बौद्ध दर्शन
खरे म्हणजे दर्शने हा काही वाचकप्रिय होण्यासारखा विषय नव्हे. त्या करिता एखादी जुनी, आपल्याला आवडलेली कविता घ्यावी, त्यात आपल्याला काय "भावले" सांगावे, मिपाकर (बहुधा पहिल्यांदीच वाचत असल्यामुळे असेल म्हणा वा सज्जन आहेत म्हणूम म्हणा !) "छान" म्हणतात, आपुन तरी खुष. दर्शनांचे तसे नाही. तो माझ्या आवडीचा विषय. पण डोके खाणारा. तेव्हा सुरवातीला विचार केला " लिहून तर बघू, १०० जंणांनी वाचला तर पुढे जावू, नाही तर दिले सोडून. सुरवातीचा प्रतिसाद सुखकारक वाटला म्हणून "तंत्रा" पर्यंत लिहले व थांबलो. थोडक्यात गोडी, एवढे नक्की कळते. नंतर आमचे मित्र श्री. माहीतगार यांच्यामुळे "सांख्य" झाले व आज श्री. मांत्रिक यांच्या सांगण्यावरून " बौद्ध दर्शन " बघू.
दर्शन म्हजे "तत्वज्ञान". धर्माचे दोन भाग असतात. आचार आणि तत्वज्ञान. बौद्ध धर्म आचारप्रधान आहे.बुद्धाने स्वत: तत्वज्ञानाला फारच कमी महत्व दिले. तो माणुस काय करतो व काय जाणतो यांत पहिल्याला महत्व देत होता. करणे आणि जाणणे यात कर्माला प्राधान्य. कोणत्याही दर्शनात आत्मा, परमात्मा व सृष्टी यांचा एकमेकांशी संबंध, माणुस मेल्यावर काय होते इत्यादींचा विचार असतो. बुद्धाचे म्हणणे "तुम्ही यांचाच विचार करत बसलात तर सगळे आयुष्य संपेल पण याची उत्तरे मिळतीलच असे नाही. सोडून द्या. कर्मावर जोर द्या. ब्रह्मचर्य, वैराग्य, निवृत्ती, उपशम ,अभिज्ञान,संबोध, प्रसाद आणि निर्वाण यांच्याशी या प्रश्नांचा संबंध येत नाही. मी दु:खाचे कारण व दु:खनिवारण यां विषयी ज्ञान दिले आहे." बुद्धाला या प्रश्नांचे ज्ञान असेल वा नसेल पण त्याने त्यावर स्वत: काहीच सांगितलेले नाही. दर्शने त्याने अव्याकृत म्हणजे अनिर्णित म्हणून सोडून दिली.त्याने आपल्या धर्मोपदेशात ईश्वराचे नावही घेतले नाही. त्याने हिंदुधर्मातील जन्मांतरवाद व कर्मफलवाद जसाच्या तसा घेतला व आत्म्याला मात्र नाकारले.
पण या प्रश्नांचा चा विचार विचारवंत करणारच. बुद्धाच्या मृत्युनंतर लागलीच त्याच्या शिष्यांनी बौद्ध दर्शनाच्या मांडणीला सुरवात केली..आता आपण सरळ बौद्ध दर्शनाकडे वळू.
प्रतित्यसमुत्पाद : याचा अर्थ एखाद्या वस्तूची उत्पत्ती होणे. बीज जमिनीत पुरले की ते अंकरून त्याचा वृक्ष होतो. पृथ्वी, सूर्य पाऊस अंकुरण्यास मदत करतात, बीज हे मुख्य कारण पृथ्वी, सूर्य .. ही गौण कारणे. तर अशा मुख्य व गौण कारणांनी एखादी वस्तु निर्माण झाली के ती दुसर्या एखाद्या वस्तुचे मुख्य वा गौण कारण बनते व हे चक्र चालू रहाते. भूत, वर्तमान व भविष्य या तीन्ही कालात हा नियम लागू आहे. अपवाद फक्त आकाश, प्रतिसंज्ञानितोध वप्रतिसंज्ञानिरोध या असंस्क्रुत धर्माचा. प्रत्यक्ष बुद्धालाही प्रतित्यसमुत्पाद चुकला नाही.याची बारा अंगांची शृंखला असून पहिले कारण व दुसरे कार्य असते. (१) अविद्या, (२) संस्कार, (३) विज्ञान, (४) नामरूप, (५) श्ढडायतन, (६) स्पर्श, (७) वेदना,(८) तृष्णा, (९) उपादान, (१०)भव, (३) ते (१०) ही जीवाच्या वर्तमान जन्माशी संबंधित आहेत. (११) जाती भावी जन्मासाठी मातेच्या गर्भात जीव प्रतिष्ट होतो व आपल्या सुकृत-दुष्कृताची फळे भोगण्याची योग्यता प्राप्त करून घ्बेतो, (१२) जरा-मरण , भावी जन्मात जीवाला वार्धक्य व मरण अनुभवावे लागते.
