडिंग हे तुम्ही स्वतः संशोधनक्षेत्रातील भरभक्कम व्यक्ती असल्याशिवाय मिळत नाही आणि असा भरभक्कमपणा येईपर्यंत तुम्हाला प्रामाणिक बनावंच लागतं. तर मुद्दा हा, की खरोखर जीव ओतून काम करायची इच्छा असल्याशिवाय हे काम करणे जमत नाही.
आता हा प्रामाणिकपणा असून भागत नाही. तुम्ही लोकांची भाषा ऐकायला जाणार म्हणजे तुम्ही मुळात लोकांना भेटणार. आता लोक कशा कशा प्रकारचे असतात हो.. काही काही आदिवासी थेट बाणांनी स्वागत करतात. काही शहरी लोक तुम्हाला दारातही उभं करून घेत नाहीत. 'फाडफाड इंग्लिश बोलता येऊनही आमच्या भाषेचा अभ्यास करणारे' म्हणजे तुम्हाला मूर्खच समजलं जाणार याची तर शंभर टक्के खात्री बाळगूनच जायचं. बरं, तुम्ही शोधायला काय जाता, तर त्यांची भाषा. भाषा म्हणजे संस्कृतीची किल्ली असते. ही किल्ली कुठच्या अनोळखी माणसाच्या हातात कुणी का म्हणून द्यावी, हे उत्तर प्रत्येक नवीन समाजासाठी वेगळं असू शकतं. त्यापलीकडे भाषेबद्दलचे त्या त्या समाजाचे समज-गैरसमज, न्यूनगंड-अहंगंड, सगळ्या गोष्टींचा तुमच्याशी संबंध येतोच. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रातच म्हणाल, तर लोकांना हे परीक्षा घ्यायला आलेले मास्तर वाटतात आणि त्यातल्यात्यात त्यांच्या प्रमाणभाषेच्या संकल्पनेच्या जवळपास जाणारं बोलणं सुरू होतं. त्यांना त्यांच्या मूळभाषेवर आणणं पण त्यांना त्याचा न्यूनगंड वाटू न देणं ही तुमची कसरत. गावात तर खासकरून लोकांना बोलतं करायलाच तुमचे दिवसचे दिवस जाऊ शकतात. एवढं करून ते तुम्हाला हवं तसं बोलणार थोडंच. तुम्हाला भूतकाळ हवा असला म्हणून तुम्ही त्यांना जुन्या गोष्टी सांगायला लावा, ते हमखास वर्तमानात बोलणार. फील्डवर्कची सेशन्स हा एक खरोखर विनोदी सोहळा असतो, हे सगळ्यांच्याच अनुभवाचं सत्य. ज्या गावात केलेल्या कामाच्या जोरावर तुम्हाला अकॅडेमिक्समध्ये मोठी पोस्ट असते त्या प्रत्यक्ष गावात 'रिसर्चवाली बाई' असलं काहीतरी बिरूद मिरवावं लागतं. 'पीयच्डी' झाल्यावर पण अभ्यास का करायचा? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर अस्तित्वात नसल्यामुळे तुम्ही आयुष्यभर पीयच्डीच करत राहायची असते!
फील्डवर जाताना तुम्हाला नक्की काय माहीत करून घ्यायचं आहे ते तुमच्या डोक्यात क्लियर असणं अत्यावश्यक असतं(म्हणे). प्रत्यक्षात तुम्हाला मदत करण्याच्या लोकांच्या उत्सुकतेमुळे आणि तुमच्या संकल्पना अजून पक्क्या न झाल्यामुळे भल्या प्रचंड प्रमाणात डेटा मिळतो, आणि हाती फारच कमी लागतं, हा अननुभवी नवशिक्या फील्डवर्करचे नेहमीचा अनुभव. तुम्हाला ध्वनिशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, तर एका प्रकारचे प्रश्न, वाक्यरचना जाणून घ्यायची असेल तर दुसर्या प्रकारचे इ. सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. या सगळ्यांच्या प्रमाण प्रश्नावल्या खूप कमी आहेत, आणि असल्या तरी तुमच्या भाषेनुसार त्यांना प्रचंड बदलून घ्यावं लागतं. तुमचा इन्फॉर्मंट/कॉलेबरेटर म्हणजे माहिती देणारी व्यक्ती - हे अगदी सुरुवातीला पण किमान ३ असतात, पुरुष/महिला, वृद्ध/तरुण, अशा प्रकारे वर्गीकरण केलेले असतात. यांच्याशी तुम्ही कुठच्या भाषेत संवाद साधणार, या संवादाच्या भाषेत तुम्हाला हवी असलेली संरचना नेमकी कशी काढून घेणार याचा प्रचंड अभ्यास केलेला आवश्यक असतो. (तो झालेला नसतो हा अ.न.फी.ने.अ.) इतकं करून प्रत्यक्ष तिथे काय घडेल याबद्दल तुम्ही पूर्ण अंधारात असता. हे कॉलेबरेटर्स सापडण्यापासून, त्यांची तयारी असण्यापासून ते त्यांच्या आवाज रेकॉर्डिंगमध्ये क्लियर येणं, रेकॉर्डिंग चालू असताना त्यांनी तंबाखू न खाणं इ. काळज्यांपर्यंत काहीही तुमच्यासमोर उभं ठाकू शकतं. प्रश्नावल्या लोकांना खूप कंटाळवाण्या वाटू शकतात. त्या तशा वाटू न देता, त्यांना सतत बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांना आपल्याला हव्या त्याच पद्धतीने बोलायला लावणं ही अनुभवाचीच गोष्ट आहे. नॅरेटिव्जमधून आम्हाला नॅचरल स्पीच डेटा मिळतो. त्यासाठी चित्रं, काही व्हिडियोज दाखवून त्यांना त्यांचं वर्णन वगैरे करायला लावणं ही एक पद्धत झाली. पण तिच्यासोबतीने तुमच्याकडे अनेक पर्याय तयार असावे लागतात. माहिती देण्यासाठी अर्थात लोक बांधील नसतात, त्यांना कंटाळा आला तर ते उडवाउडवी खूप करू शकतात. एकदा एका गावात आम्ही खूप तयारीने गेलो आणि तिथल्या सहावीतल्या दोन मुलांशी मला बोलायचं होतं. चित्रं, व्हिडियोज सगळ्यांच्या त्यांना कंटाळा आला. माझा वेळ संपत होता आणि ती मुलं कंटाळत होती. अशा वेळी नुकताच झालेला क्रिकेट वर्ल्डकप कामी आला. त्याच्यावरून त्यांच्या गल्ली क्रिकेटवर विषय आणल्यावर एकदाची ती मुलं बोलती झाली. एकदा तुम्हाला विषय सापडला की मग पाहिजे त्या गोष्टी वदवून घेता आल्याच पाहिजेत. त्या मुलांनी मला त्यांच्या सगळ्यात चांगल्या झालेल्या मॅच (भूतकाळ), त्यांची आपापसातली राजकारणं (तो मला म्हणाला, मी त्याला म्हणालो अशी वाक्यं), कोण कुणापेक्षा चांगलं खेळतं (डिग्रीज ऑफ कंपॅरिझन) अशी अनेक स्ट्रक्चर्स रंगवून सांगितली! अर्थात अनुभवी फील्डवर्कर्सना हे प्रश्न हँडल करणं चांगलं जमतं, आमचं ठेचकाळणं अजून चालू आहे. :) कागदावरच्या 'रिसर्च एथिक्स'प्रमाणे तुम्ही त्यांना सगळं सांगणं आणि त्यांच्या सह्या वगैरेही घेणं अपेक्षित असतं. हे एथिक्स कुठच्या मर्यादेपर्यंत पाळायचे हे प्रत्यक्ष परिस्थितीवरूनच ठरवावं लागतं.
