जालीय निदान ( internet diagnosis)
काल माझ्याकडे सोनोग्राफीसाठी २५ वर्षांची एक लग्न न झालेली मुलगी आली होती. तिला पाळीच्या दिवसात फारच जास्त त्रास होत असे म्हणून स्त्रीरोग तज्ञाने माझ्याकडे पाठविले होते. माझ्या सोनोग्राफी च्या खोलीत मी रुग्णांच्या नातेवाईकांनासुद्धा येण्याची परवानगी देतो. त्याप्रमाणे तिची आई सुद्धा आली होती. मी तिचे केस पेपर पाहीले त्यात फारसे काही आढळले नाही. तिची सोनोग्राफी सुरु केल्यावर तिने मला बरेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. डॉक्टर endometriosis अजून आहे का/ माझ्या ओव्हरीज कशा आहेत. त्यावर काही डाग आहे का? आतमध्ये सिस्ट (cyst) आहे का? गर्भाशयाला सूज आहे का?
सर्व साधारणपणे मी रुग्णाशी सोनोग्राफी करताना संवाद साधतो. त्यामुळे बर्याच गोष्टी ज्या निदानाला आवश्यक असतात त्या लक्षात येऊ शकतात. काही वेळेस त्यांना पाठवणार्या डॉक्टरांच्या लक्षात न आलेल्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाने कितीही प्रश्न विचारले तरी मी चिडत नाही . मी तिला विचारले कि तुम्हाला endometriosis चा त्रास केंव्हा पासून आहे. त्यावर ती काहीच बोलली नाही. मग मी तिला विचारले कि तुमची laparoscopy झाली आहे का? यावर ती म्हणाली कि नाही. मग मी विचारले कि तुम्हाला endometriosis आहे हे कोणी सांगितले. त्यावर ती म्हणाली कि अगोदरचे स्त्रीरोग तज्ञ पाळीचा इतका त्रास होतो तर असे काहीतरी असण्याची शक्यता आहे असे म्हणाल्याचे आठवते. मी तिला परत विचारले कि हे सिस्ट किंवा ओव्हरीज वर डाग तुम्हाला कोण म्हणाले? त्यावर ती म्हणाली कि ते मी इंटरनेट वर वाचले. हे ती मुलगी बोलत असताना मला थोडेसे हसू आले आणि मी तिला विचारले कि का हो तुमचा टी व्ही बिघडला कि तुम्ही त्याचा आय सी गेला आहे का सर्किट खराब झाले आहे का याचा जीवाला त्रास करून घेता का? किंवा इंटरनेट वर वाचून पाहता का? यावर त्यामुलीची आई सूचक हसली. अर्थात ती मुलगी नाही म्हणाली. मग मी तिला म्हणालो कि केवळ तुमच्या एका डॉक्टर नि हा शब्द उच्चारला म्हणून त्यावर तुम्ही जालावर बरेच वाचन केलेत आणि त्याने आपले डोके पिकवून घेतलेत?. तिला मी व्यवस्थितपणे पाळीचा त्रास का होतो हे समजावून सांगितले. बर्याच मुलींच्या गर्भाशयाचे तोंड लहान असते त्यामुळे पाळीच्या वेळेस झालेल्या रक्ताच्या गाठी बाहेर टाकण्यासाठी गर्भाशय जोरात आकुंचन पावते त्यामुळे ओटीपोटात मुरडा झाल्यासारखे( spasm) प्रचंड दुखते. लग्न झाल्यावर जेंव्हा मुलगी प्रथम गरोदर राहते तेंव्हा तिची पाळी बंद होते आणि नंतर जसा जसा गर्भाशयाचा आकार वाढत जातो तसे त्याचे तोंड मोठे होते आणि शेवटी प्रसुतीनंतर गर्भाशयाचे तोंड मोठे होते आणि हा प्रश्न कायमचा बंद होतो. मी तिला हसत म्हणालो कि याचा अर्थ तुम्ही लगेच लग्न करा असे मला सुचवायचे नाही. तुम्ही लग्न केंव्हा करावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे होईस्तोवर माझी सोनोग्राफी पूर्ण झाली होती आणि मला असे दिसले कि तिला वजन थोडेसे वाढल्यामुळे PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) हा आजार होता. पण हा काही फार गंभीर आजार नाही. मी तिला पुढे म्हणालो कि जर पाळीचा फारच जास्त त्रास होत असेल तर गर्भाशयाचे तोंड डायलेटर टाकून मोठे करता येते. परंतु लग्न न झालेल्या मुलीची खालून शक्यतो कोणतीही शल्यक्रिया केली जात नाही. हा उपाय अगदी शेवटचा म्हणूनच वापरला जातो. पाळीच्या त्रासावर परिणामकारक वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत ती सहज घेता येतील. नेट वर वाचून कोणतेही निदान करणे हे फारसे चांगले नाही. मी तिचे सर्व जुने कागदपत्र परत पाहायला मागितले.त्यात कुठेही endometriosis असल्याचा उल्लेख दिसला नाही. अगोदर केलेल्या सोनोगाफितही नाही.त्या सोनोग्राफीत तिला mild PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) असल्याचे लिहिले होते.
गम्मत म्हणजे तिने जालावर वाचून केलेल्या निदानावर एका आयुर्वेदिक वैद्याने तिला endometriosis चे उपचार चालूही केलेले होते. त्यातून तिला अडीच महिने पाळी पण आली नव्हती.( अर्थात हे कदाचित PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम मुळे पण असू शकेल) तिच्या भावाच्या आग्रहामुळे ती आता स्त्रीरोग तज्ञाकडे गेली होती. मला आश्चर्याचा धक्काच बसला. नक्की निदान नसताना गृहीत गोष्टींवर आजार आहे हे समजणे आणी त्यावर इलाजही करणे.
मुळात जालावर वाचून अर्धवट ज्ञान घेऊन लोक येतात हा अनुभव मी गेली बरीच वर्षे घेत आलो आहे. दुर्दैवाने त्या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे बहुतांश लोकांना कळत नाही आणि त्यामुळे ते भरपूर टेन्शन घेतात हे मी पाहतो आहे.
हे सर्व झाल्यावर आम्ही बाहेर आलो. ती मुलगी टॉयलेट मध्ये गेली असताना तिची आई मला म्हणाली डॉक्टर तुम्ही इतके छान समजावून सांगता तर मी तुम्हाला एक विनंती करते कि तिला नीट समजावून सांगा, काही तरी वाचते आणी टेन्शन घेऊन बसते.ती स्वतः इलेक्त्रीकल इंजिनियर आहे. चांगली मोठ्या कंपनीत नोकरी आहे.आपल्याला काहीतरी गंभीर आजार आहे असे काहीतरी डोक्यात घेऊन बसली आहे. तिच्यासाठी चांगले स्थळ आले होते.मुलगा पण मेकानिकल इंजिनियर होता. तिने त्या मुलाला सांगितले कि मला ENDOMETRIOSIS आहे तेंव्हा मला मुल होण्याची शक्यता नाही. झाले ते लोक निघून गेले. असे सांगितल्यावर कोण लग्न करेल हिच्याशी?
मला धक्काच बसला तिचा मोठा भाऊ इतका वेळ बाहेर बसला होता तो पण अगदी कळवळून म्हणाला कि डॉक्टर काहीतरी खूळ डोक्यात घेऊन बसते आणी म्हणते मला कुणाला फसवायचे नाही. तुम्ही तिला समजावा हो.मी त्यांना हसून धीर दिला. ती मुलगी तोवर टॉयलेटमधून बाहेर आली. मी तिला स्पष्टपणे सांगितले तुम्हाला कोणताही आजार नाही. तुम्ही नवीन कार विकत घेता तेंव्हा कारची कंपनी तुम्हाला तीन वर्षे किंवा ३०,००० किमी ची WARRANTY का देते तर नवीन गाडीत काही खराबी येण्याची शक्यता नसतेच म्हणून. तसेच आहे. पंचविसाव्या वर्षी कोणता आजार होईल. फार तर प्रेम जमू शकेल
अहो पंचवीस वयाला मी आजार किंवा असल्या काही गोष्टी माझ्या स्वप्नात पण नव्हत्या. उद्या कुठे फिरायला जायचे. कुठल्या सिनेमाला जायचे.कुठे मुली पाहायला जायचे. असले विचारच आमच्या डोक्यात असत. पंचविशीला तुम्ही भलत्याच गोष्टी डोक्यात ठेवल्या आहेत. नेटवर वाचले म्हणजे त्यातील सर्वात वाईट आणी गुंतागुंतीचे प्रश्न आपल्याला होतील असे तुम्ही जे गृहीत धरता आहात ते चुकीचे आहे. माझ्या कडे भरपूर गरोदर बायका जालावर काही बाही वाचून डोकं पिकवून घेऊन येतात. मुलाची वाढ व्यवस्थित आहे का? माझा आहार बरोबर आहे ना? ई ई .
