कासरा :- एक वर्हाडी कथा
"भाऊsssss लौकर चालसान होssss थे कपिला कसच्याकशी करू राहली"
असा कल्ला शंकर दादांन केला तवा म्या भाकर खायाले बशेल होतो. वरनाचा घट पेंड संग फोडेल कांदा, तेल अन बुडी च्या हातची गरम भाकर. बाबा सकाउनच कामापाई अकोल्याले गेलते ते झाकट पडल्यावरीच आले, त्याहीले ज्योन बनून देल्ते माय न अन त्येच् ज्योन झाल्यावर म्या चुली म्हावरे बशेल होतो. थंडी च्या राती चुली म्हावरे बश्याले लै ख़ास वाटते. बाबा वसरीवरी बंगई वर बशेल होते थ्याइचा पान लाव्याचा कार्यक्रम ठरेल होता रातीचा, अन नेमका तवाच शंकर दादा चिल्लावत येऊ रायल्ता आमच्या बेबटीच्या अंद्रे.
म्या थाली वरुन उठुच रायल्तो तदलोग बुडी कनारली "तू काहाले वलवल करतं रे नसानकोंबड्या, पैले भाकर गिटजो मंग जाय कुटी जायतां तर"
तिचा आम्हा लेकराइवर लै जीव हाय! दादा सद्द्या नागपुर वेटर्नरी ले होता शिक्याले अन ताई च एक बरस आंदी लगन झालते.लायना म्या होतो घरचा अन तिले तर हरघडी लायनाच वाटो.
मीन कशी बशी भाकर गिटली तदलोग बाबाचा आवाज आला ते आईले आवाज देत होते "अरे तो लायना काय अंद्रे भजे तळू राहला काय हो!!!??"
आई माया इकळे पलटली अन म्हने "पय बाबू बावाजी बलाऊ राहले"
म्या बिंग धावत भैर आलो त बाबा शर्ट अन लुंगी लपेटुन रेड़ी होते ते मले बोलले
"बाबू हे घे 100 रूपये अन बिंग पयत जा असोलकाराच्या दुकानावर त्याच्याइकुन एक पाव गुड़, बाळांत शेप, लवण अन आटा आनजो मी वावरातनी जाऊ राहिलो, ते सामान आनुन आइले दे ते जे उंड्याचे गोये बनवन ते घेऊन फटकन येजो वावरात"
अन दरवाज्या मांगुन पायणाऱ्या माय कड़े एकडाव पाहुन ते वावरातनी निंगाले. मॅटर लक्षात आल्याच्यान मी बी साईकल काढून पायडल खैचत असोलकारा च्या दुकानावरी पोचलो, त्याहीचा लायना पोरगा जयंता माया ख़ास दोस्त होता.
तटीसा गेलो त जयंता चे बाबा म्हनाले "का बे?? इतल्या रातीचा झाक्टी नंतर कुकडे हिंडू राहला"
मी त्येच्या इकडे यादी सरकोली अन म्हनलो "काका बालंतसोपा पाहिजे कपिला गामन होती आमची, जनु राहली वाट्टे"
विषय बातच समजल्यावर काका नोकरावर चिल्लावले "नामदेव लाकड़ावानी काहाले उभा राह्यला सायच्या सामान बांध, बापू तुवा साइकल अटीच् ठु तुयाले बाबा त तुमची गाड़ी घेऊन गेले आस्तीन न तू मायी स्प्लेंडर घेऊन जाई बापा म्या साइकिल नेतो माया घरी, सकाउन घरी घेऊन येजो गाडी"
मी मनापासून बोललो "हाव काकाजी असंच करा लागते"
तदलोग सामान बांधून झालते. ते घेऊन म्या फूल स्पीड न गाडी पंगवत घरी आलो व गाडी स्टॅंडवरी लावतालावताच चिल्लावलो
"आई सामान घेशीन व " आई धावत वसरी वरून खाली आली अन थैली घेऊन अंद्रे गेली.
15 मिंटाच्या अंदर आई न कपिलेसाठी उंड्याचे गोये बनोले त्यांच्यात नी कुटलेली बालंत सोप गुड़ पानी अन लवन घालेल होते
"जाय बर बाबू बातच!! आत्तालोग जनली असन ते मुकी माय"
मी वावरात जाता बाबा म्हनाले "गनेशभाऊ न गाडी देली वाटते?"
