कॉलेजात माझी जागा वर्ग कोणताही असला तरी खिडकीच्या बाजूची असायची. बाहेर गुलमोहराची झाडे, त्यावरची कावळ्याची घरटी, खारोट्यांचा दंगा वर्गात व्याख्यान म्हणून चाललेल्या काही गोष्टी सुसह्य करायच्या. अपवाद म्हणावा अशी एक घटना घडली नि मनावर कायमचा ठसा उमटवून गेली. समीक्षेचा तास सुरू होता. साठोत्तरी वास्तववादी साहित्याच्या चिंध्या करणं चालू होतं. सर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक असल्याने आवेशाने एकेक कळीचा मुद्दा उकलवून दाखवत होते. आम्ही त्यांच्या व्यासंगापुढे लीन होऊन आ वासून ऐकत होतो.
तेवढ्यात बाहेर झिमझिम पावसाला सुरुवात झाली. उन्हाच्या काहिलीनंतर बर्याच दिवसांनी अशा हळुच येऊन शेजारी बसणार्या पावसामुळे साहजिकच आमचं लक्ष विचलित होत होतं. पावसाचे ते थेंब लक्ष हातांनी बाहेर बोलवत होते. आम्ही ऐकत नाहीसे बघून पाऊस चिडला आणि मुसळधार वर्षू लागला. सर बोलायचे थांबले. म्हणाले पावसाच्या कविता म्हणूया !!!
समीक्षेसारख्या घनघोर अरण्याला लीलया पेरणारा हा माणूस पावसाच्या थेंबांच्या माळा करू म्हणत होता !!!!
मग सुरू झाल्या पावसाच्या कविता. सरांचा कमावलेला आवाज, बाहेर पाऊस, वर्गातली जेमतेम १२-१४ उत्सुकलेली डोकी आणि पावसाच्या कविता !त्यातल्या काही बोरकरांच्या ! खास !!
बोरकरांची ओळख खरी तेव्हा झाली. एकामागून एक कवितेची सर झेलत वेगळ्याच धुंदीत किती वेळ गेला माहीत नाही !
आजही पाऊस संथ लयीत मध्येच ताना घेत स्वमग्नपणे जेव्हा बरसत राहतो तेव्हा त्या कविता आठवतात. गुलमोहराची उरलीसुरली फुले भिजताना दिसतात. खारोट्यांची लगबग जाणवते...याला साथ बोरकरांच्या पाऊस कवितांची..
बोरकरांची पाऊसगाणी म्हटलं की पहिली कविता ओठांवर येते ती
गडद निळे गडद निळे जलद भरुन आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले..
या ओळीतले हे गडद निळे चपलचरण वाचेपर्यन्त ट्प ट्प थेंब पडू लागतात
टप टप टप पडति थेंब
मनिंवनिंचे विझति डोंब
आणि हे होतानाच...
वत्सल ये वास, भूमि आशीर्वच बोले
गडद निळे गडद निळे जलद भरुन आले ॥
आहाहा ! ही कविता खरोखर पंचेंदियांनी अनुभवायची.
मातीच्या वासाचा आशीर्वाद देऊन हे जलद श्रावणधारा होतात आणि एक त्या श्रावण दर्शनानेही कवी स्तिमित होतो.
गिरीदरीतुनि झरे---नव्हे हे हिरे उसळती निळे ।
पावसाळ्यातल्या मंडुकगानानेही लुब्ध होत कवी म्हणतो
ऋषी कुणी मंडूक संपवुनि उपनिषदाची ऋचा
रविकिरणाचे भस्म लावुनी उबवित बसला त्वचा !
झाडे निळी होताना हवेचे जणु दही झालेले कवीला दिसते.
झाले हवेचेच दही माती लोण्याहून मऊ
पाणी होऊनीया दूध लागे चहूंकडे धावू
लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय
भिजणार्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय..
या संतोषातच कवी तरलपणे लिहून जातो
क्षितिजी आले भरते गं
घनात कुंकुम खिरते गं
झाले अंबर झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते गं !
