श्री निरंजन रघुनाथ चरित्र - भाग 2

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
9 Jul 2015 - 8:54 pm

श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1

श्री निरंजन रघुनाथ चरित्र

माझे वडील कै. जनार्दन चिंतामण ओक यांनी साधारणपणे सन 1955च्या सुमारास आपल्या हस्ताक्षरात लिहिलेले बाड सहज हाती लागले. ... ते नेमके आज सहज अन्य काही दस्तावेज पडताळताना दिसले. व हे उर्वरित लेखन त्याला जोडून हे वाचकांना सादर.

जन्म – कळंब, परळी वैजनाथजवळ, मराठवाडा
शके 1704, कार्तिक शु.8 (इ.स.1782) ते भाद्रपद शु.11(इ.स.1855)
पूर्वाश्रमीचे नाव - अवधूत

।अंतरी एकचि झाला गोळ। वाटे हृदयि आले भूगोल।
।खाली वरी मध्ये निर्मळ। मीच अवघा व्यापलों।।50।।

... भाग 2 ...
चौथे दिवशी सकाळी घोडेगांव लागले. तेथेंही वेडा आला रे असेंच लोक म्हणू लागले. या गांवात भिकोबा बाबा नांवाचा संत होता. त्याचेजवळ तीन दिवस राहिलों. गांवात भिक्षा मागितली. अंगावरील वस्त्र फाटून चिंध्या झाल्या होत्या. तेथून ब्राम्हणवाडा या गांवी गेलो. तेथें एका कानफाट्या बैराग्याजवळ राहिलो. त्यानें सांगितले कीं तुझा निश्चय पक्का असेल तर गिरनार पर्वतावर दत्तात्रय तुला दर्शन देतील. तेथें अनेक योगी अनुष्ठान करीत असतात. हे ऐकून गिरनार पर्वतावर जाण्याचे ठरविले. तेथून जुळारास गेलो. लोकांनी अनेक तऱ्हेने टवाळी केली. पण त्याच गांवी कुशाबा नांवाचा संत भेटला.
....
।।त्याचि गांवी कुशाबा संत। कौपीन धारी पिशाचवत् ।।
वेडियासारखा असे फिरत। शुध्द नाहीं देहाची।।93।।
मुद्रा लाऊनि खेचरी। अलक्ष पाहे दिगंतरी।
श्वासोश्वास वाहती अंतरी। सुषुश्रा मार्गि चालतू।।94।।
ऐसी तयाचि धारणा। दृष्टी देखिला योगिराज।
तथांसि केले साष्टांग नमना। हात जोडूनि विनविलें।।95।।
लोक त्याला वेडा समजत होते, पण त्यानें मला उपदेश केला. कंथा जतन कर म्हणून सांगितले. माझ्या वृत्तीस आनंद वाटला. त्यांची आज्ञा घेऊन मी पुढे निघालों. पुढें कोतुळ गांवी चंडीदास बाबा नांवाचे संत भेटले. त्यांनी दिगंबर अवस्था का? म्हणून विचारें तेंव्हा कंथा अनंत ठिगळ्यांनी भरली असल्याने नेसलो नाहीं असे सांगितले. त्यांनी भोजनास दिले व दत्तात्रय पुराण श्रवणास बसावयास सांगितलें. त्यांचे घरी तीन दिवस राहिलों. एक दिवस त्यांचे माडीवर मानसपूजा आरंभली.
।।आसनी बैसलो असता जाण। नाहीं भान देहाचे।
।हृदयांतरी करितों ध्यान। हें देही गेंलो विसरून।
।तेथिचा आनंद पाहून। वृत्ति शून्य पै झाली।।
त्या गांवी एका तरूण मुलींने मला पाहिलें. तिचा नवरा बऱ्याच वर्षापासून नाहींसा झाला होता. मीच तो असावा असे समजून तिने घरीं सांगितले. तिची आई व अनेक सोयरे जमा झाले. त्यांनी माझा वृत्तांत विचारला. मी माझे नांव गांव सांगितले आणि मीं तुमचा जावई नव्हे असे परोपरीने सांगितले आणि या कटकटीतून वाचलो. मला माझ्या घराची व संसाराची आठवण झाली. लहानपणींच कष्ट करून कुटुंब पोसत होतो. पैसा संपला की घरची मंडळी पुन्हा देशांतराला जाऊन पैसे मिळवून आण म्हणत. असे कित्येक वर्षे चालले. एक वेळी स्त्री तरूण झाल्याचे समजल्यावर घरी बरेचसे द्रव्य घेऊन गेलो. आनंद भोगला, सहा महिने झाले घरची मंडळी केंव्हा जाणार म्हणून विचारू लागली आणि एक दिवस द्रव्य मिळविण्यासाठी घर सोडावे लागले. पुण्यास कीर्तन प्रसंगी वैराग्य आले व सर्वसंग परित्याग करून अहर्निश दत्त भजन करीत भटकू लागलो. ही सर्व कथा चंडीदासबाबा व मुलीच्या लोकांना सांगितली. त्यांनी ती पटली. नंतर तेथून सिन्नरास