जकार्तामधील माझ्या पहिल्या रविवारी मी तमन मिनी इंडोनेशिया नावाची एक भन्नाट जागा पाहिली. तमन म्हणजे पार्क. तर या नावावरूनच या जागी काय असेल याची कल्पना येते. इंडोनेशियाची लहान स्वरूपातील प्रतिकृती. विचार करा, अक्ख्या देशाची प्रतिकृती.
२५० एकर जागेत पसरलेला हा अवाढव्य थीम पार्क म्हणजे नियोजनबद्ध कामाचा एक उत्तम नमुना आहे. देशाची प्रतिकृती म्हणजे डोंगर नद्या वगैरे नाही. तर देशाची संस्कृती, इतिहास, वेगवेगळ्या भागातील परंपरा, जीवनशैली दर्शविणारे कार्यक्रम, शिल्पे, धार्मिक स्थळे, म्युझियम्स, अशा अनेक गोष्टींनी भरलेला तो पार्क होता.
मी मागील पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, माझी राहुलशी हॉटेलच्या लिफ्टमध्ये ओळख झाली आणि आम्ही तमन मिनीला (या जागेचं संक्षिप्त नाव) जाण्याचा प्लान बनवला. आम्ही एक टॅक्सी करून सकाळी निघालो. आम्हाला तिथे पोचायला ४०-४५ मिनिटे लागली. तिथे पोचताक्षणीच आम्ही ह्या पार्कच्या भव्यतेने स्तिमित झालो.
प्रवेशद्वारातच "मोनास" (मॉन्युमेंट चा इंडोनेशियन अपभ्रंश) या इंडोनेशियाच्या मुख्य स्मारकाची लहान प्रतिकृती आहे. जसे अमेरिकेत स्टेच्यु ऑफ लिबर्टी, भारतात कुतुबमिनार किंवा अशोकस्तंभाचे जसे महत्व आहे, तसे या मोनासला इंडोनेशियामध्ये महत्वाचे स्थान आहे.
तिथे पिकनिकसाठी आलेले अनेक ग्रुप आणि परिवार आम्हाला दिसले. इतकी मोठी जागा असल्यामुळे एक दिवस घालवायला खूपच चांगली आहे. आम्ही तिथे माहितीकक्ष शोधत होतो, पण तिथे कोणीच नव्हते. आणि रस्त्यात भेटलेल्या लोकांना इंग्लिश कळत नव्हते. एवढ्या साऱ्या पर्यायांमधून काय काय आम्हाला बघावं ते समजत नव्हतं. थोडी माहिती मिळाली असती तर काय जरूर बघावं आणि काय सोडलं तरी चालेल ते सहज ठरवता आलं असतं.
आम्हाला एक मोनोरेलचं स्टेशन दिसलं. हि ट्रेन अक्ख्या पार्कमध्ये चक्कर मारून आणते. काही ठिकाणी थांबेसुद्धा आहेत. म्हणजे पायी फिरणारे लोक हिचा वापर करू शकतील. याचसाठी एक रोपवेपण उपलब्ध आहे. पण तो जरा स्लो वाटला. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि साधारण २० मिनिटात पूर्ण पार्कला चक्कर मारून परत पहिल्या ठिकाणी आलो. तो पार्क खरच भव्य आणि जबरदस्त होता. आपल्याकडे एका ठिकाणी एक म्युझियम, किंवा एक प्राणीसंग्रहालय अशी आकर्षणे असतात. एकमेकांपासून दूर. इथे विविध प्रकारची उत्कृष्ट दर्जाची संग्रहालये, सर्व धर्माची मंदिरे, इंडोनेशियातील प्रत्येक विभागाची शैली दर्शविणारी घरे इ. सर्व काही एकाच परिसरात होते. आम्ही आम्हाला बघण्यात रस वाटेल अशी काही ठिकाणे हेरली. आणि तिथे फिरण्यासाठी एक स्कूटर ४ तासांसाठी भाड्याने घेतली.
या पार्कमधील सर्वच गोष्टी पहायच्या म्हटलं तर २-३ दिवस तरी लागतील. जर तुम्ही एकच दिवस घालविण्यास आला असाल तर मग चोखंदळपणे निवड करणे भाग आहे.
आम्ही पार्कमधून स्कूटरवर फिरायला लागलो आणि जे इंटरेस्टिंग वाटेल तिथे थांबून पाहायला सुरुवात केली. रस्त्यात आम्हाला इंडोनेशियन शैलीच्या बऱ्याच इमारती दिसल्या. आणि समोरच एक पक्षीसंग्रहालय दिसले.
ते पक्षीसंग्रहालयसुद्धा पुष्कळ मोठे होते. बराच मोठा भाग त्यांनी वरून जाळ्या लावून बंदिस्त केला होता. पण त्या जाळ्या बऱ्याच उंचावर असल्यामुळे संकुचित पिंजऱ्यामध्ये असल्यासारखं वाटत नव्हतं. आणि आतमध्ये विविध प्रकारचे पक्षी अगदी मोकळे बागडताना दिसतात. काही न माणसाळलेले पक्षी पिंजऱ्यात होते. पण बहुतांश पक्षी मोकळेच होते. काही पाळलेले पक्षी आणि त्यांचा ट्रेनर अशे २-३ ठिकाणी उभे होते. या पक्ष्यांसोबत, त्यांना हातावर किंवा खांद्यावर घेऊन फोटो काढता येतो. अर्थात थोडी फी देऊन.