फील्डवर्क ही तुमच्यासाठी एक अनुभवांची शिदोरी होऊन जाते. माझा ज्या गावांशी संबंधही नाही, त्या गावांमध्ये मला सर्दी आहे म्हणून आल्याचा चहा करून देणारी एक ताई, सासरी होणारा छळ कुणाला सांगता येत नाही म्हणून माझ्यासमोर भडाभडा बोलून दाखवणारी मुलगी, अंधार पडला म्हणून मला गाडीपर्यंत सोडायला येणारा एक दादा, या लोकांचे चेहरे मी विसरून गेलेय, पण माणुसकीचं असं दर्शन घडवणार्या फील्डवर्कचं आकर्षण मात्र अशा गोष्टींनी वाढवून ठेवलंय. त्यांची रंगीबेरंगी आयुष्यं त्यांच्या भाषेच्या माध्यमातून जगता येतात, याशिवाय थ्रिलिंग दुसरं काय असू शकतं बरं?
हा सगळा डेटा मिळवून परत आल्यावर त्याचं ट्रान्स्क्रिप्शन करणं हे सर्वात महाप्रचंड कंटाळवाणं काम. याचा अंदाज घेऊन डेटा गोळा केला पाहिजे हे शहाणपण रात्र रात्र जागून अखंड चालणार्या कथा सेकंदासेकंदाला पॉज करत टंकून काढल्याशिवाय येत नाहीच. या ट्रान्स्क्रिप्शननंतर त्यांचं विश्लेषण. तुम्ही जर नुसतंच भाषेचं डॉक्युमेंटेशन करायला गेला असाल, तर एक एक पापुद्रा उलगडून काढत सगळ्या गोष्टी पाहायच्या आणि तुम्ही एखादी विशिष्ट संरचना मिळेल या अपेक्षेने गेला असाल तर तिचा अभ्यास करायचा. या गोष्टी तुम्ही नेमक्या काय अपेक्षेने गेला होतात त्यावर अवलंबून आहेत. पण फील्डवर्क सारखी मजा या कशातच नाही, हे मी माझ्या प्रचंड तुटपुंज्या अनुभवावरूनसुद्धा नक्की सांगू शकते.
हे विश्लेषण करणं हे मात्र खास भाषाशास्त्राचं काम. आम्ही ज्या भाषेवर काम करत आहोत, तिचा इतिहास, तिच्या भोवतालची राजकीय परिस्थिती, ती कुठच्या भाषाकुळातली आहे, त्या भाषाकुळाची वैशिष्ट्ये काय, हे आम्हाला माहीत असणं आवश्यकच असतं. तुम्ही नेमका काय उद्देश घेऊन गेला होत, त्यावर विश्लेषण अवलंबून असलं, तरी त्या भाषेचं एक सर्वसाधारण व्याकरण बनवावं लागतं. व्याकरण म्हणजे त्या भाषेचा एक ढाचा; हा तुमच्याकडे असला की तिची सर्वसाधारण प्रकृती तुमच्या लक्षात येऊ शकते. हे सर्व करण्यात भाषाशास्त्रातील शिक्षणाची खरी गरज भासते.
आता विषय थोडासा भरकटवून हेसुद्धा सांगितलं पाहिजे की भाषाशास्त्रामधील करियरची व्याप्ती याहीपेक्षा बरीच मोठी आहे. संगणकांना भाषा शिकविण्यापासून ते भाषांच्या विकासाच्या पायर्या शोधेपर्यंत या क्षेत्रात बरीच आव्हानं आहेत. कम्प्यूटेशनल लिंग्विस्टिक्स, सायकोलिंग्विस्टिक्स, हिस्टॉरिकल, अगदी फोरेन्सिक लिंग्विस्टिक्स अशीही एक शाखा आहे. भाषांतराच्या थियरीचाही भाषाशास्त्रात अभ्यास होतो, आणि डिक्शनरीच्या शास्त्राचासुद्धा ('लेक्सिकोलॉजी'चासुद्धा) होऊ शकतो. मानवी भाषेच्या जेवढ्या अंगांना भाषा स्पर्श करते, तेवढ्या अंगांसाठी भाषाशास्त्राचा अभ्यास उपयुक्त आहे. यासाठी साहित्यापेक्षा थोड्याशा कोरड्या वाटू शकणार्या संकल्पनांमध्ये काही काळ डोकं बुडवावं लागलं, तरी नंतर आयुष्यभर शब्दाशब्दाशी आणि उच्चाराउच्चाराशी खेळत बसण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
प्रतिक्रिया
24 Sep 2015 - 12:32 am | बोका-ए-आझम
डेक्कन काॅलेजमध्ये चित्रीकरणाच्या निमित्ताने अनेकवेळा जाणं झालेलं आहे. त्या वास्तूचा भारदस्तपणा हा तिच्या संरचनेप्रमाणेच तिथल्या ज्ञानामुळेही आहे हे माहित होतं पण नक्की काय स्वरुपाचं काम तिथे चालू असतं हे माहित नव्हतं. ते सांगितल्याबद्दल आणि एका अनवट क्षेत्राची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!
