आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे !
तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं .
डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो.
त्या निमित्ताने देशात बर्याच ठिकाणी फिरलो .
आज महाराष्ट्र उद्या आंध्रमधे परवा आणि कुठे !
मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरांमध्येपण जायला लागायचं.
एकटाच फिरायला लागायचं. रात्री एस्टी , एशियाड मिळेल ती गाडी पकडायची आणि सकाळी मुक्कामी पोचायचा. भत्ता ठरलेला असायचा त्यात बसणार बजेट लॉज शोधायचा आणि पुन्हा क्लायंटला भेटायचं . दिवसभर फिरल्यावर संध्याकाळ खायला उठायची .
दिवसभर दमला कि हॉटेलवर येउन एक बीयर आणि बिर्याणी घेउन टीव्ही बघत बसायचा.
अशा वेळी एकटाच असेल तर लॉजचा पोर्या , मॅनेजर हळूच "चाहिये क्या ?" विचारायचे कधी खूणवायचे.
पण अशा गोष्टींची तीव्र घृणा आणि भिती असल्याने यापासून ४ हात लांबच राहायचो. पण काहीजण फार चिक्कट असतात . फोटो बघा , आवडला तर पैसे द्या ई. सांगत मागेच लागायचे , त्यांना कटवणे फार कटकटीचे असायचे.
एकदा असाच रूम मध्ये टीव्ही बघत असताना दारावर नॉक झाले. दरवाजा उघडला तर समोरून एक विशीची एक तरूणी पटकन आत घुसली .
कसेतरी घातलेले तोकडे कपडे आणि फिकुटलेल्या चेहर्यावर लावलेली लाली आणि लिपस्टिक !
उत्तेजित होण्यापेक्षा अत्यंत केविलवाणा दृष्य होतं.
तिला शांतपणे सांगितले , बाहेर जा ! तर तिचा प्रेमळ आग्रह चालूच . म्हणलं, बाई , मला असला नाद नाही , तुम्ही जावा .
५-१० मिनिट असे झाले तेव्हा मी ओरडलो , जा नाहितर धक्के मारून हाकलेन.. तशी ती भेदरून रडायला लागली..
साब , करो ना . एक बार तो !
आज पैसा नही मिलेगा तो आज भी खाना नही मिलेगा आज तिसरा दिन है साब !
रेहेम करो! भूक लगी है साब. बहोत भूक लगी है !
तिच्या फिकुटलेल्या चेहर्याचे कारण कळले आणि चिवटपणाच्या मागची अगतिकता.
-------------------------------------------------------------
रूम सर्विसला कॉल करून अजून एक बिर्याणी मागवली. तिला जेवू घातलं आणि थोडे पैसे देउन पाठवलं.
साला तेव्हापासून कोणी टाकून दिलं की जामं डोक फिरतं !!
तेव्हापासून कळलं ,अन्नाची किंमत पैश्यावर नाही तर भुकेवर ठरते !
प्रतिक्रिया
11 Jun 2015 - 7:28 pm | रेवती
अनुभव वाचला. कसंतरीच झालं. शरीरविक्रिय करणार्या स्त्री पुरुषांवरील कथेवर, चर्चेमध्ये नक्की काय बोलावे हे कधीच कळत नाही.
11 Jun 2015 - 7:28 pm | किसन शिंदे
अतिशय वाईट अनुभव मुनीवर. :(
11 Jun 2015 - 7:28 pm | जेपी
हम्म..
11 Jun 2015 - 7:32 pm | सतिश गावडे
सुन्न करणारा अनुभव.
11 Jun 2015 - 7:32 pm | सूड
.
11 Jun 2015 - 7:34 pm | किसन शिंदे
वल्ल्याने त्याचा मित्राचा खडकी स्टेशनवरचा सांगितलेला किस्सा आठवला या धाग्याच्या निमित्ताने.
11 Jun 2015 - 7:38 pm | टिवटिव
सुन्न करणारा अनुभव.
11 Jun 2015 - 7:43 pm | मोहनराव
ताटात अन्न वाया घालवण्याची खुप लोकांना घाण सवय असते. लग्नकार्य किंवा इतर अनेक कार्यक्रमात अन्न खुप वाया घालवतात. बुफे पद्धत असेल तर जादा घेऊन नंतर जात नाही म्हणुन टाकुन देणे असेही प्रकार होतात. तसेच काही लोकांना हॉटेलात मागवलेले जेवण गेले नाही तर उरलेले ते अन्न घरी पॅकिंग करुन घेऊन जाण्यात लाज वाटते.