म्हनले "हाव"
गोठ्यातनी 60 च्या बल्ब मंदी पाह्यले तर पुरी थकेल कपिला हुबी होती अन एक बारका गोळा आपल्या चार टांगावर उभा राहाची कोशिस करू रायल्ता. बाबानं ते उंड्याचे गोये घेतले अन कपिलेले जीव लावत चारले एक माया हाती देला अन मी चारत होतो तवा बोलले
"माय लेकराच्या हातून बाळंतईडा खाय व तुया पोटच्या लेकरावानी ह्याले बी दूध देजो" अन तिच्या पाया पडलो आम्ही मंग बाबान ते लायने प्रकरण उचलले भैर आनले अन कोमट पान्यान पुसले अन ते आपल्या टांगावर हुबे राह्यताच त्याले कपिलेच्या थानाले लावले अन माया इकळे वउन म्हनाले
"हे पाय गड्या गोऱ्हा वह्य हा अन मंगळवारी पैदा झाला, लाल रंगाचा हाय अन लै तेज हाय!! आपुन ह्याले बजरंग म्हनू हा!"
मी म्हनो "हाव" अन एकदमच मी अन बाबा घरी जायाले पलटलो
दुसऱ्या दीसा पासून मायावाला एक अल्लगच गेम सुरु झालता, म्या अकरावी मधे होतो तवा कालेज च काई टेंशन नाही रायत जाय, म्या दिवसभर कामधाम आटोपले का बाबा संग वावरात जात जाओ तटीसा बजरंगा संग खेळणे माया टाइमपास झालता, मित्र म्हनत
"सायच्या आता काय डुबरा हायस का बे !!! गोर्ह्या संग खेळाले??"
मी हसून वापस येत जाओ, कारण आता मी गाय दुहाले बी शिकलो व्हतो मीच कपिला दुहत जाओ अन नंतर बजरंग संग खेळत जाओ. होता मोठा तेज सायचा, होता माया कमरी इतकुसा पर सायचा बम उधम करे. हरनावानी टनटन उड्या मारे! त्या उड्याई पाई एकड़ाव आनले होते त्यानं घरावर गोटे. आमच्या गोठ्या बाजुन हीर होती आमची, मस्त बांधकाम करेल बावड़ी होती ते. एक राती कपिला दुहल्यावर म्या बजरंगा खुल्ला सोडला खेळाले . तो मस्त कुद्या मारत जाय, बारक्या आवाजातनी ऊँ ऊँ आवाज करत जाय, मस्त काही वेळा नंतर त्याचा आवाज बंद झाला अन एकदम शंकर दादा चिल्लावला
"भाऊ गोऱ्हा हिरीत पडला होsssss" मले अन बाबाले 2 सेकंद काहीच समजेच ना!!
जाग्यावर आलो त दोघ धावलो तर हीरी च्या अंदरुन आवाज येत जाय बाबा चिल्लावले
"बापू मार अंद्रे कूदी" मी घातल्या कपड़यानच कुदलो हिरीत पान्यात माया दोस्त डूबत होता म्या त्याच्या दोन टांगा इकुन अन दोन तिकुन घेतल्या खांद्यावर त बाबान खाली कासरा देला तो मी माया कमरीले लपेटला अन बजरंग ले घट धरले मंग बाबा अन शंकर दादान जीव लावून आम्हाले वर खैचले!. भाइर आलो त बेज्या थंडी पडेल होती, मंग शंकर दादा न तुराट्या परहाट्या जाळून ताप केला तो मी शेकला अन थरथर करणारा बजरंगा बी तिथेच धरला नंतर त्याले थोड़े दूध पाजले अन शांत केले आम्ही. असा हा आमचा बजरंगा. बाबा चा बी लै आवडता होता . मही 12वी झाली तवा मले भरोसा नाही वाटे इतला मोठा झालता बजरंगा पूरा
5 फुट, भरेल खांदे,टोकदार शिंग मस्त डुरकन्या मारत जाय तो!!. मी अन बाबा दिसलो का खुटा नाही त कासरा तोडून पयत आमच्यापाशी येत जाय .
