श्री. शशिकांत ओक यांनी पाताळेश्वरवरील लेखात बर्याच गोष्टींचा उहापोह केला आहे. त्यातील एक भाग म्हणजे "लेणी" या विषयावर मागितलेली माहिती. दुसरा बौद्ध धर्माचा भारतातील र्हास.. आज लेण्यांबद्दल थोडी माहिती बघू.
मी भारतातील मंदिरे या लेखमालेत "गिरिशिल्पे" या नावाखाली लेण्यांवर एक लेख लिहला होता. त्याची लिन्क
http://www.misalpav.com/node/16437
या लेखात आपल्याला लेण्यांविषयी बरीच माहिती मिळेल. त्या ठिकाणी लेणी ही मंदिरांचा एक प्रकार म्हणून पाहिली होती. आज श्री. ओकांना माहिती पाहिजे आहे ती जरा निराळी आहे म्हणून हा लेखनप्रपंच
लयन (गृह) या संस्कृत शब्दावरून लेण हा शब्द झाला व लेणचे रुपांतर लेणे मध्ये झाले. नाशिकजवळच्या पांडवलेण्यात प्रथम लेण शब्द दिसतो. " एतच लेण महादेवी महाराज मातामहाराज पतामही ददाति निकायस महाबनियान भिक्षु संघम ".शैलगृहे आणि शिलामंदिरे ही अन्य नावे.
डोंगरातील पाषाण खोदून, विशेषत: पावसाळ्यात रहाण्य़ाकरिता, केलेले घर म्हणजे गुहागृह किंवा लेण. प्रथम साधी असलेली नंतर चित्रे व शिल्पे यांनी अलंकृत केली गेली. लेण्यात स्वयंपाकघर, स्नानघर वा शौचालय यांची निराळी सोय केलेली दिसत नाही.
लेण्यांचे धर्मानुसार ब्राह्मणी, जैन व बौद्ध हे तीन प्रकार. जैन व बौद्ध लेणी प्रथमची; ब्राह्मणी नंतरची बौद्ध व जैन लेणी एकाच काळातील. सर्वात प्राचीन लेणी (इ.स.पूर्व तीसरे शतक) बिहारमधील. त्यांना तेथे सातघर म्हणतात. हीनयान व महायान या दोनही पंथांची लेणी आढळतात. हीनयान पंथाची लेणी जास्त पुरातन. त्यांत बुद्ध मूर्ती नाही. महायान पंथातील लेण्यात स्तूप, दागोबा वा बुद्धाची मूर्ती दिसते. सुरवातीची बौद्ध लेणी वर्तुळाकार होती, जणु स्तुपाचा साचा.
ऐहिक व धार्मिक असे दोन भागही करता येतील. ऐहिक लेणी फारच कमी. महाराष्ट्रातील एकमेव म्हणजे नाणेघाटातील देवकुल.(श्री.वल्ली, { वा भटकंतीतील इतर वारकरी} नाणेघाटावर , सचित्र लेख पाहिजे फोटो मात्र पावसाळ्यातीलच !)
भारतात साधारणत: ज्ञात अशी हजार एक लेणी आहेत. त्यातील नउशे महाराष्ट्रात आहेत. अजूनही लहान लहान लेण्य़ांचा शोध लागत असतो. या हजार लेण्यात ब्राह्मणी आणि जैन मिळून शंभर एक. उरलेली बौद्ध.
महाराष्ट्रात जास्त लेणी खोदली गेली याची कारणे तीन. एक म्हणजे लेणी खोदावयास लागणारा कडक व एकसंध दगड सह्याद्रीत सापडतो तसा उर्वरित भारतात नाही. दुसरे कारण आर्थिक. पूर्वी भारताचा व्यापार अरबी समुद्रामार्गे होता व कोकणातील बंदरातून माल निरनिराळ्या घाटातून देशात/देशातून बंदरांत जाई. येथील श्रीमंत व्यापारी लेण्यांचा खर्च करावयास तयार असत. तिसरे, स्वतंत्र, प्रबल आणि संपन्न राजसत्ता महाराष्ट्रात होती हे राजकीय कारण. सातवाहन, वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकुट या सत्तांनी वा त्यांच्या सामंतांनी लेणी खोदावयास लागणारे स्थैर्य दिले.
