द्वेषाची खाई....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Aug 2015 - 7:49 am

टिळकांच्या मृत्युनंतर जो खास अंक इंदूप्रकाशने काढला, त्यातील "प्रकाशकाचे दोन शब्द" येथे टाईप करुन टाकतो आहे कारण फोटोमधील अक्षर फार लहान येते व वाचता येत नाही. हे टाकायचे कारण म्हणजे त्यावेळेस सामाजिक व राजकीय वातावरण किती प्रगल्भ व विचारी होते हे समजते. आत्ताच्या जाणत्या राजांबद्दल काय बोलावे ? स्वत:च्या झेंड्याखाली चार टाळकी जमविण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. मग महाराष्ट्रावे वाटोळे झाले तरी चालेल अशी परिस्थिती आहे....असो...

अग्रलेख :
लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर त्यांनी बजावलेल्या देशसेवेच्या ऋणांतून काही अंशी उतराई व्हावे, अशा उद्देशाने आह्मी ‘‘टिळक गुणकलाप’', या नावाने इंदुप्रकाशचा खास जादा अंक काढण्याचे जाहीर केल्ल्याला आज महिना होऊन गेला. हे काम करण्याचे मनांत आणले तेव्हा त्याच्या विस्तारासंबंधी आधी केलेला अंदाज प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झल्यानंतर चुकीचा ठरण्याची चिन्हे दिसू लागली; व प्रकाशनाचा पूर्वी प्रसिद्ध केलेला दिवस लांबणीवर टाकीत टाकीत अखेरीस पांच आठवड्यांच्या कालावधीशिवाय हे काम मनाजोगे वठणार नाही, अशी मनाची खात्री झाली; आणि शेवटी आह्मांस रविवार ता. १२ सप्टेंबर ही तारीख मुक्रर करणे भाग पडले. या दरम्यानच्या काळात आमच्याकडे इंदूच्या वाचकांकडून व हितचिंतकांकडून अनेक उपयुक्त सूचना आल्या व त्या सर्वांतील ग्राह्यांशानुसार या जादा अंकाची रचना करण्या आह्मी प्रयत्न चालविला. परंतु आज वाचकांच्या हवाली करीत असलेला हा जादा अंक, मन रिझावेच इतका पसंत झाला आहे असे आह्मास तरी वाटत नाही. यापेक्षा अधिक सरस वाङ्मय खास अंकाच्या रुपाने वाचकांस अर्पण करावे, असा आमचा उद्देश होता. तथापि आमचा वाचकवर्ग आहे त्यातच आपल्या प्रेमौदार्यानें सर्व गोड मानून घेईल, अशी आह्मांस उमेद आहे.

दुसरी गोष्ट अशी की, आमचे व आमच्या साह्यकर्त्यांपैकी काहींचे शारीरिक अस्वास्थ्य, व बाहेरुन होणाऱ्या कामांत अनपेक्षितपणे उत्पन्न झालेली विघ्ने, अशा कारणांमुळे या अंकासाठी मजकुराची छाननी जशी व्हावी तशी करण्यास वेळ मिळाला नाही. खास अंकासाठी अनेक कवींनी व लेखकांनी आपले गद्यपद्यमय लेख आमच्याकडे पाठविण्यास प्रारंभ केला, व त्या क्रमाला अजूनपर्यंत खळ पडलेला नाही. आम्ही अंकप्रकाशनाची मुदत या लेखामुळेच वाढविली; पण मुदत वाढली तसे लेखही वाढले, आणि ते सारे प्रेमभक्तिने आलेले, त्यात निवडानिवड काय करायची ? परवापर्यंत ज्यांचे जसे लेख आले तसेच ते छापले आहेत; त्यातील कित्येकांत अंतर्बाह्य सौष्टवाच्या दृष्टीने दोष आहेत; परंतु त्या सर्वांचा टिळकांविषयीच्या प्रेमस्फुरणाने जन्म झाला आहे, ही एकच गोष्ट वाचक ध्यानी घेतील अशी आह्मांस खात्री आहे.

