श्रीगणेश लेखमाला १: शिक्षणक्षेत्र

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
18 Sep 2015 - 12:27 am

मी आज शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 'माझ्या आईकडे सुट्टे पैसे नव्हते.'
मला कोणीही जेव्हा कधी तू या क्षेत्रात कसा आणि कुठून आलास असं विचारतो, तेव्हा माझं हे ठरलेलं उत्तर आहे, आणि ते १०० टक्के खरं आहे. १ मे १९९६ या दिवशी जर माझ्या आईकडे सुट्टे पैसे असते, तर माझं संपूर्ण आयुष्य फार वेगळ्या मार्गाने गेलं असतं. माझी आई मुंबई महानगरपालिकेच्या स.गो.बर्वेनगर, घाटकोपर पश्चिम इथल्या शाळेत शिक्षिका होती आणि १ मे हा नेहमीप्रमाणे त्या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी महाराष्ट्र दिन असल्यामुळे शाळेत झेंडावंदन करणं, सह्या करणं आणि दीड महिन्याची सुट्टी चालू झाली, आता परत १५ जूनला किंवा त्या वर्षी जो काही शाळा परत चालू होण्याचा दिवस असेल, त्या दिवशी भेटू, असा नेहमीचा डायलॉग मारणं हा तिचा आणि तिच्या सहकार्‍यांचा ठरलेला कार्यक्रम होता.

मी त्या वेळी माझ्या बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होतो आणि मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या घातलेल्या घोळामुळे आमची परीक्षा मेच्या शेवटी सुरू होऊन १२ जूनला संपणार होती. मी त्याच्याच अभ्यासात होतो. पूर्वीच्या काळचे हिंदी पिक्चरचे हिरो कसे, फक्त बी.ए. झाले, तरी त्यांना मस्त मॅनेजरची नोकरी, चकाचक केबिन आणि यथावकाश हिरवीण या गोष्टी मिळायच्या. मी बी.ए.ला येईपर्यंत हा रम्य काळ इतिहासजमा झाला होता, आणि नुसत्या बी.ए.ला बाजारात काहीही किंमत उरलेली नव्हती. त्यामुळे त्याच्यानंतर काहीतरी करणं गरजेचं होतं. एम.ए. किंवा एल.एल.बी. असे नेहमीचे यशस्वी पर्याय होते, पण ‘सगळेच जण ते करतात‘ म्हणून मी त्या वाटेला जायचं नाही, असं ठरवलेलं होतं. एम.बी.ए.साठी तेव्हा कॅट आणि सीडब्ल्यूटी अशा दोनच परीक्षा होत्या (मला माहीत असलेल्या). दोन्हीमध्ये माझा परफॉर्मन्स काही खास नव्हता. त्यामुळे काय करायचं हा प्रश्न होता.

तर अशा पार्श्वभूमीवर माझी आई १ मे १९९६ या दिवशी झेंडावंदन वगैरे करून घाटकोपर स्टेशनवर आली, आणि तिच्या लक्षात आलं की रिक्षावाल्याला द्यायला तिच्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत. तिच्याबरोबर ज्या तिच्या मैत्रिणी आल्या होत्या, त्यांच्याकडेही सुट्टे पैसे नव्हते. रिक्षावाल्यांकडे सुट्टे पैसे असणं हे त्यांच्या युनियनच्या आदेशाप्रमाणे महाभयंकर पाप असल्यामुळे त्याच्याकडेही नव्हते. मग आता करायचं काय? म्हणून मग तिने स्टेशनच्या बाहेरच असलेल्या पेपर स्टॉलवरून एक ‘एम्प्लॉयमेंट न्यूज‘ नावाचा पेपर विकत घेतला आणि रिक्षावाल्याला सुट्टे पैसे दिले.

आम्ही त्या वेळी डोंबिवलीला राहत होतो. घाटकोपर ते डोंबिवली या प्रवासात तिने सहज तो पेपर चाळला आणि तिला त्यात काहीतरी इंटरेस्टिंग सापडलं. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन अभ्यास विभाग किंवा शुद्ध मराठीत डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची जाहिरात होती. मला कॉलेजमध्ये असताना चित्रपट, नाटक आणि एकंदरीतच माध्यमं किंवा मीडिया या क्षेत्राबद्दल कुतूहल होतं. तिने जेव्हा घरी आल्यावर मला ती जाहिरात दाखवली, तेव्हा हे काहीतरी वेगळं आहे, हे माझ्या लक्षात आलं आणि मी हा एक प्रयत्न करून पाहायला हरकत नाही असं ठरवलं. अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला प्रवेश परीक्षा असणार होती आणि नंतर गटचर्चा आणि मुलाखत किंवा शुद्ध मराठीत ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. मी या सगळ्या पायर्‍या पार केल्या आणि त्याच वर्षीच्या जुलै महिन्यात आमचा अभ्यासक्रम सुरु झाला, आणि पहिल्याच फटक्याला माशी शिंकली. आम्हाला प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात ज्या प्रकारे आमचा हा अभ्यासक्रम शिकवला जात होता, यात प्रचंड तफावत होती. थोडीफार ती असते, हे मान्य आहे, पण एवढी तफावत? काही प्राध्यापक अप्रतिम शिकवायचे, उदाहरणार्थ समर नखाते, शान्तिश्री पंडित, देवेन धनक, एस.जी. गोडबोले. पण काही प्राध्यापक धन्यवाद होते, आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार करूनही जेव्हा काही निष्पन्न होत नाही हे आमच्या लक्षात आलं तेव्हा मग आमची बॅच आणि आमचे सीनियर्स यांनी संप केला. तेव्हा सुदैवाने डॉ.वसंतराव गोवारीकर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी चर्चा केली, तीसुद्धा आमच्या डिपार्टमेंटला येऊन. खरोखर मोठा माणूस. आमचे तेव्हाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट बदलले गेले आणि मुंबईचे प्रसिद्ध टीव्ही निर्माते आणि दिग्दर्शक विनय धुमाळे आमचे हेड झाले.