माझ्या बायकोने नुकताच मला एक DSLR कॅमेरा भेट म्हणून दिला होता. त्यामुळे ह्या पक्ष्यांचे फोटो काढून मला खूपच आनंद मिळाला. पक्ष्यांचे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
त्यानंतर आम्ही एका उद्यानात गेलो. तिथे सुंदर तळे, डेरेदार झाडे आणि करड्या संगमरवरी दगडात साकारलेल्या अनेक सुंदर शिल्पकृती होत्या. एका गोलाकार खुल्या कक्षात असेच संगमरवरी प्राण्यांचे पुतळे होते. त्यांचे हावभाव खूपच सुंदर टिपले होते. त्यांच्या अल्बमला मी गंमतीने तमन रॉक झु असे नाव दिले आहे. तो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मी इथेच थोडी खरेदीपण केली. काही लाकडी खेळणी, काही स्मृतीचिन्हे व भेटवस्तू घेतल्या. नंतर मला समजले कि जकार्ताजवळ अशा प्रकारच्या वस्तू घेण्यासाठी तमन मिनी हीच सर्वोत्तम जागा आहे.
त्यानंतर आम्ही एका वाहनांच्या म्युझियमला भेट दिली. या म्युझियममध्ये बऱ्याच प्रकारच्या वाहनांचा आणि ज्याला आपण व्हिंटेज म्हणतो अशा कार्सचा समावेश होता. तिथे हेलिकॉप्टर, विमान, ट्रेन अशा प्रकारची मोठी वाहनेसुद्धा होती. या संग्रहातले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
आणि सर्वात शेवटी आम्ही एक मत्स्यालय पाहिलं. ते मात्र बाकी कुठल्याही मत्सालयासारखंच होतं. तिथली एकमात्र विशेष गोष्ट म्हणजे तिथली दोन प्रकारची कासवे. एक म्हणजे स्वच्छ पांढऱ्या रंगाचे कासव. आणि दुसरी अगदी लहान आकाराची कासवे, जी छोट्या पाण्याच्या बरण्यांमध्ये विक्रीला सुद्धा ठेवली होती. अगदी बारीक पांढऱ्या रंगाचे उंदीर सुद्धा विक्रीला होते. मत्स्यालयातील फोटोज पाहण्याकरिता इथे क्लिक करा.
याखेरीज आधी सांगितल्याप्रमाणे रस्त्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या. अशा पार्कमध्ये इकडे तिकडे पाहिलेल्या पण तितक्याच सुंदर गोष्टींचे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
त्या दिवशी फारच उन होतं आणि उकाडा पण खूप होता. काही केल्या घाम थांबत नव्हता. आमच्या स्कूटरची वेळ पण संपत आली होती, आणि आमच्यातही अजून फिरण्यासाठी त्राण नव्हतं. आम्ही स्कूटर परत करून हॉटेलकडे निघालो. सगळा पार्क काही आम्हाला पाहता आला नव्हता. पण आम्ही जेवढं काही येथे पाहू शकलो ते सुद्धा खूपच छान होतं.
प्रतिक्रिया
18 May 2015 - 3:08 pm | गणेशा
छान लिहिले आहे.. येवुद्या आनखिन ...
18 May 2015 - 3:50 pm | अजया
बरंच साधलंत की एका दिवसात!फोटोही छान.
18 May 2015 - 5:34 pm | रेवती
लेखन आवडले.
18 May 2015 - 6:36 pm | खेडूत
आवडले आहे. क्रमशः राहिले काय?
अजून येउ द्या.
फोटु ६०० बाय ४०० केलेत तर मोठे दिसतील.
18 May 2015 - 6:55 pm | एस
मस्त.
पुभाप्र.
18 May 2015 - 8:41 pm | श्रीरंग_जोशी
हा ही भाग उत्तम झालाय.
दुव्यांवरचे फोटोज निवांतपणे बघीन. पुभाप्र.
19 May 2015 - 3:19 pm | आकाश खोत
धन्यवाद मन्डळि
22 May 2015 - 12:08 pm | मदनबाण
छान... अजुन भरपुर फोटो इथे द्या... { म्हणेजे दुवा दिला तरी चालेल, पण धाग्यातल्या फोटोंची संख्या तरी वाढवा.}
माझ्या बायकोने नुकताच मला एक DSLR कॅमेरा भेट म्हणून दिला होता.
भाग्यवान मनुष्याची व्याख्या आज मला समजली ! :) च्यामारी नायतर आमचं सगळ वन-वे हाय ! लुटण्याची एक संधी सोडली तर शपथ्थ ! ;)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
22 May 2015 - 3:58 pm | पैसा
छान लिहिताय!