मले 12वी ले मार्क चांगले आलते त दादा च्या सांगन्या नुसार मी पुन्याले एडमिशन घेल होती, 6-6 महिन्याचे सेमिस्टर नीरा पागल होत जाओ मी जिकडे पाहो तिकडे बिल्डिंगीच बिल्डिंगी. माया सारखा धुर्यावर जगेल पोर्याले हे कैदेवानी वाटे!. मंग मी उपाय म्हनुन ट्रेकिंग ले जाओ भैर हिंडो पुन्याच्या ग्रामीन भागातनी हिंड्याले गेलो का मले गाय अन वासरु पायल्या बरोबर लाड का कराव वाट्ते म्हणून मित्र मैत्रिणी दुचक्यात असत पर त्याहिले काय मालूम म्या माया बजरंगा अन कपिला शोधु राहलो.
दूसरे सेमिस्टर संप्याले आल्ते तवाची गोठ, मोबाइल परवड़े नाही त्या वख्ती हॉस्टेल ले बाबाचा फोन आला हाल चाल झाल्यावर बाबा हळूच फोन वर बोलले,
"बापु, माया लेकरा, ह्या दुष्काळान कपिला खाल्ली, चारा ख़तम, माही नोकरी हाय पर मास्तरकी मधे किती पैशे घराले लावा किती वावराले?? डेपो चा चारा आन्याले पैशे नोते त तिले लंबे सोडले चराले! तटीच काई खाल्ले का काही डसले माहिती नाही बापा पर लेकरा तुले दूध देनारी यक माय त गेली बापा" अन बाबा रडू लागले,
थोड्या वेळाने मीच म्हनलो "बाबा सोताले सांभाळा, माय तर गेली पर बजरंगा?"
बाबा सांगू लागले "बापा कपिला गेली त 3 दिवस चुलीत धुपट नोते!, मंग मीच त्याले गौरक्षण संस्थेत सोडून आलो रे"
बाबा परत रडू लागले त्याइले कशेतरी समजोले अन फोन ठेवता मीच रडू लागलो, तर माया रूममेट होता एक कराड चा विशाल जाधव तो मले समजवु बसला. त्यानं फोन करून चार मित्र मैत्रिणी अजुन बलावले अन भैर चाय पियाले घेऊन गेला!. दोस्त बी माये दोन दिवस उदास होते मह्या कपिला बजरंगाचे ऐकून तवा आमच्या मित्रायन लै काळजी घेतली मायी, सेमिस्टर संपता म्या भेटन ते गाडी घेऊन घरी गेलो तर माय लै रडली मले घट धरून अन उलशेक सावरलेले बाबा "रामकृष्ण हरी करत" बसले होते,
बंगई वर दादा बशेल होता, मी त्याइले म्हनले "चाला आपुन आपल्या बजरंगा ले भेटून येऊ"
तवा बाबा बोलले "नोका जासान तिकडे, त्यानं चारा सोडेल हाय"
पुरा बावला झाल्यागत मी साइकिल घेऊन गौरक्षण संस्थे च्या इकडे धावत सुटलो अन माया मांगे गाड़ीवर बाबा अन दादा येऊ लागले,
तिकडे गेलो तर तिथला नौकर पुंडलिक म्हने "भाऊ बरे झाले आला,तुयाला गोऱ्हा लै जिद्दी हाय लेक"
मी पोटात भरू लागेल हुली(ओकारी) ले सावरत त्याच्या पाशी पोचलो तर पुर्या हड्डीया दिसू लागेल माया बजरंगा धडपड करू लागला म्या पान्याची बाल्टी त्याले लावली त दोन घोट पानी पेला तो. मंग मी त्याले मह्या हातान हराळी चारली त्यानं ते एकच डाव जीभ लंबी करून घेतली अन एकदम मागं पडला! दादा बाबा पुंडलिक धावत आले अन मी तसाच गव्हानी वर हात टेकुन उभा राहलो.
"बजरंगा रेsssss गेले बापा माये लेकरु मले सोडून गेले होsssss" बाबा एकदम रडू लागले.
दादा त्यांना सावरत होता तवा ते उठून माया पाशी आले अन बोलले "लेकरा म्या मारले रे तुयाल्या बजरंगा ले मले माफ़ कर बापा पर काय करू तुले तरी सेमिस्टर च्या मधून कसे बोलावा अन हे जिद्दी जनावर बिलकुल चारा नाही खाये, म्या लै कोशिस केली, पर म्या मारले बजरंगाले रेssss"
मले आयुष्यात मोठे होनेच होते आज!
