चांगदेवपासष्टी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
28 Feb 2015 - 1:08 am

२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा !

माझा मराठाचिये काय बोलु कौतुके ! अमृता तेही पैजा जिंके ! ऐसी अक्षरे रसिके ! मेळवीन !!

मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे/ समृध्दीस्थळे म्हणल्यावर मनात पहिला विचार आला तो माऊलींचाच . संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवदगीतेवर मराठी भाषेतील टीका जी की भावार्थदीपीका अर्थात ज्ञानेश्वरी लिहुन सर्वसामान्य जनांवर जे उपकार केले आहेत त्याचे वर्णन करावे तरी कसे ? जशी जशी ज्ञानेश्वरी वाचत जातो आणि जशी जशी ती उमगत जाते तसे तसे संत ज्ञानेश्वरांना पुरुष असुनही "माऊली" असे का म्हणतात ते कळायला लागते . जशी आई आपल्या बाळाची निर्हेतुक काळजी घेत असते तसेच हे माऊलींचे प्रेम!
ऐशी जिव्हाळ्याची जाती ! करी लाभेविण प्रीती !!
माऊलींनी अगदी जे का रंजले गांजले त्यांना समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली , मुळ ग्रंथ गीता असल्याने ते सुत्र धरुन ठेवताना ( आणि सर्वांना समजेल असे लिहावयाचे असल्याने ) निरुपण करताना माऊलींना स्वाभाविक पणे काही बंधने आली. पण माऊली स्वत नाथपंथीय सिध्द पुरुष होते . गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानदेव ही गुरुपरंपरा सर्वज्ञात आहेच . योगाच्या परिपुर्ण अवस्थेचे , शुध्द अद्वैताच्या परमोच्च अवस्थेचे अनुभव आपल्याला माऊलींच्या अमृतानुभव आणि चांगदेव पासष्ठी मध्ये पहावयास मिळतात . ज्ञानेश्वरी हरिपाठ हे वारकरी संप्रदायातील , मराठी भाषेतील समृध्दी स्थळे आहेतच ह्यात शंकाच नाही पण अमृतानुभव चांगदेवपाशष्टी हे त्याचेही शुध्द सार असल्याने त्यापेक्षा काकणभर सरसच आहे असे वारंवार वाटत रहाते ! हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी म्हणजे जणु काही सोन्याच्या कोंदण्यात केलेली हिर्याची अंगठी अशी उपमा द्यायची झालीच तर आणि अमृतानुभव / चांगदेव पाशष्ठी म्हणजे ज्या हातात ती अंगठी घालायची तो हात आणि तो "माझा"हात अशी ज्याला जाणीव होते तो अशी काहीशी तुलना करावी लागेल !
चांगदेव पाशष्ठी हा ग्रंथ निव्वळ ६५ श्लोकांचा असला तरीही बराच ज्ञानप्रधान आणि साक्षात साक्षात चांगदेवांसारख्या उच्च तपस्वी आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीला उद्देशुन लिहिला असल्याने बराच कठीण आहे समजायला . तथापि अल्पमतीने , जितके काही समजले उमगले स्वानुभावास आले तितके तितके उलगडुन लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे , भाषिक सौंदर्यावर लिहायला कितपत जमेल ते माऊलीच जाणोत !
बाकी माऊलींच्या लेखनातील काहीही वाचताना सतत समर्थांची फार आठवण येत रहाते , जसा अगदी साधा सुगम हरिपाठ तसेच मनाचे श्लोक , जशी अध्यात्ममार्गातील सोपानरुपी ज्ञानेश्वरी तसाच श्रीमद दासबोध आणि जसे साधनेचा शेवटी भरुन पावणारा अमृतानुभव तसाच आत्माराम !!

(साधंकासाठी = ह्यावरुन आठवले - समर्थ म्हणतात
"अधिकारेविण सांगणे ! अलभ्य होये तेणे गुणे ! ह्याकारणे शहाणे ! आधी अधिकार पहाती !!"
एखाद्या लेखनाचा संत साहित्यातील सौंदर्य स्थळे म्हणुन अभ्यास करणे निराळे आणि साधकावस्थेतील मार्गदर्शक म्हणुन अभ्यास करणे निराळे ! आत्माराम , अमृतानुभव चांगदेव पासष्ठी हे अत्यंत ज्ञानमार्ग प्रधान असल्याने साधनेच्या बर्यापैकी पक्वअवस्थेतील साधकां करिताच आहेत . ज्यांना उद्देशुन चांगदेव पाशष्ठी लिहिली ते चांगदेव स्वत सिध्द योगी पुरुष होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . प्रिय साधकांनी आपापली अवस्था ओळखुन मनाचे श्लोक/ हरिपाठ , दासबोध्/ज्ञानेश्वरी , अमृतानुभव चांगदेव पासष्ठी / आत्माराम ह्यांच्या स्विकार करावा हेच उचित !
तुम्ही संत मायबाप ,मला जसे जेवढे तोडके मोडके उमगले तसे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे , जसे सिंव्हाची पिल्ली त्याच्या पुढे निशंक खेळतात तसेच हे! जसे लहान पिल्लु बोबडे बोल बोलत असले तरीही आई बापाला त्याचा कौतुकच असते तसे काहीसे हे बोबडे बोल गोड मानुन घ्यावे ही नम्र विनंती !

अधिकार नसता लिहिले ! क्षमा केली पाहिजे !!)

******************************************************
!! ॐ!!

स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् । वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् ।।

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति !
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभुतं !
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

चांगदेवपासष्टी

स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥ १ ॥

श्री वटेश्वर परमात्मा प्रसन्न होवुन कृपा करो ! येथे वटेश्वर हा शब्दावर श्लेष अलंकार आहे , चांगदेवांनाही वटेश्वर असे संबोधण्यात येत असे . हा वटेश्वर परमाता लपुन ह्या जगताचा आभास निर्माण करतो आणि जेव्हा तो प्रकटतो तेव्हा ह्या आभासरुपी मायाचे ग्रास करुन , ह्या मायेला गिळुन स्वत प्रकट होते !

प्रगटे तंव तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥ २ ॥

तो लपलेला असतो , आकलन झालेला नसतो तेव्हा तेव्हा त्याचा आभास होत रहातो , मात्र तो प्रकटल्यावर आपण तद्रुपच होवुन जातो आणि मग तो ' दिसत' नाही ! पण सुक्ष्म द्रूष्टीने पहाता परमात्मा लपुन असणे आणि प्रकट होणे दोन्ही संभवत नाही कारण तो ह्या सार्याच उपाधींपासुन अलिप्त असा आहे .

बहु जन्व जंव होये । तंव तंव कांहींच न होये ।
कांहीं नहोनि आहे । अवघाचि जो ॥ ३ ॥

एकोहम बहुस्याम ह्या मुळप्रेरणे तो बहुत रुपे घेवुन नटतो , पणे खरे पहायला गेल्यास त्याचे एकपण हे कधीच भंग पावत नाही . तो काहीच न होवुन अवघेपणाने सर्वत्र व्यापुन सर्वदा असतचि असतो .

