कारगिल सेक्टर च्या माधोमध एक जागा. एका दगडावर मी सुन्न पण शांत बसलो होतो. रिज कॅप्चर झाली होती अन शेजारी माझी रायफल पड़ली होती. तिच्यातही बेटी एकच गोळी उरली होती. तासाभरापूर्वी तुंबळ रणकंदन माजले होते इथे, आरडाओरडा वीरश्रीयुक्त युद्धघोष सगळ्याचीच रेलचेल. जरासे बधीर वाटत होते, तरीही शांतता अन त्या शांततेत कानात घुमणारा कुईंsssss असा आवाज लक्षात येत होता. कदाचित मी त्या आर.पी.जी. अन गोळ्यांच्या आवाजाने बधीर झालो होतो, असेल बुवा, ह्या धामधुमीत माझे लाडके मार्लबोरो लाइट्स चे पाकीट कुठे पडले कोणास ठाऊक! त्या परिस्थितीत सुद्धा मी ते जपून सेल्फ राशनिंग करून वाचवले होते. मरू दे आता जायचेच आहे न तेव्हा बायको नं दिलेली लिस्ट घ्यायचीच आहे पठाणकोट कैंटीन मधुन तेव्हा घेऊ.
अरे वा रिइनफोर्समेंट आली वाटते, बारीक डोळे बारकी चण, अरेच्या ही तर आमचीच 3 गोरखा ओहो!!! सख्खे भाऊ दिसावे तसला आनंद. हा पहा थोडा वयस्करसा सुभेदार मेजर शिवसिंह छेत्री, ह्याला साक्षात "इनसाइक्लोपीडिया ऑफ़ बॅटल" म्हणायला हरकत नाही बरका. त्याच्या मागे कोण हा तर वीरकुमार थापा अजुन कोण लेफ्टनंट मनोज नायडू, जिवंत वाचलाच बेट्या! असो चला आता लिंकअप करावे म्हणुन मी रायफल ला हात घातला तर उचलताच येईना राइफल! अंगात विलक्षण ग्लानी होती! ओरडावे म्हणले तर आवाज फुटत नव्हता. युद्धज्वर ओसरला की होते असे शरीर सुन्न पड़ते. आमचा टाइगर काय बरे गमतीशीर म्हणायचा ह्या अवस्थेला ? हा "पोस्ट बॅटल ऑरगॅज्मिक फेज" हा हा हा हा . पण आता उठायला हवे होते.
ज़रा उठून उभा राहिलो, हात पाय ताणले ते बरे वाटत होते अन मुख्य म्हणजे बॅकपॅकचा काही भार जाणवत नव्हता! मागच्या 2 महिन्यात ती पाठीवरुन उतरली नव्हती, सवय झाली असेल. मी आता उभा राहून आजुबाजुला पाहिले ते 9 प्रेत पडलेली, पाय थरथरायला लागले तसे मी मटकन बसलो, अहो मी ही माणुसच ना? कालवर सोबत लढणारी पोरे अशी दिसली की कशी होणार अवस्था? समोर पाहता जवान एक एक पार्थिव उचलायला लागले, ओह हा कोण? अरे रे जंगबहादुर लिंबु, देवा देवा हा तर तुषार गुरुंग लेकाचा नकला मस्त करायचा आता संध्याकाळ टाइगर च्या गप्पा ऐकत मेस ला बोरिंग होणार साला फौजी वर्दी जितकी चांगली तितका हा वियोग वाईट असतो, पलीकडे कोण आहे बरे? ओह हा तर अमरपाल तमांग ह्याच्या हातचे मटन मोमो म्हणजे वाह!!.
