लंडन च्या आर्चवे ट्यूब स्टेशन च्या बाहेर येताच हायगेट हिल रोड ने सरळ सरळ चालत आलं की उजव्या हाताला एक रस्ता वळतो हा रस्ता आहे क्रॉमवेल अॅवेन्यु. एका मध्यमवर्गीय वसाहतीतला हा साधारणसा रस्ता. मुख्य रहदारीपासून जरा आतल्या भागाला असल्यामुळे इथे ट्रॅफिक सुद्धा कमीच असतो. या रस्त्याला वळून उजवीकडे आठ-दहा घरे सोडली की आपण उभे राहतो एका अगदी साध्या सुध्या रूपाच्या एका विक्टोरियन पद्धतीच्या घरासमोर. हे सर्वसामान्य दिसणारे घर मात्र इथल्या बाकीच्या घरांपेक्षा फार वेगळं आहे. या घराला इतिहास आहे तो भारतीय स्वातंत्र्य लढयाचा. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं एकेकाळचं भारताबाहेरील प्रमुख केन्द्र--पत्ता ६५ क्रॉमवेल अॅवेन्यु, हायगेट, लंडन आणि ओळख -एकेकाळचं इंडिया हाउस.
विसाव्या शतकाचा सुरुवातीचा काळ. कधीही अस्त न होणारा इंग्रजी सत्तेचा सूर्य भारतात अगदी ऐन भरात होता. स्वराज्य आणि स्वदेशीची चळवळ देशभरात मोठ्या जोमात चालली होती. लाल, बाल आणि पाल या त्रिमुर्तींनी देशभरात जनजागृती करून लोकांमधे परकीय सत्तेविरूद्ध असंतोष निर्माण करण्याचे काम जोरात चालविले होते.
एकोणीसशे पाच ला लॉर्ड कर्झन ने फोडा आणि झोडा या जगप्रसिद्ध ब्रिटीश नीतीला जागुन बंगालची फाळणी घडवून आणली. अशातच इंडियन नॅशनल कॉंग्रेस मधे जहाल आणि मवाळ असे सरळ सरळ दोन गट पडले. सशस्त्र प्रतिकाराशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही असा एक विचार जोर पकडू लागला होता आणि त्याला अनुसरून बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, तामीळनाडू मधे अनेक क्रांतिकारक संघटना निर्माण होऊ लागल्या.
आपल्या देशामधे ही धामधूम चालली असतानाच एक समांतर चळवळ आकार घेऊ लागली होती ती मात्र भारताच्या बाहेर, थेट वाघाच्या गुहेत--लंडन मधे.
श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणीसशे पाचच्या फेब्रुवारीत इंडियन होम रूल सोसायटी ची लंडन मधे स्थापना केली. मॅडम भिकाजी कामा, दादाभाई नवरोजी सारखे दिग्गज या संस्थेंचे आधारस्तंभ होते. या संस्थेने हिंदुस्थानासाठी सेल्फ रुल अर्थात स्वराज्य या संकल्पनेची मांडणी केली. याचे उद्दिष्ट होते खुद्द लंडनमधून या स्वराज्याच्या कल्पनेचा पाठपुरावा करणे, या कामासाठी जनजागृती करणे आणि त्यासाठी पैसा उभारणे. या काळात मोठ्या प्रमाणावर भारतीय मुले शिकण्यासाठी लंडन मधे येऊ लागली होती. या मुलांना लंडन मधे साहजिकच वंशभेदाचा, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागे.
श्यामजी कृष्ण वर्मांनी या भारतीय विद्यार्थांसाठी एका वसतीगृहाची एकोणीसशे पाच मधे स्थापना केली. ह्या घराचे नाव ठेवले--इंडिया हाउस.
हे इंडिया हाउस पुढच्या पाच वर्षांसाठी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील इंग्लंडमधील एक प्रमुख केन्द्र बनले. येथील सदस्यांनी द इंडियन सोशियलोजीस्ट नावाचे ब्रिटीश सरकारविरोधी वृत्तपत्र चालविले होते. या वृत्तपत्राने भारतात चाललेल्या इंग्रजी दडपशाही विरुद्ध वेळोवेळी आवाज उठविण्याचे काम केले.
अनेक भारतीय विचारवंत, नेते, क्रांतिकारक देशभक्तांचे इंडिया हाऊस हे लंडन मधील हक्काचे घर बनले. इथे त्यांच्या बैठकी चालायच्या, अनेक नवे विचार, नव्या कल्पना इथे मांडल्या जायच्या. जहाल-मवाळ अशा सर्व विचारांना या घराने एकत्र आणले.