सोनें सोनेपणा उणे । न येतांचि झालें लेणें ।
तेंवि न वेंचतां जग होणे । अंगें जया ॥ ४ ॥

जसे सोन्याच्या सोनेपणाला बाधा न येता , त्याचे अनेक दागिने बनतात तसेच परमात्म्याच्या निर्गुणत्वाला बाधा न येता त्याचे ठायी ह्या जगाची उत्पत्ती होते !
माऊलींनी ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीत अनेक उत्तमोत्तम उपमांची उधळण केली आहे तशीच ही एक सुंदर उपमा ! संस्कृतात उपमा कालिदासस्य असे म्हणले जाते , असे मराठीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास , उपमा ज्ञानेशाची असे म्हणण्याचा मोह आवरत नाही .

कल्लोळकंचुक । न फेडितां उघडें उदक ।
ते न्वी जगेंसी सम्यक् । स्वरूप जो ॥ ५ ॥

जसे पाण्यावर अनेक तरंग निर्माण होतात , पण त्याच्या मुळे पाण्याच्या पाणीपणाला , पाणी असण्याला बाधा येत नाही , तसेच परमात्म्यावर ह्या निरनिराळामायेच्या लहरी उपन्न झाल्या तरी त्याच्या निर्विकार असण्याला बाधा येत नाही , तो सम्यक असाच रहातो !

परमाणूचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां ।
तेंवी विश्वस्फूर्तिं इया । झांकवेना जो ॥ ६ ॥

जैसे परमाणुंच्या रुपाने ह्या पृह्वीवरील प्रत्येक गोष्ट बनली आहे पण तरीही पृथ्वीचे पृत्वी असणे वाया जात नाही , तसेच परम्यात्माच्या ठायी विश्वाची स्फुर्ती झाली तरीही तो ह्या विश्वाने झाकला जात नाही .

कळांचेनि पांघुरणें । चंद्रमा हरपों नेणें ।
कां वन्ही दीपपणें । आन नोहे ॥७ ॥

चंद्राच्या बिन भिन कला आपणास पहावयास मिळतात , जणु काही चंद्र ह्या कलांचे पाघरुण घेत असतो मात्र तो मुळात कमी जास्त होत नाही . जसे वभी दिव्यात सामावला तरी तो अग्निच रहातो.

म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टत्व वर्ते ।
तें मी नेणें आइते । ऐसेंचि असे ॥ ८ ॥

हे जे काही भिन्न भिन्न आपल्याला भासत असते ते आपल्या अविद्येमुळेच होय, दृश्य द्रष्टा भाव माझे ठायी निर्माण होत नाही अर्थात जो स्वरुपी लीन झाला त्याचे ठायी अशी द्वैताची कोणतीच जाणीव रहात नाही .

जेंवी नाममात्र लुगडें । येहवीं सुतचि तें उघडें ।
कां माती मृद्भांडें । जयापरी ॥ ९

साडी जरी नावाने साडी भासत असली तरीही सुक्ष्मपणे पाहो जाता तेथे सुता व्यतिरिक्त काहीही नसते किंव्वा मातीचे भांडे कोणत्याही आकाराचे रंगाचे बनवले तरीही शेवटी ती मातीच असते !

तेंवी द्रष्टा दृश्य दशे । अतीत द्ईण्मात्र जें असे ।
तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ १० ॥

म्हणुनच दृश्य , दृष्टा ( आणि देखणे ) ह्याच्या अतीत असा जो परमात्मा आहे तो केवळ ज्ञानस्वरुपच होय की ज्याचा ह्या त्रिपुटीतुन केवळ आभास निर्माण होत असतो.
आत्माराम - माया ज्ञाताज्ञेयज्ञान । माया ध्याता ध्येयध्यान ।माया हेंचि समाधान । योगियांचें ॥

अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें ।
नाना अवयवसंभ्रमें । अवयविया जेंवी ॥ ११ ॥

नाना अलंकाराच्या रुपाने नावाने जैसे की भिकबाळी , केयुर , कडे , अंगठी तोडर वगैरे जे काही भासत असते ते निखळ सुवर्णच असते , तसच नाना अवयवांच्या समुच्चयाने संभ्रमाने हा देह धारण करणारा जाणवतो.

तेंवी शिवोनि पृथीवरी । भासती पदार्थांचिया परी ।
प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे ॥ १२ ॥

तसेच शिवापासुन पृथ्वी ओपर्यंत जे जे काही पदार्थ भासतात ते केवळ प्रकाशाने ज्ञानानेच आपल्या आकलनाला येत असतात
तथापि त्यांचे मुळ असे जे की ज्ञान तेच ह्या सर्वात विविधतेने नटलेला परमात्मा होय .

नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती ।
प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥ १३ ॥

ज्याप्रमाणे भिंतीवर वेगवेगळी चित्रे काढलेली असली तरीही त्या केवळ भिंतीच असतात , वेरुळच्या लेण्यामंध्ये कितीही भिन्न भिन्न शिल्पे कोरली असली तरीही शेवटी ते दगडच असतात हे आपण जाणत असतो . ह्या सार्या जगदाकाराने नटलेल्या जगाची आपल्याला ज्या प्रकाशाने प्रतीती येत असते तो च परमात्मा होय .
येथे श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या एक श्लोकीची राहुन राहुन आठवण येते
किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे |
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ||.
संपुर्ण कथा येथे पहा http://www.manogat.com/node/7819

बांधयाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाचि गोडी ।
तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥ १४ ॥

ज्याप्रमाणे गुळाची ढेप केली तरी आकार ढेपेलाच येतो गुळाच्या गोदीला नाही तसेच भिन्नभिन्न रुपे घेवुन परमात्मा प्रतीतीला येत असला तरीही तो मुळात एकच असतो . त्याला द्वैताची बाधा होत नाही तो अद्वैतच रहातो .
विश्णुमय जग ! वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम ! अमंगळ !! असे जे तुकाराम महाराज म्हणतात त्यातील गमक हेच ! सर्वं विष्णुमयं जगत् ! सर्वं खल्विदं ब्रह्म !!

घडियेचेंइ आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें ।
तेंवी विश्वस्फुर्तिं स्फुरें । स्फुर्तिचि हे ॥ १५ ॥

ज्याप्रमाणे घडी घातल्याने कापड आकाररुपाला येवुन आकलनास येते तसेच परमात्मा विश्वस्फुर्ती रुपाने स्फुरण पावुन आकलनास येणारी स्फुर्तीच होय !

न लिंपतां सुखदुःख । येणें आकारें क्षोभोनि नावेक ।
होय आपणिया सन्मुख । आपणचि जो ॥ १६ ॥

हा परमात्मा विविध रुपाने नटला तरीही त्याला सुखदुखादि क्षोभ होत नाहीत . सुख दुख हेच मुळात द्वित असल्याने जो तिथे तिथे आपणा सन्मुख आपणच उभा असल्या सारखा सर्व व्यापी आहे त्याला हे द्वैत कसे बरे उपन्न होणार ?

तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति दृष्ट्टत्वा आणिजे जेणें ।
बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि ॥ १७ ॥

ज्याप्रमाणे आरश्यात पाहिल्याने आपल्याला आपलेच प्रतिबिंब दिसते व तेथे आपणच असल्याचा भास होतो आणि ह्या निमित्ताने आपल्यालाच बिंबत्व प्राप्त होते तसेच परमतत्व दृष्टा अर्थात पाहणारे आणि दृश्य अस्र्थात जे पहायचे ते असे आत्मतत्वी भासत असले तरीही हे सारे अविद्येनेच ( मायेनेच ) होत असते
साधकांसाठी = आत्तापर्यंत वरील १७ श्लोकात माऊलींनी जे काही सांगितले त्यातील हा १७ वा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे . जणु काही सतरावी कळाच ! ह्या श्लोकावर प्रदीर्घ चिंतन करणे आवश्यक आहे . ज्याप्रमाणे रेने देकार्त "हॅप्प्पीली डिस्टर्ब्ड बाय नथिंग " असे म्ह्णुन "मेडीतेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी" लिहायला बसला तसे साधकांनी "हॅप्प्पीली डिस्टर्ब्ड बाय नथिंग " होवुन आरश्या समोर उभे राहुन चिंतन करावे - मला जे समोर दिसत आहे ते प्रतिबिंब आहे ते ह्या आरश्या मुळे उत्पन्न झाले आहे हा आरसा जर नसता तर मला हे बिंबत्व प्राप्त झालेच नसते , अर्थात मला मीपण असे हे बिंबत्व प्राप्त करुन देणारा हा आरसा आहे , माझ्य ठायी इरव्ही असे बिंबत्व असे काहीच नकाहीच,[लीप ऑफ फेथ ] तसेच ह्या जगात जे जे काही भासत आहे ते ह्या मायेच्या रुपाने मुळ परमात्म्याचे निर्माण झालेले बिंबच होय , मग ह्या बिंबात मीही आलोच् , ही माया ही अविद्या नसती तर असे काही भासलेच नसते . मग हे सारे भासमान असे जे काही आहे ते सारे बाजुला सारले की जे उअरते तेच परब्रह्म होये . आणि आपण स्वत हुन आरश्या समोरुन बाजुला झालो कि आपले प्रतिबिंब नश्ट पावते तसेच आपण अविद्येचा पडदा बाजुला केला की ते परमात्म तत्व आपण आपोआपच सहजच होवुन जावु ! पण मुळात ही अविद्या हीच माया ! या मा सा माया ... जी कधी झालीच नाही अशी ती म्हणजेच माया .

आत्माराम -
मायेनेंचि माया चाले । मायेनेंचि माया बोले । मायेनेंचि माया हाले । वायुरूपें ॥
मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माय नासे ।मायेकरितां लाभ असे । परमार्थस्वरुपाचा ॥

एकदा की हे मायेचे मिथ्यत्व लक्षात आले , एकदा का अविद्या बाजुला केली की जे उरते ते परब्रह्म .
आत्माराम - ऐसा जो अनुभव जाला । तोही नाशिवंतामध्यें आला ।अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥

तेंवी आपणचि आपुला पिटीं । आपणया दृश्य दावित उठी ।
दृष्टादृश्यदर्शन त्रिपुटी । मांडें तें हे ॥ १८ ॥

तेव्हा माया / अविद्या हीच दृश्य द्रश्टा दर्शन ही आपणाच ठायी माम्डुन प्रकट होत असते .
आत्माराम - सकळही माया परी नाथिली । स्वरूपीं तों नाहीं राहिली ।एवं आहे नाहीं बोली । माया जाण ॥

सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाहीं दुजें ।
तेवी तीनपणेविण जाणिजे । त्रिपुटि हें ॥ १९ ॥

सुताच्या गुंडी मध्ये , नीट पाहिले तर आपल्या लक्षात येते की , सुता व्यतिरिक्त आत बाहेरी दुसरे काहीच नाही , तसेच ह्या त्रिपुटी कडे नीट पाहिले तर आपल्या लक्षात येते की ह्याच्या आत बाहेरी परमात्मा वगळता बाकी काहीच नाही .

न्य्सधें मुख जैसें देखिजतसें दर्पणमिसें ।
वायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥ २० ॥

जैसे आरश्यात मुख अवलोकन केल्याने आपल्याला आरश्याच्या निमित्ताने आपलाच भास होतो व त्रिपुटी उभी रहाते तसेच अविद्येच्या उपाधीने त्रिपुटी चा भास होतो .

तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा ।
हेचि जाणे प्रसिद्धा । उपपत्ति इया ॥ २१ ॥

तरीही मुळ अद्वैत वस्तुला कोणताच भेद वा द्वैत होत नाही हीच त्याच्या अखंडत्वाची उपपत्ती होये .

दृश्याचा जो उभारा । तेंचि द्रष्ट्रत्व होये संसारा ।
या दोहींमाजिला अंतरा । दृष्टं पंगु होय ॥ २२ ॥

आता हा अविद्येने उभारलेला पसारा आणि त्यात द्रष्द्रस्वरुप भासणारा मी ह्यांचे सारासार अवलोकन केले असता दृश्टी पंगु होते , अर्थात द्रष्टेपण असे काही उरतच नाही . आपण तद्रउपच होवुन जातो

दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्ट घेऊनि असे काई ? ।
आणि दृश्येंविण कांहीं । दृष्ट्रत्व होणें । २३ ॥

जेथे अविद्येने मायेने उभारलेला हा पसाराच नाहीसा झाला , तेथे दृष्य जे की दृष्टीचे कारण , तेच नाहीसे झाले तर म दृष्याविण द्रष्टाचे अस्तित्वही संपलेच की ! आता संपुर्ण त्रिपुटीचा लय झाला की आपणच आपल्याला पाहु !
साधकांसाठी = येथे क्षण येक विश्रांती घेवुन "अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगिराज विनवणे मना आले ओ माये " हा स्वरभास्कर भीमसेनजींच्या आवाजातील माऊलींचा अभंग आवर्जुन ऐकावा . https://www.youtube.com/watch?v=Lw0E4Wp5O6c

म्हणोनि दृश्याचे जालेंपणें । दृष्टि द्रष्ट्रत्व होणें ।
पुढती तें गेलिया जाणें । तैसेचि दोन्ही ॥ २४ ॥

दृष्य आहे म्हणुन दृष्टी , द्रष्तत्व आहे म्हणुन जेथे दृश्यच नाहीसे होते तेथे हे दोन्हीही आपोआपच नाहीसे होतात .
आत्माराम - माया योग्याची माउली । जेथील तेथें नेऊन घाली ।कृपाळूपणें नाथिली । आपण होय ॥

एवं एकचि झालीं ती होती । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ति ।
तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ २५ ॥

एका अविद्या माये मुळे ही त्रिपुटी निर्माण होते जाणवते , माया रुप भ्रांती नष्ट झाली की एकत्वाचे सत्यत्व सहज लक्षात येते . अनुभव , अनुभव्य आणि अनुभवता ही त्रिपुती गिळुन उरल्यावरच त्या एकत्वाचा संपुर्ण अनुभव येईल.