"हरामखोरहो, का रे का सोडताय मला! यु ब्लडी फूल! ओ.आर. अपने साबजी को अकेला छोड़ कर के जा रहे हो मकरो" माझ्या डोळ्यामधुन धारा सुरु झाल्या. सैनिक रडत नसतो. मिथ आहे साली, आम्ही क्वचित रडतो अन बहुतकरून असे साथी सोडुन गेल्यावर धाय मोकलुन ही रडतो उशीत तोंड खुपसुन. अजुन कोण कोण आहे पहावे म्हणून सूबेदार मेजर च्या मागोमाग गेलो तर त्याने एक ओणवे पडलेले शरीर पाहताच तो थांबला अन ओरडला "सिपाही विष्णु जंग और लांस नायक कमलेश भूटिया इधर आओ"
ते प्रेत सुलटे करता करता त्यांना काय दिसले माहिती नाही पण ती विशीतली दोन पोरे टपटप आसवे गाळु लागली, अन गलितगात्र होऊन रडु लागली, म्हणून कुतुहला ने मी समोर गेलो ते मलाच धक्का बसला
नाव : लेफ्टनंट "क्ष"
तो मीच होतो.
सुन्न पडलेले डोके मला आवरता येत नव्हते, अरे मी मी मेलोय कुठे! मला दिसते आहे की सगळे; पण शरीर मा...झेच आ आ आहे की हे. थोड्यावेळात धक्का ओसरता मी सावरलो अन मनात विचार केला "च्यायला नेमकी कुठे काशी झाली?"
रडत रडत मला(!) पोरे स्ट्रेचर वर ठेवत होती, विष्णु तर सतत रडत होता "मेरे साब मेरे साब, अब मैं क्या मुह दिखाऊंगा आंटी जी को भाभीजी को" हळू हळू पुर्ण कैंटर बॉडी न भरला तेव्हा मी एकटा मैदानात राहिलो म्हणून मी सुद्धा कँटर मधे शिरलो अन माझ्याच बॉडी वर बसुन राहिलो, आमची वरात बेस ला येताच पुर्ण बेस अन साक्षात् कोर कमांडर कँटर ला एस्कॉर्ट करत सॅल्युट करत होता, अवघड़लो न राव मी, 71 मधे झेंडे गाडलेला माझा बॉस मला माझ्या कलेवराला सॅल्युट करत होता.
मग माझे शरीर साग्रसंगीत कॅस्केट मधे ठेवले गेले, माझ्या शेजारी माझे 8 भाऊ! चंडीगढ़ एयर बेस ला येताच आम्हाला विमानात बसवले इल्युशियन 76 होते बहुतेक! मरू दे आपल्याला काय बिन एअरहॉस्टेस ची फ्लाइट! मजल दर मजल करता करता आमचा कँटर शेवटी गावाजवळ पोचला माझ्या. तसे तो थांबवला गेला त्याला लोकांनी झेंडूच्या फुलांनी सजवला होता, समोर बॅनर वगैरे जय्यत एकदम, हळूहळू मी घरी पोचलो अन कारगिल ला होतो तितकाच गलितगात्र झालो.
अनामिका माझी प्रियतमा अनामिका भकास चेहर्याने बसलेली होती, बाबा बाहेर खुर्चीत बसले होते, आई च्या डोळ्याला खळ नव्हती अन तिच्या मांडीवर असलेला माझा विश्वास, बाहेर अनामिकेच्या ऑफिस मधले सहकारी अन धाकट्या भावाची मित्रमंडळी उभी होती अन हजारो हजार अनोळखी माणसे, भाऊ वडिलांच्या मागे उभा. होता होता तयारी झाली अन माझ्या शरीरावर तिरंगा पसरला गेला, अहाहा विलक्षण उबदार होता तो!. मुक्तिधाम ला पोचलो तेव्हा मी तिथेच घुटमळत होतो थोडा अस्वस्थ होतो, आता काय होणार माझे? पुढे शरीरावरचा तिरंगा काढला तशी अजुन चूळबुळ व्हायला लागली माझी, भावाने अन वडिलांनी अग्नी दिला. हवेत मोजून 21 राउंड्स सुटले अन बिगुल वाजू लागला.
