भीती वाटे कुणाला?

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
27 Aug 2008 - 8:42 pm

'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले.

अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत, त्यात स्वत: त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचाही समावेश आहे. त्यामुळे त्या सिनेमाच्या मूळ प्रिंट्स जाळून टाकल्या गेल्या व त्याच कथेवर नवीन सिनेमा पुन्हा त्याच नावाने बनविण्यात आला.

आमच्या लहानपणी भूताचे सिनेमे पाहताना जरी भीती वाटत नसली तरी रात्री झोपताना थोडीफार भीती वाटायचीच. तशात कधी कधी माझी बहिणही मुद्दाम घाबरवत असे. घरीच व्हीडीओ प्लेयर असल्याने सुट्ट्यांमध्ये तर सिनेमे आणून पाहणे चालूच होते. भूताचे हिंदी चित्रपटही भरपूर पाहिलेत. काही वेळा आम्ही व्हीडीओ लायब्ररीत जाऊन भूताचे इंग्रजी सिनेमे देण्याची खास मागणी करत असू. जरी स्वत:हून भूताच्या सिनेमाची कॅसेट मागितली तरी एक-दोन चित्रपट आम्ही पूर्ण न पाहताच परतही केले होते. सुरूवातीला हे सर्व सिनेमे पाहताना भीती वाटायची. पण काही सिनेमात भूताचे(की राक्षस?) रूप पाहून काही वेळा हसूही येत असे. 'तहखाना' सिनेमात तर शेवटच्या मारामारीच्या वेळी भूत कोणाला तरी पायाने मारताना दाखविले तेव्हा त्याने कॅनवासचे बूट घातले असल्याचे आम्हाला वाटले होते. :) नुकताच येउन गेलेला ’भूलभूलैय्या’ सिनेमा प्रियदर्शनचे दिग्दर्शन, अक्षय कुमार व परेश रावल ह्यांचा सहभाग असल्याने बहुधा लोकांनी त्याला सुरूवातीपासूनच विनोदी सिनेमा गृहित धरला होता.

'फूंक' सिनेमा किती थरारक आहेत हे तर सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल, पण त्याकरीता सिनेमागृहात जाणे जमेल की नाही अंदाज नाही. मला वाटते की अशा प्रकारचे सिनेमे सिनेमागृहात पाहण्यातच जास्त मजा येते. मोठा पडदा, मध्येच दचकवण्याकरीता टाकलेला चढा आवाज ह्याने थोडेसे भयप्रद वातावरण तयारच असते. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की असले चित्रपट चित्रपटगृहात जाउनच पहावेत.
आता भीती वगैरे काही वाटत नाही. पण सिनेमांतील काही प्रसंग जे पाहून खरोखरच भीती वाटली होती ते म्हणजे,
'वीराना': ह्यातील कारमध्ये बसलेल्या भूताचे पाय उलटे फिरविताना दाखविले होते. तो प्रसंग नंतरही काही दिवस मला घाबरवत होता.
'गहराई': एकदा रात्री दूरदर्शनवर दाखविला होता. तेव्हा मी सिनेमा पाहता पाहताच झोपी गेलो होतो. मध्येच जाग आली तेव्हा बहुधा पद्मिनी कोल्हापुरेच्या सिनेमातील दुहेरी आवाजाच्या प्रसंगामुळे भीती वाटली होती.
'राज' ह्या सिनेमात बिपाशा बसूला भूत प्रथम जेव्हा आरशात दिसलेले दाखविले तो प्रसंग भयप्रद वाटला होता.
'भूत' सिनेमात उर्मिला रात्री पाणी प्यायला जाते. परत येताना ती जेव्हा पायर्‍या चढून परत जाते त्यावेळी अचानक समोर भूत दाखविले तेव्हा खरोखरच दचकलो होतो.
लहानपणी ड्रॅकुलाचा कुठलासा इंग्रजी सिनेमा आणला होता. त्यात थोड्या सुरूवातीनंतर ड्रॅकुला जेव्हा शवपेटीचे झाकण उघडतो, तो प्रसंग पाहून तेव्हा का कोण जाणे आम्हाला एवढी भीती वाटली होती की आम्ही तो सिनेमा तेव्हाच बंद केला होता.