अनात्मवाद :हिंदु दर्शनात आत्मा हा नित्य मानला असल्याने पुनर्जन्माचा स्विकार सोपा आहे. माणुस जुनी वस्त्रे टाकून नवी धारण करतो त्या प्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नवे धारण करतो. बुद्धाने आत्मा नाकारला व पुनर्जन्म स्विकारल्यावर थोडी अडचण येते. याचे निवारण पुढील प्रकारे केले आहे. प्रथम आत्मा नाकारतांना तो म्हणतो. "आत्मवादी पुरुष आत्मस्वरूप न जाणता त्याच्या कल्याणाकरिता प्रयत्न करतो. हे करणे म्हणजे रंग, रूप, गून, नाम, गोत्र माहिती नसलेल्या स्त्रीवर प्रेम करण्यासारखे आहे. अशा पुरुषाला माहीत नसलेल्या स्वर्गातील सुखांकरिता यज्ञ कराणार्या पुरुषासारखे मूर्खच म्हटले पाहिजे. उपनिषदांत आत्मा नित्य, शुद्ध, बुद्ध व अपरिवर्तनशील मानला आहे. तो कर्माचा कर्ता नसून कर्मफलांचा भोक्ता आहे. परिवर्तनशील प्रकृतीशी संबंध आल्यावर अनित्य विश्वाचा पसारा निर्माण होतो. बुद्धाचे म्हणणे अपरिवर्तनशीलाचा परिवर्तनशीलाशी संयोग होऊच शकत नाही.आत्मा नाहीच. मी व माझे या प्रकृतीला आधारभूत अशी ती केवळ एक कल्पना आहे. नागसेन-मिलिंद संवादात हे छान दाखविले आहे. राजा मिलिंद नागसेनाकडे येतो. नागसेन मिलिंदाला विचारतो ’तू पायी आलास कां ?" राजा म्हणतो " नाही, मी रथातून आलो". नागसेन ..हा दांडा म्हणजे रथ कां? राजा :"नाही". नागसेन :" आंस म्हणजे रथ कां?" राजा " नाही". नागसेन :" ही चाके म्हणजे रथ ?" राजा " नाही". नागसेन " रथ अशी गोष्टच नाही दंड, आंस, चाके अशा अवयवांच्या आधारावर केवळ
व्यवहारासाठी त्या सर्वांना मिळून रथ असे म्हणतात. आत्म्याचे तसेच आहे.तो केवळ समुच्चयमात्र आहे.
आत्मा नाकारूनही पुनर्जन्म कसा स्विकारता या साठी पुढील उदाहरण दिले आहे. मिलिंद नागसेनाला विचारतो "जो जन्मतो तो तोच असतो की दुसरा ? " नागसेन म्हणाला " तो तोच नसतो आणि दुसराही नसतो." राजा विचारतो "असे कसे ?" नागसेन ;"दिव्याचे उदाहरण घे. एक माणुस रात्री दिवा लावतो.पण तो एकच दिवा रात्रभर जळत राह्तो कांय ? मुळीच नाही. दिवा लावते वेळी जी दीपज्योत प्रज्वलित झाली, ती वेगळी आणि दुसर्या, तिसर्या प्रहरी इतकेच नव्हे तर प्रत्येक क्षणी जी जळून गेली ती वेगळी.पण असे असले तरी एकच दिवा जळत राहिला असे आपणास वाटते.दिवा एकच खरा, पण त्याची ज्योत प्रत्येक क्षणी परिवर्तन पावते.आत्म्याच्या बाबतीथी हाच नियम लागू आहे.कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाच्या बाबतीत एक अवस्था उत्पन्न होते , त्याच क्षणी एका अवस्थेचा लय म्होतो.प्रवाहाच्या या दोन अवस्थांमध्ये एका क्षणाचेही अंतर असत नाही.कारण एकीचा लय होतो न होतो तोच दुसरी अवस्था उत्पन्न होते.याच कारणामुळे पुनर्जन्माच्या वेळी जीव तोच राहत नाही,दुसराही होत नाही. एका जन्माच्या अंतिम विज्ञानाचा लय होतो न होतो तोच दुसर्या जन्माचे प्रथम विज्ञान पुढे उभे राहते.प्रत्येक क्षणी कर्म नष्ट होत जाते; पण त्याची वासना पुढच्या क्षणात अनुस्यूत रूपाने प्रवाहित होते."