म्या बाबा ले सावरले त्याइले पुंडलिक न आनेल स्टूल वर बसोले पानी देले,मह्या लाडक्या बजरंगाची 5 माणसाच्या मदतीने गाडून मौतमाती नीट केली त्याच्यावरी एक दगड अन 2 अगरबत्त्या लावल्या. अन भकास तोंडाच्या बाबा अन दादा कड़े पायत होतो तवाच माये मोठेपनाचे सोंग गळून पडले, मी हलकेच साइकिल काढली अन मागे न वळता निंगालो, दादा बाबा धावत मांग आले माया गाडीवर , बंडी ची चाकोरी धरून मी वावरात पोचलो ते शंकर दादा शुन्यात पायत बशेल होता,
मले पाहुन त्याले तोंड फुटले "भाऊ मले समजले...."
मी पुढले ऐकलेच नाई,मागून उदास झालेले बाबा अन दादा आले, सरका चालत म्या गोठ्यात गेलो रिकाम्या खुट्याले पाहुन तिथच सुख्या शेनात बसलो तवा दादा अन बाबा न मले सहारा देला, अन पहिल्यांदाच अनावर होऊन म्या बोंबललो
"बजरंगाsssssssss"
पर आता माया हाती होतेच काय ??
फ़क्त एक नायलॉन चा कासरा सोडून!
(लेखनसीमा) बाप्या
प्रतिक्रिया
8 Jul 2015 - 9:22 pm | होबासराव
हापिसातुन निंगुन र्हायलो..घरी पोचल्या पोचल्या वाचतो :)
8 Jul 2015 - 9:35 pm | कैलासवासी सोन्याबापु
:)
8 Jul 2015 - 10:04 pm | संदीप डांगे
पानी आलं ना राजेहो डोयात...
8 Jul 2015 - 10:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
लै गोष्टी पायल हाय दादा बारका होतो तवा पासून आता निंगते एक एक आठोन
8 Jul 2015 - 10:17 pm | उगा काहितरीच
वा क्या बात है ! वाचायला थोडा जास्त वेळ लागला पण कथा अतिशय आवडली.असे काही वाचले कि मिपावर असल्याचे सार्थक वाटते.
8 Jul 2015 - 10:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
भारतात सर्वाधिक संस्कृत शब्द रोजच्या वापरात असलेल्या काही बोली भाषांत एक माझी वर्हाड़ी आहे ! काही अडल्यास नक्की विचारा मी प्रयत्न करेन समानार्थी द्यायचे
8 Jul 2015 - 10:55 pm | वॉल्टर व्हाईट
झाकट म्हणजे अंधारुन आल्यावर का ?
9 Jul 2015 - 7:11 am | कैलासवासी सोन्याबापु
होय झाकट म्हणजे अंधारून येणे
8 Jul 2015 - 11:27 pm | भिंगरी
'नसानकोंबड्या'याचा नक्की अर्थ काय?
माझ्या एका नातलग स्त्रीच्या तोंडात हा शब्द नेहमी असतो,पण त्या'नसनखवड्या'असे म्हणतात.
9 Jul 2015 - 7:26 am | श्रीरंग_जोशी
नसानकोंबड्याचा नेमका अर्थ मला सांगता येणार नाही. पण चंचल लहान मुलास त्याची आई (त्रागा व्यक्त करताना) एखादवेळेस ही उपाधी देत असते. बहुधा कुठलंच काम नीट पार पाडू न शकणार्या मुलाला.
सोन्याबापू माझ्यापेक्षा अधिक नेमकेपणाने सांगतील.
9 Jul 2015 - 7:13 am | कैलासवासी सोन्याबापु
प्रत्येक घरातली लक्ष्मी माय ह्या शब्दाचा वेगळा अन वेगळ्या अर्थाने वापर करते, वर्हाड़ी अक्षरशः शिवार शिवारात बदलत जाते साधारणतः "नालायका" चा रांगड़ा समानार्थी आहे तो
9 Jul 2015 - 10:07 am | उगा काहितरीच
वा हे माहीत नव्हते .
धन्यवाद ! माझे आजोळ विदर्भातील आहे , त्यामुळे अर्थ कळायला विशेष प्रयत्न पडले नाही. हं ही "बोली भाषा" असल्यामुळे वाचायला थोडी जड गेली इतकेच. शिवाय मागच्या बऱ्याच दिवसांत आजोळी जाणे झालेच नाही. (आजोळी मी बोलत असताना लोक परग्रहावरचा प्राणी असल्यासारखे पहायचे. आजोबांनी एखादे काम सांगितले कि माझीपण तारांबळ उडायची. जसे , खुंटीचा मनिला आन किवो मज्यावाला.)
