जकार्ताच्या आठवणी : ३ : सुरुवातीचे दिवस

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
14 May 2015 - 2:36 pm

मी जकार्ताच्या आमच्या ऑफिसमध्ये रुजू झालो आणि काम सुरु केले. मी कामाचा तपशील तुम्हाला सांगत बसणार नाही. कारण, तुम्हाला तांत्रिक संज्ञांमध्ये विशेष रस असणार नाही, आणि त्याने काही फरकहि पडणार नाही. आणि काही कमीअधिक फरक सोडले तर सर्व आयटी कंपन्यामधले काम सारखेच असते. मी तुम्हाला मुख्यत्वे इथले लोक, जकार्ताभोवतीची मी पाहिलेली ठिकाणे याबद्दल सांगेन.

lift
माझ्या कंपनीचे इंडोनेशियामध्ये काही क्लायंट आहेत, आणि म्हणून त्यांनी तेथे एक ऑफिस उघडले आहे. या ऑफीसात काही स्थानिक इंडोनेशियन्स, काही स्थलांतरित भारतीय, आणि काही थोड्या कालावधीसाठी आलेले माझ्यासारखे काही लोक असे संमिश्र कर्मचारी आहेत. एका क्लायंटचे त्याच इमारतीत ऑफिस आहे. आता इथल्या इमारतींबद्दल एक विचित्र गोष्ट म्हणजे इथल्या मजल्याचे क्रमांक. येथे लोक संख्येबद्दल अंधश्रध्दाळू आहेत. त्यांनी इमारतीमध्ये मजला क्रमांक 13 अशुभ असल्यामुळे ठेवलेलाच नाही. 12 व्या मजला केल्यानंतर, आपण थेट 14 व्या मजल्यावर पोहोचतो. :D आणि माझ्या ऑफिसच्या इमारतीतील लिफ्ट मध्ये 4 थ्या मजल्याला 3 ए असे लिहिले होते.

मी माझ्या मागील पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे इंडोनेशियन लोक हे अगदी हसतमुख आणि प्रसन्न लोक आहेत. ते दिवसभर गप्पा मारत राहतात, मोठमोठ्याने हसत राहतात. आणि ऑफिसमध्ये दिवसभरातून किमान एकदातरी त्यांचे इतके विचित्र आवाज ऐकू येतात कि नेमकं त्यांना काय व्यक्त करायचं आहे हेच कळत नाही. जेवढे लोक मी पाहिले त्यातले बहुतांश लोक मनमिळावू, आणि मदतीस तत्पर असे लोक होते. मग ते माझ्या ऑफिसमधले सहकारी असोत कि रिसेप्शनिस्ट. बँकेचे चपराशी असोत वा रखवालदार. सर्वच प्रकारच्या लोकांकडून मला असाच अनुभव आला. काही अपवाद होते खरे, पण विरळा. आणि हे आम्ही तिथे परदेशी दिसत असल्यामुळेच नाही तर मी जेवढं पाहिलं त्यानुसार ते एकमेकांशीसुद्धा असेच वागत होते.

इथले लोक फुटबॉलबद्दल वेडे आहेत, आणि माझ्या ऑफिसमधले काही भारतीय सहकारीसुद्धा तसेच होते. फिफा वर्ल्डकप जवळ येत असल्यामुळे माझ्या आजूबाजूला कायम फुटबॉलसंबंधी चर्चा ऐकू यायची. प्रत्येकजण तो कोणत्या टीमला सपोर्ट करत आहे त्या टीमबद्दल उत्साहाने बोलायचा. कोणती टीम जिंकणार यावरून तावातावाने वाद व्हायचे. त्या लोकांनी यावरून पैजापण लावून ठेवल्या होत्या. माझ्या ऑफिसमधल्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळे फुटसॉल खेळायला गेलो होतो. फुटसॉल म्हणजे फुटबॉलचंच छोटं स्वरूप. बंदिस्त आणि छोट्या आकाराच्या मैदानात, अगदी तासभरच चालणारा गेम. आम्हाला तिथे खेळून खूप मजा आली. आयटीवाले असल्यामुळे सगळेजण तासभर पळत पळत खेळू शकले यामध्येच समाधानी होते.

इथे शुक्रवारी एक स्ट्रीट मार्केट भरते. भारतातील अनेक शहरे आणि गावांमधिल साप्ताहिक बाझारांसारखे, हे फक्त शुक्रवारी असते. या मार्केटची जागा माझ्या ऑफिसपासून जवळ आहे. माझा एक सहकारी, तेथे मला घेऊन गेला. इथल्या लोकांची फुटबॉलची आवड इथेपण दिसून आली. सर्वात जास्त गर्दी असलेले दोन स्टॉल्स फक्त फुटबॉल जर्सीज आणि फुटबॉलसंबंधित वस्तू विकत होते. त्याव्यतिरिक्त बाकी छोटी हत्यारे, गृहोपयोगी साधने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, DVDs इ. विविध गोष्टी विकणारे बरेच स्टॉल्स होते.