या अंकातील ‘आठवणींचा भाग’ टिळकांच्या चरित्रकारांना निरंतर उपयोगाचा होणारा आहे. सामान्य वाचकांसही त्याच्यापासून मनोरंजनपुरस्सर बोध घेण्यास हरकत नाही. आह्मास कै. लोकमान्यांच्या चरित्राची साधने जेव्हा उपलब्ध होऊ लागली, तेव्हा प्रस्तुत अंकाचे काम उरकल्यावर टिळकांचे एखादे सर्वांगपूर्ण चरित्र प्रसिद्ध करावे असेही आमच्या मनात आले. आम्ही मागे एकदा इंदूच्या अंकात ‘टिळकांचे चरित्र कोणी लिहावे ?’ या वादावर लिहितांना टिळकांचे चरित्र लिहिण्यास सर्वतोपरी लायक अशा दोनच व्यक्ति आहेत असे लिहिले होते. श्री. नरसोपंत केळकर आणि श्री कृष्णाजीपंत खाडिलकर या त्या दोन व्यक्ति होत. श्री नरसोपंतांनी टिळकांचे चरित्र लिहिण्याचा विचार जर जाहीर केला नसता, तर आह्मी आमचा यासंबंधी वर व्यक्त केलेला मनोदय सिद्धीस नेण्याच्या मार्गाला लावणार होतो; पण श्री. नरसोपंतांचा विचार लोकांसमोर आल्यामुळे त्यांनांच या कामी यथाशक्ति साह्य करणे आम्हांस प्रशस्त वाटले, आणि आमचा मूळचा विचार आम्ही बाजूस ठेवला. ज्यांना टिळकांविषयी काही उपयुक्त माहिती असेल त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा श्री. नरसोपंत यांस देऊन लोकमान्यांचे जीवनचरित्र उत्तम सजविण्याचा प्रयत्न करावा, अशीच आमची टिळकभक्तांस प्रेमाची सूचना आहे.

कै. लो. बळवंतरावजी टिळक व इंदूप्रकाश यांचा सार्वजनिक व सामाजिक अशा काही बाबतीत तीव्र मतभेद असतानाही लो. बळवंरावजींच्या निधनानंतर इंदूप्रकाशांत त्यांच्याविषयीचे उत्कट प्रेम प्रकट केले जात असल्याने पुष्कळांस आश्र्चर्य वाटत आहे. कै. बळवंतरावजीचा प्रेमानुबंध कसा होता, याचे थोडेसे दिग्दर्शन पूर्वी आह्मी केले होते. ज्यांच्या अवलोकनात ते आले असेल त्यांना आह्मी करीत असलेल्या अथवा केलेल्या टिळकांच्या गुणानुवादाचा चमत्कार वाटण्याचे कारण नाही. सार्वजनिक कार्यांत ज्यांचा आपसांत मतविरोध असतो, ती माणसे खाजगी बाबतीतही एकमेकांमधून विस्तव जाऊ देत नसावीत, या भ्रामक समजुतीमुळे लोकांना इंदूने चालविलेल्या टिळकांच्या गुणानुवादाचा विस्मय वाटत आहे, परंतु ही समजूत भ्रामक आहे. कै बळवंतरावांचा व इंदूच्या सध्याच्या चालकाचा परस्परस्नेहाचा संबंध कसा होता हे वाचकांच्या निदर्शनास यावे म्हणून थोडासा मागील इतिहास येथे सदर करणे जरुर आहे.