एक शंका - तत्वज्ञानात येणारा भाषिक विश्लेषण (Linguistic Analysis ) हा भाग आणि तुमचं क्षेत्र यचा काही संबंध आहे का?
24 Sep 2015 - 12:47 am | अभ्या..
वेगळ्याच विषयाचा ध्यास घेऊन निवडलेले करिअर. शुभेच्छा ग बहिणाबाई. यशस्वी भवः.
24 Sep 2015 - 2:45 am | प्यारे१
भव नंतर विसर्ग नाही.
बाकी तंतोतंत. ;)
24 Sep 2015 - 1:41 am | मधुरा देशपांडे
उत्तम लेख. खूप आवडला. लिहित राहा.
24 Sep 2015 - 2:01 am | डॉ सुहास म्हात्रे
एक अनवट विषयाचा परिचय आवडला. या क्षेत्रात काम करायला त्याचे वेडच असायला पाहिजे हेच खरे !
या विषयावर आणि तुमच्या अनुभवांबद्दल अजून वाचायला आवडेल.
24 Sep 2015 - 3:26 am | रेवती
लेख आवडला. गुंतागुंतीचे, संयमाची कसोटी असलेले काम करण्यातही तुला आनंद वाटतोय व तो त्यातील आवडीमुळेच आहे. पुढील कामासाठी शुभेच्छा.
24 Sep 2015 - 3:44 am | चाणक्य
एका वेगळ्या क्षेत्राची ओळख झाली. फील्डवर्क म्हणजर तुमच्याकडे अनुभवांची शिदोरीच असणार. अजून वाचायला आवडेल तुमच्या क्षेत्रा बद्दल आणि कामाबद्दल.
बाकी या लेखमालेच्या निमित्ताने आम्हा वाचकांचं अनुभवविश्व संपन्न होतंय. मिपाला आणि तुम्हा लेखकांना धन्यवाद
24 Sep 2015 - 4:29 am | स्रुजा
खुप सुरेख लेख ! खरंच या विषयाची व्याप्ती केवढी प्रचंड आहे. असं वेगळं फिल्ड निवडल्याबद्दल तुझं अभिनंदन. तुझी आवड आणि तुझं कौशल्य दोन्ही या लेखामधुन स्पष्टपणे समोर येतंय. कंप्युटेशनल आणि फोरेन्सिक लिंग्॑इस्टिक बद्दल थोडं अजुन सांगशील का? फार च रोचक शाखा आहेत या लिंग्विस्टिक च्या.
24 Sep 2015 - 2:07 pm | आदूबाळ
+१ मलाही हे जाणून घेण्यात रस आहे.
24 Sep 2015 - 7:27 am | मित्रहो
हे असे वेगळे क्षेत्र असते आणि त्यात फिल्डवर्क करावे लागते ह्याची कल्पना नव्हती. अशा क्षेत्राची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
24 Sep 2015 - 8:16 am | इशा१२३
मस्त माहिती पिशे.छान झालाय लेख.अस वेगळ शिक्षणक्षेत्र तु आवडिने निवडलस हे विशेष.तुला त्यात छान यश मिळुदेत.शुभेच्छा!
24 Sep 2015 - 8:36 am | अजया
अनवट शिक्षणक्षेत्र ,त्यात घरोघरी परक्या लोकांशी बोलून माहिती जमवणं, तिचं विश्लेषण करणं आणि ही करिअर काय आहे हे आमच्या सारख्या अज्ञ लोकांसमोर समजावून सांगणं हे पिसे लावणारे कामच आहे! तुझ्या या क्षेत्रातली करिअर करण्याच्या निर्णयाला सलाम आणि पिएचडीला अनेक शुभेच्छा.
24 Sep 2015 - 1:44 pm | एस
या क्षेत्रात कदाचित सर्वात महत्त्वाचे कौशल्य हे संवाद साधू शकण्याचे असावे. अगदी वेगवेगळ्या समुदायांमधील व्यक्तींशी संपर्क साधणं, त्यांचा विश्वास संपादन करणं, माहितीच्या पसार्यामधून नेमका विदा मिळवणं, त्याचं विश्लेषण करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे निष्कर्ष हे अचूकपणे व तटस्थपणे जगासमोर आणणं ह्यामागे किती मेहनत असू शकते हे ह्या लेखाच्या निमित्ताने समजलं.
लेखमाला चांगलीच रंगते आहे.
24 Sep 2015 - 9:15 am | बाबा योगिराज
खरच खुप वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर काम करत आहात. लेख चांगला आहे. तुमच्या क्षेत्रा बद्दल खूपच कमी माहिती आहे आम्हा लोकांना. तुम्हाला जमेल तस अजुन ही लेख लिहा.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
24 Sep 2015 - 9:18 am | कविता१९७८
छान माहीती , तुझा अभ्यास तुझी मेहनत दिसत आहे.
24 Sep 2015 - 10:36 am | मितान
तुला लागलेले हे वेड असेच वाढत जावो! !!
अतिशय मुद्देसूद अाणि माहितीपूर्ण लेखनाचा उत्कृष्ट नमुना अाहे हा!
24 Sep 2015 - 10:39 am | सस्नेह
वेगळ्याच विषयाचा तपशीलवार आढावा.
फिल्डवर्कचे अनुभव रोचक आहेत. आणखी वाचायला आवडतील.
24 Sep 2015 - 10:43 am | संजय पाटिल
अव्हानात्मक क्षेत्र निवडून, त्यात अशाप्रकारे काम करत आहात. छान!