‘उपन्यास’ ही त्यांची मालिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे आम्हाला आता जरा काहीतरी व्यावसायिक क्षेत्रातलं शिकायला मिळेल अशी अपेक्षा होती. धुमाळे आल्यावर त्यांनी काही सकारात्मक बदल केले. आमचे बरेचसे अभ्यासक्रम वर्गात शिकवले जायचे. प्रात्यक्षिकांवर भर नसायचा. त्यांनी ते बदललं. सगळ्या विद्यार्थ्यांना भाग घेता येईल असे उपक्रम आणि प्रकल्प त्यांनी राबवायला सुरुवात केली. आमच्या दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या सत्रात त्यांनी संपूर्ण वर्गाला एक टेलिफिल्म करायला लावली. या वर्षात आम्हाला आमचं स्पेशलायझेशन निवडावं लागत असे. टेलिव्हिजन प्रॉडक्शन आणि मीडिया रिसर्च अशी दोन स्पेशलायझेशन्स होती. मी अर्थातच टेलिव्हिजन प्रॉडक्शन घेतलं होतं. ही टेलिफिल्म हा एक अप्रतिम अनुभव होता. सुप्रसिद्ध छायाचित्रकार ए.एस.कनल (त्यांनी सई परांजप्यांच्या मालिका आणि काही चित्रपट केले होते) आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधले संकलन विषयाचे प्राध्यापक योगेश माथुर या दोघांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना पाच गटांमध्ये विभागलं आणि आमच्यात एक स्पर्धा घेतली – स्क्रिप्ट लिहायची. फक्त दोन व्यक्तिरेखा. कोणीही असू शकतात. त्यांच्यात आता संपूर्ण बेबनाव आहे. पूर्वी असं नव्हतं. काहीतरी घडलं आणि हा बेबनाव झाला. आता ते या बंद खोलीत तीन दिवस आणि दोन रात्री एकत्र आहेत. आणि जेव्हा हा काळ संपतो, तेव्हा ते परत मित्र होतात – अशी एक ढोबळ कल्पना आम्हाला दिली होती आणि आमचे मीडिया रिसर्च करणारे सहकारी आणि पहिल्या वर्षाचे विद्यार्थी यांच्यासमोर आम्हाला आमचं स्क्रिप्ट प्रस्तुत करायचं होतं. त्यांनी दिलेल्या मतांनुसार कोणतं स्क्रिप्ट चित्रित होणार ते ठरणार होतं आणि प्रत्येक गटाला त्याचा एक सीन चित्रित करायचा होता आणि नंतर संकलन करून संपूर्ण टेलिफिल्म बनवायची होती. चित्रीकरणासाठी आम्ही विद्यापीठाच्या स्टाफ क्वार्टर्समधला एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. प्रत्येक गटात एक दिग्दर्शक, एक छायाचित्रकार, एक निर्मिती नियंत्रक आणि एक संकलक असणार होते. अभिनेत्यांपैकी एक आमचीच वर्गमैत्रीण होती आणि एक व्यावसायिक अभिनेता. त्यांनाही प्रत्येक गटाने कसं चित्रीकरण केलं आणि कशा प्रकारे अभिनेत्यांकडून अभिनय करवून घेतला यावर मत द्यायला सांगितलं होतं. हा संपूर्ण अनुभव जबरदस्त होता. आजही जेव्हा आम्ही कोणी भेटतो, तेव्हा याच्या आठवणी निघतातच.

विनय धुमाळे जेव्हा आमचे हेड म्हणून आले, तेव्हा ते ‘लोकमान्य’ नावाच्या एका हिंदी मालिकेवर काम करत होते. नावावरून हे स्पष्ट होतच होतं की ही मालिका टिळकांवर होती. मी अनुभव घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे काम करायचं ठरवलं. त्यांनीही काही हरकत घेतली नाही, आणि मी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. वेषभूषा आणि वस्तू (कॉस्च्युम आणि प्रॉपर्टी) ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे पुण्यातला जुना बाजार, राजा केळकर वस्तुसंग्रहालय आणि मुंबईमधला मगनलाल ड्रेसवाला इथे नेहमी माझ्या फेर्‍या होत असत. चित्रीकरण प्रामुख्याने पुण्यातच होणार होतं आणि बरेचसे कलाकार पुण्यातल्याच पी.डी.ए. आणि इतर नाट्यसंस्थांमधले होते. टिळकांचं काम करणारा अमित शंकर हा अभिनेता बिहारी होता. त्याचा आवाज जबरदस्त होता. खर्जातला आणि टिळकांच्या भाषणांविषयी जी सिंहगर्जना अशी वर्णनं ऐकलेली आहेत, ती खरी ठरवणारा आवाज होता. रास्तेवाडा, फर्ग्युसन महाविद्यालय, राज भवन, सिंहगड अशा अनेक ठिकाणी चित्रीकरण झालं. ही मालिका दूरदर्शनसाठी असल्यामुळे सरकारकडून अनेक गोष्टींची परवानगी मिळाली होती. त्यामुळे आम्ही वाठार रेल्वे स्टेशन आणि येरवडा तुरुंग इथे बाह्य चित्रीकरण सहजपणे करू शकलो.