तुम्ही तर त्याच्या पुढे गेलात. नसलेला आजार गृहीत धरून तुम्ही तुम्हाला मुल होणार नाही हे मनात धरलेत? तुम्हाला अगदी endometriosis असेल तरीही त्यात मुल होत नाही हे कुणी सांगितले? मी गेली कित्येक वर्षे वंध्यत्व या विषयात काम करत आलो आहे आणी शेकड्यांनी बायका endometriosis च्या पाहील्या आहेत ज्या गरोदर होऊन व्यवस्थित मुलांना जन्म देऊन आनंदात आहेत.
तुम्ही गाडीच्या ABS मधून आवाज यायला लागला कि नेटवर तपासता कि सर्व्हिस सेंटरला जाता? तुम्हाला पंचविसाव्या वर्षी काय आजार होणार आहे? उगाच स्वतःवर आणी आपल्या कुटुंबावर टेन्शन कशाला आणता आहात? मी तुमची सोनोग्राफी केलेली आहे त्यात endometriosis मुळीच दिसत नाहीये. त्यातून endometriosis अगदी असेल तरी ते सूक्ष्म स्वरुपात असेल आणी इतक्या कमी प्रमाणात असलेल्या endometriosis मुळे मुल होणार नाही हे समजणे साफ चूक आहे. त्यावर ती मुलगी हसली. तिला ते पटले.काहीवेळा सोनारानेच कान टोचावे लागतात
तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. भाऊ सुद्धा सद्गदित झाला. मी त्या मुलीला म्हणालो कि मला लग्नाला नाही तरी रिसेप्शनला बोलवा. मला आईस्क्रीम फार आवडते अन फुकट असेल तर अजूनच. ते सर्व जण हसले आणि मला निरोप देउन गेले.
जाता जाता ---
माहिती आणि शहाणपण यात फरक करायला आपण शिकले पाहिजे.
टोमाटो हे फळ आहे हि "माहिती" आहे
पण ते फ्रुट सॅलड मध्ये घालू नये हे "शहाणपण" आहे
प्रतिक्रिया
21 Apr 2015 - 4:15 pm | सुबोध खरे
यात डॉक्टरांच्या वर्तनाचे समर्थन नसून विश्लेषण आहे
या वाक्याच्या खालीच आपण "डॉक प्रत्येक गोष्टीचे समर्थन केलेच पाहिजे असे काही नाही"
असे लिहिले आहे. एक तर आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचलेले नाही किंवा हा स्कोर सेटलिंगचा प्रकार असावा असे वाटते.
दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते. पण तसे होत नाही आणि होणारही नाही. त्या चार शब्दांऐवजी( मृदू , सहनशील, सेवाभावी आणि नम्र) डॉक्टर "आदर्श" असावा अशी समाजाची अपेक्षा असते असे लिहायला हवे होते का ? तसे लिहितो. पण त्याचा अर्थ असा आहे कि समाजाची डॉक्टर बद्दल अवास्तव अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा ठेवल्यास दुर्दैवाने अपेक्षाभंग होणार कारण डॉक्टर आदर्श हा पुस्तकात असतो आणि व्यवहारात तो माणूस असतो होणारही नाही. या ऐवजी त्या दुर्दैवी शब्दाचा कीस पाडत त्यांनी डॉक्टराना उच्च विचारसरणीचा सल्ला दिला.
डॉक्टरने त्याच्या सेवेचा चोख मोबदला वसूल करण्यात काहीच गैर नाही. यात सेवाभावी कसे हो येणार? तसेच गिर्हाइकाला देखील चोख, तत्पर आणि नम्र सेवा मिळालीच पाहिजे. पण त्या साठी तितका मोबदला देण्याची समाजाची तयारी आहे का?
असो. यात डॉक्टर बद्दल आलेल्या वाईट अनुभवामुळे दिसत असलेला वैयक्तिक आकस दिसतो आहे.
मुळ धागा कशावर आहे आणि लोक आपले वैयक्तिक स्कोर सेटल करायला पाहत आहेत.
नेत्रेश साहेब तर प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी कसेही कुठूनही शब्द्च्छल करुन डॉक्टरानि आत्म परीक्षण करावे हेच पालुपद घेऊन बसलेले दिसतात.
हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे.
ठीक आहे याचा साधा सरळ अर्थ आहे कि तुम्ही आम्हाला काही शिकवायची गरज नाही आम्ही सर्वज्ञ आहोत.असाच असेल तर
मग यापुढे वैद्यकीय माहितीवर धागा काढणे मी बंद करतो.
आणि हे मी भावनेच्या आहारी जाऊन लिहिलेले नाही.
धन्यवाद
21 Apr 2015 - 4:29 pm | कपिलमुनी
डॉक्टर , तुम्ही मिपावरचे जुने जाणते .. तुम्हीबी असा म्हणला तर कसा व्हायचा
21 Apr 2015 - 4:54 pm | पिलीयन रायडर
ह्या चर्चेचा निष्कर्ष काय निघेल ते माहित नाही पण ह्या धाग्यावर डॉक्टरांनाच टारगेट करुन अवांतर केलं जात आहे हे मलाही खेदजनक वाटलं.
शिवाय ही सगळी चर्चा आत्ताच काही दिवसांपुर्वी फारच डीटेल मध्ये झाली आहे. तो धागा वापरा हवं तर..
21 Apr 2015 - 5:49 pm | असंका
:(
डॉ. साहेब, ज्या संयमाने आपण इथे उत्तरे देत आहात - गेले कित्येक दिवस- त्यातून खूप काही शिकायला मिळाले आहे. पण हे कधी तरी थांबणार्/थांबावं असं मला वाटत होतं हे खरं. कारण अत्यंत चीड येइल अशा पद्धतीने प्रतिसाद येत होते...
विनंती आहे की लिहित रहा. इथे अनेक वाचक आहेत जे आपल्या लेखांची वाट बघतात. हे उलट प्रतिसाद देणारे त्यांच्यासमोर नगण्य संख्येने आहेत.
21 Apr 2015 - 7:08 pm | रुस्तम
सहमत...
21 Apr 2015 - 9:21 pm | टवाळ कार्टा
प्रचंड सहमत
21 Apr 2015 - 8:14 pm | श्रीरंग_जोशी
डॉक्टर साहेब, कदाचित अशा लेखनाला योग्य ती पोचपावती देण्यास आम्ही कमी पडत आहोत. परंतु कृपया वैद्यकीय माहितीवर धागा काढणे थांबवू नका.
मी २०१२ मध्ये मिपावर सक्रीय झालो. तेव्हापेक्षा २०१५ मधले मिपाचे वातावरण खूपच सकारात्मक वाटते.
एकतर असा गुणात्मक बदल प्रत्यक्षातच घडला असेल. किंवा संवेदनशील मनाला त्रास देणार्या (ट्रोलछाप) विचारांकडे दुर्लक्ष करायला मी शिकलो असेन.
काही लोकांना बाहेरच्या जगात जे काही खटकते त्याचे स्पष्टीकरण मिपावरच्या त्या क्षेत्रातील प्रतिनिधींकडून हवे असते. हे पूर्णपणे अव्यावहारिक आहे. आशा करूया की त्या लोकांना आज ना उद्या अशा आचरणाच्या नकारात्मक परिणामांची जाणिव होईल.
बाकी सार्वजनिक आयुष्यात फार संवेदनशील राहून चालत नाही हे तर त्रिकालबाधित सत्य आहे.
22 Apr 2015 - 6:25 am | नंदन
असेच म्हणतो.
जालावर काय किंवा छापील लेखनात काय, जितक्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांचं अनुभवविश्व येईल; तितकंच ते संकेतस्थळ/पुस्तकव्यवहार अधिक समृद्ध, अधिक वाचनीय होत राहील.
22 Apr 2015 - 10:31 am | मृत्युन्जय
एक तर आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचलेले नाही किंवा हा स्कोर सेटलिंगचा प्रकार असावा असे वाटते.
गंमतच आहे. आजकाल प्रत्येक गोष्टीला स्कोर सेटलिंग म्हणायची फ्याशन आली आहे, तुमचे सगळे धागे काढुन बघा. त्यात आवडला म्हणुन तरी प्रतिसाद असेल किंवा द्यायचा राहुन गेला असेल. ते कुठल्या प्रकारचे स्कोर सेटलिंग होते कुणास ठाउक. कुठल्याही प्रतिसादाला प्रतिवाद केला की तो स्कोर सेटलिंगचा प्रकार होतो? डॉक्टरांच्या इतक्या ढीगभर धाग्यांवर मी कधी फार निगेटिव्ह प्रतिसाद दिलेला आठवत नाही. याआधी तुमच्याशी कधी माझा वाद झाल्याचे आठवत नाही. तरी हा स्कोर सेटलिंगचा प्रकार होतो? मी काय लिहिले आहे ते आपण नीट वाचले आहे की नाही हा मलाच पडलेला प्रश्न आहे आता.
दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते. पण तसे होत नाही आणि होणारही नाही. त्या चार शब्दांऐवजी( मृदू , सहनशील, सेवाभावी आणि नम्र) डॉक्टर "आदर्श" असावा अशी समाजाची अपेक्षा असते असे लिहायला हवे होते का ?
नाही. मी तुमच्या अपेक्षा पुर्ण करतो आहे खरे सांगायचे तर. डॉक्टर हा सुद्धा इतर सर्वांप्रमाणे एक व्यावसायिक आहे आणि त्यामुळेच त्याने इतर व्यावसायिकांसारखे सौजन्यशील असायला हवे हे सांगण्यासाठीच मी ४-५ पॅरा खर्ची घातले आहेत. इतर व्यावसायिकांप्रमाणे त्यांनाही त्यांचे पैसे चोख वाजवुन घेण्याचा अधिकार आहे असेही लिहिले आहे. मी आधी लिहिलेले परत लिहितो " जर डॉक्टर इतर व्यावसायिकांप्रमाणे असेल तर इतर व्यावसायिकांप्रमाणे त्याने सौजन्यपुर्ण सेवा द्यावी". (आणी तो तसाच असावा असे मला वाटते). इतर दुकानदार जर तर्हेवाईकपणे वागत असतील तर आपण त्यांच्यावर टीका करतो पण डॉक्टरांच्या चुकीच्या वागण्यावर टीका म्हणजे अब्राह्मण्यम असे का म्हणे?
डॉक्टर चुकीचा वागला की "तो पण माणूसच आहे, सरकारी कार्यालयात अजुन सुरस अनुभव येतील, इंग्लंड अमेरिकेत वगैरे सुद्धा असेच अनुभव येतील, मानवी स्वभावाला औषध नाही" वगैरे गोष्टी का लिहाव्याशा वाटतात? तिथे त्याच्या चुकीच्या वागण्यावर टीका का होत नाही? वर "डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही" असेही आपण लिहिता. मी जर पैसे देत असेन तर सेवाकर्त्याने सौजन्यपुर्ण सेवा देणे हा माझा एक ग्राहक म्हणुन अधिकार आहे. मग डॉक्टरने "मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र" असण्यात गैर ते काय? परंतु उलट तुम्हीच अतिशय ठामपणे असे होणारच नाही असे लिहिता. मग ग्राहकाकडुन तरी योग्य वर्तणुकीची अपेक्षा कशी काय धरता? म्हणजे डॉक्टरने मुजोरी करावी, उर्मटपणे वागावे, पैसा वाजवुन घ्यावा (तो त्याचा हक्कच आहे), ग्राहकांच्या प्रश्नांची नीट उत्तरे देउ नयेत पण तरीही ग्राहकाने मात्र न कुरकुरता, न कटकट करता, डॉक्टर जे म्हणेल त्याला होयबा म्हणुन मान डोलावुन, एकही अधिक उणा प्रश्न न विचारुन निमुटपणे पैसे द्यावेत आणि मिळालेल्या सेवेत काहिही कमतरता असेल तरीही कुठेही तक्रार करु नये असेच ना?
तसे लिहितो. पण त्याचा अर्थ असा आहे कि समाजाची डॉक्टर बद्दल अवास्तव अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा ठेवल्यास दुर्दैवाने अपेक्षाभंग होणार कारण डॉक्टर आदर्श हा पुस्तकात असतो आणि व्यवहारात तो माणूस असतो होणारही नाही.
अवास्तव अपेक्षा नाहित पण योग्य ती सेवा द्यावी, सौजन्यपुर्ण वागावे आणि शंकांचे निरसन करावे, ग्राहक आधीच व्याधीग्रस्त आणि पीडाग्रस्त आहे, काळजीत आहे हे समजुन घेउन थोडे मार्दवाने थोडे सहिष्णु वृत्तीने वागावे अशी माफक अपेक्षा आहे. चूक आहे काय?
या ऐवजी त्या दुर्दैवी शब्दाचा कीस पाडत त्यांनी डॉक्टराना उच्च विचारसरणीचा सल्ला दिला. डॉक्टरने त्याच्या सेवेचा चोख मोबदला वसूल करण्यात काहीच गैर नाही. यात सेवाभावी कसे हो येणार?
उच्च विचारसरणी असण्यात काही चूकही नाही. उच्च विचारसरणी म्हणजे पदरचे पैसे खर्च करुन समाजोद्धार करावा असे नाही. सेवाभाव म्हणजे मनापासून सेवा करण्याची वृत्ती. त्याबदल्यात मोबदल्याची अपेक्षा धरु नये असे काही नाही. डॉक्टरांनी चोख मोबदला घ्यावा पण योग्य ती सेवा द्यावी हे मी आधीपण लिहिले आहे.
तसेच गिर्हाइकाला देखील चोख, तत्पर आणि नम्र सेवा मिळालीच पाहिजे. पण त्या साठी तितका मोबदला देण्याची समाजाची तयारी आहे का?
गिर्हाइकाला काही चॉइस आहे?
असो. यात डॉक्टर बद्दल आलेल्या वाईट अनुभवामुळे दिसत असलेला वैयक्तिक आकस दिसतो आहे.
मला डॉक्टरांचे एक दोन अनुभव वाईट आहेत. पण त्यात काही फार राग नाही. एक डॉक्टर ज्यांचा एक अनुभव वाईट आला त्यांच्याबद्दल इतर कारणांनी आदरच आहे. या डॉक्टरांनी शेवटपर्यंत आपली चूक मान्य केली नाही. इतर ४-५ डॉक्टरांनी अगदी ठामपणे चूक कुठे आणि कोणाकडुन (म्हणजे पहिल्या डॉक्टरकडुन) झाली आहे हे ठामपणे सांगितले. हा अनुभव येउनही परत आम्ही त्याच डॉक्टरकडे जातो. ती गोष्ट वन ऑफ चूक म्हणुन दुर्लक्ष केली (त्याचा त्रास अजुनही होतो ही गोष्ट वेगळी). त्यामुळे यात डॉक्टरी पेशाबद्दल वैयक्तिक आकस कुठेही नाही. तुमच्याबद्दल असण्याचा तर प्रश्नच नाही. तरीही तुम्ही असे लिहिले हे बघुन खेद झाला.
मुळ धागा कशावर आहे आणि लोक आपले वैयक्तिक स्कोर सेटल करायला पाहत आहेत.
कुठला वैयक्तिक स्कोर सेटल करतो आहे मी ते सांगाच आता. माझा प्रतिसाद केवळ श्री चिनार यांचा अनुभवाच्या अनुषंगाने होता. मी त्यांचा किंवा ते माझा डु आयडी नाही. नेत्रेश या आयडीशीही माझा काही संबंध नाही, मग हे स्कोर सेटलिंग नक्की कसे?
नेत्रेश साहेब तर प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी कसेही कुठूनही शब्द्च्छल करुन डॉक्टरानि आत्म परीक्षण करावे हेच पालुपद घेऊन बसलेले दिसतात.
मी अजुनतरी असे काही म्हटलेले नाही.
हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे.
मान्य
ठीक आहे याचा साधा सरळ अर्थ आहे कि तुम्ही आम्हाला काही शिकवायची गरज नाही आम्ही सर्वज्ञ आहोत.असाच असेल तर मग यापुढे वैद्यकीय माहितीवर धागा काढणे मी बंद करतो.
मी यावर प्रतिक्रिया देत नाही. तुमच्याशी भांडण करण्याची माझी कुठलीही इच्छा नसल्याने याला पास देतो. माझ्यावर झालेल्या स्कोर सेटलिंगच्या आणी वैयक्तिक आकसाच्या निरर्थक आरोपांमुळे व्यथित झालो आहे असे मात्र खेदपुर्वक नमूद करु इच्छितो.
10 May 2015 - 10:27 pm | सतिश गावडे
डॉकना या धाग्यावर कुणी असं रोखठोक आणि मुद्देसुद विचारणं अपेक्षित नसेल त्यामुळे डॉक भांबावून गेले असतील आणि त्यांना तुझे प्रतिसाद स्कोअर सेटलिंगचा प्रकार वाटला असेल.
22 Apr 2015 - 11:03 am | नेत्रेश
> "यात डॉक्टर बद्दल आलेल्या वाईट अनुभवामुळे दिसत असलेला वैयक्तिक आकस दिसतो आहे. मुळ धागा कशावर आहे आणि लोक आपले वैयक्तिक स्कोर सेटल करायला पाहत आहेत. नेत्रेश साहेब तर प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी कसेही कुठूनही शब्द्च्छल करुन डॉक्टरानि आत्म परीक्षण करावे हेच पालुपद घेऊन बसलेले दिसतात"
म्हणजे डॉक्टर्सनां लोकांचे आलेले वाईट अनुभव लिहुन त्यांना उपदेश करायची परवानगी आहे. पण लोकांनी डॉक्टरकडुन काही अपेक्षाच ठेवायची नाही, आणी काही चांगले सुचवायचेच नाही? जसे तुम्ही केलेली टीका प्रत्येकाला लागु होत नाही तशी डॉक्टरचा वाईट अनुभव आलेल्यांनी डॉक्टर्सवर केलेली टीका प्रत्येक डॉक्टरने पर्सनली घ्ययची गरज नाही.