बिगुल ची धुन "लास्ट पोस्ट" कॉमनवेल्थ देशांत शहीद शिपायाच्या अंत्यसंस्कारात वाजवतात ती, लास्ट पोस्ट चा अर्थ? "डेड कॉमरेड, तू शरीराने वारला आहेस मनाने नाही तुझा आत्मा अजुन ड्यूटी ला आहे. तुझी ड्यूटी तुला साद घालते आहे. चल उठ, अन आपली पोस्ट कायम ची सांभाळ. तुला स्वर्गात जायचे असले तर तुझ्या स्वर्गात जा" माझा स्वर्ग? काय आहे काय माझा स्वर्ग? माझा स्वर्ग पॉइंट 1234 कारगिल सेक्टर नॉर्थन कमांड इंडियन आर्मी हा होता.
लास्ट पोस्ट चा बिगुल संपला तसे confusion संपले होते, अंगावर नवी वर्दी जाणवत होती, मला पिंडदान मुक्ती सप्तस्वर्ग नको होता ते श्रद्धेचा भाग म्हणुन घरचे करू देत. लास्ट पोस्ट च्या पोस्टिंग ऑर्डर्स घेऊन मी मात्र निघालो होतो.
कारगिल 1234 पोस्ट ला मी आहे आजही! कायम सतत अहोरात्र उभा, कारण तोच आहे माझा स्वर्ग.
तीच आहे माझी
द लास्ट पोस्ट.
(काल्पनिक कथा: छायाचित्र जालावरून साभार)
प्रतिक्रिया
5 Sep 2015 - 12:29 am | होबासराव
आता वाचतो
5 Sep 2015 - 12:35 am | रमेश आठवले
विषण्ण
5 Sep 2015 - 12:36 am | होबासराव
साला इसको..नहि..इसीकोच लाईफ बोलते है..जियो बाप्पु जियो..
कारगिल 1234 पोस्ट ला मी आहे आजही! कायम सतत अहोरात्र उभा, कारण तोच आहे माझा स्वर्ग
आहा हा खतरा
5 Sep 2015 - 12:55 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! वन्स अ सोल्जर, अलवेज अ सोल्जर !!
5 Sep 2015 - 6:02 am | कैलासवासी सोन्याबापु
ई ए काका एक इंग्रजी म्हण प्रसिद्ध आहे ह्या बाबतीत "u may retire a soldier from army but you cant retire an army out of a soldier"
5 Sep 2015 - 1:05 am | उगा काहितरीच
निःशब्द !
5 Sep 2015 - 1:31 am | प्यारे१
.
(हा खरा प्रतिसाद आहे. चार वेळा काहीतरी लिहून पुन्हा बॅकस्पेस. एकही शब्द लिहायला नकोसा वाटतोय.)
तरीही-
सैनिकी मनोरचना उलगडून दाखवणारा लेख.
कौनसे मिट्टी से बनते हो आप लोग यार????
जस्ट एक सॅल्युट. और कुछ ना कह पायेंगे
5 Sep 2015 - 6:17 am | कैलासवासी सोन्याबापु
"कुछ इस तरह हम
करें बयां अपनी तासीर
ढेर मुहब्बत आपने दी
चुटकीभर फर्ज अदायगी अपनी भी!"
5 Sep 2015 - 8:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत.
5 Sep 2015 - 2:13 am | शिवोऽहम्
हे सगळे वास्तव फार फार निराळे आहे आमच्या बे-एके-बे जगण्यापेक्षा.
5 Sep 2015 - 3:51 am | बहुगुणी
आणखी काय प्रतिक्रिया देणार? नि:शब्द!
5 Sep 2015 - 5:52 am | मांत्रिक
...
सुंदर पण विषण्ण करणारे लेखन!
5 Sep 2015 - 6:10 am | कैलासवासी सोन्याबापु
ही कथा लिहिण्यामागे सिक्किम मधे नथुला बॉर्डर ला असलेले "सुबेदार बाबा" ही प्रेरणा होती, आपल्या सीमेवर असे पावला पावला ला आहेत बाबा, स्थितप्रज्ञ कायम ऑन ड्यूटी बसलेले. हा एक प्रयत्न फ़क्त त्यांना हे सांगायचा की "Lest we forget you"
5 Sep 2015 - 6:22 am | श्रीरंग_जोशी
सीमेवरच्या शत्रुपासूनच नव्हे तर नैसर्गिक आपत्त्यांच्या वेळी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लढत राहणार्या सर्व सैनिकांस कडक सलाम.