येरवडा तुरुंगात चित्रीकरण करणं हा एक विलक्षण अनुभव होता. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा अशी वेळ आम्हाला देण्यात आली होती आणि त्या कालावधीत जे काही सीन चित्रित करायचे होते, ते संपवायचे होते. आमच्या दामोदर आणि बाळकृष्ण चापेकरांची फाशी आम्ही खर्‍याखुर्‍या फाशीगेटमध्येच चित्रित केलेली आहे, जिथे कदाचित खर्‍या चापेकर बंधूंना फाशी देण्यात आली होती. फाशी देताना काय प्रोसीजर असतं, ते त्याच वेळी तिथल्या अधिकार्‍यांनी अगदी तपशीलवार समजावून सांगितलं आणि तिथले ‘जल्लाद’ अर्जुन मोरे याचीही ओळख करून दिली. सदैव दारूच्या धुनकीत असणार्‍या या सिंगल फसली माणसाने लोकांना फासावर चढवलं असेल हे मान्य करणं थोडं कठीण गेलं. त्यांनी सांगितलेल्या काही फासावर लटकवलेल्या माणसांच्या गोष्टी तर जबरदस्त होत्या. जोशी-अभ्यंकर हत्याकांडातल्या जक्कल, सुतार, जगताप आणि शाह यांना त्यांनीच फाशी दिली होती. त्याचप्रमाणे जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्‍या जिंदा आणि सुखा या दोन खलिस्तानी अतिरेक्यांनाही त्यांनीच फाशी दिली होती.

अनुभव जरी सगळे असे जबरदस्त मिळत गेले, तरी आर्थिक पातळीवर बोंबाबोंबच होती. पैसे देण्याच्या बाबतीत धुमाळे अत्यंत कुप्रसिद्ध असल्याचं मी बर्‍याच कलाकारांकडून ऐकलं होतं. पण ते माझ्याबाबतीतही खरं होईल असं वाटलं नव्हतं. कधी तगादा लावला की तेवढ्यापुरते पैसे मिळायचे, पण त्याला काही अर्थ नव्हता. आम्ही ऑफिसमध्ये बसलेले असलो की कुणातरी माणसाचा मागे कधीतरी घेतलेले पैसे परत करा असा फोन किंवा मग तो माणूस स्वतः तिथे येणं ही नेहमीची गोष्ट होती. पैसे मिळत नसल्यामुळे मग मी तिथून निघायचा निर्णय घेतला.

नंतर मग अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. झी न्यूज, ईटीव्ही मराठी (सध्या कलर्स मराठी), बालाजी टेलिफिल्म्स, विनार मीडिया, तारा मराठी (जे मोजून एक वर्ष चाललं) अशा अनेक निर्मितीसंस्थांमध्ये आणि वाहिन्यांमध्ये काम केलं. तिथलेही अनुभव संस्मरणीय वगैरे म्हणता येतील असे आहेत, पण ते परत कधीतरी. दरम्यान मी वकिलीचा थोडाफार अभ्यासही केला आणि एका मित्राबरोबर एक पब्लिक रिलेशन्स फर्मही भागीदारीत सुरू केली. हा सगळा काळ (१९९८ ते २००२) मोठा उलथापालथ घडवणारा होता - माझ्या आयुष्यात आणि बाहेरही. डॉट कॉम क्रॅशमुळे टीव्ही वाहिन्यांकडे येणारा भांडवलाचा ओघ आटल्यासारखा झाला होता. निदान सांगण्यात तरी तसं येत होतं. नवीन कार्यक्रम बनत नव्हते. वाहिन्या बंद पडत होत्या. झी आणि ईटीव्ही तोट्यात चालू होत्या आणि तेही त्यांच्यामागे भक्कम आधार असल्यामुळे. एकता कपूरच्या कार्यक्रमांची चलती होती, पण मला त्यात काही करण्याची इच्छा नव्हती. विनय धुमाळ्यांच्या पत्नी आणि स्वतः सुप्रसिध्द निर्मात्या असलेल्या विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या आग्रहामुळे मी तारा मराठीमध्ये आलो होतो, आणि सुरुवातीला परिस्थिती चांगली होती, पण बाजारात मंदी असल्यामुळे जाहिरातींचा पैसा वाहिनीकडे येत नव्हता, आणि त्यामुळे एक दिवस ज्याची भीती होती, तेच झालं. माझी नोकरी गेली. त्यामुळे ठरलेलं लग्नही मोडलं. मला त्यातून आलेल्या नैराश्यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग दिसत होता - इतकं काम करायचं की रात्री घरी आल्यावर कुठलेही विचार मनात न येता सरळ झोप आली पाहिजे. म्हणून मग मी ईटीव्हीवर येऊ घातलेल्या ‘चार दिवस सासूचे’ नामक मालिकेसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. इथे अनुभव चांगले आणि वाईट असे दोन्हीही प्रकारचे आले. जेव्हा एक वर्ष झाल्यावर आणि मालिका जबरदस्त चालत असूनसुद्धा निर्मात्यांनी पैसे वाढवायला नकार दिला, तेव्हा मग मी तिथूनही बाहेर पडलो.
मी त्या वेळी २६-२७ वर्षांचा होतो, आणि आता निर्णय घेण्याची वेळ आली होती. याच क्षेत्रात मिळतंय ते किडूकमिडूक काम करत राहायचं आणि कधीतरी आपलं नशीब फळफळेल याची वाट पाहायची, किंवा मग या क्षेत्रातून बाहेर पडून दुसरीकडे कुठेतरी नशीब आजमावायचं. मी दुसरा पर्याय निवडला, कारण किती थांबायला लागेल याची शाश्वती नव्हती आणि एकंदरीत इथल्या लोकांच्या मला आलेल्या अनुभवामुळे माझा बर्‍यापैकी भ्रमनिरास झालेला होता.

त्याच वेळी संजय पारेख नावाचा माझा एक जुना मित्र मला भेटला. तो टाटा एआयजीसाठी काम करत होता. त्याने मला "एक दिवसभर प्रशिक्षण देऊ शकशील का?" असं विचारलं. त्यांचा नेहमीचा प्रशिक्षक आजारी होता. मी हो म्हणालो आणि ते काम केलं आणि हे आपल्याला आवडतंय आणि जमतंयसुद्धा हे माझ्या लक्षात आलं. मी जेव्हा घरच्यांशी याबद्दल बोललो, तेव्हा त्यांचाही असाच विचार पडला की मग तू शिक्षणक्षेत्रात का जात नाहीस? तुझ्याकडे पदवी आहे, अनुभव आहे. मुंबई विद्यापीठाने त्या वेळी नुकताच बी.एम.एम. (बॅचलर ऑफ मास मीडिया) हा अभ्यासक्रम सुरु केलेला होता आणि तिथे मी शिकवू शकेन असं मला वाटलं. २००३ च्या एप्रिलमध्ये जयहिंद महाविद्यालयाची याच अभ्यासक्रमासाठी अधिव्याख्याता पदासाठी जाहिरात आली होती. मी अर्ज केला, मुलाखतीसाठी बोलावणं आलं आणि माझी निवडही झाली.