ऑफिसमध्ये माझ्या पहिल्या दिवशी, साधारण चहाच्या वेळी मी माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो. अचानक लोक पळायला लागले आणि एक मोठा आवाज झाला. पळतपळत सगळे कोपऱ्यात एका डेस्कभोवती जमले. त्या आवाजाच्या जोडीला जे बसले होते ते पण जमिनीवर पाय आपटून आवाज करत होते. मी आधी त्या आवाजामुळे आश्चर्यचकित झालो होतो. पण बाकी प्रत्येकजण हसत असलेले पाहिले. त्या डेस्कवरून लोक परत पांगले तेव्हा प्रत्येकाच्या हातात काही फळे किंवा चॉकलेट दिसत होते. आणि नंतर ते सगळं संध्याकाळच्या अल्पोपहाराच्या पदार्थांसाठी होते हे समजले. इथे दिवसातून दोनदा, काही चॉकलेट किंवा काही अल्पोपहाराचे पदार्थ सोबत काही फळे सर्वांना पुरवण्याची पद्धत आहे. आणि या लोकांनी याचा एक गेम बनवून ठेवलाय. जे पळत आधी पोहोचतील तेच सगळं काही उचलून घेतात. शेवटच्यासाठी काहीही उरत नाही.

थोडे किंवा काही काम नसताना, किंवा ब्रेकच्या वेळी ते लोक चक्क ऑफिसमध्ये काउंटर स्ट्राइकसारखे गेम खेळतात. काही कारणास्तव एकदा मी तेथे एकजणाला भेटायला क्लायंटच्या ऑफिसमध्ये गेलो, आणि पाहिलं तर ते लोक पद्धतशीरपणे गेमिंग कन्सोल त्यांच्या वर्कस्टेशनवर जोडून फिफावाला गेम खेळत होते. पण हे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये प्रचलित आहे. भारतातील अनेक कंपन्यामात्र सोशल मीडियावर बंदी घालतात, अगदी पत्त्यांचे गेमसुद्धा सिस्टममध्ये ठेवत नाहीत. आपल्या ऑफिसमध्येसुद्धा अशा प्रकारचे स्वातंत्र्य असलेले मला आवडेल. पण हे सगळं चालू दिलं तर आपण काम करू का हा प्रश्न आहे. :D

मी थोडीशी बहासा म्हणजे इथली स्थानिक भाषा शिकलो. (बहासा शब्द हा संस्कृतमधील भाषा या शब्दासारखाच आहे). धन्यवादला इथे "तेरीमा कसिह" असं म्हणतात. दुधाला "सुसु" म्हणतात. :D इंडोनेशियन्स श्री. किंवा सर सारखे, आदर दर्शविण्यासाठी एकमेकांना मास किंवा पाक म्हणून संबोधतात. आणि ते हीच संबोधने मेल्समध्येसुद्धा अनेकदा वापरतात.

पहिला वीकेंड जवळ येत होता, मी जकार्ता आणि अवतीभवती असलेलि प्रेक्षणीय ठिकाणे पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण अडचण म्हणजे माझ्यासोबत जायला कोणी नव्हते. मी माझ्या ऑफिसमधून जकार्ताला जाणारा शेवटचा होतो. बाकी सर्वजण तेथे आधीच गेलेले असल्यामुळे त्यांनी जवळपास सारी ठिकाणे आधीच पाहिली होती. त्यापैकी काहीजणांची तर इथे सहावी सातवी ट्रिप होती. मी आधी कुठे जाऊ मला कळत नव्हतं.

kuningan

आम्हाला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागलं. त्यामुळे शनिवारी मी उशिरापर्यंत झोपा काढल्या. तो दिवस अर्धा झोपेमुळे आणि उरलेला पावसामुळे वाया गेला. संध्याकाळी सोबत कोणी नव्हतंच. मी एकटाच माझा कॅमेरा घेतला आणि कुनिंगान म्हणजे जिथे मी राहत होतो तो भाग, तिथे आसपास फोटो काढत भटकून आलो.