सगळयांचे मार्ग वेगळे होते पण धर्म एकच--राष्ट्रभक्ति आणि उद्दिष्ट----स्वराज्य.
या इंडिया हाउस च्या सभासदांपैकी प्रमुख नावे होती--- बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, मदन लाल धिंग्रा, लाला हरदयाल, वी. एन. चटर्जी, सेनापती बापट इत्यादी. महात्मा गांधी सुद्धा त्यांच्या ब्रिटन दौर्यात इथे काही दिवस राहायला होते.
इथल्या स्वातंत्र्य चळवळीची कुणकुण स्कॉटलॅंड यार्ड ला लागली नाही तरच नवल होते. हळूहळू ब्रिटीश सरकारने इंडिया हाउस वर नजर ठेवायला सुरूवात केलीच होती. एकोणीसशे नऊ मधे इंडिया हाऊस च्या मदन लाल धिंग्रांनी लॉर्ड कर्झन वायलीचा लंडन मधे भर सभेत वध केला. त्याच्या नंतर मात्र या इंडिया हाउस वर इंग्रजी सत्तेचा झपाट्याने वरवंटा फिरू लागला. मदन लाल धिंग्रांना फाशी देण्यात आली. इंडिया हाउस चे बरेच सभासद भूमिगत झाले.
१९०५ ते १९१० या काळात या इंडिया हाउस ने अनेक तरुण भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणले. या उच्चविद्यभूषित तरुणांच्या मनात ब्रिटीश राज्यसत्तेविरुद्ध असंतोष जागा केला. त्यांच्या विचारांना हक्काचं व्यासपीठ दिले. बॉम्ब, पिस्तुले बनविण्याची माहिती पत्रके भारतात क्रांतिकारकांसाठी इथून पाठविली जात. येथील सदस्यांनी पुढे जाऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले. या इंडिया हाउस ने बलाढ्य आणि अजिंक्य ब्रिटीश साम्राज्याला जाब विचारायचं धाडस दाखवलं ते थेट त्यांच्या घरात शिरून.
आज या वास्तुची नाही चिरा नाही पणती अशी अवस्था आहे. फक्त हे घर मात्र जसंच्या तसं उभं आहे आणि सावरकर इथे वास्तव्यास होते अशा उल्लेखाची घरावर एक निळ्या रंगातली पाटी, बस इतकंच. या घराकडे बघतांना राहून राहून वाटत होतं की आत काहीतरी संग्रहालय, नाहीतर घरासमोर काही माहितीचा फलक तरी, काहीतरी हवं होतं. पण काहीही नाही.
क्रॉमवेल अॅवेन्यु
डावीकडचे घर.
या घराकडे आम्ही बाहेरूनच बघत होतो. इथे या देशात काहीतरी खूप आपलसं वाटणारं समोर दिसत होतं. इथपर्यंत येतांना डोक्यावरचं उन, लंडन मधली गर्दी, मॅप नीट बघता येत नाही का म्हणून एकमेकांवर केलेली चिडचिड सारं काही एका क्षणात विसरलो होतो. आम्ही दोघे, बरोबर माझा भाऊ आणि वाहिनी. चौघेही निशब्द.... काही बोलण्यासारखं नव्ह्तच. फक्त कधी घरासमोर तर कधी रस्त्याच्या पलीकडे जाऊन या इंडिया हाऊस कडे आम्ही एकसारखे पाहात होतो. उगाचच घराच्या आजूबाजूला घुटमळत होतो. खरोखर येथून पायच निघत नव्हता. पण मग शेवटी थोडेफार फोटो काढले आणि जरा वेळाने तेथून निघालो.
हा फोटो जालावरून साभार.
गॉड सेव द किंग आळवत अवघ्या हिंदुस्थानाला त्राही माम करून सोडणार्या ब्रिटीशांच्या राजधानीत वंदेमातरम् चा मंत्रघोष करण्याची हिंमत या घराने दाखविली.
देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत आपला वाटा उचलून काही काळासाठी का होईना पण इंग्रज सरकारला भयंकर अस्वस्थ करणार्या या इंडिया हाऊस ला देशाच्या स्वातंत्र्यदिनानीमित्त विनम्र अभिवादन.
प्रतिक्रिया
15 Aug 2015 - 2:07 am | श्रीरंग_जोशी
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर इंडिया हाऊस बघितल्याचे वर्णन इथे प्रकाशित केले. अनेक धन्यवाद.
15 Aug 2015 - 2:40 am | आदूबाळ
छान लिहिलंय.
15 Aug 2015 - 2:43 am | प्यारे१
___/\___
नतमस्तक!