इ.स. १८८२ साली बर्वेप्रकरण उपस्थित होऊन कै. आगरकर व कै. टिळक यांस न्यायकोर्टाने शिक्षा सुनावली, त्याच वेळी छत्रपतींकरीता कारागृहवास पत्करणा्र्‍या या दोन राष्ट्रविभूतींच्या ठायी वसत असलेली मूर्तिमंत निस्वार्थ राष्ट्रसेवा लोकांच्या निदर्शनास आली; आणि प्रस्तुतच्या इंदूच्या चालकांचे ठायी त्यांच्या अढळ शौर्याबद्दल अपूर्व प्रेम व आदर उत्पन्न झाला; आणि १०१ दिवसांचा कारागृहवास पूर्ण होताच मोठ्या थाटाने त्यांचा गौरव करावा असा निश्र्चय कै. रा, ब. लोखंडे प्रभृती मंडळीच्या साह्याने ठरविला. डोंगरीच्या तुरुंगातून या विभूतींची सुटका होण्याचा दिवस निश्र्चित होताच, भायखळा, डोंगरी, या भागातील लोकांची सभा करुन त्याच्यांत या विभूतींच्या स्वागताची जागृती त्यांनी उत्पन्न केली, तुरुंगातील अधिकार्‍याची भेट घेतली आणि सुटकेच्या त्या शुभदिवशी सूर्योदयापूर्वीच हजारो लोकांसह तुरुंगाच्या दारापाशी ते मित्रासह हजर झाले. बरोबर नेलेले पोषाख उभयतांवर चढवून त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातले आणि भव्य घोड्यांच्या सुंदर रथात बसवून त्यांची मिरवणूक काढली. वेळ सूर्योदयापूर्वीच होता, तरी हजारो लोकांचा समूह त्यांच्या स्वागतार्थ लोटला होता. ब्यांड, भजनी मेळे, लेझमीचे आखाडे, दांडपट्टे इ, विविध जनांनी दशदिशा दणाणून सोडल्या होत्या, व अनेक स्त्रीपुरुषांकडून त्यांजवर पुष्पवृष्टी होत होती. सारांश प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग नसतानाही, कोल्हापूर प्रकरणांत छत्रपति सरकारच्या हिताकरीत शेवटपर्यंत जे निश्चल धैर्य त्यांनी दाखविले, हीच पहिली गोष्ट त्यांच्याविषयी बहुजनसमाजांत व आम्हांत अपूर्व आदर उत्पन्न करण्यास कारण झाली; व पुढे कार्यकारणपरत्वे हा आदर वाढत जाऊन बडोद्यातील बापट प्रकरण, १८९६ मधील पहिला राजद्रोहाचा खटला, इ. निमित्ताने परस्परविषयीचा स्नेहभाव इतका वाढला की त्याची परिणति निकट व निष्कपट प्रेमाच्या मित्रत्वात झाली.