कुनिंगान मध्ये मी संध्याकाळी भटकत काढलेले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मी भटकून परत हॉटेलमध्ये आलो आणि मला लिफ्टमध्ये ऑफिसमधला एकजण भेटला. आम्ही एकमेकांना नावाने ओळखत नव्हतो पण ऑफिसमध्ये पाहिलेलं असल्यामुळे आम्ही ओळखीची स्माईल दिली. मी सहज विचारून बघावं म्हणून त्याला उद्या कुठे जवळपास साईट सीईंगला यायला आवडेल का असं विचारलं. आणि तो चक्क हो म्हणाला. माझा मजला आला होता, बाहेर येण्याआधी आम्ही पटापट एकमेकांचे नाव आणि नंबरची देवाणघेवाण केली. आणि मी रूममध्ये परत आलो तेव्हा माझ्याकडे उद्यासाठी सोबत आणि प्लान दोन्ही होते. :)

प्रतिक्रिया

एस's picture

14 May 2015 - 3:16 pm | एस

वाचतोय!

अत्रन्गि पाउस's picture

14 May 2015 - 4:08 pm | अत्रन्गि पाउस

पुलंना चहा मधे अजून दुध हवे होते तेव्हा त्यांची यजमानीण नोकराला म्हणाली "बावा लागी सुसू " आणि पु ल दचकले होते (-पूर्वरंग)

मदनबाण's picture

14 May 2015 - 4:36 pm | मदनबाण

लेखन आवडले ! :)
आधीचे भाग वाचावयाचे राहुन गेले आहेत, वेळ मिळताचे ते सुद्धा वाचेन. :) हा भाग वाचुन जकार्तात कुठल्याश्या क्लायंट ने चांगली ऑफर देउन आपल्यालाही कामासाठी बोलवले पाहिजे असं वाटुन गेलं { ऑफिसचे इतके मुक्त वातावरण पाहुन} :)
असेच लिहीत रहा...

जाता जाता :- जकार्ता म्हंटले की काळे काका आठवतात... ते सध्या कुठे आहेत ? आणि काय करतात हे कोणास ठावूका आहे का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व
Why on earth is Narendra Modi going to Mongolia?
Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China
Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li
India’s foreign policy must continue to move past the parochial
Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns

योग्यकार्ताचे वर्णन आवडले!! फोटो अजून चालले असते.

(1) बॅटमॅन (Thu, 14/05/2015 - 18:40) यांनी लिहिले--योग्यकार्ताचे वर्णन आवडले!! मला तरी हे वर्णन कुठे दिसले नाही? योग्यकर्ताला गेलात तर तेथून जवळच जगप्रसिद्ध त्रिमूर्ती संकुल (प्रम्बनम) आणि स्तूप (बोरोबुदूर) आहेत त्यांचे वर्णन आणि माहिती वाचायला आवडेल (मी तेथे नोव्हेंबर मध्ये जायचा विचार करत आहे त्याला मदत होईल).

(2) जाता जाता/अवांतर--ऑक्टोबर २०१४ मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले होते त्या संदर्भात श्री दिनानाथ सावंत यांनी लोकसत्ता (ऑक्टोबर २२, २०१४) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पत्रात लिहिले होते कि इंडोनेशियाचे लष्कर खाली दिलेली काही संस्कृत घोषवाक्ये वापरते. ती वाचून मी थक्कच झालो आणि माझ्या एका मित्रामार्फत श्री सुधीर काळे (ते आता परत येउन पुण्याला स्थायिक झाले आहेत आणि मिपाचे सदस्य आहेत असे कळते) यांना याबद्दल विचारले. त्यांच्या माहितीप्रमाणे क्रमांक 3 चे वाक्य गीतेतील एका श्लोकातील (2:47) पदाशी काही अंशी मिळते जुळते आहे (*हा दुवा पहा ). आता इतर उरलेल्या वाक्यांबद्दल तेथील स्थानिक लोकांशी बोलून अधिक माहिती मिळाली तर पहा हि विनंती.

(1) जलेषु एव जयामहे (Indonesian navy)

(2) जलेषु भूम्याम च जयामहे (Marine Corps)

(3) कर्मण्येवाधिकारः ते मा फलेषु कदाचन (Air Force, Special Forces Corps; *)

(4) राष्ट्र सेवकोत्तमः (National Police)

(5) त्रिसंध्या युद्ध (Artillery)

(6) धर्म विचक्षण क्षत्रिय (Police Academy)

(7) दिव्शक्ति भक्ति (Equipment Corps)

(8) सत्य वीर्य विचक्षणा (Military Police)

* क्र ३ मधील वाक्याचा दुवा https://mail.google.com/mail/u/0/?ui=2&ik=a3dfa7f36d&view=fimg&th=14c203...

खूप छान!.असे वातावरण जर भारतातील आयटी कंपनी मधे असले तर काम करायला किती छान वाटेल.