8 Jul 2015 - 10:30 pm | बॅटमॅन
डोळ्यांत पाणी आलं.
9 Jul 2015 - 11:31 am | ब़जरबट्टू
हेच..
विदर्भाचा, त्यामुळे कथा पोहचली... :(
8 Jul 2015 - 10:54 pm | वॉल्टर व्हाईट
वाईट वाटले, बापू घरी परतल्यावर बजरंगाला घरी परत घेऊन येईल असे वाटले होते. ज्या अर्थी असे झाले त्या अर्थी ही सत्यकथा असावी. तुमच्या त्यावेळच्या कोवळ्या मनाला बरेच खरवडून घेली असणार ही घटना.
9 Jul 2015 - 7:15 am | कैलासवासी सोन्याबापु
कुठेतरी कुठल्यातरी जिल्ह्यातल्या कुठल्यातरी एका गावात कोण्याएका शेतकरी परिवारात हे घडलेच असेल वॉल्टर भाऊ, मी काही गोड काही कडु आठवणी चा कच्चा माल वापरून लिहिले!
8 Jul 2015 - 10:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
डोळ्यात पाणी आलं :(!!!
8 Jul 2015 - 11:08 pm | सुहास झेले
काय बोलू लेका..
8 Jul 2015 - 11:09 pm | मधुरा देशपांडे
आई ग्गं...सुचेना काय लिहावं ते. :(
अस्सल वर्हाडी भाषेतले लेखन खूप भावले.
8 Jul 2015 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी
फारच हॄद्य कथा सोन्याबापू.
हे वाक्य बहुधा खालिलप्रमाणे टंकायचे असावे.
ही कथा वाचून पंचवीस वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली. माझे आजोबा (आईचे वडील) दुधाचा व्यवसाय करायचे. माझे दोन्ही मामा नोकर्यांमध्ये स्थिरावल्याने व्यवसाय आकाराने कमी होत गेला. शेवटी दोनच म्हशी राहिल्या होत्या. एका उन्हाळ्याच्या दिवशी सकाळी सकाळीच आजोबा हार्ट अटॅकने गेले. त्या दिवशी त्या म्हशीसुद्धा चार्याला तोंड लावत नव्हत्या...
9 Jul 2015 - 7:21 am | कैलासवासी सोन्याबापु
देल्ली पण चालावे अन देली पण! चॉइस आपली आपली
8 Jul 2015 - 11:52 pm | प्यारे१
:((
बापुसाब ___/\___
9 Jul 2015 - 12:02 am | रेवती
भाषा सुरेख आहे पण कथा वाचून जीव गलबलला.
या भाषेतल्या आणखी कथा वाचायला आवडतील.
9 Jul 2015 - 12:06 am | श्रीरंग_जोशी
भाषा मराठीच आहे हो.
वर्हाडी ही मराठीचीच एक शैली आहे किंवा बोलीभाषा आहे.
9 Jul 2015 - 12:16 am | रेवती
तेच ते!
9 Jul 2015 - 12:12 am | रातराणी
सुंदर लिहलेय. काही शब्द कळले नाही पण भाव तंतोतंत पोचला.
9 Jul 2015 - 6:05 am | यशोधरा
आई गं :(
9 Jul 2015 - 6:56 am | जयंत कुलकर्णी
माणसां माणसांमधील नाती हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. पण जनावरे आणि माणूस यांच्यातील नाते अत्यंत सरळ, निखळ्ळ, सुटसुटीत, विश्वासपात्र असते. आता यात महत्वाची भुमिका मला वाटते जनावरांचीच असावी. कारण क्षणाक्षणाला, पावलापवलावर शेवटी स्वतःच्या सावलीला घाबरणारा माणूस आपल्या लाडक्या जनावरावर इतका विश्वास टाकूच शकला नसता. माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेम हा एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. कुत्र्यांच्या घसरगाडीच्या पर्यटनाचा उद्योग करणारा एका मालकाने म्हटले आहे, "मी गेली तीस वर्षे हा उद्योग करतोय. सफरीच्या शेवटी कुत्र्यांच्या गळ्यात गळा घालून न रडणारा माणूस मी अजूनतरी पाहिलेला नाही......''