हे हवेत तरणारे अत्तर बोरकरांच्या असंख्य कवितांना स्पर्शून गेले आहे. बोरकरांच्या निसर्गवेडात समुद्रावरचे त्यांचे प्रेम जेवढे ठळक आहे, तेवढेच पावसावरचेही. पावसाच्या अनेक लकबी, तर्हा, बोरकर सहजतेने कवेत घेतात. थेट आपल्या जगण्यातच पावसाला विणून घेतात.
पर्जन्याची पिसें सांडली पिसांवलेल्या उन्हांत
तुझे नि माझे लग्न लागले विसांवलेल्या मनात
आणि या त्यांच्या विसावलेल्या क्षणाला साक्षीदार असतात
ढवळे ढवळे ढग खवल्यांचे निळीत वळती इवले इवले
सरी ओवल्यागत ओघळती हरळीवरती निळसर बगळे
उन्हात पडणारा पाऊस पाहिलाय का तुम्ही? त्याला आम्ही कोल्ह्याचं लग्नं म्हणायचो. गोव्यात हा असा पाऊस माकडाचं लग्नं घेऊन येतो. ती पूर्ण कविता देण्याचा मोह आवरत नाही.
उन्हातले सरी ! बाई, उन्हातलें सरी !
खरेच का माकडाचे लग्न तुझ्या घरी ?
सोनियाच्या घरा तुझ्या मोतियांच्या जाळ्या
आंत काय चालें तें न कळे काही केल्या
माकडाची टोपी कशी, माकडीची साडी ?
सोहळ्याला कोण कोण जमले वर्हाडी ?
कुणीं कुणीं केले किती अहेर केवढे?
पाहुण्यांना वाटले ते सांडगे की पेढें?
आम्ही मात्र ऐकले ते पाखरांचे मंत्र
आणि पानीं वाजलेले ताश्यांचे वाजंत्रं
ऐन वेळी घातलें का भुलाईचे पिसें?
चार क्षणांतच लग्न आटोपले कसे ?
:) :) :)
ही सुखाची साय दाट होतानाच
फांदीसारखी झुकते सांज जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन पेंगुळ पांगुळ होते जग
गगनभारल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे
ओला काळोख आळत येतो उकत्याझाकत्या काजव्यांसवे
अशी कातरता दिसून येते. अशीच पावसाशी जोडलेली अजून एक सुंदर उदास कविता
हवा पावसाळी जरा रात्र काळी
ढगा़आडचा चंद्र थोडा फिका
नदी आज जागी उदासी अभागी
अजूनी न ये नीज या सागरा
ही अस्वस्थता आणि जीवनासक्ती उलगडताना कवी पावसाचं बोट धरतो नि म्हणतो
संतत धार झरे
गढले अंबर जड जलदांनी
सागर मदिर उधाणी
धरिले वादळ वड माडांनी
भरले खूळ धरे
तरी हे चित्त पिपासित रे !
निसर्गाची ; समुद्र्-पावसाची अनंत रूपे बोरकरांनी शब्दचित्रित केली आहेत. त्याच्या प्रत्येक रूपावर बोरकर भाळतात. हे त्यांचे प्रेम एक सुंदर कवितानुभव होते..
थंड आले तीव्र वारे : अत्तराचे की फवारे
पंखसे व्योमी उडाले मृत्तिकेचे ध्यास सारे;
या पावसाशी एकरूप होत
पावसाची ही निशाणी खेळवी गात्रांत पाणी,
पाखरांनी उंच नेली पुष्पपात्रांतील गाणी;
पावसाची तृप्ती कवी अनुभवतो नि म्हणतो
शोक सारे श्लोक झाले, रंग सारे चिंब ओले
तृप्तिचा अंदाज घेती आज माझे श्रांत डोळे
ही तृप्ती मन भारून जाते. या कवितांमधल्या पावसातून बळेच मनाला ओढून काढतानाही पावलं कृष्ण्वेड्या गोपींसारखी नाचत गात राहतात..