इंदूचे मूळ संस्थापक कै. न्या. मू. महादेव गोविंद रानडे हे होत. रा.सा. रानडे यांनी लावलेला हा इंदूप्रकाशरुपी वृक्ष कै. सखाराम पंडिताच्या मृत्यूनंतर जेव्हा कोमेजण्याच्या मार्गास लागला, तेव्हा त्यांच्या आग्रहावरुन इंदूच्या जोपासनेची कामगिरी १८९९त आम्ही शिरावर घेतली. कै. रा.सा रानडे यांच्या व कै. बळवंतरावजी टिळक यांचा सामाजिक कार्यासंबंधी जरी अति तीव्र मतभेद असे, तथापि लो. बळवंतरावजी टिळक यांच्या अपर्व बुद्धिमत्तेबद्दल ते त्यांचे कौतुक करीत असत, आणि कै टिळक हेही रावसाहेबांस गुरुस्थानी मानून सार्वजनिक महत्वाचे काम रावसाहेबांचा सल्ला घेतल्यावाचून करीत नसत. कै. न्या. रानडे यांच्या निधनप्रसंगी केसरीत बळवंतरावजींनी लिहिलेला लेख किती कळकळीचा व ह्रदयद्रावक होता, तो ज्यांच्या पहाण्यात आला असेल त्यांस न्या. मू. रानडे यांची ठायी कै. बळवंतरावजींची भक्ति किती अपूर्व होती हे दिसून आलेच असेल. त्याचप्रमाणे रा. सा. रानडे यांचे ठायी कै. बळवंतरावांविषयी किती आदर वसत होता, त्यासंबंधाने एकदोन आख्यायिका या जादा अंकात दुसरीकडे दिल्या आहेत त्यावरुन वाचकांच्या लक्षात येईलच. शिवाय हल्लीच्या चालकाचा व लोकमान्यांचा तर सन १८८२ सालापासून जो स्नेहभाव जडला होता तो उत्तरोत्तर इतका वाढत गेला की, अनेक आणीबाणीच्या प्रसंगी परस्परांनी परस्परांस साह्य करुन परस्परांविषयींचा आदर व्यक्त केला आहे. सुरत कॉंग्रेसच्या बखेड्यानंतर सन १९०८ साली कै बळवंतरावजींवर जो राजद्रोहाचा खटला झाला होता, त्यावेळी ते स्वत: आपले काम चालवीत होते. ज्युरीपुढे आपण करीत असलेला समारोप लगेच छापून त्याची एक एक प्रत ज्युरर मंडळीस देण्यात यावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु लोकमान्यांविषयी सरकारचा कटाक्ष आहे, अशा समजुतीने कोणी छापखाना हे काम करण्यास तयार होईना इतकेच नव्हे, तर एका छापखान्याने हाती घेतलेले हे काम ऐन वेळी भीतीने परत केले. अशा आणीबाणीच्या प्रसंगी बळवंतरावजींनी इंदूप्रकाशच्या चालकाकडे शब्द टाकला, आणि ते काम कसल्याही भिडेची पर्वा न करिता लोकमान्यांच्या इच्छेप्रमाणे इंदूने करुन दिले. सांगावयाची गोष्ट इतकीच की १९०७ साली सुरतेस कॉंग्रेसचा जो बखेडा झाला होता, त्यासंबंधात इंदूने कै. बळवंतरावजींवर आणि केसरीने इंदूवर टीकेचा कडेलोट केला होता. अशा वादविवादाच्या प्रसंगानंतर इंदूप्रकाश आपले काम करील की नाही अशी शंका बलवंतरावजींच्या निकट स्नेही मंडळीस वाटत होती, परंतु कै. बळवंतरावजींच्या अंत:करणांत इंदूच्या निष्कपट स्नेहाची ज्योत जागृत असल्याने त्यांनी ती आणीबाणीची कामगिरी हक्काने इंदूसच सांगितली; आणि स्नेही मंडळींच्या शंकेचे निरसन केले. तात्पर्य कांही बाबतीत सार्वजनिक मतभेदांमुळे टीका करण्याचे प्रसंग जरी आले असले, तरी कै. बळवंतरावजी टिळक यांच्या अंगी असलेल्या अनेक थोर गुणांबद्दल कै. रानड्यापासून प्रिन्सिपाल पाध्यांपर्यंत इंदूच्या प्रत्येक संपादकाच्या व चालकाच्या ठायी प्रेमयुक्त आदरभाव वसत होता, हे सन १८९७ व १९०८ साली बळवंतरावजीं विरुद्ध कोर्टाने दिलेल्या निकालासंबंधाने इंदूत जे कळकळीचे अग्रलेख आले होते, त्यावरुन दिसून आलेच आहे. आणि सांप्रतच्या चालकाचे ठायी तर तो मूळापासूनच वसत आहे. शिवाय योग्य प्रसंगी थोर पुरुषाच्या योग्य गुणांचा गौरव करणे, हा एक कृतज्ञतेचा मार्ग सर्वांसच मोकळा आहे. कै. टिळकांसारख्या देशकार्यधुरंदर निस्सीम भक्ताच्या गुणांचे गोडवे तरुण पिढीपुढे ठेवून त्यांस कर्मतत्पर करणे हे एक महत्वाचे देशकार्य आहे, अशी आमची प्रामाणिक समजूत आहे. या समजूतीस अनुसरुन आमच्या निष्कपट प्रेमाचे द्योतक म्हणूनच आज ‘टिळक-गुण-कलाप’ रुपाने इंदूचा जादा अंक वाचकांच्या सेवेत आह्मी सादर करीत आहो.