डॉक्टरकडुन असलेल्या अपेक्षा मोकळेपणी मांडल्या तर त्याला वैयक्तीक आकस / स्कोअर सेटलींग म्हणायचे? वर काही डॉक्टर्सचे प्रतीसाद तर यापेक्षा जास्त वैयक्तीक आणी खालच्या दर्जाचे आहेत. (डॉ. खरे यांच्या प्रतीसादापद्दल बोलत नाही, गैरसमज नको)
बाकी डॉ. खरे व त्यांच्यासारख्याच अनेक विद्वान आणी प्रोफेशनल डॉक्टर्सविषयी मी काही लिहीलेले नाही. पण अनेक अन-प्रोफेशनल आणी वाईट डॉक्टर्स अस्तीत्वात आहेत आणी लोकांचा डॉक्टरवरील विश्वास कमी व्हयला त्यांचे वर्तन (कट-प्रक्टीस,लुबाडणुक, ईत्यादी) कारणीभुत आहे ईतके तरी त्यांना मान्य होण्यास हरकत नसावी.
तसेच आत्मपरीक्षण करणारा हा दोषीच असतो असे नाही. माझ्या माहीतीप्रमाणे या शब्दाचा मराठी अर्थ self-assessment / self-evaluation आहे. असो. माझ्या कोणत्याही प्रतीसादात कुणाही डॉक्टरवर वैयक्तीक टीका केलेली नाही. डॉ. खरे यांनी माझा कुठलाही प्रतीसाद पर्सनली घेउ नये.
22 Apr 2015 - 11:42 am | कपिलमुनी
तुमचा धंदा काय ?
10 May 2015 - 12:51 pm | अत्रन्गि पाउस
आपल्या लिखाणाबद्दल सर्वच मिपा करांना नितांत आदर आणि आस्था आहे ...
आपली संयत भाषा ... अनुभव, समजावून देण्याची हातोटी ह्या सगळ्यांची आम्हाला जाणीव आहे ...
आणि हे आपण सतत मनात ठेवा हि आपल्याला नम्र विनंती
"हंसोहंस: ..बकोबक:" हे आम्हीही जाणतो ..
20 Apr 2015 - 12:14 pm | नाखु
एक नंबरी ले़ख
जाल् (हिंदी) =====जाळ(अग्नी)(मराठी)
किंवा जाल् (हिंदी)=== जाळे मराठी)
अता यात अडकायचे का पोळायचे हे ज्याचे त्यानी ठरवायचे दिवस आले आहेत.
वैयक्तीक आयुष्यात अगदी अत्यंत कटू प्रसंग येऊनही सगळ्याच डॉक्टरना आरोपी न समजणारा
अनुभवी नाखु
20 Apr 2015 - 12:56 pm | कपिलमुनी
आजाराबद्दल आंजावर माहिती शोधणे हे चांगलेच आहे.
बाबांना कॅन्सर झाला होता तेव्हा बाकी रूग्णांचे , त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव फार उपयोगी पडले ( औषधोपचार नाही पण इतर परीस्थिती हाताळताना) .
पण आंजावर वाचून पुर्वग्रह करणे आणि औषधोपचार स्वत:च घेणे हे शुद्ध मुर्खपणाचे लक्षण आहे.
जर नेत्रेश म्हणतात त्याप्रमाणे डॉक्टर खात्रीशीर नसेल तर डॉक्टर बदलावा पण कधीही स्वतः औषध घेउ नयेत.
नेट वर बर्याचदा अर्धवट माहिती असते. साईड इफेक्ट नसतात.
माझा अनुभव असा आहे ,
पुणे - मुंबईचे बहुसंख्य डॉक्टर खूप काम असल्याने रूग्णाशी कमी बोलतात , नक्की काय झाले आहे , कशाने झाले आहे, पथ्ये काय हे सांगत नाहीत. "गोळ्या दिल्या आहेत, बरे नाही वाटले तर या पुन्हा " अशी वृती आहे . त्यामुळे रूग्ण आंजावर माहिती घ्यायचा प्रयत्न करतात.
20 Apr 2015 - 1:28 pm | कानडाऊ योगेशु
बेंगलोरमध्येही हीच रडकथा आहे. अपॉईंटमेंट घेऊन गेलो तरीसुध्द्या कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त कितीही वेळ स्वतःचा नंबर येऊ पर्यंत बसावे लागते. आणि सध्या फी सुध्दा जास्त झाल्या आहेत त्यामुळे बर्याच वेळेला रूग्णाला आपण आतापावेतो वाया घातलेल्या वेळेचा व दिल्या जाणार्या पैशांचा परतावा थोडी जास्त माहीती मिळवुन घ्यावा असे वाटते.
उदा. ३५० रू. तपासणी फि आहे व मला माझा नंबर येण्यासाठी ४५ मिनिटे बसावे लागले. आणि डॉक्टरने फक्त तपासुन काहीही बातचीत न करता मोजुन ५ मिनिटात बाहेर काढले तर मनात त्याने पुरेसा वेळ न देता डायग्नोसिस केले ही शंका घर करुन बसते.
अर्थात पुरेसा वेळ देणारे डॉक्टर ही अनुभवले आहेत व त्यावेळेला फि कडे न पाहता त्याच डॉक्टरकडे नंतरही गेलेलो आहे.
20 Apr 2015 - 7:59 pm | सुबोध खरे
हि गोष्ट दुर्दैवाने खरी आहे कि बरेच डॉक्टर रुग्णांना पुरेसा वेळ देत नाहीत. फी जर कमी ठेवली तर तेवढेच पैसे मिळवायला तुम्हाला जास्त रुग्ण पाहायला लागतात. या ऐवजी आपण फी वाढवा आणि जेवढे येतील त्यांना पूर्ण न्याय द्या असे माझे म्हणणे आहे. परंतु बाजार प्रभावीत व्यवस्थेत तसे करण्याचे धैर्य बर्याचशा डॉक्टरना नाही हि वस्तुस्थिती आहे.
माझी फी वरच्या पट्टीतील आहे असे मला काही रुग्णांनी सांगितले आहे त्यावर माझे म्हणणे एवढेच कि चार रुग्ण पाहतो आणि त्यांना पूर्ण न्याय देतो. उगाच एक ना धड भाराभर चिंध्या हे मला जमत नाही. तुम्हाला परवडेल आणि पटेल तेथे तुम्ही जावे.ज्यांना हे पटते ते माझ्याकडे येतात.
21 Apr 2015 - 11:43 am | नेत्रेश
असे फार थोडे डॉक्टर असतात. बहुसंख्य डॉक्टर हे कायम भारग्रस्त आणी त्यामुळे तणावग्रस्त असतात.
त्यामुळे रुग्णांचा शंकांवर चिडणे, पाट्या टाकल्या सारखे ५ मिनीटांत १ रुग्ण निपटवणे, दीवसात १०० च्या वर रुग्ण तपासणे इत्यादी प्रकार सर्रास होतात.
मग ५ मिनीटात बाहेर आलेला (घालवलेला) रुग्ण नेटवर जाउन आपले शंका निरसन करायला बघतो आणी बाकी ईतर माहीती (साईड ईफेक्टस वगैरे) वाचुन घाबरतो. परत शंका निरसन करायला डॉक्टर भेटत नाही तेव्हा वैद्याच्या सल्याने किंवा स्वतःच्या मनाने औषधे किंवा डोस बदलतो.
ईथे रुग्ण चुकीचे वागतो नि:संशय. पण ही परीस्थीती डॉक्टर बदलु शकतात.
20 Apr 2015 - 7:15 pm | आजानुकर्ण
गप्प बसायचे ठरवले आहे. ;)
20 Apr 2015 - 10:12 pm | मधुरा देशपांडे
लेख आवडला. पटला.
21 Apr 2015 - 1:05 pm | सस्नेह
जालावरू न निदान करू पाहणे चुकीचेच !
तथापि योग्य मार्गाने स्वत:च्या शरीराबद्दल आणि आजाराबद्दल माहिती घेणे अगदी स्वाभाविक आणि आवश्यक आहे. पुष्कळदा डॉक्टर्स याबाबत रुग्णांना पुरेसे विश्वासात घेत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे अशा अप्रत्यक्ष मार्गाने जाण्याची वेळ येत असावी. वरील उदाहरणातच त्या तरुणीस पूर्वीच्या डॉक्टरने असे सूचित केलेलं दिसते.
यावरून डॉक्टरनीही पुरेशा जबाबदारीने पेशंटला निदानाबद्दल सांगितले नाही असे वाटते.
स्वत: स्वत:च्या आरोग्याचा मागोवा घेणे, परिक्षण करणे यात चुकीचे काही नाही. स्वत:च्या शरीर व प्रकृतीमान याबद्दल वाजवी माहिती असायलाच हवी. अर्थात त्याचा फोबिया होऊ नये.