लेखन खूप भावले. त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया लिहावी ते सुचत नाही.
5 Sep 2015 - 7:50 am | अभ्या..
सलाम बाप्पू.
5 Sep 2015 - 8:06 am | कैलासवासी सोन्याबापु
Last Post Bugle Call: http://youtu.be/I2FKGwZ9oMs
सदर लिंक मधे लास्ट पोस्ट बिगुल कॉल ऐकू शकता
5 Sep 2015 - 8:23 am | जेपी
...
5 Sep 2015 - 8:59 am | प्रचेतस
जबरदस्त लेखन बाप्पू.
5 Sep 2015 - 9:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
.......................................................................
5 Sep 2015 - 9:06 am | तुषार काळभोर
...
5 Sep 2015 - 9:36 am | सिरुसेरि
+१ - "उस मुल्कको कोई छू नही सकता , जिस मुल्कके सरहदकी निगेहबान हो आंखे" असे कुण्या देशभकताने लिहिलेलेच आहे .
5 Sep 2015 - 9:47 am | असंका
हे असलं काही वाचलं की सगळे हिशेब पुन्हा करायला लागतात....
पारच भुस्कट केलंत डोक्याचं....
अनेक धन्यवाद!
7 Sep 2015 - 7:26 pm | जे.पी.मॉर्गन
खरंय.... आपण कोण... आपल्या आयुष्याचा कोणाला काय उपयोग... आपण काय करतोय इथे....
सुन्न झालोय.
जे.पी.
5 Sep 2015 - 9:50 am | ज्ञानोबाचे पैजार
प्रत्येकजण आपापल्या परीने या कथेतल्या वीरा सारखा नि:स्वार्थी आणि कर्तव्यदक्ष झाला तर लढाईमधे प्राण गमावण्याची वेळ जगातल्या कोणत्याही सैनिकावर येणार नाही.
प्रत्येक सैनिकाच्या बलिदानाला (मग तो कोणत्याही देशाचा असो) आपणही काहीअंशीतरी जबाबदार आहोत याची सतत जाणीव ठेउन आपण सावध पणे वागायला लागू तेव्हाच या परिस्थिती मध्ये बदल घडायला सुरुवात होईल.
नाहीतर स्वार्थ साधण्यासाठी शहिदांचे पोवाडे गाणारे अनेक जण आपली दिशाभूल करायला टपलेले आहेतच.
पैजारबुवा,
5 Sep 2015 - 10:00 am | अनामिक२४१०
नि:शब्द ....
देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र लढणाऱ्या सैनिकांना सलाम … !!!
5 Sep 2015 - 10:23 am | अजया
___/\___
5 Sep 2015 - 10:25 am | नीलमोहर
नि:शब्द...
5 Sep 2015 - 10:43 am | अद्द्या
काय बोलू ?
काहीच सुचत नाहीये .
सलाम बापूसाहेब
5 Sep 2015 - 10:53 am | कैलासवासी सोन्याबापु
अहो मंडळी सलाम मला नको हो ह्या सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांस करुयात आपण सगळे मिळून
5 Sep 2015 - 10:49 am | अद्द्या
कित्येक दिवसांनी, मिपावर रोज लॉगीन का करतो . याचं कारण मिळाल्यासारखं वाटतंय :)
जियो बापूसाब जियो
5 Sep 2015 - 11:03 am | नाखु
कडक सलाम!!!
चटकन ती कवीता आठवली अनाम वीरा नाही चिरा नाही पणती..
आवंढावाला नाखु
5 Sep 2015 - 11:23 am | एस
बलिदानाची अत्त्युच्च सीमा!