१३ जून २००३ या दिवशी मी पहिल्यांदा टेबलाच्या दुसर्‍या बाजूला उभं राहून विद्यार्थ्यांकडे पाहिलं. माझे पाय थरथरत होते, तोंड कोरडं पडलं होतं. टेबलाचा आडोसा घेऊन मी उभा राहिल्यामुळे माझे थरथरणारे पाय विद्यार्थ्यांना दिसणार नाहीत, असं मला वाटत होतं. मी त्यांच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली. पंधरा-सोळा मिनिटं बोललो. तेवढ्यात कुणीतरी एक प्रश्न विचारला. मी त्याचं उत्तर दिलं. त्या विद्यार्थ्याचं बहुधा समाधान झालं असावं, कारण तो नंतर काही बोलला नाही. पन्नास मिनिटांचं लेक्चर संपल्यावर मी स्टाफरूममध्ये गेलो. माझी कानशिलं गरम झाली होती. मी बाहेर पडल्यावर आमच्या अभ्यासक्रमाच्या समन्वयक प्रा. मोहिनी डायस आत गेल्या होत्या, विद्यार्थ्यांना लेक्चर कसं वाटलं ते विचारायला.
मी शांत राहायचा प्रयत्न करत होतो, आणि मला माझ्या बाजूला कोणीतरी बसल्याचं जाणवलं. पाहिलं तर डायस मॅडमच होत्या. “They have liked you,” त्या म्हणाल्या, “They just wanted you to speak slowly.”

चला. निदान सुरुवात तरी चांगली झाली होती. नंतर मग मी माझं एम.बी.ए. केलं. त्यासाठी कॉलेजने पूर्ण सहकार्य केलं. एम.बी.ए. केल्यामुळे बी.एम.एस.(बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) या अभ्यासक्रमाच्या समन्वयाची जबाबदारीही माझ्यावर टाकण्यात आली.

८ वर्षांनी - म्हणजे २०११मध्ये मी जयहिंद कॉलेजमधून माझ्या सध्याच्या नोकरीत रुजू झालो. ८ वर्षं कॉलेजमध्ये शिकवल्यावर त्यातलं आव्हान कमी झालं होतं. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मी डोळे बंद करून एखाद्या वर्गात गेलो असतो, आणि तिथे विचारलं असतं की आज काय करतोय आपण आणि त्यांनी सांगितलं असतं, तर मी लगेच तो विषय शिकवला असता. बनचुकेपणाची एक भावना यायला लागली होती आणि ते मला नको होतं. म्हणून मग मी प्रशिक्षण क्षेत्रात जायचा निर्णय घेतला. माझं एम.बी.ए.तर होतंच, आणि शिवाय मला ८ वर्षांचा शिकवण्याचा अनुभव होता. त्यामुळे तशी अडचण आली नाही. फक्त एक जाणवलं की प्रशिक्षण क्षेत्रात तुम्हाला चांगलं शिकवावंच लागतं. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या शिक्षकाचं शिकवणं आवडलं नाही, तर विद्यार्थी त्याला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत. त्यांना हजेरीसाठी तरी तिथे बसावं लागतं. पण ज्या क्षेत्रात मी काम करतोय – स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण – तिथे तुम्हाला पाट्या टाकता येत नाहीत. एक तर विद्यार्थी जी फी भरतात, ती भरपूर असते, आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पैशाचा मोबदला हवा असतो.

प्रशिक्षण क्षेत्रातले अनुभवही चांगले/वाईट असे सगळ्या प्रकारचे आहेत. ज्येष्ठ मिपाकर खेडूत यांनी अभियांत्रिकी शिक्षणाच्या दुरवस्थेबद्दल लिहिलेली मालिका स्वतः अनुभवायला मिळाली आहे. कंपन्या ज्या aptitude tests घेतात, त्यासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. त्या निमित्ताने मुंबईतल्या सरदार पटेल, डी.जे. संघवी, मुकेश पटेल या प्रथितयश महाविद्यालयांपासून ते वसई-विरारपर्यंत आणि ऐरोली, कोपरखैराणे ते पनवेलपर्यंत मी जाऊन आलेलो आहे. अॅकॅडेमिक हुशारी आणि अशा तर्‍हेच्या प्रशिक्षणात दिसून येणारी हुशारी यांचं प्रमाण काही ठिकाणी सारखं असलं, तरी बर्‍याच ठिकाणी व्यस्त आढळलं आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे इंग्लिश भाषा येण्याची गरज आहे, हे प्रत्येकाला मान्य आहे, पण त्यासाठी मेहनत करायला लागेल हे मान्य करायला कोणीही तयार नाही. त्यामुळे हुशारी असून आपण मागे पडू हे मानायलाच कोणी तयार नाही. नव्या मुंबईत एका काॅलेजमध्ये आम्हाला काम मिळालं नाही, कारण आम्ही कोणत्याही प्रकारची हमी द्यायला नकार दिला. तिथल्या प्रिन्सिपॉलनी या शब्दांत आमची बोळवण केली होती - "आता तुम्ही गॅरंटी देत नाही, तर आम्ही स्टुडंट्सकडून या तुमच्या प्रोग्रॅमसाठी पैसे कसे काढणार?"