सरिंवर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं ।
मल्हाराची जळात धून
वीज नाचते अधुनमधून
वनात गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदी थिजून
घुमतो पांवा सांग कुठून?
कृष्ण कसा उमटे न अजून?
वेली ऋतुमती झाल्या ग
सरिंवर सरी आल्या ग...
सरिंवर सरी आल्या ग...
सरिंवर सरी आल्या ग...
प्रतिक्रिया
22 Jul 2015 - 5:18 pm | पिशी अबोली
वाचून तृप्त झाले. :)
22 Jul 2015 - 5:19 pm | प्रीत-मोहर
आहा!!! किती सुरेख लिहिलयस. आजच मी बोरकरांच्या कविता घेउन बसले होते, र.ग्र. साठी, तर मग हे असच वाचत राहिले. आणि बाहेर मस्त पाउस. :)
22 Jul 2015 - 5:29 pm | इशा१२३
क्षितिजी आले भरते गं
घनात कुंकुम खिरते गं
झाले अंबर झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते गं !
आहाहा!अप्रतिम आवडत्या कविता.
सुरेख लिहिलयस अगदि.
22 Jul 2015 - 5:31 pm | एस
सुंदर...!
22 Jul 2015 - 6:02 pm | कविता१९७८
मस्तच.
22 Jul 2015 - 6:17 pm | अजया
आत्ता बाहेर सरींवर सरी सुरु आहेत.समोर पाऊसभरला तुझा लेख आहे!
सुं द र!
22 Jul 2015 - 10:08 pm | पैसा
_/\_ बाकीबाब सामको कळ्ळो तुका!
22 Jul 2015 - 11:38 pm | बहुगुणी
अप्रतिम रसग्रहण!
आम्ही ऐकत नाहीसे बघून पाऊस चिडला आणि मुसळधार वर्षू लागला.
हे फार म्हणजे फारच आवडलं!ते रसिक समीक्षक सर कोण हो?
23 Jul 2015 - 2:31 am | पद्मावति
रसग्रहण खूपच आवडलं.
23 Jul 2015 - 3:06 am | रेवती
सुरेख रसग्रहण!
23 Jul 2015 - 6:57 am | जुइ
चांगले लिहिले आहेस!
23 Jul 2015 - 10:35 am | उमा @ मिपा
अप्रतिम!
23 Jul 2015 - 10:46 am | शरद
छानच लिहले आहे.
शरद
23 Jul 2015 - 11:28 am | प्रीत-मोहर
मुळातच बाकीबाब तरल लिहितात, त्यात गोव्यातला पाउस भिनलेला मग त्यांना पाउसगीते न सुचली असती तरच नवल.
''दिशा दिशातून आषाढाच्या श्याम घनांना पूर
तृणाप्रमाणे मनेंहि झाली चंचल तृष्णमयूर॥''
किंवा
रे थांब जरा आषाढ घना। बघू दे दिढीभरून तुझी करूणा ॥धृ॥
कणस भरू दे जिवस दुधाने। देंठ फुलांचा अरळ मधाने
कंठ खगांचा मधुगानाने। आणीत शहारा तृणपर्णा...रे थांब जरा आषाढघना !
इथे ते आषाढाच्या पावसाला थांब म्हणतात, मनांची तहान भागव आणि असा वर्षाव कर, की शेतकरी, पाखरं, प्राणी सारेच खुश होवुदेत असा बरस!!!
किंवा मग
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पांचवा म्हैना ॥धृ॥
कटीस अंजिरी नेसूं। गालात मिस्किल हसू
मयूरपंखी, मधुरडंखी। उडाली गोरटी मैना॥
लावण्य जातेस उतू। वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना..... सृष्टीला पाचवा म्हैना॥
ही कविता माझी खास आवडीची. मितान तुझ्या आवाजात ऐकुन अजुनच जास्त आवडायला लागली. :)
श्रावणात, पावसात असे काही वातावरण असते गोव्यात प्रत्येक परसात अंगणात मोगरा, जाई जुई बहरतात. अळु, तेरं फोफावतात, अबोल्याही सोबत आहेतच. जिथे तिथे लहान लहान ओझर/ ओहोळ दिसत असतात. हे सगळ म्हणजे निसर्गाला लागलेला पाचवा महिना नाही तर काय आहे?
