विद्ध

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
8 Aug 2015 - 5:13 pm

(वि. सू. - ही कविता आणि कुणाल यांचा "घालमेल: हे प्रेम होतं की आकर्षण?" हा लेख यांचा काही संबंध दिसून आल्यास तो योगायोग समजावा. कारण तो फक्त योगायोगच आहे. सदर लेख इथे वाचता येईल)

तीच ती होती तरी का
प्रश्न सलतो अंतरी
सत्य होता काळ तो का
होती तरी का ती खरी?

तरल साधी स्वप्न प्रतिमा
जपुनि हृदयी ठेविली
अब्द गेले दशक गेले
ती तिथे परि राहिली

वाहते आयुष्य गेले
साजिऱ्या चित्रापरी
दुःख येई सुखहि येई
येति नेमेच्या सरी

कधि न मजला वाटले
"ती हरवली कोठेतरी"
पाहिले ना कधिहि तिजला
अन्य कोणाच्या परी

परतुनी मग भेट झाली
याद सारी परतली
हरवले होतेच काही
जाण पुनरपि उमटली

"काय हे केलेस तू!!"
हे विद्ध मन आक्रंदले
खोलवर त्या वेदनेने
तळमळोनी स्पंदले

त्या क्षणार्धी चित्त माझे
नाहि माझे राहिले
भरभरोनी लाभलेले
मृत्तिकेसम भासले

आजही दिसते मला ती
दुरुनी तिजला पाहतो
हे खरे का ते खरे
या दोलनी मी राहतो

प्रेम कविताकविता

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

8 Aug 2015 - 6:21 pm | टवाळ कार्टा

लोकमत आणि Oxygen पुरवणी र्हाय्ली की =))

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 2:49 pm | चलत मुसाफिर

कुणाल यांच्या 'घालमेल: हे प्रेम की आकर्षण?' या मिपा लेखाचा वर दिलेला दुवा निकामी झालेला दिसतो. पण हाच लेख मनोगत संकेत स्थळावर उपलब्ध आहे. लेखकाचे नाव नीरज औरंगाबादकर असे दिले आहे.
मनोगत लेखाचा दुवा:
http://www.manogat.com/node/18371

चांदणे संदीप's picture

7 Apr 2020 - 3:29 pm | चांदणे संदीप

मला आधी वाटलं, 'कविता' आणि 'कुणाल' यांचं काही आहे का? पण 'कुणाल' आणि 'भाग्यशाली' ची "सिर्फ तुम" च्या मुस्काटात मारेल अशी (अजून पूर्णत्वाला न गेलेली) लव्हस्टोरी वाचली आणि कविताबद्दलचा गैरसमज लगेचच दूर झाला. ;)

कविता सुरेख आहे! :)

सं - दी - प

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 3:39 pm | चलत मुसाफिर

असल्यास मला कल्पना नाही. (आता कल्पनावरून नवा विनोद करू नका)

कविता तुम्हाला आवडली हे वाचून आनंद झाला. धन्यवाद