आणखी एका काॅलेजमध्ये तर तिथल्या टीपीओने (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अाॅफिसरने) आमची ओळख करुन देताना असे तारे तोडले होते - "तशीही हा प्रोग्रॅम करुन तुम्हाला नोकरी मिळणं शक्यच नाही, कारण तुमची तेवढी लायकीच नाही."
केंद्र आणि राज्य सरकारांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक योजनांमध्ये प्रशिक्षण सहयोगी (Training Partner) म्हणून आमची कंपनी सहभागी आहे. त्याच संदर्भात महाराष्ट्रात नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, उदगीर; महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये अहमदाबाद, वडोदरा, कलोल, थालतेज; हरयाणामध्ये पानिपत आणि पंचकुला आणि पंजाबमध्ये रोपड, मोरिंडा, संगरुर, पतियाळा आणि राजपुरा इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. एक अत्यंत आशादायक गोष्ट म्हणजे या सर्व ठिकाणी मुलींची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या किमान ४०% आहे, आणि त्यांच्यातली शिकण्याची जिद्द आणि मेहनत करण्याची तयारीही चांगली आहे.

आज जरी मी टेलिव्हिजन क्षेत्रापासून अनेक मैल दूर गेलो असलो, तरी तिथे जो वेगवेगळ्या लोकांशी, भाषांशी आणि विचारांशी संबंध आला, त्याचा आता भरपूर फायदा होतो, हे कळतंय. शिकलेलं कधीही वाया जात नाही हे जेव्हा लहानपणी ऐकलं होतं, तेव्हा त्याचा अर्थ नीट समजला नव्हता. तो आता समजू लागला आहे.

तर, अशी ही माझी आजपर्यंतची कथा. पण अजूनही मनात विचार यायचं काही थांबत नाही – त्या दिवशी आईकडे सुट्टे पैसे असते, तर?......

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

18 Sep 2015 - 12:53 am | भिंगरी

+++१११

सचिन जोशी's picture

18 Sep 2015 - 1:00 am | सचिन जोशी

आभिनन्दनिय आनि प्रेरनादायक

वेल, तर मग आम्हांला हा अप्रतिम लेख कसा बरे वाचायला मिळाला असता? :-)

क्या बात है! श्रीगणेश लेखमाला किती रंगणार आहे ह्याची झलक देणारा लेख. फारच प्रेरणादायी आणि या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍यांना दिशा दाखविणारा असा हा लेख फारच आवडला.

प्रेरणादायी +१

रेवती's picture

18 Sep 2015 - 2:14 am | रेवती

लेखन आवडले. आधी फारसे या क्षेत्राबद्दल ऐकले, वाचले नव्हते.
श्रीगणेश लेखमालेची सुरुवात चांगली झाली.
धन्यवाद.

मित्रहो's picture

18 Sep 2015 - 2:40 am | मित्रहो

आपला अनुभव रोचक आहे. टेलीव्हीजन वगेरेच्या क्षेत्राला ग्लॅमर भरपूर आहे परंतु आतली परिस्थिती मात्र वेगळी.

रातराणी's picture

18 Sep 2015 - 4:22 am | रातराणी

सुंदर झालाय लेख!

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2015 - 4:41 am | श्रीरंग_जोशी

स्वानुभावावर आधारीत लेखन खूप भावले व प्रेरणादायी वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2015 - 8:49 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ टू रंगाण्णा.

मिहिर's picture

18 Sep 2015 - 5:23 am | मिहिर

छान लेख.

मी आज शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 'माझ्या आईकडे सुट्टे पैसे नव्हते.'

हे बळंच जुळवलेलं कारण वाटलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2015 - 6:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रेरणादायी लेख.

-दिलीप बिरुटे

अजया's picture

18 Sep 2015 - 9:02 am | अजया

लेख आवडला.

प्रचेतस's picture

18 Sep 2015 - 9:11 am | प्रचेतस

उत्तम लेख.

ह्या क्षेत्रातील अजून काही निवडक अनुभव वाचायला आवडतील.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Sep 2015 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडला आणि प्रांजळ आणि प्रामाणिक लेखनशैली मुळे शब्द न शब्द मनाला जाउन भिडला.
तुमचे बाकीचे लेखनही असेच सकस आणि दमदार असते.

गणेश लेखमालेची सुरुवात जोरदार झाली आहे. आता दहा दिवस वेगवेगळ्या विषयावरचे चांगले चांगले लेख वाचायला मिळतील याची खात्री आहे.

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

पैजारबुवा,

मांत्रिक's picture

18 Sep 2015 - 11:22 am | मांत्रिक

सहमत! लेखन आवडले बोकोपंत! सिंदबाद सारखा तुमचा देखील वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवास झालेला दिसतोय. अगदी थक्क करणारा प्रवास! मान गये उस्ताद!

नाखु's picture

18 Sep 2015 - 9:50 am | नाखु

मेहनत, जिद्द या दोन गोष्टींबरोबर्च तुम्ही घेतलेल्या "डोळस" धाडसाला सलाम.(आजही बरेच विद्यार्थी अगदी १२ वी नंतर निव्वळ मित्र-मैत्रीण कॉमसला प्रवेश घेतेय म्हणून मला घ्यायचाय असे सांगणारे आहेत.

आणि पालकांचे विशेष अभिनंदन, कारण कठीण काळातही तुमचा धीर खचू दिला नाही.

इतकं काम करायचं की रात्री घरी आल्यावर कुठलेही विचार मनात न येता सरळ झोप आली पाहिजे.

याला +११

अनुभव लेख अजून येऊद्या "मायावी" जगाबद्दल बरीच खरी माहीती मिळेल.

पाषाण-ते भोसरी(नोकरी)-पुणे(कॉलेज)-पाषाण अशी त्रिस्थळी यात्रा सायकलीवर केल्याचे दिवस आठवले.

यादगार नाखु.

