जा जरा पूर्वेकडे (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
27 Feb 2015 - 5:05 am

संघर्ष हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. माणसाच्या जवळजवळ ३५०० वर्षांच्या लिखित इतिहासात अजिबात कुठल्याही प्रकारचा संघर्ष नसलेली वर्षे जेमतेम २०० असतील. जसजशी माणसाने भौतिक प्रगती केली, तसतशी प्रगती संघर्षांमध्येही होत गेलेली आहे. विसाव्या शतकातल्या दोन महायुद्धांनी तर हे सिद्ध केलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा माणसांना मारण्यासाठी फार प्रभावीपणे वापर करता येतो. इतर प्राणी गरज असेल तरच दुस-या प्राण्यांची शिकार करतात. पण माणूस नुसती इतर प्राण्यांचीच नव्हे तर माणसांचीही शिकार करतो आणि तेवढंच करून थांबत नाही तर विचारसरणी आणि तत्वज्ञान यांच्या कुबड्या वापरून त्याचं समर्थनही करतो.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ' जा जरा पूर्वेकडे ' ही कविता माणसाच्या याच पाशवी वृत्तीवर भाष्य करते. या कवितेतून व्यक्त होणारे कुसुमाग्रज हे ' क्रांतीचा जयजयकार ', ' पृथ्वीचे प्रेमगीत ', ' कोलंबसाचे गर्वगीत ', ' आगगाडी आणि जमीन ' - अशा कवितांमधून वेगवेगळ्या भावना समर्थपणे हाताळणारे कवी नाहीत तर युद्धाच्या भयानकतेवर आणि इतकी संहारक युद्धं करूनदेखील शहाणपण न सुचणा-या माणसाच्या कोडगेपणावर उपरोध आणि संताप यांनी कोरडे ओढणारे आणि राज्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षेमध्ये बळी पडणा-या सामान्यांचं प्रतिनिधित्व करणारा एक माणूस आहेत.

युद्धांवर याआधी कविता झालेल्या नाहीत असे नाही, पण बहुसंख्य कवितांनी युद्धातला वीररस किंवा मग क्वचित रौद्ररस हाताळलेला आहे. खुद्द कुसुमाग्रजांच्याच ' वेडात मराठे वीर दौडले सात ' मध्ये वीररस, रौद्ररस आणि करुणरस हे तिन्हीही आहेत. पण युद्धाची भयानकता आणि बीभत्सपणा नेमक्या आणि प्रभावी शब्दांत व्यक्त करणारी ' जा जरा पूर्वेकडे ' ही एक जबरदस्त कविता आहे. पूर्ण कविता अशी आहे -

जा जरा पूर्वेकडे
वाळवंटी कोरता का एक श्वानाचे मढे?
जा गिधाडांनो पुढे
जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेतांचा पडे
जा जरा पूर्वेकडे
आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा
भागवा तेथे तृषा
ढीग साराया शवांचा तेथ लागे फावडे
जा जरा पूर्वेकडे!
गात गीते जाऊ द्या हो थोर तांडा आपुला,
देव आहे तोषला
वर्षता त्याचा दयाब्धी राहता का कोरडे
जा जरा पूर्वेकडे!
तेथ देखा आग वेगाने विमाने वर्षती
थोर शास्त्रांची गती
धूळ आणि अग्नी यांच्या दौलती चोहीकडे
जा जरा पूर्वेकडे!
खड्ग लावूनी उराला बायकांना वेढती
आणि दारी ओढती
भोगती बाजारहाटी मांस आणि कातडे
जा जरा पूर्वेकडे!
आर्त धावा आईचा ऐकूनी धावे अर्भक
ना जुमानी बंदूक
आणि लोंबे संगिनीला छान छोटे आतडे
जा जरा पूर्वेकडे!
हा दयेने ईश्वराच्या काळ आहे चालता
व्यर्थ येथे राबता
व्यर्थ तेथे शोणिताचे वाहुनी जाती सडे
जा जरा पूर्वेकडे!
आणि येताना पवाडे संस्कृतीचे गा जरा
डोलू द्या सारी धरा
मेघमालेतून आम्हा शांततेचे द्या धडे
जा जरा पूर्वेकडे!

आपली साम्राज्यतृष्णा भागवण्यासाठी जपानने १९३७ मध्ये चीनवर आक्रमण केलं. जपानी सैनिक कडवे लढवय्ये होतेच, शिवाय चिनी लोक आपल्यापेक्षा वांशिक दृष्ट्या हीन आहेत असा त्यांचा दृढ विश्वास होता. परिणामी जपानी सैनिकांनी चीनमध्ये लुटालूट, कत्तल, बलात्कार आणि जाळपोळ यांचं अभूतपूर्व थैमान घातलं. हाँगकाँग, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया आणि फिलिपाईन्स यांच्याकडे जपानची वक्रदृष्टी वळू नये म्हणून ब्रिटन आणि अमेरिका यांनी या अत्याचारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि जपानला चीनचे लचके तोडू दिले. ही या कवितेची पार्श्वभूमी आहे. या युद्धात जरी ब्रिटिशांनी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी चिन्यांना वैद्यकीय मदत केली होती. महाराष्ट्राचे सुपुत्र डाॅ. द्वारकानाथ कोटणीस हे अशाच एका वैद्यकीय पथकातून चीनमध्ये गेले होते. या युद्धाच्या बातम्या त्यामुळे भारतात पोहोचत होत्या आणि त्याचबरोबर तिथल्या अत्याचारांच्याही. त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेने या कवितेला जन्म दिलेला आहे. आणि आज कुठल्याही युद्धावर ती तितक्याच समर्थपणे भाष्य करते.