23 Jul 2015 - 11:44 am | पैसा
आणि श्रावण हा वर्षातला पाचवा महिना. आणखी एक गंमत आहे. गोव्यात 'हिरवा' या शब्दाला 'पाचवा' म्हणजे पाचूसारखा हा शब्द वापरतात बघ. इथे त्यावर अप्रतिम श्लेष झालाय.
"गडद निळे गडद निळे" ही कविता शाळेत असताना शिकले. तेव्हा हा "पोएट" हा किती मोठा कवी होता हे माहीत नव्हते. पण त्या कवितेतली लय आणि ल, ळ, न या सर्व मृदू वर्णांचा उपयोग बघून मन मोहून गेले होते. किती नादमय आणि चित्रदर्शी कविता आहे ही!
23 Jul 2015 - 12:11 pm | प्रीत-मोहर
येस. पाचवो कलर :)
23 Jul 2015 - 1:11 pm | नंदन
असेच म्हणतो.
शिवाय संस्कृतनिष्ठ शब्दांची रेलचेल असणार्या या कवितेत 'ढोर' सारखा एरवी विसंगत वाटू शकेल, असा शब्द किती नेमकेपणाने येतो पहा:
धूसर हो क्षितिज त्वरित, ढोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे.
23 Jul 2015 - 5:16 pm | मितान
अहाहा ! हा श्लेष उकलुन सांगितल्याबद्दल आभार पैसाताई ! :)
प्रीमो, माझीही अत्यंत आवडती कविता ! समुद्र बिलोरी ऐना !!! तू फार छान रसग्रहण केलंयस ! :)
23 Jul 2015 - 5:40 pm | पिशी अबोली
डुंबवताय गं सगळ्याजणी आनंदात..
बाहेर पाऊस कोसळतच असतो, पण त्याला नीट झेलून त्याचा टपटप आवाज करवून त्याची अजून जाणीव झाडं करून देतात.. त्या पावसासारखे ते हवेतलं अत्तर, तो तृणपर्णाचा शहारा, सगळं नीट डोळे उघडून बघायला, अनुभवायला शिकवणारे बाकीबाब आणि झाडांसारख्या त्यातले रस उलगडून दाखवणार्या पावसाळलेल्या तुम्ही.. :)
23 Jul 2015 - 12:14 pm | स्वाती दिनेश
आवडत्या कवितेचं सुंदर रसग्रहण!
पु लं व सुनीताबाईंचा 'सरीवर सरी.. ' कार्यक्रम आठवला.
स्वाती
23 Jul 2015 - 5:26 pm | मितान
ते दोघे मिळून सरींवर सरी ही कविता किती तन्मयतेने म्हणतात !!!
23 Jul 2015 - 12:18 pm | रातराणी
मस्त!
23 Jul 2015 - 1:05 pm | नंदन
रसग्रहण फारच आवडलं. बोरकरांच्याच 'पाणियाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी; आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी, मीही पाणी' या ओळी आठवून गेल्या.
23 Jul 2015 - 5:23 pm | मितान
नंदन, याच कवितेतल्या ओळी ना ?
तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
तांबडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरूंसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरीचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळिच्या कांट्याप्रमाणे टोचरे पाऊसपाणी !!!!
निरीक्षण आणि कल्पनाशक्ती !!!!!!!
26 Jul 2015 - 5:12 am | नंदन
अगदी, अगदी.
नेहमीच्या परिचयातला विषय घेऊन अशा अद्भुत, चित्रदर्शी प्रतिमा कवितेतून रेखाटण्याची किमया बोरकरच करू जाणे! (निळ्या रंगावरची त्यांची कविताही अशीच - विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा)
23 Jul 2015 - 1:37 pm | प्यारे१
खूप मस्त रसग्रहण.