तुषार काळभोर's picture

18 Sep 2015 - 1:33 pm | तुषार काळभोर

<तोंडात दहा बोटे घातल्याची स्मायली>

मोक्षदा's picture

18 Sep 2015 - 10:01 am | मोक्षदा

आपला लेख खरच चं झाला आहे तरुणपिढीला प्रेरणा देणार आहे

मुक्त विहारि's picture

18 Sep 2015 - 10:02 am | मुक्त विहारि

अब एक कट्टा तो बनता ही हय.

पद्मावति's picture

18 Sep 2015 - 10:06 am | पद्मावति

खूपच सुंदर लेख.
मस्तं लिहिलंय. खूप आवडलं.
टेलेविजन सारख्या वेगळ्याच क्षेत्रातले अनुभव तर काही अनोखेच. यावर अजुन काही लिहा. वाचायला आवडेल.

पैसा's picture

18 Sep 2015 - 10:12 am | पैसा

अतिशय सुरेख, प्रेरणा देणारे लिखाण!

प्रांजळ आणि प्रेरणादायी लेखन.
शिक्षणक्षेत्राने श्रीगणेश लेखमालेचा सुरेख श्रीगणेशा झालाय.

सुबोध खरे's picture

18 Sep 2015 - 10:36 am | सुबोध खरे

आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे इंग्लिश भाषा येण्याची गरज आहे, हे प्रत्येकाला मान्य आहे, पण त्यासाठी मेहनत करायला लागेल हे मान्य करायला कोणीही तयार नाही.

शहरात येउन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आणि भरपूर "गुण" मिळवलेले अनेक विद्यार्थी दोन वाक्ये सरळ शुद्ध इंग्रजीत बोलू शकत नाहीत हि भीषण वस्तुस्थिती आहे.

सुबोध खरे's picture

19 Sep 2015 - 11:13 am | सुबोध खरे

आपला लेख सुंदरच आहे( हे लिहायला विसरलो याबद्दल क्षमस्व). आपले कष्ट ( आणी ते घेण्याची तयारी) पाहून आपल्याला दंडवत.

देशपांडे विनायक's picture

18 Sep 2015 - 10:41 am | देशपांडे विनायक

++

गॅरी ट्रुमन's picture

18 Sep 2015 - 10:44 am | गॅरी ट्रुमन

छान लेख. आवडला.

नया है वह's picture

18 Sep 2015 - 10:45 am | नया है वह

++

छान लेख . आवडला. बोकेरावांची शैली अप्रतीम आहेच .

लाल टोपी's picture

18 Sep 2015 - 11:05 am | लाल टोपी

लेखमालेची सुरुवात उत्तमच आहे. क्षेत्र कोणतेही असो उमेदवारीच्या काळात धडपड आहेच.

अनुप ढेरे's picture

18 Sep 2015 - 11:06 am | अनुप ढेरे

आवडला लेख!

मितान's picture

18 Sep 2015 - 11:14 am | मितान

लेख आवडला !

जे.पी.मॉर्गन's picture

18 Sep 2015 - 11:19 am | जे.पी.मॉर्गन

लेखनातला "प्रामाणिकपणा" आवडला. सगळ्या लेखाचाच टोन खूप छान आहे.

जे.पी.

मृत्युन्जय's picture

18 Sep 2015 - 11:19 am | मृत्युन्जय

लेख एकदम जबरदस्त झाला आहे.

अभ्या..'s picture

18 Sep 2015 - 11:28 am | अभ्या..

मस्त हो बोकेश.
एकदम जमले आहे. एवढ्या वेगळ्या फिल्डमध्ये टॉगल व्हायच म्हणजे भारीच्. आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2015 - 11:38 am | प्रभाकर पेठकर

सुंदर लेख. अंगीभूत हुशारी, प्रत्येक घटनेकडे 'एक अनुभव' म्हणून पाहण्याची वृत्ती आणि काट्याकुट्यातून ठामपणे वाटचाल करायचे धाडस ह्यातून घडत गेलेले रसायन म्हणजेच लेखक बोका-ए-आझम.

प्यारे१'s picture

18 Sep 2015 - 11:53 am | प्यारे१

छान लेख आहे.
हल्ली आमच्याकडं वाई भागात चित्रपट मालिका जाहीरातींची बरीच शूट्स असतात. त्यात पडद्यामागच्या लोकांची काय धावपळ सुरु असते ते काही अंशी बघितलं आहे. या क्षेत्रातल्या अनुभवांवर नंतर कधीतरी लिहावे असा क्लेम लावून ठेवतो.
- बोकाफॅन

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2015 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्रीगणेश मालेचा सुंदर श्रीगणेशा !

यापुढचे अनुभवही वाचायला आवडतील.

पिशी अबोली's picture

18 Sep 2015 - 12:40 pm | पिशी अबोली

अतिशय इंटेरेस्टिंग लेख. वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं :)

इशा१२३'s picture

18 Sep 2015 - 12:41 pm | इशा१२३

लेख आवडला.टेलिविजन क्षेत्रातले अनुभव सविस्तर लिहाच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Sep 2015 - 12:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अतिशय सुंदर लेख :). वाचनप्रत काढुन ठेवली आहे :)

बोकोबा
तुमचा प्रांजलपणा भावला
तुमचे अनुभव बहुआयामी आहेत
सुंदर मांडणी
एक जमल कधी तरी तर
सदैव दारूच्या धुनकीत असणार्‍या या सिंगल फसली माणसाने लोकांना फासावर चढवलं असेल हे मान्य करणं थोडं कठीण गेलं. त्यांनी सांगितलेल्या काही फासावर लटकवलेल्या माणसांच्या गोष्टी तर जबरदस्त होत्या.

या माणसांच्या गोष्टी आम्हालाही सांगा

पियुशा's picture

18 Sep 2015 - 1:09 pm | पियुशा

खुप मस्त !

शिव कन्या's picture

18 Sep 2015 - 1:35 pm | शिव कन्या

यथास्थित.

अन्या दातार's picture

18 Sep 2015 - 1:43 pm | अन्या दातार

अप्रतिम लेख. प्रामाणिकपणा व निर्लेप लेखनशैली भावली. तुमच्या मुशाफिरीचे अजून किस्से अवश्य लिहा.