लेखन पण लाजवाब.
24 Sep 2015 - 10:54 am | उगा काहितरीच
थोडासा क्लिष्ट , तरीही रोचक विषय ! अजून वाचायला आवडेल .
24 Sep 2015 - 10:58 am | लाल टोपी
वेगळी वाट निवडून यशस्वी होण्यासाठी खूप परीश्रम लागतात ते घेऊन यशस्वी झालात अभिनंदन.
24 Sep 2015 - 11:06 am | पद्मावति
उत्तम लेख. एका वेगळ्याच क्षेत्रा विषयी खूप छान माहिती कळली. लेख फार आवडला.
24 Sep 2015 - 11:06 am | सिरुसेरि
"ती फुलराणी" मधल्या अशोक मास्तरमुळे फोनेटिक्स , लिंग्विस्टिक्स चे क्षेत्र दुरुन माहित होते .तुमच्या लेखामुळे बरीच माहिती मिळाली.
24 Sep 2015 - 1:19 pm | शिव कन्या
हेच म्हणत होते
25 Sep 2015 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार
वाचताना फुलराणीच आठवत होते.
एका वेगळेयाच करियरची ओळख झाली .
हाही लेख आवडला.
पैजारबुवा
24 Sep 2015 - 11:16 am | वेल्लाभट
क्या बात है ! जबर अनवट असं क्षेत्र आणि त्यातील तुमची यशस्वी वाटचाल.... सहीच... सहीच...
24 Sep 2015 - 11:16 am | अभिजितमोहोळकर
सिरूसेरि ह्यांना ती फूलराणी तर मला माय फेअर लेडी आठवला. दोन्ही शॉ च्या पिग्मॅलियनचे अवतार.
पण मला खरच कुतूहूल आहे की ह्या अभ्यासाचा निष्कर्ष क्सा आणि काय निघतो? दुसरं म्हणजे क्सला अभ्यास करायचा आणि कुठला अथवा कुठ-कुठल्या स्थानिकांचा गट निवडायचा हे कसं ठरवतात?
आभार
24 Sep 2015 - 11:18 am | अभिजितमोहोळकर
सिरूसेरि ह्यांना ती फूलराणी तर मला माय फेअर लेडी आठवला. दोन्ही शॉ च्या पिग्मॅलियनचे अवतार.
पण मला खरच कुतूहूल आहे की ह्या अभ्यासाचा निष्कर्ष कसा आणि काय निघतो? दुसरं म्हणजे कसला अभ्यास करायचा आणि कुठला अथवा कुठ-कुठल्या स्थानिकांचा गट निवडायचा हे कसं ठरवतात?
आभार
24 Sep 2015 - 3:52 pm | पिशी अबोली
हा अभ्यास कसा करायचा याची निवड बर्याचदा आत्ता 'फॅशन' कसली आहे त्यावर अवलंबून असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
उदा. अगदी काही दशकांपूर्वी ऐतिहासिक भाषाशास्त्राचं बरंच वारं होतं. तेव्हा बरंच संशोधन आणि पुस्तकं त्याच विषयावरची आढळतात. तेव्हा भाषांचे फील्डवर अभ्यास झाले तेसुद्धा बर्याचदा याच दृष्टीकोनातून झालेले दिसतात.
तेच मागच्या काही वर्षांमधे आदिवासी भाषांवरचा फोकस वाढलेला दिसतो. अंदमानमधील 'बो' भाषेची शेवटची भाषक वारल्याची बातमी बरीच प्रसिद्ध झाली होती. 'डॉक्युमेंटेशन' या प्रकाराला अचानक फार महत्व आलं त्या घटनेच्या आसपास.
कुठल्या स्थानिकांचा गट निवडायचा, हे बर्याचदा तुमच्यावर अवलंबून असतं. मी स्वतः आदिवासी भाषांवर काम केलेलं नाही. मी अजूनतरी फक्त ग्रामीण आणि निमशहरी भागात फिरले आहे, कारण माझ्या अभ्यासाचा फोकस तोच आहे. एक भाषाशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून मला माझ्या माहितीतल्या एका बोलीची काही वैशिष्ट्ये आढळली जी आजवर रिपोर्ट झाली नव्हती, रादर ती बोलीच फारशी अभ्यासली गेली नव्हती. म्हणून मी त्यावर काम सुरू केलं आणि हळूहळू त्याचा स्कोप वाढत गेला. पण प्रत्येकाचे मोटिवेशन वेगळ्या गोष्टींमुळे असू शकते.
निष्कर्षाबद्दल मी कितपत नीट सांगू शकेन कल्पना नाही, पण सांगायचा प्रयत्न करते. मुळात आम्ही जाताना एक काहीतरी उद्देश घेऊन जातो. जर मला ती भाषा फक्त नोंदवायची असेल फक्त, तर मी त्यातील गाणी, कथा सगळं गोळा करेन, रेकॉर्ड करेन. त्या गावातील सगळ्या वयोगटातील लोकांकडून त्यांच्या बोलण्याचे नमुने गोळा करेन. हे सगळं ट्रान्स्क्राईब करून त्या भाषेचे नियम बनवेन. कदाचित त्यातील शब्दांची एक डिक्शनरीपण बनवेन. ही डिक्शनरी, आणि हे नियम जगभरातील कुणीही भाषाशास्त्रज्ञाने वाचली, तरी त्याला त्या भाषेची संरचना लक्षात आली पाहिजे अशा पद्धतीचं हे व्याकरण असेल. त्या माणसाने ती भाषा प्रत्यक्ष कधीही ऐकली नसली, तरी त्याला तिचे नियम आणि तिची टायपॉलॉजी समजू शकेल.