गेलो. दिगंबरच होतो. त्या रात्री ब्राम्हण रूपानें दत्तात्रय आले व अंगावर वस्त्र वापरत जा म्हणून त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी एका ब्राम्हणानें दिलेले वस्त्र घेतले. तेथून नाशिकला आलो. तेथील देवतांची दर्शनें घेतली. पंचवटीस रामदर्शन घेतले. एके रात्री दत्तात्रयांनी स्वप्नांत रघुनाथ भटजीकडे जा म्हणून सांगितले. सकाळी एका संन्यासाला त्यांची माहिती विचारली. त्यांनी सायंकाळी भटजी भेटतात म्हणून सांगितले. मी त्यांना म्हटले माझे अंतःकरण शुध्द असेल तर आज सकाळींच मला त्यांचे दर्शन झाले पाहिजे असे म्हणून मी घाटावर चढलों तो कांही अंतरावर ब्राम्हण मंडळींचा समुदाय दिसला. त्यांत रघुनाथ गुरूंचे दर्शन झाले. आनंद झाला.
तंव गुरूराय तेथोनि गेला। जै दरिद्रिया परीस सांपडला।।
तेथील इतर सज्जनांचे मार्फत रघुनाथ गुरूंचेकडे गेलो. त्यांनी विचारपूस केली. भोजनास थांबण्यास सांगितले. माझी सर्व हकीगत सांगून गिरनारास सगुण दत्तदर्शनासाठी जात आहे असे सांगितले. त्यांनी हसून येथेंही दत्त आहेतच असे सांगितले व त्यांच्या दत्तमंदिरातील मूर्ती दाखविली. ते पाहून अतिहर्ष झाला. मला चार दिवस राहण्यास त्यांनी सांगितले. त्या रात्रीं मला ब्राम्हण रूपाने देवाने रात्री दर्शन दिले व सांगितले की येथे सोळा दिवस रहा. सकाळी सर्व कर्मे आटोपून माधुकरी मागून भक्षण केली. सायंकाळी गुरू मंदिरात गेलो. इतर मंडळी गेल्यावर त्यांनी कोणता सांप्रदाय? असे विचारले.
।। कवण मुद्रा कवण ध्यान। ध्याता निराकार कीं सगुण।।
कवण धारणा धरूनि मनी। उदासीन पै केले।।
त्यांना नम्रतेनें सांगितलें.
।।ऐके वो सदगुरू समर्थ। माझी पश्चातापि कथा।।
।अग्निज्वाला नखादि शिखा। व्यापुनिया राहिल्या।
।म्हणून भ्रमिष्टाकृती होऊन। फिरत आलों देशाटन।
।परि स्थिर नव्हे अंतःकरण। उदासीन सर्वथा।।
।गुरूकृपा नाही संपादिली। धारणा अद्यापि नाहीं धरली।
।संत मुखे किर्तन ऐकली। ते सगुण मूर्ती ध्यातसे।
गुरू रघुनाथ म्हणाले, ‘उत्तम झाले आतां पश्चाताप सोड आणि मी काय म्हणतो ते नीट ऐक.’
।टाकोनिया शब्द विभाग। सांडोनि पोकळी दिशावलंब।।
।त्यागोनि आधार प्रकाश। चिदाकाश ते घेईता ।।
।आकाश सर्व व्यापक आहे। बाह्य दृष्टीसी न दिसताहे।
।जेणि हृदयांतरी पाहे। ज्ञानदृष्टी करूनियां।।44।।
।मग मी तैसाच पाहूं गेलो। पाहता तदाकारचि झालो।
।देह स्फूर्तिने विसरलो। कोठे कांही नेणवे ।।45।।
।कवण ध्याता कवण ध्यान। कोण वक्ता श्रोता करून।।
।पाहतां हारपुनी गेले मन। तीव्र ध्यान लागले।।46।।
।शरिरामाजी आकाश भरले। वाटे मस्तक भेदुनी गेले।
।ब्रह्म शरीरा माजी भिनलें। स्वरूप माझे सर्वही।।47।।
अशा प्रकारे चार घटका ध्यानांत होतो. सर्व देहभान विसरलो – वाचेला शब्द फुटेना. नंतर सदगुरू म्हणाले, ‘ध्यान विसर्जन कर.’
।तन अंतरी काढू गेलो ध्यान। वाटे कोठे ठेऊं काढून।
।याजला ठेवितों ठिकाण। याविण नाहीं दुसरा।।49।।
।अंतरी एकचि झाला गोळ। वाटे हृदयि आले भूगोल।
।खाली वरी मध्ये निर्मळ। मीच अवघा व्यापलों।।50।।
माझी ही अवस्था पाहून श्रीगुरू म्हणाले –
।हेंचि ब्रम्ह निराकार। निरंजन निराधार।
।निःप्रपंच निर्व्यापार। हेंचि स्वरूप तुझें पै।।52।।
।तुझें स्वरूप निराकार। तुझेचि रूप अजरामर।।
।तुज जन्ममृत्यूचा घोर। एथून आतां नसेचि।।54।।
।आतां निर्भय होय अंतरी। सांडी व्दैताची कर्तरी।
।नांदे एकपणाचे घरीं। स्वानंदेसी सर्वदा।।55।।
या प्रमाणें गुरू कृपा झाली, दोन दिवसानंतर रात्री लक्ष्मीदेवी स्वप्नात आली आणि गुरू उपदेशाबद्दल म्हणाली –