चाणक्य's picture

18 Sep 2015 - 2:10 pm | चाणक्य

अनुभवकथन आवडले. तुमच्या धाडसाला आणि निर्णयक्षमतेला सलाम.

बाबा योगिराज's picture

18 Sep 2015 - 3:07 pm | बाबा योगिराज

वा वा वा.
लेखन मालेला दमदार सुरुवात झालेली आहे.
आता दहा दिवस मस्त मस्त लेखांची मेजवानी भेटनार.
.
बाप्पा पावला.दमदार पाऊस आणि दर्जेदार लेखनमाला.
.
.
.
आशावादी आणि समाधानी बाबा.

प्रेरणा देणारे अनुभव कथन !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Sep 2015 - 4:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

वाह!! रिस्क मापुन मनसोक्त जगण्याची उदाहरणे कमीच तूफ़ान लेख! जड़णघडण डोळ्यासमोर आली इतके चित्रदर्शी लेखन आहे

चांदणे संदीप's picture

18 Sep 2015 - 4:29 pm | चांदणे संदीप

१३ जून २००३ या दिवशी मी पहिल्यांदा टेबलाच्या दुसर्‍या बाजूला उभं राहून विद्यार्थ्यांकडे पाहिलं. माझे पाय थरथरत होते, तोंड कोरडं पडलं होतं. टेबलाचा आडोसा घेऊन मी उभा राहिल्यामुळे माझे थरथरणारे पाय विद्यार्थ्यांना दिसणार नाहीत, असं मला वाटत होतं. मी त्यांच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली. पंधरा-सोळा मिनिटं बोललो. तेवढ्यात कुणीतरी एक प्रश्न विचारला. मी त्याचं उत्तर दिलं. त्या विद्यार्थ्याचं बहुधा समाधान झालं असावं, कारण तो नंतर काही बोलला नाही. पन्नास मिनिटांचं लेक्चर संपल्यावर मी स्टाफरूममध्ये गेलो. माझी कानशिलं गरम झाली होती. मी बाहेर पडल्यावर आमच्या अभ्यासक्रमाच्या समन्वयक प्रा. मोहिनी डायस आत गेल्या होत्या, विद्यार्थ्यांना लेक्चर कसं वाटलं ते विचारायला.
मी शांत राहायचा प्रयत्न करत होतो, आणि मला माझ्या बाजूला कोणीतरी बसल्याचं जाणवलं. पाहिलं तर डायस मॅडमच होत्या. “They have liked you,” त्या म्हणाल्या, “They just wanted you to speak slowly.”

हा अनुभव काही अंशी घेतला असल्याने या परिच्छेदानंतर ख-या अर्थाने मी या लेखाशी एकरूप झालो.

लेख आवडला!

अप्रतिम लेख! सुंदर, नेमक्या शब्दातले अनुभवकथन! स्वानुभव असूनही Reportas चा फील आहे! पु. ले. शु.

किसन शिंदे's picture

18 Sep 2015 - 7:16 pm | किसन शिंदे

अतिशय सुरेख लेख!

मी-सौरभ's picture

18 Sep 2015 - 8:00 pm | मी-सौरभ

मस्त

यशोधरा's picture

18 Sep 2015 - 8:54 pm | यशोधरा

लेख अतिशय आवडला.

स्वाती२'s picture

19 Sep 2015 - 2:56 am | स्वाती२

अनुभवकथन फार आवडले!

विशाखा पाटील's picture

19 Sep 2015 - 7:23 am | विशाखा पाटील

उत्तम लेख! आवडला.

प्रभावी आणि प्रेरणादायी अनुभव लेखन.

खेडूत's picture

19 Sep 2015 - 11:19 am | खेडूत

लेख आवडला..
पहिल्याच लेखाने या मालिकेच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत!

सुधीर's picture

19 Sep 2015 - 11:54 pm | सुधीर

दुसर्‍या फुलानंतर हे पहिले फुल वाचले. "शिकलेलं कधीही वाया जात नाही". खरयं!

बीए करुन त्यानंतर कम्युनिकेशन स्टडीज सारख्या क्षेत्रात करिअर करायचे म्हणजे तुम्हाला मानलेच पाहिजे. सभोवताली सगळी जत्रा इंजिनिअरिंग आणि मेडीसिनकडे धावत असताना तर विशेषच! तुमचे अनुभवही अगदी रोचक दिसतात म्हणजे टीवी सीरीअल्स आपल्याला दिसतात तो सगळा पडद्यावरचा भाग झाला परंतु खरा मुख्य भाग हा पडद्यामागेच घडत असावा असे वाटते त्याबद्दलही अधिक वाचायला आवडेल. येरवड्याच्या कारागृहातील अनुभवही सर्वसामान्यपणे लोकांना येण्याची शक्यता नसते त्याबद्दलही जरुर लिहा.

वालचंद कॉलेजला एक वर्ष शिकवायला होतो त्यावेळी प्रथमवर्ष मेकॅनिकलच्या वर्गाला इलेक्ट्रॉनिक्स शिकवायला जातानाचे पहिले लेक्चर आठवले. भाषण वगैरे करायची सवय असल्यामुळे आणि नाटकात कामे केल्यामुळे भीड चेपलेली होती परंतु आपल्यापेक्षा तीन चार वर्षेच लहान असलेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे म्हणजे टेन्शन नक्कीच आले होते. विशेषतः नवख्या शिक्षकांच्या आम्ही उडवलेल्या टोप्या आठवून आपलीही टोपी कोणी उडवली तर काय या विचाराने ग्रासले होते. ;) परंतु वालचंदची मुले चांगली होती. फक्त पहिल्या वर्षीच इलेक्ट्रॉनिक्स असूनही मेकॅनिकलच्या मुलांची हजेरी पूर्ण असे. त्या विषयात सगळी मुले पास झाली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला! :)

श्री गणेशलेखमालेतले लेख अतिशय दर्जेदार आणि माहितीपूर्ण आहेत. पुढील लेखांबाबतची उत्सुकता वाढली आहे. संमचे अभिनंदन आणि आभार.