11 Jun 2015 - 8:01 pm | एक एकटा एकटाच
खरच
फार वाईट आहे हे......।
11 Jun 2015 - 8:03 pm | एस
कुणाच्या शरीराच्या भुकेपुढे कुणाची अन्नाची भूक अशी हरत असते. रोजच.
यानिमित्ताने कितीतरी असेच चेहरे नजरेपुढून तरळून गेले.
थोडे अवांतर होईल, पण कधीकधी फार प्रकर्षाने वाटते की निदान शरीरविक्रीच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यतातरी दिली जावी. जेणेकरून या अभाग्यांना काही शासकिय सवलती/योजनांचा आधार तरी देता येईल.
11 Jun 2015 - 8:56 pm | मालविका
मी सध्या नेदरलंड येथे वास्तव्यास आहे. amsterdam हे रेड लाईट एरिया साठी (कु)प्रसिद्ध आहे. पण इथे तो विभागही तितकाच स्वच्छ आणि व्यवस्थित आहे . त्या बायकांनाही इतर लोकांसारखाच आरोग्य विमा बंधनकारक आहे. ठराविक दिवसांनी त्यांची आरोग्य तपासणी बंधनकारक आहे . महिन्यातील "त्या ३ " दिवसात त्यांना काम करायला लागू नये म्हणून वेगळा भत्ता मिळतो . ठराविक वयानंतर त्यांना बळजबरीने काम करावे लागू नये म्हणून त्यांनादेखील पेन्शन मिळते . त्यांची मुले नेहमीच्या शाळेत जातात . शरीर विक्रय कोणी मनापासून करत नाही परंतु त्यात निदान सरकारकडून त्यांचे शोषण होत नाही . निदान ground level ला तरी . सरकार या धंद्यावर भरपूर कर लावून पैसा गोल करते हे जरी खरे असले तरी त्यांना तेवढ्या सुविधा देखील पुरवते . कायदेशीर व्यवसाय केल्याने किती जनी आल्या?कुठून आल्या?इत्यादी माहिती त्यांच्या रेकॉर्ड ला असते . आणि त्यांच्या पुनर्वसनतहि सरकार मदत करते .
11 Jun 2015 - 8:04 pm | सुबोध खरे
मुनिवर्य
आपल्याशी एकदम सहमत. पोटाची भूक काय असते ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळत नाही. ओडीसा मध्ये दुष्काळात लोक जीव जगवण्यासाठी उंदीर खाताना पाहिले आहेत किंवा बिहार मध्ये शेत मजूर दोन वेळचे जेवण (लीट्टी चोखा) आणि १८०० रुपये वर्षाला यावर गुजराण करताना पाहिले आहे. त्यामुळे स्वतःच्या मुलांना ताटात अन्न टाकायला मी मुळीच परवानगी देत नाही. परंतु आमचे काही हुच्च नातेवाईक (त्यांच्या मुलांना घेऊन आलेले असताना)हॉटेलात उरलेले अन्न पॅकिंग करुन घरी घेऊन येत असताना त्यांनी ते अन्न कचर्यात टाकताना पाहीले.अशी अन्नाची नासाडी करताना पाहिले तर तळपायाची आग मस्तकात जाते पण काही बोलता येत नाही.
11 Jun 2015 - 8:26 pm | स्रुजा
सुन्न व्हायला होतं असं काही वाचलं की. खुप वर्षांपुर्बी एक जण घरी आला होता, काही तरी विकायला. पाठ केलेली वाक्यं तो ईंग्रजी मध्ये बोलला मग बाबा पण त्याच्याशी ईंग्रजी मध्येच बोलायला लाग्ले.तो थोडा गडबडला, बाबांना म्हणे एवढं चांगलं मला बोलता येत नाही अजुन. आम्ही शेतावर शिकलो, आदल्या दिवशी पाठवलेल्या उसळीत कधी कधी पाणी घालुन खावं लागयचं कारण ती आंबुन जायची. त्या नादात ईंग्लिश तेवढं मागे पडलं पणएमी सराव करतोय. तुम्ही हे विकत घेतलंत तर बोहोनी होईल , बाबांनी घेतलं मग ते. मी तर हे असं काही असतं हे पहिल्यांदाच ऐकत होते. असाच खुप धक्का झोंबी वाचताना पण बसला होता. सुदैव इतकंच की याने योग्य तो धडा घेतला आणि उत मात करायची नाही हे आई बाबा सांगायचे तेंव्हा आपसुक पटायला लागलं.