।म्हणे शुकभृगुपासून। म्यां संपादिले आत्माज्ञान।
।आकाशवत् चिंतन करून। हृदयांतरी पहावे ।।68।।
दुसरे दिवशी गुरूंना स्वप्न सांगितले. त्यांना आनंद झाला. त्यांनी बीजसहित दत्तात्रय मंत्र दिला. त्यांना नमन करून निघालो. त्यांवेळीच कवित्व स्फूर्ती झाली. जप ध्यान पुराण श्रवण यात काही दिवस घालवले. या दिवसांत उन्माद दशा आली.
।नेत्र भ्रुकुटी एकच झाली। मस्तकाप्रती कळ लागली।।
।आकाशमय वृत्ती जाहली। भान नाहीं देहाचे।।
।वाटो आकाशीच उडावे। किं समुद्रापलीकडे जावे।
।कीं ब्रम्हांडाचि गिळावे। तोंड पसरून आवघे।।86।।
।स्फुरण चढे वीराप्रती। बाहु उडली तटतटा।।
।जैसा मद्यपि दिसे भ्रांत। तैसी गती जहाली।।
।आपुलें न दिसेचि शरीर। आवघें दिसे निर्विकार।।
।सृष्टी जाहली धुम्राकार। नाहीं आकार कोठेही।।92।।
माझी ही अवस्था गुरूंनी पाहिली व संतुष्ट झाले आणि माझ्याकडे कृपादृष्टीने पाहून मला देह भानावर आणलें. त्यावेळी माझें शरीर शीतल झाले. झोप आली आणि त्यांतच गाढ समाधि लागली. तिला तूर्या म्हणतात. अशा प्रकारे गुरूप्रसाद झाला. दरिद्र्याला राज्य मिळाले, जीव जीवनमुक्त झाला. असे तीन दिवस झाले. मध्यान्ह रात्री –
।करीत बसलो होतो ध्यान। तों एक वेश्याजवळ येऊन।
।तिने आपुल्या स्तने करून। माझे ह्रदयी ताडले।
।आणखी एकयाचि हारीने। आठ वेश्या गृह बांधून।
।आपुल्या दारी बैसून। मज बोलावूं लागल्या।
।म्या तयांते धिक्कारून। मग पुढारा केले गमन।
।तव दृष्टी देखिला ब्राम्हण। बहुस्त्रिया समवेत।
या स्त्रिया गुरूंचे स्तवन सुस्वर स्वरांत करीत होत्या. हे सर्व पहात मी गंगेच्या काठी येऊन बसलो. त्यावेळी सहस्र चंद्राचे किरण असावेत अशा तेजात माझेंही स्वरूप तेजमय होऊन गेले. रात्रभर अशाच स्थितीत होतो. प्रातःकाली गुरू उठून आले. त्यांनी मजकडे पाहून मला पूर्ववत केले.
असे अनेक अनुभव घेत ऋध्दि-सिध्दींचे वाटेस न जातां गुरू सेवा चालविली. गुरूंनी सांगितले आता इतर ठिकाणी ऋध्दि सिध्दींचे वाटेस न जाता गुरू सेवा चालविली. गुरूंनी सांगितले, ‘आता इतर ठिकाणी लक्ष देऊ नको. आत्मचिंतन कर’ असे सांगून त्यांनी माझे नांव ‘निरंजन’ ठेविले. ‘मी गुरूदक्षिणा काय देऊ, माझ्या देहाशिवाय मजकडे कांही नाही आणि देहपण नाशिवंत आहे’. गुरू म्हणाले मला सर्व काही मिळाले. 'स्वरूपी अखंड दृष्टी ठेव' हीच गुरूदक्षिणा. गुरूंनी कृपा करून गिरनारकडे जाण्यास आज्ञा दिली.