5 Sep 2015 - 11:43 am | बाबा योगिराज
वल्लाह.... झक्कास लिहिलय.... वा वा...
5 Sep 2015 - 11:52 am | सुबोध खरे
बापूसाहेब डोळ्यात पाणी आणलेत हो
एके काळी शेजारच्या बाथरूम मध्ये एकत्र अंघोळ केलेले अधिकारी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी, दोन आठवड्यापूर्वी मुल होत नाही म्हणून बायकोला इंजेक्शन देणारा मी तिच्या नवर्याच्या अंत्यसंस्कारासाठी, समारंभासाठी चा (ceremonial) गणवेश घालून साश्रू नयनांनी त्यांना सलाम ठोकत असल्याचे आठवले. माझे कित्येक वैमानिक दोस्त पंचविशी, तिशीतच हुतात्मा झाले. त्यांची कुटुंबे आयुष्याचे तुकडे आजही जोडण्याचा प्रयत्न करीत जीवन जगत आहेत. त्यांच्या कडे पाहिल्यावर स्वतःबद्दल शरम वाटते.
5 Sep 2015 - 1:50 pm | द-बाहुबली
:(
5 Sep 2015 - 1:22 pm | मास्टरमाईन्ड
सर्वांगावर काटा आला.
कथा अक्षरशः "बघितल्याची" जाणीव झाली.
5 Sep 2015 - 1:34 pm | पद्मावति
आतापर्यंत जवळ जवळ दोन तीनदा हा लेख वाचला. नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाहीये. माझ्या मते सुरेख, अप्रतिम, सुंदर म्हणणं म्हणजे understatement होईल या कथेकरता.
निशब्द: अभिवादन त्या सगळ्या वीरांना आणि तुमच्या सुरेख लेखन शैलीला मनापासून दाद.
5 Sep 2015 - 2:56 pm | फारएन्ड
काय जबरदस्त लिहीले आहे! कल्पना व लेखन दोन्ही परिणामकारक आहे. शेवटही एका सैनिकाच्या प्रतिमेला आणखीनच उंचावून जातो. _/\_
5 Sep 2015 - 3:21 pm | सस्नेह
' अनामवीरा....' ही कविता आठवली !
5 Sep 2015 - 3:25 pm | कविता१९७८
लिखाण आवडल
5 Sep 2015 - 3:30 pm | पैसा
अप्रतिम लिखाण!
5 Sep 2015 - 4:50 pm | सुहास झेले
अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात
5 Sep 2015 - 4:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
सगळ्यांचे आभार मित्रहो!
5 Sep 2015 - 5:33 pm | एक एकटा एकटाच
जबरदस्त लिहिलय
खरच काय प्रतिसाद देऊ कळत नव्हत
Hat's off Sir..........
5 Sep 2015 - 9:40 pm | बोका-ए-आझम
छा गये!
5 Sep 2015 - 11:28 pm | नाव आडनाव
.
6 Sep 2015 - 9:12 am | santosh mahajan
निशब्द: निशब्द: निशब्द:
6 Sep 2015 - 9:43 am | दमामि
.....,,
6 Sep 2015 - 9:45 am | दमामि
जवानांचा मृत्यू नेहमीच मनाला चटका लावून जातो. असं लिहू नका हो भाऊ.
6 Sep 2015 - 10:15 am | पिलीयन रायडर
........
6 Sep 2015 - 2:30 pm | कोमल
कडक..
6 Sep 2015 - 3:22 pm | मार्मिक गोडसे
लेख आणि लेखावरील खरेसरांचा प्रतिसाद वाचुन गलबलुन आले.
6 Sep 2015 - 3:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय लिहावं कळत नाही.
-दिलीप बिरुटे
6 Sep 2015 - 3:42 pm | जव्हेरगंज
थरारक,,
आवडली.
6 Sep 2015 - 4:08 pm | नि३सोलपुरकर
निःशब्द....काय लिहावं कळत नाही.