11 Jun 2015 - 10:11 pm | प्रियाजी
भूक! व्यंकटेश स्तोत्र आठवलं. अन्नासाठी दाही दिशा आम्हां फिरविशी जगदिशा. भूक काय काय करायला लावेल सांगता येत नाही. आपण रोज जे काही करतो त्यातलं बरंच या टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठीच करतो हेच विसरलं की बाकीचे नखरे सुरू होतात.
11 Jun 2015 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
अन्नाची किंमत पैश्यावर नाही तर भुकेवर ठरते !
अजून एक कटू सत्य ! सुन्न !
ताटात अन्न टाकून उठणार्यांचा राग येतो. जेवणावळी उठवल्यावर किती अन्न उकीरड्यावर टाकले यावरून आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवणार्यांचा त्यापेक्षा जास्त राग आणि खरेतर तिरस्कार वाटतो.
या निमित्ताने आमची आजी नेहमी "खाऊन माजा, टाकून नको" असे म्हणत असे, हे आठवले.
11 Jun 2015 - 10:45 pm | टवाळ कार्टा
:(
11 Jun 2015 - 10:46 pm | किसन शिंदे
भूक या स्पर्धेच्या धाग्यावर दिलेला प्रतिसादच पून्हा देतो..
आत्ता काही महिन्यांपूर्वी पुण्यात शिरूरला लग्नाला गेलो होतो. लग्न संध्याकाळचं होतं, त्यामुळे साहजिकच जेवणावळी दुपारी ठेवलेल्या होत्या. आम्ही कार्यालयात पोचेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते तेव्हा जेवणाची शेवटची पंगत सुरू होती. आमचे दुपारचे जेवण बाहेरच झाले होते, त्यामुळे लग्नात जेवणार नव्हतो. तिथे कार्यालयात सहज फिरता फिरता काही वेळाने जेवणाच्या हॉलबाहेर येऊन पोचलो. तिथे कचर्याच्या ठिकाणी ताटात उरलेल्या अन्नाचा प्रचंड मोठा ढिग जमा झाला होता. साहजिकच एवढा मोठा ढिग पाहून धक्का बसला आणि त्याहूनही मोठा धक्का बसला जेव्हा नजर त्या ढिगापलीकडच्या नेहमी बंद असणार्या गेटवर गेली. तिथे गेटच्या पलीकडे त्या फेकून दिलेल्या अन्नाच्या ढिगार्याकडे आशाळभूतपणे पाहणारी फासेपारध्यांची म्हणा वा भटक्या जमातीतली पाच ते दहा वर्षांची काही मुले उभी होती. प्रचंड मोठा विरोधाभास!
जेवणाची वेळ टळून गेली होती तरीही, 'लग्नाला आलोय ना? मग आहेराच्या पाकिटाचे पैसे वसूल करायचेच या मानसिकतेतून काही लोकं बळेच जेवत होती. पाच वर्षाचे मुल, ज्याला स्वत:च्या हाताने नीट खाताही येत नाही त्यासाठी वाढप्यांना बायका वेगळं ताट वाढायला सांगत होत्या. दोन पदार्थ खाल्ले की, बाकीचे सगळे वायाच! एकीकडे मिळतंय म्हणून सारासार विचार न करता वाया घालवण्याची प्रवृत्ती, तर दुसरीकडे एकावेळचं जेवणही पोटभर मिळत नाही म्हणून मातीतल्या अन्नालाही उचलून खाण्याची लाचारी. :(
11 Jun 2015 - 10:49 pm | मी-सौरभ
विचार करायला लावणारे ओघवते लेखन
11 Jun 2015 - 10:51 pm | सुनिल मोरे ००७
मजबुरी खुप विचित्र असते...
11 Jun 2015 - 10:53 pm | बन्डु
कढीचा पाला, टमाटर साल, एक एक शित, कण संपवताना... तर आठवत नाही हि सवय कधी लागली ते..
नुस्ते तेच नाही तर खाण्याच्या सवयी, संपुर्ण बोटं, हात तोंड न भरवता खाणे ते ही महत्वाचे आहे.
11 Jun 2015 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे सालं पोट खुप खराब.
11 Jun 2015 - 11:06 pm | रामपुरी
.
11 Jun 2015 - 11:15 pm | NiluMP
कटू सत्य.
सुन्न करणारा अनुभव.
11 Jun 2015 - 11:23 pm | आतिवास
विदारक
:-(
11 Jun 2015 - 11:36 pm | पैसा
हम्म...