कथा मस्त लिहिली आहे.. आणि भाषेचा तर प्रश्नच नाही. कानाला भलतीच मस्त वाटली....
9 Jul 2015 - 7:25 am | कैलासवासी सोन्याबापु
विशेषतः आपली प्रतिक्रिया फार महत्वाची मानतो काका! मिपा परिवारातल्या एका ज्येष्ठ लेखकाने ही दाद देणे म्हणजे बहुमान वाटतो!!आपणा कडून मला एकदा युद्धकथालेखन तंत्र ह्याचे बरकावे शिकायला आवड़तील
9 Jul 2015 - 7:26 am | कैलासवासी सोन्याबापु
सगळ्यांचे खुप खुप आभार मंडळी वेगळा विषय अन ग्रामीण भाषा होती म्हणुन थोडा चाचरत होतो! :)
9 Jul 2015 - 8:24 am | नाखु
अस्सल ग्रामीण (शंकर पाटील सारखी) कथा वाचली. डोळे कधी भरून आले तेही कळले नाही.
9 Jul 2015 - 8:46 am | प्रचेतस
अप्रतिम.
9 Jul 2015 - 9:58 am | नाव आडनाव
वाचतांना प्रत्येक वाक्याला मी तुमच्या बरोबर होतो.
9 Jul 2015 - 10:12 am | एस
अस्सल कथा. मजकुरावर विरामचिन्हे व परिच्छेदांचे संस्कार झाल्यास अजून उंची प्राप्त होईल असे वाटते.
9 Jul 2015 - 10:49 am | विशाल कुलकर्णी
अप्रतिम रे भावा ... ! जियो !!
9 Jul 2015 - 11:26 am | llपुण्याचे पेशवेll
सुंदर. वर्हाडी बोली खूप छान वाटली. कथा आवडली जरी दु:खान्त असली तरी.
9 Jul 2015 - 11:37 am | पैसा
हे असं जगले आहे गावात आणि मुके सोबती किती जीव लावतात तेही अनुभवले आहे. वाचताना डोळ्यात पाणी आलंच. या बोलीत लिही अजून. लोकांना नीट ओळख होऊ देत!
9 Jul 2015 - 11:43 am | अमोल मेंढे
लडवलं नं भाऊ तुनं. माह्या घरचा बुढा मेला (आबाजी)तवा आठ दिवसात दोनय कुत्र्यानं जीव सोडला.
9 Jul 2015 - 11:56 am | चिनार
फारच सुंदर बापूसाहेब...पाणी आले डोळ्यात ...
तदलोग,अंद्रे हे शब्द खूप दिवसांनी ऐकले. छानच लिहिलंय !
या वाक्यासाठी सलाम घ्या !
9 Jul 2015 - 12:00 pm | शि बि आय
भाषेत एक प्रकारचा रांगडेपणा असूनहि खूप गोडवा आहे आणि तो लेखनात उतरला आहे.
शेवट मात्र चटका लावून गेला हो !!! निदान बजरंगा तरी घरी यायला पाहिजे होता.
नितळ आणि अतिशुद्ध प्रेम काय असते ह्या जिवांकडून शिकावे.
9 Jul 2015 - 12:12 pm | राही
अगदी काळजाला हात घातलात. मुक्या प्राण्यांची माया अनुभवली आहे.
वर्हाडी आणि अहिराणीत एक गोडवा आहे. शिवाय गुजरातीचा ही किंचित प्रभाव आहे. अहिराणीवर जास्त.
खूप अस्सल लिखाण.
9 Jul 2015 - 1:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
वर्हाड़ी वर हिंदी चा भयंकर प्रभाव,भाषेचा बाज म्हणल्यास सतत आसमानी झेलनारा माणुस जसा रग्गेल होतो तेच तो बाज रिफ्लेक्ट करतो, मे महिन्याच्या उन्हात वावर नांगरुन जमीन तयार करणारे कास्तकार इथे सगळे, मी पुण्यात आलो तेव्हा आमची एक फलटण ची मैत्रीण होती ती कायम "बापु काय रे बाबा भाषा तुमची" म्हणत असे गमतीने! नंतर नंतर आम्ही तिला नीट सगळे वाकप्रचार म्हणी शिव्या वगैरे शिकवल्या होत्या
9 Jul 2015 - 2:30 pm | सूड
शेवट अस्वस्थ करणारा आहे, पण लिखाण नेहमीप्रमाणेच उत्तम!! लिहीत राहा.