6 Sep 2015 - 7:32 pm | बहुगुणी
माझा शेजारी मॅनी हा व्हिएटनाम war veteran आहे, त्यामुळे मला मधून मधून त्या युद्धाविषयी काही दुवे पाठवत रहातो. काल त्याने खालील व्हिडिओ पाठवला, with a note that "there is something Indian in it". कोलोरॅडो राज्यात डर्ट बायकिंग करणार्या एका महिलेला एका डोंगरावर अनपेक्षितपणे सापडलेलं हे बिन-सरकारी व्हियेतनाम युद्ध स्मारक, कुणी उभारलं त्याची कल्पना नाही, पण त्या युद्धातील सैनिकांच्या काडतुसं वगैरे खुणा स्मृती म्हणून लोकांनी आणून ठेवलेल्या दिसताहेत. विविध भाषांतले संदेश आहेत. व्हिडिओ पाहून सोन्याबापूंच्या या धाग्याची आठवण झाली. पूर्णच पहा, पण 3:25 चुकवू नका ….
6 Sep 2015 - 7:45 pm | मित्रहो
काही वर्षापूर्वी नागपूरला तरुण भारतात डॉ विनय वाइकर रक्तरंग सदराखाली युद्धकथा लिहायचे. त्यातल्या काही कथा आजही स्मरणात आहे. ती पोकळी जाणवते. तुम्ही मनावर घ्या.
6 Sep 2015 - 9:35 pm | मुक्त विहारि
सुन्न...
6 Sep 2015 - 10:09 pm | गामा पैलवान
सोन्याबापू,
तुमची कथा वाचली. प्रतिसाद काय द्यावा कळंत नाहीये. फक्त एव्हढंच जाणवतंय की हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. पण काय करायला पाहिजे त्यासाठी? माहीत नाही मला. तुम्हीच सांगा. एव्हढी सुन्नविषण्ण कथा सांगितलीत, तर हेही सांगा.
आ.न.,
-गा.पै.
7 Sep 2015 - 10:45 am | यमन
अकादमी पासून तुमचा पंखा आहे आपण .
प्रत्येक वेळी जेवताना पहिल्या घासावर तुमच्या आठवणीची मोहोर असते ,सैनिक बंधो !!!
अजून काय लिहू ?
7 Sep 2015 - 5:41 pm | gogglya
जरी तुम्ही काल्पनिक कथा म्हणत असाल तरी वास्तव याहून फार वेगळे नसावे.
अवांतरः डॉक्टर साहेब - अश्या विषण्ण मनस्थीती मधून स्वतःला कसे काय सावरायचे?
7 Sep 2015 - 6:59 pm | कैलासवासी सोन्याबापु
खरंय भाऊ, एकदा का रेजिमेंटचं मीठ खाल्लं का होते असे, सत्य खरेच काही वेगळे नसते, डॉक्टर साहेब बोलले आहेत वर एक आठवड्याअगोदर ज्याची ट्रीटमेंट करत होते त्याच्या फ्यूनरल सर्विस ला सेरेमोनियल घालुन हजर होणे कठीण असते फार, साली आर्मी चीजच वेगळी! इथे सामयिक प्रार्थनास्थळात असलेले धर्मगुरु, पंडित, मौलवी, भंते, फादर किंवा शिख सेवक ज्यांना डिफेन्स परलंस मधे लाडाने "पंडित महाराज" म्हणले जाते ते सुद्धा "५ विभाग में एलएमजी खोलना जोड़ना" वगैरे कारवाया सराइतपणे करतात अन प्रसंगी खांद्याला खांदे लावुन पोस्ट सुद्धा सांभाळतात :)
8 Sep 2015 - 1:02 pm | gogglya
जेव्हा सर्व सामान्य जनतेला होईल आणी त्यांच्या वागण्यातून ते दिसू लागेल तो सुदीन. मग भ्रष्ट राजकारणी, भ्रष्टाचार, बेईमानी ईत्यादी दुर्गुण आपोआप नाहीसे होतील. कधी कधी असे वाटते की सैन्य सेवा सर्वांना सक्तीची करावी [ ईस्राईल प्रमाणे ] जेणे करून एकीची भावना प्रखर होईल.