लेणी तयार करणे हे दीर्घ काळ चालणारे काम होते. छिन्नी व हातोडी ही दोनच हत्यारे व दगडही कठीण. बर्याच वेळी काम वरून खाली करत यावे लागे. एखादा घाव जोराने पडला व दगडाचा टवका जास्त उडाला तर दुरुस्ती करणे शक्य नव्हते. मूर्ति करतांना चुकले तर दुसरा दगड घेऊन दुसरी मूर्ति करणे शक्य असते. इथे त्याला अजिबात वाव नव्हता. थोडक्यात, वेळखावू काम. उदा. वेरुळचे कैलास लेणे. एकुण वेळ १३५ वर्षे ! गेला बाजार पाच पिढ्या.लढत होत्या. मुलाला किंवा शिष्याला तयार करणे सोपे नव्हते. थोडक्यात याला प्रचंड खर्चही येणार असणार. श्री..ओक विचारतात "कोण देत होते हा पैसा ?" भारताच्या संपूर्ण इतिहासात आपल्याला येथेच किरणशलाका दिसते. बर्याच लेण्यात दात्यांची नावे दिलेली आढळतात. यात राजघराण्यातील नावे आहेत, श्रीमंत व्यापारी आहेत आणि महत्वाचे म्हणजे सामान्य माणसेही आहेत ! तुमची कुवत कमी आहे ? मग एक खांब खोदाईचे किंवा पाणपोयीचे पैसे द्या. आनंदच आहे. आजच्या सार्वजनिक गणपती सारखे. दहा-वीस देणारे असतात व दहा-वीस हजार देणारेही असतात. परत काम मोठे असेल तर पुढील पिढीही हा भार उचलत होती. आणि आणखी एक महत्वाची नोंद घेतली पाहिजे. यात धर्माचा अडसर नव्हता. महाराष्ट्रातील राज्यकर्ते बुद्द किंवा जैन नव्हते तरी त्यांनी बुद्ध-जैन लेण्यांना विरोध तर केलाच नाही पण मदतच केली.सगळेजण एकमेकांना मदत करत होते. खर्या अर्थाने सुवर्णकाळ होता तेंव्हा !!
लेण्यांचे कालानुसार तीन वर्ग कल्पिले आहेत. (१) इ.स.पूर्व २०० ते इ.स.२००. (२) पाचवे शतक ते सातवे शतक पूर्वार्ध. (३) सातवे शतक उत्तारार्ध ते दहावे शतक.
हीनयान पंथातील लेणी सर्व प्राचिन. यात बुद्धाची मूर्ती नाही कारण बुद्ध देवतास्वरूप पावला नव्हता.ही कसर (?) महायान पंथाने भरून काढली. त्यांच्या लेण्यात मूर्ति आहेत. भिक्षूंना लेण्यांतील लावण्याची गरज नसावी मात्र्र कलासक्त निर्मात्यांनी ही साधी लेणी कलांची संग्रहालयेच बनवली. प्रथम शिल्पकृती घडवल्या व नंतर चित्रकला अवतरली. हा क्रम उलटा असावयाची शक्यता नक्कीच आहे. पण चित्रे काही शिल्पांइतकी दीर्घकाळ काळाशी टक्कर देवू शकत नाहीत. आज आपण अजंठा-वेरुळ सारख्या लेण्यांतील चित्रे पाहू शकतो पण ती तुलनात्मक दृष्ट्या नंतरचीच.
बौद्ध लेण्यात चैत्य व विहार हे दोन प्रकार दिसून येतात. चैत्य म्हणजे भिक्षूंचे प्रार्थनामंदिर व विहार म्हणजे त्यांचे निवासस्थान. चैत्यात मूर्ति, स्तूप किंवा दागोबा असतो. विहारात त्यांच्या निवासाची व्यवस्था. मोठ्या लेण्यात मध्ये चौक व भोवताली खोल्य़ा असतात तर लहान विहारात खोदून काढलेल्या खोल्या.
ब्राह्मणी लेण्यात देवतांच्या मूर्ति, शिवलिंग इ. असतातच पण भरीला रामायण-महाभारतातील, पुराणातील प्रसंगही दाखविलेले असतात. लेणे हे एखाद्या मंदिराचेही रूप धारण करू शकते. वेरुळचे कैलास लेणे हे मंदिरच नव्हे काय ?
लेण्यांचे नुकसान तिघांनी केले. प्रथम काळाने जे निर्माण होते ते विनाश पावतेच. आज आपण आधुनिक विज्ञानाने त्याचा परिणाम थोडाफार थांबवू शकतो. दुसरे परधर्मीयांनी जाणूनबुजून. पण देवालयांपेक्षा थोडे कमी. तिसरे स्वधर्मीयांनी अज्ञानाने. अजंठ्याला धुनी पेटवून ध्यान धरणार्या बैराग्याला आपण कलावैभव नष्ट करत आहोत याची कल्पना॒च नव्हती. अर्थात त्यांना काय दोष देणार ? अजिंठ्यातील चित्रांवर व्हार्निशचा लेप देण्याची घोडचूक आपण विसाव्या शतकातही केलीच !