11 Jun 2015 - 11:58 pm | शिव कन्या
हि सत्यकथा वाचून विश्राम बेडेकरांच्या आत्मचरित्रातील [एक झाड दोन पक्षी] असाच प्रसंग आठवला.
बेडेकरांनी लिहिलेली तिची व्यथा मन सुन्न करून गेली होती.
तुमच्या आजच्या लिहिण्याने परत तेच जाणवले.
इतक्या वर्षानंतरही तेच चित्र! कुठली प्रगती, अन कुठला विकास?
12 Jun 2015 - 8:04 am | अमृत
फार पूर्वी दूरदर्शनवर Living on the Edge हा कार्यक्रम यायचा ३री ४थी ची गोष्ट असेल. त्यात एकदा ओरीसा मधल्या बहुतेक दुष्काळाविषयी एका भागात २-३ अतिशय हडकुळ्या वृध्हांवरती काही चित्रण दाखवित होते. कासेला केवळ एक विटलेली चिंधी बांधलेले हे लोकं रस्त्यावर उभे राहून भात खाता खाता काही भाताचे दाणे रस्त्यावर पडलेत तर लगेच वेचून खायला लागलेत. मी नेमका जेवत होतो हे दृष्य पाहून खूप रडायला आलं होतं. अर्थातच अन्न वाया घालवणं कायमचं सोडलं
12 Jun 2015 - 8:55 am | श्रीरंग_जोशी
खरंच लिहावे तरी काय.
वरील सर्वांच्या प्रतिक्रियांच्या आशयाशी सहमत.
12 Jun 2015 - 8:56 am | सस्नेह
ज्वलंत अनुभव पण संयतपणे मांडला आहे.
अजूनही इथे भूकबळी आहेत हे भीषण वास्तव आहे.
12 Jun 2015 - 9:15 am | झकासराव
:(
12 Jun 2015 - 9:26 am | मुक्त विहारि
कटू आणि परखड सत्य....
12 Jun 2015 - 9:29 am | नाखु
दंडवत.
ताटात अन्न टाकणे बद्दल माझा राग घरीदारी सगळ्यांनाच अनाठायी वाटतो.
पण वरती किसन्देव आणि एक्का काकांनी सांगीतलेली उदाहरणे आम्ही मंगल कार्यालय बहुल क्षेत्रात (एकूण १० आणी सारी गुंठामंत्र्यांची) रहात असल्याने उकीरड्यावर अक्षरशः अन्नाचा ढीग लागलेला पाहिला आहे.
(त्याच गावात (अगदी १ किमी अंतरावर) सेवाभावी वृत्तीने चालविलेल्या "गुरुकुलम"ला ३५० पेक्षा जास्त मुलांच्या रोजच्या जेवणासाठी मेटाकुटीचे प्रयत्न करावे लागत आहेत असे मितानतैं नीच सांगीतले) आणि विरोधाभास अंगावर आला.
भोट नाखु
30 Jun 2015 - 7:29 pm | gogglya
पण माझ्या घराच्या वास्तूशांतीला तब्बल ५० जण येणार असे नक्की सांगूनही आले नाहीत. केटररना उरलेले अन्न कोण्या संस्थेला देता येईल का असे विचारले असता 'आम्ही तसे करणे बंद केले आहे कारण १ - २ वेळेला [जेथे अन्न दिले त्यांनी ] चुकीच्या पद्धतीने साठवणूक केल्याने विषबाधा होऊन प्रकरण अंगाशी आले' अशी माहिती मिळाली.
म्हणणे एवढेच आहे की प्रत्यक्ष अन्न वाया घालवण्या इतकेच अप्रत्यक्ष अन्न वाया घालवणे ही तितकेच निषेधार्ह आहे. अजूनही आपल्याकडे 'नक्की येतो' असे म्हणुन ऐन वेळी न जाण्यात कोणालाही काहीही वावगे वाटत नाही !
12 Jun 2015 - 10:48 am | मृत्युन्जय
आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे !
आपल्या इथे कोणी भुकेने मरत नाही म्हणणार्या लोकांनी डोळ्याला आणि मेंदूला सुद्धा झापडे लावुन घेतली असावीत किंवा त्यांच्या दृष्टीने "आपल्या इथे" या शब्दांची व्याप्ती केवळ त्यांच्या घरापुरती मर्यादित असावी. पानात टाकले तर किमान टाकले आहे याची लाज बाळगावी माणसाने. अशी कशी काय वागू शकतात माणसे?
12 Jun 2015 - 10:49 am | मदनबाण
ऑफिस मधुन निघाल्यावर पहिला सिग्नल लागतो,तिथे बरेच विक्रेते असतात...भिकारी सुद्धा असतात. हे आणि असं दॄष्य मी अनेक वर्ष अनेक ठिकाणी पाहत आलो आहे. मध्यंतरी माझ्या पिल्लासाठी या नेहमीच्या सिग्नलवर स्ट्रॉबेरीचा बॉक्स घेतला... सिग्नल सुटला घरी आलो... परत दुसरा दिवस उजाडला... तोच सिग्नल आणि तेच विक्रेते फक्त विकावयाच्या वस्तू मात्र वेगळ्या ! सिग्नल नुकताच लागला म्हणुन बाईक्चे इंजिन बंद करुन टाकले, आणि नेहमी प्रमाणेच आजुबाजुचे माझे निरिक्षण सुरु झाले ! बाजुला एक बाई तिचे तांबरलेले केस विंचरत बसली होती आणि तिची मुलं { नक्कीच तिची असावी का नाही ते ठावूक नाही ! } आजुबाजुला धावत होती, खेळत होती. एका चिंधी सदॄष्य कापडाचा झोपाळा केलेला आणि त्याच्या झोक्यात झोपलेला एक लहान जीव. सिग्नल लागल्यावर विक्रेते आले, कोणी गजरा आणि कोणी इतर गोष्टी विकत होत...ती भिकारी मुल भिक मागायला लागली ,प्रत्येक कारच्या काचेवर हात मार, हातातल्या कळकट कपड्याने गाडीची काच पुस... खायला माग असे त्यांचे उध्योग सुरु झाले...मग २ मुली माझ्या जवळ आल्या... पैश्यासाठी हात लावु लागल्या, मी त्यांना विचारलं भूक लगी है ? त्यावर त्यांनी माना डोलवल्या. मी तिथेच फिरत असलेल्या एका विक्रेत्याला हाक मारली, आज तो संत्री विकत होता... कशी ? भाव विचारला आणि संत्री घेउन मी त्या मुलींच्या हातात दिली....त्यांचे मोबल्यात फोटो काढले, माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले, सिग्नल सुटला....बाईक सुरु करुन त्या बालपण हरवलेल्या निरागस मुलांकडे परत कटाक्ष टाकुन निघालो....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Uncensored Trailer [Full Version] Nagrik Marathi Movie
बोला विठ्ठल ! :- नागरिक
12 Jun 2015 - 6:40 pm | सौंदाळा
लेखकाचा अनुभव सुन्न करणारा आहेच.
पण मदनबाण तुम्ही जे केले ते अगदी योग्य केले.
भिक मागायला लहान मुले आली तर मी पण कधीच पैसे देत नाही. त्यांना खायला / वस्तु द्यावे.
लहान वयातच भिक मागुन पैसे मिळतायत म्हटल्यावर ती मुले मोठेपणी काम करायची शक्यता खुपच कमी होते.
12 Jun 2015 - 8:55 pm | मदनबाण
या त्या दोन मुली... त्यांना पैसे दिले असते तर त्यांनी त्याचे काही खाद्य पदार्थ घेउन खाल्ले असते याची शक्यता तशी कमीच होती. तसेच रोज या मुलीं समोर इतर विक्रेते बोर,स्ट्रॉबेरी संत्र अशी फळ विकताना पाहतात, पण ही फळ काही त्यांना खाता येत नाहीत कारण जमवलेले पैसे त्यांच्या आई / त्या बाईला देण्यातच जात असणार, मग त्यांची ही फळ खाण्याची इच्छा मला पूर्ण करावीशी वाटली.आपल्याला ज्या गोष्टी सहजतेने उपलब्ध होतात त्याची किंमत आपल्याला कळत नाही,पण यांच्यासाठी मात्र ही गोष्ट आनंद आणि समाधान या दोन्ही गोष्टी देणारा ठरली.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Uncensored Trailer [Full Version] Nagrik Marathi Movie
बोला विठ्ठल ! :- नागरिक
12 Jun 2015 - 10:50 am | सुबोध खरे
लोक जेवतात केंव्हा ?
श्रीमंत लोक-- जेवायची वेळ झाली की.
मध्यम वर्गीय लोक --भूक लागली कि.
गरीब लोक-- अन्न मिळेल तेंव्हा.
12 Jun 2015 - 11:02 am | विशाल कुलकर्णी
सुन्न व्हायला झालं वाचून ....
12 Jun 2015 - 11:58 am | सिरुसेरि
सुन्न करणारा अनुभव व प्रतिक्रिया . आम्हाला गरिबांविषयी कणव आहे असे म्हणणारे गरिबांचे कैवारीच जेव्हा पंचतारांकीत हॉटेल्समध्ये आपले समारंभ साजरे करुन पैशाची व अन्नाची नासाडी करतात तेव्हा वाईट वाटते .
गाईड मधील 'अल्ला मेघ दे , पानी दे रे , रोटी दे रे तु , शामा मेघ दे ' या गीतात तत्कालीन दुष्काळाचे भयानक चित्रण दाखविले आहे . अलिकडच्याच काळातल्या चारा छावण्या तर अजुनही विसरता येत नाहीत .
12 Jun 2015 - 2:43 pm | सुमेरिअन
मनन करायला लावणारा लेख. सर्व प्रतिक्रियांच्या आशयाशी सहमत!
आई बाबांनी लहानपणापासूनच ताटात काही शिल्लक ठेवायचं नाही हेच रुजवलं. ती शिकवण आजही तेवढीच ताजी आहे. पण आज काल मित्रमैत्र्णींसोबत पार्टीला किंवा अजून काही कारणांनी बाहेर जेवायला जाण झाला कि अन्न शिल्लक राहिलेलं दिसतच! specially कंपनी sponsored पार्टी मध्ये तर खूपच नासाडी होते. आणि मी हटकल्या नंतर बरेचदा मलाच ऐकाव लागतं. 'I am full. So better it go to dustbin' वगैरे वगैरे type च्या comments येणं चालू होतात. मी जास्त बोललो तर कोणी तरी explain करून सांगत कि आता ताटात अन्न उरलच आहे तर पोटाच्या वर खाण्यापेक्षा dustbin मध्ये जाऊ दे. निरुत्तर होतो कधी कधी. त्यामुळे हा लेख वाचल्यानंतर मनात कुठे तरी थोडं चांगलं पण वाटलं.
12 Jun 2015 - 4:30 pm | अजया
याप्रकारच्या स्पाॅन्सर्ड पार्ट्या डाॅक्टरांच्या नेहमीच सुरु असतात. मला दर महिन्याला अनेक वर्ष छळ असल्यासारखे जावे लागे.पाण्यात राहुन माशाशी वैर नको असल्याने.पण तिथे होणारी अन्नाची नासाडी ही मुजोरीबरोबर होत असे.फार्माकंपनी स्पाॅन्सर करणार .त्यांना वाकवायला डाॅक्टर्स मनाला येईल तो अफाट मेनु ठरवणार.मग फॅशनेबली चघळून सर्व फेकाफेक.अशाच एका डिनर मिटला बादल्या भरुन फेकलेले अन्न बघुन ,वाद घालुन जायचे बंद केले. आपल्या बापाचे काय वाया जाते,एंजाॅय असे काही म्हणून हे असे अन्न वाया घालवणार्या लोकांबाबत माझे हल्ली हिंसक विचार झालेले आहेत :(
12 Jun 2015 - 2:50 pm | मधुरा देशपांडे
त्या स्त्रीची, तिच्यासारख्या असंख्य लोकांची भयंकर परिस्थिती आणि एकीकडे कसेही आणि कितीही प्रमाणात अन्न फेकुन देणार्या लोकांची विचित्र मानसिकता.
12 Jun 2015 - 2:56 pm | गणेशा
लेख आणि रिप्लाय सुन्न करण्यास लावणारे
12 Jun 2015 - 3:06 pm | बॅटमॅन
.
12 Jun 2015 - 3:23 pm | द-बाहुबली
क्या बात है.
आजही पैशाची किंमत तुला काय समजते असे कोणी कोणालाही म्हणालं की मुस्काटात देउन सप्लाय डिमांड वेळीच न शिकवल्याचा हा परिणाम असतो असेच शांतपणे म्हणावेसे वाटते. कशाचीही किंमत ही फक्त सप्लाय डिमांडवर ठरते हे जो जितके लवकर शिकेल तितके योग्य... बाकी भावनांना फार थारा देत बसत नाही.
12 Jun 2015 - 3:43 pm | गिरकी
फार संयतपणे लेख लिहिला आहे. पण काहीवेळा मनात नसूनही खूप वाया जातेच. तेव्हा पोटात कालवा कालव होते. एक उदाहरण आहे.
माझ्या माहितीत एकजण स्वर्गवासी झाले. त्या दिवशी लोक पिठले भात आणून देतातच. घरचे लोक कोणत्याच मन:स्थितीत नसतात. त्यामुळे चुकून २ जणांनी ५०-६० जणांचे पिठले भात आणून दिले.
त्या दिवशी घरी तेवढे लोक होतेच. पण दुसऱ्या दिवशी कोणी थांबणारे नव्हते. मग ५०-६० जणांच्या जेवणाचे काय करायचे याचा प्रश्न पडला. अजून डबे उघडलेही नव्हते. त्यातल्या एकानी दिलेले डबे तसेच गाडीत घालून माझे वडील अनेक अनाथाश्रम, सेवा संस्था, होस्टेल वगैरे फिरले पण कोणीही ते घ्यायला तयार झाले नाही. प्रत्येकाने 'मयताकडचे जेवण' म्हणून नाकारले. अगदी काहीच भिकारी थोडं थोडं घ्यायला तयार झाले पण उरलेले सगळे टाकून द्यावे लागले.
लग्नाचे जेवण, हे असले जेवण, तेराव्याचे / वर्ष श्राद्धाचे जेवण या गोष्टी बहुतेकदा अंदाजापेक्षा जास्त होतातच. तर हे उरलेले अन्न वाया न जावे म्हणून काही व्यवस्था करता येईल का? निदान मोठ्या शहरांत तरी काहितरी व्यवस्था असावी / व्हावी असे वाटते.
12 Jun 2015 - 4:11 pm | चिनार
सुन्न करणारं लिखाण आहे हे..
या वाक्यावर एक गोष्ट आठवली. वरच्या लिखाणएवढी सुन्न करणारी नसली तरी अजूनही आठवली की मला वाईट वाटते.
लहानपणी माझी आई अंगणात शेणाच्या पाण्याचा सडा टाकायची. रोज दुपारी एक बाई वेताच्या टोपलीत शेण घेऊन यायची. त्या बदल्यात आम्ही तिला काय द्यायचो तर रात्रीची उरलेली शिळी पोळी (ती सुद्धा उरलेली असेल तर !). तिच्या वेताच्या टोपलीत एका बाजूला शेण असायचं तर दुसर्या बाजूला मळकट कापडात गुंडाळलेल्या शिळ्या पोळ्या..कसलं hygine आणि कसलं काय ?
12 Jun 2015 - 6:26 pm | स्पंदना
एका घासासाठी!!
काय बोलावं? जाऊ दे! वरच्या प्रतिक्रियांमध्ये काय यायच ते येउन गेलय.
12 Jun 2015 - 6:47 pm | यशोधरा
काय प्रतिक्रिया देणार ह्यावर! :( अतिशय विदारक, सुन्न करणारं..
12 Jun 2015 - 6:48 pm | बबन ताम्बे
पुण्यात अमर्याद थाळी मिळणा-या हॉटेलांत अन्नाची होणारी नासाडी बघवत नाही. गि-हाईक आणि वेटर, एक पैसे देतोय म्हणून माज, दुसरा आपल्या बापाचे काय जातेय ह्या व्रूत्तीने वाढत असतो.
आताशा दुर्वांकुरमधे ताटातील सगळे अन्न संपवले तर डीस्काउंट देतात असे ऐकलेय.
12 Jun 2015 - 8:31 pm | बॅटमॅन
होय, सगळे संपवले तर २०/- डिस्काऊंट असतो.
26 Jun 2015 - 1:59 am | अमित खोजे
अशी पद्धत जर दुर्वांकुरने सुरु केली असेल तर नक्किच स्प्रुहणीय आहे.
बरोबर स्प्रु कसा लिहावा बरे?
26 Jun 2015 - 3:12 am | श्रीरंग_जोशी
स्पृ लिहिण्यासाठी spRu असे टंकावे.
दुर्वांकुरचे या बाबतीतले उदाहरण अनुकरणीय आहे.
12 Jun 2015 - 6:57 pm | शब्दानुज
इथला प्रत्येक माणुस भुकेलाच आहे. कुणाची भुक अन्नाची तर कुणाची पैशाची! ही भुक दुसर्याच्या भुकेचे कारण तर नसावे?