21 Apr 2015 - 1:56 pm | पिलीयन रायडर
खरे काका आणि गोपाळ काका (गम्मत हो..) ह्यांचे प्रतिसाद आवडले.
आपल्याला नक्की काय झालंय हे नेट वर शोधुन पहावेसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे.. पण ते चुक आहेच..
१. अनेकदा नेट वरती लिहीलेले बरोबर असेलच असे नाही. चुकीची माहिती सुद्धा मिळु शकते.
२. नेट वर संपुर्ण सत्य कळत नाही. एखाद्या आजाराची १०० कारणे असु शकतात. आता माझ्या शरीरात त्यातली कोण कोणती, काय कॉम्बिनेशनने काम करत आहेत आणि त्यावर माझे शरीर कसे रिअॅक्ट करत आहे हे कुणास ठाऊक?
३. मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे प्रकरण आहे, ते आपल्या सारख्या शररीशास्त्राबद्दल काहीही न वाचलेल्या / शिकलेल्या माणसाने हाताळु नये हे माझे मत आहे.
४. सर्वच डॉक्टर काही मार खात नाहीत. जे पेशंटला विश्वासाते घेत नाहीत / ज्यांना पाहुनच हा मानूस काही तरी लपवतोय असं वाटतं ते मार खात असावेत. अशा माणसांची पैशाची हाव समजुन येते. पण सरसकट सगळे तसे नसतात. आपण डॉक्टरकडे जाताना चौकशी करुन जावी. ज्यांच्या हाताला गुण आहेत असे अनेक चांगले डॉक्टर आहेत. इमर्जन्सीला मात्र जर वाईट डॉक्टर भेटला तर तो नशिबाचाच भाग आहे. पण वाईट माणसं सर्वत्र आहेत.. त्याला तुम्ही काही करु शकत नाही.
५. डॉक्टर लोक आपल्या आयुष्यातला बराच वेळ शिक्षणात घालतात. त्यात त्यांच्याही धंड्याची गणितं आहेत. सर्वच डॉक्टर बक्कळ कमावत नसावेत. आणी कमावलं तरी तो त्यांच्या प्रोफेशनचाच एक भाग आहे. जसं त्यांना रात्री अपरात्री काम करावं लागु शकतं हा ही एक कामाचा भाग आहे तसं. (बाकी प्रोफेशन्स सोबत तुलना करायचं काही कारण नाही. जगात सर्व काही समान पातळीवर नसतंच..) अशावेळी त्यांनी धर्मादाय काम करावं ही अपेक्षा आपण ठेवु शकत नाही.
६. डॉक्टरांनीही पेशंटला वेळ आणि नीट माहिती देणं आवश्यक आहे. अनेकदा तसं होताना दिसत नाही.
21 Apr 2015 - 7:31 pm | प्रसाद१९७१
@डॉक्टर खरे आणि डॉक्टर गोपाळ साहेब -
तुम्ही कशाला जस्टिफिकेशन च्या मोड मधे जाउन डॉक्टरांची बाजू मांडायचा प्रयत्न करत आहात? ज्या लोकांना डॉक्टरांबद्दल मनात प्रचंड जळजळ आहे ते जातात तरी कशाला डॉक्टर कडे?
ह्या अश्या डॉक्टरांवर च्य बिनबुडाच्या आरोपांना तुम्ही उत्तर देणे म्हणजे तुमचा अपमान आहे. दुर्लक्ष करा. खरेतर अश्या लोकांची काळी यादीच डॉक्टरांनी करुन ठेवली पाहीजे. आणि ह्यांच्या पैकी कोणी आले तर सरळ हाकलुन द्यायला पाहीजे.
22 Apr 2015 - 6:19 am | रुपी
ह्या अश्या डॉक्टरांवर च्य बिनबुडाच्या आरोपांना तुम्ही उत्तर देणे म्हणजे तुमचा अपमान आहे. >> अगदी हेच मनात आले काही प्रतिक्रिया आणि डॉक्टरांनी दिलेली उत्तरे पाहून. खरं तर लेखातला मुद्दा लक्ष्यात घ्यायचा सोडून उगीच फाटे फोडण्यात काय अर्थ आहे?
मला मराठी टाईप करण्याचा कंटाळा येतो म्हणून मी फार थोडक्यात प्रतिक्रिया देत असते. पण माझ्या स्वत:च्या अनुभवावरुन मी शिकले आहे की आरोग्याच्या बाबतीत नेटवर वाचलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढत बसू नये आणि वेळीच डॉक्टरांकडून शंकानिरसन करुन घ्यावे. म्हणून न राहावून इतकं टाइप करत आहे.
आं.जा. वर अनेक ठिकाणी वेगवेगळी माहीती असते. त्यातली विश्वासार्ह कुठली आणि नाही कुठली ते समजत नाही. मला वाटते माणसाचे मन हे बर्याचदा स्वत:ला अपेक्षित असलेली बातमी ऐकायला / वाचायला उस्तुक असते. मग ते भविष्य असो, किंवा अजून काही. आपण बाकी सोडून तेवढं उचलतो आणि मग ते कसं खरं आहे/ लागू होत आहे याचे पुरावे शोधत राहतो. मी एकदा तशीच चूक केलीही. इथे अमेरीकेत मनात आलं की डॉक्टरांकडे जाणं सोपं नाहीये, पण इमेल / फोन करुन शंका निरसन करून घेता येते आणि तरीही वाटलं तर जाउन दाखवता पण येतं. पण नेटवरुन वाचून अगदीच निर्धास्त राहणं किंवा निदान करुन उपचार करणं हे मी आता नाही करणार.
तसं इथे गाडी मेकॅनिककडे नेणंही सोपं नाहीये आणि कधी कधी खूप खर्चिकही असतं. त्यामुळे एक छोटासा बिघाड झाला असताना नेटवर वाचून घरीच उपाय केला आणि आता तीन वर्षे झाली तरी 'तो' बिघाड पुन्हा झाला नाही. पण मोठा बिघाड / निदान/ दुरुस्ती यासाठी तेथे पाहिजे जातीचेच!
23 Apr 2015 - 10:55 am | आनंदी गोपाळ
डॉक्टरांनी अशा लोकांना प्रत्युत्तर देऊ नये. वैद्यकीय 'सेवा' देतो म्हणून सेवकासारखे वागावे, असल्या अपेक्षा आता फेकून द्यायचीही वेळ निघून गेली आहे, म्हणून अशा लोकांना मी उत्तर देत असतो.
"सेवाभावी" संस्थांनी चालवलेल्या चॅरिटेबल हॉस्पिटल्सच्या प्रचण्ड लक्रेटिव्ह धंद्याचं गणीतही इथे लिहीन कधीतरी. मग सेवाभावी म्हणजे काय असतं ते लोकांना समजेल नीट.
नॉर्मली प्रचण्ड शांत असलेल्या डॉ. खरे साहेबांचीही चिडचीड होण्याला कारणीभूत लोकांसाठी आता पुढचे लिहितो आहे.
जेन्युइन शंकांना उत्तरे नक्कीच दिली जातात. पण शंका विचारणे अन 'प्रश्न' विचारणे यातला फरक सहज लक्षात येतो.
उदा. मी कुणा पेशंटला क्विनाईनची गोळी लिहून दिली, तर त्याचा अर्थ त्याला मलेरिया झालेला आहे असा नेहेमीच होतो का? या प्रश्नाचे उत्तर लोकांनी गूगल करून शोधावे. आता, हेदेखिल माहिती नसताना यापुढे जाऊन त्या औषधाचे 'साईड इफेक्ट' नेटवर वाचून चौकश्या करणार्या लोकांची शिकवणी घ्यायला खरेच वेळ नसतो.
कागदावर औषध लिहून देताना, हे औषध या पेशंटला उपयोगी किती अन इजा काय करू शकेल, याचा संपूर्ण हिशोब डोक्यात करून नंतर ते लिहिलं जातं. या औषधाचा त्रास तुम्हाला स्वतःला पूर्वी झालेला असल्यास नक्कीच सांगा. पण, 'मी नेटवर वाचल्या प्रमाणे २२% लोकांना या औषधाच्या सेवनानंतर गुंगी येते, मग तुम्ही हे औषध मला का लिहिले?' हा प्रश्न मुळातच अनाकलनीय व खुसपटकाढू आहे.
या औषधाला असणार्या 'अॅडव्हर्स इफेक्ट्स'बद्दल त्या डॉक्टरांना माहिती नसेल, हे गृहितक त्या प्रश्नापाठी असते. तुम्हाला आजार काय झाला, तो होताना शरीरात काय बदल होतात, व ते औषध त्या आजाराच्या उपचारासाठी नेमके कोणते जीवरासायनिक बदल घडवून आणते, त्यामुळे होणार्या फायद्यांसोबत तोटेही कसे होऊ शकतात हे सगळे डिटेल सांगायचे, तर तितका वेळ हवा, अन त्यासाठी मग तितके पैसेही मोजायची तयारी हवी. शेपन्नास डॉलर तपासणी फी देणार असलात, तर मी नक्कीच हे सगळे समजवून सांगण्याचा प्रयत्न करीन.