अनीश्वरवाद बुद्धाने ईश्वर नाकारला..तसा तो बहुतेक हिंदु दर्शनांनीही नाकारलाच आहे. ईश्वर या कल्पनेला कुठल्याही तर्काचा आधार नाही असे म्हणून न पाहिलेल्या, न ऐकलेल्या ईश्वराच्या सर्वकर्तृत्वावर भर दिल्याने मनुष्याचा आत्मविश्वास खचतो असे त्याला वाटत होते.अनुयायांना ईश्वराच्या जोखडातून बुद्धाने मुक्त केले. मात्र अनात्मवादी व अनीश्वरवादी असूनही बुद्ध भौतिकवादी नव्हता. त्याने भौतिकवादाचा विरोध केला आहे. भौतिकवाद इंद्रियनिरोध व समाधी यांना प्रतिबंधक होतो. माणुस मुलत: साधू नाही, त्याला त्या कोटीला जावयाचे आहे; त्याकरिता निर्मल आचार, विचार, उच्चार यांची गरज आहे.
बौद्ध तंत्र : पौर्वात्य माणसावर तंत्राचा प्रभाव फार झटकन पडतो. तेव्हा बौद्ध दर्शनात तंत्र लवकरच शिरले. त्यातही शैव तंत्राचा प्रभाव जास्त दिसतो. जास्त माहिती तंत्र दर्शना सारखीच.
विकास : दर्शन हा धर्माचा एक भाग. धर्मात परिवर्तन घडले की दर्शनाची दिशा बदलणारच. बुद्धाच्या मृत्युनंतर लगेचच धर्मात बदल व्हावयास सुरवात झाली. निरीश्वरवादी बुद्धालाच ईश्वर बनवले गेले व हिंदु देवतांपेक्षा जास्त देवता बौद्ध धर्मात घुसल्या ! इ.स.च्या सुरवातीला जशा अवैदिक देवता निर्माण होऊ लागल्या तशा त्यांना तोंड देण्याकरिता बौद्ध देवताही वाढल्या. शेवटी सामान्य माणसाला देव पाहिजे असतो, तत्वज्ञान नव्हे. बौद्ध दर्शनाचा विकास इ.स.५०० ते १५०० असा जवळजवळ १००० वर्षांत झाला (बुद्धानंतर १००० वर्षांनी!) त्याचा थोडासा परिचय वर दिला आहे. आज जगात मंगोलिया, चीन, जपान, इन्डोनेशिया इत्यादी विस्तृत प्रदेशात बौद्ध धर्म प्रचलित आहे सहाजिकच आहे की चीनमधील बुद्ध धर्म निराळा, जपानमधला निराळा ! तेव्हा तेथील बुद्ध दर्शन निराळे. आज तुम्ही जालावर पाहिले तर असे आढळून येईल की चीनमधील बौद्ध धर्मावर झेन तत्वज्ञानाचा गाढा पगडा आहे. तेव्हा वरील माहिती ही भारतातील बौद्ध दर्शनावर आधारित आहे. इति अलम् ! .
शरद
कृष्णा बोल का रे क्रुष्णा डोल का रे !
घडिये घडिये घडिये गुज बोल का रे !!
प्रतिक्रिया
6 Sep 2015 - 6:33 pm | प्यारे१
तत्त्वज्ञानात लैच अंतर्विरोध वाटतोय. सावकाशीनं वाचून काही संगती लावता येते का पाह्यलं पाहिजे.
पुनर्जन्म आहे पण आत्मा नाही म्हणताना कशाला नाकारलं जातं हे समजत नाही. आत्मा भोगतो म्हणजे काय याचाही विचार समजत नाही.