वरील विवेचनावरुन इंदूप्रकाश व कै बळवंतरावजी टिळक यांचा परस्पर संबंध किती निष्कपट स्नेहयुक्त व आदरचा होता हे वाचकांच्या सहज लक्षात येईल. ‘व्यक्ति तितक्या प्रकृती’ हा न्याय, संगति, शिक्षण, परिस्थिती आणि विचारपद्धती या कारणांमुळे दोन व्यक्तींचा सार्वजनिक कार्यांत कितीही उत्कट मतविरोध असला तरी खाजगीरीतीने त्यांच्या प्रेमावर विरजण पडत नाही, आणि ती एकमेंकांस साह्य करण्यात कचरत नाहीत. वृत्तपत्रांतील, सभांतील, विरोधी वादामुळे वाद करणाऱ्या व्यक्तीचे खाजगी वैमनस्य सदैव असतेच, अशी कल्पना करुन घेणे हा निव्वळ भ्रम आहे; व त्या भ्रमाने इंदूप्रकाश दाखवीत असलेल्या टिळकासंबंधी प्रेमाच्या बुडाशी काहीतरी विलक्षण क्रांती असली पाहिजे, असा तर्क करणे, अगदी चुकीचे आहे. टिळकांच्या लोकोत्तर चारित्र्यामुळे त्यांच्या विषयी मनांत अहोरात्र द्वेषाची खाई जळत ठेवणारा अभागी प्राणी हिंदुस्थानात सापडणे शक्य नाही. त्यांच्या गुणाची प्रस्तुत संपादकाप्रमाणे प्रत्यक्ष ओळख व पारख करण्याचा ज्यांस प्रसंग आला असेल, त्यांच्या मनात प्रेमादराशिवाय दुसऱ्या भावनांचा उगम होणे अगदीच असंभाव्य आहे हे वेगळे सांगणे नको.

असो, वर दिलेल्या थोड्याशा हकिकतीवरुन कै. लो. बळवंतरावजी टिळक यांचा व इंदूच्या संस्थापकांचा परस्पर निकट स्नेहादराचा संबंध कसा होता, राष्ट्रकार्य हे एकच ध्येय उभयतांचे ठायी कसे जागृत होते, आणि कै. टिळकांच्या खऱ्या योग्यतेची जाणीव इंदूस किती होती हे वाचकांच्या लक्षात सहज येण्यासारखे आहे. ज्यांचे लक्ष कार्याकडे असते, त्यास खरा कार्यकर्ता असा योद्धा रणांत पडला असता आपली व आपल्या कार्याची हानि किती मोठी झाली, याची जाणीव तत्काल होते, व ती भरुन काढण्यासाठी गत झालेल्या कर्तृत्ववान पुरुषांचे अंगचे गुण भावी तरुण पिढीपुढे ठेवून या नवीन पिढीत जागृति उत्पन्न करण्याचा मार्ग सुलभ करुन देणे त्यास जरुरी भासते. टिळक-गुण-कलापाचे जननही त्याच हेतूचे आहे. कै. लो. बळवंतराव टिळक यांच्या ठायी जे अनेक अमुल्य गुण वसत होते, त्या गुणांपैकी एकेक गुणाचे जरी तरुण पिढीने अनुकरण केले, आणि नि:स्वार्थ बुद्धीने व सोज्वल चारित्र्याने ही राष्ट्रनौका पुढे ढकलली, तरी खात्रीने कै. महर्षी रानडे, ना. गोखले व लो. टिळक यांच्या ऋणांतून अंशत: तरी आपण मुक्त होऊ शकूं. सारांश इंदूप्रकाशच्या जादा अंकाच्या रुपाने जनन पावलेल्या या टिळक-गुण-कलाप इष्ट हेतू लक्षात घेवून वाचकवर्ग त्याचा योग्य उपयोग करुन घेतील, असा भरंवसा ठेऊन हे दोन शब्द येथे पुरे करतो.
समाप्त.....