लेण्यांवरून व त्यांच्यातील लेखांवरून त्या त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक, राजकिय, सामाजिक, आर्थिक इतिहासाची ओळख होते हे एक महत्वाचे अंग.
आज लेण्यांची तांत्रिक माहितीच दिली आहे. गिरिशिल्पे या मिपावरील लेखात इतर माहिती व काही फोटोही आहेत. ते तिथे पहा किंवा कोणी महाभाग ते व इतर अनेक फोटो इथेही डकवू शकेल (धन्यवाद)
हो, एक राहिलेच. महत्वाची लेणी कोठे आहेत हे द्यावयास पाहिजे कां ? म्हणजे आपण सर्व ठिकाणांना भेट देऊच असे नाही पण निदान जालावर आपण चांगली छायाचित्रे पाहू शकू. अवष्य कळवा.
शरद
प्रतिक्रिया
12 Jun 2015 - 9:27 pm | कंजूस
जलद आणी छान माहिती.
12 Jun 2015 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका अत्यंत महत्वाच्या प्राचिन ठेव्याची सुंदर तोंडओळख !
त्यात जाणकारांनी भर टाकल्यास हा एक उत्तम माहितीपूर्ण धागाच नव्हे तर संदर्भधागाही होऊ शकेल.
12 Jun 2015 - 9:58 pm | पैसा
खरेच सर्व भटक्यांनी त्यांनी पाहिलेल्या लेण्यांची यादी आणि छायाचित्रे इथे द्यावीत.
12 Jun 2015 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा
वाचताना अतिशय छान वाटत होतं.
लेणी समांतर:-
@चैत्यात मूर्ति,स्तूप किंवा दागोबा…> हे आगोबा चे मूळ ऐतिहासिक रूप असावे का? ;-)
Calling खाटुकम्यान! :-D
13 Jun 2015 - 12:14 am | एस
वाचनखूण साठवलेली आहे. लेण्यांच्या संदर्भाने दोन प्रश्न मला नेहमीच पडतात. एक म्हणजे, लेणीस्थापत्यकला नंतर लोप का पावली, त्यात कुशल असणारे कारागीर नंतर कुठे गेले. आणि दुसरे, ह्या लेण्यांचा इतिहासही लोकांच्या विस्मृतीत कसा गेला? आज स्थानिकांना विचारले तर लेण्या पांडवकालीन आहेत असेच उत्तर येते. ही समजूत का आणि कशी प्रबळ झाली?
13 Jun 2015 - 9:49 am | प्रचेतस
बौद्ध धर्म वेगाने लयास जाऊ लागला होता. राष्ट्रकूटांच्या कालखंडात कैलाससारख्या सर्वश्रेष्ठ लेण्याची निर्मिती झाली पण नंतर लेणी खोदायचे काम अधिकाधिक खर्चिक होऊ लागले व मंदिरनिर्मितीकडे कल वाढला. मंदिरांचे बांधकाम कमी वेळात व कमी श्रमांत होऊ लागले त्यामुळे लेणीस्थापत्यकला लोप पावू लागली. ११ व्या शतकापर्यंत अगदी तुरळक ठिकाणी लेणी खोदण्याचे काम चालू होते. उदा. मांगी-तुंगी, अंजनेरी, वेरूळ येथील जैन गुहा. अगदी १४ व्या शतकापर्यंतही हे काम चालू असलेले आढळते. उदा. पाटेश्वरच्या डोंगरातील गूढ शैवलेणी
लेणी खोदणारे हे सगळे कलाकार नंतर मंदिरनिर्मितीकडे वळले असतील.
लिपी आणि वस्तीची ठिकाणं बदलली.
ब्राह्मी लिपीचा अस्त होऊन देवनागरीचा वापर वाढला त्यामुळे लेण्यांत खोदलेले लेख समजेनासे झाले. बौद्ध लेणी ही एकाकीपणे डोंगरात होती ती विस्मृतीच्या पडद्यांआड गेली तर ब्राह्मणी आणि जैन लेण्यांचा वापर मात्र होत राहिला.
बौद्ध धर्माचा संपूर्णपणे र्हास झाला होता. एकेकाळी भारतात बैद्ध धर्म इतका प्रबळ होता अआणि बहुसंख्य बौद्ध लेणी हे तत्कालीन राज्यकर्त्यांनी तसेच बौद्धसंघांनी खोदवलेली आहेत हेच लोकांना माहित नाही. शिवाय इतके भव्यदिव्य बांधकाम पांडवांशिवाय कोणीच करु शकत नाहीत ही समजूत निर्माण झाली.