असो!
6 Sep 2015 - 7:11 pm | द-बाहुबली
सदरील विवेचन ही माझी समजुत आहे. नक्कि हेच तत्वज्ञान आहे अशी मला खात्री नाही म्हणून जाणकारांनी असल्यास यात दुरुस्ती सुचवावी.
कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाच्या बाबतीत एक अवस्था उत्पन्न होते , त्याच क्षणी एका( एका न्हवे तर त्याच) अवस्थेचा लय होतो पण लय होउन हे चक्र थांबत नाही तर लगेच पुन्हा अस्तित्वावस्था उत्पन्न होते अन त्याच क्षणी त्या अवस्थेचा लय होतो. एकावर ७० शुन्ये दिली तर जी संख्या येते साधारण तेवड्या वेळा यच्चावत प्रकृती एका सेकंदात उत्पन्न होते व नाहीशी होते व हे चक्र अविरत चालुच राहते. पण जसे एका विषीष्ट वेगात चित्रे बदलली गेली तर ते चलतचित्र भासते तसेच हे जग प्रकृतीच्या प्रचंड वेगाने नष्ट व उत्पन होण्याच्या क्रियेने एकसंध भासते, सॉलीड स्टेट अनुभवास येते.
आपण या सतत उत्पन्न होणार्या व नश्ट होणार्या प्रकृतीचा एक हिस्सा आहोत (जसे चाक हा रथाचा हिस्सा आहे संपुर्ण रथ न्हवे) ज्याचेही सतत स्थित्यंतर होत आहे. काया वाचा व मनाच्या मौनाने ( वा दुसर्या श्ब्दात बोलायचे तर समतेने, सम्यकतेने, कर्मासकट सगळ्याबाबत तठस्त राहण्याचा अभ्यासाने) आपण महानिर्वाण प्राप्त करु शकतो जेथे प्रकृतीचा हिस्सा असलेला जिव निर्माण नाहीसे होण्यापासुन अलिप्त होतो.
बाकी पुनर्जन्म आहे पण आत्मा नाही अशी बाब समजुन घेताना बहुतेकांचा गोंधळ होतो तसा माझाही आहे. पण आत्मा नाकारताना बुध्द आत्मस्वरुप नाकारत नाही ही बाब मज अल्पमतीसाठी पुरेशी सुचक आहे. जसे उपनिषदांत आत्मा नित्य, शुद्ध, बुद्ध व अपरिवर्तनशील मानला आहे तर बुध्द त्याचे स्वरुप सतत परीवर्तनशील/ स्थित्यंतर होणारे सेकंदात एकावर ७० जिरो दिल्यास जेवढी संख्या येते (त्या फ्रिक्वेन्सीने) तेवढे वेळा उत्पन्न व नष्ट होणारे मानतो हाच तो तत्वज्ञनातील आत्म्याबाबतच्या अवस्थेतिल प्रमुख फरक... बुध्दा आत्मा न्हवे तर आत्मस्वरुपाच्या समजुतीमधे असलेली तफावत दाखवत आहे त्याचे अस्तित्व नाकारत नाही. जसे आपण नदीत उभे तर असतो पण प्रत्येक्षणी शरीराला स्पर्श होणारे पाणी जसे एकच वाटले तरी बदलते असते तसाच हा (प्रकृती/निसर्गरुप) आत्मा (आत्मस्वरुप) बदलता आहे)तो उपनिषदात उल्लेखल्या प्रमाणे नित्य, शुद्ध, बुद्ध व अपरिवर्तनशील नाही असे त्यांचे म्हणने असावे.
7 Sep 2015 - 12:54 pm | ज्ञानोबाचे पैजार
तो निओ उंचावरुन उडी मारतो पण त्याला लागत नाही. नुसत्या गोळ्यांकडे बघत गोळ्या थांबवतो. नजरेने चमचा वाकडा करतो.
वरील थिअरी बरोबर असेल तर मग दगडावर डोके आपटले की डोके फुटून रक्त यायला नको. पण तसे होताना दिसत नाही.
तो दगडही वर्षानुवर्षे दगडासारखाच दिसतो. उदा वेरुळ मधली शिल्पे हजारो वर्षे जशीच्या तशीचा आहेत असे कसे ? मग त्यांच्यात परिवर्तन होते म्हणजे नक्की काय होते?