समाजात द्वेशाची खाई जळत ठेऊन त्या धगेवर आपला स्वार्थ साधून घ्यायचा हे आजच्या संधीसाधू पुढार्‍यांचे आवडते काम. पण हिटलर आणि त्याची नाझी पार्टी शेवटी असल्याच एका खाईत कडेलोट हो‍ऊन नाश पावली हे या पुढार्‍यांनी विसरता कामा नये. नाहीतर तेही याच खाईत जळून नष्ट होणार हे विधिलिखीत आहे....

जयंत कुलकर्णी.

समाजलेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

19 Aug 2015 - 8:56 am | श्रीरंग_जोशी

समायोचित लेखन.

हा अग्रलेख प्रथमच वाचण्यास मिळाला. यासाठी मनःपूर्वक आभार.

एस's picture

19 Aug 2015 - 10:12 am | एस

समयोचित लेख आहे. सध्याच्या सामाजिक विवेकवादाच्या घसरत्या आलेखाकडे नजर टाकली तरी अस्वस्थ व्हायला होते!

यशोधरा's picture

19 Aug 2015 - 10:20 am | यशोधरा

हेच म्हणते!

सुधीर's picture

19 Aug 2015 - 10:32 am | सुधीर

वैचारिक मतभेद असले तरी कटूता नव्हती, उलट एकमेकांविषयी आदरच होता. चांगलं वाटलं वाचून.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Aug 2015 - 10:46 am | प्रकाश घाटपांडे

लेख आवडला.वैचारिक मतभिन्नतेची परिणिती जेव्हा वैयक्तिक संबंध बिघडण्यात होते तेव्हा मला पुर्वी आश्चर्य वाटत असे. पण मेंदुच्या जडणघडणीचा तो अपरिहार्य परिणाम आहे असे लक्षात येउ लागले. विवेक जागृत ठेवताना स्वत:शी किती संघर्ष करावा लागतो हे अनेकांना जाणवत असेल. शब्द हे शस्त्र असते ते जपून वापरावे याचे भान बाळगणे अवघड आहे पण अशक्य नाही. टिळक आगरकरांच्या वादामधे खरोखरच मत भिन्नता राखून परस्परांचा आदर व अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर हा शेवटपर्यंत खराच टिकला का? हा मला प्रश्नच पडतो.मृत्यूनंतर वैर संपते अशा तत्वाने वागणे हा भाग प्रगल्भते बरोबर चाणक्यनीताचाही असतोच. सहानुभूतीच्या लाटेत वेगळा सूर लावणे आत्मघातकी ठरु शकते याचे भान सुजाण लोकांना असतेच. यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं। ना चरणीयं ना करणीयं। अनेक विद्वानांना आपले स्पष्ट व परखड मत व्यक्त करणे अवघड जाते. मग ते मौन बाळगणे पसंत करतात किंवा सुरात सुर मिळवण्याची तडजोड करतात.

विकास's picture

19 Aug 2015 - 10:36 pm | विकास

वैचारिक मतभिन्नतेची परिणिती जेव्हा वैयक्तिक संबंध बिघडण्यात होते तेव्हा मला पुर्वी आश्चर्य वाटत असे.

टिळक-आगरकर हे दोघेही ध्येयासक्तीने झालेले मित्र होते त्यामुळे एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा या जास्त असू शकतात. तरी देखील राजकारणातील प्रभावामुळे असेल पण आगरकरांवर मृत्यूलेख लिहीताना कुणाच्या सुरात सुर मिसळण्याची गरज नव्हती. तसेच १९०८ साली इंदूप्रकाशला टिळकांना त्यांच्या प्रति छापण्याची मदत करण्याची गरज नव्हती. इतरांनी मदत केली नाही तशीच त्यांनी केली नाही इतकेच अप्रकाशीत इतिहासात राहीले असते. तेच वरील लेखात म्हणल्याप्रमाणे, टिळक न्या. रानड्यांकडे सल्ला घेण्यास जात या संदर्भात म्हणता येईल...