कविता वाचताना सर्वात प्रथम जाणवते ती कवितेची दृष्यात्मकता. प्रत्येक ओळ आपल्या डोळ्यासमोर एक एक भयानक चित्र उभं करते. A Picture is worth thousand words असं म्हणतात आणि ते खरंही आहे पण ही कविता वाचल्यावर जाणवतं की Words can also be worth thousand pictures! अजून एक गोष्ट जाणवते तो म्हणजे कठोर व्यंजनांचा वापर. ' वाळवंटी कोरता का एक श्वानाचे मढे, जा गिधाडांनो पुढे ' ही ओळ तर भर दुपारचं रखरखीत वाळवंट, कुत्र्याच्या मौतीने मेलेली माणसं आणि त्यांच्यावर कर्कश्य चीत्कार करत झेपावणारी गिधाडं इतक्या प्रत्ययकारी रीतीने आपल्यासमोर उभं करते की अंगावर सर्रकन् काटा येतो.

आणि आता हा अस्वस्थ झालेला माणूस प्रश्न विचारायला सुरूवात करतो - हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सुष्ट-दुष्ट आणि देव-राक्षस या संकल्पना त्याला कचकड्याच्या वाटू लागतात - युद्धात विनाकारण मारल्या गेलेल्या लोकांनी काय पाप केलं होतं? जर त्यांनी कुठल्यातरी देवाची आराधना केली होती तर एवढं भीषण मरण त्यांच्या नशिबी का? त्याच्या कृपेचा वर्षाव या लोकांवर झालाच नाही का? आणि तसं जर असेल तर का?

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमधला एक विरोधाभास हा आहे की एकाच विज्ञानाने माणसाला तारणारी आणि मारणारी अशी दोन्ही साधनं निर्माण केलेली आहेत. हा विरोधाभास व्यक्त करण्यासाठी कुसुमाग्रज उपरोधाचा वापर करतात. शास्त्रांची गती थोर आहेच. ज्या विमानांनी माणसाचा संचार इतका सहजसुलभ केला त्याच विमानांचा वापर आकाशातून आग बरसवण्यासाठीही होतो हा त्याच थोरपणाचा पुरावा आहे.

स्त्रिया आणि मुलं हे कुठल्याही संघर्षात शोषित असतात. शत्रूच्या स्त्रिया पळवून त्यांचा उपभोग घेणं आणि लहान मुलांना ठार मारून शत्रूची पुढची पिढी खच्ची करणं हे जगात सगळ्याच आक्रमकांनी केलेलं आहे. पण इथे कुसुमाग्रजांना निव्वळ स्त्रिया आणि मुलं अभिप्रेत आहेत असं मला वाटत नाही. संस्कृती, निर्मिती आणि निरागसता यांचा युद्धात जो अपरिहार्य बळी जातो त्याच्या अनुषंगाने स्त्रिया आणि मुलं या प्रतिमा वापरलेल्या आहेत.

महाभारतातील युद्ध हे खरोखर घडलं होतं का ती कविकल्पना आहे हा वाद जर आपण क्षणभर बाजूला ठेवला तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की महाभारतात कुठेही युद्धाचं उदात्तीकरण केलेलं नाही. उलट युद्धात कोणीच विजयी होत नाही, जेत्यालाही विनाशाला सामोरं जावं लागतं असंच महाभारतात ठासून सांगितलेलं आहे आणि आजच्या युद्धांच्या बाबतीतही ते तितकंच लागू आहे. रक्तपाताने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, उलट नवे प्रश्न निर्माण होतात. पण युद्धपिपासू माणसाला हे अजूनही लक्षात येत नाही. प्रत्येक युद्धानंतर माणसाला या फोलपणाची नव्याने जाणीव होते, शांततेचा उद्घोष होतो आणि माणूस परत नव्या युद्धाची तयारी करतो. इतिहासाची पुनरावृत्ती होते. हा कोडगेपणा बघून येणारी विषण्णता आणि त्यातून निर्माण होणारा उपरोध या कवितेच्या शेवटी आहे.