जर मी एका सेकंदात एकावर ७० जिरो दिल्यास जेवढी संख्या येते तेवढ्या वेळा मरत असेन तर मग मी निश्प्राण होतो म्हणजे काय होते?
एखादा प्राणी मेला की मगच त्याचे शरीर सडायला लागते. वरच्या थिअरी प्रमाणे माझे शरीर कधीच सडले नाहि पाहिजे किंवा सध्या आहे तसेच कायम राहिले पाहिजे.
महानिर्वाण होते म्हणजे नक्की काय होते? महा निर्वाण झालेला माणूस / प्राणी कसा ओळखावा? गौतम बुध्दाला परत नवा जन्म मिळालाच नाही / मिळणारच नाही हे खात्रीने कसे सांगता येईल? तो कदाचीत त्याचा भ्रम असु शकेल.
कदाचॆत वारीला प्रश्र्न वेडगळ असू शकतील त्याची उत्तरे कदाचित नसतीलही किंवा माझ्या आकलनाबाहेरची असतील. पण हे मला सध्या पडलेले प्रश्र्न आहेत.
पैजारबुवा,
7 Sep 2015 - 3:15 pm | द-बाहुबली
नेमका प्रश्न आहे पण आधीच स्पष्ट केले आहे हा नष्ट होणे व पुन्हा उत्पन्न होण्याचा वेग एकावर ७० शुन्ये दिली तर जितकी संख्या होते तितका प्रतिसेकंद आहे*. परीणामी जग सॉलीड वा एकसंध भासते जसे एका विशीष्ट वेगात चित्रे बदलली तर त्याचे चलतचित्र भासते. पण प्रत्यक्षात त्या फ्रेम्स असतात.
हे वैज्ञानीक वास्तव आहे की देर इज नो सॉलीडीटी इन एंटायर युनीवर्स....
आता हे लागु होते प्रत्येकालाच. म्हणजेच आत्मस्वरुपापासुन अणू -रेणुलाही. परिणामी अणू रेणू पासुन बनलेल्या प्रत्येक गोष्टीला म्हणजेच या समग्र भौतीक विश्वाला. म्हणून आत्मा हा उपनिशदामधे उल्लेखल्याप्रमाणे नित्य, शुद्ध, बुद्ध व अपरिवर्तनशील नाही असे बुध्द म्हणत असावा. म्हणून "आत्मवादी पुरुष आत्मस्वरूप न जाणता त्याच्या कल्याणाकरिता प्रयत्न करतो. हे करणे म्हणजे रंग, रूप, गून, नाम, गोत्र माहिती नसलेल्या स्त्रीवर प्रेम करण्यासारखे आहे. अशा पुरुषाला माहीत नसलेल्या स्वर्गातील सुखांकरिता यज्ञ कराणार्या पुरुषासारखे मूर्खच म्हटले पाहिजे." असे म्हटल्या गेले असावे.
वरील थिअरी विश्वाची सॉलीडीटी का अनुभवाला येते याविशयी आहे. विश्वातील विवीध पदार्थाना विशीश्ट गुणधर्म का चिकटतात व त्यानुसार प्रक्रिया कशा निर्माण होतात या विशयी नाही. तर समग्र विश्व अस्तित्वात आहे हे का भासते यानुशंगाने आहे. परीणामी शरीर सडायला कारणीभुत ठरणारे घटक यांचा अभ्यास इथे प्रस्तुत नाही.
शरिराप्रमाणे आत्मस्वरुप हेही भौतीक व त्याच नियमांनी बांधील आहे(उपनिशदात वर्णल्या प्रमाणे अलौकीक अमर कधीच नाहीसे न होणारे न्हवे ) असे त्याचे मत आहे. म्हणून हिंदुना(?) अभिप्रेत असलेला आत्मा अस्तित्वात नाही असे विधान तो करतो. सर्व काही निसर्ग(जीव, भौतीक वा रसायन शास्त्र) नियमानी चालु आहे असे तो समजतो. म्हणूनच ध्यानाची सुरुवात मनापासुन हवे शरीरापासुन करावी अशी त्याची शिकवण आहे.
जागेपणा, झोप, जन्म होणे याप्रमाणे निष्प्राणता ही एक नैसर्गीक भौतीक अवस्था आहे. जी बदलुन पुन्हा जन्म मिळेल.