फास्टफॉरवर्ड करूयात...

प्रमोद महाजन गेले त्यावेळेस त्यांच्याशी राजकीय विरोध असलेले कितीजण भेटायला गेले होते हे पहाता येईल. तेच उदाहरण अजून ठळकपणे बाळासाहेब ठाकर्‍यांच्या निधनसमयी.... पवार तात्काळ त्यांच्या घरी गेले होते. त्यांचे एरवी कौटूंबिक संबंध असायचे हे देखील कायम दोन्हीकडून सांगितले गेले आहे.

हे कधी होत नाही?

जेंव्हा आदर्शाची नशा चढते आणि आम्ही म्हणजेच शहाणेम्हणत इतरांच्याभावी एक तुच्छ भाव येतो तेंव्हा. ते जेथे जेथे होते तेथे तेथे तुम्ही म्हणता तसे त्याची परिणिती जेव्हा वैयक्तिक संबंध बिघडण्यात होते.

अनुप ढेरे's picture

19 Aug 2015 - 10:50 am | अनुप ढेरे

आवडला लेख! धन्यवाद.

जेपी's picture

19 Aug 2015 - 10:53 am | जेपी

लेख आवडला.

छान लेख. या सम्पादकांचं नाव काय?

तिमा's picture

19 Aug 2015 - 11:42 am | तिमा

लेख उचित मूल्ये सांगणारा. समयोचित!

त्यामधील किती मंडळींना हा लेख वाचून काही बोध होईल ?

पैसा's picture

19 Aug 2015 - 2:29 pm | पैसा

आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी अशा सर्व महात्म्यांबद्दल उणेदुणे बोलणे आणि विषारी अपप्रचार हे हल्ली जाणीवपूर्वक केले जाते. या लेखातील भावना या मंडळीला कळली तरी वळणे अशक्य आहे.

प्यारे१'s picture

19 Aug 2015 - 3:39 pm | प्यारे१

उत्तम लेख.
तपशील बदलतात, तत्त्वं कालातीत असतात, राहतील.

प्रचेतस's picture

19 Aug 2015 - 6:43 pm | प्रचेतस

उत्कृष्ठ अग्रलेख.
आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुम्हास खूप खूप धन्यवाद.

रामपुरी's picture

19 Aug 2015 - 8:43 pm | रामपुरी

हेच म्हणतो

उत्कृष्ट अग्रलेख.अगदी समयोचित!

विकास's picture

19 Aug 2015 - 10:17 pm | विकास

खुप खुप धन्यवाद!

टाकला आहेत त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.

टिळक आणि अगरकर यांच्यातही टोकाचे मतभेद झाले. अगदी दूषणे देऊन एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत वेळ गेली परंतु वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी आगरकरांचे अकाली दु:खद निधन झाल्यानंतर टिळकांनी केसरीत जो अग्रलेख लिहिला होता त्याला तोड नाही. वैचारिक मतभेद हे व्यक्तिगत द्वेषात परिवर्तित होऊ नयेत इतका विवेक आणि मनाचा मोठेपणा या दोन्ही गोष्टी सध्या इतिहासजमा झालेल्या दिसतात हे आपले दुर्दैव आहे.
पूर्वी परकी अक्रमकांनी आपलेच सरदार एकमेकांविरुद्ध उभे करुन मारवले. त्यानंतर इंग्रजांनीही तेच केले आणि आता आपले राजकारणीही आपल्याच लोकांना एकमेकांविरुद्ध उभे करवून मारवताहेत. आपण इतिहासापासून काही शिकलो नाही हे खरे आणि अशांना इतिहास धडा शिकवल्याखेरीज राहत नाही.
वाईट एका गोष्टीचे जास्त वाटते की सगळ्यांचीच पुढ्ली पिढी जी सध्या अगदी लहान आहे त्यांची सगळ्यांची यात होरपळ होणार आहे...:(

पण हिटलर आणि त्याची नाझी पार्टी शेवटी असल्याच एका खाईत कडेलोट हो‍ऊन नाश पावली हे या पुढार्‍यांनी विसरता कामा नये.