तुम्हालाही असे काही सिनेमे आठवतात का ज्यात, निदान तो सिनेमा पाहताना तरी, भीती किंवा कमीत कमी दचकणे तरी अनुभवले असेल?

मौजमजाचित्रपटअनुभवप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

मनिष's picture

27 Aug 2008 - 9:50 pm | मनिष

कुठे बघायचा म्हणे हा फूंक एकट्याने? रामगोपाल ला म्हणा पैसे ठेव तयार, मी बघतो!
थोडे दचकणे ठीक आहे, पण मी कुठल्या सिनेमाला खरच घाबरलो असल्याचे आठवत नाही.

प्रियाली's picture

27 Aug 2008 - 10:06 pm | प्रियाली

ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत, त्यात स्वत: त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचाही समावेश आहे. त्यामुळे त्या सिनेमाच्या मूळ प्रिंट्स जाळून टाकल्या गेल्या व त्याच कथेवर नवीन सिनेमा पुन्हा त्याच नावाने बनविण्यात आला.

मस्त लोणकढी आहे. या चित्रपटाचा डायरेक्टर अद्याप जिवंत आहे. ;)

असो,

हा खेळ सावल्यांचा प्रदर्शित झाला तेव्हा मी बरीच लहान होते. भयंकर भीती वाटली होती. विशेषतः माडाचे एक उंच झाड आमच्या घरातून दिसतं. नरसूचं भूत त्यावर राहात असावं अशी माझी कल्पना होती. रात्री काळोखात एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जायचीही हिम्मत नव्हती.

तर हा चित्रपट मी पुन्हा दोन दिवसांपूर्वी पाहिला. मला वाटत होतं की जुना चित्रपट आता त्याची काय भीती वाटणार? पण तो पाहताना अनेक पैलू पुढे आले. चित्रपटाची कथा चांगली आहे. काही मेलोड्रॅमाटिक प्रसंग सोडले तर कथावस्तु सुरेख आहे. वेड्या जाईचा केस पिंजारून केलेला नाच अद्यापही अंगावर शहारे आणतो. आशा काळेनी रोजची रडूबाई सोडून शिव्या घालणारी मानसिक रुग्ण साकारणे म्हणजे हाईट. ही कथा सुमती गुप्तेंची आहे असे कळले तरी ती कुठल्या पाश्चात्य चित्रपटावरून घेतलेली आहे का काय असे वाटले.

आपल्या हातून खून झाला अशी अपराधी भावना बाळगल्याने कमकुवत मनाची तरूणी, आपल्या सावत्र आईचे, दिवाणजींचे, सावत्र मामाचे सगळे उद्योग माहित असलेली पण कुणाची साथ नसल्याने त्यांच्या संगतीत आयुष्य जगणारी आणि भूताचा संचार होतो आहे हे कळल्यावर कोलमडून पडलेली आणि त्या भरात अर्वाच्य शिव्या घालून सर्वांचे बिंग बाहेर आणणारी मुलगी मस्तच. चित्रपट बघताना काही प्रसंगात अजूनही अंगावर शहारा येतो.

कोणाला ही मूळ कथा कोणती हे माहित असल्यास कळवावे.

तरीही,

चित्रपटातील सर्वात भीतीदायक प्रसंगः डॉ. काशिनाथ घाणेकर केसांचा कोंबडा, तांबारलेले डोळे, बेल बॉटमची प्यांट, चार बटनं सुटलेला शर्ट, गळ्यात लटकणारं चमकदार लॉकेट घालून गोमू संगतीनं म्हणत तंगड्या उडवत नाचतात तो. हा प्रसंग पाहून दोन दिवस झोप लागली नाही. :(

जाता जाता: डरना मना है पाहिला होता आवडला म्हणून डिविडी विकत घेतली आहे. कधीतरी एकांतात पाहिन म्हणते. फूंकची डि व्ही डी येण्याची वाट बघते आहे. ;)

देवदत्त's picture

27 Aug 2008 - 11:04 pm | देवदत्त

या चित्रपटाचा डायरेक्टर अद्याप जिवंत आहे.
असेलही. मी तसे ऐकले होते.

त्या दिग्दर्शकाला म्हणावे माफ कर मला. :)
ह्या सिनेमाबाबत भरपूर काही इथे वाचायला मिळाले.
http://en.wikipedia.org/wiki/The_Exorcist_(film)
http://www.houseofhorrors.com/exorcist.htm

मूळ प्रिंट जाळल्या असे कोणत्या सिनेमाबाबत आहे का?