तुम्ही निश्प्राण झालात तरी निसर्गापासुन अलिप्त होत नाही परीणामी निसर्गनियमानुसार जन्म म्रुत्यु सुरुच राहील इथे कृपया लक्षात घ्या जन्म मृत्यु आणी सेकंदाला विशीष्ट फ्रिक्वेन्सीने नश्ट व पुर्नीर्मीत होण्याचा विज्ञानाने सिध्द झालेला नियम या दोन वेगळ्या बाबी आहेत.
मी बौध्द नाही. गौतम बुध्द तर अजिबात नाही. विपश्यना केल्यामुळे मला जि माहीती मिळाली त्यानुशंगाने माझे विवेचन आहे. ज्याचा मुख्य रोख उपनिशदात वर्णन केल्या प्रमाणे आत्म्याचे अस्तित्व अजिबात नाही या बुध्दाने विधानाचा उहापोह करणे इतकाच आहे. हिंदुनी लगेच आत्मा नाही असे बुध्द म्हणतो हो........ हे विधान ऐकताना मग नेमके काय आहे असे तो म्हणतो हे संपुर्ण दुर्लक्षीत केल्याने हिंदु मनाचा जो तात्वीक गोंधळ उडाला आहे त्याची जी माझ्या मनाला मौज वाटते म्हणुन हे लिखाण आहे.
परंतु ज्याच्या अधिष्टानावर हा संपुर्ण भौतीक डॉलारा उभा राहीला त्या शुन्य तत्वात आत्मशुन्यात स्थिर होउन सेकंदाला ७० वेळा निर्माण नश्ट होण्याच्या प्रक्रीयेतुन आत्मस्वरुप विलग होणे (काहीच न उरणे आंतरीक शुन्यानुभव घेणे) म्हणजे निर्वाण असे भौतीकशास्त्राच्या व्याख्येने नक्किच म्हणता येत असावे अशी माझी समजुत आहे. हे कसे करावे यावर वेगले विवेचन द्यावे लागेल... माझे हे उत्तर आपले कितपत समाधान करेल यबद्दल मला शंका आहेच कारण मी स्वतः या तत्वज्ञानाचा अभ्यासक नाही. जी जुजबी माहीती व प्रात्यक्ष अनुभव आहे त्यातुन जे डॉट्स कनेक्ट करता येत आहेत ते करत आहे. त्यापेक्षा मला भागवत वा ज्ञानेश्वरीबद्दल कोनत्याही शंका अवश्य विचारा अगदी पोपटा सारखा बोलु शकेन...
6 Sep 2015 - 6:36 pm | एस
माहिती त्रोटक आहे. परंतु हेही नसे थोडके. बौद्ध धम्मात गौतम बुद्धानंतर नागार्जुनाचा शून्यवाद कसा आला, थेरवाद (हीनयान) आणि महायान अशा दोन शाखा कशा पडल्या, भारतातून इतर देशांत धम्म कसा पसरला? अशी बरीच माहिती देता आली असती.
पुढे लोकायत दर्शन वाचण्यास उत्सुक.
6 Sep 2015 - 6:44 pm | प्रचेतस
तंत्राचा प्रभाव असलेली तिसरी वज्रयान पण.
6 Sep 2015 - 9:21 pm | बिपिन कार्यकर्ते
बौद्ध धम्मावर एक अत्यंत विस्तृत मराठी पुस्तक लवकरच येत आहे. :)
6 Sep 2015 - 11:19 pm | प्रचेतस
मला हवेय. :)
7 Sep 2015 - 12:18 pm | बिपिन कार्यकर्ते
मिळेल.
6 Sep 2015 - 6:46 pm | प्रचेतस
लेख नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट पण संक्षिप्त.
बौद्ध दर्शनांवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.
6 Sep 2015 - 7:12 pm | मांत्रिक
धन्यवाद शरदसाहेब. बौद्ध दर्शनाविषयी हिंदुना फारच कमी माहिती असते. तुमच्या या लेखामुळे ती कमी पूर्ण होत आहे.
माझ्याशी फारशी ओळख नसताना देखील या विषयावर लिहिण्याची विनंती आपण मान्य केलीत, याबद्दल खूप खूप धन्यवाद!