जर मला एखाद्या भाषाकुळातील एका वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीबद्दलच अभ्यास करायचा असेल, तर मी जास्तीत जास्त माहिती त्या गोष्टीवर फोकस ठेऊन गोळा करेन. मग माझ्याकडे प्रत्येक भाषेचं संपूर्ण व्याकरण नसेल तरी चालेल. पण त्या एका कंटिन्युअम मधील सगळ्या भाषांचं ते फीचर कसं काम करतं ते मला समजेइतका मात्र डेटा गरजेचा असेल. आता हे फीचर मला वेगळं/ त्या भाषाकुळाच्या प्रेडिक्टेड फीचर्स मधे न बसणारं वाटलं, तर ते तसं का झालं याची कारणं मला शोधावी लागतील. ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, अशी जी काही असतील त्यांचा विचार करावा लागेल. हे एक्स्प्लानेशन देणे हा त्या निष्कर्षाचा एक भाग असू शकतो.
हे सगळं खूप ढोबळ आहे, आणि स्पेसिफिक काहीच नाहीये हे मला स्वतःलाच जाणवतंय. लक्षात न येणारं काहीही विचारा, शक्य तसं सांगायचा प्रयत्न करेन. :)
25 Sep 2015 - 5:27 am | अभिजितमोहोळकर
कसलं गुंतागुंतीचं आणि निवडायला अवघड आहे हे!!! खरंच कौतुक करावे तेव्हढे कमीच.
24 Sep 2015 - 11:42 am | प्रचेतस
लेख आवडला.
मध्यंतरी पुरातत्वशास्त्रावरच्या एका वर्कशॉपला डेक्कन कॉलेजमधे हजेरी लावली असल्याने तिथल्या पुरातत्वीय विथिका, मराठा संग्रहालय, लायब्ररी, लिंग्विस्टिक्स आणि लेक्सिकोग्राफी डिपार्टमेंट ह्या वास्तूंशी थोडक्यात पण जवळून परिचय झाला होता त्यामुळे तिथे कसे काम चालते ह्याची थोडीबहुत कल्पना आहेच.
24 Sep 2015 - 12:01 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
24 Sep 2015 - 1:21 pm | शिव कन्या
माहितीपूर्ण लेख.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.
24 Sep 2015 - 1:33 pm | रातराणी
वेगळ्या क्षेत्राची ओळख करून दिलीत! प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायची जिद्द आवडली!
24 Sep 2015 - 1:56 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशयच सुंदर! वाह!
24 Sep 2015 - 2:12 pm | मोहन
वा ! Stay Hungry Stay Foolish !
24 Sep 2015 - 2:26 pm | सूड
वरवर डोळ्याखालनं घातलाय, सवडीनं वाचायला राखून ठेवतोय.
24 Sep 2015 - 3:17 pm | पिशी अबोली
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. या लेखमालेतील इतर कुणाच्याही अनुभवाच्या आणि यशाच्या पाव भागापुरताही माझा अनुभव नसताना तुम्ही लेख गोड मानून घेतल्याबद्दल आभार.
@बोका-ए-आझमः मला तत्वज्ञानातील लिंग्विस्टिक अनॅलिसिसबद्दल फारशी माहिती नाही, पण 'सिमेंटिक्स' या शाखेत याबद्दल चर्चा आढळू शकेल.
स्रुजा आणि आदूबाळः कम्प्यूटेशनल लिंग्विस्टिक्स हे क्षेत्र आत्ता खूपच गाजतंय आणि भारतात सुद्धा त्यावर बरंच काम चालू आहे. नॅचुरल लँग्वेजचे संगणकीय प्रक्रियेसाठी योग्य असे नियम तयार करणं असं लिंग्विस्टांचं यातील काम ढोबळपणे सांगता येईल. मॉर्फोलॉजी(शब्दांचा अभ्यास) सिंटॅक्स(वाक्यरचनाभ्यास), सिमेंटिक्स(अर्थविज्ञान) अशा उपशाखांमधे हे काम चालतं. मशिन ट्रान्स्लेशन, स्पेलचेकर वगैरे आपल्या अगदी नेहमीच्या ओळखीचे विषय यात येतात. एखाद्या भाषेच्या कॉर्पसवर काम करून त्यातून त्याची विभक्तीरुपं, त्यांचे नियम, वाक्यरचनेचे नियम, शब्दार्थांचे डिसेंबिग्वेशन इ. कामं साधारणपणे भाषाशास्त्रज्ञ करू शकतात. याव्यतिरिक्त यातील थियरीवरसुद्धा बरंच काम चालू आहे. पण त्या सगळ्याबद्दल काही मला नीटशी कल्पना नाही.
फोरेन्सिक लिंग्विस्टिक्स आत्ता कुठे मूळ धरू लागलंय. अजून एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून फार मोठ्या प्रमाणावर यात काम झालेलं दिसत तर नाही, पण काही भारताबाहेरील केसेस मधे याचा वापर केला गेलेला आहे. उदा. एखाद्या गुन्हेगाराच्या फोन संभाषणावरून त्याची ओळख भाषाशास्त्रीय निकषांनी पटवून त्यांचा कोर्टात पुरावा म्हणून वापर केला गेलेला आहे. अगदी गुन्हेगारच म्हणून नाही, पण लिखाणाच्या शैलीवरून मूळ लेखकाची ओळख पटवणं इ.(रोलिंगबाईंच्या टोपणनावाने लिहिलेल्या पुस्तकाची ओळख कशी पटली याबद्दल मला आठवतंय त्याप्रमाणे आदूबाळ यांनीच एक रंजक लेख लिहिला होता) या गोष्टी करण्यातही भाषाशास्त्राची मदत होऊ शकते.
@सिरुसेरी, तर्रीताई आणि अभिजितमोहोळकरः 'माय फेयर लेडी' आणि त्याचा सुंदर भावानुवाद 'ती फुलराणी' यांनीच कदाचित हे क्षेत्र इतक्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. माय फेयर लेडी मधे दाखवलेली यंत्रे त्याकाळच्या ध्वनिशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धतींची कल्पना देतात. आता याप्रकारच्या अभ्यासासाठी विविध सॉफ्टवेअर्स आणि अन्य पद्धतीही शोधल्या गेल्या आहेत/जात आहेत. :)
पुनश्च धन्यवाद!
24 Sep 2015 - 3:21 pm | आदूबाळ
व्यनि करतो.