वर्षा's picture

30 Aug 2008 - 11:24 am | वर्षा

Exorcistचा विषय निघालाच आहे म्हणून...
Exorcist मागची खरी गोष्ट
-वर्षा

छोटा डॉन's picture

28 Aug 2008 - 7:55 pm | छोटा डॉन

डरना मना है पाहिला होता आवडला म्हणून डिविडी विकत घेतली आहे. कधीतरी एकांतात पाहिन म्हणते.

नका हो, एकांतात नका बघु.
घाबरायचे सोडा, पिक्चर बोर झाल्याने तुम्ही जर "गाढ झोपी" गेलात तर तो "टीव्ही आणि डीव्हीडी प्लेअर" बंद कोण करणार ?
फुकट ८-१० तास विजेचा अपव्याय होईल, लाईट किती महाग झाली आहे आता नाही !

हा खेळ सावल्यांचा प्रदर्शित झाला तेव्हा मी बरीच लहान होते. भयंकर भीती वाटली होती.

सहमत.
बहुतेक हा माझा आयुष्यातला पहिला भयपट. मराठीतुन असल्याने समजला व कदाचित त्यामुळेच भिती वाटली होती.
आता आम्ही पार निर्ढावलो आहोत, कश्शा कश्शाची म्हणुन भिती वाटत नाही.
हिंदी सिनेमात घाबरण्यासारखे काही नसते व इंग्रजी जास्त कळत नाही त्यामुळे "मनापासुन भिती" वाटत नाही.
काही वेळा किळसवाणे वाटते नक्की ...

अवांतर : परवाच "हॉस्टेल भाग १ व २" पाहिले, महाभयंकर हा एकच शब्द मी सांगु शकतो त्या सिनेमाबद्दल.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रियाली's picture

28 Aug 2008 - 8:08 pm | प्रियाली

घाबरायचे सोडा, पिक्चर बोर झाल्याने तुम्ही जर "गाढ झोपी" गेलात तर तो "टीव्ही आणि डीव्हीडी प्लेअर" बंद कोण करणार ?
फुकट ८-१० तास विजेचा अपव्याय होईल, लाईट किती महाग झाली आहे आता नाही !

कालच आली (ऑनलाईन मागवली होती) आता बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे. तसा, आधी पाहिला असल्याने बोर होणार नाही याची ग्यारंटी. पण आता आठवत नसल्याने पुन्हा पहावा म्हणते. त्यामुळे झोपी जाणार नाही. :)

आता आम्ही पार निर्ढावलो आहोत, कश्शा कश्शाची म्हणुन भिती वाटत नाही.

हा खेळ सावल्यांचा पुन्हा बघ हो! कशाची नाही तर डॉ. घाणेकरांना नाचताना बघून नक्की भीती वाटणार.
पण खरंच, या चित्रपटावर विचार करता त्यातील काही डायलॉग्ज आणि प्रसंग भारी आहेत. अशा धर्तीवर नवा चित्रपट काढता येईल.

हिंदी सिनेमात घाबरण्यासारखे काही नसते व इंग्रजी जास्त कळत नाही त्यामुळे "मनापासुन भिती" वाटत नाही.

मग जपानी चित्रपट बघ (सबटायटल्ससह). सिरियसली, हल्ली सर्व इंग्रजी हॉररपट जपानी चित्रपटांवरून येतात. महाभयंकर कल्पना असतात या जपान्यांच्या. मनापासून भीती आणि किळस दोन्ही वाटते.

आगाऊ कार्टा's picture

28 Aug 2008 - 12:01 pm | आगाऊ कार्टा

"द रिंग" आणि "द रिंग २" हे चित्रपट कोणी पाहिले आहेत का?
या चित्रपटातील काही प्रसंग खूपच भितीदायक आहेत.
'फूंक' हा भयपट नसून तो एक फसलेला विनोदी चित्रपट आहे.