तेथून दुर्घट वनामधून सतत नामस्मरण व ध्यान करीत त्र्यंबकेश्र्वरी आलो. तेथून कोकण प्रदेश व भयानक वन लागले. सर्व प्रदेश निर्मनुष्य होता. झाडाखाली पडलेली फळे व पाणी असे सेवन करीत होतो. एक दिवस अतिश्रमाने एका नदीकाठीच झोपलो. गिरनारची वाट कळेनाशी झाली. म्हणून आर्तस्वराने दत्तात्रयांची नावे घेऊन हाका मारीत सुटलो. तेंव्हा अकस्मात एक भिल्ल आला. त्याने नीट वाट दाखवून दिली आणि तो नाहीसा झाला.
पुढे तीन बैरागी भेटले. ते व्दारकेस चालले आहेत असे कळले म्हणून त्याचे बरोबर पुढे निघालो. पुढे एका गांवात तो तिथे भिक्षेसाठी गेले आणि त्यांनी गुरूसाठी भिक्षा पाहिजे म्हणून खूपच साहित्य गोळा करावयास सुरूवात केली. हा त्यांचा लोभी स्वभाव व वागणे पाहून माझे मन त्रासून गेले. मी त्यांना सोडून दुसरा रस्ता धरला. तेथून धर्मपूर या गांवी आलो. तेथे एक शब्दब्रह्मज्ञानी बोवांची गाठ पडली. मी त्यांना ज्ञानाबद्दल विचारले पण प्रचितीचे काहीच दिसले नाही. तेथील भाविक मंडळींन मला बरेच दिवस ठेऊन घेतले. नेहमीसाठी येथेच रहा म्हणू लागले. उत्तम भोजनाची सोय होती. तेव्हा विचार केला आता येथे राहण्यात अर्थ नाही. एके रात्री त्यांना न सांगता सुरत या गांवाकडे गेलो. तेथे एक तपस्वी गाठ पडले. त्यांनी विचारपूस केली. त्यांनी ज्ञान म्हणून मला जे सांगितले ते एकून मला हसू आले. त्याचे गुरूमार्गाप्रमाणे -
।।म्हणे ब्रम्ह आहे उंच बहुत। मस्तक आकाशापरि येतं।।
।हात पाय स्थूळ बहुत। उदर मोठे विशाल पैं।।13।।
।म्हणे ते ब्रम्ह सर्वोत्कृष्ट। नाहीं याविण दुजे श्रेष्ठ।।
।ऐसे मज गुरूनें स्पष्ट। कथिलें आहे मजप्रति।।14।।
।त्यासी पहावयाचे लक्षण। पूर्व दिशेसी मुख करून।
।करावी छाया विलोकून। मुखावरी ध्यान धरोनि।।15।।
अशा प्रकारचे ध्यान व नाममार्गी पंथाचे बीजपंथ व क्रियापंथाची माहिती ऐकून फार त्रास झाला. या बाबांशी भाषणही करू नये असे वाटू लागले. म्हणून
।असो कोणी एक मुमुक्षानें। गुरू करावा विचारून।।
।मान्य जयाची वचने। वेदशास्त्रा मिळताती।।25।।

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

कवने अथवा श्लोकरुपांतले काव्यचरित्र चांगले लिहिले आहे तुमच्या वडिलांनी.पुढे इंग्रजी अंक ।।52।।वगैरे त्यांनीच लिहिले आहेत का ?

शशिकांत ओक's picture

12 Jul 2015 - 6:37 pm | शशिकांत ओक

अंक इंग्रजीत ?
आपण म्हणता ते अगदी योग्य आहे...
हस्तलिखितात अंक मराठीतून आहेत. मात्र जेंव्हा हे टायपिंग केले तेंव्हा इंग्रजीत ते करायला सोपे गेले नंतर ते बदलायचे राहून गेले. आपण ते लक्षात आणून दिलेत या बद्दल आभार...

अंक बदलून हे दोन्ही प्रतिसाद काढून घ्या संपामंकडून.चांगल्या रुपात राहील काव्य इथे.

तुडतुडी's picture

13 Jul 2015 - 1:40 pm | तुडतुडी

सुंदर. पुढचा भाग येवू द्या लवकर