गोवेकरांचे 'आपल्या' माणसाबद्दलचे प्रतिसाद देखील तितकेच छान!
जमल्यास ऑडियो अपलोड करावा. श्रवणातून कविता लवकर पोचते!
23 Jul 2015 - 2:45 pm | कन्यारत्न
अप्रतिम
23 Jul 2015 - 2:54 pm | स्पंदना
नाद खुळा लेख झालायं. जसं तुला ही कविता वर्णु की ती झालयं तसच वाचताना पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या ओळी येत राहिल्या.
निव्वळ पावसावर बरसलेल्या या लेखाचं आणखी सोनं केलं ते "पाचवा" या शब्दातल्या श्लेषाकडे वेधून पै तै ने.
सुरेख लेखन, सुरेख प्रतिसाद!!
23 Jul 2015 - 3:07 pm | अनुप ढेरे
अप्रतिम!
या ओळी भारी आहेत!
23 Jul 2015 - 3:39 pm | अंतरा आनंद
अहा. फार सुंदर. सकाळपासून नुसतं छप्पर धरून राहीलेला पाउस आता पडायला लागलाय नेमका याचवेळी बोरकरांच्या कवितांवरचा अगदी जमून आलेला लेख वाचताना मजा आली.
समीक्षेसारख्या घनघोर अरण्याला लीलया पेरणारा हा माणूस पावसाच्या थेंबांच्या माळा करू म्हणत होता
मस्त.
23 Jul 2015 - 3:40 pm | विशाखा पाटील
सुंदर! छान लिहिलेय.
23 Jul 2015 - 5:24 pm | मितान
सर्वांचेच प्रतिसाद हा धागा श्रीमंत करणारे !
मनापासून आभार !:)
23 Jul 2015 - 6:34 pm | उगा काहितरीच
कविता "वाचायची" कुवतच बहुतेक नाही दिली मला देवाने ! :-( :-(
24 Jul 2015 - 6:50 am | Maharani
खुपच छान लिहिले आहेस..
24 Jul 2015 - 9:05 pm | सूड
सुंदर!! "पाचवा'चा श्लेष माहीत नव्हता.
24 Jul 2015 - 10:32 pm | नूतन सावंत
मन भिजून चिंब चिंब झालंय.
24 Jul 2015 - 11:47 pm | स्रुजा
वाह वाह ! शब्द नाहीत मितान .. या सगळ्या कविता अत्यंत आवडत्या, ३६ डीग्री मध्ये तुझ्या लेखाने श्रावण आणला इक्डे.. यातच काय ते समज :)
25 Jul 2015 - 12:10 pm | स्नेहानिकेत
छानच लिहिले आहेस मितान.कविता फारश्या कधी वाचल्या नाही जात मझ्याकडून.पण हे वाचतच राहवेसे वाटले
25 Jul 2015 - 1:37 pm | सस्नेह
धन्स गं !
..पाऊस म्हणजे वैताग हे समीकरण झालं होतं अन तो असा काव्यमय आहे हेही विसरलं गेलं होतं..
26 Jul 2015 - 6:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है. मला कवितेबरोबर सुरुवातीचा उतारा खुप आवडला, साठोत्तरी साहित्य शिकविणारे सर, पावसाच्या थेंबाच्या माळा करू पाहणारे सर, खिडकीतुन पावसात गच्च भिजलेला गुलमोहर.
अहाहा ! क्लास. पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. :)
-दिलीप बिरुटे
26 Jul 2015 - 7:26 am | सविता००१
तृप्त झाले.
सगळा पाउस परत अनुभवला! बाकीबाब ....
आणि अर्थात तुम्हा दोघींच्या रसग्रहणानं.
अप्रतिम.
काय सुंदर सकाळ उगवली आज. हेच वाचलं पहिल्यांदा...
वाह