24 Sep 2015 - 6:53 pm | सुबोध खरे
भाषिक बुद्धिमत्ता (Linguistic intelligence) आणी भाषा शास्त्राचा संबंध आपल्या संशोधनात कितपत आला आणी त्याचा आपल्याला काही फायदा झाला काय? ( क्षमा करा. कदाचित विषयांतर होत आहे असे वाटले तर सोडून द्या)
दुर्दैवाने आपल्याकडे बुद्धिमत्ता हि फक्त गणिती/तार्किक( MATHEMATICAL) समजली जाते. म्हणजे जो माणूस गणितात किंवा बुद्धीमापनात हुशार तोच हुशार असे समजतात. परंतु भाषिक किंवा सांगीतिक किंवा परस्पर संबंधातील(INTERPERSONAL) बुद्धिमत्ता हि खिजगणतीत नसते. प्रत्यक्षात पाहिले तर या परस्पर संबंधी बुद्धिमत्ता असलेली माणसे आयुष्यात जास्त यशस्वी आणी श्रीमंत होताना दिसतात. उदा. वकील किंवा नेते.
फोरेन्सिक लिंग्विस्टिक्स मध्ये अशी भाषिक बुद्धिमत्ता असलेली माणसे जास्त यशस्वी होतील असे वाटते.
https://en.wikipedia.org/wiki/Linguistic_intelligence
https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences
24 Sep 2015 - 9:25 pm | पिशी अबोली
या मॉडेल बद्दल पहिल्यांदाच वाचतेय. फ़क्त विकी वाचून मी मत देणं चुकीचं आहे, पण प्रथमदर्शनी मला वाटतं की प्रत्यक्ष फील्डवर इंटरपर्सनल आणि लिंग्विस्टिक या ऍबिलिटी महत्वाच्या असतात आणि विश्लेषणात मात्र लॉजिकल जास्त महत्वाची असते.
माझ्या टीममेट्सनी मला सांगितल्याप्रमाणे, मी लोकांशी पटकन कनेक्ट होऊन बोलू शकते. आणि मी लक्ष देऊन ऐकतेय हे पटल्यावर लोक छान बोलतात हा माझा अनुभव आहे. आपलं बोलणं ऐकणारी व्यक्ती, ही एकूणच आत्ताच्या जगात दुर्मीळ असल्यामुळेही असेल, पण असं होतं खरं.. (एरवी मी कुणालाही अजिबात बोलू देत नाही हे मला कट्टयाला भेटलेल्यांना चांगलंच माहीत आहे ;-))
लिंग्विस्टिक ऍबिलिटीची गरज पड़ते हे मात्र नक्की. मला नेमकं काय हवंय हे समोरच्या माणसाला नीट समजावून सांगता येणं हे बरंच कठीण काम आहे. अगदी मराठीतल्या मराठीतही तिथल्या तिथे एक शब्द सुद्धा अनेक प्रकारे समजावून सांगता आला पाहिजे.. एका नवीन भाषेत २-३ सेशन्स झाल्यानंतर मला उत्तरं प्रेडिक्ट करता येऊ लागली होती आणि तरुण लोकांनी वेगळी उत्तरं, वेगळी स्ट्रक्चर्स वापरल्यावर त्यांना लगेच वय आणि बदललेल्या परिस्थितीशी कोरिलेट करता आलं होतं. मोठी गोष्ट नाही, हे असं लक्षात यावं असं ट्रेनिंग असतंच; पण ही प्राथमिक निरीक्षणं नोंदवण्यासाठी भाषिक बुद्धिमत्ता कामी येत असावी.
नेते, वकील यांच्यासाठी भाषिक बुद्धिमत्ता नक्कीच महत्वाची असते. फोरेन्सिक लिंग्विस्टिक्स मधे तार्किक बुद्धिमत्तेचीच जास्त गरज लागेल असं मला वाटतं..
24 Sep 2015 - 3:25 pm | अंतरा आनंद
वा वेगळ्या क्षेत्राची तोंडओळख आवडली. जास्त सविस्तर वाचायला आवडेल.
या अभ्यासाची दिशा कोण ठरवतं? त्याचा उपयोग कुठे होतो? उपयोग काय आणि कुठे यावर अभ्यास अवलंबून असतो की नीट अभ्यास केल्यावर उपयोजन कुठे आणि कसे होणार हे कळते?
तुम्हाला भाषांमध्ये रस होता हे ठिक पण व्याकरणाचा रुक्ष पण गणिती भाग आवडत होता की नंतर आवडाय्ला लागला?
सविस्तर वाचायला आवडेल
26 Sep 2015 - 3:08 pm | पिशी अबोली
अभ्यासाची दिशा कोण ठरवतं याबद्दल वरच्या एका प्रतिसादात ढोबळ माहिती दिलेली आहे. याचा उपयोग बर्याच ठिकाणी होऊ शकतो. एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे 'लँग्वेज पॉलिसी/प्लॅनिंग'. ग्रियर्सनच्या 'लिंग्विस्टिक सर्वे' बद्दल तुम्हाला माहिती असेल. भारतीय भाषा आणि समाजाची राज्य करण्याच्या दृष्टीने माहिती असावी हा त्याचा मुख्य उद्देश होता. भाषासंबंधी निर्णय घेण्यासाठी भाषाशास्त्रज्ञांची मदत घेणे हल्ली हल्ली सुरू झाले आहे. पण मग असे निर्णय शुद्ध भाषाशास्त्रीय नसून त्यात इतर अनेक गोष्टी येतात हे गृहीतच धरावं लागतं. या सगळ्या गोष्टी फार तुरळक आहेत. पण असा विचार सुरू झाला आहे हे नक्की.
भाषा आणि संस्कृती आणि अर्थकारण यांचा घनिष्ठ संबंध लक्षात घेता इंटरडिसिप्लिनरी अभ्यास या संदर्भात खूप महत्वाचे ठरतील असं वाटतं.