9 Jul 2015 - 3:24 pm | मित्रहो
पण आता गावाकडबी ना गोऱ्हे रायले ना कालवडी
9 Jul 2015 - 3:53 pm | सानिकास्वप्निल
छान लिहिले आहे, वाचून मन हळवं झालं.
वर्हाडी बोलीतील लेखन भावले.
9 Jul 2015 - 8:08 pm | नूतन सावंत
वऱ्हाडी भाषेला कोपरे नसल्याने(जसं प्लॅटफॉर्मचे कोपरे घासल्यावर फलाट झाल्यावर ऐकायला वाटते हे पुलंनी सुरेखरीत्या मांडले आहे.)अतिशय गोड वाटते कानांना.
पण शेवट वाचताना काही दिसेनासे झाले डोळ्यांना._/\_
9 Jul 2015 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
खूपच सुंदर !! भावनावेगात गुंतून कधी त्याच्याबरोबर वाहू लागलो हे समजलेच नाही !
वर्हाडी भाषा येत नसून, प्रवाही लेखनामुळे, सगळे अर्थ न अडखळता समजत गेले याचे कथा संपल्यावर आश्चर्य वाटले ! हे या कथेचे शक्तीस्थळ आहे !
10 Jul 2015 - 6:52 am | अनन्त अवधुत
छान लिहिले आहे.
काही काही वाक्प्रचार खूप दिवसांनी ऐकले घरावर गोटे येणे , काय भजे तळू राहला काय , इत्यादी.
सोन्याबापू मान गये. पहिले ते अकादमीवाली कहानी अन मंग हे कासरावाली. लय भारी लिवता.
11 Jul 2015 - 1:46 pm | अजया
कथा वाचताना अापोआप भाषा समजत गेली.अप्रतिम लिहिलंय.पाणी आलं डोळ्यात :(
11 Jul 2015 - 11:14 pm | प्रीत-मोहर
मस्त लिहिलीये. या बोलीभाषेत अजुन लिखाण येउदेत. फार कष्ट नाही पडले तसे समजायला.
याच नोटवर आरोही आणि त्रि अहिराणीत लिहा व बायना!!!
11 Jul 2015 - 11:40 pm | आतिवास
अप्रतिम!
12 Jul 2015 - 4:52 am | स्वाती२
सुरेख!
12 Jul 2015 - 6:15 am | स्पंदना
भाषा जरी शब्द न शब्द उमजत नसली, तरी भाव उमजला सोन्याबापू.
लिहित रहा.
आमच्या घरीबी जनावर हायती. आता ट्रॅकटरर्च्या म्होरं जरी उगा वैरणीला अन उसाभरीला भार वाटत असली, तरी शेतकर्याच्या दारात जित्राप असावं म्हुन्श्यान आजून दोन खोंड हायती दावणीला!! खरं आता माती सुटली, वास ग्येला आंगाचा, तर ती मुकी जनावर कुटन वळख दावायला? समद भकास गमत जी मनाला. काय बी आपलं वाटत न्हाय. ह्यो ऽऽ सात-आट फूट उंच सावळ्या बगा कुरवाळ कुरवाळ म्हनत डोचक आंगाला लावायचा तवा त्याच्या शिंगाच्या घेर्यात आमी आख्ख मावायचो. खर कदी त्या शिंगान कोलमडायला सुदिक झालं न्हाय. असा अल्लाद काडुन घ्याचा शिङ वर. ह्ये मुटी मुटी येव्हढा देकणा डोळा त्याचा, त्या वरच्या लांबसडक पापण्या, डोळ्याभवताल पडलेल्य चामडीच्या घड्या.
लय भारी लिवलसा सोन्याबापू. काय्बाय डोळ्याम्होरं आलं आन कायबी दिसनास झालं.
12 Jul 2015 - 7:13 am | कैलासवासी सोन्याबापु
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मित्रहो
29 Jan 2022 - 5:24 pm | चौथा कोनाडा
वाचता वाचता डोळे कधी भरून आले तेही कळले नाही !
अ ति शय सुंदर हृदयस्पर्शी !
_/\_ सोन्याबापु _/\_
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !