बेफिकीर…पण काही क्षणापुरताच

ganeshpavale's picture
ganeshpavale in जनातलं, मनातलं
5 Jun 2015 - 11:44 am

कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच…
तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या की अभद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुढत बसतो.
मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जातो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी.
तुझ्यासोबत जगलेले ते क्षण किती गोड होते. किती मदमस्त जीवन होतं. तुझे बोलणे, तुझे चालणे, तुझे हसणे, तुझे रुसणे, तुझ्या अदा, तुझे नखरे सारं काही अजूनही माझ्यासाठी जिवंत. भास आभासात मी तुलाच जगत असतो, तुलाच अनुभवत असतो, शोधत असतो… सैरावैरा पळत असतो फक्त तू एकदा दिसण्यासाठी.
न बोलताच सारं काही सांगून जाणारे तुझे डोळे आणि त्यांची भाषा आजकाल मी विसरत चाललो. रात्रीच्या अंधारात मागून येणाऱ्या तुझ्या पैंजणाच्या आवाजासाठी कान अजूनही टवकारतात, त्या चंद्राच्या शीतल छायेत मी जातो, शोधत असतो तुला त्या प्रत्येक चांदणीत, आणि तू दिसतेस ही. पण दूर दूर कुठेतरी. मध्येच गायब होतेस आणि पुन्हा मी हताश होवून अधीर पाणावलेल्या डोळ्यांनी तुझ्या दर्शनास व्याकुळ होवून हरवून जातो स्वतःच्याच भाव विश्वात.
वाटतं कधी कधी तू पुन्हा येशील आयुष्यात. पुन्हा रंगून जाईल संसार माझा. अंगणातली तुळस पुन्हा डोलेल. तिला रोज तू पाणी घालशील, तिला गोडशी पालवी फुटेल, सारं घर आनंदान सजेल… पण हे सारं फक्त स्वप्नातच घडतं.
प्रत्यक्षात तू मात्र बेफिकीर….
प्रत्यक्षात तू मात्र बेफिकीर…


जगेन तुझ्याशिवाय, मरेन तुझ्याशिवाय
पण काही क्षणापुरताच

अश्रू भरलेल्या डोळ्यांनी झिडकारीन तुला
पण काही क्षणापुरताच

विसरेन तुला, पुन्हा कधीच न आठवण्यासाठी
पण काही क्षणापुरताच

हा राग, हा रुसवा, हा अबोला माझा कायमचाच
पण काही क्षणापुरताच

अजूनही तुझी वाट पाहतोय…. अधाशासारखा
पण काही क्षणापुरताच

तुझाच… प्रेमवेडा
तुझा गणेश….

[तुझ्यासाठी सोडून दिलेली लेखणी पुन्हा तुझ्यासाठी हातात घेतलीय…। तुझाच प्रेमवेडा ]

(साहित्य संपादन केले आहे)

प्रेमकाव्यलेख

प्रतिक्रिया

माझ्या वरील लेखनात काही चुका आहेत. त्या दुरुस्त कशा करू
मला वरील लेख पुन्हा संपादित करायचा आहे

ganeshpavale's picture

6 Jun 2015 - 11:03 am | ganeshpavale

"मी जगतो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी."
हि ओळ अपडेट करा.....
मी जातो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी. << अशी झालीय