समयोचित उत्तम लेख.
15 Aug 2015 - 8:26 am | एस
+१!
15 Aug 2015 - 2:46 am | रेवती
समयोचित लेखन आवडले. फोटोही मस्तच!
तुम्ही म्हणताय की इथे निदान माहितीफलक तरी हवा होता पण निदान निळ्या रंगातली पाटी तरी आहे. आपल्या देशातून तर त्यांचं अस्तित्वच पुसलं जाईल असंच काय काय चालू असतं. हा धागा पाहून शिकागोचा स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ असलेला रस्ता आठवला.
16 Aug 2015 - 7:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
अवांतर--स्वामी विवेकानंद भारतातुन श्रीलंका,हाँगकाँग,जपान,कॅनडा (व्हँकुव्हर) तेथुन रेल्वेने शिकागोला गेले.
वाटेत विनिपेग स्टेशनवर त्यांनी एक रात्र मुक्काम केला होता. तेथील भारतीय समाजाने त्यांचा अर्ध पुतळा विनिपेग स्टेशनवर उभारला आहे.
http://www.winnipegfreepress.com/arts-and-life/life/faith/hindus-honour-...
16 Aug 2015 - 8:17 pm | श्रीरंग_जोशी
आर्ट इन्स्टिट्युट ऑफ शिकागो येथे जे सभागृह आहे त्याच ठिकाणी सप्टेंबर १८९३ मध्ये स्वामीजींनी आपले प्रसिद्ध भाषण दिले होते. आता त्या सभागृहाची रचना बरीच बदलली असली तरी सभागृहाच्या प्रवेशद्वाराशेजारील भिंतीवर स्वामीजींचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. मी काढलेले काही फोटोज.
फोटोज मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे.
15 Aug 2015 - 6:11 am | सटक
सुंदर लेख! स्वातंत्र्यदिनाची सुरुवात छान करून दिलीत!
15 Aug 2015 - 7:30 am | अजया
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या लेखामुळे का होईना या इमारतीचे स्मरण झाले याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद._/\_
15 Aug 2015 - 8:40 am | किसन शिंदे
समयोचित लेख आवडला. ब्रिटिशांच्या राजधानीत, आणि ते ही पारतंत्र्याच्या धामधूमीच्या काळात भारतीयांची अशी काही वास्तू तिथे होती याचं खूप आश्चर्य वाटतंय.
तिथल्या अनेक अनामिक वीरांना मानाचा मुजरा!
15 Aug 2015 - 8:55 am | श्रीरंग_जोशी
तुम्हाला याचं आश्चर्य वाटण्याचं कारण या वास्तुबाबत आज कळले असल्यास ती खरंच आश्चर्याची बाब असेल.
शाळेतल्या इतिहासातही श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या कार्याचे जे वर्णन होते त्यात इंडिया हाउसचा उल्लेख होता.
अवांतर - गदर चळवळीशी संबंधीत क्रांतिकारक व कृषीतज्ञ पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या जीवनावर वीणा गवाणकर यांचे डॉ. खानखोजे नाही चिरा हे पुस्तक आवर्जुन वाचण्यासारखे आहे.
15 Aug 2015 - 8:57 am | किसन शिंदे
हो! आज या लेखाच्या निमित्तानेच कळतंय. शाळेतल्या पाठ्यपुस्तकातले अजूनपर्यंत लक्षात राहायला माझी स्मरणशक्ती तितकीशी चांगली नाही. :)
15 Aug 2015 - 8:47 am | विशाल कुलकर्णी
समयोचित लेख. धन्यवाद !
15 Aug 2015 - 9:02 am | डॉ सुहास म्हात्रे
समयोचित लेख !
आपल्या इतिहासातील महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची परंपरा इथेही पाळली गेली आहे हे पाहून आश्चर्य नाही तरी खेद वाटलाच !
15 Aug 2015 - 9:39 am | कैलासवासी सोन्याबापु
सरसरुन काटा आला अंगावर!! _/\_
15 Aug 2015 - 11:11 am | कोमल
मस्तच..
ब्रिटीशांनी त्यांच्याच विरोधी खलबते ज्या वास्तूत झाली ती एवढी जपून ठेवलीये याचे खरच नवल वाटत.
सध्या कोणाच्या अखत्यारीत येते इंडीया हाऊस?
15 Aug 2015 - 11:18 am | संजय पाटिल
माहितीपुर्ण लेख, समयोचित.
15 Aug 2015 - 12:04 pm | लाल टोपी
समयोचित लेख आवडला.