आज जेव्हा ही कविता आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की १९३७-३८ मध्ये जेव्हा कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिली तेव्हाची परिस्थिती जरी वेगळी असली तरी माणसाची युद्धांपासून सुटका झालेली नाही. धर्म, जात, जमीन यांच्यावरुन आजही माणसातलं पशुत्व जागं होतं आणि संघर्षाला सुरूवात होते. पण ही कविता निराशावादी आहे का? तर नाही. या अंधःकारातून केवळ सद्सद्विवेकबुद्धीचा सूर्यच माणसाची सुटका करु शकेल आणि त्यामुळे माणसाने तो सूर्योदय घडवायला पूर्वेकडे जायलाच पाहिजे असा एक आशावादी दृष्टिकोनही ही कविता देते. माणसाचा आजवरचा इतिहासही तेच सांगतो की अनेकवेळा सर्वनाशाच्या कड्यापर्यंत येऊनही मानवी समाज अजून टिकून आहे तो या शेवटच्या क्षणी जागृत होणा-या विवेकी वृत्तीमुळे!

या कवितेआधी आणि नंतरही कुसुमाग्रजांनी कविता लिहिल्या पण या एका कवितेतून जाणवणा-या त्यांच्या द्रष्टेपणामुळेच ते कविश्रेष्ठ आहेत आणि राहतीलही!

वाङ्मयप्रकटनआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

चिमणीकडे लक्ष ठेवून, डोळे किलकिले करून झडप घालायच्या तयारीतला बोका कवितेचं सुरेख रसग्रहणही करू शकतो?

hitesh's picture

27 Feb 2015 - 6:28 am | hitesh

महाभारतात कुठेही युद्धाचं उदात्तीकरण केलेलं नाही. उलट युद्धात कोणीच विजयी होत नाही, जेत्यालाही विनाशाला सामोरं जावं लागतं असंच महाभारतात ठासून सांगितलेलं आहे ..

.......

असं महाभारतात अर्जुनाने कृष्णाला ठासुन सांगितले.

पण तू फक्त निमित्तमात्र , मीच मारणारा वगैरे सांगुन कृष्णाने त्याला युद्धासाठी प्रवृत्त केले.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी त्यांच्या सुंदर कवितेचे अप्रतिम रसग्रहण.

ही कविता जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा डोळे भरून आल्याशिवाय राहवत नाहीत. युद्ध करणारे, त्याला चिथावणी देणारे आणि लांबून मजा बघणारे अशा सर्वच घटकांना त्यांच्या कृत्यांचा जाब विचारणे हे विवेकवादाला धरून होईल, पण त्यामुळे त्यांच्या विचारसरणीत काही फरक पडेल अशी आशा करणे फारच निरागसपणाचे ठरेल. युद्ध कित्येकदा अपरिहार्य असतेही, ते लढावेही, पण त्यात काही विधिनिषेध नावाचा प्रकार गुंडाळून ठेवणे हे अत्यंत चीड आणणारे आहे.

आणि जपान्यांच्या चीन व कोरियावरील त्या अत्याचारांबद्दल काय बोलावे! नाझी जर्मनीने केलेला हॉलोकास्ट (ज्यू वंशविच्छेद) सर्वांना माहित असतो, पण त्यापेक्षाही भयानक नानजिंग बलात्कारांबद्दल अजूनही सामान्य जनतेत तितकीशी माहिती नाही हे किती वाईट आहे!

प्रचेतस's picture

27 Feb 2015 - 12:13 pm | प्रचेतस

अप्रतिम रसग्रहण. स्वॅप्स यांचा प्रतिसादही समर्पक.

फार अस्वस्थ करता बोका ए आझम तुम्ही. मनात घुसून मेंदुला बधिर करून टाकता.

( लेख सुंदर आहे. धन्यवाद.)

पैसा's picture

27 Feb 2015 - 1:59 pm | पैसा

कुसुमाग्रजांच्या शब्दांसमोर नतमस्तक आहे. त्यांच्या एका अद्वितीय कवितेचं तेवढंच सुरेख रसग्रहण. धन्यवाद बोकेश!

अप्रतिम कविता आणि छान रसग्रहण. बहुत धन्यवाद बोका ए आझम.

वेल्लाभट's picture

27 Feb 2015 - 2:38 pm | वेल्लाभट

दर्जा !

हाही शब्द फारसी आहे, मराठी नाही =))

प्रदीप's picture

27 Feb 2015 - 3:02 pm | प्रदीप

.

अप्रतिम कविता आणि छान रसग्रहण

उगीच वाचली कविता असं वाटलं. किती भयानक!

विशाखा पाटील's picture

28 Feb 2015 - 11:10 am | विशाखा पाटील

रसग्रहण आवडलं. लेखातले मुद्दे वाचतांना विल्फ्रेड ओवेनची 'Strange Meeting' ही कविता आठवली.

प्रखर राष्ट्रवाद, लोकशाहीला झिडकारून लष्करशाही प्रबळ होणं, वंशद्वेष, देशातल्या समस्यांवरून नागरिकांचं लक्ष विचलित करण्यासाठी इतर देशांवर आक्रमण करणं ही लक्षणं जर्मनी, इटली आणि जपान यांच्यामध्ये त्या वेळी सारखीच होती.