दर्पणाचिया आधि शेखीं । मुख असतचि असे मुखीं ।
माजीं दर्पण अवलोकीं । आन कांहीं होये ? ॥ २६ ॥

आरशात पाहण्याच्या आधीही मुख होतेच , आरश्यात मुख पाहतानाही मुख होतेच आणि आणि आरसा नष्ट झाला तरीही ते असणारच आहे , ते काही नाहीसे होणार नाही . ( भगवद्गीता - अव्यक्तादीनी भुतानी व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना ? !! )

पुढें देखिजे तेणे बगे । देखतें ऐसें गमों लागे ।
परी दृष्टीतें वाउगें । झकवित असे ॥ २७ ॥

आपण आरशात आपणाहुनच मुख पहातो त्यामुले आपल्याला दृश्यत्व प्रापत होते इरव्ही असे काही द्वैत नसतेच , आरश्या मुळेच हा चकवा निर्माण होतो .

म्हणोनि दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्ट्टत्वावेगळें ।
वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं ॥ २८ ॥

म्हणुनच , दृष्याच्या निमित्ताने द्रश्टत्व हे भास निर्माण होतात , ते गेलिया वस्तु आपणाला आपणच न्याहालते / जाणोन घेते .

वाद्यजातेविण ध्वनी । काष्ट्जातेविण वन्ही ।
तैसें विशेष ग्रासूनी । स्वयेंचि असे ॥ २९ ॥
)

जसे वाद्याच्या आधी ध्वनी अव्यक्त स्वरुपात असतोच , किंवा लाकडा मध्ये अग्नि सुप्त रुपाने असतोच तसेच हा परमात्मा सुक्ष्म रुपाने सर्वां मध्ये ग्रासुन असतच आहे !

जें म्हणतां नये कांहीं । जाणो नये कैसेही ।
असतचि असे पाही । असणें जया ॥ ३० ॥

जे शब्दाने वर्णन करता येते नाही ( कारण जे जे वर्णन करावे ते ते सारे द्वैता मध्येच येते आणि त्याला जाणुनही गेता येत नाही ( कारण जावावे म्हणले तर लगेच् जाणुन घ्यायचे ते , जानता आणि जाणणे ही त्रिपुटी निर्माण होते ) . अशी ती परब्रह्म वस्तु होये की जेथे श्रुतीही नेती नेती असे बोलुन नकारामक्त निर्देशनच करुन मौन पावतात !!

आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा ।
तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥ ३१ ॥

ही अजुन एक अप्रतिम उपमा - ज्याप्रमाणे बुबुळा मुले आपल्याला अखिल जग पहायला मिळते सार्या जगाचे ज्ञान होते , ते बुबुळ मात्र स्वत ला दृष्टी असुनही स्वत ला पाहु शकत नाही .तसेच आत्म्यामुळे आपल्याला सारे ज्ञान , आकलन होत असले तरीही तो स्वत ला पाहु शकत नाही ! अहाहा ! माऊली माऊली !!

जें जाणणेंचि कीं ठाईं । नेणणें कीर नाहीं ।
परि जाणणें म्हणोनियांही । जाणणें कैंचें ॥ ३२ ॥

ज्या ज्ञानस्वरुप परमात्म्यामुळे आपणाला ज्ञान होते तेथे अजानते पणाचे , अज्ञानाचे नावही असु शकत नाही पण जाणते पण हाही गुण असल्याने तो तरी त्या निर्गुणाला कसा काय चिकटेल ? !!

यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व होईजे ।
नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ ३३ ॥

म्हणुनच आत्मवस्तुविषयी मौन धारण करावे काहीच न करता ह्या नाही नाहीपनाचाही त्याग करावा . आणि ह्या अभावाचीही त्याग केल्यावर आपण त्या वस्तुशी एकरुप होवुन जावु !
आत्माराम - शिष्य विचारून बोले । स्वामी कांहीं नाहीं उरलें ।अरे ’नाही’ बोलणें आलें । नाशिवंतामधें ॥
’आहे’ म्हणतां कांहीं नाहीं । ’नाहीं’ शब्द गेला तोही ।नांहीं नांहीं म्हणता कांही । उपजले कीं ॥

नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणें एके ।
नाना कल्लोळमाळिके । पाणि जेंवि ॥ ३४ ॥

असे जे काही नाना बोध होत होतात , त्यांच्या सोयरिकितुन ज्ञान होते , त्याला ही साक्षीस्वरुप अशी जी तुर्या अवस्था , तयेच्याही पार अशी ती वस्तु ! जसे पाण्यावरील कितीही तरंग उमटले तरीही शेवटी पाणी पाणीच रहाते तसेच ती वस्तु हे सारे विकार उपन्न होवुनही अलिप्तच रहाते .

जें देखिजतेविण । एकलें देखतेंपण ।
हें असो आपणीया आपण । आपणचि जें ॥ ३५ ॥

जे दृश्यत्वाच्या द्वैताशिवाय एकटेच देखणे पणे अर्थात द्न्यानावस्थेने भरुन आहे ते पहाणे म्हनजे आपणाला आपनानेच आपणच पहाणे होय ( पहातोय ते ही आपण , पाहणारा ही आपण आणि हे पाहतोय तोही आपणच )

जें कोणाचे नव्हतेनि असणें । जें कोणाचे नव्हतां दिसणें ।
कोणाचें नव्हतां भोगणें । केवळ जो ॥ ३६ ॥

असे हे परमात्म तत्व कोणाच्याही असण्या नसण्याने नसते . ते स्वयं प्रकाशी आहे .
ज्याप्रमाणे सुर्याला पहायला दिव्याची गरज भासत नाही , सुर्य स्वयं प्रेरणेनेच अनुभवास आकलनास येतो , तसेच परमात्म स्वरुपाला जाणुन घेण्यासाठी अन्य कशाची गरज भासत नाही . एकदा अविद्या मायेचा पडदा बाजुला केला की झाले ! मग सर्वत्रच स्वरुप भरुन राहिल्याचे अनुभवास (?) येते !
आत्माराम -स्वरूप निर्मळ निघोट । स्वरूप शेवटा शेवट ।जिकडे पहावे तिकडे नीट । सन्मुखचि आहे ॥
जें बहू दुरीच्या दुरी । जे निकटचि जवळीं अंतरीं ।दुरी आणि अभ्यंतरीं । संदेहचि नाहीं ॥