6 Sep 2015 - 7:27 pm | मांत्रिक
माहिती उत्कृष्टच आहे. म्हणजे मूळ बौद्ध तत्वज्ञानाचा जो आकृतीबंध आहे, त्याप्रमाणे आहे. परंतु अजून थोडी विस्तृत, तपशीलवार देता येईल. त्या दिशेने कृपया विचार व्हावा. हिंदु तंत्रातील प्रसिद्ध दशमहाविद्यांपैकी तारा व छिन्नमस्ता या देवता तर प्रथम बौद्ध तंत्रात उगम पावल्या. त्यावरून बौद्ध तत्वज्ञानाचा अचंबित करणारा प्रवास लक्षात यावा. असो.
6 Sep 2015 - 7:25 pm | द-बाहुबली
भागवतात अशाच स्त्रिसोबत प्रेम्/विवाहाची उपमा बुध्दीला सत्य मानणे या प्रक्रियेला दिली आहे जिच्यामुले जिवाला/आत्म्याला मोठ्या कश्टाला सामोरे जावे लागते. भगवतावरही एखादा लेख जरुर येउद्या जर कोना मान्यवरानी विनंती केली तर...
6 Sep 2015 - 7:59 pm | अनुप ढेरे
आवडली माहिती!
6 Sep 2015 - 8:15 pm | सत्याचे प्रयोग
"निरीश्वरवादी बुद्धालाच ईश्वर बनवले गेले" हे पटले पण हिंदु देवतांपेक्षा जास्त देवता बौद्ध धर्मात घुसल्या ह्या घुसवलेल्या देवता कोणत्या कळेल का?
6 Sep 2015 - 8:28 pm | प्रचेतस
बोधिसत्व, तारा, भ्रुकूटी, महामयूरी, अवलोकितेश्वर, रक्त अवलोकितेश्वर, जंभाल, हरिती.
7 Sep 2015 - 10:37 am | शुचि
माहीती फार आवडली.
7 Sep 2015 - 12:06 pm | शरद
श्री. स्वॅप्स :
दर्शन" सारख्या विषयावर लिहतांना "थोडक्यात" लिहणे गरजेचे असते कारण नाही तर "तंत्र" सारखे तीन तीन लेख एकाच दर्शनावर लिहावे लागतील. वाचकांच्या सहनशीलतेचा विचार करावयास पाहिजेच. ते असो. बौद्ध दर्शना बाबतीत प्रतित्वसमुत्पाद ,अनात्मवाद व निरीश्वरवाद हे तीन मुद्दे जास्त महत्वाचे वाटले म्हणून तेवढेच घेतले. नागार्जुनाचा "शून्यवाद" यावर लिहावयाचे म्हणजे सगळे "माध्यमिक" दर्शनच सांगितले पहिजे. ते अंमळ निरस होण्याची शक्यता, म्हणून टाळले. तरीही अतिसंक्षेपात सांगावयाचे म्हणजे वर "रथ" बद्दल जसे म्हटले कीं "रथ" अशी गोष्टच नसते; तसेच विश्वातील प्रत्येक गोष्टीबद्दलच म्हणता येईल. हा झाला शून्यवाद. गंमत म्हणजे बौद्ध दर्शन "शून्या"विषयी जे म्हणते तेच अद्वैत दर्शन "ब्रह्मा"विषयी म्हणते.बुद्ध हा अद्वैतवादी होता. बोधीचित्तविवरणात शून्यतेला अद्वैतलक्षण म्हटले आहे. फरक असला तर इतकाच की माध्यमिक आचार्य शून्याला निषेधात्मक शब्दांनी अभिव्यक्त करतात तर अद्वैतवादी ब्रह्माला सत्तात्मक शब्दांनी निर्दिष्ट करतात.
लेख दर्शनावर आहे, धर्मावर नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता ती माहिती येथे नाही.
दर्शने ५ चार्वाक किंवा लोकायत http://www.misalpav.com/node/15418
शरद
7 Sep 2015 - 3:25 pm | प्रसाद गोडबोले
हे वाक्य थोडे गोंधळात पाडणारे आहे ... अद्वैतवादी म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे इथे ?
अद्वैत म्हणजे आत्मा आणि परमात्मा ह्यांचे अभिन्नत्त्व ना ? मग अनात्मवादी बुध्द अद्वैतवादी होता ह्याचा नक्की अर्थ काय ?