7 Sep 2015 - 6:43 pm | राजाभाउ
......
7 Sep 2015 - 6:50 pm | नया है वह
..
8 Sep 2015 - 11:59 am | समीरसूर
आपल्या लिखाणाचा चाहता आहे. सीमेवर सगळी संकटं झेलून, प्राणांची आहुती देऊन देशाचं रक्षण करणारे कुठल्या मातीचे बनलेले असतात? ती माझी माती नक्कीच नव्हे. मी (आणि माझ्यासारखे कोट्यवधी) पावसाचे चार शिंतोडे आले की सैरावैरा धावत सुटतो दुसऱ्या दिवशीच्या वाहत्या नाकाला आणि फणफणणाऱ्या तापाला घाबरून! आणि बापुडवाणे चेहरे करून बसतो धरणं नाही भरली तर प्यायला पाणी मिळेल की नाही या चिंतेने ग्रासल्यावर! असो. सामान्यांची झेपही सामान्यच!
आपल्याला लिखाणाची हुकुमी कला अवगत आहे. आपण पुस्तकलेखनाचा विचार करावा. आणि असेच लेख अजून येऊ द्यावेत ही विनंती.
8 Sep 2015 - 2:58 pm | बॅटमॅन
..........
न्याय देऊ शकेलशी प्रतिक्रिया नाही सुचली.
8 Sep 2015 - 4:28 pm | कैलासवासी सोन्याबापु
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!
समीरसूर भाऊ, मी शिपाईगड़ी आहे हो हे आपले उगाच हौशी लेखन करतो, इन ऑल पॉसिबिलिटी जेव्हा लेखक व्हायचे म्हणुन लिहेन तेव्हा आमची शिस्त त्यात ही उतरेल अन लेखन मोनोटोनस होईल, आम्ही असेच बरे! कौतुका साठी धन्यवाद!
8 Sep 2015 - 4:31 pm | बॅटमॅन
असं काय नाही सोन्याबापूसाहेब! आत्ताच नव्हे पण पुढे कधीतरी हे सगळे लिहून ठेवायचे डोक्यात असूद्यात. भारतीय समाजाचे एक वाईट्ट वैशिष्ट्य म्हणजे जातीव्यवस्था, ते सगळीकडेच दिसते. साहित्यात त्याचे प्रतिबिंब फार जास्त जाणवते, जरी अलीकडे व्हरायटी असली तरी मोनोटोनी प्रचंड आहे. त्यातच मिलिट्री पेशातल्यांनी लिहिलेली पुस्तके खूप कमी आहेत. तुम्ही मनावर घेतले तर व्हरायटी अजून ०.०१% ने वाढेल त्यात समाजाचा फायदाच आहे.
9 Sep 2015 - 12:09 pm | gogglya
+१११११११११११
9 Sep 2015 - 6:09 pm | कोमल
अगदी.. हेच म्हणते
9 Sep 2015 - 1:42 pm | चिनार
सुंदर लेख !
बापूसाहेब…सलाम स्वीकारावा !
9 Sep 2015 - 7:20 pm | सिरुसेरि
माझी शिपाईगिरी - हे ले. जन. एस.पी. थोरात यांचे पुस्तक खुप गाजले आहे. तुमचेही पुस्तक तसेच गाजणार हे नक्की .
9 Sep 2015 - 8:47 pm | खटपट्या
सलाम !!
10 Sep 2015 - 8:05 am | हेमंत लाटकर
सोन्याबापू छान लिहले. निशब्द झालो.
10 Sep 2015 - 12:41 pm | माधुरी विनायक
फार काही लिहिता येणार नाही.
रारंग ढांग आठवले.
13 Sep 2015 - 5:29 am | अनन्त अवधुत
काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही.
इतरांसाठी स्वत:चा जीव धोल्यात घालणाऱ्या सगळ्यांनाच सलाम.