मात्र असला प्रयत्न आपल्याकडे करणे मुर्खपणाचे आहे, याचा अनुभव १०० पैकी ९५ पेशंट्स देतात. तुला अमुक झाले आहे, त्यासाठी अ ब आणि क या तीन उपचारपद्धती आहेत. यापैकी प्रत्येकीचे फायदे तोटे अमुक तमुक आहेत. आता आपण निर्णय घेऊ. ही बडबड केली, तर 'तुम्हीच ठरवा. आम्हाला समजलं अस्तं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो'
अन दुसरं, म्हणजे आजार समजवून सांगायचा. उपचाराची डिसीजन मीच सांगायची हे केलं, की शेवटचा प्रश्न, "पित्तामुळे होतंय ना हे असं?" अशा प्रकारचा येतो.
क्लासिक कपाळबडवती योग.
नेटवर पब्लिक डोमेनमधे फुकट उपलब्ध असलेल्या वैद्यकीय क्रमिक पुस्तकांची नांवे, वा इतर फुकट मिळू शकणार्या खर्या विश्वासार्ह माहीतीचे स्रोत किती व कोणते, हे मला कुणी सांगेल का? हे असे काहीही मलातरी मिळालेले नाही. कोणत्याही विश्वासार्ह वैद्यकीय माहितीसाठी इंटरनेटवर मला पैसे मोजावे लागतात.
एकच औषध एकाच आजारासाठी अनेक लोकांना दिले तर प्रत्येकाचा त्या औषधाला येणारा प्रतिसाद वेगळा असतो. ही दुसरी कठीण गोष्ट. यावरून त्या पेशंटच्या शारिरिक तपासणी नंतर मला जे ज्ञान मिळालेले असते, ते इंटरनेट सर्च करून मिळालेल्या माहितीपेक्षा वेगळे असते. याचा विचार औषध लिहिण्याआधी केला जातोच, याचे कारण म्हणजे औषध हेदेखिल एक शस्त्र आहे, ते उपायासोबत अपाय करू शकते या जबाबदारीची जाण डॉक्टरला असतेच असते.
त्यामुळे, परत इंटरनेटवर 'रिसर्च' करून जर कुणी रिकामे प्रश्न विचारत असेल, तर बाबौ, हे तुझे पैसे, आता निघ. माझ्या दुकानात परत येऊ नकोस, हे अन हेच मी सांगेन.
आय कॅन रिफ्यूज अ गिर्हाईक लीगली, यू नो!
23 Apr 2015 - 12:37 pm | असंका
"पित्तामुळे होतंय ना हे सगळं!!" :-))
धन्यवाद....!!
23 Apr 2015 - 2:03 pm | सुबोध खरे
डॉ. खरे साहेबांचीही चिडचीड होण्याला
गोपाळराव माझी चिडचिड झाली नाही तर खंत वाटली
कारण लोक फक्त आपल्याला पाहिजे तसाच अर्थ काढत राहतात. त्यावर कितीही स्पष्टीकरण दिले तरी यांचे पालुपद चालूच. मुळ विषय काय आणि लोक फक्त डॉक्टर हरामखोर कसे आहेत याबद्दलच प्रतिक्रिया देत राहतात. मग त्याचे खंडन करण्यात काय फायदा?
पण योग्य ती सेवा द्यावी, सौजन्यपुर्ण वागावे आणि शंकांचे निरसन करावे, ग्राहक आधीच व्याधीग्रस्त आणि पीडाग्रस्त आहे, काळजीत आहे हे समजुन घेउन थोडे मार्दवाने थोडे सहिष्णु वृत्तीने वागावे अशी माफक अपेक्षा आहे
जाताजाता एक उदाहरण देत आहे.
रात्री दीड वाजता माझ्या बायकोच्या एका रुग्णाचा घरी फोन आला मला झोप येत नाहीये काय करू? मी त्याला विचारले कि हि काय इमर्जन्सी आहे का?तरीही मी त्याला "शांतपणे"( यावरही काही लोकांनी टिप्पणी केली होती) चिडचिड न करता फेनारगनची गोळी लिहून दिली. पहिल्यांदा त्याने पेन आणि पेपर आणेपर्यंत वाट पाहायला लागली.( हा एक उच्छाद असतो १००% रुग्ण पेन आणि पेपर घेऊन फोन करत नाहीत) मी त्याला फेनारगनची गोळी लिहून दिली. हि एक गोळी आत्ता घे. आणि झोप
रात्री दोन वाजता त्याचा परत मला फोन आला आणि उलट तपासणी घेण्याच्या आवाजात त्याने मला जाब विचारला कि डॉक्टर तुम्ही मला झोपेची नव्हे एलर्जीची गोळी लिहून दिलीत. मी त्याला विचारले कि रात्री दीड वाजता कोणता केमिस्ट तुला प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेची गोळी देणार आहे? या गोळीचा साईड इफेक्ट म्हणून झोप येते. यावर त्याने आवाज खाली आणून सोर्री म्हटले. यानंतर तो बरेच दिवस उगवलाच नाही( गरज सरो आणि वैद्य मरो).
मला लोकांना हे विचारायचे आहे कि या गोष्टीचा त्या रुग्णाकडून किती मोबदला घ्यायचा आणि रात्री दीड ते अडीच या काळात दोन वेळा व्यत्यय आलेल्या झोपेची किंमत किती?
अर्थात मी एक गोष्ट अनुभवानेच पण फार अगोदर शिकलो आहे कि रात्री रुग्णावर चिडचिड केली तर आपल्यालाच झोप लागत नाही त्यामुळे मी शांत असतो. पण किती डॉक्टर असे "मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र" असू शकतील.
आणि रात्री तुम्ही कितीही वाजता झोपा सकाळी तुमच्या दवाखान्यात तुम्हाला प्रसन्न वदनाने लोकांचे स्वागत करावेच लागतेकारण ते "गांजलेले' असतात. तुम्ही काय त्यांना उपलब्ध असलेच पाहिजे( माझा एक मित्र मला चक्क या शब्दात म्हणाला होता कि अरे कधी कधी मला वेश्येसारखे वाटते.)
डॉक्टर इतर व्यावसायिकांप्रमाणे असेल तर इतर व्यावसायिकांप्रमाणे त्याने सौजन्यपुर्ण सेवा द्यावी".
किती व्यवसाय असे आहेत कि ज्यांना रात्री दीड दोन वाजता असे उठवले जाईल?
वकिलाला मी रात्री दोन वाजता फोन केला आणि काही शंका विचारली तर तो किती सौजन्यपूर्वक उत्तर देईल? माझी केबल/ इंटर्नेट रात्री बंद पडली तर केबल वाला/ एम टी एन एल वाला येतो का?
हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे.
मान्य
मूळ मुद्द्याला किती सफाईने फाटा मारला आहे
असो या वितण्डवादाचा मला कंटाळा आला आहे.
23 Apr 2015 - 5:17 pm | मृत्युन्जय
माझ्या प्रतिसादातील वाक्ये लिहुन प्रतिसाद दिला आहे म्हणुन टंकायला लागत आहे. नाहितर एकदा खुलासा करुन झाल्यानंतर दुर्लक्ष केले होते. एकतर तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाही किंवा जाणूनबुजुन दुर्लक्ष केले किंवा दुसर्याच कोणाचेतरी प्रतिसाद माझे समजुन गैरसमज करुन घेतलेत.
माझा मूळ प्रतिसाद आणि त्यानंतरचा दूसरा प्रतिसाद यात कुठेही डॉक्टरी पेश्याला टार्गेट केलेले नाही. श्री चिनार यांनी एक उदाहरण दिले होते. त्या उदाहरणातील डॉक्टर अतिशय अव्यावसायिक पद्धतीने वागला असे माझे मत आहे आणि त्या अनुषंगाने प्रतिसाद दिला होता. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करु नये असे माझे मत होते, आहे आणि राहिल. यात कुठेही सरसकटीकरण केलेले नाही. डॉक्टर्स "हरामखोर" असतात असे तर मी कुठेही म्हटलेले नाही. आपले शब्द तुम्ही माझ्या तोंडात का कोंबत आहात हे कळत नाही.
डॉक्टर हा ही एक माणूस आहे हे स्वत: तुम्हीच म्हणत आहात तर मग त्या माणसांच्या चुकीच्या कृतीचे समर्थनही नको. कट प्रॅक्टिस होते हे सत्य आहे. तुम्ही की इथले इतर डॉक्टर नाही करत तर ते स्तुत्य आहे पण म्हणून होतच नाही याकडे काणाडोळा करुन चालणार नाही किंवा डॉक्टर होण्यात किती पैसा खर्च होतो हा तर्कही योग्य होणार नाही (हे केवळ उदाहरण म्हणुन. या विषयावर मी एरवी भाष्य केले नव्हते आणी करायची इच्छाही नाही.)