13 Jun 2015 - 10:06 am | एस
सविस्तर चर्चेबद्दल धन्यवाद, वल्ली!
13 Jun 2015 - 7:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, चांगली माहिती. आभार.
-दिलीप बिरुटे
13 Jun 2015 - 8:40 am | अजया
माहितीपूर्ण लेख.महत्त्वाच्या लेण्यांची माहिती एका ठिकाणी फोटोसह संकलित झाल्यास छान संदर्भसूची तयार होऊ शकेल.
13 Jun 2015 - 8:56 am | विशाखा पाटील
खूप सुंदर लेख!
13 Jun 2015 - 9:38 am | प्रचेतस
धन्यवाद काका सविस्तर लेखाबद्दल.
लेण ह्या शब्दाचा प्रथम उल्लेख नाशिकच्या लेणीतचनक्कीच नाही. बहुधा त्यापेक्षाही जुना उल्लेख गांधारपालेच्या लेणीत आहे जो मी खाली देत आहे. ह्याउपरही अजून जुना उल्लेख महाराष्ट्रातल्याच कुठल्यातरी बौद्ध लेणीत आहे. असो. उपरोक्त 'लेण' हा उल्लेख ३ र्या क्रमांकाच्या देवीलेण्यात आहे आणि हा वशिष्ठिपुत्र पुळुमावीचा लेख आहे. गौतमीपुत्र सातकर्णीची माता गौतमी बलश्री हिने हा कोरविला असून त्यात गौतमीपुत्राची महती वर्णित केली आहे. (इ.स. २ रे शतक)
दागोबा शब्दाबद्दल-
दागोबा हा सिंहली शब्द असून धातुगर्भ ह्या शब्दापासून त्याची व्युत्पत्ती झाली आहे. पार्थिव देहाचे काही अवशेष किंवा भिख्खुंच्या वापरत्या वस्तूंवर बांधलेला स्तूप म्हणजेच धातुगर्भ अथवा दागोबा. महाराष्ट्रातील गिरिलेण्यांत त्या मोनोलिथिक असल्याने धातु ठेवता येत नसत तेव्हा ते बहुतांश वेळा हर्मिकेच्या खड्ड्यात ठेवले जात असून त्यावर छत्र उभारले जाई.
बौद्ध लेणी ही सर्वात प्रथम, नंतर जैन लेणी मग ब्राह्मणी लेणी. अर्थात महाराष्ट्रात जैन लेणी खूप उशिरा आल्या. भारतातील पहिली जैन लेणी म्हणजे हाथिगुंफा. तिथला कलिंगधिप खारवेलाचा इ.स.पू २र्या शतकातला हाथीगुंफा प्रस्तरलेख प्रसिद्ध आहे. हे लेणॅ त्याने जैन धर्माला दान केले आहे.
महाराष्ट्रातला सर्वात प्राचीन जैन लेख हा महाडजवळाच्या गांधारपाले लेणीत असून 'नमो अरहंतानं कातुनं भदंत इंदरखित लेणं कारापितम पोढि च सह काहिसह' असे त्याचे वाचन आहे.
महाराष्ट्रातील काही लेण्यांत कारागीरांचेहुद्दे कोरलेले आहेत जसे की कान्हेरीच्या लेण्यांतील सेलकवढकी (शैलगृह खोदणारा), खदरकी (खोदकाम करणारा), मिथिक (चकाकी आणणारा) इत्यादी.
13 Jun 2015 - 10:26 am | गुनि
do you really feel that the LENI's are made by humans. I read one book " Manus pruthvivar upra" . pustak vachla ki v4 karav lagto
any comment
13 Jun 2015 - 11:41 am | विशाल कुलकर्णी
छान, माहितीपूर्ण लेख आणि त्यावरचा वल्लीचा प्रतिसादही उपयुक्त. धन्यवाद !
13 Jun 2015 - 1:58 pm | कंजूस
आता भाजे कट्टा जाहिर करा.
वेळ वाचावा म्हणून येतानाच एखाद्या हॅाटेलातून हवे ते खाद्यपदार्थांचे पार्सल आणावे.मळवली स्टेशनजवळच्या फाटकाजवळच्या टपय्रांत मिसळ चांगली मिळते. भाजे कट्टा ठरल्यास हा प्रतिसाद तिकडे हलवावा.
13 Jun 2015 - 2:28 pm | प्रचेतस
पुढच्या रविवारी?