बाकी 'अॅकेडेमिक्स फॉर द सेक ऑफ अॅकेडेमिक्स' हे आहेच.. :)
मला भाषांमधे रस होता, आणि त्याला घरून प्रोत्साहनही मिळालं. पण एकूणच त्याच्या साहित्यिक भागावरच जास्त फोकस व्हावा अशीच आपली सिस्टमच आहे बहुतेक. लेखन-वाचन बरंच झालं. पण त्यापलीकडे काहीतरी असावं असं पूर्वीपासूनच वाटायचं. आताही मला व्याकरणापलीकडे, त्याच्या गणिती भागापलीकडे त्यात काहीतरी असावं असंच वाटतं. पण ते काहीतरी अॅब्स्ट्रॅक्ट अजून नीटसं कळत नाहीये. एकूणच या अभ्यासाच्या बाबतीत मी रांगायलाही नाही लागलेय अजून त्यामुळे आताच काही बोलता येण्याची पात्रताच नाहीये. जर काही समजलंच कधी, आणि जमलंच काही करायला आयुष्यात, तर येईनच मिपावर सांगायला.. :)
24 Sep 2015 - 5:04 pm | पलाश
छान लेख. आपल्या आवडीची वेगळी वाट निवडल्याबद्दल विशेष कौतुक. अनेक शुभेच्छा.
24 Sep 2015 - 6:21 pm | pradnya deshpande
फिल्डवर काम करणे सोपे नाही हे मी माझ्या पत्रकारितेच्या अनुभवावरून सांगू शकते. त्यात तुमचे क्षेत्र आणखी अवघड आहे. एम ए ला असताना भाषाशात्राचा अभ्यास केला होता पण हा विषय मला जमणार नाही असे वाटल्याने पुढे त्यात रस घेतला नाही. तुम्ही या विषयात करीयर केले त्याचे कौतुक आहे.
24 Sep 2015 - 6:57 pm | राही
वेगळ्या विषयावरचा लेख आवडला. या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे आणि त्यामुळे तळ गाठणे किती कठिण आहे, हे
जाणवले.
अधिक लेखनाच्या अपेक्षेत आणि प्रतीक्षेत.
24 Sep 2015 - 10:14 pm | पैसा
अतिशय दुर्लक्षित क्षेत्र निवडल्याबद्दल आधी अभिनंदन! लेख मस्त झालाय. मंझिलें और भी है!
24 Sep 2015 - 11:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खुप सुंदर लेख. खरं सांगायचं झालं तर अश्या क्षेत्रामधे करिअर करता येउ शकतं हे मला कधी ऐकुनही माहिती नव्हतं. तुमच्या मुळे ओळख झाली. पुढील वाटचालीस शुभेच्छा!
24 Sep 2015 - 11:56 pm | पिशी अबोली
सर्व प्रतिसादकांचे खूप आभार.
संमं आणि सासंमंचे सतत सुधारणा सुचवत या लेखाला वाचण्यास योग्य बनवल्याबद्दल विशेष आभार.
25 Sep 2015 - 4:09 am | मिहिर
लेख आवडला.
25 Sep 2015 - 8:53 am | नाखु
फिल्डवर्कचे अनुभव रोचक आहेत. आणखी वाचायला आवडतील.+१
अगदी प्रामाणीकपणे सांगायचे म्हणजे असा काही अभ्यासक्रम असतो हेच माहीती नव्हते. आणि अश्या आगळ्या अभ्यासासाठी ध्यास वेडी माणसेच अत्यंत चिकाटीने प्रामाणिक+निरपेक्ष प्रयत्न करू शकतील.
सरकारी पाटी टाकणे समूहाचे ते काम नाही इतकेच म्हणतो. या अनुशंगाने आलेले आणि अनोखे अनुभव वाचायला आवडतील. आपल्या पालकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा !!!!
25 Sep 2015 - 10:10 am | प्रभाकर पेठकर
अतिशय वेगळा विषय. धाडसाचे कौतुक आहेच.
पुरुषांना असे विषय, करियरसाठी, निवडताना मन दोलायमान होते. ह्याला कारण पुरुष, अजूनही, चांगला मिळवता असावा लागतो. माझ्या एका कमर्शियल आर्ट केलेल्या मित्राची मुळ आवड ही फाईन आर्टची होती. पण त्याच्या प्राध्यापकांनी त्याला सांगितले की, 'फाईन आर्ट' ने तुला वाहवा आणि टाळ्या भरपूर मिळतील पण पैसा मिळवायच्या संधी फार कमी मिळतील. कमर्शियल आर्टने तुला वाहवा आणि टाळ्या मिळाल्यानाहीत तरी पैसा नक्कीच मिळेल.' बिचारा, मनाविरुद्ध कमर्शियल आर्टला गेला. असो.
एखाद्या मनजोगत्या क्षेत्रात काम करताना प्रचंड समाधान लाभतं हे नक्की. तुमचा विषय क्लिष्ट आणि आव्हानात्मक असल्याकारणाने त्यात मिळविलेले यश हे एखाद्या योद्ध्याप्रमाणे असेल. मनापासून सलाम.
25 Sep 2015 - 1:29 pm | अनिता ठाकूर
असा विषय असतो हेच मला माहित नव्हतं.वेगळंच क्षेत्र आहे हे. अशा स्वरूपाच्या अभ्यासासाठी 'पिशी' झालेल्या (ध्यास घेतलेल्या) 'अबोलीचं' मनापासून कौतुक! सध्या प्रमाणित मराठीसुद्धा काहीजणांना अनावश्यक वाटतं. अर्थ कळला ना, मग बास - अशी हल्ली धारणा असते.व्याकरण तर बिघडलं आहेच,पण एकूणच भाषा हा विषयच काहीजणांना महत्त्वाचा वाटत नाही. तुम्ही मात्र ह्या विषयाचा ध्यास घेतला आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
25 Sep 2015 - 2:59 pm | सानिकास्वप्निल
वेगळ्या क्षेत्राची ओळख, माहिती आवडली.
अनेक अनेक शुभेच्छा पिशी
25 Sep 2015 - 3:09 pm | बॅटमॅन
ऐकून होतो या फील्डबद्दल बरेच पण प्रत्यक्ष प्रॅक्टिषनरचे मणोगत पाहणे हा वेगळाच अनुभव. आवडले, अजून येऊद्यात असेच!
25 Sep 2015 - 4:04 pm | प्रास
आमच्या आवडत्या विषयांपैकी एक असलेल्या विषयावरचा हा लेख उत्तम जमलाय.