तुम्ही दिलेले उदाहरण वाचुन हसु आले. सदर प्रकरणातील रुग्ण नक्कीच मुर्ख असु शकतो. पण यावर मी तुम्हाला "शेवटी तो ही एक माणूसच आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे काही लोकांना कधीही प्रश्न विचारायची सवय असते. दुर्दैवाने रुग्णाने कसे सहनशील असावे आणि स्थळकाळाचे भान ठेउन वागावे अशी डॉक्टरांची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही. अगदी इंग्लंड अमेरिकेत ( जिथले लोक जास्त सॉफिस्टिकेटेड आहेत असे काही लोकांचे म्हणणे आहे) हि तुम्हाला असेच अनुभव येतील. कुठेही जा मानवी स्वभावाला औषध नाही हेच खरे. ते बरोबर आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही." असे गोंडस उत्तर दिले तर चालेल का? इथे बरोबर नाही असेही म्हणायचे आणि त्या डॉक्टरची चुक आहे असे ढळढळीत दिसत असताना त्याचे माणूस असणे, सरकारी अधिकार्यांपेक्षा त्याचे वर्तन बरे असणे वगैरे गोष्टी तुम्हाला का दाखवाव्याश्या वाटल्या. ती जी गोष्ट ज्याला तुम्ही केवळ विश्लेषण म्हणत आहात हे इनडारेक्टली समर्थनच आहे असे मला वाटते. तो डॉक्टर चुकीचा वागला असे तुमचेही म्हणणे असेल तर प्रश्नच मिटतो. मी तेवढेच म्हणतो आहे.
किती व्यवसाय असे आहेत कि ज्यांना रात्री दीड दोन वाजता असे उठवले जाईल?
तुम्ही व्यावसायिक आहात, मी नौकरी करतो. आमच्या कंपनीत काही पेटले की असेच रात्री अपरात्री फोन करतात. डायरेक्टर लोकांचे २४ तासात कधीही फोन येउ शकतात. खासकरुन ते जर परदेशात फिरत असतील तर कामाच्या भरात त्यांना बर्याच वेळा टाइम डिफरंसचे भान राहत नाही. पहाटे दीड दोन वाजता मला कैक वेळा कॉल आले आहेत. तुम्ही किमान गरज पडल्यास त्या पेशंट वर चिडु शकता मी तर डायरेक्टरवर चिडुही शकत नाही. बर्याचदा या असल्या कॉल्समुळे माझीच काय बायकोची आणि छोट्या मुलाचीही झोपमोड झाली आहे. डॉक्टरांना असल्या कॉल्सचा त्रास होत असेलही कदाचित पण हे बर्याच व्यावसायिकांच्या आणि नौकरपेशा लोकांच्या नशिबात असु शकते.
मला लोकांना हे विचारायचे आहे कि या गोष्टीचा त्या रुग्णाकडून किती मोबदला घ्यायचा आणि रात्री दीड ते अडीच या काळात दोन वेळा व्यत्यय आलेल्या झोपेची किंमत किती?
माझ्या ओळखीतले एक डॉक्टर आहेत जे स्पष्ट सांगतात की मी फोनवर कन्सल्टन्सी करत नाही. दवाखान्यात या. एखाद्याने अगदीच गरज दर्शवली तर तात्पुरत्या गोळ्या लिहुन देतात. माझ्यामते तरी रात्री अपरात्री फोन करुन त्रास देणार्या रुग्णाकडुन दुप्पट पैसे वसूल करावेत. बाकी जेन्युइन रुग्णांना डॉक्टर्स बर्याच वेळी कंसिडर करतात असा माझा अनुभव आहे.
पण किती डॉक्टर असे "मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र" असू शकतील.
माझ्या माहितीतले बरेच आहेत. जितके तुमचे लेख वाचलेत त्यावरुन तुम्हीही आहात. बाकिच्यांनीही तसेच असावी अशी अपेक्षा आहे. आमचे फॅमिली डॉक्टर, फिजीशियन, ऑर्थोपेडिक, डेंटिस्ट, पेडिट्रिशियन हे सर्व वरील सर्व गुणांनी युक्त आहेत. आमच्या सगळ्या शंकांचे निरसन करतात आणी वाजवुन फी घेतात. एक डॉक्टर सकाळी गेल्यावर ४०० रुपये घेतात आणि परत संध्याकाळपर्यंत मुलाला ताप चढला म्हणुन गेलो की परत ४०० घेतात. जास्त वाटतात. पण त्यांच्या हातचा गुण आणि तत्पर "सेवा" बघता आम्हाला खळखळ करावीशी वाटत नाही. मी जेव्हा इथे "सेवा" म्हणतो आहे तेव्हा "सर्व्हिस प्रोव्हायडर" या अर्थाने वापरतो आहे "सर्व्हंट " या अर्थाने नाही हे समजले असावे अशी अपेक्षा आहे.
आणि रात्री तुम्ही कितीही वाजता झोपा सकाळी तुमच्या दवाखान्यात तुम्हाला प्रसन्न वदनाने लोकांचे स्वागत करावेच लागतेकारण ते "गांजलेले' असतात. तुम्ही काय त्यांना उपलब्ध असलेच पाहिजे( माझा एक मित्र मला चक्क या शब्दात म्हणाला होता कि अरे कधी कधी मला वेश्येसारखे वाटते.)
मला वेश्यांबद्दलचा अनुभव नाही त्यामुळे पास. पण मी स्वतः डॉक्टर असलो असतो तर स्वतःची तुलना वेश्येशी केली नसती. असे म्हणून तुमच्या मित्राने स्वतःला डिग्रेड झाल्यासारखे वाटते असे सुचवले असेल तर नक्कीच नाही (एखाद्या स्त्री ने वेश्या असणे मी तुच्छ मानत नाही पण त्याची चर्चा इथे नको)
माझी केबल/ इंटर्नेट रात्री बंद पडली तर केबल वाला/ एम टी एन एल वाला येतो का?
डॉक्टरची सेवा आणि यांची सेवा यात थोडा फरक आहे असे मला वाटते. असो. एम टी एन एल वाला तर सरकारी कर्मचारी असतो ना? तिथे तर खुपच सुरस आणि चमत्कारपूर्ण अनुभव येतील.
मूळ मुद्द्याला किती सफाईने फाटा मारला आहे
मी?? ???? तुमचा युक्तिवाद मान्य केला आहे की. मग काय प्रॉब्लेम आहे
हे वरील वाक्य खालील चर्चेसंदर्भात होते
असो या वितण्डवादाचा मला कंटाळा आला आहे.
भयानक कंटाळा आला आहे. पण म्हणुन चुकीचे आरोप मी सहन करीन असे वाटत नाही. मी परत एकदा आधी लिहिलेल्या गोष्टी लिहितो आणि त्यातली कुठलीही चूक आहे असे मला वाटत नाही:
१. डॉक्टरांनी इतर व्यावसायिकांप्रमाणेच सौजन्यशील असावे
२. डॉ़क्टरांनी आपली फी चोख वाजवुन घ्यावी
३. डॉक्टर हाही इतरांप्रमाणे एक व्यावसायिक आहे.
मी खालील वाक्ये कधीही लिहिलेली नाहितः
१. डॉ़क्टर हरामखोर असतात
माझा तुमच्या खालील विधानांवर ठाम आक्षेप आहे:
१. आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचलेले नाही किंवा हा स्कोर सेटलिंगचा प्रकार असावा असे वाटते
खासकरुन स्कोर सेटलिंग बद्दल का लिहावेसे वाटले हेच मला उमजत नाही.
धन्यवाद.
8 May 2015 - 12:53 pm | नेत्रेश
> माझा एक मित्र मला चक्क या शब्दात म्हणाला होता कि अरे कधी कधी मला वेश्येसारखे वाटते.
आता स्वत: डॉक्टरच असे म्हणत असेल तर त्यात काही तरी तथ्य असलेच पाहीजे. समजुन घेण्यासाठी आपण तुलना करुन पाहु.
१. डॉक्टर आणी वेश्या दोघेही व्यावसाईक. दोन्ही व्यवसाय शेकडो वर्षे ईतीहास असलेले.
दोन्ही व्यवसाय भातात एकेकाळी अत्यंत भरभराटीस आलेले (आयुर्वेद आणी कामसुत्र)
२. दोघांचे उद्दीष्ट ग्राहकांचे पुर्ण समाधान हेच असुन दोघेही आपल्या सेवेची किंमत ग्राहकाकडुन घेतात.
३. दोघांचेही ठरलेले दर नसतात. ज्याच्याकडुन चांगली सेवा मीळते तीथे ग्राहक जास्त पैसे मोजायला तयार असतात.
४. दोघेही व्हीजीटींग फी आकारतात.