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा ।
चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥

हे चांगदेवा , तु त्या वटेश्वराचाच पुत्र होय . जसे की कापुराचाचाच रवा . त्यामुळे चांगया , तुझ्यात आणि माझ्यात भिन्नत्त्व असे नाही .
माऊली हे कापुराचे रुपक अनेक ठिकाणी वापरतात - पहा हरीपाठ अभंग ६ -
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला।ठायींच मुराला अनुभवें॥
कापुराची वाती उजळली ज्योति।ठायींच समाप्ति झाली जैसी॥
मोक्षरेखें आला भाग्यें विनटला।साधूंचा अंकिला हरिभक्त॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं।हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्वीं॥

ज्याप्रमाणे अग्निचा स्पर्ष होता क्षणार्धात कापुर पेट घेतो आणि अग्निस्वरुपच होवुन जातो आणि मग तेथे कापुरपण मुळीच उरत नाही . एकदा अग्निमय झाला की कापुराची निषेश समाप्ती होते तसेच एकदा का परमतत्वाचे आकलन झाले की द्वैत अगदी सहज संपुन जाते . तेव्हा मग नाथ म्हणत्तात तसे "सबाह्य अभ्यंतरी तु एक दत्त" अशी अवस्था होवुन जाते .

ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें ।
ते तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि । ३८ ॥

द्नानदेव म्हणतात की तुझा माझा बोल एकच आहे , जसा मी परमात्म स्वरुप तसाच तुही ! तळहाताने तळहाताला मिठी मारावी असेच काहीसे आपले भेटणे ! ( हेच सर्वांन्ना दोन हात जोडुन नमस्कार करण्यामागील आपले तत्वज्ञान ! )

बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे ।
कां उजिवडे देखिजे । उजिडा जेंवि ॥ ३९ ॥

मी तुला उपदेशिणे हे मुळातच मी तू पण नसल्याने तुच तुला / मीच मला उपदेश करण्यासारखे आहे जसे की बोलण्याचे बोलणे ऐकावे कि स्वादानेच स्वादाचा उपभोग घ्यावा कि उजेडानेच उजेड पहावा .

सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा ।
मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि ॥ ४० ॥

जसे सोन्याचा कस सोनेच व्हावे की मुख हाच मुखाचा आरसा भावे तसाच तुझा माझा संवाद आहे . अर्थात संवाद असा काहीच नाहीच .
शब्देविण संवादु ! दुजेविण अनुवादु ! हे तव कैसे निगमे ! परेही परते बोलणे खुंटले ! वैखरी कैसे नि सांगे !!

गोडिये परस्परें आवडी । घेतां काय न माये तोंडी ।
आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ ४१ ॥

जर गोडीनेच मुखात न सामावताच स्वत चा गोडवा अनुभवावा तसे काही आपले हे अद्वैत प्रेमभावाचे नाते आहे .
ही अवस्था माऊलींच्या कानडा ओ विठ्ठलु मधे माउलींची पाम्डुरंगा बद्दल झाल्याचे अनुभवास येते ...

सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे ।
कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥

सखया , चांगदेवा , तुझ्या भेटीच्या उद्देशाने माझा जीव उल्हासित झाला आहे पण त्याच बरोबर हे भय वाटते की ह्या भौतिक भेटीमुळे आपली आधी पासुनच असलेली अद्वैत भेट विस्कतेल की काय !

भेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येनों पाहे मन ।
तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ ४३ ॥

मी तुझ्या दर्शनास आसुसलो आहे पण तुझे दर्शन घेता माझे चित्त आधीच स्वरुपाकडे धाव घेत आहे पण स्वरुप पाहणे तर मुळात असंभव आहे हे ही आकळु लागत आहे .
साधकांसाठी - ही अवस्था साधनामार्गात नक्की अनुभवायाला येते. आपली प्रिय व्यक्ती , तिच्याशी इतके अद्वैत होते की तिच्या स्मरणाने आपण परत आपल्या स्वरुपातच येवुन सामावतो !

कांहीं करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी ।
ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेति उमसू ॥ ४४ ॥

तु/मी काही करेन बोलेन कल्पेन किंव्वा करणार नाही बोलणार नाही करणारही नाही ... पण ह्या दोन्हीही गोष्टी स्वरुपी होतच नाहीत !

चांगया ! तुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें ।
हें काय म्हणों परि न धरवे । मीपण हें ॥ ४५ ॥

हे चांगया सखया , करणे न करणे हा द्वैताचा व्यवहार स्वरुपी होतच नसल्याने मी हा उपदेश करत असल्याने ह्यातले मी पण मात्र कोठेच उरत नाही !

लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो ।
तंव तेंचि नाहीं मा काय घेवो । माप जळा ॥ ४६ ॥

अजुन एक अप्रतिम उपमा - समजा की मिठाच्या खड्याने आपण पाण्याची खोली मापायला गेलो तर तो खडाच पाण्यात विरघळुन जातो मग जळाची खोली मापणार तरी कशी ? अर्थात ह्या मी पणाने आत्मतत्वाचे आकलन करो गेलो तर हे मी पणच त्यात विरघळुन जात आहे , आता जिथे मीपनच विरघळुन गेले तेथे पुढे काय राहिले !
कबीर म्हणतात तसे - "जब मै था तब हरी नहीं ,अब हरी है मै नाही, सब अँधियारा मिट गया ,जब दीपक देखा माही"
जेव्हा मी पणा होता तेव्हा हरी नव्हता , आता हरी आहे हे आकलन झाले तर मी पणा उरला नाही ! आता अंधारच नष्ट झाला मग दिव्याची गरजच काय ?

तैसें तुज आत्मयातें पाही । देखो गेलिया मीचि नाहीं ।
तेथें तून् कैचा काई । कल्पावया जोगा ॥ ४७ ॥

तसे तुला आत्मस्वरुपाला पहायला गेलो तर मीच उरत नाही मग कल्पना करायला तेथे तु तरी कसा रहाशील , आपण दोघेही मिठाच्या खड्याप्रमाणे आत्मतत्वात विरघळुन जाऊ .

जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जेंवि मुके ।
तेंवि तूंतें देखोनि मी थाके । कांहीं नहोनि ॥ ४८ ॥

अजुन एक अप्रतिम उपमा - जसे एखाद्याने झोप कशी असते हे पाहण्यासाठी जागण्याचा संकल्प केला तर तेथे निद्राच न आल्याने तो द्रश्टेपणास मुकतो तसेच मी पणा ठेवुन मी तुला पाहो गेलो तर मीच मला मुकतो .
आत्माराम -
अभिन्न ज्ञाता तोचि मान्य । साधक साध्य होता धन्य ।वेगळेपणें वृत्तिशून्य । पावती प्राणी ॥
वेगळेपणें पाहों जातां । मोक्ष न जोडे सर्वथा । आत्माहि दिसेसा नाही मता । प्राणी वरपडे होती ॥
साधकांसाठी - येथे साधकांनी लक्ष देणे खुप महत्वाचे आहे , आजवरच्या अनुभवांमध्ये जितके जितके हुशार अभ्यासु मित्र मला भेटले आहेत ते ह्याच,,वेगळे पणाने पहाण्याच्या , ट्रॅप मधे अडकुन देव नाही निव्वळ कविक्ल्पना आहे असे मत मांडताना दिसले आहेत.