फिल्डवर्कचे अनुभव लिहावेत ही विनंती.
26 Sep 2015 - 8:36 am | सुधीर कांदळकर
मनोरंजक माहिती मिळाली. या विषयावरील मला असलेली माहिती म्हणजे एक मोठे प्रश्नचिन्ह. तरी लेख वाचल्यावर बरीच कोडी मनात होती. काही तपशील प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातून मिळाले.
एरवी मी कुणालाही अजिबात बोलू देत नाही: अबोली नावाची लेखिका बोलते? आणि त्यावर ताण म्हणजे बोलीभाषांवर संशोधन करते?
.......... गावाला पाऊस!
26 Sep 2015 - 4:18 pm | चांदणे संदीप
डिट्टेलवार वाचला.
माझ म्हणजे अस व्हायला लागलाय ह्या श्री गणेश लेखमालेतले लेख वाचून जस की लहानपणी पोलिसाकड पाहून पोलीस व्हावं वाटे, हॉटेलापुढून जाताना मोठेपणी हॉटेल टाकून बसावस वाटे, शाळेत आवडत्या शिक्षकांना पाहून त्यांच्यासारख शिक्षक व्हाव वाटे, कॉम्प्युटर शिकल्यावर आधी सायबर कॅफे टाकू वाटला आणि अनुभवाने पुढे सॉफ्टवेयर इंजिनियर व्हावं असं वाटू लागलं. थोडक्यात गोंधळाची परिस्थिती! आणि आता हे लेख वाचताना प्रत्येक लेखाशी स्वत:ला पडताळून पाहताना असं वाटतय के अरे हे केल असत तर बर झाल असत किंवा अरे हे करायचं राहूनच गेल.
एकूणच, छान चाललीये लेखमाला!
छान सविस्तर लेखाबद्दल तुमचे आभार!
26 Sep 2015 - 8:58 pm | पियुशा
पिशे छान ओळख करुन दिलीस .खुप वेगळे फिल्ड वेगळे अनुभव !
27 Sep 2015 - 7:54 am | कैलासवासी सोन्याबापु
क्या बात है!!! अतिशय वेगळा विषय अतिशय वेगळे करियर! पुढील वाटचालीस शुभेच्छा
27 Sep 2015 - 6:05 pm | वगिश
संगणकीय स्पीच प्रोसेसिंग वर थोडे काम केले आहे खुपच क्लिष्ट आहे विषय. तुम्ही कौतुकास्पद काम करत आहात.
28 Sep 2015 - 6:18 am | चतुरंग
क्लिष्ट प्रकार दिसतो आहे हा भाषाशास्त्रातले फील्डवर्क म्हणजे. वेगळ्या क्षेत्राची बरीच माहिती समजली.
असे क्षेत्र जिद्दीने निवडून त्यात काम करण्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!
नामांकित भाषाशास्त्रज्ञ डॉ.अशोक केळकर यांच्याशी झालेल्या गप्पांमधून काहीवेळा अत्यंत मनोरंजक माहिती आणि किस्से समजत असत. त्यांची आठवण झाली. गेल्या वर्षी त्यांचे औरंगाबाद येथे निधन झाले.
28 Sep 2015 - 4:25 pm | खटपट्या
अजीबात माहीत नसलेल्या अभ्यासक्रमाबद्द्ल छान माहीती मिळाली. यासाठी कीती चिकाटी लागत असेल याची कल्पना करतोय. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...
28 Sep 2015 - 5:21 pm | पिशी अबोली
सर्व प्रतिसादकांचे प्रतिसादांसाठी व शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. :)
29 Sep 2015 - 11:18 am | विशाखा पाटील
पिशी, छान ओळख. या विषयात काम करण्याचे माझे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे. काम जसे पुढे सरकत जाईल, तसे अनुभव लिही. लवकर डॉ. होण्यासाठी शुभेच्छा! :)
29 Sep 2015 - 6:52 pm | मारवा
ड्रीम माझ ड्रीम आहे मी सेमीऑटीक्स या शाखेचा सखोल अभ्यास करावा.
सध्या एको ऊंबर्टो यांची या विषयावरची अद्वितीय पुस्तके वाचण सुरु आहे.
मार्गदर्शन नसल्याने अनेक ठिकाणी अडखळतो
काही ठीकाणी कळत नाही ठेचकाळतो पण नेटाने शोधत शोधत जात राहतो
तुम्हाला सांगतो अबोली जी
अफाट आनंद येतो हा विषय सींपली एक्स्प्लोअर करायला
तुम्ही इको उंबरटो ची पुस्तके एकदा अगोदर नसतील तर नक्की वाचुन बघावी
त्यांची एक असामान्य कादंबरी पण आहे फोकाल्ट्स पेन्डुलम
यावर एक लेख लिहीण्याची इछा होती
एक कच्चा खर्डा तयार केला होता पण ते इतक कॉम्प्लीकेटेड झालेल की
म्हटल छोडो यार
वाचणारा म्हणेल काय ताप आहे डोक्याला
तुमचा लेख व तुमच कार्यक्षेत्र व तुमची मेहनत इमानदारी सगळ सगळ खुप आवडल
आणि हो तो आय डी च नाव अबोली
त्यातली आयरनी पण आत्ता लक्षात आली
हॅट्स ऑफ टु यु अबोली जी
30 Sep 2015 - 11:22 am | पिशी अबोली
@विशाखाताई-धन्यवाद! :)
@मारवाजी-धन्यवाद. उंबेर्तो एको चा एक इंटर्व्यू तेवढा वाचल्याचं आठवतंय लहानपणी. नक्की लिहा या कादंबरीवर. सिमियोटिक्स फार इंटरेस्टिंग आहे.
2 Oct 2015 - 2:07 am | श्रीरंग_जोशी
एका महत्वाच्या पण लौकिकार्थाने लोकप्रिय नसणार्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेऊन त्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
तो प्रवास आमच्यापुढे या लेखाद्वारे मांडल्याबद्दल अनेक आभार.
हे काम करतानाचे तुमचे अनुभव वाचायला आवडतील.
5 Oct 2015 - 11:52 am | dadadarekar
छान