घरावर लावलेला फलक ग्रेट लंडन कॉन्सील ने लावला आहे असे दिसत आहे ज्यांच्याविरुध्द सावरकर लढले त्यांनी लावलेला फलक पाहून कौतुक वाटले. आंदमानमध्ये अशाच प्रकारे स्मारक उभारतांना मणीशंकर अय्यर या 'थोर विचारवंताने' तोडलेले तारे आठवले.
15 Aug 2015 - 3:06 pm | बोका-ए-आझम
ब्रिटिशांनी अशीच १८, Howley Place ही वास्तू जपून ठेवली आहे. तिथे टिळक राहिले होते.
16 Aug 2015 - 11:07 am | यशोधरा
उत्तम लेख.
16 Aug 2015 - 7:18 pm | मधुरा देशपांडे
खूप आवडला लेख.
16 Aug 2015 - 7:41 pm | राजेंद्र मेहेंदळे
समयोचित आणि छान ... लेख आवडला.
16 Aug 2015 - 9:03 pm | अत्रन्गि पाउस
https://en.wikipedia.org/wiki/Partition_of_Bengal_(1905)
हा व्होइसरोय होता
https://en.wikipedia.org/wiki/William_Hutt_Curzon_Wyllie ह्याला मदनलाल धिंग्राने उडवले होते ...
16 Aug 2015 - 11:12 pm | जुइ
फोटोही आवडले!
17 Aug 2015 - 1:28 am | पद्मावति
श्रीरंग--जिथे स्वामी विवेकानंदाचे भाषण झाले त्या वास्तूचे फोटो दिल्याबद्दल तुमचे खूप आभार. खूपच मस्तं.
कोमल- मला वाटतं की हे घर आता हे ग्रेटर लंडन च्या अखत्यारीत येतं.
बोका-ए-आझम-- १८ हाउली प्लेस विषयी संगिताल्याबदद्ल तुमचे खूप आभार. तुम्ही सांगितल्यावर गूगल सर्च केला तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते घर आहे. तिथे आता नक्कीच जाणार.
17 Aug 2015 - 4:00 pm | gogglya
__/\__
17 Aug 2015 - 5:34 pm | स्रुजा
अप्रतिम! समयोचित लेख. खुप आवडला.
17 Aug 2015 - 10:51 pm | सानिकास्वप्निल
पद्मावति तुझा लेख आला की मी आवर्जुन वाचते, नेहमीप्रमाणेच उत्तम लिहिले आहेस.
18 Aug 2015 - 2:24 am | अगम्य
http://www.satyashodh.com/London_Tour_17112011.htm
मी ह्या सफरीबद्दल चांगली मते ऐकली आहेत. श्री गोडबोले अतिशय तळमळीने माहितीपूर्ण सफर करवतात असे ऐकले आहे. तुम्हाला ह्यात रस असू शकेल.
18 Aug 2015 - 2:30 am | अगम्य
ह्यात जाहिरात करण्याचा हेतू नाही. मी ही सफर घेतलेली नाही किंवा मी श्री गोडबोले ह्यांना ओळखतही नाही. परंतु असे दिसते की त्यांचा हेतू पैसे कमावणे हा नसून, स्वातान्त्र्यासैनिकांबद्दल असलेल्या तळमळीतून एक व्रत म्हणून ते ही सहल करवतात. इथे तुम्ही इतका लेख टाकला आहे तर तुम्हाला किंवा लंडन मध्ये असलेल्या इतरांना सुद्धा कदाचित हे माहिती उपयुक्त वाटू शकेल म्हणून टाकली.
18 Aug 2015 - 2:58 pm | पद्मावति
श्री. गोडबोले यांच्या या टूरबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. आधी माहीत असतं तर त्यांच्या बरोबर ही सफर करण्यात जास्त आनंद झाला असता. पण ही टूर मी अगदी नक्कीच घेईन. खरोखर लंडन मधे आपले कोणी भारतीय असे काम करतात हे वाचून खूप छान वाटलं.
18 Aug 2015 - 5:58 pm | पीशिम्पी
ह्या शनिवारी श्री. गोडबोले ह्यांनी टूर आयोजित केली आहे, माझा जाण्याचा विचार आहे. पुर्ण दिवसाची टूर आहे
19 Aug 2015 - 2:01 am | अगम्य
इथे त्या सफरीचा वृत्तांत दिला तर फार छान होईल. आणि हो, पद्मावातींचा लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.
19 Aug 2015 - 2:52 am | पद्मावति
खरंच असा वृतांत फार आवडेल वाचायला.
19 Aug 2015 - 1:26 pm | बॅटमॅन
क्या बात है, लै मस्त!!!! फटू बघून भारी वाटले.