अंधाराचे ठाईं । सूर्यप्रकाश तंव नाहीं ।
परी मी आहें हें कांहीं । नवचेचि जेंवि ॥ ४९ ॥

ज्याप्रमाणे अंधारात सुर्यप्रकाश नसतो (सुर्यप्रकाश आला की अंधार नाहीसा होतो ) ह्या दोहोंचे अलिप्त राहुन एकमेकाला पहाणे संभवत नाही .

तेंवि तूंतें मी गिवसी । तेथें तूंपण मीपणेंसी ।
उखते पडे ग्रासीं । भेटीचि उरे ॥ ५० ॥

तसेच तुझे स्वरुप पाहो जाता मी पण तूपण ह्याचा लय झाल्याने , हे सारे द्वैत नाहीसे झाल्याने अद्वैत वस्तुच भेटी मात्र उरते .

डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें ।
आणि तेणेंचि तो देखे । न डंडळितां ॥ ५१ ॥

ज्याप्रमाणे डोळा मिटुन घेतल्यावर भिन्न भिन्न चित्र आकृती त्याच्या समोर येतात , डोळा मात्र चचळ न होता निश्चळच रहातो .

तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टि ।
मीतूंवीण भेटी । माझी तुझी ॥ ५२ ॥

तैसेच ह्या संवादाने आपले सस्वरुप न डंडळता , त्यात फुट न पडता , मी तू पणा विरहित आपली भेट होते .
नाथ म्हणतात तसे " मी तू पणाची झाली बोळवण ! एका जनार्दनी श्रीदत्त जाण !! "

आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी ।
ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥ ५३ ॥
आता मी पण तूपण ह्या उपाधीला गिळुन आपली भेट व्हावी , ही अवस्था जिचे की मी वर वारंवार घोळून घोळुन वर्णन केले आहे !

रूपतियाचेनि मिसें । रूचितें जेविजे जैसें ।
कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेंवि ॥ ५४ ॥

जेवणारा जसे जेवणाच्या चवी मुळे स्वत्च रुची होवुन स्वतचाच् उपभोग घेत असतो , वा दर्पणात प्रतिबिंब पाहणारा दर्पणाच्या निमित्ताने स्वतलाच पहात असतो .

तैसी अप्रमेयें प्रमेयें भरलीं । मौनाचीं अक्षरें भली ।
रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥ ५५ ॥

तसे अप्रमेय परमात्म्याला प्रमेय रुपानी वर्णन करण्यास ह्या एकत्वाच्या गोष्टी मी मौनाची अक्षरे करुन जुळवुन आनल्या आहेत .
आत्मस्वरुपाचे विशेश वर्णन करणे हे स्वभावत च शक्य नाही, ते केवळ निर्देशानेच दाखवता (?) येते . आपण जी जी म्हणुन उपमा देवु ती ती शब्द रुप असल्याने द्वैतात येते आणि आत्मा त्या वेगळा असा अलिप्तच रहातो . मौना विषयी कितीही भाषण ठोकले तरी मुळ मौन हे त्यापेक्षा अलिप्तच रहाते तसे काहीसे . माऊलींनी ह्या उपर नियोजित उपमा ह्या केवळ निर्देशात्मकच होय .
आत्माराम-
हेंही न घडे बोलणें । आता पार्हेरा किती देणें ।वेदशास्त्रें पुराणें । तेही नासोनि जाती ॥
ग्रंथमात्र जितुका बोलिला । आत्मा त्यावेगळा राहिला ।ये मायेचा स्पर्श जाला । नाहींच तयासी ॥

साधकांसाठी- वरील उपमांचे चिंतन करुन त्या आत्मप्र्तीतीस आणण्याचा प्रयत्न करावा , आणि त्या अनुभवास आल्या की की अनुभता मी ,हा अनुभव , ह्या त्रिपुतीचाही त्याग करावा
आत्माराम -बोलणें तितुकें व्यर्थ जातें । बोलतां अनुभवा येतें ।अनुभव सांडितां तें । आपण होईजे ॥

इयेचें करुनि व्याज । तूं आपणयातें बुझ ।
दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसें ॥ ५६ ॥
ह्या प्रसंगाचे निमित्त करुन , बा चांगया , जसे दीपकाने दीपक पहावा तसे तु स्वतास जाणोन घे

तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी ।
आपणिया आपण भेटी । आपणामाजी ॥ ५७ ॥

ह्या इतक्या गोष्ठी ह्या इतक्या उपमा ह्यांचे तु अवलोकन कर सखया जेणे करुन आपली आपल्याशीच भेटी होईल !

जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव ।
गिळी आपुला उगव । तैसें करी ॥ ५८ ॥

अजुन एक अप्रतिम उपमा - जसे की प्रळय झाला की समुद्र नदी नाले ह्या सार्या उगम स्थानांना गिळुन टाकतो तसेच काहीसे एकदा हा ब्रह्मपळय झाला की त्या ज्ञानाच्या योगाने ह्या ज्ञानाचे जे जे कारण त्या त्या प्रत्येक गोष्टीला गिळुन तु द्न्यानस्वरुपच होवुन जा .

ज्ञानदेव म्हणे नामरूपें । विण तुझें साच आहे आपणपें ।
तें स्वानंदजीवनपे । सुखिया होई ॥ ५९ ॥

ज्ञानदेव म्हनतात की नामरुपाच्यापार तुझे जे आत्मस्वरुप आहे ते जाणोन घेवुन तु त्या अक्षयी स्वानंदपदाचा लाभ करुन घेवुन सुखी हो .

चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति ।
वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसें ॥ ६० ॥

चांगदेवा , मित्रा , तुला वारंवार हेच सांगने आहे की जेव्हा ही ज्ञानसंपत्ती घरी येते तेव्हा देव्य वेदकत्व ह्याच्याही अतीत अशा स्वररुपाचीप्राप्ती होते.

चांगदेवा तुझेनि व्याजें । माउलिया श्रीनिवृत्तिराजे ।
स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥ ६१ ॥

चांगदेवा , मित्रा , तुम्झे तुझ्या कोर्या पत्राचे निमित्त करुन तुला उपदेश करायचे निमित्त करुन श्री गुरु निवृत्तीनाथ माऊलींनी मलाच हा रसाळ खाऊ भरवला आहे . अहाहा .

एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे ।
परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥

ज्ञानदेव आणि चांगदेव हे दोन्ही ज्ञानस्वरुपच असल्याने एका मेकाला पाहो गेले तेव्हा अभिन्न होवुन गेले .
साधकांसाठी -एकदा का देह बुध्दी आत्मबुध्दीत स्थिरावली की हा अनुभव चांगदेवांपुरताच मर्यादित न रहाता सार्वत्रिक होवुन जातो आणि मग तुकोबा म्हणतात तसे विषणुमय जग वैष्णवांचा धर्म ह्याची प्रतीती येते

तियेपरि जो इया । दर्पण करील ओंविया ।
तो आत्माएवढिया । मिळेल सुखा ॥ ६३ ॥

ह्याउपर जोकोणी ह्या ओव्यांचे दर्पण करुन स्वताचे अवलोकन करेल चिंतन करेल तो आत्म्या येवढ्याच अर्थात अनंत सुखाचा लाभ करुन घेईल !

नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे ।
असें तेंचि नेणों आपैसे । तें कीं होइहे ॥ ६४ ॥

बाऊंसर ओवी - संपुर्ण चांगदेव पासष्ठीतील हा सर्वात बाऊंसर ओवी ! साधकांनी हा खचितच पाठ केला पाहिजे अनेक वेळा चिंतन केल्याशिवाय ह्या श्लोकाचे गमक हाती लागणे अशक्य वाटते .
जे दिसत नाही ( अर्थात अदृष्य माया) तेचि नेणो असे अर्थात न जाणता येईल असे आहे , जे दिसते ( अर्थात दृष्य माया ) तेही तसेच मायारुपच असल्याने दिसले तरीही जाणता येईल असे नाही. जे आहे जे की परमात्मस्वरुप , तेही जाणता येत नाही कारण जाणो घेवु झालो तर आपण तेच होवुन जातो !
जी अदृष्य माया ९ अर्थात जी दिअसत नाही म्हणुन आपण नाही असे म्हणतो ते ते सारे ) ती जाणण्याच्या पार आहे . अतर्क्य आहे . जे दिसते तेही दृष्य मायाच असल्याने , या मा सा माया , अर्थात जी कधी झालीच नाही ती माया असे असल्याने तेही अतर्क्य आहे . आता जे आहे अर्थात आत्मस्वरुप त्याचेही जाणणे होत नाही कारण त्याला जाणु जाता , ज्ञेय/ज्ञातव्य , ज्ञाता आणि ज्ञान ही त्रिपुटी लय पावते , मग त्याला तरी कसे जाणावे ?

माऊली माऊली

निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें ।
केलें तैसें जुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥

असे हे निद्रेच्या पलीकडचे निजणे किंवा जागृती गिळुन जागणे अशी ही समाधीची तुर्या अवस्था ( की त्याच्याही अतीत असलेले स्वानंदपद ) त्याचे वर्णन करुन हे काव्य गुंफले आहे असे माऊली म्हणतात !

****************************************************

साधकांनी ग्रंथ वाचताना स्वताला चांगदेव वटेश्वर ह्यांचे जागी कल्पावे आणि ह्या ग्रंथाचे चिंतन करावे. हळु हळु अभ्यासाने अर्थ उमगेल . समर्थ म्हणतात तसे "श्रवण आणि मनन ! ह्या ऐसे नाही साधन ! म्हणिनि हे नित्य नुतन ! केले पाहिजे !!आणि पवहारी बाबा म्हणतात तसे "जन साधन तन सिध्दी " अर्थात साधनेच्या परमोच्च अवस्थेचेच नाव सिधी होय . श्रवण मन निदिध्यासन अखंड करत राहिल्याने एकविध भाव निर्माण होतो आणि जेव्हा चितावर उमटणार्या र्या वृत्तींच्या तरंगाचे आपण अलिप्तप्अणे अवलोकन करु शकतो तेव्हा आपण आपला ह्या जगाशी असलेला अलिप्तपणा जाणु शकतो . मग साधना फळास आली असे म्हणता येईल . अद्वैताविषयीचा संदेह हाच साधनेतील सर्वात मोठ्ठा अडथळा होय . "आत्माराम - संदेह हेंचि बंधन । निशेष तुटलें तेंचि ज्ञान । निःसंदेहीं समाधान । आपैसें होय ॥! "

Never forget the glory of human nature! We are the greatest god.. krisnas,Christs and Buddhas are but waves in the boundless ocean which I AM.” - स्वामी विवेकानंद

द्वैत म्हणुन जो जो संदेह आहे तो तो निशेश लय पावल्यावरच चांगदेव पासष्ठी आत्मप्रचितीने सिध्द होईल !
साधनेतील हा प्रवास चांगदेवापासुन हळु हळु उन्नत होत होत माऊली होण्याचा अन शेवटी निव्रुत्तीमय होवुन जाण्याचा , कल्याणापासुन रामदास होत होत अंती रामरुपच होवुन जाण्याचा , एकनाथापासुन एका जनार्दनी होत सबाह्य अभ्यंतरी तु एक दत्त होवुन जाण्याचा . तुका झाला सांडा पासुन संतांचिये पायी हा माझा विश्वास असे म्हणत नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ही जागृतीची अवस्था ओलांडुन अणु रेणुया थोकडा तुका आकाशा येवढा होत जाण्याचा प्रवास सर्वसाधकांना अनुभवायला मिळो हीच त्या परब्रह्मलिंग पांडुरंगाच्या, सर्वरहित सबउरपुरवासी रामरायाच्या , चिदानंदरुप शिवोहं शिवोहं अशा शिवाच्या चरणी प्रार्थना !

साधकांसाठी - आता येथे विश्रांती घेवुन अरे अरे ज्ञाना झाला से पावन हा अभंग आवर्जुन ऐकावा असा आहे https://www.youtube.com/watch?v=D6pzY4WihVw

जमले तसे उलगडुन लिहिण्याचा प्रयत्न केला . साहित्य म्हणुन किती अभ्यासता आले देव जाणे . पण तरीही
काय एक से एक शब्द एक से एक उपमा वापरल्या आहेत माऊलींनी ! सोनें सोनेपणा उणे । न येतांचि झालें लेणें । किंवा आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा । किंव्वा लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो ।
उधृत म्हणुन करावे तरी किती !
ब्रह्मसुत्र , अमृतानुभव आत्माराम ह्यांच्या तोडीस तोड ग्रंथ तोही फक्त ६५ ओव्यांमध्ये!
पोराला कडेवर घेवुन , खिडकीत उभीराहुन , चांदोमामा दाखवत , एक घास चिऊचा एक घास काऊचा करीत जेव्हा आई दुधभात भरवते , तेव्हा तेव्हा माऊलींची आठवण येते ! माऊलींनी ही असेच काहीसे केले आहे निरनिराळा उपमा देत , आईच्या प्रेमाने एक एक घास भरवत अद्वैताचा वेदान्ताचा खाऊच आपल्याला दिधला आहे ! आणि म्हणुनच चांगदेव पासष्ठी हा मराठी भाषेतील एक मोदकु महारसु ठरतो !! माऊली माऊली !!