" काय, संबंधित जाणत्याकडून इतक्या अपेक्षा आपण ठेवू शकतो ??"

पगला गजोधर's picture

20 Aug 2015 - 4:57 pm | पगला गजोधर

‘व्यक्ति तितक्या प्रकृती’ हा न्याय, संगति, शिक्षण, परिस्थिती आणि विचारपद्धती या कारणांमुळे दोन व्यक्तींचा सार्वजनिक कार्यांत कितीही उत्कट मतविरोध असला तरी खाजगीरीतीने त्यांच्या प्रेमावर विरजण पडत नाही, आणि ती एकमेंकांस साह्य करण्यात कचरत नाहीत. वृत्तपत्रांतील, सभांतील, विरोधी वादामुळे वाद करणाऱ्या व्यक्तीचे खाजगी वैमनस्य सदैव असतेच, अशी कल्पना करुन घेणे हा निव्वळ भ्रम आहे;

मध्यंतरी, अगदी काहीच दिवसांपूर्वी (आजही अधूनमधून कुजबुज ऐकू येतेच )

सुभाषचंद्र बोस विरुद्ध महात्मा गांधी ,

पंडित नेहेरु विरुद्ध सरदार पटेल ,

महात्मा गांधी विरुद्ध डॉ आंबेडकर

अशी झुंज लावून देत होते काही लोकं, त्यांनीही ह्या लेखातून काही बोध घ्यावा.
उगाचच आपलं 'सरदार पटेल पंतप्रधान असते तर भारताचे चित्र काही वेगळेच (भव्यदिव्य अशा अर्थी ) दिसले असते ' अस म्हणून आपल्याला सोयीस्कर पत्रे, संधार्भातून, सोयीस्कर भाग गाळून/टाळून विष पसरवण्याचे कार्य पद्धतशीरपणे (इथे 'पद्धतशीरपणे' या शब्दावर विशेष लक्ष द्या बरे !) चालवलेलं आहे.

त्यामुळे लेखातील हायलाईटेड भाग खूपच महत्वाचा वाटला.

जयंत कुलकर्णी's picture

21 Aug 2015 - 8:05 am | जयंत कुलकर्णी

पगजी, तुमची अ‍ॅनलॉजी चुकली आहे....

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 11:15 am | पगला गजोधर

जयंतसर,
आपला लेख छान वाटला,
आपला लेख वाचून त्याचं कॉम्प्रेहेंषण माझ्या मनात असं उमटलं की "इतिहासात दोन महान प्रसिद्ध व्यक्तींमध्ये (इथे टिळक व आगरकर/रानडे) (या प्रतिसादामधे नेहरू व पटेल)मतभेद असतात, मनभेद नव्हे." माझी प्रतिक्रिया ही आपल्या लेखावर नव्हती, तर आपल्या लेखाच्या अनुषंगाने मला मत व्यक्त करावयाचे होते. आपला लेख हा मला माझे मत व्यक्त करताना पूरक असा वाटला म्हनुन प्रतिसाद.

स्वत:च्या झेंड्याखाली चार टाळकी जमविण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. मग महाराष्ट्रावे वाटोळे झाले तरी चालेल अशी परिस्थिती आहे.

बरोबर आहे आपले,
स्वत:च्या झेंड्याखाली चार टाळकी जमविण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. मग महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या देशाचे वाटोळे तरी चालेल अशी लोकं आहेत इथे.