12 Jun 2015 - 7:43 pm | पद्मावति
अन्नाच्या नासाडीवरुन आठवलं, माझी एक मैत्रिण तिच्या लग्नातली " गम्मत" सांगत होती. तिच्या लग्नात म्हणे, वधू-पक्षात 'कितना दम' आहे हे चेक करण्यासाठी मुलाकडील लोकांनि मुठी भरभरून बुफे मधले रसगुल्ले खाली मातित फेकायला सुरुवात केली. आणि वधुपक्षाने त्यांची सो कॉल्ड हिम्मत दाखवीलि ते पातेले पुन्हा पुन्हा नवीन ताजे रसगुल्ले भरुन. वर-पक्षावर अशी मात केली म्हणे...... आता हे ऐकुन हसावे की रडावे हेच कळत नव्ह्ते
26 Jun 2015 - 3:39 am | वॉल्टर व्हाईट
मातीतले रसगुल्ले तोंडात कोंबले असते तर खरा दम दिसला असता असे स्पष्टपणे सांगायचे.
30 Jun 2015 - 7:32 pm | gogglya
+१११११११११११
12 Jun 2015 - 8:32 pm | चिगो
सुन्न करणारा अनुभव.. सुन्न करणारी शिकवण..
14 Jun 2015 - 6:33 am | भाग्यश्री कुलकर्णी
लहानपणी आजीकडे रहात होते.माझे जेवणात खुप नखरे होते..एक भिकारी बाई रोज यायची घरी,उरलेले अन्न न्यायला.आजी एक दिवस मुद्दामच तीला म्हणाली..तुझ्या मुलांसाठी बनवत असशील ना तु वेगळे..मला ऐकू जावं या उद्देशाने...ती म्हणे नाय या पोळ्या वाळवून ठेवतो..कालवण नसल तेंव्हा पाण्यात शिजवून खातो....पोरबी तेच खात्यात....मला एकदम कोणीतरी कानाखाली मारल्याचा फिल आला ते एैकून..त्या दिवसापासुन मी समोर आलेले अन्न नावे न ठेवता खायला लागले...पुढे शिकायला बाहेर राहील्यावर बुरशी आलेली पोळी खाताना मला हवे ते रांधणारी आजी आठवायची..
26 Jun 2015 - 1:57 am | अमित खोजे
अगदि साध्या पद्धतीने मुलांना चांगली शिकवण लावण्याची तुमच्या आजीची लकब आवडली. असाच अनुभव अनेकदा गिर्यारोहण करतानादेखील येतो. आम्ही हरीश्चंद्र गडावर जाताना रस्ता चुकलो अन तेथेच १ दिवस घालवावा लागला. तेव्हा पाण्याची आणि अन्नाची जी किंमत कळाली ती अजुन विसरलेलो नाहिये.
24 Jun 2015 - 1:12 pm | कपिलमुनी
वाचक व प्रतिसादकांनां धन्यवाद !
26 Jun 2015 - 12:34 am | अभिजीत अवलिया
मुनीवर, मन सुन्न झाले वाचून.
26 Jun 2015 - 8:19 am | अर्धवटराव
येस्स्स... भरल्या पोटाने वसुधैव कुटूंबकम् वगैरे तत्वज्ञान सुचणारं डोकं उपाशी पोटी त्याच जगाला खाउ कि गिळु करु लागतं तेंव्हा अन्नाची किंमत कळते. (काहि लोकं अगदी तहान भूक विसरुन त्या तत्वज्ञानाला वाहुन घेतात हा भाग वेगळा)
26 Jun 2015 - 9:21 am | खटपट्या
लेख सुन्न करणारा आणि प्रतिक्रियाही तितक्याच उत्कट..
29 Jun 2015 - 3:36 pm | तुडतुडी
specially कंपनी sponsored पार्टी मध्ये तर खूपच नासाडी होते. आणि मी हटकल्या नंतर बरेचदा मलाच ऐकाव लागतं. '>>>
मला हि २-३ वेळा अनुभव आलाय . कोणाला काही सांगायला गेलं कि आपल्यालाच मुर्खात काढतात . मोठी आली शहाणी वगेरे … पार्ट्यांना जाण बंद केलंय आता मी . पण आता आई बापच मुलांना अन्न वाया घालवू नये असं शिकवत नाहीत
5 Jul 2015 - 12:01 am | अभिजीत अवलिया
'अन्नाची किंमत पैश्यावर नाही तर भुकेवर ठरते; क्या बात ही मुनिवर. हे वाक्य मी कधीच विसरणार नाही. मला देखील पाणी आणी अन्न ह्या दोन गोष्टी वाया घालवणाऱ्या लोकांचा (कितीही जवळचे नातेवाइक असले तरी) प्रचंड राग येतो.