पुंडलीकवरदे हरि विठ्ठल ! श्री ज्ञानदेव तुकाराम ! पंढरीनाथ महाराज की जय ! जय जय रघुवीर समर्थ !!

****************************************************
लेख आटोपता घेताना तुकाराम महाराजांचे धरणेकर्याला उद्देशुन लिहिलेले काही अभंग आठवले ते येथे देण्याचा मोह आवरत नाही ... सद्य अवस्था
ह्या पेक्षा काही फार भिन्न नाही ...

माझ्या बापें मज दिधलें भातुकें । ह्मणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥1॥
केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥ध्रु.॥
घेऊनि विभाग जावें लवलाहा । आलेति या ठाया आपुलिया ॥2॥
तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥3॥

ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । ह्मणती ज्ञानदेव ऐसें तुह्मां ॥1॥
मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥
ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे । इतर तुळणें काय पुरे॥2॥
तुका ह्मणे नेणे युक्तीची ते खोलीं । ह्मणोनि ठेविली पायीं डोइऩ ॥3॥

______________________/\_________________________

बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥1॥
करा क्षमा अपराध । महाराज तुह्मी सिद्ध ॥ध्रु.॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥2॥
तुका ह्मणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥3॥

माऊली माऊली !

करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥1॥
कोणाकारणें हें जालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥2॥
तुका ह्मणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥3॥

तुह्मी येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥1॥
आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥
देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥2॥
तुका ह्मणे सेवा समर्पूनि पायीं । जालों उतराइऩ ठावें असो ॥3॥ ॥31॥

पांडुरंग पांडुरंग

*******************************************************************
संदर्भ -
चांगदेवपासष्टी
http://satsangdhara.net/dn/ch_pasashti.htm
http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4...
समओवी चांगदेवपासष्टी http://www.transliteral.org/pages/z121027113427/view
सार्थ अमृतानिभ आ़णि चांगदेव पासष्ठी ( प्रकाशक मिलिंद जोरी सारथी प्रकाशन पुणे )
ज्ञानेश्वरी http://satsangdhara.net/dn/dnya.htm
भावार्थ ज्ञानेश्वरी ( डॉ.विजय पांढरे ) http://www.ednyaneshwari.com/
तुकाराम गाथा http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4...
दासबोध http://satsangdhara.net/db/das.htm
आत्माराम http://satsangdhara.net/db/atmaram.htm
धरणेकऱ्याचे अभंग http://tukaram.com/marathi/lekh/dharanekaryache_abhang.asp
हभप बाबामहाराज सातारकर ह्यांची युट्युब वरील प्रवचने
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर ह्यांची युट्युब वरील प्रवचने

*******************************************************************

हरि ॐ तत्सत ब्रह्मार्पणमस्तु !!

*******************************************************************

संस्कृतीधर्मशुभेच्छामत

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Feb 2015 - 10:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बोsssSssssSSSsला पोपपंथीय ध.गु.ह.भ.प.रा.रा.श्री.श्री. प्रगो (गिर्जागाव प्रतिष्ठान) म्हाराज की जय...बोला पुंडलिक वर्दे हाsssSssssरी विठ्ठल!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मस्तं जमलाय लेख गुरुमाउली _/\_

पैसा's picture

28 Feb 2015 - 10:38 am | पैसा

सुरुवात वाचली आहे. नीट वाचून आकलन करून घ्यायला वेळ लागेल. ही निव्वळ एका चांगल्या लेखासाठी पोच!

आनन्दिता's picture

1 Mar 2015 - 4:57 am | आनन्दिता

+१ हेच म्हणते,

आदूबाळ's picture

28 Feb 2015 - 12:47 pm | आदूबाळ

वा.... या बात!

स्वाती२'s picture

28 Feb 2015 - 5:19 pm | स्वाती२

सावकाशीने वाचेन.

अजया's picture

28 Feb 2015 - 5:27 pm | अजया

अप्रतिम अप्रतिम _/\_

कवितानागेश's picture

1 Mar 2015 - 4:34 am | कवितानागेश

:)

सस्नेह's picture

1 Mar 2015 - 7:49 am | सस्नेह

या(ही) शास्त्रावरील प्रभुत्व आवडले +)

स्पा's picture

1 Mar 2015 - 10:48 am | स्पा

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2015 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख चाळला. सवडीने दाद देतो. तो पर्यंत पोच.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

1 Mar 2015 - 6:38 pm | प्रचेतस

सुंदर लेख.

ह्यावरून हरिश्चंद्रगडावरच्या चांगदेवांच्या शिललेखांची आठवण झाली.

बॅटमॅन's picture

2 Mar 2015 - 2:36 pm | बॅटमॅन

व्वाह!!!!! क्या बात!!!!

आता जरा सवडीने आरामात वाचतो.

बाकी शोणितवर्णकुपिका तर होणारच ;) ह.घ्या.

अन्या दातार's picture

2 Mar 2015 - 2:39 pm | अन्या दातार

छान लेख. वाखु साठवली आहे. सवडीने वाचेन.

नाखु's picture

2 Mar 2015 - 4:19 pm | नाखु

सवडीने वाचेन
कारण दी$$$$$$$$$$$र्घ लेख आणि आमची किमानोत्तर आकलनक्षमता..

गामा पैलवान's picture

12 Aug 2016 - 11:15 pm | गामा पैलवान

मार्कस,

सहज म्हणून वाचला लेख. बेचाळीसावी ओवी विशेषकरून भावली. चांगदेवांशी देहभेट झाल्यावर अद्वैतभेट विसकटण्याची भीती माऊलींना का वाटावी? यावरून नुकताच वाचलेला एक (इंग्रजी) लेख आठवला. त्यात म्हंटलं होतं की जीवन हे मुळातून पौंजिक (quantum) असले तरी स्थूल (classical) जगांशी समतोल साधून असते. स्थूल जगाची वादळे सहन करत जीवन आपले पौंजिक अस्तित्व टिकवून धरते.

माऊलींना नेमकी हीच भीती वाटंत असावी. जर स्थूलभेट झाली, तर अद्वैतभेट म्हणजे quntum coherence लय पावेल. लेख मुळातून वाचण्याजोगा आहे. इथे मिळेल : https://aeon.co/essays/quantum-weirdness-is-everywhere-in-the-living-world

अगदीच राहवलं नाही म्हणून महत्त्वाचा भाग खाली डकवतोय :

>> Molecular vibrations are the mortal enemy of quantum coherence. How, then, does life manage
>> to maintain its molecular order for long enough to perform its quantum tricks in warm and wet
>> cells? That remains a profound riddle. Recent research offers a tantalising hint that, instead of
>> avoiding molecular storms, life embraces them, rather like the captain of a ship who harnesses
>> turbulent gusts and squalls to maintain his ship upright and on-course. As Schrödinger predicted,
>> life navigates a narrow stream between the classical and quantum worlds: the quantum edge.

आ.न.,
-गा.पै.