५. उच्चभ्रु ग्राहकांसाठी पंचतारांकीत सेवा दोन्ही व्यवसाय देतात, ज्या सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असतात.
६. आलेला ग्राहक शक्यतो न नाकारण्याकडे दोघांचाही कल असतो.
७. ग्राहक नाईलाजाने दुसरीकडे पाठवावा लागला तरी आपला 'कट' वसुल करायला शक्यतो दोघेही विसरत नाहीत
८. छोट्याशा हलगर्जीमुळे ग्राहकाचे आयुश्य उध्वस्त करायची ताकद दोघांकडे पण आहे
९. डॉक्टर आणी वेश्या प्रत्येक गावात्/शहरात असतात.
या पैकी डॉक्टरला समाजात अनेक शतके देवासारखा मान होता तर वेश्येला फारसा मान कधीच नव्हता.
पण जर आता डॉक्टरनी आपल्या कर्माने तो मान घालवला असेल तर मग फारसा फरक रहात नाही ना? म्हणुनच कदाचीत तो डॉक्टर स्वतःची तुलना वेश्येशी करत असेल का?
23 Apr 2015 - 11:12 am | क्रेझी
शेवटचं वाक्य १ नंबर आहे :) लेख खरंच छान आहे. हा लेख वाचल्यावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेची आठवण झाली.कदाचित सर्वांनी ती बातमी वाचली असेलच.IITian who killed family fearing AIDS, tests negative
23 Apr 2015 - 4:43 pm | सिरुसेरि
या सर्व वरिल विषयांवरुन मला ( तसा काही संबध नसताना) वह कौन थी या सिनेमा मधला एक प्रसंग आठवला - डॉक्टर असलेल्या मनोज कुमारला एक अनोळखी मनुष्य खुप केविलवाण्या सुरात रात्री उशीरा फोन करुन आपल्या आजारी मुलीला तपासायला घरी बोलावतो . डॉक्टर मनोजकुमार त्या पावसाळी काळोख्या रात्री गाडी चालवत त्या माणसाने सागितलेल्या पत्त्यावर गावाबाहेरील एका सुनसान , दिवे नसलेल्या हवेलीत पोचतो. तेव्हा काही वेळापुर्वी केविलवाण्या सुरात बोलणारा तो माणुस अचानक त्याच्याशी चढेल आवाजात बोलायला लागतो .
23 Apr 2015 - 6:15 pm | एस
मस्त अवांतर. यावरून आठवले, मला हा पिक्चर पहायचा आहे. डीव्हीडीवर उपलब्ध आहे का? कुठे मिळेल? 'वह कौन थी' आणि 'बीस साल बाद' हे दोन्ही पिक्चर परत बघायचे आहेत. :-D
24 Apr 2015 - 3:50 am | यशोधरा
हो दोन्ही उपलब्ध आहेत.
24 Apr 2015 - 5:22 am | निनाद मुक्काम प...
लेख व प्रतिसाद वाचून माझे मत मांडतो
आभासी जगतात जी माहिती उपलब्ध असते तिचा आपण सर्वच शेत्रात स्वतः पुरता वापर करून घेतो , किंबहुना आता असे करणे आता आपल्या जीवनपद्धतीचा भाग झाला आहे ,
वैद्यकीय गोष्टींच्या बाबतीत नेत वरून माहिती घेण्यास वावगे काहीच नाही. मात्र एक मुलभुत फरक एवढाच आहे ही माहिती आपल्या माहितीसाठी ठेवावी , त्यावरून आपण कोणताही निष्कर्ष काढू नये तो काढण्य्याचा अधिकार डॉ लोकांचा ,
मात्र वैद्यकीय तपासणी करण्यास गेल्यावर मला असे झाले आहे का किंवा तमके झाले का असे प्रश्न डॉ ह्यांना जिज्ञासेच्या पोटी विचारणे गैर नसावे मात्र आपण नेत वरून जी माहिती मिळाली आहे त्यावरून निदान करणे वाईट व त्यावरून पुढे कृती करणे वाईट
डॉ ह्यांच्या लेखातून व त्या मुलीच्या उदाहरणातून हेच सांगण्यात आले , जे बरोबर आहे.
मला माझ्या प्रकृतीच्या विषयी काही माहिती हवी असेल
तर येथे जरी वैद्यकीय सेवा मोफत असली तरी मिळण्यास कधी कधी वेटिंग लिस्ट असते तेव्हा नेत वरून माहिती घेतो , ह्यावर विषयावर गुगल वर सर्च केल्यास अनेक दुवे सापडतात ते वाचून मिळालेली माहिती तपासून घेतो , आणि त्यातून निघालेला निष्कर्ष म्हणजे असे मला झाले असेल अशी एक शक्यता मनात ठेवतो मात्र अंतिम निर्णय हा डॉ चा आहे म्हणूनच त्यांचा कडे जायचे आहे ह्याबद्दल मनात दुमत नसते.
माझ्यावर एक शस्त्र क्रिया होणार होती तेव्हा डॉ ह्यांनी तिचे नाव सांगितले तेव्हा तू नळीवर ती कशी करतात हे पाहून घेतले व मनाची मी थोडी तयारी केले , अशी शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णांचे अनुभव फोरम वर वाचले व त्याने मनात काही प्रश्न उभे राहिले त्याबद्दल डॉ विचारायचे असे मनात ठरवले .
थोडक्यात काय तर डॉ पुरेसा वेळ किंवा दर्जेदार सेवा देत नाही म्हणून नव्हे तर एकूणच नेत वारू माहिती घेण्याचा ट्रेंड आहे , आता मिसळपाव व त्यावरील डॉ खरे ह्यांचे लेख त्यात त्यांना आलेले अनुभव वाचून मी एकप्रकारे नेत वरून माहिती मिळवली .
डॉ असो किंवा इतर कोणत्याही शेत्रातील व्यक्ती कस्टमर सर्विस वर लक्ष देणे ही काळाची गरज आहे ,
अनेकदा चेहऱ्यावर हास्य आश्वासक आवाज व संवाद कौशल्य ह्यामुळे एकाच विभागात दोन डॉ असतील तर एकाकडे जास्त गर्दी असते तर दुसर्याचा दवाखाना रिता असतो.
डॉ लोकांना संवांद कौशल्य असणे गरजेचे आहे माझ्यामते रुग्णाचा आपल्या डॉ वर विश्वास बसला कि तो आपसूकच आपला फेमिली डॉ बनतो व त्यास उठसूठ प्रश्न विचाराने आपसूकच टाळले जाते.
27 Apr 2015 - 10:19 pm | गवि
..लक्षणे दिसणे ऊर्फ त्रास --> नेट --> भीती --> सर्वात वाईट शक्यतेचे मनात घर (मनुष्यस्वभाव) --> भीतीआधारित नवीन लक्षणे--> भीतीचा कडेलोट -> डॉक्टर व्हिजिट --> अविश्वास --> नेटवरच्या शंका --> तपासण्या --> आणखी शंका
..या टॉर्चर मार्गापेक्षा
.त्रास -> डॉक्टर -> त्यांनी सांगितल्यास तपासणी --> त्यांचे निदान --> त्यांचे औषध --> अधिक तपशिलासाठी हवा तर नेटवर शोध
.हा मार्ग नक्कीच सुखकर आणि लॉजिकल आहे.
..शंभरातला एक डॉक्टरच पूर्ण हिस्टरी वगैरे घेतो आणि फिजिकल टेस्ट करतो हेही दुर्दैवाने सर्वत्र दिसतं..ते नाकारता नाही येत ही बाजूही खरीच..चूक दोन्हीकडे आहे.चांगला डॉक्टर मिळणं हे नशिबात हवं.
28 Apr 2015 - 8:14 am | अत्रन्गि पाउस
केवळ सल्ल्याचे नीट पैसे देणे-घेणे हि मानसिकता आली तर ...डॉक्टरसाहेब २ पैसे जास्त घ्या पण निश्चित निदान सांगा ...आणि कृपा करून घुमवू नका असे सांगता येईल ...
आणि निदान तद्न्य लोकांनी (कुठल्याही क्षेत्रातील) त्यांचे 'ठाम' मत देणे जरुरीचे आहे ...
"आज उत्तर पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ...काही भागात आकाश निरभ्र राहील' असली उत्तरे नकोत ...
10 May 2015 - 11:34 am | द-बाहुबली
एव्हड्याचसाठी फक्त मनोविकारांचीच माहिती नेट अथवा पुस्तकातुन घ्यावी असे सुचवेन. शरीराशी खेळ करायच्या फंदात पडू नये.
10 May 2015 - 2:25 pm | प्रकाश घाटपांडे
डॉक्टर हा प्रथम माणूस आहे व नंतर डोक्टर आहे. त्यामुळे राग,लोभ,मोह,काम्,क्रोध,मत्सर हे षड्रिपु आलेच.
11 May 2015 - 4:12 am | नेत्रेश
त्यातल्या काही रीपुंचे प्रदर्शनही काही लोकांनी या धाग्यावर मांडले आहे :)