प्यारे१'s picture

20 Sep 2015 - 12:31 pm | प्यारे१

>>> प्रथमवर्ष मेकॅनिकलच्या वर्गाला इलेक्ट्रॉनिक्स

बेसिक इलेक्ट्रीकल का? माझ्या माहितीत पहिल्या वर्षी सगळ्यांचे विषय सारखे असतात नि इलेक्ट्रॉनिक्स असा काही विषय नसतो.

विषय शिकवलेला आहे.

प्यारे१'s picture

20 Sep 2015 - 6:28 pm | प्यारे१

काहीतरी गोंधळ आहे सर. माझाच आहे. जरा कन्फर्म करा.

http://www.unishivaji.ac.in/syllabus/engineering/be/F.E/Modified%20FE%20...

सहावं पान पहा. १९९७-९८ ला सुद्धा हाच पॅटर्न होता.
पहिल्या सेम ला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, कम्यु स्किल्स, अ‍ॅप मेक आणि इन्जिनरींग ग्राफिक्स + वर्कशॉप
तर
दुसर्‍या सेम ला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बेसिक् सिविल, मेकॅनिकल, एलेक्ट्रीकल

हे विषय सगळ्या ब्रँचच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी सारखे असतात.

-फक्त पहिल्या वर्षी बर्‍यापैकी अभ्यास केलेला.

एक एकटा एकटाच's picture

20 Sep 2015 - 9:17 am | एक एकटा एकटाच

छान होता अनुभव

कविता१९७८'s picture

20 Sep 2015 - 5:21 pm | कविता१९७८

मस्त लेख

जव्हेरगंज's picture

20 Sep 2015 - 5:29 pm | जव्हेरगंज

लेखन आवडले. सुट्टया पैंशांसारखे प्रसंग आयुष्यभर लक्षात राहतात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Sep 2015 - 9:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

छान अनुभव आपण सांगितलात! इंग्रजी भाषेच्या समस्येबाबत सहमत.

वेल्लाभट's picture

21 Sep 2015 - 11:30 am | वेल्लाभट

एक्सलंट! खूप सुरेख लिहिलंयत ! वाह !

सानिकास्वप्निल's picture

21 Sep 2015 - 2:23 pm | सानिकास्वप्निल

वॉव!! खूप सुरेख लिहिले आहे.
लेखन खूप आवडले, प्रेरणादायी.

शंतनु _०३१'s picture

21 Sep 2015 - 4:34 pm | शंतनु _०३१

आवडला

समीरसूर's picture

21 Sep 2015 - 5:53 pm | समीरसूर

लेख आवडला. नवनवीन मार्ग चोखाळत राहण्याची वृत्ती आवडली.

gogglya's picture

21 Sep 2015 - 6:24 pm | gogglya

+१११ आवडला! एकंदरीत श्रीगणेश लेखमाला एकापेक्षा एक सरस लेख वाचण्याचे भाग्य देईल असे दिसतेय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Sep 2015 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

अनुभव आणि एकुण वाटचाल आवडली.

अर्धवटराव's picture

22 Sep 2015 - 9:48 pm | अर्धवटराव

असंही लाईफ असतं होय :)
आजवर कधिच कुणाकडुन असे अनुभव ऐकले नाहित. रोचक वाटचाल.

प्रास's picture

22 Sep 2015 - 10:28 pm | प्रास

छान लिखाण...

आवडले.

Sanjay Uwach's picture

23 Sep 2015 - 10:39 pm | Sanjay Uwach

आपला लेख आवडला.माणसाने प्राप्त परिस्थितीला समोर जाऊन योग्य मार्ग स्वीकारणे या शिवाय आपल्या कडे दुसरा पर्यायही नसतो .आशा वेळी आपल्या मदतीला कोणी नाही याची ही जाणीव होते. आपल्या आवडीचे काम केल्यास माणूस मात्र निश्चितच यशस्वी होतो .एक चांगल्या लेखा बद्दल मनापासून अभिनंदन.

जुइ's picture

13 Oct 2015 - 8:24 pm | जुइ

आपली चिकाटी आणि शून्यातून परत जोमाने नवीन गोष्टींकडे वळण्याच्या वृत्तीला सलाम.
इंग्रजी भाषेच्या समस्येबाबत सहमत.

मोदक's picture

7 Sep 2016 - 8:02 pm | मोदक

जुना लेख वर काढत आहे..

झी न्यूज, ईटीव्ही मराठी (सध्या कलर्स मराठी), बालाजी टेलिफिल्म्स, विनार मीडिया, तारा मराठी (जे मोजून एक वर्ष चाललं) अशा अनेक निर्मितीसंस्थांमध्ये आणि वाहिन्यांमध्ये काम केलं. तिथलेही अनुभव संस्मरणीय वगैरे म्हणता येतील असे आहेत, पण ते परत कधीतरी.

या संस्मरणीय अनुभवांच्या प्रतिक्षेत.

आनंदयात्री's picture

7 Sep 2016 - 8:40 pm | आनंदयात्री

सहमत आहे. समीरण वाळवेकरांचे चॅनेल 4 लाईव्ह अशातच वाचले, तेव्हाच हे आठवून वाटले होते बोका ए आझमांनी या अनुभवांवर लेखमाला करावीच!

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Sep 2016 - 9:30 pm | माम्लेदारचा पन्खा

बोकासाहेबांची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल......

खटपट्या's picture

7 Sep 2016 - 10:23 pm | खटपट्या

जुना लेख वर काढल्याबद्दल मोद्क यांचे आभार.

खरच प्रेरणादायी लेख आहे. अनसंग हीरो

मंजूताई's picture

8 Sep 2016 - 3:19 pm | मंजूताई

प्रांजळपणे लेख!