घाटावरचे भट's picture

29 Aug 2008 - 3:01 am | घाटावरचे भट

वरिजिनल जपानी 'द रिंग' पहा...विंग्रजी 'द रिंग' पेक्षा १० पट जास्त भीतीदायक आहे...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

तात्या विंचू's picture

28 Aug 2008 - 7:04 pm | तात्या विंचू

आख्खी रिंग सीरिज फालतू आहे असे माझे ठाम मत आहे...
आत्तापर्यंत कुठलाही भयपट मला भितीदायक वाटला नाही...
त्यातल्या त्यात १४०८ बरा वाटला...
'फूंक' अजुन बघायचा आहे..बघूया वेळ मिळाला की.....

सुचेल तसं's picture

29 Aug 2008 - 8:53 am | सुचेल तसं

राम गोपाल वर्माचाच पहिला भयपट "रात". हा खरोखरच भयानक होता. रेवतीचा अभिनय तर एकदम भारी. ७-८ वेळा पाहिल्यानंतर आता कुठे जरा भिती कमी झाली. नाहीतर आधी घरात एकटा असताना कधी "रात" लागला की पहायला भिती वाटायची. त्यातले खास प्रसंग म्हणजे-

१) रेवती आणि तिचा मित्र बाइकवर एका ठिकाणी हिंडायला जातात. तिथे बाइक पंक्चर होते (किंवा पेट्रोल संपतं असं काहितरी) आणि तिचा मित्र तिला तिथेच थांबायला सांगून एकाला लिफ्ट मागतो आणि टायर दुरुस्त करायला जातो. जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याला रेवती दिसत नाही. तिला शोधत शोधत तो आतमधे झाडीत जातो आणि एका तळ्यापाशी ती गुडघ्यात मान घालून बसलेली दिसते - रडताना. तिला हाका मारतो तरी ती वर बघत नाही. शेवटी तिला हात लावतो तेव्हा ती वर बघते. हा संपुर्ण सीन जबरदस्त घेतला आहे.

२) रेवती ज्या घरात रहात असते तिथे आधी एका बाईचा खुन तिच्या नवर्‍यानेच केलेला असतो आणि तिचं भूत तिथे वावरत असतं. फ्लॅशबॅक मधे असं दाखवतात की तो एकदा झोपला असताना अचानक पलंगामधुन एकदम दोन हात येतात आणि त्याला मारुन टाकतात.

३) रेवती एकदा एका समारंभाला जाते. तिथे सगळ्यांशी बोलता बोलता अचानक तिच्या अंगात त्या बाईचं भूत शिरतं. ती तशीच गच्चीवर जाते. ते पाहून तिची खास मैत्रिण ही कुठे चालली ते बघायला जाते. ही हाका मारत तिच्या पाठीमागे जाते तेव्हा रेवती पाठमोरी असते. मग हळूहळू रेवती मागे वळते आणि तिच्या मैत्रिणीची मान काडकन मोडते.

४) रेवती सापडत नाही तेव्हा तिचा मित्र तिला शोधत शोधत एका क्लासरूम मधे जातो तो सीन.

५) चित्रपटाच्या शेवटी ओम पुरी (मांत्रिक) आणि रेवतीचा मित्र घराखालील भुयारात त्या भुताला शोधायला जातात आणि एका वळणानंतर अचानक ती बसलेली दिसते. लाल साडीत.

एकूणच हा चित्रपट एक सुंदर भयपट आहे. :-) जेवढे श्रेय राम गोपाल वर्माच्या दिग्दर्शानाला तेवढेच श्रेय रेवतीच्या अफलातून अभिनयाला.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

देवदत्त's picture

30 Aug 2008 - 2:43 pm | देवदत्त

रात हाही मस्त सिनेमा होता.
त्यानंतर 'भूत' मध्ये रामगोपाल वर्माने 'रात' मधील दोन तीन प्रसंग पुन्हा वापरले होते.
'रात' मध्ये मैत्रीणीची मान मोडलेली. 'भूत' मध्ये वॉचमन ची.
'रात' मध्ये सुरूवातीला रेवतीला थियेटर मध्ये एकटा असल्याचा भास होतो, तसेच 'भूत' मध्ये ही दाखवले आहे, नेमके आठवत नाही पण बहुधा उर्मिला ला समुद्रकिनार्‍यावर दाखविले आहे.
आणखी आहेत बहुधा. सिनेमा पाहताना आठवत होते, आता नाही. :)

जेवढे श्रेय राम गोपाल वर्माच्या दिग्दर्शानाला तेवढेच श्रेय रेवतीच्या अफलातून अभिनयाला.
सहमत.